Monday 25 November 2019

बांधकाम व्यवसायाला ,पॅकेजरूपी वेदनाशामक गोळी !



























“सरकारची खरी जबाबदारी म्हणजे लोकांसाठी चांगले काम करणे, सुलभ करणे व वाईट काम करणे अवघड करून ठेवणे.”… डॅनियल वेबस्टर

डेनियल वेबस्टर हे अमेरिकी राजकारणी होते ज्यांनी अमेरिकी काँग्रेसचे न्यू हॅम्पशायर व मॅसॅच्यूसेट्स या दोन्ही ठिकाणाहून प्रतिनिधीत्व केले होते. ते विल्यम हेन्री हॅरिसन, जॉन टायलर व मिलार्ड फिलमोर या तिघांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अमेरिकेचे गृहमंत्रीही होते. सरकार कशासाठी अस्तित्वात असतं याविषयी   इतके स्पष्ट विचार असल्याशिवाय तुम्ही तीन तीन अमेरिकी अध्यक्षांच्या कार्यकाळात कायम  राहुच शकत नाही . म्हणूनच आपण जगातला सर्वात मोठा लोकशाही देश असलो तरीही अमेरिका हा जगातला सर्वात चांगला लोकशाही देश आहे, कारण डॅनियल यांच्यासारख्या व्यक्ती (म्हणजे, किमान आतापर्यंत तरी अशीच परिस्थिती होती) त्या लोकशाहीचा भाग आहेत. रिअल इस्टेट उद्योगासाठी (म्हणजे घर खरेदी करणाऱ्यांसाठी) 25,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून आपल्या सरकारनं रिअल इस्टेट उद्योगातील लोकांचं आयुष्य थोडसं सुकर व्हावं अशी इच्छा नक्कीच व्यक्त केली आहे. आता बरेच जण म्हणतील की, कोणत्या लोकांचं, ज्या बांधकाम व्यावसायिकांनी वर्षानुवर्षे या व्यवसायातून बक्कळ पैसा कमावला त्यांना मदत का करायची असा प्रश्न विचारला जाईल. बांधकाम व्यावसायिकांकडे बक्कळ (म्हणजे ढिगानं) पैसा असतो हे एक मिथक आहे ज्यावर सामान्य माणसाचा ठाम विश्वास आहे. मी त्याला दोष देत नाही कारण आपण अनेक दशके बिल्डरांची  उंची जीवनशैली पाहिली आहे (पेज 3 चे आभार), टीव्ही मालिका, चित्रपट, आता वेब सिरीज या सर्व माध्यमांमधूनही बांधकाम व्यावसायिकांना अतिशय श्रीमंत, गर्विष्ट, खलप्रवृत्तीचे व पैशासाठी वाट्टेल ते करणारे असं दाखवलं जातं. तर मग सरकार आता अशा समुदायाबाबत इतकी कनवाळू का झाली आहे, ते याच पैशाची मदत लाखो गरजू लोकांना करू शकत नाही का जे एकतर भाड्याच्या घरात किंवा अवैध घरांमध्ये राहात आहेत कारण त्यांना स्वतः चांगली कायदेशीर घरं घेणं परवडत नाही. मी या लोकांना असं मत व्यक्तं करण्यासाठी दोष देत नाही कारण आपल्याकडे खरोखर लाखो बेघर लोक आहेत. सरकारला नेमकं हेच करायचं आहे, त्यांना या लोकांना त्यांच्या स्वप्नातलं घर द्यायचं आहे, म्हणूनच त्यांनी 25 हजार कोटी रुपयांचं पॅकेज बांधकाम व्यवसायाला जाहीर केलंय.

