Thursday, 18 June 2015

शहरे स्मार्ट झाली, नागरीक कधी होणार ?चांगल्या शहरांमध्ये, सार्वजनिक जागा तसेच इमारतींची व्यवस्थित रचना केली जाते व त्यानंतर ती बांधली जातात: खाणे, झोपणे, पादत्राणे तयार करणे किंवा प्रेमासाठी किंवा संगीतासाठी आत जाण्याऐवढेच चालणे, झोपणे, सार्वजनिक ठिकाणी जाणे हे त्या रचनेचा व हेतूचा अविभाज्य भाग आहेत. नागरिकांचा संबंध शहरांशी असतो, व आदर्श शहर हे नागरिककेंद्रित असते सार्वजनिक जीवनातील सहभाग हा त्याचा गाभा असतो.”
                                       …
रेबेका सॉलनिट.

रेबेका सॉलनिट ही लेखिका असून सॅनफ्रँसिस्को, कॅलिफोर्निया येथे राहते. तिने पर्यावरण, राजकारण, विविध स्थळे व कला अशा वैविध्यपूर्ण विषयांबाबत लिहीले आहे. ती जगातल्या बहुदा सर्वोत्तम शहरांपैकी एक असलेल्या शहरात राहते म्हणूनच तिचा शहराविषयीचा दृष्टिकोन अतिशय खुला व सामाजिक भान असलेला आहे. यामुळेच ती नागरी नियोजन विशेषतः शहर नियोजन या विषयातील अतिशय महान समीक्षक मानली जाते! गेल्या वर्षभरात शहरी भारतामध्ये सर्वाधिक कोणता शब्द वापरण्यात आला किंवा त्याचा संदर्भ देण्यात आला? अर्थातच याचं उत्तर आहे स्मार्ट सिटी! म्हणूनच या लेखाच्या सुरुवातीला मी रिबेकाचे अवतरण वापरले. मी काही नगर नियोजक नाही किंवा नागरी रचनाकार नाही तरीही कुठेतरी माझ्या व्यवसायामुळे माझा शहर या शब्दाशी अतिशय जवळचा संबंध आला आहे! रिअल इस्टेट हा एक असा व्यवसाय आहे जो शहरी जीवनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे किंवा त्याचे उपउत्पादन आहे. म्हणूनच मी जेव्हा स्मार्ट सिटी हा शब्द ऐकला तेव्हा माझे विचारचक्र सुरु झाले व या शब्दाविषयी शक्य तेवढी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत होतो!  अनेक तत्ववेत्ते, नियोजक व वास्तुविद्याविशारदांच्या मते प्रत्येक शहराचा एक चेहरा असतो व तो नागरिकांनी दिलेला असतो, म्हणूनच मी जेव्हा स्मार्ट सिटी हा शब्द ऐकला तेव्हा मी विचार करु लागलो की स्मार्ट सिटीचा अर्थ काय होतो? याचा अर्थ संपूर्ण शहरामध्ये वायफायसारखी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देणे किंवा सिग्नलपासून ते सांडपाणी ते पाणीपुरवठा या सर्व पायाभूत सुविधांचे संगणकाद्वारे नियंत्रण करणे असा अर्थ होतो का? एक शहर विचार करु शकते का किंवा शहराचा एकच व्यक्ती म्हणून विचार केला जाऊ शकतो का जिला आपण स्मार्ट म्हणू शकू, आपण शहराला नेमके कशाप्रकारे स्मार्ट बनवू शकू? या पार्श्वभूमीवर स्मार्ट शहरांची गरज का जाणवत आहे हे आपण पाहिले पाहिजे? चंदिगड किंवा अहमदाबाद म्हणजेच गांधीनगर किंवा नवी दिल्ली किंवा नवी मुंबईचा काही भाग विकसित व सुनियोजित नाहीत का ज्यांचे नियोजन नागरिकांना एक चांगले जीवन देण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आले? त्यानंतर मुंबई, बंगलोर, चेन्नई व कोलकाता यासारखी महानगरे आहेत ज्यामध्ये प्रचंड क्षमता आहे व अनेक वर्षांपासून अब्जावधी लोक या शहरांचे नागरिक आहेत! असे असताना आणखी स्मार्ट सिटीची काय गरज आहे?
याचे उत्तर आपल्या शहरांच्या सद्यस्थितीमध्ये आहे तसेच गेल्या काही दशकात झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामध्ये आहे. २००० पर्यंत आपण निम शहरी देश होतो बहुतेक जनता लहान शहरांमध्ये किंवा गावांमध्ये राहात होती. मात्र अचानक एखादा हत्ती झोपेतून उठून पळत सुटावा त्याप्रमाणे इंटरनेटने आपल्या शंभरकोटीहून अधिक जनतेचा ताबा घेतला, झपाट्याने शहर व गावांमधील सामाजिक सीमारेषा पुसट होत गेल्या, कुणाच्याही लक्षात येण्यापूर्वीच हे झाले! पूर्वी एखाद्या खेड्यातल्या किंवा लहानशा गावातल्या माझ्यासारख्या मुलाने मुंबईसारख्या शहरातील आरामदायक सदनिका केवळ चित्रपटातच पाहिल्या होत्या व आम्ही ज्या परिस्थितीमध्ये राहात होतो त्याविषयी आनंदी व समाधानी होतो. मुंबईमध्ये राहणा-या एखाद्या मुलाची सॅनफ्रँसिस्कोसारख्या शहरातील राहणीमानाविषयीही अशीच परिस्थिती होती त्याला ते एखाद्या हॉलिवुडपटात किंवा मोठ्या बजेटच्या हिंदी चित्रपटात पाहायला मिळायचे. मात्र त्यानंतर माहिती तंत्रज्ञान व सॉफ्टवेअरचे युग आले, आता अगदी गावातल्या मुलांनाही अंबानीच्या अंटिलिया या निवासस्थानाविषयी माहिती मिळू शकते, पुणेरी पेठेतला एखादा मुलगा आता नियमितपणे अमेरिकेतल्या बे एरियाला प्रवास करतो. या बदलांमुळे लोकांच्या ते राहात असलेल्या परिसराविषयीच्या अपेक्षा वाढल्या आहेत! याचे कारण म्हणजे त्यांनी चांगले आयुष्य म्हणजे काय हे प्रत्यक्ष पाहिले आहे, जो चांगल्या पायाभूत सुविधांचा परिणाम आहे (या संकल्पनेविषयी माझे थोडे वेगळे मत आहे मात्र आपण या मुद्याविषयी नंतर चर्चा करु) व आता लोक संपूर्ण शहरात चांगल्या पायाभूत सुविधांची मागणी करत आहेत!  म्हणूनच आपल्या सध्याच्या शासनकर्त्यांनी स्मार्ट सिटी ही संकल्पना तयार केली असावी असे मला वाटते! पुढील निवडणुकीपर्यंत पन्नास टक्क्यांहून अधिक मतदार शहरी भागातील असतील व ते शहरातील त्यांच्या परिसराविषयी तसेच शहरात त्यांना मिळणा-या सुविधांविषी आनंदी नसतील तर निवडणुकांचा निकाल काय असेल हे सांगायला आपल्याला कुणा ज्योतिषाची गरज नाही व आजचे राज्यकर्ते हे समजून घेण्याएवढे स्मार्ट आहेत!

