Tuesday, 11 March 2014

मनोगत एका लेखकाचे!

आपले भाग्य आपल्याच हृदयात असते फक्त स्वतःमध्ये ते ओळखण्याएवढे धैर्य असले पाहिजे … “ब्रेव्ह या डिस्नेच्या चित्रपटातून.
शेड्स ऑफ ग्रे अँड ग्रीन या भानुबाई नानावटी वास्तुकला महाविद्यालयाद्वारे माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मी ब्रेव्ह चित्रपटातील या वाक्याची स्वतःला वारंवार आठवण करुन देत होतो. मला गेली अनेक वर्षे श्रोत्यांसमोर बोलायची सवय आहे, मात्र माझ्या पहिल्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी माझ्या पोटात गोळा आला होता! मला स्वतःलाच त्याविषयी जरा आश्चर्य वाटत होते कारण त्यात काय मोठेसे, ते केवळ एक पुस्तक प्रकाशन होते व त्याप्रसंगी आणखी एक भाषण द्यायचे होते. मात्र तुम्ही जेव्हा एखाद्या विशिष्ट विषयावर बोलता तेव्हा तुमच्याकडे विषयाची चौकट असते व त्यामुळे अशा वेळी बोलणे सोपे असते. मात्र स्वतःच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मी काय बोलणे अपेक्षित आहे हे मला माहिती नव्हते. अशा वेळी तुम्ही पाहिलेल्या चित्रपटातील विशेषतः कार्टुनपटातील संदेश तुमच्या मदतीला येतो. मी पुस्तक प्रकाशनाच्या आदल्या रात्री टीव्हीवर ब्रेव्ह हा चित्रपट पाहिला होता व तो माझ्या मदतीला धावून आला.
बहुतेक लोक भाषण लिहून काढतात व त्यानंतर ते बोलतात, मी कधीच तसे केलेले नाही! शाळेत असताना एकदा मी महात्मा गांधींवरचे भाषण लिहून काढले होते मात्र मध्येच मी ते विसरलो मला काहीच आठवेना; त्यामुळे गांधीजी महान पुरुष होते, जय हिंद असे म्हणून मंचावरुन पळ काढला. त्या दिवसापासून मी माझे भाषण कधीही लिहून काढले नाही, मी काही महान वक्ता नाही मात्र मी मंचावर जे काही बोलतो ते उत्स्फूर्त असते, एवढे नक्की
पुण्याच्या खासदार वंदना चव्हाण मॅडम आधी पुस्तकाविषयी बोलल्या होत्या, त्यांच्यासारख्या नामवंत वक्त्यानंतर बोलणे हे खरोखर एक आव्हान होते. पुस्तक प्रकाशानाचा सोहळा झाल्यानंतर मी त्याप्रसंगी व्यक्त केलेल्या माझ्या भावना आज येथे सांगणार आहे. या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करणे मला आवश्यक वाटले. कारण कोणतेही यश एका व्यक्तिचे नसते, त्याची फळे कदाचित त्या व्यक्तिला चाखायला मिळाली तरी पडद्यामागे अनेक लोकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ते शक्य होते. माझ्या बाबतीतही माझ्या जीवनाच्या विविध टप्प्यांमध्ये माझे सर्व मित्र, भावंडे, हितचिंतक, माझे सहकारी, कुटुंबातील माझे ज्येष्ठ व माझ्या शिक्षकांमुळे हे होऊ शकले. अशा प्रकारे लेखातून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याशिवाय दुसरा कोणता योग्य मार्ग असू शकतो!

