Tuesday, 25 March 2014

वृक्ष समिती, परवानगी आणि बिचारे वृक्ष
झाडांमुळे तुम्हाला क्षितीज पाहता येत नसेल तर घराच्या छतावर जाऊन पहा, झाडे छाटल्यानंतर जेवढ्या स्पष्टपणे पाहता येईल तेवढ्या स्पष्टपणे दिसला नाही तरी दिसणारा सूर्यास्त थक्क करणारा असेल.”   …बेन्सेन ब्रूनो

या प्रसिद्ध लेखकाला जे झाडांविषयी समजले ते आपण पुणेकर मात्र विसरत आहोत. तथाकथित वृक्ष समित्यांच्या स्वरुपात आपण जो गोंधळ करुन ठेवला आहे, त्यातून कुणालाही झाडांची किंवा घराची काळजी नसल्याचे वाटते! लोकसभा निवडणुकीच्या बातम्यांचे ओघ सुरु होण्यापूर्वी, पुणे महापालिकेने नवीन वृक्ष समिती स्थापन केल्यासंदर्भात काही ठळक बातम्या पेपरमध्ये प्रसिद्ध झाल्या  होत्या. वृक्ष समिती म्हणजे काय व शहराच्या विकासामध्ये त्याचे काय महत्व आहे हे माहिती नसलेल्यांसाठी थोडी पार्श्वभूमी सांगतो. काही वर्षांपूर्वी ट्री A^kT नुसार या समितीची स्थापना करण्यात आली. जेव्हा कोणतेही झाड कायदेशीरपणे तोडायचे असते त्यासाठी एका प्रक्रियेचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यासाठी पीएमसीच्या उद्यान विभागाकडे अर्ज करावा लागत असे, प्राथमिक निरीक्षणानंतर अर्ज वृक्ष समितीकडे जायचा ज्यामध्ये काही निवडून आलेले नगरसेवक, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी व जीवशास्त्र तसेच उद्यानशास्त्र या क्षेत्रातील तज्ञांचा समावेश होता. या समितीची महिन्यातून एकदा बैठक होत असे व हे सर्व सदस्य झाडे कापण्याच्या प्रस्तावांचा आढावा घेत, त्यांना जे काही प्रश्न असतील त्यांची व्यवस्थित उत्तरे घेऊन व त्यानंतर प्रस्तावास मंजूरी दिली जात असे. त्यानंतर उद्यान विभाग झाड तोडण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देत असे, ज्या शर्ती व अटींतर्गत ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यांचे पालन होते का हे पाहण्याची जबाबदारी उद्यान विभागाची असे म्हणजे कापलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावणे तसेच झाड जगविण्यासाठी ते पुन्हा लावणे किंवा त्याची जागा बदलणे इत्यादी बाबींकडे लक्ष देणे.

कुणी क्ष व्यक्तीने जनहित याचिका दाखल करेपर्यंत अनेक वर्षे याच पद्धतीने काम सुरु होते. ही प्रक्रिया चुकीची आहे व यामध्ये कोणत्याही नियमांचे पालन होत नाही व यामुळे पुण्यामध्ये बरीच झाडे अवैधपणे किंवा चुकीच्या पद्धतीने तोडली जात आहेत व संपूर्ण शहरातील झाडे कमी होत आहेत असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. याचिकाकर्त्याने झाडे तोडण्याचे तसेच झाडे तोडताना अटींची पूर्तता न केल्याचे शेकडो पुरावे न्यायालयासमोर सादर केले. वृक्ष समिती व उद्यान विभाग, झाडे कापण्याची खरी गरज आहे का हे ठरविण्यात अकार्यक्षम असल्याचीही याचिकाकर्त्यांची एक तक्रार होती. याचा अर्थ असा होतो की अनेक वेळा रस्ते किंवा पाण्याची टाकी यासारखे काही सार्वजनिक बांधकाम करताना नियोजनात थोडेसा बदल केल्यास झाड वाचवता आले असते. मात्र त्याची पडताळणी करण्यात आली नाही व एक चांगल्या जुन्या वृक्षाचा निष्काळजीपणे बळी देण्यात आला; अशी बाजू न्यायालयात मांडण्यात आली.

न्यायालयाविषयी पूर्णपणे आदर बाळगून असे सांगावेसे वाटते की न्यायालयात  जे काही सादर करण्यात आले त्यापैकी शंभर टक्के अचूक नव्हते. माननीय न्यायालयाच्या नजरेत कंत्राटदार व बांधकाम व्यवसायिकांचा लौकिक सकारात्मक नसल्याने त्यांनी शहराच्या वृक्षगणनेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोडीवर पूर्णपणे बंदी लावली. तसेच पीएमसीला झाडे कापण्याची परवानगी देण्यासाठी योग्य मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचा आदेश दिला. तेव्हापासून झाड किंवा अगदी झाडाची फांदी कापायची असली तरीही माननीय उच्च न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक झाले. यासाठीही पुन्हा उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एक व्यवस्था तयार करण्यात आली. या आदेशामुळे सध्याच्या वृक्ष समितीला कोणतेही झाड कापण्यास परवानगी देण्याचे अधिकार नाहीत. न्यायालयाच्या निर्देशांनुसार या क्षेत्रातील केवळ तीन तज्ञांची समिती स्थापित करण्यात आली. झाड तोडण्यासाठी उद्यान विभागाकडे करण्यात आलेल्या प्रत्येक अर्जाची या समितीद्वारे पडताळणी केली जाई व पुढील प्रक्रियेसाठी तो उद्यान विभागाकडे पाठवला जात असे. परवानगीविषयी करण्यात आलेली शिफारस त्यानंतर वकिलामार्फत उच्च न्यायालयाकडे पाठविली जात असे, व झाड कापण्यासाठी अंतिम मंजूरी मिळत असे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून अशा प्रकारे मंजूरी मिळाल्यानंतर उद्यानविभाग झाड कापण्यासाठी अंतिम ना हरकत प्रमाणपत्र देत असे.