आता स्मार्ट शहरांची संकल्पना मांडण्यात आली आहे मात्र मला असे वाटते की स्मार्ट सिटी म्हणजे नेमके काय हे समजावून सांगण्याची एक प्रमाणभूत पद्धत असली पाहिजे, मात्र सध्या तसे होताना दिसत नाही व अगदी सर्वोच्च नोकरशहा किंवा राजनैतिक अधिका-यांनाही स्मार्ट सिटी प्रत्यक्षात कशा साकारणार आहेत हे स्पष्ट नाही अशी सध्या परिस्थिती आहे. इथे मला ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टोयोटा कसे काम करते हे आठवले; मी पुण्यातील त्यांच्या एका सेवा केंद्राचे काम करत होतो, त्यांनी आम्हाला स्वागत कक्षातील प्रतीक चिन्हापासून ते सर्विस बेच्या आकारापर्यंत प्रत्येक गोष्टीचा तपशील आपल्या दस्तऐवजात पाठवला त्यामुळे कोणतीही शंका उरली नाही किंवा माहिती द्यायची राहिली नाही, यामुळे अमेरिकेच्या कोणत्याही महामार्गावरील सेवा केंद्रासारखेच ते दिसू लागले! आपल्यालाही याचीच गरज आहे, स्मार्ट सिटी ही संकल्पना आधी दस्तऐवजांमध्ये तपशीलाने स्पष्ट केली पाहिजे व सर्व संज्ञांच्या व्यवस्थित व्याख्याही त्यामध्ये असल्या पाहिजेत. त्यासाठी एक दोन वर्ष लागली तरी चालतील मात्र ते झाले पाहिजे, कारण कल्पना कितीही चांगली असली तरीही ती स्थानिक पातळीवर राबवताना तिचे काय होते हे विशेषतः आपण आपल्या प्रिय पुणे शहराच्या बाबतीत पाहिले आहे! कुप्रसिद्ध बीआरटीचे काय झाले ते पाहा; आपण चक्क मिश्र बिआरटी ही  नवीनच संकल्पना शोधून काढली आहे, केवळ स्थानिक संस्थाच त्याचा नेमका काय अर्थ होतो हे सांगू शकतात, कारण जिथे दुभाजक उभारण्यात आले आहेत तो मार्ग केवळ बससाठी आहे व जेथे नाहीत तो रस्त्यावरील रहदारीचा भाग आहे कि झाली बी. आर. टी ! मी एक धम्माल चित्रपट पाहिला होता त्याचे नाव होते, "गॉड्स मस्ट बी क्रेझी”, मला असे वाटते आपण आपल्या सार्वजनिक परिवहनाची व बीआरटीची जी परिस्थिती केली आहे त्यावर पुणेकर्स मस्ट बी क्रेझी”! नावाचा एक चित्रपट तयार होऊ शकतो.!
स्मार्ट सिटी या संकल्पनेशी संबंधित लोकांनाच जर तिचे सार समजले नसेल तर संपूर्ण संकल्पनाच वाया जाईल अशी मला चिंता वाटते! ही संकल्पना कशाप्रकारे राबवायची आहे याची माहिती पुस्तिका तयार करणे अतिशय महत्वाचे आहे कारण ही संकल्पना सर्वोच्च पातळीवर तयार करण्यात आली असली तरीही तिची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर केली जाणार आहे! ज्या शहरामध्ये नवीन रस्ता, जलवाहिनी घालण्यापासून ते ऑप्टिकल फायबर केबल घालण्यापर्यंत विविध कारणांसाठी खणला जातो, तिथे स्मार्ट सिटीची अंमलबजावणी कशी करायची याची मार्गदर्शक तत्वे व्यवस्थित स्पष्ट केली नसल्यास काय होईल याचा आपण विचार करु शकतो.  दुसरा घटक म्हणजे स्मार्ट सिटी संकल्पना राबविताना प्रत्येक कामाची जबाबदारी स्पष्ट करणे आवश्यक आहे नाहीतर सीसी टीव्ही बसविण्यासारखी परिस्थिती होईल; वाहतुकीचा गोंधळ, सिग्नल तोडण्याचे प्रकार नियंत्रित करण्यासाठी संपूर्ण शहरात कॅमेरे बसविण्यात आले. मात्र त्यांचा काहीही उपयोग झाला नाही कारण या कॅमे-यांची देखभाल कुणी करायची व त्यातून मिळणा-या लाखो छायाचित्रांवर कुणी प्रक्रिया करायची असा प्रश्न निर्माण झाला, कारण कॅमे-यांची देखभाल करायची जबाबदारी घ्यायला पीएमसीही तयार नाही किंवा पोलीसही तयार नाहीत, त्यामुळे त्या कॅमे-यांमधून मिळणा-या छायाचित्रांद्वारे कारवाई करणे तर दूरच राहीले!