सरकारनी हे अतिशय चांगलं पाऊल उचललं आहे व सकृतदर्शनी सरकारचा हेतू अतिशय स्वच्छ व साधा वाटतो. याचे कारण म्हणजे देशभरात हजारो प्रकल्पांचे (म्हणजेच इमारतींचे) कामकाज मंदीमुळे (अर्थात हा शब्द आपण अजूनही अधिकृतपणे वापरत नाही) स्थगित आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांचं दिवाळ निघालंय व याचा सर्वात मोठा फटका बसलाय तो आयुष्यभराची कमाई या रखडलेल्या प्रकल्पांमध्ये गुंतवून बसलेल्या लोकांना. म्हणून या प्रकल्पांमध्ये पैसा ओतून, सामान्य माणसाचं घर घेण्याचं स्वप्न वाचवण्याचा सरकारचा उद्देश आहे. नेहमीप्रमाणे त्यासाठी अरे वा, फारच छान, उत्तम, उदात्त वगैरे वगैरे (माफ करा ही सवय कधीही जाणार नाही) प्रतिक्रिया दिल्या जातील. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते ही म्हण आता जुनाट झालीय, त्याऐवजी प्रत्येक यशस्वी व्यावसायिक साम्राज्यामागे एक गुन्हा असतो असं म्हणावं लागेल! असं म्हटलेलं माझ्या अनेक मित्रांना खरंतर आवडणार नाही. तरीही याच आधारावर मी एक व्यावहारीक नियम तयार केला आहे, “बहुतेक (प्रत्येक नाही) उदात्त विचारांमागे काहीतरी स्वार्थी उद्देश असतो व आपलं सरकारही या व्यावहारीक नियमाला अपवाद नाहीयावरही बऱ्याच जणांचं म्हणणं असेल हा अगदी पक्का पुणेरी नकारात्मक विचार झाला. पण माझा नाईलाज आहे. बहुतेक वर्तमानपत्रांमध्ये व इतरही माध्यमांमध्ये अर्थमंत्र्यांनी रिअल इस्टेटसाठी पॅकेज जाहीर केल्याची ठळक बातमी होती. शेअर बाजारानंही उसळी घेतली (दुसरं काय करणार), विकासकांनी सरकारवर स्तुती सुमनं उधळली (उधळावीच लागली). या सगळ्यात आपण अगदी सोयीनं इतर काही महत्त्वाच्या बातम्या विसरलो. व्होडाफोनच्या (मोबाईल नेटवर्कमधील अग्रगण्य कंपनी) सीईओंनी सरकारी धोरणांवर टीका करत इथे व्यवसाय करणं जवळपास अशक्य असलाचं म्हटलं होतं. त्याशिवाय आयटी उद्योगातील काही बड्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ कपातीची (म्हणजे कर्मचाऱ्यांची छाटणी) घोषणा केली. अन्न प्रक्रिया उद्योगातील एका मोठ्या कंपनीनेही (पार्ले इंडस्ट्रीज) सध्याच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती, या घोषणेने या उद्योगात गदारोळ उडाला. त्यानंतर उत्पादन क्षेत्राचा कणा असलेल्या ऑटोमोबाईल उद्योगातील विक्री दिवसेंदिवस निच्चांक गाठत असल्याच्या बातम्या येतंच आहेत. त्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या, खराब हवामानामुळे देशभरात पिकाची नासधूस या बाबी नित्याच्याच झाल्यात (मला कुणालाही दुखवायचं नाही, मात्र आपण कोडगे झालोय हे स्वीकारावं लागेल). रिअल इस्टेटला जाहीर झालेल्या पॅकेजच्या बातम्यांमुळे या सगळ्या बातम्यांकडे दुर्लक्ष झालं. त्याशिवाय माझा एक वैयक्तिक अनुभव सांगतो, माझा धाकटा मुलगा अॅमेझॉनमध्ये काम करत होता, त्यानं अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतलीय. त्यासोबत काम करणाऱ्या पंधरा जणांपैकी जवळपास तेरा जण अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे होते मात्र ही बिगर अभियांत्रिकी नोकरी सोडली तर दुसरी मिळेल की नाही याची खात्री नसल्यामुळे ते ही नोकरी सोडायला धजावत नव्हते, असं त्याने मला बोलता बोलता सांगितलं !

