Monday 21 October 2024

ताडोबा,नवीन सिझन सेम एक्साइटमेन्ट !
































ताडोबा,नवीन सिझन सेम एक्साइटमेन्ट !

तुम्ही जेव्हा एकाच व्यक्तीला दररोज अधिक उत्सुकतेने भेटण्यासाठी इच्छुक असता, तेव्हा त्यालाच प्रेम असे म्हणतात”… मी.

थांबा, लगेच कुठलाही निष्कर्ष काढू नका, हा लेख प्रेम किंवा नातेसंबंधांविषयी नाहिये कारण एकतर तो माझा प्रांत नाही व दुसरे म्हणजे जीवनाचा हा पैलू (म्हणजे प्रेम) अतिशय खाजगी बाब आहे व त्याचे सार्वत्रिकरण करता येणार नाही. म्हणूनच तुम्ही विचार करत असाल की मी हे अवतरण कोणत्या संदर्भात वापरले आहे, तर या ताडोबाच्या अभयारण्याविषयी माझ्या भावना आहेत (दुसरे काय?). मला माहितीय तुमच्यापैकी बहुतेकांना माझा व माझ्या ताडोबा अभयारण्याविषयीच्या वेडाचा कंटाळा आला असेल, तरीही काही हरकत नाही, तुम्हाला पुढचे न वाचण्याचा पर्याय आहे,! परंतु मी म्हटल्याप्रमाणे, तुमचे जेव्हा एखाद्या गोष्टीवर प्रेम असते तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करणे कधीच थांबवत नाहीत व या आश्चर्यकारक गोष्टी जाणून घेण्याचे औत्सुक्य सातत्याने वाढतच असते व ताडोबा माझ्या बाबतीत नेमके हेच करते. माझी अलिकडचीच भेट अगदी धावती होती, परंतु तरीही ती या सर्व गोष्टींच्या किंवा प्रेमाच्या नियमाला अपवाद नव्हती. खरेतर, जेव्हा शहरामध्ये तुमचा जीव घुसमटू लागतो व तुमच्या फुफ्फुसांमध्ये तो ताजा हिरवाईचा गंध भरून घेण्याची जेव्हा तुम्हाला ओढ लागते, जेव्हा तुमचे कान पक्ष्यांचा किलबिलाट, प्राण्यांनी इशारा देण्यासाठी काढलेले चित्कार ऐकण्यासाठी आसूसतात, जेव्हा तुमचे डोळे पिवळ्या-काळ्या पट्ट्यांचा शोध घेत असतात, तेव्हा तुम्ही हृदयाने वन्यजीवप्रेमी झाला आहात असे समजावे. मी जंगलापासून लांब असताना माझ्याबाबतीत नेहमी असे होते, यावेळी तर हा दुरावा चार महिन्यांहून अधिक काळ होता, संपूर्ण मध्य भारतात झालेला मुसळधार पाऊस याला कारणीभूत होता. तुम्हाला जेव्हा एखाद्या व्यसनी माणसासारखे वाटू लागते, तुमच्या जीपची चाके ओबडधोबड रस्त्यांवर फिरत असताना जाणवणारी उत्तेजना जेव्हा तुम्हाला हवीहवीशी वाटत असते तेव्हा हमखास जाता येईल अशा ठिकाणांमध्ये ताडोबाशिवाय दुसरी अधिक चांगली जागा कोणती असू शकते, मीही तेच केले...

 नवीन सिझनचा पहिला आठवडा होता व गाभा क्षेत्रातील (कोअर एरिया) हंगाम सुरू झालेला होता. बफर क्षेत्र वर्षभर पर्यटनाला खुले असले तरीही पावसाळ्यातील सफारी  फार अवघड असतात. मी सांगितल्याप्रमाणे, ही अगदी छोटीशी ट्रिप होती ज्यामध्ये केवळ चारच सफारींचा समावेश होता तरीही ताडोबा तुम्हाला प्रत्येक सफारीमध्ये आश्चर्यचकित करणे कधीही थांबवत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुन्हा एकदा माझी इच्छापूर्ती झाली. मला जवळपास गेली चार वर्षे हुलकावणी देत असलेला विशालदेही छोटा मटकासूर नावाचा वाघ मला दिसला. त्याचशिवाय हिरवाईच्या वेगवेगळ्या छटांच्या पार्श्वभूमीवर विहार करणाऱ्या ठिपकेदार हरिणांच्या झुंडीही दिसल्या, काही सुंदर पक्षी दिसले, आणि हो ताडोबाची सुपर मॉम झुनाबाई तिच्या बछड्यांसह दिसली. सुपर मॉमविषयीच्या पुढील लेखामध्ये तिच्याविषयी सविस्तर लिहीनच, परंतु या भेटीमध्येही सांगण्यासारखे (व जाणून घेण्यासारखे) बरेच काही घडले.