पीएमसीने सांडपाण्याच्या वाहिनीसाठी किंवा जलवाहिनीसाठी रस्ता खणला तर काहीही शुल्क आकारले जात नाही मात्र तेच एमएसईडीसीएलने वीजेच्या तारा घालण्यासाठी रस्ता खणला तर ५०००/मीटर रुपये एवढ्या प्रचंड दराने शुल्क आकारले जाते! आता यातली मजेशीर बाब म्हणजे सांडपाणी, जलवाहिनी, वीजेच्या तारा या सर्व सार्वजनिक पायाभूत सुविधांचाच एक भाग आहेत, असे विनोद केवळ याच शहरात होऊ शकतात! या पार्श्वभूमीवर शहराला स्मार्ट सिटी बनविण्यात कोणत्या अडचणी आहेत हे लक्षात येऊ शकते, प्रशासन संस्थांमधील समन्वयापासून हा स्मार्टपणा आला पाहिजे कारण शेवटी त्याच ही संकल्पना राबविणार आहेत. म्हणूनच स्मार्ट सिटी उभारताना नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करणे महत्वाचे आहे व जबाबदारी दिल्यानंतर संबंधित संस्था ती पूर्ण करु शकली नाही तर काय हे देखील अतिशय स्पष्ट असले पाहिजे तरच लोक काम करतील!

