Sunday, 12 February 2012

नवीन कारभारी आणि शहराच्या अपेक्षा 

 

 

 

प्रभावी नेतृत्व म्हणजे योग्य गोष्टीला प्राधान्य देणं आणि प्रभावी व्यवस्थापन म्हणजे शिस्तबद्धपणे, त्यांची अंमलबजावणी करणे...स्टीफन कोव्ही.

पुढील आठवड्यात यावेळेपर्यंत निवडणुका संपल्या असतील आणि पीएमसीवर कुणाची सत्ता असेल याचं चित्र स्पष्ट झालेलं असेल. जेव्हा मी या विषयावर लिहायला सुरुवात केली तेव्हा प्रचार रंगात आला होता. प्रत्येक सदस्य हे पटवून द्यायचा प्रयत्न करत होता की तो शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं जीवन कसं सहज आणि सोपं करेल. प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक नव्या चित्रपटाचे निर्माता/दिग्दर्शक नेहमी त्यांच्या चित्रपटाविषयी सांगतात की तो “इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आहे”, इथे सुद्धा प्रत्येक जण शहरामध्ये ते जे बदल घडवून आणतील त्याविषयी आश्वासन देत आहे!
हा स्तंभ निवडणुका, राजकीय दृष्टीकोन यासाठी नाही हे मान्य असलं तरी दुर्दैवाने समाजाची ही बाजू केवळ पायाभूत सुविधा, शहराचा विकास यांच्याशीच नाही तर शहराच्या एकूणच चरित्र्याशी अतिशय जवळून निगडित असते! आता तुम्ही विचाराल शहराचे चारित्र्य म्हणजे काय? याचा अर्थ म्हणजे तुम्ही शहराकडे ज्याप्रकारे पाहता आणि शहराला अनुभवता. अगदी अलिकडच्या काळापर्यंत हे शहर "निवृत्त लोकांसाठी स्वर्ग " मानलं जायचं. इथे एकप्रकारचा निवांतपणा आणि उबदारपणा होता, रस्त्यांवर एवढी रहदारी, गजबज नसायची. दुकानं सकाळी दहा वाजता उघडायची आणि दुपारच्या वामकुक्षीसाठी बंद केली जायची आणि रात्री ८ वाजेपर्यंत शहरात सामसुम व्हायची! हळूहळू शहराचं स्वरुप बदलून ते “शैक्षणिक राजधानी” झालं. देशाच्या कानाकोपऱ्यातून वाढत्या संख्येनं विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येऊ लागले. आता आपण स्वतःला अभिमानाने माहिती तंत्रज्ञानाचे आणि औद्योगिक केंद्र म्हणवतो आणि ऑटो उद्योगांच्या वाढत्या संख्येमुळे हे "पश्चिमेचं डेट्रॉइट" झालं आहे!
मात्र ही सर्व बिरुदं मिळवताना त्याची किंमत चुकवावी लागते हे विसरुन चालणार नाही! यामुळेच केवळ शहराचे चारित्र्यच नाही तर त्याच्या गरजाही बदलल्या आहेत आणि म्हणूनच जेव्हा शहराच्या विकासाचा मुद्दा येतो तेव्हा सार्वजनिक संस्थांच्या निवडणुकांचा उल्लेख होतो. घर ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत आणि प्राथमिक गरज आहे. शहर अधिकाधिक लोकांना रोजगार पुरवतंय त्यामुळे घरांची गरजही वाढतेय ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच रियल इस्टेटची परिस्थिती कशी आहे हा प्रश्न नाही तर आपण हजारो गरजूंना घर देऊ शकतो का हा प्रश्न आहे? आणि मला खेदाने सांगावसं वाटतं की उत्तर नाही आहे! इथे बरेच जण म्हणतील की रियल इस्टेट विकासकांच्या लोभामुळेच घरांच्या किमती गरजू लोकांच्या आवाक्यात नाहीत! हे अंशतः खरे आहे मात्र जेव्हा घरासारखा गुंतागुंतीचा विषय असतो तेव्हा अपयशासाठी केवळ एक कारण नसतं. कारण सरते शेवटी शहरावर केवळ विकासकाचंच नाही तर त्यातील लोकांचं, ते ज्या सार्वजनिक संस्थांना निवडून देतात आणि त्या सार्वजनिक संस्थांच्या धोरणांचंही नियंत्रण असतं! आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला या घटकाकडे बघावं लागेल.
ज्या लोकांना आपण निवडून दिलं आहे ते धोरणं बनवणार आहेत, त्यातूनच शहराचं जे चारित्र्य किंवा ओळख निर्माण झाली आहे ती सार्थ करण्याची ताकद मिळणार आहे!
शहराला चांगल्या घरांची आवश्यकता आहे आणि चांगलं घर हे केवळ किंमत किंवा त्यातील सुविधा अथवा भविष्यात त्याची किंमत कशी वाढेल याद्वारे ठरवलं जात नाही तर एखाद्या परिसरामुळे तिथे राहणाऱ्या व्यक्तिला कशा दर्जाचं जीवन मिळतं यावर चांगलं घर अवलंबून असतं.