सर्वप्रथम, पावसाळ्या नंतरचा महिन्यात ताडोबाचे जंगल अतिशय सुंदर दिसते, याचे मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यानंतर सगळेकाही ताजेतवाने झालेले असते जे प्रत्येक झाड, वेली, ओढे, रस्ते व प्राण्यांमध्येही दिसून येते. केवळ हिरव्या रंगाच्याच असंख्य छटा मोजून तुम्ही थकून जाल व वेलींवरील अनेक फुलांचा सुगंध तुमची फुफ्फुसे आनंदाने भरून टाकतील. प्रत्येक जलाशय ताज्या पाण्याने काठोकाठभरलेला असतो (जे आपल्यासारख्या शहरातील लोकांसाठी दुर्मिळ दृश्य असते). वाघ तसेच सांबर हरिणांच्या शरीरावरील नारंगी पिवळसर रंगाचा कोट, ठिपकेदार हरिणांच्या शिंगांवरील मखमली थर, संपूर्ण जंगलाने हिवाळ्याच्या स्वागतासाठी असा साज ल्यायलेला असतो!  त्यांचे (अर्थातच वाघांचे) दर्शन होणे थोडे अवघड असते परंतु देवाच्या (व ताडोबाच्याही) कृपेने मला बरेच वाघ पाहायला मिळाले आहेत व मी जंगलातील इतर गोष्टींचा आनंदही घेऊ शकतो. तरीही ताडोबाचा विचार करता, तुम्ही हे काळे-पिवळे पट्टे दृष्टीस पडतील अशी आशा नेहमी करू शकता जे या हंगामामध्ये नारंगी लाल होतात. पहिल्या सफारीची सुरुवात झाली तेव्हा आम्हाला जंगली कुत्र्यांचा एक मोठा कळप अभ्यासण्याची संधी मिळाली, ज्यांचा रंग अतिशय सुंदर लालसर सोनेरी होता व ते तितकेच हिंस्रही असतात. हे छोटेसे खेळकर प्राणी जेव्हा शिकारीला निघतात तेव्हा किती हिंस्र व जीवघेणे असू शकतात हे जाणून घेणे अतिशय आश्चर्यकारक होते. ते ज्याप्रकारे शिकार करतात व त्यांचे भक्ष्य जिवंत खातात ते पाहून अनेक पर्यटक त्यांना क्रूर मानतात. परंतु ही त्या रानटी कुत्र्यांची चूक नाही तर त्यांच्या लहान आकाराची चूक आहे. त्यांच्या आकारामुळे वाघ किंवा चित्त्याप्रमाणे ते एका झटक्यात शिकार करू शकत नाहीत. त्यामुळे भक्ष्यास घायाळ करणे मग ते सांबर किंवा ठिपकेदार हरिण असो किंवा नीलगाय, त्यांचा पाठलाग करून त्यांना दमवणे व त्यांना जिवंत खाणे हाच एकमेव पर्याय त्यांच्याकडे असतो, परंतु ते पाहणे अतिशय त्रासदायक असते. आम्हाला त्यांची झटापट प्रत्यक्ष पाहता आली नाही, मात्र तो कळप त्यांचे भक्ष्य जिवंत खात असताना जंगलामध्ये शिकारीच्या वेळी त्यांनी मारलेल्या किंकाळ्या भरून राहिल्या होत्या. हे रानटी कुत्रे थेट वाघही अंगावर घ्यायला  घाबरत नाही, ते वाघांच्या लहान बछड्यांवर हल्ले करतात तसेच वाघांच्या क्षेत्रातील भक्ष्यासही त्रास देतात. त्यामुळे वाघांना जेथे रानटी कुत्री दिसतात तेथे वाघ ते त्यांच्यावर संपूर्ण ताकदीनिशी हल्ला करतो व त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्नही करतो. या दौऱ्याचा सर्वोत्तम भाग म्हणजे मला पाच नर वाघ पाहता आले व केवळ एक वाघीण दिसली, त्याविषयी मी पुढील प्रकरणामध्ये लिहीन. हे अतिशय विशेष आहे कारण जंगला मध्ये  एक नर वाघही दृष्टीस पडणे अवघड असते कारण त्यांच्या क्षेत्राचा आकार अतिशय मोठा असतो व त्यांना बछड्यांचे रक्षण करावे लागत नाही. ते काम वाघीणीचे असते व नर वाघ त्याच्या मर्जीनुसार कुठेही भटकू शकतो. या दौऱ्यामध्ये मला नर वाघांच्या वर्तनातील काही विशेष बाबी आढळून आल्या व सफारीचे योग्य पर्याय निवडण्याविषयी काही गोष्टीही मी इथे नमूद करणार आहे.