ही प्रक्रिया किचकट वाटली तरीही जलद तसेच परिणामकारक होती, त्यामध्ये कुणाचेही लागेबांधे नव्हते. न्यायालयच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी असल्याने पडताळणीविषयी जागरुक होते. ही प्रक्रिया लांबलचक असली तरीही ती बरीच पारदर्शक होती व तीन सदस्यीय समितीमध्ये तज्ञांचा समावेश असल्याने, त्यांचा निर्णय नेमका असायचा व त्यांच्या सूचनांमुळे बरीच झाडे वाचलीही आहेत.  यातला केवळ एकच अडथळा म्हणजे अगदी एखाद्या झाडासाठीही प्रत्येकाला उच्च न्यायालयात जावे लागत असे, उदाहरणार्थ एखाद्या बंगल्याच्या मालकाला धोकादायक झालेले जुने झाड कापायचे असेल तर त्याला वरील प्रक्रियेचे पालन करावे लागत असे, जे किचकट होते. मात्र आयुष्यभर अशाप्रकारे सुरु राहू शकत नाही कारण झाडे कापण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे हे न्यायालयाचे काम नाही व त्याचवेळी झाडे कापण्याची परवानगी देण्यावरील आपला अधिकार परत मिळविण्याबाबत पीएमसीचे सदस्य उत्सुक होते, त्यामुळे लढाई पुन्हा उच्च न्यायालयात गेली.

या संपूर्ण लढाईमध्ये एक महत्वाचा घटक म्हणजे वृक्ष गणना पुन्हा एकदा प्रलंबित राहीली त्यासाठी अनेक कारणे देण्यात आली म्हणजे पुरेसा निधी नाही (हा एक विनोदच आहे) व योग्य संस्था न मिळणे इत्यादी. आजतागायत वृक्षगणनेचे काय झाले हे एक कोडेच आहे! आपल्या हाताशी एवढे अद्ययावत तंत्रज्ञान असूनही आपण शहरातील प्रत्येक झाडाची माहिती मिळवू शकत नाही व नोंद करु शकत नाही ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे, किती झाडे आहेत हे माहिती असल्याशिवाय आपण त्यांचे संरक्षण कसे करणार आहोत! महापालिका ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा अधिकार पुन्हा मिळावा यासाठी अतिशय आग्रही होती. शेवटी पाच वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा आदेश देऊन नवीन वृक्ष समितीची स्थापना करण्यास व त्यानंतरच झाडे कापण्याचा अधिकार पीएमसीच्या पातळीवर देण्यास सांगितले आहे.

त्यानंतर या नवीन समितीमध्ये येण्यासाठी स्पर्धा सुरु झाली. मी काही कुणी कायदेतज्ञ नाही मात्र जे काही पाहतो आहे किंवा सामान्य ज्ञानानुसार, या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणारी किंवा शैक्षणिकदृष्ट्या झाडांच्या समस्यांशी संबंधित व्यक्ती समितीचा भाग असली पाहिजे. वृक्ष संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवी संस्थांचाही योग्य विचार करण्यात आला पाहिजे. पीएमसीद्वारे इच्छुक सहभागींसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे व त्यानंतर निवडण्यात आलेली नावे पीएमसीच्या सर्वसाधारण समितीस पाठविण्यात आली आहेत त्यातून त्यांनी तेरा नावे अंतिम केली आहेत. ही नावेच बातम्यांच्या मथळ्यांमध्ये झळकली आहेत, कारण अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच या क्षेत्रातील तज्ञांचा असा आरोप आहे की काही अपवाद वगळता यापैकी कुणीही या समितीसाठी पात्र नाहीत. स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली राजकीय कार्यकर्त्यांनीच प्रवेश मिळवला आहे. या संपूर्ण प्रक्रियेला सहा महिने लागले आहेत व या कालावधीमध्ये झाडे कापण्याचे प्रस्ताव पीएमसीमध्ये पडून आहेत, त्यामुळे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत व दिरंगाईमुळे लाखो रुपयांची हानी होत आहे.

सुदैवाने पीएमसी आता नवीन समिती अस्तित्वात येईपर्यंत व कामकाज सुरु होईपर्यंत वृक्ष छाटणीचे प्रस्ताव उच्च न्यायालयाकडे पाठवत आहे. मात्र न्यायालयीन लढाई व झाडांचा संबंध कायमचा जोडला गेला आहे कारण आधीच अनेक व्यक्ती व स्वयंसेवी संस्था या समिती निर्मितीच्या प्रक्रियेविरुद्धच न्यायालयात जात आहेत! त्यामुळे काही काळ तरी उच्च न्यायालयालाच आपल्या शहरातील झाडे कापण्यासाठी परवानगी देण्याबाबत काम करावे लागेल.

या परिस्थितीची तुलना अंधेर नगरी चौपट राजा या प्रसिद्ध हिंदी म्हणीशी करावीशी वाटते! या शहराला आपण विद्येचे माहेरघर किंवा पूर्वेकडील हार्वर्ड म्हणतो, मात्र आपण झाडे कापण्यासाठी एक साधी यंत्रणा तयार करु शकत नाही ही खरोखरच लाजीरवाणी बाब आहे किंवा एक विनोद आहे. बरेच जण म्हणतील की कोणतेही झाड तोडण्यास परवानगीच देऊ नका, मात्र अशी भूमिका घेणेही टोकाचे होईल. मी स्वतः एक कट्टर वृक्षप्रेमी आहे मात्र विकास व झाडे यांचे संतुलन राखणे आवश्यक आहे हे देखील आपण स्वीकारलेच पाहिजे.

सर्वप्रथम उच्च न्यायालयाने झाडे कापण्याची परवानगी देण्याच्या सध्याच्या यंत्रणेवर कडक ताशेरे ओढून तिच्याविषयी अविश्वास का दाखविला याचा विचार आपण केला पाहिजे. २३-३० वर्षांपूर्वी रस्त्यांच्या दुतर्फा, बंगल्यांच्या कडेला मोठ-मोठी जांभूळ, वड, आंबा व अनेक स्थानिक प्रजातींची झाडे होती ज्यामुळे सावली मिळायची व संपूर्ण शहराला हिरवे आच्छादन मिळायचे. विकासाच्या नावाखाली आपण त्यापैकी बहुतेक झाडे कापली हे सत्य आहे मात्र नवी झाडे लावण्याविषयी काय केले ? आपण आपल्याच कर्मांची फळे भोगत आहोत व समस्यांना तोंड देत आहोत. अर्थात अशीही उदाहरणे आहेत की अनेक उपनगरांमध्ये ओसाड पट्ट्यांवर केवळ नवीन विकासामुळे नव्याने झाडेही लावण्यात आली आहेत, मात्र जुनी झाडे कापणे व त्याऐवजी नवीन झाडे न लावण्याचे समर्थन होऊच शकत नाही.