मी जे काही बोललो ते आज येथे देत आहे, यामध्ये जे बोलायचे होते मात्र राहून गेले ते देखील आहे
मंचावरील सर्व मान्यवर व माझ्या मित्रांनो, अशा वेळी जाणवते की भाषण देण्यापेक्षा लिहीणे किती सोपे आहे. लिहीताना तुमच्याकडे ते वाचून पाहण्याचा तुम्ही विचार केलेल्या शब्दांमध्ये काट-छाट करण्याचा पर्याय असतो. तुम्ही जे लिहीले आहे त्यात फेरबदल करु शकता मात्र बोलल्यानंतर त्यात बदल करता येत नाही! मी आज इथे येऊन तुमच्यापुढे काय बोलणार आहे हे मला माहिती नव्हते कारण तो माझ्यासाठी एक पूर्णपणे नवीन अनुभव  होता. मंचावर उभे राहून पहिल्या घराचा ताबा घेताना माझ्या सदनिकाधारकांना कसे वाटत असेल हे आता मला समजू शकते, माझ्या भावनाही काहीशा तशाच आहेत. वंदना ताई आधीच पुस्तकाच्या विषयाबाबत बोलल्या आहेत, मी ते का लिहीले व ते छापण्यापर्यंतचा प्रवास याविषयी बोलणार आहे. हा प्रवास जवळपास दहा वर्षांपूर्वी सुरु झाला मला तेरी (टीईआरआय) या ऊर्जा संशोधन संस्थेने दिल्ली येथे पर्यावरणविषयक परिसंवादामध्ये बोलण्यासाठी आमंत्रित केले होते. मी नोंदणी कक्षात गेल्यानंतर तेथील महिलेने मला विचारलेतुम्ही बांधकाम व्यवसायिक आहात का?” मी म्हणालोहोय.” तिने पुढे विचारले, “आणि तुम्ही पर्यावरण या विषयावर बोलायला आला आहात?” मी पुन्हा उत्तर दिलेहोय मॅडम”. त्यावर त्या महिलेने दारुबंदी आंदोलनामध्ये विजय माल्या आल्यानंतर करावा तसा चेहरा केला! तिच्या चेह-यावरील भाव स्पष्ट होते की एक बांधकाम व्यवसायिकाचे पर्यावरणविषयक परिसंवादात काय काम आहे, कारण तेच तर पर्यावरणाचा नाश करत आहेत. दहा वर्षांपूर्वीची लोकांची मानसिकता फारशी बदललेली नाही, लोकांना बीएनसीए तसेच आमच्याकडून आमंत्रणे जायला लागली तशा लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या, अरे वा तुम्ही पुस्तक लिहीले आहे! पुस्तकाचा विषय काय आहे ? ते रिअल इस्टेटविषयी आहे का? माझे उत्तर हो व नाही असे दोन्हीही होते! कारण हे पुस्तकबांधकाम व्यवसायिक कसे व्हायचे याविषयी नाही, कारण कुणालाही बांधकाम व्यवसायिक होण्यासाठी अशा पुस्तकाची गरज नसते, आपल्या देशात त्यासाठी कोणताही निकष नाही. बांधकाम व्यवसायिक होण्यासाठी थोडेसे पैसे हवेत व शासकीय यंत्रणा समजून घ्यायची गरज आहे, बाकी सर्व काही लाखो भारतीयांच्या घरांच्या मागणीमुळे आपोआप होतो ज्यांचे पहिले स्वप्न आहे स्वतः घर घेणे.
 विनोदाचा भाग सोडला तर रिअल इस्टेटमधील माझ्या २४ वर्षांच्या प्रवासात आपल्या शहरी दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक बाबी मी पाहिल्या. या समस्या व त्या सोडविण्यासाठी आपल्याला देण्यात आलेली आश्वासने पाहिली. मग वाहतुकीची समस्या असो, पाण्याची, सार्वजनिक आरोग्याची, किंवा आजूबाजूला कमी होणा-या हिरवाईची; यापैकी कोणतीही आश्वासने पूर्ण झाली नाहीत. कोणत्या तरी टप्प्यावर आपल्याला फसवणूक झाल्यासारखी वाटते व आपण पूर्ण व्यवस्थेवर वैतागतो, मात्र मनातली आशा कधीही संपत नाही. ही आशाच आपल्याला सर्व संकटांशी लढा देण्याचे सामर्थ्य देते व हे जग अधिक चांगले व्हावे यासाठी आपण प्रयत्न करतो, मात्र आपण नेमके काय करतो? आपल्यापैकी बहुतेक जण आजूबाजूच्या परिस्थितीचा दोष कुणावर तरी टाकतात. आपले शहर शांघाय किंवा सिंगापूरसारखे होईल अशी स्वप्ने आपल्याला दाखविली जातात. आज इथे वास्तुरचना किंवा शहर नियोजन या क्षेत्रातील कितीतरी मोठी नावे उपस्थित आहेत. मात्र मला असे वाटते की फक्त आयटी पार्क्स किंवा मेट्रो किंवा उड्डाणपूल उभारल्याने कोणतेही शहर सिंगापूर होत नाही, जे एक आदर्श शहर मानले जाते ते तर प्रत्येक नागरिकाचा शहराविषयीचा दृष्टिकोन शहराचे भवितव्य निश्चित करतो की ते एक चांगले शहर होईल की एक बकाल शहर होईल!