 आम्ही कोलारा बाजूच्या बफर क्षेत्रामध्ये अर्ध्या दिवसाची सफारी आरक्षित केली होती ज्यामध्ये बेलारा, मदनापूर व कोलारा प्रवेशद्वारांचा समावेश होतो, कारण यामुळे आपल्याला या तिन्ही क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळू शकतो. जेव्हा एका विभागामध्ये वाघ दिसून येईल अथवा नाही याची खात्री नसते जे सामान्यपणे वर्षाच्या या काळात घडते तेव्हा असा पर्याय निवडणे अधिक चांगले कारण यामुळे तुम्ही दुसऱ्या विभागातही जाऊ शकता व हा संपूर्ण प्रदेश पाहू शकता. या तिन्ही विभागांमध्ये एका नर वाघाचे राज्य आहे त्याचे नाव झायलो व तो गेल्या पाच ते सहा दिवसात दिसला नसल्याचे आम्हाला समजले. जेव्हा वाघाला भटकंती करण्यासाठी एवढे मोठे क्षेत्र असते तेव्हा नर वाघाच्या बाबतीत असे होणे सामान्य बाब आहे. तर या झायलोला बेलारा विभागात राहणे आवडते म्हणून आम्ही आधी हा विभाग पाहण्याचा ठरवले. आश्चर्य म्हणजे एका ठिकाणी आम्हाला त्या विभागातील काही जिप्सी वाट पाहात उभ्या असलेल्या आढळल्या कारण आपल्या क्षेत्राच्या हद्दीच्या खुणा करताना त्यांना तो दिसून आला होता. तुम्हाला एकदा नर वाघ दिसल्यानंतर त्याचा ठावठिकाणा शोधणे सोपे असते कारण वाघ कधीही त्याच्या चालण्याचा मार्ग बदलत नाही विशेषतः जेव्हा तो त्याची हद्द आखून घेत असतो तेव्हा तो एका निश्चित मार्गाने जातो व स्थानिक गाईड व चालकांना हे नेमके माहिती असते. तर हे धिप्पाड अंगकाठीचे झायलो महाशय आम्हाला अगदी जवळून पाहता आले. एका वेळी तर तो आमच्या जिप्सीच्या एवढ्या जवळ आला की त्याची भेदक नजर जणू काही मला जाब विचारत असावी की तुम्ही लोक मला माझे काम का करू देत नाही? याचे कारण म्हणजे, बफर क्षेत्रातील जंगल झुडुपे, गवत यामुळे घनदाट असते व रस्ते अरुंद व नागमोडी असतात, त्यामुळे जोपर्यंत वाघ रस्त्यावर येत नाही तोपर्यंत तो कुठून येतोय हे तुम्हाला माहिती नसते, त्यामुळे एका ठिकाणी तो आमच्या जिप्सीजवळून गवतातून बाहेर आला. गाभा क्षेत्रापेक्षा बफर क्षेत्रामध्ये कमी हरिणे किंवा माकडे असतात (म्हणजे वाघांचे भक्ष्य), त्यामुळे त्यांच्या चित्कारांवरून तुम्हाला वाघाचा माग काढता येत नाही व तुम्हाला केवळ वाघ प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसण्यावरच अवलंबून राहावे लागते. वन विभागाने किमान रस्त्याच्या कडेला असलेली उंच झुडुपे व गवत काढले तर चालकाला व गाईडना सहजपणे वाघाचा  मार्ग पाहता येतील व एक सुरक्षित अंतर राखता येईल व अपघातानेही त्यांचे जिप्सीच्या जवळ येणे टाळता येईल. हा झायलो  गवतातून बाहेर येत असताना त्याची माझ्याकडे रोखून बघणारी भेदक नजर माझ्या मनात कायमची कोरली गेली, या सफारीतील ही सर्वोत्तम आठवण होती.

