Friday, 9 February 2018

पन्ना, जंगलांमधील हिरा !


 जंगलात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडांमधून एक कुजबुजणारा आवाज येऊ लागला, जणू काही आम्ही तिथे आहोत याची जंगलानं दखलच घेतली होती व जंगल त्यावर कुजबुज करत होतं.”… स्टीफन किंग.

स्टीफन एडविन् किंग हा एक अमेरिकी लेखक आहे तो भयकथा, काल्पनिक, वैज्ञानिक, व अद्भूतरम्य कथा लिहीतो. त्याच्या पुस्तकांच्या आत्तापर्यंत 3 कोटी 50 लाख प्रती विकल्या गेल्या आहेत, ज्यापैकी बहुतेकांवर चित्रपट, लघुमालिका, दूरचित्रवाणी मालिका, व कॉमिक पुस्तके निघाली आहेत. मी सुद्धा किंग व त्याच्या थरारपटांचा चाहता आहे. वरील ओळी त्याचा एक थरारपट द बॉडीमधल्या आहेत व या चित्रपटाचा जंगलांशी काहीही संबंध नसला तरी अनेक वर्षं मी या ओळींमधील शब्दांचा अनुभव जंगलांमध्ये घेतला आहे. मध्यप्रदेशातल्या पन्ना अभयारण्याला नुकतीच दिलेली भेटही त्याला अपवाद नव्हती.

ऐन हिवाळ्यातील सकाळची हाडे गोठवणारी थंडी होती, सूर्य क्षितीजावर नुकताच वर आलेला होता व आम्ही पन्नातल्या आमच्या सफारीसाठी जंगलात शिरलो. मला तुम्हाला सांगावसं वाटतं की खरं म्हणजे मला मध्यप्रदेशात हिवाळ्यात जंगलांमध्ये जायला अजिबात आवडत नाही (माझ्या जंगलाविषयीच्या प्रेमाबद्दल पूर्ण आदर राखून), कारण मला थंडी अजिबात आवडत नाही व जंगलांमध्ये या काळात अतिशय थंड वातावरण असतं. तसंच पन्ना हे वाघ दिसण्यासाठीही फारसं प्रसिद्ध नाही. आपण वाघांसाठी जंगलाला भेट देत नसलो तरीही अनपेक्षित बोनस कुणाला आवडत नाही? जेव्हा जंगलात प्रवेश केल्यानंतर दहा मिनिटांत आम्हाला एक टेहाळणी करणारं जंगल खात्याचं वाहन दिसलं तेव्हा आम्ही फक्त काही अंतर त्याचा पाठलाग केला, कारण पन्नातले जवळपास निम्मे वाघ रेडिओ कॉलर लावलेले आहेत. हे टेहाळणी करणारे वाहन वाघांवर नजर ठेऊन असत. त्यानंतर आमचे गाईड आरपी ओमरे यांनी नैसर्गिक इशाऱ्यांवर अवलंबून राहायचा निर्णय घेतला. सगळी वाहनं सोडून आम्ही दुसराच मार्ग घेतला व काही मिनिटांत आम्हाला माकडांचा आवाज ऐकू आला व हरिणांचे इशारेही  ऐकु आले  . वाघ जवळपासच असला पाहिजे याबद्दल आमची खात्री झाली. मात्र जेव्हा आम्ही तीन सुंदर वाघिणी (आई व तिचे 2 वयात येत असलेले मादी बछडे) शेजारच्या गवतातून एका पाठोपाठ एक बाहेर येताना पाहिल्या तेव्हा आमचा विश्वासच बसेना. आमच्यासमोर त्या डौलानं चालत आल्या, मध्येच पाणी प्यायला आणि पुन्हा घनदाट जंगलात नाहीश्या झाल्या. इतर प्राण्यांचे इशारे तसेच सुरू होते आणि आम्हा वन्यप्रेमींचे चेहरे थक्क झालेले होते! पन्ना सफारीतलं हे पहिलं दृश्य होतं. आम्हा वन्यप्रेमींसाठी (काही समविचारी मित्रांचा गट ज्यांना जंगलाविषयी सारखाच जिव्हाळा वाटतो) सफारीची सुरूवात तर मोठी जोरदार झाली होती!