विशाल व सदा हरित प्रकारच्या झाडांचे महत्व आपल्याला कुणीही सांगण्याची गरज नाही, कारण प्रदूषणाविरुद्ध लढा देण्यासाठी व भूजल जलसंधारणासाठी त्यातूनच काही आशा आहे. मात्र त्याचवेळी लाखो लोकांसाठी घरे बांधण्यास, तसेच रस्ते, मैदाने, रुग्णालये व इतरही पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एकही झाड तोडू न देणे हे देखील अतार्किक आहे. ज्या विकासामध्ये झाडांना स्थान नाही त्यास चिरस्थायी म्हणता येणार नाही व आपण एक मोठे झाड तोडल्यास त्याऐवजी केवळ दहा नवी झाडे लावून चालणार नाही. आपण तोडलेल्या मोठ्या वृक्षाप्रमाणे त्या झाडांची सावली मिळण्यासाठी अनेक वर्षे लागतील हे तथ्य आहे. त्यामुळे त्यांचे संतुलन राखले पाहिजे व शक्य तितक्या प्रमाणात आपल्याला आपण करत असलेला विकास झाडांच्या भोवताली किंवा त्यांना विचारात घेऊन केला पाहिजे यासाठी आपण प्रत्येक झाड मोडणे आवश्यक आहे. त्यानंतर सर्व नियोजक व अभियंत्यांना नियोजनाच्या या मूलभूत संकल्पनेविषयी समजून सांगणे व त्यानंतर केवळ तज्ञांचे मत घेऊनच झाड कापण्याची गरज आहे का याची पडताळणी करणे आवश्यक आहे व हे सर्व वेगाने झाले पाहिजे. उशीर झाल्याने आर्थिक ताणही वाढेल तसेच अवैधपणे झाडेही कापली जातील व असे प्रकार रोखण्यासाठी आपल्याकडे व्यवस्था नाही.  कुणीही शहाणा माणूस अनावश्यकपणे झाड कापा असे म्हणणार नाही मात्र कुणीही शहाणा माणूस झाड कापणे आवश्यक आहे, व तो नवीन झाड लावण्यास व त्यांची काळजी घेण्यास तयार असताना परवानगी मिळण्यातील उशीर मान्य करणार नाही.

आणखी एक मुद्दा म्हणजे संपूर्ण शहरात आपल्या शक्य तितकी नवीन झाडे लावणे व त्यासाठी आपल्याला कोणत्याही न्यायालयाच्या परवानगीची गरज नाही तर वृक्षारोपणाचा निर्धार व हेतू हवा. मी वारंवार नमूद केले आहे की या शहरातील महत्वाचे रस्ते बोडखे होत आहेत किंवा आधीच झाले आहेत. महापालिकेला किंवा नागरिकांनाही या रस्त्यांच्या कडेला नवीन झाडे लावण्यापासून कोणीही रोखलेले नाही. यातील मुख्य अडथळा आहे तो म्हणजे व्यवसायिक विकास व रस्त्यावरुन अग्रभाग व्यवस्थित दिसावा, व्यवसायिक क्षमतेचा पुरेपूर वापर करता यावा यासाठी अशा इमारतींसमोर नवी झाडे लावण्यास विकसक तयार नसतात परवानगी दिली जात नाही. मात्र जगातील मुख्य शहरांवर एक नजर टाकल्यास तुम्हाला जाणवेल, झाडे दुकानाच्या किंवा दालनाच्या व्यवसायिक मूल्यात अडथळा आणत नाहीत तर त्यामध्ये भर घालतात. आपण गैरसमज बाजूला ठेवून झाडांसोबत सहजीवन शिकले पाहिजे.

माझ्यासारख्या काही भाग्यवान लोकांना आठवत असेल की लहानपणी आम्ही आंबे, बोरे, जांभळे किंवा सिताफळे कधीही विकत आणत नसू. ही फळझाडे आमच्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात उपलब्ध होती  व अशी सर्व फळे  झाडावरूनच मिळवण्याचा आनंद अद्वितीय असतो. मी आज पैसे देऊन जगातील सर्वोत्तम फळे कदाचित विकत घेईल, मात्र दगड मारुन फळे पाडण्याची मजा त्यात कधीच येणार नाही. अशी मजा आता कुठे अनुभवता येते? मला आठवते आहे की ३० वर्षांपूर्वी मी जेव्हा विदर्भातल्या माझ्या गावाहून पहिल्यांदा पुण्यात आलो तेव्हा माझ्या आईला पत्रात लिहीले होते की इथे उन्हाळाच नाही! कारण शहरातील रस्त्यांवर झाडांचे आच्छादन असल्याने उन्हाळ्याचा सर्व उष्मा आणि वाहनांमुळे होणारे थोडेफार प्रदूषण शोषले जायचे. मात्र आता आपण या शहराचे काय केले आहे? तरीही हे शहर इतर शहरांच्या तुलनेत बरेच चांगले व राहण्यायोग्य आहे, याचे कारण केवळ आधुनिक इमारती व त्यातील लोक नाही तर येथील झाडे आहेत.