दुसऱ्या दिवशी आम्हाला तरुण नर वाघांची आणखी एक जोडगोळी भेटली जी ताडोबामध्ये मामा-भांजे (मामा व भाचा) म्हणून प्रसिद्ध आहे. हे दोन तरूण नर वाघ सतत एकत्र फिरत असतात व शिकारही जोडीने करतात, जी नर वाघांसाठी अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. त्याचवेळी, ते रक्ताचे भाऊ नाहीत त्यामुळे त्यांच्यातील एकत्रपणाचे हे नाते अधिक विशेष ठरते. कारण एकीकडे वाघांसाठी सर्वात मोठा धोका म्हणजे क्षेत्रावरून व शिकारीवरून त्यांच्या आपसात होणाऱ्या लढाया. परंतु इथे दोन वाघ असे आहेत ज्यांच्यात रक्ताचे नाते नाही तरीही त्यांचे एकमेकांशी चांगले पटते, वाघांच्या वर्तनातील बदलाची ही खूण आहे का?

या ट्रिप मधील महत्वाचा भाग म्हणजे, मला वाघांमधील वडील-मुलाचे नाते पाहायला मिळाले जे सामान्यपणे सिंहांमध्ये दिसून येतेलायन किंगमधील मुफासा व सिंबा आठवतोय?  (आता हे काय असा प्रश्न कृपया विचारू नका, फक्त गूगल करा) तेच नाते व तोच जिव्हाळा मला छोटा मटका नावाचा एक मोठा नर वाघ व त्याचा पूर्णपणे वयात आलेला नर बछडा ज्याला कालुआ असे म्हणतात (त्याचा चेहरा काळसर आहे) यांच्यात पाहायला मिळाला. मी नेहमी सांगत आलोय की ही नावे स्थानिकांनी दिलेली असतात या बछड्यांना कुणी जन्म दिला आहे तसेच त्यांच्या जन्माचे ठिकाण किंवा एखादी जन्म खूण यावरून ही नावे ठेवली जातात. अर्थात वन विभाग हे स्वीकारत नाही, तर प्रत्येक वाघाला ओळखण्यासाठी एक क्रमांत देतो, तरीही वाचकांना सहजपणे समजावे यासाठीच केवळ मी ही नावे वापरतो आहे. छोटा मटका हा अजिबात छोटा नाही, म्हणजे आकाराने लहान नाही तर ताडोबाच्या जंगलातील तो कदाचित सर्वात मोठा वाघ असावा व जंगलाच्या एका मोठ्या भागावर म्हणजे क्षेत्रावर त्याचे राज्य आहे ज्यामध्ये तीन वाघीणींचा समावेश आहे. त्या सगळ्यांचे बछडे हे छोट्या मटकापासून झालेले आहेत व तो अगदी सहजपणे या वयात आलेल्या बछड्यांसोबत असतो, जे आता आता आपापल्या आयांपासून म्हणजे वाघीणींपासून वेगळे झाले आहेत, ही देखील नर वाघाच्यादृष्टीने अतिशय दुर्मिळ बाब म्हणावी लागेल. आम्ही जेव्हा सीएमला (ज्याला स्थानिक लाडाने छोटा मटका असे म्हणतात) पाहिले, तेव्हा तो पुढच्या डाव्या पायाने लंगडत होता व तो सुजलेला होता, कदाचित ते साळिंदराच्या काट्यामुळे झाले असावे असा आमच्या गाईडचा अंदाज होता. मी स्थानिक वनाधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली म्हणजे ते त्याच्यावर लक्ष ठेवू शकतील, हे जंगल आहे व नैसर्गिकपणे अशा गोष्टी घडू शकतात हे मान्य असले तरीही इतकी वर्षे आपण वन्यजीवनाला ज्याप्रमाणे वागवले (म्हणजे नष्ट केले आहे असे वाचावे) आहे, आता हस्तक्षेप करणे व उर्वरित वन्यजीवन, विशेषतः वाघ सुरक्षित ठेवणे आपले कर्तव्य आहे, कारण जंगलाच्या वन्यजीवनाच्या साखळीमध्ये ते सर्वोच्च स्थानी आहेत. इथेच पर्यटनामुळे वन विभागाला मदत होऊ शकते, कारण ते त्यांचे डोळे व कान होऊ शकते व म्हणूनच जंगलाचा प्रत्येक भाग पर्यटनासाठी खुला केला पाहिजे.