खरंतर मला मध्यप्रदेशातल्या जंगलांमधला हिवाळा अजिबात आवडत नाही. विशेषतः पन्नासारख्या, कारण इथे मोठे जलाशय आहेत. पन्नाला केन नदीचं वरदान मिळालंय, जी अभारण्याच्या बहुतेक भागातुन मधोमध वाहते. तरीही मला अनेक दिवसांपासून पन्नाला भेट द्यायची होती. याची दोन कारण आहेत एक म्हणजे केन नदी (कर्णावती) आपल्या देशातील सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक मानली जाते आणि पन्नातला डोंगराळ प्रदेश बिबट्यांसाठी उत्तम असल्याचं मी ऐकलं होतं. तसंच माझ्या वन्यप्रेमी मित्रानं मला पन्नातल्या जैवविविधतेविषयी बरंच काही सांगितलं होतं त्यामुळे माझी उत्सुकता अतिशय वाढली होती. त्यामुळेच मी हिवाळ्याविषयी मला वाटणाऱ्या तिटकाऱ्याचीही (माफ करा दुसरा योग्य शब्द सापडला नाही) पर्वा केली नाही. पन्ना हा मध्यप्रदेशातल्या सर्वात जुन्या जिल्ह्यांपैकी एक असला आणि भूगोलाच्या पुस्तकात आपल्याला त्याची ओळख  हिऱ्यांच्या खाणींचा प्रदेश म्हणून करण्यात आली असली तरीही आता त्या इतक्या उत्पादक राहिलेल्या नाहीत. अर्थात त्या अजूनही अभयारण्याच्या भोवताली अस्तित्वात आहेत. अलिकडच्या काळात पन्ना बातम्यांमध्ये यायचं कारण म्हणजे शिकारीमुळे इथले वाघ नामशेष, होण्याच्या मार्गावर होते. त्यानंतर 2009 साली मध्य प्रदेश वन विभागानं अभयारण्यातल्या वाघांच्या संवर्धनासाठी एक मोहीम सुरू केली. कान्हा व बांधवगढमधून वाघांच्या जोड्यांचं इथे यशस्वीपणे स्थलांतर करण्यात आलं. त्यामुळे आता या अभयारण्यामध्ये पस्तीसहून अधिक वाघ आहेत तसंच वयात येऊ घातलेले काही बछडेही आहेत त्यामुळे वन्यजीव प्रेमींचा ओघ पुन्हा या जंगलाकडे सुरू झालाय. पन्ना अभयारण्यामध्ये फक्त वाघांशिवाय पाहण्यासारखं बरंच काही आहे व जवळपास अकरा वाघांचं निरीक्षण करण्यासाठी त्यांना कॉलर लावण्यात आली आहे. वन विभागाचे अधिकारी वाईल्ड लाईफ इन्स्टीट्यूच्या लोकांच्या मदतीनं कॉलर लावलेल्या प्रत्येक वाघाचं चोवीस तास निरीक्षण करत असतात, हे सोपं काम नाही. आम्ही जंगलातून फेरफटका मारत असताना आम्हाला अनेकदा निरीक्षण वाहन म्हणजे अँटेना लावलेली व्हॅन दिसली. त्यामध्ये मागोवा घेण्यासाठी साधन असते जे कॉलर लावलेल्या वाघांनी दिलेल्या संदेशांनुसार त्यांचा मागोवा घेते. स्क्रीनवर जोरात बीप असा आवाज ऐकू येत असतो, त्याआधारे शंभर मिटर्सच्या परीघात वाघ शोधता येतो. म्हणूनच, अनेक पर्यटक जिप्सी वाघ दिसेल या आशेनं या निरीक्षण वाहनाच्या मागे जातात. मात्र निसर्ग विज्ञानावर मात करतो, कारण पन्नासारख्या अभयारण्यामध्ये वाघ तुमच्यापासून काही पावलांच्या अंतरावर असला तरी तुमचं नशीब असेल तरंच तो तुम्हाला दिसेल, वाघ दिसण्यातली खरी मजा तर यातंच आहे.