दर्जा म्हणजे इटालीयन मार्बल किंवा न्हाणीघरात उंची साधनं बसवणं नाही, या सगळ्या सुविधा प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे बसवू शकतात.  परिसराचा दर्जा शहरातील रस्त्यांवर फिरताना तुम्हाला जाणवतो, तो नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला हवा आणि त्यांच्या बोलण्यातून जाणवला पाहिजे.
आजकाल नागरिकांच्या शहराबद्दल काय अपेक्षा आहेत हे आपण प्रसिद्धी माध्यमांपासून ते विविध चर्चासत्रांपर्यंत विविध माध्यमांमधून ऐकत असतो. आता कुणीही समाजाच्या सर्व अपेक्षा पूर्ण करु शकणार नाही हे मान्य केलं तरीही त्यासाठी प्रयत्न नक्कीच करु शकतो आणि लोकांची अशी भावना आहे की त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा साधा प्रयत्नही केला जात नाही, हीच समस्या आहे!
आणि अपेक्षा तरी काय आहेत? नक्कीच कुणीही चंद्राची सफर घडवून आणण्याची मागणी करत नाही केवळ अतिशय मूलभूत गोष्टी म्हणजे, पाणी, चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, स्वच्छ रस्ते, अतिक्रमणरहित पदपथ आणि सायकलींसाठी मार्ग, परवडणारं शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा या त्यातल्या काही अपेक्षा आहेत. हे कुणालाही वैयक्तिक खरेदी करता येणार नाही मात्र सार्वजनिक संस्थांवर सत्ता असणाऱ्यांच्या धोरणांमधून याबाबत निर्णय घेतला जातो आणि त्यांची अंमलबजावणी होते. निवडून आलेल्या सदस्यांवर ही जबाबदारी असते आणि सामान्य माणसानंही इतर कुणाकडून अपेक्षा करायची? या अपेक्षांसाठी लोकांनी मतदान केलेलं असतं आणि या अपेक्षा येत्या काही वर्षात शहराचं चारित्र्य किंवा त्याची ओळख कशी असेल हे ठरवतील.
राजकारणाविषयी बोलायचं नाही म्हटलं तरी एका गोष्टीचा उल्लेख केल्यावाचून राहावत नाही, प्रचारादरम्यान सर्वच पक्षांच्या मुद्द्यांमध्ये एक समान धागा होता तो म्हणजे बहुमत मिळालं तर बदल घडवून आणू! इथे सामान्य माणसाला प्रश्न पडेल की एखादी गोष्ट चांगली करणं हा प्रत्येकाचा वेगळा कार्यक्रम कसा असू शकतो? चांगल्या शहराची व्याख्या व्यक्तिगणिक बदलते का? काही प्रमाणात ती वेगळी असू शकते उदाहरणार्थ मेट्रो भूयारी असावी की जमीनीवर याबाबत दुमत असू शकतं मात्र आहे ती सार्वजनिक वाहतूक यंत्रणा बळकट करण्याविषयी किंवा रस्तांचं जाळं आणखी वेगाने वाढवण्याचं काय? शहराचा डीपी इतके दिवस का स्थगित ठेवण्यात आला होता आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतरही, शहर आणि परिसरातल्या घटत्या जैवविविधतेचा प्रश्न का टांगता ठेवण्यात आला आहे? नव्याने (आता हा शब्दही जुना झाला आहे) अधिग्रहित गावांमधील अनेक पट्टे तसेच पडून आहेत, विविध हेतूने राखीव जमीनींचे वेगाने अधिग्रहण करुन, ज्या हेतूने त्या राखीव आहेत त्यासाठी लवकरात लवकर विकसित का केल्या जात नाहीत? अशा उद्दिष्टांसाठी मतभेद कसे असू शकतात? निवडून आलेले सर्व सदस्य, त्यांना ज्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निवडून देण्यात आलं आहे त्या पूर्ण करण्यासाठी एकत्र का येत नाहीत? इथे आपण पक्षसीमा विसरुन केवळ शहराच्या विकासाचा विचार का करु शकत नाही? बरेचण जण हा विचार किती निरागस आहे म्हणून हसतील, पण सामान्य माणसाला या प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. एक लहानसं आणि चांगला परिसर असलेलं घर मिळवण्याचं स्वप्न आणि परवडणाऱ्या किंमतीमध्ये योग्य पायाभूत सुविधा मिळवण्याचा मार्ग इथेच आहे हे सामान्य माणूस जाणतो! मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना, आपण ज्यांना निवडून दिलं आहे त्यांना असे प्रश्न विचारण्याएवढा अधिकार आहे!