कोणताही स्मार्टपणा हा तुम्हाला जाणवला पाहिजे, अनुभवता आला पाहिजे कारण शेवटी एखादे शहर स्मार्ट आहे किंवा नाही हे तुम्ही कसे ठरवणार आहात? नागरिकांच्या जीवनाच्या दर्जातून हे दिसून येईल व शहरात राहताना दैनंदिन जीवनात कमीत कमी त्रास व्हावा एवढीच सामान्य माणसाची माफक अपेक्षा असते. रस्ते खणण्यात कोणतीही समस्या नाही मात्र ते वेळेत व व्यवस्थित बुजवावेत एवढेच रस्त्यावरुन जाणा-या व्यक्तिची अपेक्षा असते. लोक मालमत्ता कर द्यायला तयार आहेत मात्र कराच्या पावतीवर नमूद करण्यात आलेल्या सेवा त्यांना मिळाल्या पाहिजेत. रस्त्यावरील अपघातामध्ये एखादा भटका कुत्रा मरण पावला तर त्याचा मृतदेह अनेक दिवस तसाच कुजत पडलेला असतो, तरीही तो कुणी उचलत नाही ही सद्य परिस्थिती आहे शहराची ! स्मार्ट सिटीमध्ये प्रत्येक सेवा देण्यासाठी कोण जबाबदार आहे हे लोकांना माहिती असले पाहिजे व त्या सेवेसंदर्भात काहीही समस्या निर्माण झाल्यास उत्तर देण्यासाठी कुणीतरी जबाबदार व्यक्ती असली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे

आणखी एक अतिशय महत्वाचा घटक म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये कोणत्याही विकासाशी संबंधित आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या वेळच्या वेळी मिळविणे, कारण कोणताही विकास खाजगी क्षेत्राच्या सहभाशिवाय होऊ शकत नाही. इथे एखाद्या प्रामाणिक विकासकाला किंवा कोणत्याही व्यावसायिकाला दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागतो; एकीकडे त्याला त्याच्या व्यवसायासाठी सर्वप्रकाराच्या परवानग्या घ्याव्या लागतात कारण तो सर्व काही कायदेशीरपणे करत असतो तर दुसरीकडे त्याला बेकायदेशीर व्यावसायिकांच्या स्पर्धेला तोंड द्यायचे असते जे कोणत्याही कायद्याचे पालन करत नाहीत व तरीही चालून जाते!  प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये कायद्याचा आदर असला पाहिजे, मग तो किंवा ती कुणीही असो, जे सध्या होताना दिसत नाही. या शहरामध्ये सिग्नल पाळण्यासारख्या मूलभूत कायद्याचे पालनही केवळ वाहतूक पोलीस असेल तरच केले जाते व वाहतूक पोलीसही प्रवाशांनी सिग्नल तोडू नये असा प्रयत्न करण्याऐवजी त्यांनी सिग्नल तोडल्यानंतर त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात व्यस्त असतात!