सीएम व त्याच्या साधारण वयात आलेल्या बछड्यांना एकत्र फिरताना, तसेच एकत्र शिकारही करताना पाहून, माझ्या गाईडने मला विचारले, “सर, टायगर्स का बर्ताव बदल रहा है क्या?” म्हणजे साहेब, वाघांचे वागणे बदलत आहे का? कारण एक नर वाघ कधीही त्याच्या वयात आलेल्या बछड्यांना, विशेषतः नर बछड्यांना सोबत फिरू देत नाही कारण तो त्याच्या भक्ष्यासाठी तसेच इतर मादींसोबत त्याच्या नात्यासाठी थेट धोका असतो. मी उत्तर दिले, कदाचित असेलही, कारण हजारो वाघ हा एकांडा प्राणी मानला जात आला आहे कारण तो कधीही सिंहांसारखा कळपाने किंवा समूहात राहात नाही. परंतु जागेच्या कमतरतेमुळे त्यांना जगण्याचे स्वरूप बदलणे भाग पडले असावे. अशाप्रकारचा कोणताही निष्कर्ष लगेचच काढणे फार घाईचे होईल, परंतु मला जे काही आढळले तसेच गाईड व चालक दररोज पाहात आहेत की वर्तनाच्या स्वरूपात काहीतरी बदल होत आहेत व हे ताडोबामध्ये होत आहेत यात काही आश्चर्य नाही, जेथे वाघ आधीपासूनच माणसांसोबत जगायला शिकला आहे व आता कदाचित त्यांच्यावर आपल्या स्वतःच्याच प्रजातीसोबतच जगण्याचा प्रयत्न करण्याची वेळ वाघांवर आली आहे. वन विभाग व वन्यजीव संशोधकांनी या पैलूचा अभ्यास केला पाहिजे, पर्यटकांना जोडीने फिरणारे वाघ पाहून छानच   वाटते परंतु तो मानवासोबतच्या सहजीवनातील एक अतिशय मोठा अडथळा ठरू शकतो कारण समूहामध्ये असताना वाघाची आक्रमकता वाढू शकते. आपण माणसेही समूहामध्ये असताना अधिक धाडस करण्यास धजावतो हे आपण पाहिलेच आहे. इथेच वनविभागाची भूमिका जास्त तीव्रपणे समोर येते, कारण वाघांसाठी अधिक जागा तसेच पाणवठे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, म्हणजे ते जंगलात सर्वत्र विखुरले जातील व एखाद्या विशिष्ट भागातच त्यांना केंद्रित व्हावे लागणार नाही, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी! उदाहरण म्हणजे आपण कोलारा प्रवेशद्वारापासून ते जामनी गावापर्यंतच्या रस्त्यालगत पाणवठे तयार करू शकतो, म्हणजे काही वाघांना जंगलाचा हा पट्टा वापरता येईल व अशा अनेक लहान गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो व मला खात्री आहे की ताडोबाचे व्यवस्थापनही यासंदर्भात काम करतच असेल. ताडोबामध्ये, केवळ वाघ व त्यांची छायाचित्रे काढणे एवढेच नाही तर तुम्ही अवतीभोवती इतरही असंख्य गोष्टी पाहू शकता, स्वच्छंदपणे हवेत विहार करणारी फुलपाखरे, वाघ आजूबाजूला असताना सांबर हरिणांचे वागणे व अशाच इतरही गोष्टी. अशा सगळ्या गोष्टी शिकून मी ताडोबाचा निरोप घेतला, लवकरच अधिक उत्साहाने, औत्सुक्याने पुन्हा भेट देण्याचे ठरवूनच!