आता मला यातून नेमकं काय म्हणायचं आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सांगतो, कोणत्याही व्यवसायांची परिस्थिती चांगली नाही व सगळीकडे कपातीचंच वातावरण आहे. पण म्हणून काय झालं, याचसाठी तर सरकारनं पॅकेज जाहीर केलेलं नाही का, मला पॅकेजची सकारात्मक बाजू बघता येत नाही का? मला दिसतेय, पण अजूनही काही ठळक बातम्या आहेत, आपल्या स्मार्ट पुणे शहराचंच घ्या ना, संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या विकास नियोजनाची, प्रामुख्यानं शहरी भागाची जबाबदारी असलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) जलसिंचन विभागाकडून गेल्या सहा महिन्यात देय असलेल्या पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही. त्यानंतर अशाही बातम्या होत्या की पुणे महानगरपालिकेला राज्य सरकारच्या अर्थ किंवा संबंधित विभागाकडून जीएसटी सवलत मिळालेली नाही. त्यानंतर पुणे-सातारा महामार्गाचं काम, भामा-आसखेड जलवाहिनीचं काम, मुळा-मुठा नद्यांच्या (आता त्या नद्या आहेत का हे मला विचारू नका) सुशोभीकरणाचं काम यासारखी सरकारी पायाभूत सुविधा प्रकल्पांची असंख्य कामं रखडली आहेत किंवा संथ गतीनं सुरू आहेत, त्यांच्या बातम्या वाचून आता आपल्याला काही वाटेनासंच झालं आहे. हो, या यादीमध्ये आणखी काही नावांचा (प्रकल्प म्हणून) समावेश केल्याशिवाय ती पूर्ण व्हायची नाही, तो म्हणजे पुणे शहरासाठी कचरा डेपो, पुण्याचं नवीन देशांतर्गत विमानतळ, पुणे शहराभोवती रिंग रोड (खरंतर दोन रिंग रोड आहेत व हा विनोद नाही) व एचसीएमटीआर (हाय कपॅसिटी मास ट्रांझिट रूट), खरंतर वर्षानुवर्षं एवढी लांबलचक नावं लिहूनही मला कंटाळा आलायत्यानंतर न्यायिक विभागानं (पुन्हा सरकार) राष्ट्रीय हरित लवादामध्ये तांत्रिक पदांची भरती न केल्यानं, शहराच्या तसंच समाजाच्या चांगल्या (हरित) भविष्यासाठी महत्त्वाची असलेली अनेक प्रकरणं प्रलंबित असल्याची बातमी होती, अर्थात काही वेळा आपल्याला विकास व पर्यावरण यात समतोल साधावा लागतो ही वस्तूस्थिती आहे.

सगळ्यात शेवटी पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्याच्या तलाठ्याने फक्त 5000 चौरस फुटांच्या एका जमीनीच्या तुकड्याची 7/12च्या उताऱ्यात (जमीनीच्या मालकीचा दस्तऐवज) नोंद करण्यासाठी लाखो रुपयाची लाच घेतल्याची बातमी होती (म्हणजे तुम्ही वर्तमानपत्र उघडताच तुम्हाला अशा अनेक बातम्या वाचायला मिळतात), खरंतर तलाठी हे महसूल विभागातलं सर्वात कनिष्ठ पद मानलं जातं. त्यानंतर पुण्यात व भोवतालच्या परिसरातील नवीन विकास कामांसाठी हवाई वाहतूक प्राधिकरणांचं (एनडीए/लोहगाव विमानतळ) ना हरकत प्रमाणपत्रं आवश्यक आहेत, त्यामुळे शेकडो प्रकल्पांची कामं रखडली आहेत अशी बातमी होती. अशा इतरही अनेक बातम्या आहेत आता हा माझा लेख आहे का की बातमीपत्रं वाचतोय असं तुम्ही म्हणाल, म्हणून आता हे बातमीपत्राचं वाचन थांबवतो.

तर हे 25 हजार कोटी रुपये कदाचित घसघशीत मदत वाटू शकते पण रखडलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पांचे प्रमाण, जमीन तसंच इतर गोष्टींसाठी होणारा खर्च पाहता ही मदत अगदी फुटकळ आहे हे एखादा सामान्य विकासकही तुम्हाला सांगू शकेल. पण ठीक आहे, सुरूवात जरी चांगली असली तरीही, खरी अडचण अशी आहे की आपण (म्हणजेच सरकार) या गरजू विकासकांना ओळखणार कसं कारण प्रत्येक प्रकल्प वेगवेगळ्या कारणांमुळे रखडला आहे व सगळी कारणं न्याय्य नाहीत. अनेक ठिकाणी विकासकांच्या हव्यासापोटी प्रकल्प अडचणीत आले आहेत त्यामुळे असे प्रकल्प कोण पूर्ण करणार हा प्रश्नच आहे. अनेक प्रकरणांमध्ये बदललेली सरकारी धोरणे ही समस्या आहे, अशा प्रकल्पांचं काययावरील सर्वोत्तम उपाय म्हणजे हा निधी बँकांना देऊन त्यांना प्रत्येक प्रकल्पांवर देखरेख करायला सांगा किंवा एखादी स्वतंत्र संस्था (पुन्हा नाही) स्थापन करा व हा निधी या संस्थेला द्या व त्यांना प्रत्येक प्रकल्पाचे विश्लेषण करायला सांगा म्हणजे हा पैसा योग्य कारणानं वापरला जात असल्याची खात्री केली जाईल. अन्यथा हे पॅकेज फक्त काही सुदैवी लोकांपुरतेच मर्यादित राहील व आपल्या देशामध्ये सुदैवी असण्याचे काय निकष आहेत हे आपल्याला माहिती आहे.

