Wednesday 24 July 2019

जागतीक व्याघ्र दिन आणि मनुष्य-प्राणी संघर्ष !



























आपण जेव्हा निसर्गात वन्यप्राण्यांना सामोरे जातो तेव्हा नेहमी दयाळूपणा व सहानुभूती दाखवली पाहिजे.” … पॉल ऑक्स्टन

वरील अवतरण श्री पॉल ऑक्स्टन यांचे असून ते वाईल्ड हार्ट वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे संस्थापक/संचालक व वन्यजीवन छायाचित्रकार आहेत. दक्षिण आफ्रिकेतील, वाईल्ड हार्ट वाईल्डलाईफ फाउंडेशन ही लहानशी संघटना अतिशय मोठं काम करण्यासाठी झटतेय. आम्ही सर्वाधिक धोका असलेल्या वन्यप्राण्यांना मदत करण्यासाठी जगतो. आम्हाला प्राण्यांचं संगोपन करायला आवडतं व आम्ही प्रत्येक प्राण्याला आमच्याकडून शक्य ती सर्व मदत व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो, ह्या संघटनेचे ब्रिदवाक्यआहे.

मी पॉलचे हे शब्द यापूर्वीही वापरले आहेत. मात्र काही शब्दांची ताकदच अशी असते की तुम्हाला ते पुन्हा-पुन्हा आठवतात व पॉलचे वरील शब्दही असेच आहेत आणि वाघांच्या संवधर्नाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 29 जुलैला जागतिक वाघ दिन अथवा आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा करतात.सेंट पिटर्सबर्ग येथे 2010 साली झालेल्या व्याघ्र परिषदेत याची सुरूवात करण्यात आली. या पार्श्वभुमीवर याव्याघ्र दिनाचं पॉलचे वरील शब्द मला परत एकदा शेअर करावेसे वाटले.   या व्याघ्र दिनाचं घोषवाक्य आहेत्यांचे अस्तित्व आपल्या हाती, ऐकायला तर छान वाटतंय नाही का पण यासंदर्भात आपल्या भोवतालची परिस्थिती काय आहे? मला आपल्या महाराष्ट्रातली गेल्या चार वर्षातली परिस्थिती पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की जाणवलीय की लोकांमध्ये वन्य जीवनाविषयी जागरुकता वाढतेययाचं श्रेय सरकारला (म्हणजेचवनविभागालाही), अनेक सामान्य लोकांना तसंच स्वयंसेवी संस्थांना द्यावं लागेल. हो फेसबुकसारख्या समाजमाध्यमांनाही द्यावं लागेल जिथे अनेक लोक (छायाचित्रकार) त्यांच्या जंगलातल्या क्षणांची छायाचित्रं टाकतात आणि त्यामुळेच आणखी बरेचजण वन्य जीवनाविषयी विचार करायला उद्युक्त होतात. यातही वाघांची छायाचित्रं सर्वाधिक लक्षं वेधून घेतात ही वस्तुस्थिती आहे. एक लक्षात ठेवा आपलं राज्य सगळ्यात प्रगत व शहरीकरण होत असलेलं राज्य आहे. मात्र यामुळेच वन विभागाचं काम सर्वात अवघड आहे. कारण वन्यजीवनाला सर्वाधिक धोका निसर्गाकडून किंवा कोणत्याही मोठ्या प्राण्यापासून नाही तर माणसापासून आहे. कारण वाघाकडे सुळे व धारधार पंजे आहेत, बिबट्याकडे वेग आहे, हत्तीकडे शक्ती आहे, अस्वलाकडे नखं आहेत ज्यामुळे तो मानवी शरीरातील मांसाचे तुकडे पाडु शकतो, रानडुकरालाजमीन खणण्यासाठी सुळे असतात, सापाकडे दंशामध्ये विष असतं, मधमाशीकडे डंख असतो, पक्षी आकाशात उंच भरारी घेऊ शकतो मात्र या सगळ्याची माणसाकडे जे आहे त्याच्याशी तुलना होऊच शकत नाही ते म्हणजे आपला मानवी मेंदू. या मेंदूच्या मदतीनेच आपण जेसीबी, ट्रॅक्टर, चेन सॉ, काँपॅक्टर व इतरही अनेक प्रकारची यंत्रे बनवतो आणि वर नमूद केलेल्या प्राण्यांची सगळी शक्ती आपल्या बुद्धिमत्तेतून तयार झालेल्या यंत्रांच्या ताकदीपुढे निष्प्रभ ठरते. यामुळेच मानव विरुद्ध प्राणी या संघर्षात नेहमी प्राण्याला माघार घ्यावी लागते. माघार घ्यावी लागते म्हणजे एकतर आपण जिला प्रेमानं प्राण्यांचीवसाहत (राहण्याची जागा) म्हणतो ती सोडून जावं लागतं किंवा नामशेष व्हावं लागतं. अलिकडे आपल्याला हे प्राणी नामशेष होतानाच दिसून येताहेत. माणसांची आणखी एक गोष्ट प्राणी कधीच करू शकत नाहीत ती म्हणजे, माणसं संघटित होऊ शकतात, मतदान करून सरकार स्थापन करू शकतात, त्यांना आरामशीरपणे राहता यावं यासाठी कायदे तयार करू शकतात, प्राणी मात्रं असं काहीच करू शकत नाहीत. माणसं जेव्हा त्यांना आरामात राहता यावं म्हणून कायदे तयार करतात तेव्हा त्या कायद्यांच्याकेंद्रस्थानी माणसंच असतात ज्यात प्राण्यांना अजिबात जागा नसते. माणसं सरकार स्थापन करतात, नागरी विकास, रस्ते, जलसिंचन, परिवहन यासारखे इतरही अनेक विभाग स्थापन करतात. या विभागांमुळे त्यांचं आयुष्य सुखकर होतं पण प्राण्यांना मात्र जाच होतो ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच माणसानं आणखी एक विभाग बनवला तो म्हणजे वन विभाग.