आपण झाडे तोडण्यावरुन भांडायला नको तर, ते कसे जगवायचे यासाठी सर्व प्रयत्न झाले पाहिजेत, त्यानंतर कोणत्याही उच्च न्यायालयास झाड कापण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्रासारख्या विषयांमध्ये हस्तक्षेप करावा लागणार नाही. म्हणूनच आपल्याला काय हवे आहे हे आपण ठरवणे आवश्यक आहे! नाहीतर एक दिवस झाड कापण्याची परवानगी घेण्यासाठी एकही झाड उरणार नाही व तो सर्वनाशच असेल आपला!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्सWednesday, 19 March 2014

हिरवे प्रश्न, विराण भविष्य !
"आपण या पृथ्वीवर अशाप्रकारे जगतोय की जणु आपल्याकडे दुस-या ग्रहाचा पर्याय उपलब्ध आहेटेरी स्वियरिंगेन

टेरी स्वियरिंगेन ही अमेरिकेच्या ओहायो राज्यातील एक परिचारिका आहे. तिला १९९७ साली ग्लोल्डन इन्व्हायरन्मेंटल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिने कचरा तंत्रज्ञान उद्योगांच्या विषारी कचरा भट्टीविरोधात ईस्ट लिव्हरपूल, ओहायोतील ऍपलांशियन या गावात निदर्शने केली होती. तिच्या या पार्श्वभूमीमुळेच तिने सध्याची पर्यावरणाची परिस्थिती इतक्या सोप्या शब्दात मांडल्याबद्दल आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही आणि आपल्या सरकारने मात्र जणू तिचे शब्द खरे करण्याचा चंगच बांधलाय! बांधकाम व्यवसायिक असलेल्या माझ्यासारख्या व्यक्ती असे मत मांडत असल्याबद्दल बरेच जण आश्चर्य व्यक्त करतील, मात्र अलिकडील एका घटनेमुळे मी हे लिहीण्यास उद्युक्त झालो. आमच्या संघटनेच्या माध्यम व्यवस्थापकाने मला तीन प्रश्न पाठवले होते, हे प्रश्न बांधकाम उद्योगातील एका मासिकाद्वारे विचारण्यात आले होते. ते प्रश्न पर्यावरणास अनुकूल साहित्य (ग्रीन मटेरियल) वापरण्याविषयी होते व ऊर्जा-पर्यावरण समितीचा अध्यक्ष या नात्याने तो मेल माझ्याकडे उत्तरार्थ पाठविण्यात आला होता. मी जेव्हा ते प्रश्न पाहिले तेव्हा मला त्यांचे गांभीर्य जाणवले, वरकरणी ते अगदी साधे वाटले तरी त्यांचे उत्तर शोधाताना मला सखोल विचार करावा लागला. या प्रक्रियेतच मला श्रीमती टेरी यांचे वरील अतिशय सुंदर अवतरण सापडले!

पर्यावरणवादी होणे ही आजकाल फॅशन होत चालली आहे व अधिकाधिक लोक स्वतःला पर्यावरणवादी म्हणवतात, त्याचा नेमका अर्थ काय होतो हे कदाचित त्यांना माहितीही नसेल मात्र स्वतःला तसे म्हणवून घेणे ऐकायला चांगले वाटते. हे अतिशय धोकादायक आहे, एका दशकाहून अधिक काळ होऊन गेला आहे व अजूनही आपल्या देशातील हरित चळवळ केवळ जागरुकतेच्या पातळीवरच थांबल्यासारखे वाटत आहे, विशेषतः रियल इस्टेट क्षेत्रात तर हीच परिस्थिती आहे. काही बांधकाम व्यवसायिक पर्यावरणास अधिक पूरक इमारती बांधण्याचा प्रयत्न करत आहेत व वास्तुकला तज्ञही पर्यावरणपूरक संकल्पनेला धरुन प्रकल्पाची रचना करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यासोबतच २.० लाख चौ.फू. पेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या प्रकल्पासाठी पर्यावरणविषयक परवानगी घेण्यासारखे सरकारी नियम आहेत. त्याशिवाय बहुतेक स्थानिक संस्था आता भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यापूर्वी पावसाच्या पाण्याचे संधारण, गांडुळखत निर्मिती, लागवडीसाठी उद्यान विभाग इत्यादी विविध ना हरकत प्रमाणपत्रे मागतात. तरीही कुठेतरी काहीतरी गंभीर त्रुटी आहेत, कारण जर सर्वजणच पर्यावरणाचे रक्षण करण्याबाबत इतके जागरुक आहेत तर मग त्याचा परिणाम का दिसून येत नाही? कुणी असे म्हणेल की भूतकाळात या पातळीवर अतोनात हानी झाल्याने तिचा परिणाम पुसून टाकण्याची प्रक्रिया अतिशय संथ आहे व त्यामुळेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीकोनातून उचललेल्या पावलांचा परिणाम अजून दिसून येत नाही! मी मात्र याच्याशी असहमत आहे, केवळ काही प्रामाणिक प्रयत्न सोडले तर बाकी सर्वजण पर्यावरणवादी होण्याचा केवळ दिखावा करत असल्याचे मला वाटते!
सरकारला पर्यावरणविषयक अनेक तथाकथित ना हरकत प्रमाणपत्रे लागू करुन पर्यावरणाचे रक्षण करण्याबाबत ते किती जागरुक आहे हे दाखवायचे असते, मात्र त्याचवेळी ही ना हरकत प्रमाणपत्रे घेतल्यानंतर या पातळीवर काय होते याची काळजी करत नाही. दुसरीकडे रस्ते रुंदीकरण, सांडपाण्याची वाहिनी बसविणे इत्यादी स्वतःच्या प्रकल्पांमध्ये पर्यावरणविषयक नियमांचे पालन करत नाही. उदाहरणार्थ ९० च्या दशकात सुरुवातीला पुण्यामध्ये सिंहगड रस्ता तसेच पौड रस्त्याच्या कडेला मोठाले घनदाट असे वटवृक्ष होते; रस्ते रुंदीकरणामध्ये हे सगळे मोठे वृक्ष कापले गेले. मात्र त्यांच्या जागी पुन्हा वृक्षारोपण व त्यांच्या संवर्धनाचे काय? परिणामी या रस्त्यांवर लाखो वाहनांमधून बाहेर पडणा-या धुरामुळे प्रदूषण होते व या रस्त्यांवर दिवसभर आपल्याला उष्मा तसेच हवेचे प्रदूषण जाणवते. शहरातील बहुतेक प्रमुख रस्त्यांवरील परिस्थितीही अशीच आहे. त्याचवेळी या रुंद रस्त्यांचा लाभ घेण्यासाठी त्यालगत झालेल्या सर्व नव्या व्यवसायिक विकासामध्ये, रस्त्याच्या कडेला कोणतेही मोठे वृक्ष लावण्यात आले नाहीत. याचे कारण म्हणजे इमारतींमध्ये पुढील बाजूस असलेली दुकाने तसेच कार्यालयांच्या व्यवसायिक मूल्यात अडथळा निर्माण होईल, स्थानिक संस्थांनीही त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली व परिणामी शहराच्या मध्यवर्ती भागातील हा संपूर्ण पट्टा काँक्रिटचे जंगल व प्रदूषणाचे केंद्र झाला आहे!
 पावसाच्या पाण्याच्या संधारणाचीही (रेन vaa^टर हार्वेस्टिंगची)अशीच गत आहे. पीएमसी/पीसीएमसीसारख्या संस्था एकीकडे रेन vaa^टर हार्वेस्टिंग बंधनकारक करतात, तर दुसरीकडे वेगाने होणा-या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे व डांबरीकरणामुळे, पाण्याला जमीनीमध्ये जाण्यासाठी जागाच उरत नाही. ब-याच ठिकाणी रस्त्यालगतची झाडेही पूर्णपणे काँक्रिटने वेढलेली असतात किंवा फरसबंदी केलेली असते त्यामुळे बिचा-या झाडाभोवतालची माती उघडी राहू शकत नाही व कालांतरानी असे झाड मानच टाकते.
कचरा व्यवस्थापनाचा मुद्दाही अशाचप्रकारे अज्ञानीपणे हाताळला जातो, कारण भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गांडुळखत निर्मिती प्रकल्पाची अट आहे. मात्र प्रत्यक्षात भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या इमारतींमध्ये किती ओल्या कच-यावर प्रक्रिया केली जाते याची कुणीच खात्री करत नाही! पीएमसी या इमारतींमधून ओला कचरा गोळा करत राहते व या इमारतींमधील नागरिकांनी त्यांच्या ओल्या कच-यावर स्वतःच प्रक्रिया करणे अपेक्षित आहे याचा विचारच करत नाही.
त्यानंतर शहरातील व शहराच्या आजूबाजूचे जैववैविध्य; आपण शहरातून चिमण्या नामशेष होत चालल्याच्या बातम्या ऐकतो मात्र त्यासंदर्भात काहीच करत नाही. एनडीएच्या डोंगरांसारख्या थोडेफार वनक्षेत्र उरलेल्या परिसरात भटक्या कुत्र्यांनी हरिणांना मारले ही ठळक बातमी होते व विस्मरणात जाते. आपल्याकडे शहराच्या मध्यवर्ती भागात पक्षीमित्र सलीम अली यांच्या नावाचे उद्यान आहे जे झपाट्याने कचरा टाकण्याचे ठिकाण होऊ लागले आहे, तिथली झाडे कमी होत आहेत व त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेण्यासाठी कुणीही पुढे येत नाही.
या पार्श्वभूमीवर मला शहराच्या रिअल इस्टेटमधील पर्यावरणास पूरक बाबींविषयी उत्तरे द्यायची होती! शेवटी ते माझे काम असल्याने करणे भागच होते, तर सुरुवात करुया पहिल्या प्रश्नाने..