तुम्ही खालील दुव्यावर अधिक माझे क्षण पाहू शकता …

https://www.flickr.com/photos/65629150@N06/albums/72177720321143099/with/54066445190

                                                                                                                                                    

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स 

smd156812@gmail.com


















Sunday 6 October 2024

रस्ता, पाऊस आणि वाहतुकीची समस्या !





























रस्ता, पाऊस आणि वाहतुकीची समस्या !                                                 

दर्जा म्हणजे जेव्हा कुणीही आपल्यावर नजर ठेवत नसेल तेव्हाही योग्य तेच काम करणे.”  हेन्री फोर्ड

काही नावांचा परिचय करून द्यावा लागत नाही व वरील अवतरणाचे लेखकही अशाच व्यक्तींपैकी एक आहेत. माझा आजचा लेख अशा विषयासंदर्भात आहे ज्याबद्दल न लिहीण्याची मी शपथ घेतली होती (स्वतःपुरतीच), तो म्हणजे पुणे शहरातील रस्त्यांची परिस्थिती व वाहतूक, अशावेळी लेखाची सुरुवात करण्यासाठी हे शब्द अतिशय चपखल वाटतात. वाहन उद्योगाचे जनक मानल्या गेलेल्या व्यक्तीशिवाय यासाठी दुसरे कोण अधिक योग्य असू शकते? परंतु मी फोर्ड यांचे शब्द त्यांच्या वाहन उद्योगातील पार्श्वभूमीमुळे नव्हे तर त्यांचा कामविषयी दृष्टिकोन व दर्जाविषयीचा त्यांचा आग्रह यासाठी वापरले आहेत. मी रस्ते व वाहतुकीच्या विषयावर लिहीणार नाही अशी शपथ घेतली होती आणि त्याच कारण म्हणजे याविषयी खूप ठिकाणी लिहीण्यात आले आहे व तरीही दरवर्षी परिस्थिती अधिकच वाईट होत चालली आहे. त्यामुळे लेखक व वाचक या दोघांनाही होणारा मनस्ताप कशाला वाढवायचा असा विचार मी केला. परंतु मला झेनच्या एक गोष्ट आठवते की एक डॉक्टर होता जो जखमी सैनिकांना बरे करत असे व ते सैनिक जेव्हा पुन्हा लढायला जात तेव्हा त्यांना मरण पावलेले किंवा पुन्हा जखमी झालेले पाहून तो उद्विग्न होत असे. जेव्हा तो एका गुरूला त्याचे विचार बोलून दाखवतो तेव्हा तो गुरु डॉक्टरला समजावतो की त्याचे काम जखमींना बरे करणे हे आहे कारण तो डॉक्टर आहे, तर सैनिकाचे काम लढणे हे आहे, त्यामुळे त्याबाबत उद्विग्न होऊन कसे चालेल. त्यामुळे मीदेखील धीर एकवटला आणि पुण्यातील सर्वाधिक लिहील्या जाणाऱ्या विषयाबद्दल म्हणजे वाहतूक व रस्त्यांच्या परिस्थितीबद्दल लिहायचे ठरवले. त्यांचवेळी आपण इथे आणखी एका पैलूकडे दुर्लक्ष करत आहोत व तो म्हणजे पाऊस, बरेच जण म्हणतील की त्यात काय मोठेसे? पावसाळ्यामध्ये वाहतुकीची दैना होते हे आपण सगळे जाणतो व रस्तेही खराब होतात, ज्यामुळे जखमेवर मीठच चोळले जाते. परंतु हा विषय एवढा साधा नाही म्हणूनच मी त्याच्याकडे बोट दाखविले !