आता पुन्हा आपल्या सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजविषयी थोडसं बोलू, वर उल्लेख केलेल्या बातम्यांचा या पॅकेजशी काय संबंध आहे? याचं उत्तर सोपं आहे, वरील सगळ्या बातम्या व त्यामागच्या कारणामुळेच या पॅकेजची गरज निर्माण झाली. रिअल इस्टेट म्हणजेच घर हे सगळ्यात महाग उत्पादन (अर्थातच कायदेशीर घरं) आहे तरीही ती मूलभूत गरज आहे, ज्याप्रकारे एखाद्या पॅकेजमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, त्याचप्रमाणे कोणतंही पॅकेज रिअल इस्टेटला तारू शकणार नाही हे लक्षात ठेवा व त्याचा स्वीकार करा. त्याऐवजी वरील सर्व ठळक बातम्या व त्यामागच्या कारणांवर काम करायचा प्रयत्न करा असं मला वाटतं. आर्थिक पॅकेज हे अपघात झालेल्या रुग्णाला वेदनाशामक देण्यासारखं आहे, खरंतर इजा झालेल्या भागांवर शस्त्रक्रिया केली पाहिजे व त्यानंतर योग्य शारिरीक तंदुरुस्ती होईपर्यंत व्यायामाची ट्रीटमेंट म्हणजेच दिली जावी, म्हणजे रुग्ण पुन्हा उभा राहू शकेल व आपल्या पायांवर  चालू शकेल. या ठिकाणी रिअल इस्टेट हा रुग्ण आहे जो वरील प्रत्येक बातमीवर अवलंबून आहेकुणाही पुरुषाला किंवा स्त्रीला आपण आर्थिकदृष्ट्या स्थीर आहोत असे वाटले तरंच ते घरासारखं महाग उत्पादन खरेदी करायचा विचार करतील (विचार करू शकतील). म्हणजेच त्यांना नोकरीची शाश्वती असली पाहिजे किंवा चांगला चालणारा व्यवसाय असला पाहिजे किंवा चांगलं व्यावसायिक उत्पन्न असलं पाहिजे व त्यासाठी वर नमूद केलेले सगळे घटक आवश्यक आहेत, ज्याकडे आपलं मायबाप सरकार दुर्लक्ष किंवा काणाडोळा करतंय व पॅकेजरूपी ओव्हरकोटखाली झाकण्याचा प्रयत्न करतंय. पण एक लक्षात ठेवा (सरकारमधल्या उच्च पदस्थांनी) एखादी व्यक्ती ओव्हरकोटखाली नग्न राहू शकत नाही, कडाक्याच्या थंडीत तग धरण्यासाठी त्याला इतर कपडे लागतातचआपल्याला पायाभूत सुविधा हव्या आहेत, आपल्याला विकासासाठी योग्य धोरणं हवी आहेत, आपल्याला सर्व प्रकारच्या उद्योगांसाठी (केवळ रिअल इस्टेटसाठीच नाही) एकाच ठिकाणी सर्व मंजुऱ्या मिळतील अशी व्यवस्था आवश्यक आहे, आपल्याला एक भ्रष्टाचारमुक्त यंत्रणा (म्हणजे सरकार म्हणून) हवी आहे व आपल्याला या सगळ्या गोष्टी वेगानं व्हायला हव्या आहेत, कारण रिअल इस्टेट नावाचा रुग्ण शेवटच्या घटका मोजतोय. त्यामुळेच एखाद्या पॅकेजरुपी वेदनाशामक औषधाची मात्रा देऊन तो जगणार नाही, हे लक्षात ठेवा!


संजय देशपांडे 
smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स

Saturday 9 November 2019

घरे ,शहर आणि शहराचे नवीन पालक !

