१)      सध्या, भारतामध्ये हरित उत्पादने व तंत्रज्ञानांची मागणी व बाजारपेठ कशाप्रकारे विकसित होत आहे व त्यांची उपलब्धता व किफायतशीरपणा याविषयी तुमचे काय मत आहे?
 मागणी निश्चितच आहे, मात्र त्यापेक्षाही ती काळाची गरज आहे, फ्ल्याय A^शसारख्या विटांचा कच्चा माल, एलईडी दिवे, सौर/पवन ऊर्जा निर्मिती, हरित साहित्य आवश्यक आहे. मात्र मुख्य मुद्दा आहे प्रारंभिक खर्च, त्यामुळे अशा उत्पादनांपासून विकासक दूर राहतो; त्यासोबतच अशा साहित्याची उपलब्धता व ते योग्यप्रकारे वापरण्यासाठी पायाभूत सुविधाही आवश्यक आहेत. उदाहरणार्थ एलईडी दिव्यांसाठी विशिष्ट विद्युतभाराने सातत्यपूर्ण वीजपुरवठा होणे आवश्यक आहे मात्र दुर्दैवाने तो होत नाही व त्यामुळे ते खराब होतात व ग्राहकांना त्याच्या दुरुस्तीसाठी भरमसाठ खर्च करावा लागतो. मी स्वतः माझ्या अलिकडच्या एका प्रकल्पामध्ये एलईडी दिवे बसविले, मात्र ते तिनदा बदलावे लागल्यानंतर शेवटी पारंपरिक दिवे बसविले. तसेच पाण्याचा नियंत्रित प्रवाह असलेले नळ बसविणे बंधनकारक केले पाहिजे व बाजारात ते खात्रीशीरपणे उपलब्ध असले पाहिजे, जे सध्या नसतात.
२ )     हरित (पर्यावरणपूरक) इमारत वातावरण निर्माण करण्यात सरकारची काय भूमिका आहे?
खरे तर सरकार या पातळीवर काहीच करताना जाणवत नाही. केवळ सार्वजनिक पैशातून वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देणे किंवा काही ना हरकत प्रमाणपत्रे बंधकारक केल्याने समस्या सुटणार नाही. या क्षेत्रात प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या लोकांशी चर्चा केली जात नाही, पर्यावरणपूरक उत्पादनांची व्यवस्थित जाहिरात केली जात नाही, अशा साहित्याच्या निर्मितीसाठी कोणतेही अनुदान दिले जात नाही किंवा अधिकाधिक लोकांनी त्यांचा वापर करावा यासाठी धोरणे तयार केली जात नाहीत. अशा साहित्यावर व्हॅट किंवा एलबीटीसारखे कोणतेही कर आकारले जाऊ नयेत ज्यामुळे ते अतिशय स्वस्त दरात व खुल्या बाजारात घाउक प्रमाणात उपलब्ध होईल. मात्र सोलार ^ pa^नलसारख्या साहित्यालाही व्यवस्थित अनुदान मिळत नाही; आधी तुम्हाला खिशातुन खर्च करावा लागतो व नंतर त्या पैशांची भरपाई मागावी लागते आणि सरकारकडून कोणत्याही प्रकारची भरपाई मिळविण्यासाठी काय करावे लागते हे आपण सगळे जाणतोच!
३   ) भारतीय उद्योगास हरित (पर्यावरणपूरक) करण्यासाठी भविष्यात काय योजना आहेत?
हरित (पर्यावरणपूरक) भारतीय उद्योगाचे भविष्य उज्ज्वलच असले पाहिजे नाहीतर आपले भविष्य अंधकारमय असेल! आपण ज्या-ज्या प्रकारे हरित उत्पादने तयार करु ती अधिकाधिक लोकांनी मागितली पाहिजेत. त्यासाठी संशोधन व विकास अतिशय महत्वाचा आहे, कारण त्याशिवाय आपल्याला अशा उत्पादनांची रिअल इस्टेट उद्योगाला असलेली प्रत्यक्ष गरज व व त्यामधील अडथळे समजणार नाहीत! दुर्दैवाने भारतीय उद्योगास हरित करण्यासाठी कोणत्याही ठोस भविष्यकालीन योजना नाहीत, कारण अशा योजना करण्याचे काम नेमके कुणाचे आहे याबाबत स्पष्टता नाही? अनेक वरिष्ठ असल्यावर व्यवस्थेमध्ये गोंधळ निर्माण होतो, संपूर्ण व्यवस्था पर्यावरणपूरक करण्याबाबतही असेच होत आहे. आपल्याकडे एकच सर्वोच्च विभाग असायला हवा होता व पर्यावरणाविषयीच्या सर्व धोरणांवर त्याचे नियंत्रण असायला हवे होते. आता आपल्याकडे केंद्रात व राज्यात पर्यावरण मंत्रालय आहे व त्यानंतर आपल्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळे आहेत, गृहबांधणीशी संबंधित सर्व कायदे नागरी विकास किंवा गृहबांधणी विभाग तयार करतो. त्यानंतर एमएसईडीसीएल ही आपल्याला वीज पुरवठा करणारी कंपनी आहे, आपल्याकडे ऊर्जा मंत्रालय तसेच अपारंपरिक ऊर्जास्रोत मंत्रालय आहे, तसेच महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण अर्थात एमईडीएसारख्या संस्था आहेत, ज्यांनी ऊर्जेची बचत करणा-या म्हणजेच हरित उत्पादनांचा प्रसार करणे अपेक्षित आहे. मात्र विविध मंत्रालयांच्या या विभागांमध्ये काहीही समन्वय नाही हे तथ्य आहे. त्याशिवाय या विभागांचे कुणीही अधिकारी या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणा-या लोकांशी कधीही बोलत नाहीत, हरित धोरण तयार करताना त्यांच्या सूचना विचारात घेत नाहीत व परिणामी अशी सर्व धोरणे अपयशी ठरली आहेत, नाहीतर आपल्याला वरील प्रश्न विचारावे लागले नसते.
औद्योगिक आघाडीवरही रिअल इस्टेट विकासकांनी तसेच उत्पादन उद्योगांनी पुढाकार घेऊन एकत्रितपणे काम केले पाहिजे व पर्यावरणासाठी भविष्यातील योजना तयार करण्यास सरकारवर दबाव आणला पाहिजे. ग्राहकाची भूमिकाही तितकीच महत्वाची आहे, त्यांनी केवळ महागड्या किंवा आकर्षक सुविधा/वैशिष्ट्यांचा विचार न करता पर्यावरणास पूरक साहित्याची अधिकाधिक मागणी केली पाहिजे.

