Thursday 24 August 2017

क्षितीजापार निघालेले जहाज ! (एका वडिलांचे मनोगत : )



































प्रिय रोहीत (दादा) ,

जहाज बंदरात सगळ्यात सुरक्षित असतं, मात्र बंदरात रहाण्यासाठी जहाजाची बांधणी केली जात नाही”… ग्रेस मरे हॉपर.

 खरच अमेरिकेच्या नौदलाचे रिअर ऍडमिरल हॉपर यांच्याशिवाय जहाज व त्याच्या असण्याच्या उद्देशाचे अधिक चांगल्याप्रकारे वर्णन कोण करू शकेल. दादा आज तू तुझं बंदर म्हणजे पुणे सोडून जाताना वरील अवतरण हजारो वेळा माझ्या मनात येऊन गेलं. बरोबर 22 वर्षं तुझं हे जहाज घररुपी बंदरात सुरक्षितरित्या नांगरलेले होते. मात्र एक दिवस या जहाजाला बंदर सोडून जावंच लागणार याची मला जाणीव होती आणि आता तो दिवस उजाडला आहे. मी देखील 13 वर्षांचा असताना जेव्हा माझं बंदर सोडून निघालो तेव्हा माझ्या वडिलांना काय वाटलं असेल हे माहिती नाही, मात्र मला आधीच्या पिढीचं कौतुक करावसं वाटतं की त्यांनी आम्हाला अनेकदा कठिण आव्हानांचा सामना करू दिला, मला आमच्या पिढीच्या बाबतीत मात्र तसं म्हणता येणार नाही. मला अजूनही 12 मे 95 हा दिवस आठवतोय, सारसबाग गणपती मंदिरासमोरच्या पाटणकर हॉस्पिटलच्या व्हरांड्यात मी बसलो होतो. मी तुला पहिल्यांदा पाहिलं तो क्षण आठवतोय आणि खरं सांगू तुझ्या जन्मानं माझ्यावर काय जबाबदारी आली आहे हे समजायलाही मी खूप तरूण होतो, मात्र तू जसा मोठा होत गेलास तसंच तुझ्यासोबतच मीसुद्धा ही जबाबदारी उचलायला शिकत गेलो, कदाचित थोडं उशिराच असेल, पण शिकलो नक्की!

 मी मागे वळून पाहतो तेव्हा मार्व्हल कॉमिक्सच्या चित्रपटांतील टायटल्सप्रमाणे तुझी विविध क्षणचित्रं माझ्या डोळ्यासमोरून सरकत जातात. मी तुला खूप वेळ देऊ शकलो असं नाही पण मला तुझं दोन वर्षांचं गुटगुटीत रुपडं आठवतंय. आपल्या सहकारनगरमधल्या घराच्या स्वयंपाकघराच्या दाराला लटकवलेल्या झोक्यात बसून तू झोके घेत असायचास, तसंच तुझा गणवेश घालून सिंबायसिस शाळेत जातानाचा पहिला दिवसही आठवतोय. इतर लहान मुलांसोबत तुला कार्टुन चित्रपटांना नेलेलं आठवतंय. मला अजूनही तू खारवलेल्या काजूचं पाकीट पाहिलं की तोंडाचा चंबू करून आनंदाने खारे काजू असं ओरडायचास हे आठवतंय.त्यानंतर दहावीच्या परीक्षेच्या वेळी तुझा अभ्यास घेतला, तुझी अभ्यासाची भीती घालवली, तुझी बाईक आल्यावर तुला झालेला आनंद, अशा कितीतरी आठवणी आहेत ज्या नेहमी माझ्या मनाला तजेला देत राहतील. मग जाणवायच्या आत अचानक तू मोठा झाला होतास , माझ्यापेक्षा उंच झालास, जिममध्ये जाऊन सिक्स पॅक बनवायला लागलास, दाढी ठेवलीस (खरं सांगू, मला ती कधीच आवडली नाही). दिवस कसे उडून गेले कळलंच नाही आणि आज तू जगात स्वतःचा मार्ग शोधायला निघाला आहेस. आजपर्यंत तुला सतत माझ्या अवतीभोवती, डोळ्यांसमोर पाहायची सवय आहे. मनात जाणवत होतं की आता तू खरच साता समुद्रापार जाण्याची वेळ येऊन ठेपलीय आणि तू आता आमच्यापासून कित्येक मैल दूर जाणार आहेस!