म्हणूनच वन्य प्राण्यांच्या अस्तित्वासाठी वन मंत्री व त्यांच्या विभागाची भूमिका फार  महत्वाची ठरते. विद्यमान वनमंत्र्यांनी या विभागाचा कार्यभार हाती घेईपर्यंत या विभागाला कुणी गांभिर्यानं घेत नसे कारणकदाचीत हे असं एकमेव खातं आहे जे माणसांसाठी नाही. अर्थातच त्यामुळे निवडून आलेल्या बहुतेक व्यक्तींना (म्हणजेच मंत्री) जंगले, प्राणी किंवा झाडांना हाताळण्यात फारसा रस नव्हता. मात्र गेल्या चार वर्षांमध्ये बराच बदल झालाय, वाघ व बिबट्यांचे मृत्यू होत असले तरीही आपल्या राज्यामध्ये वाघांची संख्या वाढलीय ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. नागपुरला वाघांची जागतिक राजधानी म्हणतात. हा शाही प्राणी जगाच्या बहुतेक भागांमधून नामशेष होत असताना ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रात मात्र वाघटिकून आहेत तसंच त्यांचीही संख्याही वाढतेय. राज्याच्या पश्चिम भागात कोल्हापूर जिल्ह्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे नवीन अभयारण्य सुरू झालं आहे. तसंच वन्य प्राण्यांचं जीवन थोडं सुकर करण्यासाठी इतरही अनेक पुढाकार घेण्यात आले आहेत. सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे वन विभागामध्ये काम करणाऱ्या माणसांचीही काळजी घेणे, कारण हीच माणसं वन्य प्राणी व त्यांच्या निवासस्थानाचं संरक्षण करण्यासाठी जबाबदार आहेतया लोकांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर ते वन्य जीवनाची काळजी घेऊ शकतील अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो? मी गेल्या काही वर्षामध्ये पाहिलेला बदल म्हणजे वन विभागासाठी चांगल्यापैकी निधीची तरतूद केली जाऊ लागलीय. हा अगदी शंभर टक्के बदल नसला तरीही ही मोठी गोष्ट आहे. त्याचवेळी वनीकरणावर व शहरी लोकांमध्ये वन्य जीवन संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करण्यावर अधिक भर देण्यात आलाय. हे महत्वाचं आहे कारण तुम्हाला जोपर्यंत कशाचं संरक्षण करायचंय हेच माहिती नसेल तर तुम्ही त्याचं संरक्षण कसं कराल? मी आपल्या राज्याच्या मंत्रालयाला (जिथे राज्याची सगळी धोरणं तयार केली जातात) अनेकदा भेट देतो पण अलिकडे झालेल्या भेटीत पहिल्यांदाच संपूर्ण तळमजल्यावर वन्यजीवनाची छायाचित्रं लावलेली पाहिली, त्याचप्रमाणे एका भल्यामोठ्या वाघीणीचा पुतळा तुमचं स्वागत करतो. हेच आवश्यक आहे कारण जेव्हा सामान्य माणूस, राज्यकर्ते वन्यजीवनाचा प्राधान्यानं विचार करत असल्याचं पाहतो तेव्हा ते महत्वाचं असलं पाहिजे असं त्याला वाटतं. यातून एक स्पष्ट संदेश दिला जातो. यासाठी मी वन विभागाच्या चमूला व वनमंत्र्यांना पैकीच्या पैकी गुण देईन. ते स्वतः चंद्रपूर मतदार संघातले आहेत, जिथे सर्वाधिक जंगल तसंच माणूस व प्राण्यांमधला संघर्षही आहे. त्यामुळेच राज्यातल्या इतर भागातल्या कोणत्याही शासनकर्त्यांच्या तुलनेत त्यांना जंगलाचं महत्व तसंच समस्या अधिक चांगल्याप्रकारे समजत असाव्यात. एकापरीनं सध्याचे वनमंत्री हे वन्यजीवनासाठी एकप्रकारे वरदानच आहेत कारण अर्थ खातंही त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे ते स्वतःच वन्यजीवनासाठी निधीची तरतूद करू शकतात.