पर्यावरणाची कुणालाच काळजी नाही असे रडगाणे गाऊन समस्या सुटणार नाही आणि आपण सर्वांनीच वेळेत पावले उचलायला हवीत नाही तर काळजी करण्यासाठी काहीच उरणार नाही!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com


संजीवनी डेव्हलपर्स

Tuesday, 11 March 2014

मनोगत एका लेखकाचे!

आपले भाग्य आपल्याच हृदयात असते फक्त स्वतःमध्ये ते ओळखण्याएवढे धैर्य असले पाहिजे … “ब्रेव्ह या डिस्नेच्या चित्रपटातून.
शेड्स ऑफ ग्रे अँड ग्रीन या भानुबाई नानावटी वास्तुकला महाविद्यालयाद्वारे माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मी ब्रेव्ह चित्रपटातील या वाक्याची स्वतःला वारंवार आठवण करुन देत होतो. मला गेली अनेक वर्षे श्रोत्यांसमोर बोलायची सवय आहे, मात्र माझ्या पहिल्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी माझ्या पोटात गोळा आला होता! मला स्वतःलाच त्याविषयी जरा आश्चर्य वाटत होते कारण त्यात काय मोठेसे, ते केवळ एक पुस्तक प्रकाशन होते व त्याप्रसंगी आणखी एक भाषण द्यायचे होते. मात्र तुम्ही जेव्हा एखाद्या विशिष्ट विषयावर बोलता तेव्हा तुमच्याकडे विषयाची चौकट असते व त्यामुळे अशा वेळी बोलणे सोपे असते. मात्र स्वतःच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मी काय बोलणे अपेक्षित आहे हे मला माहिती नव्हते. अशा वेळी तुम्ही पाहिलेल्या चित्रपटातील विशेषतः कार्टुनपटातील संदेश तुमच्या मदतीला येतो. मी पुस्तक प्रकाशनाच्या आदल्या रात्री टीव्हीवर ब्रेव्ह हा चित्रपट पाहिला होता व तो माझ्या मदतीला धावून आला.
बहुतेक लोक भाषण लिहून काढतात व त्यानंतर ते बोलतात, मी कधीच तसे केलेले नाही! शाळेत असताना एकदा मी महात्मा गांधींवरचे भाषण लिहून काढले होते मात्र मध्येच मी ते विसरलो मला काहीच आठवेना; त्यामुळे गांधीजी महान पुरुष होते, जय हिंद असे म्हणून मंचावरुन पळ काढला. त्या दिवसापासून मी माझे भाषण कधीही लिहून काढले नाही, मी काही महान वक्ता नाही मात्र मी मंचावर जे काही बोलतो ते उत्स्फूर्त असते, एवढे नक्की
पुण्याच्या खासदार वंदना चव्हाण मॅडम आधी पुस्तकाविषयी बोलल्या होत्या, त्यांच्यासारख्या नामवंत वक्त्यानंतर बोलणे हे खरोखर एक आव्हान होते. पुस्तक प्रकाशानाचा सोहळा झाल्यानंतर मी त्याप्रसंगी व्यक्त केलेल्या माझ्या भावना आज येथे सांगणार आहे. या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करणे मला आवश्यक वाटले. कारण कोणतेही यश एका व्यक्तिचे नसते, त्याची फळे कदाचित त्या व्यक्तिला चाखायला मिळाली तरी पडद्यामागे अनेक लोकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ते शक्य होते. माझ्या बाबतीतही माझ्या जीवनाच्या विविध टप्प्यांमध्ये माझे सर्व मित्र, भावंडे, हितचिंतक, माझे सहकारी, कुटुंबातील माझे ज्येष्ठ व माझ्या शिक्षकांमुळे हे होऊ शकले. अशा प्रकारे लेखातून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याशिवाय दुसरा कोणता योग्य मार्ग असू शकतो!