दादा मी अनेक वर्षांपासून तुला पत्र लिहीतोय, मी कधीकधी विचार करतो की माझ्या अशा उपदेशपर पत्रांची त्याला गरज उरली असेल का. पण तुला सांगावसं वाटतं की तू माझी अलिकडची काही पत्रं पाहिलीस तर तुला जाणवेल की हा माझा उपदेश नाही तर मी माझ्या भावना व्यक्त करतोय. कारण उपदेश असो किंवा सल्ला, मुलगा मोठा होईपर्यंत देणं ठीक आहे, त्यानंतर एक बाप केवळ आपल्या भावना व्यक्त करू शकतो. बापानं जे काही सांगितलंय त्यातून काय घ्यायचं आणि घ्यायचे का नाही हे मुलानं ठरवायचं असतं. तरीही एक वडील म्हणून मला माझ्या भावना तुझ्यापाशी व्यक्त करताना आनंद होतो, बाबा झाल्यावर तुलासुद्धा हे जाणवेल. अर्थात माझ्या वडिलांनी मला असं कधी काही सांगितलं नाही कारण माझ्या पिढीला किंवा त्यांच्या पिढीला याची सवयच नव्हती. माझी आधीची सगळी पत्र वाचलीस तर तुला कदाचित माझं बोलणं कंटाळवाणं वाटेल, तीच फिलॉसॉफी पुन्हा वेगळ्या शब्दात बोलतोय असं वाटेल, मात्र अनेक पिढ्या आल्या आणि गेल्या पण चांगल्या-वाईटाची व्याख्या बदललेली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच मी तुला आणि रोहनला जे काही सांगतो, ते तुम्हाला चांगलं काय व वाईट काय हे समजावं व तुम्ही नेहमी चांगल्याची बाजू घ्यावी यासाठीच! तुला कदाचित हा एखाद्या डिस्नेच्या चित्रपटातला संवाद वाटेल पण त्याला पर्याय नाही. तुझ्या वडिलांना कार्टुनपट आणि त्यातलं तत्वज्ञान किती आवडतं तुला माहिती आहे. दादा, मी तुला कार्टुनपट पाहायला का घेऊन जायचो माहितीय कारण त्यांच्यासारखा उत्तम शिक्षक नाही. त्यातून तुला जे शिकायला मिळतं ते तुला मी किंवा कोणतीही शाळा शिकवू शकणार नाही. हे चित्रपट चांगलं, वाईट, नितीमत्ता, मूल्यं, भीती, धैर्य, मैत्री, कुटुंब, जबाबदारी अशा अनेक शब्दांचा अर्थ समजावतात आणि मग कुंग फू पांडामधल्या मनःशांतीच्या शोधात निघालेल्या मास्टर शिफूला आपण कसं विसरू शकतो? वरील सगळे शब्द केवळ काही अक्षरं किंवा संज्ञा नाहीत, तर त्यामुळेच आपल्या जीवनाला अर्थ मिळतो. शाळा किंवा कॉलेजात तुला ज्ञान मिळेल त्यामुळे तू पदवीधर होशील, ते ज्ञान वापरून समाजात तू यशस्वी म्हणून ओळखला जाशीलही, मात्र जोपर्यंत तुला वरील शब्दांचा योग्य अर्थ उमगत नाही तोपर्यंत तुझ्या ज्ञानामुळे मिळालेल्या यशाचा तुला खऱ्या अर्थानं आनंद उपभोगता येणार नाही, हे मी सांगु ईच्छितो.

 दादा तुला माहितीय मी पुण्यात वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आलो तेव्हा माझ्याकडे काय होतं माहितीय? घरापासून दूर राहण्याचा तीन वर्षांचा अनुभव, कपड्यांचे जेमतेम चार जोड, मुंबईच्या फुटपाथवर घेतलेला नकली अदीदास बुटांचा जोड, एक गजराचं घड्याळ, एक रजई, एक गादी आणि एक सेकंड हँड लुना! तू आज तुझ्यासोबत काय घेऊन जातो आहेस हे तुला माहितीय; मात्र मी आजही या शहरात काय घेऊन आलो होतो हे विसरलेलो नाही. अर्थात मी कधीही माझं बालपण आणि तुझं आणि रोहनच बालपण यांची तुलना केलेली नाही व करणारही नाही, कारण प्रत्येक झाड आपल्या नशीबानं वाढत असतं असा मला विश्वास वाटतो. पण कधीही विसरू नकोस की तू कितीही उंच झालास, तुझ्या फांद्या कितीही विस्तारल्या तरी तुझी मुळं जमीनीत खोलवर रुजलेली असतील तरच तू कोणत्याही चक्रीवादळात टिकून राहू शकशील. तुझी उंची व विस्तार म्हणजे  तुझं  सुदृढ शरीर आहे अभिनयातला डिप्लोमा, तुझी पदवी, इंग्लंडमध्ये शिकण्याची संधी, एका सुखवस्तू कुटुंबात जन्माला आल्यामुळे मिळालेल्या सर्व सुखसोयी, स्वतःचे शूज, घड्याळ, स्वतःची कार व इतरही अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची लाखो मुलं स्वप्नही पाहू शकत नाहीत. मात्र आकाशाला गवसणी घालताना, जबाबदारीची जाणीव ठेव, तुझ्यातला चांगुलपणा कायम ठेव, तुझं कुटुंब, तुझे मित्र तुझ्यावर खूप प्रेम करतात आणि तुझी काळजी करतात कारण या गोष्टीच तुझी पाळमुळं आहेत, हे लक्षात ठेव !

खरंतर तू एक वर्षभरासाठीच जाणार आहेत व आपल्या आयुष्याचा विचार करता एक वर्षं म्हणजे काही फार मोठा काळ नाही. मात्र जेव्हा कुणी आपल्या जवळची व्यक्ती दूर जाणार असते तेव्हा एक वर्षंही खूप मोठा काळ वाटू लागतो, आमचंही इथे असंच होणार आहे. तुझ्या आवडत्या ठिकाणी आता एकत्र जेवायला जाता येणार नाही किंवा तुला जे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी पाहायला आवडायचे ते पाहता येणार नाहीत. अशा अनेक लहान लहान गोष्टी आहेत ज्या तू जवळ नसताना खूप मोठ्या वाटतील. मात्र लक्षात ठेव तू एका नव्या देशात, नव्या जगात जातो आहेत. जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न कर, हा तुझ्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ असेल आणि तुझ्या भोवतालच जगच तुला खूप काही शिकवून जाईल. तू तिथे एक मुलगा म्हणून जातोयस आणि परतशील तेव्हा एक उमदा तरूण असशील. परत येताना केवळ पाश्चिमात्य जगाचं ज्ञान, शिक्षण, पदवी, शिष्टाचार व सभ्यताच नाही तर त्यांचा जगण्याचा दृष्टिकोनही घेऊन ये, ज्यामुळे ते सर्वच आघाड्यांवर नसले तरी ते आपल्याहून अधिक चांगला समाज बनले आहेत. आपल्यात ज्या गोष्टींची कमतरता आहे ते शिकून ये आणि आपल्या चांगल्याच्या व्याख्येत जे बसत नाही किंवा आपल्याला रुचत नाही ते सोडून दे कारण विकसित समाजात सगळं काही बरोबरच असतं असं नाही.

सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घे. तूझं जहाज गेले 22 वर्षं  घराच्या बंदरात होतं तेव्हा तुला काळजी हा शब्दच माहित नव्हता. तू जेव्हा पुन्हा या बंदरावर येशील तेव्हा नवनव्या क्षितीजांना गवसणी घालण्यासाठी सज्ज असशील हे पाहून मला आनंदच होईल एवढंच मला सांगावसं वाटतं, बाकी काहीच महत्वाचं नाही!

तुझे प्रिय बाबा

(संजय देशपांडे )
09822037109


Friday 18 August 2017

गणेश उत्सव स्मार्ट कधी होणार ?

























सणांमुळे वैविध्याला चालना मिळते, त्यामुळे शेजाऱ्यांमध्ये संवाद वाढतो, त्यामुळे सृजनशीलता वाढते, त्यामुळे नागरिकांना अभिमान वाटेल अशा संधी निर्माण होतात, व त्यामुळे एकूणच समाजाचे मनस्वास्थ्य सुधारते. थोडक्यात त्यामुळे शहरे राहण्यासाठी अधिक चांगली होतात”… डेव्हिड बाईंडर.

डेव्हिड बाईंडर हा न्यूयॉर्क टाईम्सचा 1961 ते 2004 या कालावधीत पत्रकार होता, त्याने पूर्व व पश्चिम युरोप, सोव्हिएत महासंघ, अमेरिका, क्युबा, प्युर्तो रिको यासारख्या अनेक विषयांवर वार्तांकन केले. त्याने 1961 मध्ये बर्लिनमध्ये विदेशी वार्ताहर म्हणून काम केले, तिथे तो बर्लिनची भिंत बांधली जात असताना वार्तांकन करत होता. पत्रकाराच्या नजरेतून संपुर्ण युरोपसारखा सांस्कृतिक प्रदेश पाहिल्यानंतर  साहजिकच तो सणांचे इतके चपखल वर्णन करू शकतो. म्हणूनच मला हे अवतरण गणेशोत्सवात आठवले. तुम्ही कुणालाही पुण्याबद्दल विचारल्यावर पहिल्यांदा आठवतो तो  येथील प्रसिद्ध गणेशोत्सव. या दहा दिवसात संपूर्ण शहर डिन्जेलँडप्रमाणे परिकथेतले शहर भासू लागते. नागरिक शहरातल्या रोजच्या समस्या विसरतात व सगळेजण बाप्पाचे स्वागत व पूजा अर्चना करण्यात गुंग होऊन जातात. प्रत्येक जण आपापल्यापरीने बाप्पाचे जास्तीत जास्त  चांगले स्वागत करायचा प्रयत्न करत असतो. केवळ घराघरातच नाही तर संपूर्ण शहरात उत्सवी वातावरण असतं म्हणूनच पुण्याचा गणेशोत्सव विशेष असतो. या निमित्तानं समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र येतात व काही काळासाठी स्वतःचे पद, वय, लिंग, जात, धर्म विसरून जातात. लोकमान्य टिळक (श्री. भाऊ रंगारी यांनाही) यांना 125 वर्षांपूर्वी या सणातून नेमके हेच अभिप्रेत होते. या सणाला एवढी समृद्ध व प्राचीन परंपरा असल्यामुळेच पुण्याचा गणेशोत्सव संपूर्ण देशात अतिशय प्रसिद्ध व विशेष आहे!

गणेशोत्सवाला सध्या कसे स्वरुप आले आहे हे पाहण्यापूर्वी आपण पूर्वी तो कसा होता यावर एक नजर टाकू. साधारण तीन ते चार दशकांपूर्वी या सणात आज दिसतो तसा झगमगाट नसे, तसंच गणेश मंडळांकडे फारसा पैसाही नसे. तरीही हा उत्सव दिमाखात व एखाद्या कौटुंबिक सोहळ्याप्रमाणे साजरा होत असे. उत्सवादरम्यान समाजातल्या सर्व वर्गांसाठी तसेच सर्व वयोगटातल्या व्यक्तिंसाठी कार्यक्रम आयोजित केले जात असत. मी सार्वजनिक गणेश मंडळांबद्दल बोलतोय एखाद्या वाड्यातल्या किंवा सोसायटीच्या गणेशमंडळाबद्दल नाही, तर या निमित्तानं संपूर्ण परिसरातली मंडळी एकत्र येत असत. प्रत्येकाच्या घरातल्या गणपतींशिवाय परिसरातल्या अळीचा/किंवा पेठेच्या मंडळाचा एक गणपती असे, तिथे विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे तसेच सामाजिक जागरुकता निर्माण करण्यासाठी तशा आशयांचे चित्रपटही दाखवले जात. आरास हा देखील महत्वाचा घटक असे मात्र सण साजरा करताना केवळ त्यावरच लक्ष केंद्रित केले जात नसे. परिसरात घरोघरी फिरून व दुकांदारांकडून वर्गणी गोळा केली जात असे, पण त्यासाठी सक्ती नसायची. गणेशोत्सवात धमाल मौज मजाही केली जायची मात्र इतरांची मनःशांती भंग करून नाही. प्रत्येक कार्यक्रम आयोजित करताना हातात किती पैसे आहेत याची जाणीव ठेवली जायची. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या सणाचे उद्दिष्ट मौज-मजा, शांतता व समाजाच्या प्रत्येक वर्गाचा एकोपा हे असायचे. दहाव्या दिवशी होणारी विसर्जन मिरवणूक या उत्सवाचा सर्वोच्च बिंदू असे. या विसर्जन मिरवणुकीमुळेच पुण्याच्या गणेशोत्सवाला वेगळे वलय प्राप्त झाले आहे, केवळ राज्यातूनच नाही तर संपूर्ण देशातून लाखो लोक ही मिरवणूक बघायला येतात. रात्रभर जागून या मिरवणुकीत सहभागी होतात, ती खरोखरच डोळ्याचे पारणे फेडणारी असते.