 या विचारातूनच मी एक व्यक्ती म्हणून काय करु शकतो व करायला हवे असा विचार करण्याची प्रेरणा मला मिळाली व मी माझ्या भावना कागदावर उतरवल्या. त्या लेखनामुळेच आज आपण सर्वजण येथे एकत्र जमलो आहोत. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेसारख्या शैक्षणिक संस्थेद्वारे चालविले जाणारे वास्तुरचना महाविद्यालय हे पुस्तक छापत आहे, पुण्याच्या खासदार त्या पुस्तकातील मजकूर वाचून दाखवत आहेत व माझ्यासारख्या बांधकाम व्यवसायिक लेखकाने ते लिहीले आहे. शहराच्या सामाजिक जीवनातील अनेक नामवंत व्यक्तिंच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे! एक चांगले शहर घडविण्याच्या दृष्टीने यापेक्षा चांगली सुरुवात आणखी काय असू शकते! केवळ पर्यावरण असा विषय आहे की जो समाजाच्या सर्व घटकांना एका मंचावर आणू शकतो व तसे होईपर्यंत आपण एक आदर्श समाज किंवा शहर होऊ शकत नाही हे तथ्य आहे. मी जे काही लिहीले आहे ते यासाठीच.
 मला काही वर्षांपूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली. त्या भाषणात त्यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आवाहन केले की पदवीद्वारे तुम्हाला एक चांगली नौकरी, पैसा, ओळख, सन्मान व इतरही अनेक गोष्टी मिळतील, मात्र तुम्ही अभियांत्रिकीला परत काय देणार आहात? याप्रमाणेच या शहराने मला ओळख दिली, रिअल इस्टेट क्षेत्राने मला पैसा दिला, मला जाणीव आहे की मी काही फक्त समाजकार्य करण्यासाठी या व्यवसायामध्ये आलेलो नाही. पर्यावरणाने आज मला प्राध्यापकांना व्याख्यान देण्याची संधी दिली आहे. मागच्या बाकांवर बसून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या माझ्यासारख्या मुलाला आज एवढ्या मान्यवरांसोबत पुढच्या रांगेत बसायचा बहुमान मिळाला आहे, हे सर्व मला माझा व्यवसाय व या शहरामुळे मिळाले आहे. म्हणूनच पुस्तकाच्या रुपाने या दोन्हींचे ऋण थोडेफार फेडण्याचा माझा प्रयत्न आहे. आज रिअल इस्टेट उद्योगाकडे आदराने पाहिले जात नाही, मात्र वंदना ताईंनी म्हणल्याप्रमाणे थोडेफार चांगले राजकारणी आहेत, त्याचप्रमाणे अनेक चांगले बांधकाम व्यवसायिकही आहेत जे माझ्यापेक्षाही चांगले काम करत आहेत. हे पुस्तक म्हणजे, आपल्या कामाद्वारे रिअल इस्टेट उद्योगाला अधिक चांगला चेहरा देण्याचा प्रयत्न करणा-या माझ्या सर्व सहका-यांना आदरांजली आहे.
मी बीएनसीएच्या चमूचे विशेषत्वाने आभार मानतो, अनुराग कश्यप सर हे या महाविद्यालयाचे अतिशय उत्साही प्राचार्य आहेत, रितू मॅडम, जयदेव व तेजस यांनी अनेक चित्रांच्या रुपाने माझ्या शब्दांना चेहरा दिला, माझे मित्र नितीन, पूनम व विजय, माझा बॅडमिंटनचा ग्रुप, मॉर्निंग स्टार्स आज मला प्रोत्साहन देण्यासाठी इथे हजर आहे, सर्वात महत्वाचे म्हणजे आमची संघटना क्रेडईचे मी विशेष आभार मानतो, तिच्यामुळेच मी या उद्योगाच्या विविध समस्या समजावून घेऊ शकलो, सकाळ व लोकसत्ताच्या चमूंनी मला लिहीत राहण्यासाठी प्रोत्साहन दिले, त्यांनी माझे लेख छापले नसते तर मला माझ्या क्षमतेची जाणीव कधीच झाली नसती. माझ्या शिक्षक पालकांसाठी आजचा दिवस अतिशय अभिमानाचा आहे. मी किती इमारती बांधल्या किंवा माझ्याकडे किती गाड्या आहेत यापेक्षा मी पुस्तक लिहीले जे विद्यार्थ्यी वाचणार आहेत हेच त्यांच्यासाठी अधिक महत्वाचे आहे. माझी बहीण व माझ्या चुलत-आते भावंडांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले, संजीवनीच्या संपूर्ण टिमने मला विचार करण्यासाठी व लिहीण्यासाठी मोकळा वेळ दिला, म्हणूनच या पुस्तकाचे अशा प्रकारे बरेच लेखक आहेत. सर्वात शेवटचे मात्र महत्वाचे म्हणजे माझी पत्नी, मी लिहीत असताना तिने घरच्या आघाडीवर सर्व काही सांभाळले म्हणूनच या पुस्तकात तिचे योगदान मोलाचे आहे.
निरोप घेण्यापूर्वी बीएनसीएच्या विद्यार्थ्यांना एकच सांगावेसे वाटते की भरपुर वाचत जा व मनातले लिहीत राहा, तरच एक दिवस असा येईल की तुम्ही या मंचावर असाल व केवळ तुमच्या जीवलगांनाच नाही तर तुम्हाला स्वतःलाही त्याचा अतिशय अभिमान वाटत असेल!
मनःपूर्वक आभार ….


संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्सNo comments:

Post a Comment