खरंच या सगळ्या प्रयत्नांमुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्प, मेळघाट, पेंच, उमरेड-करंडला किंवा टिपेश्वर या सगळ्या ठिकाणी वाघांच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. वाघ हा वन्य जीवनाच्या शीखरस्थानी असल्याने हे एकप्रकारे सुदृढ वन्य जीवनाचे निदर्शक आहे. मात्र यामुळे मनुष्य व प्राण्यांमधील संघर्षातही वाढ झाली आहे. अनेकांनी मनुष्य व प्राण्यांमधील संघर्षाविषयी ऐकलं असेल मात्र अतिशय कमी जण त्याचा नेमका अर्थ जाणतात. हे अगदी सोपं आहे, जंगल हे वन्य प्राण्यांचं घर आहे, ज्यामध्ये फक्त वाघ किंवा बिबट्याचाच नाही तर सशापासून ते हरणापर्यंत व साळींदरापासून ते इतरही हजारो वन्य प्रजातीपर्यंत सर्वांचा समावेश होतोया प्राण्यांचं घर असलेल्या जंगलांना लागून मानवी वसाहतीही असतात व माणसांची लोकसंख्या प्राण्यांपेक्षा झपाट्यानं वाढते. आपल्या वाढत्या लोकसंख्येसोबतच जीवनाच्या सुखसोयीही वाढतात.त्यामुळेच माणसांना वाढत्या लोकसंख्येसाठी अधिक जमीन हवी असते म्हणून ते प्राण्यांच्या घरांवर म्हणजेच जंगलांवर अतिक्रमण करतात. अर्थातच प्राणी प्रतिकार करायचा प्रयत्न करतात. वाघ जंगलांना लागून असलेल्या मानवी वसाहतींवर हल्ले करतात किंवा बिबटे, गाय किंवा शेळ्यांसारखे पाळीव प्राणी मारतात किंवा हरिणांचे कळप जंगलांशेजारी राहणाऱ्या शेतकऱ्यांची पिके खाऊन टाकतात. असा अनेकप्रकारे संघर्ष होतो. माणसांना वन्य प्राण्यांचे हल्ले आवडत नाहीत, त्यांच्या सुखसोयी नष्ट करणाऱ्या प्राण्यांना ते त्यांच्या शस्त्रांनी ठार मारतात, यालाच माणूस व प्राण्यांमधला संघर्ष म्हणतात. हा संघर्ष सर्व जंगले व त्यांच्या आसपासच्या भागात सुरू असतो. हा संघर्षच वन विभागासाठी सर्वात मोठं आव्हान आहे.

मला खात्री आहे की वनविभागालाही हे माहिती असेल व वन्य प्राण्यांसाठीची ही लढाई जिंकण्यासाठी ते योग्य ती पावलं उचलतील. याचं कारण म्हणजे वन्य प्राण्यांच्या वाढत्या संख्येला सामावून घेण्यासाठी केवळ आहेत ती जंगलं पुरेशी नाहीत तर मनुष्य व प्राण्यांमधील संघर्ष कमी करण्यासाठी नवीन जंगलंही तयार करणं आवश्यक आहे याची त्यांना जाणीव आहे. जशी माणसांना वाढत्या लोकसंख्येसाठी जागा हवी असते तशीच प्राण्यांनाही जागा आवश्यक असते पण त्यांच्याकडे माणसासारखी बुद्धिमत्ता किंवा यंत्रसामग्री किंवा त्यांची काळजी घ्यायला सरकार नसतं. म्हणूनच आपली बुद्धिमत्ता व यंत्रसामग्री या प्राण्यांसाठी वापरणं हे वनमंत्री व त्यांच्या विभागाचे काम आहे.

आपल्या राखीव जंगलाच्या परिसरात जेव्हा एखादा वाघ मारला जातो, ता.क. (साल 2019 मध्येच आपण जवळपास 12 वाघ गमावलेत) किंवा गावकरी एखाद्या बिबट्याला मारहाण करतात किंवा तो एखाद्या लहान मुलाला मारतो किंवा एखादा हत्ती शेतकऱ्यांना पळता भुई थोडी करतो, तेव्हा या सगळ्या घटनांना वर्तमानपत्रात मुखपृष्ठावर प्रसिद्धी मिळते. सगळी माध्यमं ही समस्या उचलून धरतात व लोक त्याला माणूस व प्राण्यांमधला संघर्ष म्हणतात. मात्र अगदी आपल्या  पुणे  शहराभोवतालच्या भागात फुलपाखरं, पक्षी, मुंगूस, बेडूक, कोल्हा, ससा, तरस, मासा किंवा अगदी माकडं (ही यादी न संपणारी आहे) या संघर्षामध्ये पराभूत (म्हणजे नामशेष) होत आहेत. माणूस-प्राण्यांमधल्या या संघर्षापेक्षाही कितीतरी पटीनं मोठ्या असलेल्या शहर व वन्यजीवन संघर्षाची कुणालाच फिकीर नाही. माणसांसाठी व त्यांच्या वाढत्या गरजांसाठी जागा करून देण्यासाठी जशी शहरं वाढताहेत तसं आपण प्रत्येक प्रजातीला आपल्या शहरांमधून किंवा गावांमधूनच नाही तर या पृथ्वीवरूनच नामशेष करतोय. तुम्ही जेव्हा एखादं झाड तोडता तेव्हा ते अनेक पक्षी, खारी, माकडं किंवा फुलपाखरांचं घर असतं. विचार करा त्यांच्याकडे आपल्यासारखं एका रात्रीत सामान हलवण्यासाठी मूव्हर्स अँड पॅकर्सची सोय नसते. तसंच त्यांना एखादा वास्तुविशारद किंवा कंत्राटदार बोलावून त्यांच्यासाठी नवीन घरंही बांधता येत नाही, मग त्यांनी कुठे जायचे ?

आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शहरातलं मानवनिर्मित कोणतंही अतिक्रमण (म्हणजे अवैध घरं) हटवणं किती अवघड असतं. ही गरीब माणसं कुठं जाणार असं आपलं सरकार म्हणतं व मानवतेच्या दृष्टिकोनातून ही सगळी अवैध घरं नियमित करतंमात्र एखाद्या दिवशी एखादी जमीन निवासी किंवा औद्योगिक म्हणून जाहीर करताना आपण ज्या पक्ष्यांच्या, कीटकांच्या, प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या प्रजातींचं ते कायदेशीर घर होतं त्यांच्याविषयी क्षणाचाही विचार करत नाही. त्यांना त्यांच्या घरातून हाकलून देतो, आता याला माणूसकी म्हणावी की काय?

मी पुन्हा एकदा सांगतो की, घरं, रस्ते, उद्योग किंवा कोणतंही बांधकाम करू नका असं माझं म्हणणं नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण आपल्यासाठी आरामदायक घरं बांधत असताना सगळीकडेच वन्यजीवनासाठीही थोडी जागा ठेवली पाहिजे, जे आपण सध्या करत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठीच आपण आपल्या वनविभागाची रचना वन्य जीवन विभाग म्हणून केली पाहिजे. ज्याप्रमाणे आयएएस अधिकारी प्रत्येक सरकारी विभागाचे प्रमुख असतात, त्याचप्रमाणे आयएफएस अधिकाऱ्यांना म्हणजेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही प्रत्येक विभागाच्या नियोजन चमूमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. आपल्याकडे जसा नागरी नियोजन विभाग असतो त्याचप्रमाणे आपल्याकडे वन्य जीवन नियोजन विभागही असला पाहिजे. असं झालं तरंच आपलं संपूर्ण जीवन वन्यजीवन-केंद्रित होईल. तरच प्राण्यांसाठी काही आशा असेल, ज्यामध्ये वाघ हा शिखरस्थानी आहे. माझ्या मनात सहजच (स्वैरपणे) हा विचार आला. मात्र असा विचार येण्यामागेही एक कारण आहे, तुम्ही कोणतंही वर्तमानपत्र उघडा, तुम्हाला वन्यजीवनाविषयी काहीतरी वाईटच वाचायला मिळतं. त्याशिवायही वन्यजीवनासंदर्भातल्या अनेक वाईट बातम्या असतात ज्या प्रसिद्धच होत नाही, पण त्या घडत असतात. त्या घडू नयेत यासाठी आपल्याला झपाट्यानं पावलं उचलावी लागणार आहेत. आता वाघ वाचवा म्हणून नुसती जनजागृती करणं बसं झालं (म्हणजे ती सुरूच राहील), आता प्रत्यक्ष कृती करायची वेळ आहे. वाघ व त्याचं घर म्हणजेच जंगल वाचवण्यासाठी केवळ कुणा वनमंत्र्यांचे किंवा वन विभागाचे प्रयत्न पुरेसे नाहीत तर आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत.

आपण वन्यजीवनाविषयीच्या आपल्या दृष्टिकोनात अमूलाग्र बदल केला (आपण केवळ तेवढंच करणं आवश्यक आहे) तरच आपल्याला जागतिक वाघ दिन साजरा करायचा अधिकार आहे. नाहीतर वाघ किंवा कोणत्याच प्रजातीसाठी जमीन (घर किंवा निवासस्थान) उरणार नाही. त्यानंतर फक्त वाघ दिवस असेल, मात्र तो दिवस पाहायला वाघच उरणार नाहीत!

संजय देशपांडे
संजीवनी  डेव्हलपर्स

Monday 22 July 2019

पुन्हा एकदा महानायक नं १ !





















पुन्हा एकदा महानायक नं १ !

मला यशाचं एखादं खात्रीशीर सूत्रं माहिती नाही. मात्र मला इतक्या वर्षात नेतृत्वाची काही वैशिष्टे सार्वत्रिक असल्याचं जाणवलंय व लोकांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये संघटित करणे, त्यांचे गुण, त्यांचे विचार व संघटितपणे काम करण्याच्या त्यांच्या प्रेरणेला प्रोत्साहन देण्यासाठी मार्ग शोधणे यांचा त्यात  नक्कीच समावेश होतो”. …महाराणी एलिझाबेथद्वितीय.

प्रिय नरेंद्र मोदी सर व सहकारी यांस,

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ या जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात वयस्कर कार्यरत राष्ट्र प्रमुख  आहेतत्यांचे वय 93 वर्षे असून  त्या जवळपास 67 वर्षांपासून सत्तेत आहेतत्या कधीही कोणत्याही शाळेत किंवा महाविद्यालयात गेल्या नाहीत, तर त्यांनी घरातच ज्ञानाचे धडे गिरवले. आपल्या देशाला स्वातंत्र मिळून आपण जगातली सर्वात मोठी लोकशाही झाल्यानंतर चारच वर्षात त्या महाराणी म्हणून नियुक्त झाल्या.म्हणजे एकाप्रकारे इंग्लंडच्या राणींची कारकीर्द व आपली लोकशाही साधारण एकाच वयाच्या आहेत. म्हणून मला आपल्या देशातील यावेळच्या लोकसभा निवडणुकीत तुमच्या संघाच्या विजयाचे वर्णन करताना, त्यांचे वरील अवतरण अतिशय चपखल वाटले. या अवतरणातून असे दिसून येते की काही वेळा (यावर बरेच जणं असं म्हणतील की खरंतर अनेकदा) शिक्षणावरून एखाद्या व्यक्तीची क्षमता, बुद्धिमत्ता किंवा हुशारी ठरत नाही. अनेक लोकांची (म्हणजे बहुतेकांची) अशी अपेक्षा होती की या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तुम्ही पुन्हा एकदा सत्तेत येणार नाही व तुम्ही ज्या मताधिक्यानं निवडून आलात त्याची तर कुणीच अपेक्षा केली नव्हती. मात्र तुमचा एवढ्या मताधिक्यानं विजय ही काळ्या दगडावरची रेघ होती हे कुणाला उमगलंच नाही. अर्थात हे समजण्याइतकी दूरदृष्टी किंवा हुशारी देशातल्या फारशा लोकांकडे (म्हणजेच तुमच्या विरोधकांकडे) नाही, ती माझ्याकडेही नाही!