स्मार्ट शहराच्या प्रिय नवनिर्वाचित आमदारांनो,

“कुठल्याही मुलांच्या पालकांना विचारा त्यांची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी कशाची गरज असते, तर बहुतेक जण एकाच शब्दात उत्तर देतील...त्यागब्रायन के. वॉन

ब्रायन केलर वॉन (जन्म 17 जुलै, 1976) हे अमेरिकी कॉमिक पुस्तक व दूरचित्रवाहिनी लेखक आहेत. त्यांच्या द लास्ट मॅन, एक्स मशिन व रनअवेज इत्यादी कॉमिक पुस्तक मालिका अतिशय प्रसिद्ध आहेत. म्हणूनच तेलहान मुलांच्या आयुष्यात पालकांची भूमिका काय आहे हे एकाच शब्दात सांगू शकतात.आता लहान मुलांच्या जागी आपलं स्मार्ट शहर असेल तर  त्यांच्या पालकांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे कळलं ना? होय मी आपल्या शहरातल्या नवनिर्वाचित आमदारांविषयी बोलतोय, जे एकप्रकारे आपल्या शहराचे पालकही आहेत. राज्यातल्या विधानसभा निवडणुका संपल्यात, आपल्याकडे सत्तापालट हा विषय बाजुला ठेवला तरीही काही चेहरे वगळता बरेचसे पालक नवीन आहेत.म्हणूनच या स्मार्ट शहराचा रहिवासी या नात्यानं मला माझ्या भावना लिहून त्यांना सांगाव्याशा वाटल्या.या निवडणुकीनंतर मुख्यालयात म्हणजेच मंत्रालयात ज्याप्रकारे कामकाज चालतं त्यात बरेच बदल होऊ शकतात.मात्र एक शहर म्हणून आपले डोळे, कान, नाक (थोडक्यात सगळी ज्ञानेंद्रिये) आपण निवडून दिलेल्या व विधानसभेत आपलं प्रतिनिधित्व करणाऱ्या पालकांवर केंद्रित असतील.मला राजकीय पक्षांविषयीच्या वादात पडायचं नाही, कारण निवडणूक लढण्यासाठी पक्ष आवश्यक असतात मात्र ज्याप्रमाणे एखादी आई लहान बाळाला वाढवताना कधी वडिलांचीही भूमिका पार पाडते किंवा वडिलही आईची भूमिका पार पाडतात तसंच तुम्हीही एकदा जिंकल्यानंतर शहराचा (बाळ समजून) चांगल्याप्रकारे विकास व्हावा यासाठी आवश्यक ते सर्व काही करणे महत्त्वाचे आहे. यात बऱ्याचदा व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, आवडनिवड, अहंकार, छंद, एखाद्या गोष्टीचं वेड मुलासाठी बाजूला ठेवावं लागतं, यालाच आपण पालकांचा त्याग असं म्हणतो. 

नवीन पालक येण्याआधी म्हणजे या निवडणुकांपूर्वीची परिस्थिती कशी होती यावर एक नजर टाकू. मी असं म्हणणार नाही की सगळं काही आलबेल होतं (छान चाललं होतं), पण इतर शहरांची तुलना करता पुणं बऱ्याच बाबतीत सुदैवी आहे. तुम्हाला आधीच्या पालकांकडून सगळं श्रेय काढून घेता येणार नाही हे नक्की. आपली परिस्थिती इतरांएवढी वाईट नाही, असं आपल्याला म्हणता येईल, नाही का? आपल्याकडे आकाराने आपल्याएवढ्या इतर शहरांच्या तुलनेत सर्वोत्तम पाणीपुरवठा यंत्रणांपैकी (यंत्रणेपेक्षाही स्रोत म्हणणं अधिक योग्य ठरेल) एक आहे. आपल्याकडे अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा (सशुल्क असल्या तरीही) आहेत. आपल्याकडे मुंबईएवढी कार्यक्षम नसली तरीही सार्वजनिक वाहतूक यंत्रणा आहे. जवळपास दहा लाख लोक दररोज तिचा वापर करतात व आता मेट्रोही येऊ घातलीय.आपल्याकडे चोवीस तास वीज पुरवठा होतो, राज्यातल्या अनेक शहरात हे सुख नाही.पावसाळ्यात थोडा त्रास होत असला तरीही आपल्याकडचा वीज पुरवठा बराच चांगला आहे.आपल्याकडे रस्त्याचे बरेच चांगले जाळे आहे. हे ऐकून बऱ्याच नागरिकांच्या भुवया उंचावल्या जातील. पण तुम्ही जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या मध्यम आकाराच्या ईतर शहरांमध्ये जा व मग तिथली रस्त्यांची परिस्थिती सांगा.आपल्याकडे आपला कचरा उचलण्यासाठी एक यंत्रणा आहे. ती यंत्रणा कचऱ्याचं काय करते व एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा तयारच कसा होतो असे प्रश्न विचारू नका.चांगल्या गोष्टींची यादी बरीच मोठी आहे व आपलं शहर रोजगार निर्मितीमध्ये राज्यातलंच नाही तर देशातलं सर्वात मोठं शहर आहे.मुलाच्या (म्हणजेच शहराच्या) विकासामध्ये हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, यामुळेच अनेक लोक इथे स्थलांतर करतात व त्यांच्या उदरनिर्वाहामुळे तसंच त्यांच्या उत्पन्नामुळे शहराच्या संपत्तीत भर पडते.