याशिवाय सांगायचे म्हणजे पुण्यातील अनेक  राजकीय व्यक्तींची राजकीय कारकिर्दच या गणेश मंडळांमधून सुरु झाली व इथेच पुण्यातल्या गणेशोत्सवाचे चित्रही पालटू लागले. राजकीय नेत्यांना जाणीव झाली की गणेशोत्सवाच्या माध्यमातून लाखो घरांमध्ये (मतदरांच्या घरात) प्रवेश मिळतो मग त्यानंतर या उत्सवांमध्ये पैशांचा ओघ सुरु झाला. हळूहळू गणेश मंडळांमधील कुटुंबे व सामाजिक कार्यकर्त्यांची जागा भाई, दादा व युवा नेता वगैरे प्रकारच्या मंडळींनी घेतली. ज्याप्रमाणे निवडणुकीमध्ये तिकीट देताना निवडून येण्याची क्षमता, लोकप्रियता विचारात घेतली जाते, त्याचप्रमाणे गणपती मंडळाच्या संघटनांमध्ये कार्यकर्ता किती वर्गणी आणू शकतो यानुसार महत्वाची पदे व सदस्यत्व दिले जाऊ लागले. त्याचसोबत सजावटीवर लाखो रुपये खर्च करायची तसेच मोठ्या राजकीय नेत्यांची तसेच लोकप्रिय व्यक्तिंची छायाचित्रे लावण्याची स्पर्धा सुरु झाली. स्थानिक नागरिकांची कुटुंबे ही मंडळाच्या केंद्रस्थानी राहीली नाहीत तर गणपती मंडळांच्या आरासींचा तसेच कार्यक्रमांचा मुख्य उद्देश गर्दी खेचणे हा झाला. परिणामी गणपती मंडळांची आरास किंवा शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महिला किंवा कुटुंबीय गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यांवर सहजपणे वावरू शकत नाहीत. आता सगळे लक्ष फक्त झगमगती प्रकाशयोजना, महाकाय ध्वनीक्षेपक यंत्रणेवरच केंद्रित असते. त्यातच तथाकथित कार्यकर्ते (स्वयंसेवक) कोणत्यातरी तडक-भडक गाण्यावर हिडीस (ओंगळवाणे) अंगविक्षेप करत असतात. संपूर्ण गणेशोत्सवाच्या हेतूलाच हरताळ फासला गेला आहे व केवळ मूठभर लोकांकडून स्वतःची ताकद दाखवण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. मला माहितीय अनेक जण या लेखाशी सहमत होणार नाहीत किंवा अनेकांना हा लेख आवडणार नाही मात्र माझ्या पुण्यातल्या गेल्या तीस वर्षांच्या वास्तव्यातलं हे निरीक्षण आहे.

त्यानंतर आपल्या उत्सवाचं स्वरुप पाहा. जेव्हा 125 वर्षांपूर्वी हा उत्सव सुरु झाला तेव्हा व त्यानंतर अनेक वर्षं रहदारीची स्थिती इतकी गंभीर नव्हती. आता समाजाची कार्यपद्धती पूर्णपणे बदलली आहे. लोक दहा दिवस त्यांच्या येण्याजाण्यात इतका अडथळा किंवा एवढं प्रचंड ध्वनी प्रदूषण सहन करू शकत नाहीत. गणेशोत्सव आल्याची चाहुल कशी लागते, पूर्वी रस्त्याच्या कडेने मंडप घालायला सुरुवात झाली की कळायचं उत्सव जवळ आला आहे. आता महिनाभर आधीपासून संपूर्ण शहरात ढोल ताशाचे कर्कश आवाज सुरु होतात. हा उत्सव आहे हे मान्य असलं तरी आपल्याभोवती वर्षभर एवढं ध्वनीप्रदूषण होत असताना आपल्याला त्यात भर म्हणुन अशा ध्वनी प्रदूषणरूपी कर्करोगाची गरज आहे का असा प्रश्न पडतो. मंडपांमुळे रस्ते अडवले जातात, हे फक्त दहादिवसच होत नाही तर जवळपास महिनाभर ते तसेच पडून असतात. यामुळे संपूर्ण शहरातील वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. सण-उत्सव हे या शहराचा अविभाज्य घटक आहेत हे मान्य असले तरीही आपले शहर जसे स्मार्ट होतेय तसा गणेशोत्सवही स्मार्ट होऊ शकत नाही का असा प्रश्न मला प्रत्येक नागरिकाला विचारावासा वाटतो. उदाहरणार्थ आपल्याला मूळातच एवढ्या मंडळांची गरज आहे का, असल्यास आपण रस्ते अडवून व नागरिकांचे कान बधीर करून उत्सव साजरा करायची गरज आहे काशांतपणे आपण आपले उत्सव साजरे नाही का करू शकत ?

उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात ज्याप्रमाणे दसरा मैदानात रावण दहन होते आपणही गणपतीसाठी तशीच कल्पना का राबवू शकत नाही. अथवा दुबईमध्ये ग्लोबल व्हिलेज नावाचे ठिकाण आहे तिथे एका विस्तीर्ण मैदानावर सगळ्या देशांचे शामियाने असतात ज्यावर प्रत्येक देशाची संस्कृती व व्यापार इत्यादींचे प्रदर्शन मांडले जाते. त्याचप्रमाणे आपणही शहराबाहेर मोकळ्या जागेवर गणेश मैदान तयार करू शकतो. अशा प्रकारची मैदाने शहराच्या चारही बाजूंना तयार करता येतील, तिथे सगळ्या मंडळांना आपापले गणेश मंडप उभारता येतील. या ठिकाणी जाण्यायेण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल व शहरामध्ये केवळ सोसायट्या किंवा वाड्यांचे गणपती असतील ज्यामुळे शहराच्या नागरी व्यवस्थापनात किंवा नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. अशा ठिकाणी आपण सांस्कृतिक किंवा कला सादरीकरणासाठी जागा राखून ठेवू शकतो तसेच खाद्यपदार्थ, विक्रेय वस्तुंसाठी जागा ठेवू शकतो म्हणजे या उत्सवावर पोट असणा-या लोकांचे नुकसान होणार नाही! दररोज समाजातील प्रसिद्ध व्यक्ती या गणेश मैदानाला भेट देऊ शकतात व सामायिक मंचावरून जनतेपुढे आपले विचार मांडू शकतात. शेवटच्या दिवशी संपूर्ण शहरात ब्राझिलमध्ये, रिओत होणाऱ्या कार्निव्हलप्रमाणे एकाच मिरवणुकीचे आयोजन केले ज्यात सगळे शहर सामील होऊ शकते!