आता या जंगलाचा विस्तार किती चौरस किमी क्षेत्रात आहे, झाडे, प्रदेश तसा आहे वगैरे धाटणीची माहिती द्यायला नको. कारण ही माहिती कोणत्याही संकेतस्थळावर उपलब्ध होईल. मात्र थोडक्यात सांगायचं तर पन्ना अभयारण्य जवळपास 650 चौ. किमी क्षेत्रात पसरलेलं आहे म्हणजे पुणे शहराच्या 1.5 पट अधिक क्षेत्रात (याचा विस्तार किती मोठा आहे याची केवळ कल्पना यावी यासाठी), मात्र या आकडेवारीतून तुम्हाला विस्ताराची कल्पना येणारच नाही कारण हा फक्त अभयारण्याचा आरक्षित भाग आहे. खरंतर पन्नाला आरक्षित अभयारण्याभोवती सर्वात मोठ्या बफर क्षेत्राचं वरदान लाभलं आहे. मी पन्नापर्यंत येत आणि जात असताना मला जाणवलं की या अभयारण्याच्या शंभर किलोमीटरच्या क्षेत्रात मोठं गाव किंवा कारखान्यासारखा कोणताही विकास झालेला नाही. म्हणूनच सगळ्या अभयारण्यांमध्ये पन्ना ठळकपणे उठून दिसतं, हे अभयारण्य कितीही वाघ सामावून घेऊ शकेल फक्त आपण त्याची क्षमता समजून घेतली पाहिजे. अर्थात कोणत्याही तथाकथित विकासापासून दूर असणं हा पन्ना अभयारण्यासाठी एकप्रकारे शापही आहे. कारण याच्या प्रचंड मोठ्या विस्तारामुळे अभयारण्यात आत व बाहेर जाणाऱ्या वाघांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणं अतिशय अवघड होतं. याच कारणामुळे दशकभरापूर्वी पन्नातले वाघ गायब झाले होते. वाघांना त्यांचं क्षेत्र वाढवायला आवडतं आणि जेव्हा त्यांना मोठं क्षेत्रं उपलब्ध असतं तेव्हा ते कदाचित अभयारण्यातून बाहेर पडले असावेत. दुसरे कारण म्हणजे मुख्य अभयारण्याभोवती एवढे मोठे जंगल असल्यामुळे शिकाऱ्यांना सहजपणे प्रवेश मिळू शकतो व वाघाच्या शिकारीनंतर बाहेरही पडता येऊ शकतं. सध्या आहे तशी निरीक्षणाची कोणतीही यंत्रणा तेव्हा नसल्यामुळे, वाघांना सहजपणे बाहेर पडता आलं असेल असा माझा तर्क आहे. इथेच पर्यटनामुळे वाघांच्या तसंच जंगलाच्या संवर्धनात मोठा फरक पडू शकतो.कारण सर्वप्रथम पर्यटकांनाच पन्नामध्ये वाघ दिसत नाहीयेत याची जाणीव झाली व त्यानंतर संपूर्ण यंत्रणेला जाग आली. वाघासारख्या प्रजातीचं पूर्ण स्थलांतर करण्याचं व त्याचं संवर्धन करण्याचं संपूर्ण श्रेय वनविभागाला दिलं पाहिजे. आपण जेव्हा वाघ म्हणतो तेव्हा ती केवळ एक प्रजाती नसते तर त्याच्या भोवती असलेलं संपूर्ण चक्रच असतं. म्हणूनच ज्या जंगलात वाघ असतो ते निरोगी जंगल असतं कारण त्यामध्ये जीवनाचं संपूर्ण चक्र असतं. मात्र पन्नाभोवती पसरलेलं अतिशय व्यापक बफर क्षेत्र पाहून मला अतिशय आनंद झाला. कारण नवीन वाघांना सामावून घेण्यासाठी आपण जंगलाच्या याच क्षेत्राचा वापर करू शकतो. मात्र केंद्र सरकारनं मध्यप्रदेश सरकारला जंगलाचं हे बफर क्षेत्र राखण्यासाठी निधी दिला पाहिजे व वाघांचं वसतीस्थान म्हणून ते विकसित केलं पाहिजे. यातली मुख्य अडचण म्हणजे पन्नाच्या बफर क्षेत्रातली गावं व ही गावं स्थलांतरित करण्यासाठी लागणारा वेळ. कारण तोपर्यंत माणूस व प्राण्यांमधला संघर्ष सुरू राहील व परिणामी वाघांसारख्या प्राण्यांचा पराभव होईल किंवा ते मारले जातील. बिबट्या अतिशय हुशार असतो त्यामुळे तो मानवी वस्त्यांच्या भोवती असला तरी जगू शकतो. त्या तुलनेत वाघ निडरपणे चालतो व उघडपणे मारतो त्यामुळे तो सहजपणे माणसाचा शत्रू होतो.