बहुतेक लोक वाहतुकीमुळे होणारा उशीर व गोंधळासाठी सार्वजनिक वाहतुकीला दोष देतील कारण ते महत्त्वाचे कारण आहे. परंतु बऱ्याच गोष्टी इतर पैलूंवरही अवलंबून असतात. वाहतुकीच्या कोंडीवर आगपाखड करणाऱ्या किती जणांनी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बससेवेसाठी वाट पाहण्याइतपत संयम दाखवला आहे किंवा अगदी अलिकडे मेट्रोने प्रवास करून पाहिला आहे, असा प्रश्न मला विचारावासा वाटतो. किंवा किती जण त्यांच्या ४ चाकी/ २ चाकी वाहनांऐवजी ऑटोरिक्षा किंवा ओला/उबर (खाजगी टॅक्सी) वापरतात असेदेखील आपण विचारले पाहिजे. यावर लोकांची उतावळी उत्तरे काय असतील हे मला माहिती आहे, आम्ही असे का करू, एवढी वाट कोण पाहील, सार्वजनिक बस वाहतूक एकदा पाहा, ती आम्ही वापरावी अशी अपेक्षा कशी करू शकता? तुमचे म्हणणे चूक आहे असे मी म्हणणार नाही, परंतु हा उतावीळपणाही वाहतुकीची कोंडी होण्याचे एक मुख्य कारण असू शकते, जे आपण रस्त्यावर अनुभवले आहे, ही देखील वस्तुस्थिती आहे, बरोबर? सार्वजनिक वाहतूक किंवा टॅक्सी किंवा रिक्षा न वापरण्याची शेकडो कारणे असतील, परंतु अशी कोणतीही वाहतूक व्यवस्था वापरण्यासाठी थोडी तडजोड स्वीकारावी लागते, जर संपूर्ण शहराला तडजोड करायची नसेल तर, अशा वृत्तीने वाहतुकीची समस्या कधीही सुटणार नाही हा माझ्या लेखाचा विषय आहे.

आता मुख्य विषयाकडे वळू तो म्हणजे रस्त्यांची परिस्थिती व वाहतुकीच्या वेगावर त्याचा परिणाम. रस्त्यांची दैना होण्याचे मुख्य कारण म्हणजे पावसाचे पाणी साचणे, त्यामुळे जर आपल्याला चांगले रस्ते हवे असतील, तर आधी आपण पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावायला शिकले पाहिजे. हे कदाचित अतिशय सोपे वाटू शकते, परंतु त्यासाठी अगदी सुरुवातीपासून नियोजनाची गरज आहे, जे होताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. आपल्या देशामध्ये शहराचा विकास आधी होतो व नंतर आपण रस्ते बांधतो अशी आपली कार्यशैली आहे. त्यामुळे आपले रस्ते पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यात हमखास अपयशी ठरतात, जे होताना दिसत आहे. दरवर्षी पावसामुळे एखाद्या ठिकाणी पाणी साचते व पाणी मग ते वाहते असो किंवा साचलेले, कोणत्याही बांधकामाचा सर्वात मोठा शत्रू आहे (मग ते अगदी काँक्रिटचे असले तरीही). ज्या ठिकाणी पाणी वाहते असते तिथेही पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्याचा पृष्ठभाग वाहून जातो. म्हणूनच रस्त्यांवर खड्डे पडू नयेत यासाठी आपण या पाण्याचा प्रवाह कमी केला पाहिजे, पण आपण त्या संदर्भात काहीच करत नाही. वेळोवेळी हे सिद्ध झाले आहे की पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी बंद गटारे पावसाच्या पाण्याचे स्वरूप बदलल्याने ते वाहून नेण्यास अपुरी आहेत व दुसरे म्हणजे आपण पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या बंद गटारांमध्ये (किंवा कुठेही) कचरा फेकत असल्यामुळे ती सतत तुंबतात. आपण पुणे महानगरपालिका/पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला प्रत्येक पावसाळ्यापूर्वी पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी गटारे साफ न केल्याबद्दल दोष देतो. परंतु ही गटारे स्वच्छ करण्याची गरजच का पडते असा प्रश्न मला विचारावासा वाटतो. याचे कारण म्हणजे या शहराच्या नागरिकांना ज्या वस्तू नको असतात त्या ते या पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या गटारांच्या अवतीभोवती टाकून देतात, ज्यामुळे महापालिकांचे काम आणखी अवघड होते. पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्या पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी असतात, परंतु दरवर्षी सफाई कामगारांना त्यामध्ये सोफा सेट (अर्थातच वापरता येणार नाही असा), मृत जनावर सुद्धा व अशा अनेक काहीबाही गोष्टी आढळतात. यामुळे तसेच या वाहिन्यांचा आकार अपुरा असल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर किंवा जिथे शक्य आहे तिथुन वाहते. याचे एकमेव कारण म्हणजे नागरिकांची निष्काळजी वृत्ती. पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचा आकार वाढवला तरीही त्या तुंबल्यावर पावसाळ्यात त्यांचा काहीही उपयोग होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. या शहरामध्ये, आपण आपल्या खुल्या नद्यांनाही सोडत नाही व त्यामध्ये कचरा फेकत राहतो (मी अतिक्रमणांचा उल्लेखही केलेला नाही), याचे प्रमाण इतके असते की शेवटी महानगरपालिकांना प्रत्येक पुलावर तुरुंगासारख्या जाळ्या  उभाराव्या लागतात म्हणजे नागरिक या नद्यांमध्ये कचरा फेकू शकणार नाहीत, त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्यांमध्येही कचऱ्याशिवाय दुसरे काय दिसेल अशी आपण अपेक्षा करू शकतो.