आता या सगळ्या चांगल्या गोष्टी वाचल्यानंतर एखादा म्हणेल की मग आधीच्या पालकांना जनता जनार्दनाने का नाकारले. असा प्रश्न विचारण्यात तुमची काहीही चूक नाही.मी काही कुणी राजकीय विश्लेषक नाही. मात्र वर दिलेल्या चांगल्या गोष्टींच्या यादीनंतरही नागरिकांनी नव्या पालकांना निवडून दिलंय (त्यांची निवड केलीय) याचा अर्थ शहरात अजूनही काही गोष्टींची कमतरता आहे ज्या देण्यात आलेल्या नाहीत. मुलांनी पालकांना बदलून आपला निषेध नोंदवला आहे.

पालकांनी (नवनिर्वाचित आमदारांनी) नेमकं हेच विसरून चालणार नाही. यासाठी राजकीय पक्ष, इर्षा, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, विरोधकांशी असलेले जुने तंटे, मुलांना गृहित धरणे, तसेच हव्यास (कशाचा ते विसरू नका) अशा गोष्टी विसराव्या लागतील. वर्षानुवर्षे याच व अनेक अशा कारणांमुळे आपल्या जुन्या पालकांना घरी जावे लागले आहे, पण यामुळे शहराचा मात्र अतिशय तोटा झाला आहे .आपल्याकडे पाणी भरपूर आहे मात्र आपल्याकडे ते पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी चांगल्या जलवाहिन्या नाहीत. म्हणूनच आपल्या शहरात टँकर माफिया (पाण्याचे टँकर) नावाच्या नव्या जमातीचा सुळसुळा झालाय.त्यानंतर आपल्याकडे हजारो शाळा व रुग्णालये आहेत. मात्र जिथे शिक्षण व वैद्यकीय उपचारांचा दर्जा चांगला आहे ती ठिकाणं सामान्य माणसाला परवडणारी नाहीत ही वस्तुस्थिती आहे व जी परवडणारी आहेत त्यांच्या दर्जाविषयी न बोललेलं बरं ! आपल्याकडे सार्वजनिक वाहतूक यंत्रणा आहे, मात्र तिची परिस्थिती कुटुंबातल्या म्हाताऱ्या माणसासारखी आहे कारण ती अस्तित्वात तर आहे मात्र तब्येत अतिशय खराब असल्याने कुटुंबातील कुठलीही जबाबदारी घेऊ शकत नाही. आपल्याकडे विजेचा पुरवठा सुरळीत आहे मात्र पाण्याच्या पुरवठ्याप्रमाणेच, विद्युत वाहिन्यांचे जाळे अपुरे आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांचे घर, कार्यालय किंवा कारखान्यापर्यंत वीज यावी यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. खरंतर वीज वाहिन्या टाकणं हे सरकारचं (म्हणजेच आपल्या पालकांचं) काम आहे, मात्र त्यासाठी नागरिकांनाच मोठा खर्च करावा लागतो.ज्याकाही वीज वाहिन्या आहेत त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे त्यामुळे थोडासाही पाऊस पडला की वीज पुरवठा खंडित होऊन शहर अंधारात बुडून जाते. आपल्याकडे रस्त्यांचे जाळे आहे मात्र रस्त्यांची अवस्था, वाहतुक सिग्नल, दुभाजक, चौक यांची परिस्थिती दयनीय आहे. यामुळे पावसाळ्यातच काय वर्षभर कोणत्याही कामाच्या किंवा शाळेच्या वेळांमध्ये वाहतुकीची कोंडी होते.या शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी दिवसाच्या कोणत्याही वेळी दोन तास लागतात (तुमचं नशीब वाईट असेल तर जास्तीही लागू शकतात)वाईट गोष्ट म्हणजे शहराचं नियोजनच असं करण्यात आलं आहे की नागरिकांना नोकरी, शिक्षण, आरोग्य सेवा किंवा अगदी मनोरंजन अशा विविध कारणांसाठी सतत एका टोकावरून दुसऱ्या टोकाला जावं लागतं. शहर सकृतदर्शनी स्वच्छ वाटतं, मात्र त्याने भुलू नका. कचरा डेपोचा वाद सतत डोकं वर काढत असतो व त्यानंतर तुम्हाला सगळीकडे कचऱ्याचे ढीगच्या ढीग दिसू लागतातआपल्याला अनेक दशकं उलटून गेल्यानंतरही आपल्या शहरातल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी योग्य जागा मिळालेली नाही. खरंतर आपण आपला कचरा जिथे नेऊन टाकतो तिथल्या लोकांची शांतता भंग न करता (आरोग्याला धोका निर्माण न करता) कचऱ्याची निर्मिती नियंत्रित ठेवू शकतो किंवा त्यावर प्रक्रिया करू शकतो ही वस्तुस्थिती आहे.शहरातल्या सार्वजनिक शौचालयांचीही अशीच परिस्थिती आहे, तुम्ही कधी नैसर्गिक विधीसाठी त्यांचा  वापर करून पाहिलात तर पुढील वेळेस तुम्ही सार्वजनीक स्वछतागृहात पाऊलही टाकणार नाही याची मला खात्री आहे. त्यानंतर सुरक्षा तसंच पोलीस व अग्निशामक दलांसारख्या महत्वाच्या दलांसाठीच्या निकृष्ट पायाभूत सुविधा हीसुद्धा एक समस्या आहेजैवविविधता धोरणांमधल्या त्रुटींमुळे केवळ शहरातल्याच टेकड्या व जलस्रोतांचे (नदी हा शब्द वापरू शकत नाही) नाही तर आजूबाजूच्या परिसराचेही नुकसान होतेय. इतरही अनेक समस्या आहेत. या सगळ्या नकारात्मक बाबींमध्येही या शहरात होणारी रोजगार निर्मिती ही एक सकारात्मक बाब आहे. मात्र एखादंअनाथ मूलही वाढतं, तो निसर्गनियम आहे, मात्र त्याची वाढ किती सुदृढपणे होते हे त्याच्या पालकांवर अवलंबून आहे.