वाघ व बिबट्यांविषयी बोलायचं तर, वाघाचं पाण्यातलं संपूर्ण प्रतिबिंब टिपण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी कितीतरी किंतू परंतूंचा अडथळा पार करणं आवश्यक होतं म्हणजे आधी वाघ मूळात दिसला पाहिजे, तो जलाशयाजवळ असला पाहिजे, पाणी शांत असलं पाहिजे व प्रकाश असला पाहिजे. त्यानंतर वाघानं प्रतिबिंबाकडे पाहिलं पाहिजे, तरच मला स्पष्ट व स्थिर दृश्य मिळू शकते. पण जर धीर धरला व नशीब असेल तर जंगल नेहमीच तुमच्या इच्छा पूर्ण करते. पन्नाने माझी इच्छा पूर्ण केली, एका सुंदर वाघिणीचं पाण्यातलं प्रतिबिंब मला टिपता आलं.

दुसरं म्हणजे मला बिबट्याचं एक छान छायाचित्र हवं होतं, मी अनेकदा बिबटे पाहिलेत मात्र कधीही त्याचं स्पष्ट दृश्य चित्रित करता आलं नाही. पन्नाच्या सफरीत, मी चित्त्याला भेटायला उत्सुक होतो. पन्नातला डोंगराळ भाग या भूतासाठी उत्तम वसतिस्थान आहे. जंगलामध्ये त्याला याच नावानं ओळखतात कारण तो जंगलातली वाळलेली पानं व पिवळ्या करड्या पट्ट्यांमध्ये क्षणार्धात नाहीसा होतो. एके दिवशी सकाळी सफारीमध्ये आम्ही सेंटर पॉईंटला (जंगलामध्ये फ्रेश होण्यासाठी तसेच चहा नाश्ता वगैरे घेण्यासाठी तयार केलेल्या जागा) थांबलो होतो व अचानक डोंगराखालून इशारा ऐकू आला. आम्ही वाकून पाहू लागलो कारण आमच्या गीडनी सांगितलं होतं हा बिबट्याच्या मादीचा परिसर आहे व गेल्या काही दिवसात ती तिच्या बछड्यांसोबत नियमितपणे या भागात दिसली होती. म्हणून आमचे गरम चहाचे कप (कडाक्याच्या थंडीतील एकमेव आधार) तसेच ठेवून जिप्सीकडे धाव घेतली व जिथून चितळाचे इशारे येत होते त्या जागी जायला सुरूवात केली. एका वळणानंतर आम्हाला पुढे एक जिप्सी दिसली व एक बिबट्याची मादी तिच्यासमोरून चालत जात होती. त्यानंतर आमच्या पुढे असलेल्या जिप्सीनं मोठं सौजन्य दाखवत आम्हाला बिबट्याची छायाचित्रं काढायला पुढे जाऊ दिलं, कारण त्या जिप्सीतल्या पर्यटकांकडे कॅमेरे नव्हते. जे जंगलाला नेहमी भेट देत देतात त्यांना या सौजन्याचे महत्व समजू शकेल. कारण बहुतेक गाईड, पर्यटक अशा दृश्यासमोरून हालत नाहीत व या लोकांनी आम्हाला अधिक स्पष्ट छायाचित्रं घेता यावीत यासाठी जागा करून दिली. अशा गोष्टींमुळे जंगलातल्या सफरी अधिक संस्मरणीय होतात व तुम्हाला जाणवतं हेच तर जंगलाचं खरं सौंदर्य आहे! समोरील