गणेश उत्सव स्मार्ट व्हावा यासाठी हा केवळ एक विचार मांडला आहे, तो जरा विक्षिप्त वाटू शकतो, अनेकांना मला वेड लागलंय असंही वाटेल. मात्र या उत्सावाचे बदललेले स्वरुप व शहराच्या गरजांचा विचार करता आपल्या पूर्वजांनी ज्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तो पुनरुज्जीवित करण्यासाठी असाच काहीतरी वेगळा विचार करण्याची गरज आहे. कारण तुम्ही गणेशोत्सवाशी संबंधित वाद पाहिले तर सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक किंवा भाउसाहेब रंगारी आज हयात असते व त्यांनी पुण्यातल्या या उत्सावाचं आजचं स्वरुप पाहिलं असतं तर त्या दोघांनाही हा उत्सव सुरु केल्याची लाज वाटली असती, ज्याला आपण पुण्याचं वैभव किंवा अभिमान म्हणतो. अशीही गणेश मंडळे आहेत जी हा उत्सव जागरुकपणे साजरा करता व विविध सामाजिक समस्यांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी या संधीचा वापर करतात. मात्र अशा मंडळांची संख्या दुर्दैवानं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे.

थोडक्यात सांगायचं तर आपण कशाप्रकारचा समाज होत आहोत याविषयी मी जे लिहीलं होतं ते येथे परत शेअर करतोय ...

काही वर्षांपूर्वी दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्यावरून वाद झाला होता, काही महिन्यांपूर्वी राम गणेश गडकरी यांच्यावरून झाला, आता गणेश उत्सवातील लोकमान्य टिळकांच्या छायाचित्रावरून; कोणत्याही व्यक्तिचा आदर त्याचे कार्य तसंच कर्तुत्वावरून होतो, त्याची जात किंवा धर्मावरून नाही हे आपल्याला कधी समजणार! केवळ पुणे किंवा महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात लोकांमध्ये जात किंवा धर्माच्या आधारे फूट पाडण्याचे अतिशय लाजीरवाणे काम सुरु आहे. त्यामुळेच आपल्याला संपवण्यासाठी चीन किंवा पाकिस्तान यासारख्या शत्रूंची गरज नाही, आपणच आपल्या  नाशाला पुरेसे आहोत!” आपण जेव्हा गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला निरोप देतो तेव्हा ही संस्कृती व एकोप्याची भावना जतन केली पाहिजे, नाहीतर एक समाज म्हणून आपण ज्या मार्गावरून चाललोय ते पाहता  एक दिवशी बाप्पा परत यायलाच नकार देईल!


संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्स



Tuesday 8 August 2017

रेरा, जीएसटी आणि रिअल ईस्टेटचे ग्राहक !























रिअल इस्टेटमध्ये यशस्वी होण्यासाठी नेहमी व सातत्याने तुमच्या ग्राहकांच्या हिताला प्राधान्य द्या. तुम्ही जेव्हा असे कराल तेव्हा तुमच्या वैयक्तिक गरजा तुमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त पूर्ण होतील”… अँथनी हिट.

अँथनी हिट हे 2014 पासून उत्तर अमेरिकेतील एंजल अँड व्होकर्स या कंपनीचे सीईओ आहेत. अमेरिकेमध्ये 2010 पासून ही कंपनी नावारुपाला येण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ज्यांना एंजल अँड व्होकर्सविषयी माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, ही जगातील अग्रगण्य सेवा कंपनी असून आपल्या ग्राहकांना आरामदायक रिअल इस्टेट, मालमत्ता, याच व बोटी पुरवते. या कंपनीची जगभरात सुमारे 520 निवासी मालमत्ता कार्यालये व 49 व्यावसायिक कार्यालये आहेत, जी किरकोळ विक्री, औद्योगिक क्षेत्र, गुंतवणूक मालमत्ता, बहुउपयोगी अपार्टमेंट, कार्यालयीन जागा व विविध प्रकारच्या मालमत्तांचे व्यवहार करते. अँथनी यांच्या वरील शब्दांमधून त्यांचा कामातील अनुभव व अधिकार दिसून येतो, मात्र आपल्या देशात अँथनी यांच्याच व्यवसायात असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना मात्र वरील सत्य अजून समजलेले नाही, हे मी बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिअल इस्टेट विकसकांविषयी बोलत आहे. या व्यवसायातील अनेकांना बिल्डर हा शब्द आवडत नाही तरीही सामान्य माणूस याच नावाने त्यांना ओळखतो. येथे रिअल इस्टेट हा वर्षानुवर्षे ग्राहकांविषयी फारशी आस्था बाळगणारा व्यवसाय मानला जातो. ही परिस्थिती अपवादात्मकच म्हटली पाहिजे कारण इतर सर्व व्यवसाय ग्राहकांसाठी पायघड्या घालत असताना, रिअल इस्टेटला या आघाडीवर प्रयत्न करायची कधीच गरज नव्हती. याचे कारण अतिशय साधे होते, ते म्हणजे रिअल इस्टेट उद्योगात नेहमीच पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त होती. त्यामुळे सदनिका, भूखंड, दुकाने, कार्यालये सोन्याच्या खाणींसारखी होती त्यामुळे रिअल ईस्टेटशी संबंधित कुणीही अतिशय श्रीमंत होतो (असा सार्वत्रीक समज आहे). आपल्या समाजातील बहुतेक श्रीमंत व्यक्ती सामान्य जनतेत मिसळण्याचा प्रयत्न करत नाहीत ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. मी सामान्य जनता असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ सामान्य सदनिकाधारक किंवा घराचा ग्राहक असा होतो. जे सहमत नाहीत त्यांनी थोडे मागे जाऊन 80 व 90च्या दशकातील सदनिका ग्राहकांना विचारावे, की बांधकाम व्यवसायिकांशी व्यवहार करताना त्यांचा अनुभव कसा होता व त्यांच्यापैकी किती जण त्यांच्या बांधकाम व्यावसायिकाला प्रत्यक्ष भेटण्याइतके सुदैवी होते? काही बांधकाम व्यावसायिक या वर्गवारीत येत नसतीलही, मात्र सर्वसाधारणपणे रिअल इस्टेटमध्ये ग्राहकांच्या संपर्कात राहण्यासंदर्भात अशीच परिस्थिती होती.