मी काही तुमची स्तुती करण्यासाठी किंवा तुमच्याकडून काहीतरी मिळवण्याच्या अपेक्षेनं हे लिहीत नाही. मात्र तुम्ही दुसऱ्यांदा एवढ्या मोठ्या मताधिक्यानं सत्तेत आल्यानं त्यासोबत स्तुती ओघानंच येतेच (मात्र ती बऱ्याचदा ईर्षेनेही किंवा अगदी मत्सरानेही केली जाते). तुम्ही आधीही काही दशकांपासुन सत्ता म्हणजे काय हे जाणून आहात. मात्र एका राज्याचे मुख्यमंत्री असणं आणि जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान असणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. हे देखील तुमच्या समकालीन अनेकांना समजलं नाही. खरंतर एका महिलेला अनेक वर्षांपूर्वी हे समजलं होतं. त्यावेळी आम्ही शाळकरी होतो. तिच्या देशाला एका सच्च्या नेतृत्वाची गरज होती. मात्र नेतृत्व करत असताना तिलाही तिचा अती आत्मविश्वास नडला असं मला वाटतं. अर्थात मी काही तिच्या कर्तुत्वाचं विश्लेषण करू शकत नाही किंवा मी तिचा समकालीनही नाहीमात्र आज मी पन्नाशीत असताना तुमच्या यशाचं (अर्थात तुम्ही याला यश म्हणाल किंवा नाही हे सुद्धा मला माहिती नाही) इतरांच्या किंवा तुमच्या विरोधकांच्या (ते सुद्धा आता फारसे उरलेले नाहीत) दृष्टिकोनातून थोडंफार विश्लेषण करू शकतो. 2014 मध्ये बदलाची लाट होती त्यामुळे तुम्ही व तुमचे सहकारी सत्तेत आलात असं म्हणता येईल, मात्र 2019 हे खऱ्या अर्थानं आव्हान होतं. जसे की आपण 1983 मध्ये पहिल्यांदा आयसीसी क्रिकेट विश्वचषक जिंकला, पण या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी आपल्याला 28 वर्षं लागली. त्याचप्रमाणे पहिल्यांदा कोणताही विजय मिळवणं कदाचीत तुलनेने सोपं असते, मात्र सातत्यानं विजयी होणं अवघड असतं व यातूनच खरे विजेते इतरांहून कसे वेगळे असतात हे दिसून येतं.