शहरातल्या वर नमूद केलेल्या सगळ्या सकारात्मक व नकारात्मक बाबी नागरिकांसाठी एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीसाठी जबाबदार असतात, ती म्हणजे घर. जर अधिकाधिक लोक या शहरात स्थलांतरित होत असतील तर त्यांची दुसरी गरज आहे घर (पहिली गरज ही नेहमी रोजगार असते) व इथेच आपण अतिशय कमी पडतोयबरेच जण म्हणतील की, हजारो सदनिका (म्हणजेच घरे) ताबा देण्यासाठी तयार अवस्थेत पडून आहेत. मात्र बांधकाम व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये मंदी आहे म्हणून सैरभैर झाले आहेत. अशावेळी घरांच्या आघाडीवर आपण अपयशी झालो आहोत असं कसं म्हणता येईलहजारो सदनिका (कदाचित जास्तीही) पडून आहेत, त्याचशिवाय अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. शहरासाठी हे चांगलं लक्षण नाही. रिअल इस्टेटमधली मंदी ही शहरामध्ये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांच्या असमान वितरणामुळे आहे, केवळ घरांचे दर किंवा विक्रीसाठी अतिरिक्त घरे उपलब्ध झाल्यामुळे नाहीहेच मुख्य कारण आहे. साधारण तीन दशकांपूर्वी अवैध घरात राहणारी लोकसंख्या (ज्यामध्ये झोपडपट्ट्यांचाही समावेश होतो) जेमतेम 15-25% होती, तीच आता जवळपास 45झाली आहे. म्हणजेच या शहरातली जवळपास निम्मी लोकसंख्या अवैध घरांमध्ये राहते व पालकांसाठी हा धोक्याचा इशारा आहे.कुणालाही अर्थातच अवैध घरांमध्ये किंवा झोपडपट्टीत आपणहून राहायचं नसतं. ते वेळोवेळी पालकांवरील राग एकमेव मार्गाने व्यक्त करतात तो म्हणजे विद्यमान पालकांविरुद्ध मतदान करून, ही संधी पाच वर्षातून एकदाच येते.कायदेशीर घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कष्टाचे पैसे खर्च केल्यानंतरही (जे बरेच करावे लागतात) चांगल्या सेवा मिळत नसतील तर ते सुद्धा हाच मार्ग पत्करतात.नुकत्याच आलेल्या पुरानं कायदेशीर व बेकायदेशीर दोन्ही घरांमध्ये हाहाकार उडाला, मात्र शहराच्या पालकांनी नागरिकांची काळजी घेतली नाही हे अतिशय बोलकं उदाहरण आहे. लाखो कुटुंबांना या पुराचा विविध प्रकारे फटका बसला. प्रियजनांचा जीव गेला, मौल्यवान वस्तू वाहून गेल्या, पुरामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीने व वीज पुरवठा खंडित झाल्याने जीव मेटाकुटीला आला. म्हणूनच हे सगळे नागरिक पालकांविरुद्ध मतदान करून बंड करणार हे स्वाभाविक होतं व आपल्याला या निवडणुकीमध्ये हेच दिसून आले.