मी जे काही बोललो ते आज येथे देत आहे, यामध्ये जे बोलायचे होते मात्र राहून गेले ते देखील आहे
मंचावरील सर्व मान्यवर व माझ्या मित्रांनो, अशा वेळी जाणवते की भाषण देण्यापेक्षा लिहीणे किती सोपे आहे. लिहीताना तुमच्याकडे ते वाचून पाहण्याचा तुम्ही विचार केलेल्या शब्दांमध्ये काट-छाट करण्याचा पर्याय असतो. तुम्ही जे लिहीले आहे त्यात फेरबदल करु शकता मात्र बोलल्यानंतर त्यात बदल करता येत नाही! मी आज इथे येऊन तुमच्यापुढे काय बोलणार आहे हे मला माहिती नव्हते कारण तो माझ्यासाठी एक पूर्णपणे नवीन अनुभव  होता. मंचावर उभे राहून पहिल्या घराचा ताबा घेताना माझ्या सदनिकाधारकांना कसे वाटत असेल हे आता मला समजू शकते, माझ्या भावनाही काहीशा तशाच आहेत. वंदना ताई आधीच पुस्तकाच्या विषयाबाबत बोलल्या आहेत, मी ते का लिहीले व ते छापण्यापर्यंतचा प्रवास याविषयी बोलणार आहे. हा प्रवास जवळपास दहा वर्षांपूर्वी सुरु झाला मला तेरी (टीईआरआय) या ऊर्जा संशोधन संस्थेने दिल्ली येथे पर्यावरणविषयक परिसंवादामध्ये बोलण्यासाठी आमंत्रित केले होते. मी नोंदणी कक्षात गेल्यानंतर तेथील महिलेने मला विचारलेतुम्ही बांधकाम व्यवसायिक आहात का?” मी म्हणालोहोय.” तिने पुढे विचारले, “आणि तुम्ही पर्यावरण या विषयावर बोलायला आला आहात?” मी पुन्हा उत्तर दिलेहोय मॅडम”. त्यावर त्या महिलेने दारुबंदी आंदोलनामध्ये विजय माल्या आल्यानंतर करावा तसा चेहरा केला! तिच्या चेह-यावरील भाव स्पष्ट होते की एक बांधकाम व्यवसायिकाचे पर्यावरणविषयक परिसंवादात काय काम आहे, कारण तेच तर पर्यावरणाचा नाश करत आहेत. दहा वर्षांपूर्वीची लोकांची मानसिकता फारशी बदललेली नाही, लोकांना बीएनसीए तसेच आमच्याकडून आमंत्रणे जायला लागली तशा लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या, अरे वा तुम्ही पुस्तक लिहीले आहे! पुस्तकाचा विषय काय आहे ? ते रिअल इस्टेटविषयी आहे का? माझे उत्तर हो व नाही असे दोन्हीही होते! कारण हे पुस्तकबांधकाम व्यवसायिक कसे व्हायचे याविषयी नाही, कारण कुणालाही बांधकाम व्यवसायिक होण्यासाठी अशा पुस्तकाची गरज नसते, आपल्या देशात त्यासाठी कोणताही निकष नाही. बांधकाम व्यवसायिक होण्यासाठी थोडेसे पैसे हवेत व शासकीय यंत्रणा समजून घ्यायची गरज आहे, बाकी सर्व काही लाखो भारतीयांच्या घरांच्या मागणीमुळे आपोआप होतो ज्यांचे पहिले स्वप्न आहे स्वतः घर घेणे.
 विनोदाचा भाग सोडला तर रिअल इस्टेटमधील माझ्या २४ वर्षांच्या प्रवासात आपल्या शहरी दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक बाबी मी पाहिल्या. या समस्या व त्या सोडविण्यासाठी आपल्याला देण्यात आलेली आश्वासने पाहिली. मग वाहतुकीची समस्या असो, पाण्याची, सार्वजनिक आरोग्याची, किंवा आजूबाजूला कमी होणा-या हिरवाईची; यापैकी कोणतीही आश्वासने पूर्ण झाली नाहीत. कोणत्या तरी टप्प्यावर आपल्याला फसवणूक झाल्यासारखी वाटते व आपण पूर्ण व्यवस्थेवर वैतागतो, मात्र मनातली आशा कधीही संपत नाही. ही आशाच आपल्याला सर्व संकटांशी लढा देण्याचे सामर्थ्य देते व हे जग अधिक चांगले व्हावे यासाठी आपण प्रयत्न करतो, मात्र आपण नेमके काय करतो? आपल्यापैकी बहुतेक जण आजूबाजूच्या परिस्थितीचा दोष कुणावर तरी टाकतात. आपले शहर शांघाय किंवा सिंगापूरसारखे होईल अशी स्वप्ने आपल्याला दाखविली जातात. आज इथे वास्तुरचना किंवा शहर नियोजन या क्षेत्रातील कितीतरी मोठी नावे उपस्थित आहेत. मात्र मला असे वाटते की फक्त आयटी पार्क्स किंवा मेट्रो किंवा उड्डाणपूल उभारल्याने कोणतेही शहर सिंगापूर होत नाही, जे एक आदर्श शहर मानले जाते ते तर प्रत्येक नागरिकाचा शहराविषयीचा दृष्टिकोन शहराचे भवितव्य निश्चित करतो की ते एक चांगले शहर होईल की एक बकाल शहर होईल!