पुन्हा स्तुतीचा वर्षाव करतोय, पण तुम्हाला व तुमच्या सहकाऱ्यांना सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेला विजय त्याच योग्यतेचा होता. एकशे वीस कोटी लोकसंख्येच्या या वैविध्यपूर्ण देशात, नावात कुठेही गांधी नसताना दुसऱ्यांदा एवढ्या प्रचंड बहुमतानं निवडून येणं हे खरोखरंच विशेष आहे. हे नेमकं का विशेष आहे याचं विश्लेषण मला करावसं वाटलं. बहुतेक लोकांना असं वाटत होतं की भाजपा पुन्हा सत्तेत येईल मात्र मताधिक्य 2014 पेक्षा कमी झालेलं असेल, त्याचप्रमाणे सत्तेत येण्यासाठी बऱ्याच तडजोडी कराव्या लागतील असेही तर्क होते. तुमच्या पक्षातले बरेच इच्छुकही या अनिश्चितेवर पोळी भाजण्यासाठी तयार होते, कारण सत्तेसाठीच्या वाटाघाटी किती अटीतटीच्या असू शकतात हे आपण सगळे जाणतो. मात्र देशात जे काही झालं त्यामुळे या सगळ्या किंतु-परंतुला पूर्णविराम मिळाला. मला शंका वाटते की तुम्हाला स्वतःला तरी आपण एवढ्या प्रचंड मताधिक्यानं जिंकू असं वाटलं होतं कातुम्हाला वाटलं असेल तर मला तुमच्याविषयी असलेला आदर अनेकपटींनी वाढेल यात शंका नाही.
आता मूळ विषयाकडे येऊ ते म्हणजे विश्लेषण व पुढचा मार्ग कसा असेल. आता बरेचजण असे म्हणतील की यशाचं विश्लेषण करायची काय गरज आहे, कारण आपल्या देशामध्ये यशाला कोणत्याही कारणाची किंवा तर्काची गरज नसते. अपयशालाच या सगळ्या कुबड्यांची गरज असते. मला माहितीय की तुम्हाला नेमक्या याच दृष्टिकोनावर हसू येईल. कारण तुमच्यासाठी 2019 चा विजय कधीच इतिहासजमा झाला असेल व तुम्ही 2024 ची तयारीही सुरू केली असेल यात शंका नाही. मला असं वाटतं याचसाठी विश्लेषण अतिशय महत्वाचं आहे कारण गेल्या पाच वर्षात ज्या काही चुका झाल्या तुम्हाला त्यांची पुनरावृत्ती नक्कीच करावीशी वाटणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निश्चलनीकरण (नोटबंदी” हा अधिक सोपा व लोकप्रिय शब्द वाटतो) व त्यानंतर जीएसटी लागू करणे ही तुमची सर्वात अपयशी उपाययोजना ठरली असं अनेक लोकांना वाटतं. मात्र माझ्यामते नोटबंदी हे तुमचं ब्रह्मास्त्र (सर्वोच्च अस्त्र) होतं. खरंतर प्रत्येक चतुर्थ-श्रेणीतील (म्हणजे गरीब) किंवा त्याखालील वर्गातील व्यक्तींनी जेव्हा त्यांच्या श्रीमंत मालकांना भांबावुन पळताना व एका रात्रीत कवडीमोल ठरलेल्या त्यांच्या पैशांचं काय करायचं या विवंचनेत पाहिलं तेव्हा त्यांना मनापासुन आनंद झाला! मला असं वाटतं आपण भारतीय जेव्हा एखाद्याला आपल्यापेक्षा जास्त अडचणीत पाहतो तेव्हा आपल्याला अतिशय आनंद होतो (माफ करा मित्रांनो, पण ही मानवी प्रवृत्ती आहे). म्हणूनच सलीम-जावेद यांच्या पटकथांनी चित्रपटगृहांवर अधिराज्य गाजवलं. मूठभर श्रीमंत व शक्तीशाली लोक लाखो गरीब व निराधार जनतेचं शोषण करत असताना एक निडर तरूण या सगळ्यांना पळता भुई थोडी करतो अशा आशयाच्या त्यांच्या कथा असत. अशाच कथांनी “आम जनतेनं त्या निडर तरुणाला सुपरस्टार पदावर नेऊन ठेवलंआपल्याला या पटकथा व आताच्या परिस्थितीमध्ये साधर्म्य वाटत नाही का. नोटबंदी हा फक्त एकच उपाय झाला, असे अनेक उपाय करण्यात आले ज्यामुळे “सामान्य जनता आनंदी झाली. मध्यम वर्गाला स्वयंपाकाच्या गॅससाठी दिलं जाणारं अनुदान सोडून देण्याचं आवाहन असो किंवा हे अनुदान लाखो लाभार्थींच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करणे असो. या सगळ्यामुळे ते आपोआपच गरीबी हटाओ मोहीमेचा भाग झाले. अशाप्रकारे एकेका शस्त्राचा विरोधी पक्षांवर वार करण्यात आला मात्र त्यांना ते समजलंच नाहीअसं म्हणतात ज्या शस्त्राचा वार होईपर्यंत शत्रूला दिसतच नाही ते सर्वोत्तम शस्त्र मानावे, मात्र तुम्ही आणखी एक पाऊल पुढे गेलात. तुमची शस्त्रं शत्रूवर (म्हणजे विरोधकांवर) आदळूनही त्यांना ती दिसली नाहीत किंवा जाणवलीच  नाहीत. तुम्ही व तुमच्या सहकाऱ्यांनी तुमच्या प्रचारासाठी आपल्या लष्कराचाही वापर करून घेतला असा तुमच्यावर आरोप झाला. तुम्हीच काही दहशतवादी हल्ले घडवून आणले असं म्हणण्यापर्यंतही काही जणांची मजल गेली. तुम्ही या सर्व टीकेला धीरानं तोंड दिलं, मात्र यामध्ये विकास, बेरोजगारी, दुष्काळ, जलसिंचन, महागाई वगैरे मुद्दे मागे पडले. हे शस्त्र वापरण्याचा तुमचा हेतू नसतानाही ते लागू पडलं. अगदी सर्जिकल स्ट्राईक विषयावरच्या चित्रपटानंही 300 कोटी रुपयांच्यावर कमाई केली. खरंतर यावरूनच कुणाही शहाण्या माणसाला सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांचा अंदाज यायला हवा होता. पण या देशात व विशेषतः राजकारणात शहाणी माणसं अभावानंच आढळतात. यातली सर्वोत्तम बाब म्हणजे तुम्ही जे काही करता ते सामान्य माणसासाठीच करता व मतदारच तुमचे मायबाप आहेत यावर लोकांचा विश्वास निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी झालात. कुणाही व्यक्तीला अलिकडच्या काळात हे साध्य झालं नव्हतं व तुम्ही ते एकहाती करून दाखवलंतुमच्यावर माध्यमांचा वापर करून घेणे, दिखावेबाजी करणे तसंच अगदी तुमच्या विदेश दौऱ्यांवरूनही टीका झाली. मात्र सरतेशेवटी मतदारांना तुमच्याविषयी काय वाटतं हे महत्वाचं, विरोधकांना नाही.