आपल्या नवीन पालकांनी या सगळ्या घटनांचा अभ्यास केला पाहिजे कारण पाच वर्षं हां हां म्हणता निघून जातील. माध्यमांना, शासनकर्त्यांना व बिझनेस गुरुंना वाटते तेवढे लोकांची स्मरणशक्ती अल्पकालीन नसते.जे पालक (आमदार, खासदार, नगरसेवक) पुन्हा निवडून आले आहेत त्यांनी त्यांच्या नशीबाचे आभार मानले पाहिजेत. कारण मताधिक्य कमी झालं आहे याचा अर्थ लोक त्यांच्यावर पूर्वीसारखे खुश नाहीत आणि  नवीन चेहऱ्यांना जबाबदारी देण्यात आलीय किंवा ते काहीतरी चांगला बदल घडवतील असा विश्वास दाखवण्यात आलाय. इथेच शहराच्या पातळीवर पालकांचा त्याग महत्त्वाचा ठरतो.आम्ही तुमच्याकडे आमचे पालक म्हणून पाहतो, म्हणूनच तुम्हीज्या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक जिंकलाय त्याला नाही तर नागरिकांना जबाबदार आहात.तुम्ही पक्षाच्या चौकटीतून बाहेर पडून शहराच्या भल्यासाठी एकजुटीनं काम करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही काही मूठभर नागरिकांच्या नाही तर संपूर्ण शहराच्या भल्यासाठी काम केलं पाहिजे.त्यासाठी तुमच्यापैकी प्रत्येकजण या शहराचा अविभाज्य भाग झाला पाहिजे तसंच स्वतःला समाजासाठी उपलब्ध करून दिले पाहिजे. तुम्हाला पालकाची भूमिका तसंच व्याख्या समजली तरंच हे शक्य आहे.पालक हा आधी कुटुंबाचा सदस्य असतो, तुमच्या बाबतीत सांगायचं तर तुम्ही या स्मार्ट शहराचे आधी नागरिक आहात म्हणूनच पालक झाला आहात.आपण जेव्हा म्हणतो त्याग तेव्हा तुम्ही महत्त्वाकांक्षी होऊ नका किंवा संपत्ती, नाव अथवा प्रसिद्धी मिळवू नका असं आमचं म्हणणं नाही.पण एक लक्षात ठेवा ही सगळी तुम्ही पालक म्हणून तुमचं कर्तव्य करत असतानाची उपउत्पादनं आहेत, उद्दिष्टं नाहीत. आम्ही तुम्हा सगळ्यांवर जो विश्वास दाखवलाय त्या बदल्यात या शहराला तुमच्याकडून असा त्याग अपेक्षित आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य चोख पार पाडलं तर तेच नागरिक तुम्हाला पुन्हा पुन्हा त्यांचे पालक बनवतील. या निवडणुकीत आपल्याला अशा चेहऱ्यांची उदाहरणं राज्यभरात दिसून आली आहेत.

म्हणूनच पालकांनो तुम्हाला तुमची जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. हा अतिशय अद्भुत देशआहे, इथे लोक जसं जीवापाड प्रेम करतात तसंच टोकाचा तिरस्कारही करतात; विशेषतः ज्यांना ते पालक म्हणतात (किंवा असल्याचं मानतात) त्यांचा.एक लक्षात ठेवा ज्याप्रकारे आम्ही आमचे देव तयार करतो, त्याच प्रकारे आम्ही आमचे पालकही घडवतो किंवा बिघडवतो.

 संजय देशपांडे
संजीवनीडेव्हलपर्स