रिअल इस्टेटचा प्रवास सुरळीतपणे सुरु होता, भरपूर नफा होत होता व साधारण 2012 पर्यंत तरी ग्राहकांच्या संपर्कात न राहणे परवडत होते अशी परिस्थिती होती. किमान पुण्यात तरी अशी परिस्थिती होती, मात्र गृहबांधणी क्षेत्रात दर व नफ्याच्या जाड आवरणाखाली परिस्थिती हळूहळू बदलत होती. अर्थात या काळातही उतार-चढाव आले व तुम्ही गेल्या तीस वर्षांचा विचार केल्यास मंदीची किमान पाच ते सहा आवर्तने येऊन गेली असतील, मात्र तरीही हा व्यवसाय टिकून राहिला कारण दर वेळी नंतर जमीनीची दरवाढ व्हायची व हा उद्योग जेवढा पुरवठा करू शकेल त्यापेक्षा मागणी अधिक होती. मात्र गेल्या पाच वर्षात परिस्थिती अतिशय बदलली आहे व राज्य सरकारच्या नागरी धोरणामुळे रिअल इस्टेटसाठी अधिकाधिक जमीन उपलब्ध होऊ लागली तसेच पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यासारख्या स्थानिक प्रशासकीय संस्थांनी अधिक महसूल मिळावा यासाठी सध्याच्या बांधकामयोग्य जमीनींसाठी अधिक एफएसआय तसेच टीडीआर द्यायला सुरुवात केली. त्याचशिवाय दुसरीकडे जमीनींच्या किमतींवर काहीही नियंत्रण नव्हते. जमीन मालकांनी भूखंड दाबून ठेवलेले होते त्यामुळे रिअल इस्टेटसाठी कच्चा माल असलेली जमीन हा सगळ्यात महाग घटक झाला होता. मजुरीचे दर तसेच साहित्याच्या किमती वाढत गेल्या; त्याचसोबत सरकारही विविध शुल्के वाढवत होती हे सांगायची गरज नाही, मुद्रांक शुल्कासहित इतर करांच्या वाढत्या आलेखामुळे रिअल इस्टेटमध्ये बहुतेक दरवाढ होत होती. याच्या परिणामी अंतिम उत्पादन म्हणजेच घर इतके महाग झाले की, ते सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले तसेच बाजारामध्ये पुरवठ्यात वाढ झाली. हे सगळे कमी होते की काय म्हणून सरकारने तीन गोष्टी लागोपाठ केल्या, निःश्चलनीकरण, रेरा व सरतेशेवटी जीएसटी; या शेवटच्या घावानं ग्राहकांना (खरंतर गुंतवणूकदारांना) रिअल इस्टेटपासून दूर केलं व याला तोंड देण्यासाठी हा व्यवसाय कधीच तयार नव्हता. आता केवळ खरे ग्राहक हाच थोडाफार दिलासा आहे पण त्यांना ओळखायचे कसे व तुम्ही ग्राहकांना ओळखले तरी त्यांच्याशी संवाद कसा साधायचा कारण बांधकाम व्यावसायिकांचा आत्तापर्यंत ग्राहकांशी संवाद साधण्यात कधीच हातखंडा नव्हता!

या मुद्याला स्पर्श करण्यापूर्वी मी ग्राहकांशी संवाद साधण्याविषयी स्वतःचा अलिकडचाच एक अनुभव सांगणार आहेव्हीजे-एसडीमध्ये (विलास जावडेकर व संजीवनी ग्रुपआम्ही नेहमी आमच्या ग्राहकांशी शक्य त्या सर्व मार्गांनी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो व आम्हाला असा विश्वास वाटतो की ग्राहकच आमचे सर्वोत्तम ब्रँड दूत आहेत. बांधकामस्थळी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यापासून ते स्नेहसंमेलन आयोजित करणे तसेच आपल्या ग्राहकांना वाढदिवशी शुभेच्छा देण्यापर्यंत, आम्ही आमच्या ग्राहकांशी अगदी नियमित संपर्क ठेवतो. आमचे अनेक ग्राहक आजकाल पुण्याबाहेरचे पण आहेत म्हणजे अगदी नागपूरच्या आसपासचेही (विदर्भ) असतात व त्यांच्या कुटुंबियांना पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत नाही. म्हणून आम्ही विचार केला की आपल्या विदर्भातल्या ग्राहकांसाठी नागपूरातच स्नेहसंमेलन का आयोजित करू नये म्हणजे त्यांना त्यांच्या बांधकाम व्यावसायिकाला व त्याच्या चमूला (म्हणजे आम्हाला) भेटता येईल. आता यामध्ये थोडा धोकाही होता कारण हे लोक पुण्यात राहात नसल्यामुळे पूर्वी आमच्याकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात काही चूक झाली असेल तर त्याचा राग अशा कार्यक्रमांमध्ये व्यक्त केला जाऊ शकतो व त्यामुळे कार्यक्रमाचा रागरंगच बदलू शकतो. मात्र आम्ही ही जोखीम पत्कारण्याचा निर्णय घेतला, कारण मला स्वतःला माउंटन ड्यूच्या (एक शीत पेय) घोषवाक्यावर विश्वास आहे, डर के आगे जीत है म्हणजेच तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्ही भीती दूर सारली पाहिजे. म्हणून आम्ही हे संमेलन आयोजित करायचा निर्णय घेतला व प्रत्येक ग्राहकाला आमंत्रण पाठविण्यासाठी आम्ही वॉट्स-ऍप तसेच ईमेलसारखा अतिशय सोपा मार्ग निवडला. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या युगात जग जवळ आलंय हे खरं असलं तरीही संवाद साधण्यासाठी कुणीतरी एंटर व सेंड ही बटणं दाबावी   लागतातच ना! मला असं वाटतं बांधकाम व्यावसायिक म्हणून ग्राहकांनी आपल्याला संपर्क करण्याची वाट पाहात बसण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी ही बटणं आधी दाबणं ही आपली जबाबदारी आहे.