जिप्सीच्याच कृतीचंच अनुकरण करत बिबट्याची मादीही मार्गावरून उतरली व आपच्या जिप्सीला समांतर येऊन उभी राहिली. आम्हाला या सुंदर प्राण्याची संपूर्ण पुढील बाजू व कडेची बाजू दिसत होती, ती म्हणजे मूर्तीमंत नजाकत होती! कॅमेऱ्यातून तिच्याकडे पाहताना मला जाणवलं की बिबट्याला जंगलातील लोक भूत का म्हणतात, कारण त्याच्या अंगावरच्या ठिपक्यांमुळे त्याच्यावर कॅमेरा लक्ष केंद्रित करणं किती अवघड असतं हे मला कळलं. तो सहजपणे जंगलातल्या कोरड्या पार्श्वभूमीमध्ये मिसळून जाऊ शकतो. हे संपूर्ण नाट्य दहा मिनिटे चाललं असेल व त्यानंतर ती मादी घनदाट जंगलात नाहीशी झाली. पण तरीही जंगलानं माझी आणखी एक इच्छा पूर्ण केली. 

या सफारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टी श्रू नावाचा एक लहानसा प्राणी पाहायला मिळाला व त्याची छायाचित्रि काढता आली. हा प्राणी खरंतर नामशेष होत चाललाय. आम्ही इशाऱ्यांची वाट पाहात होतो तेव्हा आमच्या गाईडला हा अतिश. दुर्मिळ प्राणी दिसला. तो दिसायला उंदराच्या आकाराचा असतो मात्र अतिशय सुंदर असतो व उंदीर वर्गातील आहे. टी श्रूसारख्या प्राण्यांमुळेच जंगल जैववैविध्यानं समृद्ध होतं. मात्र दुर्दैवानं बहुतेक पर्यटकांना, अगदी गाईडनाही त्यांचं महत्व समजत नाही व ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. वन तसंच पर्यटन विभागानं टी श्रूसारख्या प्राण्यांना जंगलांचे दूत केलं पाहिजे, कारण त्यातच जंगल वाचवासारख्या संकल्पनांसाठी यशस्वीपणे जागरुकता मोहीम राबवता येईल.

पन्ना जंगलातला सर्वोत्तम भाग म्हणजे केन नदी व जी अभयारण्याच्या भागातून वाहते तो संपूर्ण पट्टा. वन विभागानं इथे नौकाविहाराचीही सोय केली आहे. उन्हाळ्यामध्ये तुमचं नशीब असेल तर तुम्हाला या नदीतून पाणी पिणारे वाघ किंवा चित्तेही दिसू शकतात. हिवाळ्यात मात्र अनेक पक्षी इथे पाहायला मिळतात, तसंच असंख्य मगरीही दिसतात. तुम्ही नौकाविहार करत असताना त्या वेगवेगळ्या स्थितीत तुमचं स्वागत करतात. सुदैवानं केन नदीच्या प्रवाहाच्या मार्गात कोणताही शहरी किंवा औद्योगिक विकास झाला नसल्यानं तिचं पाणी अजूनही स्वच्छ व अप्रदूषित राहू शकलंय. त्यामुळे ती पक्ष्यांच्या व माशांच्या हजारो प्रजातींसाठी उत्तम वसतीस्थानांपैकी एक आहे. भोवतालची झाडं-झुडुपं पाहून अतिशय आनंद झाला.