मला असं वाटतं की महानगरपालिकेवर जे कोणी निवडून येतील त्यांच्यावर अतिशय मोठी जबाबदारी आहे, कारण शहरामध्ये अनेक बदल होत आहेत. येती काही वर्ष शहराचं चारित्र्य कसं असेल किंवा आपण चारित्र्यहीन होऊ हे ठरवतील? इथली ४०% लोकसंख्या झोपडपट्टीत राहते ही बाब धक्कादायक आहे, तीसएक वर्षांपूर्वी या शहरात अशी परिस्थिती नव्हती! याचा अर्थ असाही होत नाही की उरलेली ६०% जनता जी चांगल्या घरांमध्ये राहते ती त्यांच्या घराबाहेरच्या पायाभूत सुविधांविषयी समाधानी आहे आणि त्यांना शहराविषयी काहीही तक्रारी नाहीत. एखादी व्यक्ती खर्च करुन घरामध्ये सर्वोत्तम फर्निचर बनवून घेऊ शकते मात्र स्वतःच्या इमारतीबाहेर फूटभऱ लांबीची सांडपाण्याची वाहिनी टाकून घेऊ शकत नाही किंवा सार्वजनिक रस्ता नीट करुन घेऊ शकत नाही. ही सार्वजनिक संस्थेची जबाबदारी आहे कारण लाखो लोकांना रस्ते, सांडपाणी अशा मूलभूत सुविधांची आवश्यकता असते आणि त्यासाठी ते निवडेल्या सदस्यांनाच जबाबदार धरतात! यासंदर्भातील धोरणे वेगाने तयार करुन त्यांची अंमलबजावणी केल्यानेच प्रत्येक नागरिकाची घराची गरज पूर्ण होऊ शकेल. हा केवळ एकमात्र उपाय असणार नाही मात्र अधिकाधिक मोकळ्या जागेचा, ती ज्या कारणाने आरक्षित करण्यात आली होती त्यासाठी योग्य वापर झाला आणि संपूर्ण शहरात पायाभूत सुविधांचा समतोल विकास करण्यात आला तर घरांच्या किमती संतुलित राहण्यास नक्कीच मदत होईल. किंवा सध्यासारखी परिस्थिती निर्माण होईल जिथे पायाभूत सुविधा आहेत तिथे किमती आवाक्याबाहेर आहेत आणि जिथे किमती आवाक्यात आहेत तिथे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था यासारख्या पायाभूत नाहीत, शाळा, वैद्यकीय सुविधा यासारख्या सामाजिक सुविधा तर दूरच राहिल्या, त्यामुळे तिथे कुणालाही आनंदाने राहता येणार नाही. अशा ठिकाणी ज्यांचे घर आहे त्यांना वाईट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाण्याची कमतरता असे प्रश्न भेडसावत आहेत, ते शहराला दूषणे देत जीवन जगत आहेत! हे नक्कीच चांगल्या शहराचे लक्षण नाही आणि याबाबत लवकर पावलं उचलली नाहीत तर परिस्थिती अधिकाधिक खराब होत जाईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे! आमच्या नव्या शासनकर्त्यांना याची जाणीव होईल अशी अपेक्षा करुया! कारण सरतेशेवटी शहरातील प्रत्येक व्यक्तिच्या वैयक्तिक नाही तर एकूणच शहराच्या अपेक्षा महत्वाच्या असतात! निवडून आलेल्या सदस्यांनी शहराचा कारभार हाती घेताना याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे.
परिस्थिती एका रात्रीत बदलणार नाही हे मान्य आहे, मात्र तो बदल घडवण्यासाठी पाच वर्षे आहेत आणि आपले काम केवळ पाच वर्षातून एकदा मतदान करुन संपत नाही! कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं याची जाणीव आपल्या नेत्यांना करुन देण्याची जबाबदारी आपल्याला सतत पार पाडायची आहे, तरच आपल्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतील!


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स
एन्व्हो-पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारसरणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!

संजीवनीची सामाजिक बाजू!

http://www.flickr.com/photos/65629150@N06/sets/72157628805700569/
शहराविषयीच्या तुमच्या कुठल्याही तक्रारींसाठी, खालील लिंकवर लॉग-ऑन करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx

हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा

www.sanjeevanideve.com