आमचा हेतू अगदी स्वच्छ होता, विद्यमान ग्राहकांना भेटणे व नागपूरपासून 800 किमीवर असलेल्या पुण्यात काय चालले आहे हे त्यांना समजावून सांगणे व ग्राहकांना आम्हाला काय सांगायचे आहे ते जाणून घेणे. मी पुणे व बांधकाम क्षेत्रातल्या वाढीविषयी एक सादरीकरण तयार केले होते. मात्र मंचावर उभे राहिल्यानंतर मला त्याची गरज वाटली नाही, कारण मी जर हे माझ्या कुटुंबाचं संमेलन आहे असे म्हणत असेन तर मला माझ्या कुटुंबाला भेटण्यासाठी सादरीकरणाची काय गरज आहे का? अजिबात नाही, म्हणूनच मी पुण्यामध्ये काय चालले आहे याविषयी बोललो. नागपूरमधून पुण्यासारख्या शहरात स्थलांतर करणाऱ्या लोकांसाठी (ग्राहक व त्यांचे कुटुंब) सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे त्यांना पुण्यात काय चाललं आहे याविषयी थेट काही माहिती मिळत नाही. त्यांना वॉट्स-ऍपसारख्या समाजमाध्यमांमधून किंवा दूरचित्रवाहिन्यांमधून किंवा वृत्तपत्रांमधून नाण्याची केवळ एकच बाजू समजते. रेरा व जीएसटीच्या पार्श्वभूमीवर बहुतेक ग्राहकांना बांधकाम सुरु असलेल्या त्यांच्या घरांवर काय परिणाम होईल, तसेच पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट होणारी गावे व पायाभूत सुविधांचा विकास यासारख्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. एक लक्षात ठेवा, विदर्भ, मराठवाडा किंवा जिल्ह्याच्या ठिकाणाहून स्थलांतरित होणाऱ्या बहुतेक ग्राहकांना त्यांच्या मर्यादित बजेटमध्ये प्रभात रोडसारख्या उच्चभ्रू भागात किंवा अगदी कोथरुड अथवा बाणेरसारख्या भागातही सदनिका परवडू शकत नाही. म्हणूनच ते आजूबाजूच्या भागाला व महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होणाऱ्या 34 गावांना प्राधान्य देतात. यापैकी बहुतेक ग्राहक तरुण आहेत ज्यांना नोकरी मिळाली आहे किंवा पालक जे त्यांच्या मुलाच्या/मुलीच्या शिक्षणासाठी खरेदी करत असतात. त्यांना रस्ते, पाणी यासारख्या पायाभूत सुविधांची तसेच घर हाय स्ट्रीट, बाणेर किंवा कोरेगाव पार्क यासारख्या हॅपनिंग ठिकाणांच्या जवळ असलेच पाहिजे अशी काळजी नसते. मात्र जेव्हा ते जीएसटीमुळे घरे महाग होतील किंवा रेरामुळे घरे स्वस्त होतील किंवा त्यांचे घर जिथे बांधले जात आहे तो भाग पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणार आहे यासारख्या बातम्या वाचतात, तेव्हा त्यांना या बाबींविषयी असंख्य प्रश्न असतात व ते वारंवार पुण्याला येऊ शकत नाहीत. म्हणून मी त्यांना पुणे व नागपूरमधला फरक समजावून सांगितला.  लक्षात ठेवा कुणालाही स्वतःचं घर सोडून जायला आवडत नाही, म्हणून मी सर्वप्रथम आपली सहानुभूती व्यक्त केली की त्यांना नागपूरसारखं सुंदर शहर सोडून यावं लागतंय, मात्र त्यांच्या पुढील पिढीचं करिअर पुण्यात आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहेपुण्यामध्ये रोजगार आहे, शिक्षण आहे व सर्वात महत्वाचे म्हणजे पुण्यामध्ये सामाजिक सुरक्षेची संस्कृती आहे, म्हणजे नागपूर, उत्तर किंवा मध्य भारतातील कोणत्याही शहरापेक्षा जास्त आहे. हा घटक किती महत्वाचा आहे हे समजावे म्हणून सांगतो की माझ्या खामगावात (विदर्भ) अजूनही सिनेमागृहांमध्ये महिला व पुरुष विभाग वेगवेगळे आहेत, एवढेच नाही तर तिकीट खिडक्याही महिला व पुरुषांसाठी वेगळ्या आहेत. म्हणूनच जेव्हा या भागातले तरुण पुण्यातील रस्त्यांवर फिरतात तेव्हा त्यांना किती मोकळं व सुरक्षित वाटत असेल याचा विचार करू शकता. पुण्यामध्ये पायाभूत सुविधा ही एक समस्या आहे मात्र नागपूरमध्येही अशाच नागरी समस्या आहेत. आपल्या देशात  रिअल इस्टेट विकास आधी होतो नंतर रस्ते व पाण्यासारख्या पायाभूत सुविधा उभारल्या जातात, याउलट पाश्चिमात्य देशांमध्ये मात्र पायाभूत सुविधा आधी उभारल्या जातात. त्यामुळे या मुद्द्यांवर पुणे हे नागपुरपेक्षा तरी सरसच आहे, हे ही मी स्पष्टपणे सांगितले.