 या विचारातूनच मी एक व्यक्ती म्हणून काय करु शकतो व करायला हवे असा विचार करण्याची प्रेरणा मला मिळाली व मी माझ्या भावना कागदावर उतरवल्या. त्या लेखनामुळेच आज आपण सर्वजण येथे एकत्र जमलो आहोत. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेसारख्या शैक्षणिक संस्थेद्वारे चालविले जाणारे वास्तुरचना महाविद्यालय हे पुस्तक छापत आहे, पुण्याच्या खासदार त्या पुस्तकातील मजकूर वाचून दाखवत आहेत व माझ्यासारख्या बांधकाम व्यवसायिक लेखकाने ते लिहीले आहे. शहराच्या सामाजिक जीवनातील अनेक नामवंत व्यक्तिंच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे! एक चांगले शहर घडविण्याच्या दृष्टीने यापेक्षा चांगली सुरुवात आणखी काय असू शकते! केवळ पर्यावरण असा विषय आहे की जो समाजाच्या सर्व घटकांना एका मंचावर आणू शकतो व तसे होईपर्यंत आपण एक आदर्श समाज किंवा शहर होऊ शकत नाही हे तथ्य आहे. मी जे काही लिहीले आहे ते यासाठीच.
 मला काही वर्षांपूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली. त्या भाषणात त्यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आवाहन केले की पदवीद्वारे तुम्हाला एक चांगली नौकरी, पैसा, ओळख, सन्मान व इतरही अनेक गोष्टी मिळतील, मात्र तुम्ही अभियांत्रिकीला परत काय देणार आहात? याप्रमाणेच या शहराने मला ओळख दिली, रिअल इस्टेट क्षेत्राने मला पैसा दिला, मला जाणीव आहे की मी काही फक्त समाजकार्य करण्यासाठी या व्यवसायामध्ये आलेलो नाही. पर्यावरणाने आज मला प्राध्यापकांना व्याख्यान देण्याची संधी दिली आहे. मागच्या बाकांवर बसून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या माझ्यासारख्या मुलाला आज एवढ्या मान्यवरांसोबत पुढच्या रांगेत बसायचा बहुमान मिळाला आहे, हे सर्व मला माझा व्यवसाय व या शहरामुळे मिळाले आहे. म्हणूनच पुस्तकाच्या रुपाने या दोन्हींचे ऋण थोडेफार फेडण्याचा माझा प्रयत्न आहे. आज रिअल इस्टेट उद्योगाकडे आदराने पाहिले जात नाही, मात्र वंदना ताईंनी म्हणल्याप्रमाणे थोडेफार चांगले राजकारणी आहेत, त्याचप्रमाणे अनेक चांगले बांधकाम व्यवसायिकही आहेत जे माझ्यापेक्षाही चांगले काम करत आहेत. हे पुस्तक म्हणजे, आपल्या कामाद्वारे रिअल इस्टेट उद्योगाला अधिक चांगला चेहरा देण्याचा प्रयत्न करणा-या माझ्या सर्व सहका-यांना आदरांजली आहे.
मी बीएनसीएच्या चमूचे विशेषत्वाने आभार मानतो, अनुराग कश्यप सर हे या महाविद्यालयाचे अतिशय उत्साही प्राचार्य आहेत, रितू मॅडम, जयदेव व तेजस यांनी अनेक चित्रांच्या रुपाने माझ्या शब्दांना चेहरा दिला, माझे मित्र नितीन, पूनम व विजय, माझा बॅडमिंटनचा ग्रुप, मॉर्निंग स्टार्स आज मला प्रोत्साहन देण्यासाठी इथे हजर आहे, सर्वात महत्वाचे म्हणजे आमची संघटना क्रेडईचे मी विशेष आभार मानतो, तिच्यामुळेच मी या उद्योगाच्या विविध समस्या समजावून घेऊ शकलो, सकाळ व लोकसत्ताच्या चमूंनी मला लिहीत राहण्यासाठी प्रोत्साहन दिले, त्यांनी माझे लेख छापले नसते तर मला माझ्या क्षमतेची जाणीव कधीच झाली नसती. माझ्या शिक्षक पालकांसाठी आजचा दिवस अतिशय अभिमानाचा आहे. मी किती इमारती बांधल्या किंवा माझ्याकडे किती गाड्या आहेत यापेक्षा मी पुस्तक लिहीले जे विद्यार्थ्यी वाचणार आहेत हेच त्यांच्यासाठी अधिक महत्वाचे आहे. माझी बहीण व माझ्या चुलत-आते भावंडांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले, संजीवनीच्या संपूर्ण टिमने मला विचार करण्यासाठी व लिहीण्यासाठी मोकळा वेळ दिला, म्हणूनच या पुस्तकाचे अशा प्रकारे बरेच लेखक आहेत. सर्वात शेवटचे मात्र महत्वाचे म्हणजे माझी पत्नी, मी लिहीत असताना तिने घरच्या आघाडीवर सर्व काही सांभाळले म्हणूनच या पुस्तकात तिचे योगदान मोलाचे आहे.
निरोप घेण्यापूर्वी बीएनसीएच्या विद्यार्थ्यांना एकच सांगावेसे वाटते की भरपुर वाचत जा व मनातले लिहीत राहा, तरच एक दिवस असा येईल की तुम्ही या मंचावर असाल व केवळ तुमच्या जीवलगांनाच नाही तर तुम्हाला स्वतःलाही त्याचा अतिशय अभिमान वाटत असेल!
मनःपूर्वक आभार ….


संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स