यात शेवटचा आघात होता जीएसटी. देशातला मतदान न करणारा 10उच्चभ्रू वर्ग 90% लोकांची मालमत्ता नियंत्रित करतो. जीएसटी लागू करायचा निर्णय घेऊन तुम्ही स्वतःची (तसंच तुमच्या पक्षाची) कबर खोदून घेतलीय अशी टीका झाली. मात्र 10श्रीमंतांच्या हातात 90% जनतेची मालमत्ता असली तरीही निवडणुका या 90लोकांच्या मतांवरच जिंकल्या जातात हे लोक विसरतात. जे 10% लोक तुमच्या निर्णयांवर नाखुश होते, ते मतदान करायची तसदीही घेत नाहीत कारण कोणतंही सरकार आलं तरी त्यांचंच आहे असं त्यांना वाटतं. मात्र तुमचं सरकार तसं नाहीतुम्ही 90% वर्गातल्या लोकांसाठी काम करत आहात हे तथाकथित श्रीमंत वर्गाला कधी समजलंच नाही (किंवा त्यांनी विश्वास ठेवला नाही). हाच 90वर्ग तुमच्यामागे ठामपणे उभा राहिला. मात्र एक गोष्ट विसरून चालणार नाही की आपल्याला व्यवसाय हवेत. आपल्याला केलेल्या गुंतवणुकीवर नफाही हवाय (म्हणजेच मूल्यवाढ) कारण त्यामुळेच कोणताही व्यवसाय चालू शकतोया देशामध्ये आणखी एक दुर्दैवी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं मात्र तरीही इथे श्रीमंत होणं पाप मानलं जातं. आपल्या भोवतालची यंत्रणाच अशी आहे की प्रत्येक श्रीमंत स्त्री-पुरुषामागे काहीतरी गुन्हा लपला असलाच पाहिजे असंच सगळ्यांना वाटत असतं, तुम्हाला हा गैरसमज दूर करावा लागेल.अमेरिकेमध्ये आपण पहिल्या पाच सर्वात श्रीमंत व्यक्ती पाहिल्या तर त्या मध्यमवर्गातून आल्याचं आपल्याला दिसेल. आपल्या देशामध्ये मात्र तुम्हाला काय दिसते, सर्वात श्रीमंत व्यक्तींना वारशानंच श्रीमंती मिळालीय, अमेरिका आणि आपल्यात हाच फरक आहे. तुम्हाला अशी एक व्यवस्था तयार करावी लागेल ज्यामध्ये सामान्य माणूस कायदेशीर मार्गाने श्रीमंत होऊ शकेल.

मला असं वाटतं आता तुमचा सहकारी (म्हणजेच तुम्ही) पुन्हा सत्तेत आल्यानं खरा धोका विरोधकांकडून नाहीच (खरंतर आता कुणी उरलेलंच नाही) तर स्वपक्षीयांकडुनच आहे. सर्वोच्च स्थानी असल्यावर हीच समस्या असते, लोकांची तुमच्याकडून नेहमी सर्व आघाड्यांवर जिंकण्याचीच अपेक्षा असते. सामान्य जनतेची स्मृती अतिशय कमी असते व जनता जनार्दनालानेहमी नवीन समस्या शोधून त्या नेत्यांसमोर मांडायची सवय असते याची तुम्हाला जाण आहे. असे म्हणतात की तुम्ही काही वेळा काही लोकांना खुश करू शकता मात्र नेहमी सर्व लोकांना खुश करू शकत नाही. आपला देश एवढा मोठा आहे की सर्वांना खुश करणं हे एक मोठं आव्हानच आहे. त्याचप्रमाणे संपत्ती महत्वाची आहे तसंच श्रीमंत लोकही महत्वाचे आहेत. तुम्ही श्रीमंत लोकांकडून थोडीशी संपत्ती काढून घेऊ शकता व गरीब लोकांना थोडंसं श्रीमंत करू शकता. पण हा देश व्यवसाय, व्यापार, नवप्रवर्तन यावर चालतो व या सर्व गोष्टी सुरक्षित ठेवल्या पाहिजेत व त्यांचं जतन केलं पाहिजे. तुमची शस्त्र विरोधकांवर बेसावधपणे वार करतात, आता कुणी राजकीय पक्ष तुमचा विरोधक नसेल तर मतदारच तुमचे विरोधक असतील. एखादा नेता दीर्घकाळ सत्तेत असल्यावर हळूहळू कुठेतरी असंतोषाची बिजं पसरू लागतात (सध्याही दिसतंय) जो भविष्यात डोकं वर काढतो. हा असंतोष एखाद्या शस्त्रासारखा वार करू शकतो. जाणत्या माणसांनी म्हटलंय की सत्ता मिळवण्यापेक्षा ती पचवणं अतिशय कठीण असतं, म्हणूनच तुमच्यासमोरचं खरं आव्हान तुमच्या  सहकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीतल्या यशाचा किंवा विजयाचा खरा अर्थ समजून सांगणं आहे (त्यांनी तो पचवणं). असं झालं तरच त्यांचं ठोकं ठिकाणावर व पाय जमीनीवर राहतील.

मला असं वाटतं या देशासमोरचा सर्वात मोठा धोका म्हणजे आपली लोकसंख्या, जी काही दशकांमध्ये चीनलाही मागे टाकेल. जवळपास 120 कोटी (ती लवकरच 150 कोटींवर पोहोचेल) लोकांसाठी अन्न हवं व 240 कोटी हातांसाठी काम हवं. 120 कोटी लोकांना कामात गुंतवून उत्पादकता (तसंच सकारात्मकता) वाढवणं हे मोठं काम आहे. आपण हा लोकसंख्यारुपी भस्मासूर वेळीच नियंत्रणात आणला नाही तर गृहबांधणी, सार्वजनिक आरोग्य, कृषी, वाहतूक, शिक्षण या सगळ्यांशी संबंधित धोरणे अपयशी ठरतील. आपल्याकडे मर्यादित जमीन आहे व एफएसआय किंवा टीडीआर देऊन आपण आणखी घरे बंधू शकतो व ती सगळ्यांना परवडणारी बनवू शकतो. मात्र या कुटुंबांसाठी पाणी, या घरांसाठी वीज, कचरा टाकण्यासाठी जागा, या घरांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था आपण कुठून करणार आहोत अशा प्रश्नांमुळे तुम्ही आधीच विचारात पडले असाल. लोकसंख्येच्या या भस्मासुरामुळेच लहान शेतकऱ्यांना टिकून राहणे अशक्य झाले आहे. कुटुंबाचा आकार मोठा झाल्यावर त्यांच्या मागण्याही वाढतात व शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्या पूर्ण करणं अवघड होऊन जातं व परिणामी देशभरात आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायला मिळतात.