त्यानंतर रेराचा मुद्दा आला ज्याविषयी रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती चर्चा करत आहे. मी त्यांना समजावून सांगितले की रेराद्वारे रिअल इस्टेटमधील दर ठरविले जात नाही तर ते ग्राहकांना त्यांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी दिलेले एक साधन आहे. कोणत्याही कायद्यामुळे उद्योग बदलू शकत नाही मात्र हे आपल्यावर आहे की उद्योगामध्ये हा बदल घडवून आणण्यासाठी आपण कायद्याचा वापर कसा करतो व रेराही त्याला अपवाद नाहीयामुळे रिअल इस्टेट उद्योग नक्कीच पारदर्शक होईल मात्र तुम्ही ग्राहक म्हणून यंत्रणा सुधारण्यासाठी जोपर्यंत कायद्याचा वापर करत नाही तोपर्यंत बांधकाम व्यावसायिक हे बांधकाम व्यावसायिकच राहतील. मी त्यांना समजावून सांगितले की रेरामुळे जे बांधकाम व्यावसायिक त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करतील तेच व्यवसायात टिकून राहतील, मात्र ग्राहक म्हणून तुम्हाला कोणती आश्वासने देण्यात आली आहेत याविषयी तुम्हीही जागरुक असले पाहिजे. याआधीही मोफा होता, मात्र तो ग्राहकांचे बांधकाम व्यावसायिकांपासून संरक्षण करण्यास पुरेसा पडला नाही, कारण कोणताही कायदा स्वतःहून कुणाचेही संरक्षण करू शकत नाही. किंबहुना आपण कायद्याचा वापर अशाप्रकारे केला पाहिजे की कुणीही बांधकाम व्यावसायिक कायद्याचे उल्लंघन करणार नाही व ग्राहकांना फसवणार नाही. मी त्यांना त्यांचा बांधकाम व्यावसायिक म्हणून माझ्यावर रेरामुळे कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही अशी खात्री दिली. मला या कायद्याची भीतीही वाटत नाही मात्र रेरामुळे चांगल्या बांधकाम व्यावसायिकांना व्यवसायात टिकून राहायला मदत होईल व वाईट बांधकाम व्यावसायिकांवर नियंत्रण राहील. जीएसटीच्या परिणामांविषयीसुद्धा काही टिप्पणी करणे फार लवकर होईल, मात्र आपण पारदर्शकपणे काम केले तर आम्हाला जो काही हिशेब करावा लागेल तो करू व जी काही वजावट येईल ती ग्राहकांना हस्तांतरित करू असे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले. जीएसटीच्या नियमांमुळे, प्रत्येक सदनिकेत किती वजावट येईल याचे चित्र वेगवेगळे असेल. आधी ग्राहकांना साधारणपणे व्हॅट व सेवा कराच्या स्वरुपात करार मूल्याच्या जवळपास 5.5% रक्कम द्यावी लागायची, जी आता जीएसटीच्या परिणामामुळे साधारणपणे 6% असेल असा माझा प्राथमिक अंदाज आहे.

मी सगळ्यात शेवटी मुद्दा मांडला की हे संवादाचे युग आहे व आम्ही आमच्या ग्राहकांसाठी केवळ सदनिकेशी संबंधित कोणत्याही बाबींसाठीच नाही तर त्यांच्या पुण्यात असलेल्या मुलांच्या संदर्भातही काहीही मदत लागली तर चोवीस तास उपलब्ध आहोत. कारण आम्ही आमच्या ग्राहकांना आमचे कुटुंब मानतो, त्यामुळे त्यांना कोणत्याही चिंता असतील तर त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आमची जबाबदारी आहे. हे संमेलन अतिशय यशस्वी झाले हे वेगळे सांगायची गरज नाही, ग्राहकांच्या आनंदी चेहऱ्यांशिवाय आम्ही आणखी काय मागू शकतो.

मला रिअल इस्टेटमधल्या माझ्या मित्रांना हेच सांगावसं वाटतं की काळ बदलतोय व आपल्याला रिअल इस्टेट एक सन्मान्य उद्योग व्हावा यासाठी रेरा, जीएसटी किंवा निःश्चलनीकरणाची गरज नाही. आम्ही इतर कुठल्याही उद्योगासारखेच आहोत मात्र ग्राहकांच्या हृदयाच्या अधिक जवळ आहोत कारण कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर ती त्याच्याकडे येते, घराच्या बाबतीत मात्र त्याला घराकडे जावे लागते. रिअल इस्टेटचा ग्राहक बदलतोय, त्यांना आणखी पर्याय उपलब्ध झालेत, कायदाही त्यांच्या बाजूने आहे तसेच जागरुकताही वाढली आहे. त्यामुळे आपण ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत, त्यासाठी आपण ग्राहकांशी संवाद साधला पाहिजे, नाहीतर ग्राहकांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे आपल्याला कसे कळेल. केवळ ज्या बांधकाम व्यावसायिकाला ग्राहकांशी संवाद साधला पाहिजे एवढा साधा तर्क समजेल तोच रिअल इस्टेटमध्ये टिकून राहील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सरतेशेवटी मला ग्राहकांना फक्त एवढंच सांगावसं वाटतं की रिअल इस्टेटमध्ये नेहमीच चांगले बांधकाम व्यावसायिक होते व वाईट बांधकाम व्यावसायिक होते, चांगले बांधकाम व्यावसायिक व वाईट बांधकाम व्यावसायिक आहेत; व यापुढेही चांगले बांधकाम व्यावसायिक व वाईट बांधकाम व्यावसायिक असतील. रेरामुळे वाईट बांधकाम व्यावायिक चांगला व चांगला बांधकाम व्यावसायिक वाईट होणार नाही, मात्र त्यामुळे तुम्हाला काय चांगले व काय वाईट याची तुलना करायची संधी मिळेल, त्यानंतर कुणाशी व्यवहार करायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचाच आहे! 

संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्स