स्मार्ट शहर बनविण्यासोबतच नागरिकांनाही स्मार्ट नागरिक बनविणे तितकेच महत्वाचे आहे! मी अलिकडेच पुण्यातल्या माझ्या प्रभागातील  सर्व नाल्यांवरील व नैसर्गिक ओढ्यांवरील पुलांच्या कडेने जवळपास २० फूट उंच जाळ्या लावलेल्या पाहिल्या. मी पीएमसीच्या माझ्या एका मित्राला विचारले की याचे काय कारण आहे तर त्याने उत्तर दिले की लोकांनी नाल्यामध्ये कचरा फेकू नये म्हणून त्या उभारण्यात आल्या आहेत! आता या शहरामध्ये पुढे काय होईल हे देवालाच माहिती? लोकांनी रस्त्यावर थुंकू नये म्हणून त्यांच्या तोंडावर मास्क लावायचा का किंवा नागरिकांना इतस्ततः कचरा फेकू नये यासाठी त्यांच्याभोवती साखळ्यांचा पिंजरा बनवायचा का किंवा एखादा नागरिक कायद्याचे उल्लंघन करत नाही ना यावर देखरेख करण्यासाठी प्रत्येकाच्या मागे एक सीसी टीव्ही कॅमेरा बसवायचा  इतकंच बाकी राहिले आहे आता ! स्मार्टपणा हे कोणत्याही शहराचे वैशिष्ट्य किंवा त्यामागची संकल्पना असू शकते व तुम्ही कोणत्याही शहराचे नियोजन व विकास स्मार्ट संकल्पनांच्या आधारे करु शकता. मात्र केवळ त्या शहरामध्ये राहणारे नागरिक स्वतःच्या वर्तनाने कोणतेही शहर स्मार्ट ठेवू शकतात! स्मार्ट शहरांची संकल्पना मांडणारे सर्वोच्च अधिकारीही ही बाब समजून घेतील अशी आशा करु व त्यानंतरच स्मार्ट सिटी हा शहराची संकल्पना साकार करु, नाहीतर स्मार्ट सिटी ही संकल्पना सामान्य माणसाच्या नजरेत केवळ आणखी एक खूळ ठरेल किंवा जेएनएनयूआरएमसारख्या केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे अनेकांसाठी ते केवळ पैसे कमवायचे साधन होईल!

हा लेख संपविण्यापूर्वी आपल्या शहराच्या सद्यस्थितीविषयी अलिकडेच जी दोन उदाहरणे पाहिली ती इथे देत आहे; एका खासगी रुग्णालयाच्या संबंधातील अवैध बांधकामाविषयी एक बातमी आली होती. इथे जेव्हा सामान्य माणसाला त्याच्या बंगल्यावर आणखी बांधकाम करायचे असते तेव्हा त्याला सगळ्या प्रकारच्या मंजू-या घ्याव्या लागतात, बांधकामामध्ये थोडीशीही अनियमितता आढळल्यास सर्व सरकारी संस्था त्याला दंड करायला तयार असतात. मात्र या रुग्णालयाची बातमी पाहा त्यामध्ये कोणतीही परवानगी नसताना पाच मजली बांधकाम करण्यात आल्याचे पीएमसीचे अधिकारीही स्वीकारतात, तरीही त्यावर कोणतीही कारवाई न होता ते अभिमानाने उभे आहे! दुसरे एक उदाहरण म्हणजे मला स्वतःच्याच प्रकल्पावर लहानसा फलकही उभारायचा असेल तर मला पीएमसीची परवानगी घ्यावी लागते, नाहीतर पीएमसीचे पथक मला तो फलक काढायला लावते व दंड आकारते! गेल्या आठवड्यामध्ये मी पौड रस्त्यावर चालत होतो व नेहमीप्रमाणे तिथे शिक्षण क्षेत्रातील डॉनचे (शिक्षण महर्षीऐवजी हा योग्य शब्द आहे असे मला वाटते) नेहमीप्रमाणे मोठ्ठे होर्डींग लावलेले होते व पदपथावर तसेच सायकलींच्या मार्गात या चित्रांमुळे अडथळा येत होता, मात्र तरीही पीएमसी किंवा पोलीस अधिका-यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही! अशा वागणुकीतून आपण सामान्य माणसाला काय संदेश देत आहोत?

मला असे वाटते की या तथाकथित स्मार्ट शहरांमध्ये, सर्व नागरिकांना कायद्यासमोर समान वागणूक दिली जावी तरच ते ख-या अर्थाने स्मार्ट शहर होईल! म्हणूनच कोणतेही शहर केवळ नियम किंवा यंत्रणेमुळे किंवा त्यातील इमारतींमुळे नाही तर नागरिकांच्या दृष्टिकोनामुळे स्मार्ट होते व प्रत्येक नागरिकाने शहराप्रती आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे व स्वीकारली पाहिजे; तरच आपले शहर स्मार्ट होण्याची काही आशा आहे! 

संजय देशपांडे
smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स