देशाला असलेला दुसरा सर्वात मोठा धोका म्हणजे आपण सामाजीक अशांततेच्या ज्वालामुखीवर बसलोय. आपला तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद किंवा सामान्य भाषेत सांगायचं तर समाजातील जात तसंच धर्माच्या आधारे असलेली समाजातील दुफळी हा इतका संवेदनशील विषय आहे की आत्तापर्यंत कुणीही सत्ताधारी त्याला हात लावण्यास धजावलेला नाही. आपल्या मनावर या गोष्टींचा एवढा पगडा असतो की कुणीही जात व्यवस्थेविषयी (आरक्षणाविषयीही) उघडपणे बोलत नाही. आपल्या देशात विनोद म्हणजे जेव्हा दोनअनोळखी लोक एकमेकांना भेटतात तेव्हा एकमेकांचं नाव (म्हणजेच अडनाव) जाणून घेतल्यावर हा कोणत्या जातीचा आहे किंवा असेल असाच विचार आधी मनात येतो. त्यानंतर पुढे होणार संवाद हा या घटकावर अवलंबून असतो. अनेक वाचकांना माझं निरीक्षण पटणार नाही, विशेषतः आयटीच्या पिढीतल्या तरुणांना. काही शहरांमध्ये किंवा काही भागांमध्ये त्यांचं म्हणणं बरोबर असेल पण खाजगी क्षेत्रात किंवा अगदी सर्वोच्च संस्थांमध्येही जातपात अस्तित्वात असते हे ढळढळीत सत्य आहे. याबाबतीत बोलायचं तर आपण भारतीय खरंच महान आहोत, आपल्याला समाजात समानता हवी असते मात्र आपले (जातीचं) विशेष स्थान न गमावता. या सगळ्या समुदयांना विशेष स्थान हवं असल्यामुळेच आपण समाज म्हणून कधीच एकजूट होऊ शकत नाही व स्वतःला एक राष्ट्र मानत नाही ही समस्या आहे. बऱ्याच जणांना हे आवडणार नाही किंवा ते स्वीकारणार नाहीत मात्र लोकसभा निवडणुका असोत किंवा ग्रामपंचायत निवडणुका, सर्व राजकीय पक्ष कशाप्रकारे तिकीट वाटप करतात ते पाहा. उमेदवारी देण्याचा पहिला निकष (आर्थिक बळ हा निकष अर्थातच असतो) एखाद्या मतदारसंघामध्ये विशिष्ट जातीचे किंवा धर्माचे किती मतदार आहेत त्यानुसार उमेदवाराची निवड केली जाते. मला असं वाटतं भ्रष्टाचारापेक्षाही ही दोन सर्वात मोठी आव्हानं आहेत. मी प्रत्येक भारतीय माझ्याच धर्माचा, जातीचा किंवा कुटुंबातला आहे असा विचार करू लागलो तर आपल्या बहुतेक समस्या सोडवल्या जातील. मला खात्री आहे की प्रत्येक भारतीयाला आपला धर्म, जात व समुदाय एकच असल्याची जाणीव व्हावी हे तुमच्याही कार्यक्रम पत्रिकेवर असले पाहिजे.

या देशाच्या (म्हणजेच सामान्य माणसाच्या) तुमच्याकडून अजूनही बऱ्याच अपेक्षा आहेत. आम्हा भारतीयांची देवावर नेहमी गाढ श्रद्धा असते. देव आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल असा विश्वास आम्हाला वाटतो. म्हणूनच आम्ही मंदिर, मशीद, चर्च सगळीकडे देवाला साकडं घालतो. आम्ही जीवापाड प्रेम करतो, संवेदनशील, भावनिक आहोत, त्याचप्रमाणे सडकून टीकाही करतो, आम्ही बहुतेकवेळा बुद्धीपेक्षा भावनेनी निर्णय घेतो, होय आम्ही तुमचे मतदार आहोत, आम्ही भारतीय आहोत!

मी माझ्या लेखात कुठेही मर्यादा ओलांडली असेल तर मोदी सर मला माफ करा. मी वर नमूद केलेल्या सर्व मुद्द्यांची तुम्हाला जाणीव असलेच मात्र तुमच्या विजयामुळे अजूनहीअचंबीत असलेल्या लोकांसाठी मी ते लिहीलं आहे. या देशाला महासत्ता बनवण्यासाठी नाही तर भारत हा नेहमीच महासत्ता होता याची देशाला तसंच देशवासीयांनाही जाणीव करून देण्यासाठीच अनेक शुभेच्छा. हे दाखवून द्यायची वेळ आता नक्कीच आलीय!

जय हिंद!

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स