इथे ओझरतं सांगायचं म्हणजे, आम्ही सलीम अलीच्या पक्षी अभयारण्यातल्या गाईडसोबतच पन्ना जंगलातल्याही सगळ्या गाईडना एका छोटेखानी समारंभात खांद्यावर लटकवायची एक लहान पिशवी दिली. त्यांनी आमचे आभार मानले, तो अतिशय हृदस्पर्शी सोहळा होता. आणखी एका गोष्टीचा उल्लेख आवर्जुन करावासा वाटतो. तो म्हणजे आम्ही ज्या केन रिव्हर लॉजमध्ये राहिलो होतो तिथले कर्मचारी. तुम्ही जेव्हा अशा ठिकाणांना भेट देता तेव्हा तो अनुभव संस्मरणीय होण्यासाठी तुमच्या निवासालाही अतिशय महत्व असतं. त्याबाबतीत केन रिव्हर लॉजच्या चमूला सर्वोच्च स्थान द्यावं लागेल असं मला वाटतं. पन्नामध्ये कुठल्याही पर्यटकानं चुकवू नये अशी गोष्ट म्हणजे इथली रात्रीची सफारी. जंगलात तरस, उदमांजर, अस्वल किंवा साळिंदर यासारखे शेकडो प्राणी निशाचर आहेत. हे प्राणी सूर्यास्तानंतरच बाहेर पडतात व तुम्हाला सकाळच्या सफारीमध्ये सहसा दिसत नाहीत, कारण तुम्हाला सूर्यास्तापूर्वीच जंगलातून बाहेर यावे लागते. रात्रीची सफारी बफर क्षेत्रात म्हणजे मध्यवर्ती/आरक्षित जंगलाच्या भोवताच्या क्षेत्रात असते. ती संध्याकाळी 6 वाजता सुरू होते व रात्री साधारण 9.30 पर्यंत तुम्ही परत येता. या वेळेत तुम्हाला वर नमूद केलेले सर्व प्राणी पाहायला मिळतात (अर्थात तुमचं नशीब असेल तर). अंधार असल्यामुळे तुम्हाला फारशी छायाचित्रं काढता येत नाहीत पण तुम्ही भोवताचं जंगल नक्कीच अनुभवू शकतापन्नातली हीच रात्र सफारी अनुभवताना मला स्टीफन किंगचे शब्द आठवले, तुम्हाला जंगल तुमच्याशी कुजबुजतंय, तुमच्याकडे हजारो डोळ्यांनी पाहतंय असं वाटायला लागतं आणि तुम्हाला जंगल खरंच आवडू आणि समजू लागतं. जंगल तुम्हाला नवीन भाषा शिकवतं, जंगलाची भाषा, ते तुम्हाला एक नवीन दृष्टी देतं, अंधारातही पाहण्याची दृष्टी, नवीन सुगंध अनुभवण्याची क्षमता देतं, निसर्गाचा सुगंधही नवी ओळख घेऊन मी पन्नातून परत आलो. माझ्या मनात एकच प्रार्थना होती देवा कृपया पन्नासारखे हिरे जपून ठेव आणि हो आमची जबाबदारीची जाणीवही. माझाही त्यामध्ये खारीचा वाटा असला पाहिजे.
  


संजय देशपांडे
Mobile: 09822037109