त्यानंतर पावसाचे पाणी रस्त्यावर वाहण्याचे आणखी एक महत्त्वाचे परंतु दुर्लक्षित कारण म्हणजे, सार्वजनिक असोत किंवा खाजगी आपण जमीनीच्या प्रत्येक तुकड्याचे काँक्रिटीकरण केले आहे. अनेक लोक मला विचारतात की, आपल्याकडे पावसाच्या पाण्याच्या संधारणासाठी नियम किंवा कोणत्याही बांधकामासाठी धोरण नाही का; त्यावर माझे उत्तर असते, आहे, परंतु आपल्याकडे वाहने चालवताना हेल्मेट घालणेही सक्तिचे आहे! कोण पाळतात ? यातला उपहास बाजूला ठेवा परंतु आपण कितीतरी गोष्टींविषयी बोलत असतो व पावसाच्या पाण्याचे संधारण हे त्यापैकी एक आहे. तोपर्यंत एकेदिवशी आपण पावसाच्या पाण्यात वाहून जाणार नाही तोपर्यंत आपण त्याची जिबात फिकीर करणार नाही. जे सध्या घडताना दिसत आहे, पावसामुळे आपले रस्ते खराब होत आहेत परंतु आपण ते स्वीकारत नाही. जर आपण पावसाचे बहुतांश पाणी जमिनीत शोषून घेतले तर रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी असेल, त्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबण्याचे किंवा पाणी वाहण्याचे प्रमाण कमी असेल व परिणामी रस्त्याच्या पृष्ठभागाचे नुकसानही कमी होईल, हे स्थापत्य अभियांत्रिकीच्या अगदी पहिल्या वर्षाला असलेला मुलगादेखील तुम्हाला सांगू शकतो. परंतु आपण सगळे अभियांत्रिकी क्षेत्रातले जाणकार मात्र पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनाच्या या तर्काकडे दुर्लक्ष करत आहोत. याचे कारण म्हणजे, आपल्या नागरी धोरणांनी निसर्ग व विकासाचे संतुलन राखण्याकडे दुर्लक्ष केले आहे, मग ते पाणी असो, हरित क्षेत्र असो किंवा जमीनीचा पृष्ठभाग, आपल्याला जर रस्ते चांगले करायचे असतील तर आपण यामध्ये सुधारणा केली पाहिजे. सर्व नवीन इमारतींमध्ये पावसाच्या पाण्याचे संधारण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) आवश्यक आहे, परंतु आपण त्याकडे व त्यातून काय परिणाम साध्य होत आहे यावर देखरेख करत आहोत का, असे करण्यासाठी आपल्याकडे कोणती व्यवस्था आहे? परिणामी, प्रत्येक विकसित प्रकल्पांच्या (काही अपवाद वगळता) परिसरातून लाखों लिटर पावसाचे पाणी बाहेर वाहून जाते. त्यानंतर आपल्या पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या एकतर तुंबलेल्या असतात किंवा अपुऱ्या असतात, त्यामुळे हे पाणी कुठे जाईल, या प्रश्नाचे उत्तर कुणाला मिळाले आहे का, तर रस्त्यावर हेच उत्तर आहे !

याचे खरे उत्तर म्हणजे पाणी नेहमी आपली वाट शोधत गुरुत्वाकर्षामुळे सखल भागांमध्ये जाईल. या प्रश्नाचे उत्तरही विज्ञानाचा अभ्यास करणारा एखादा मुलगाही देऊ शकेल, परंतु आपण या साध्या विज्ञानाचा स्वीकार करण्यास तयार नाही. माझ्या सोसायटीच्या मागे एक नाला आहे (जो पूर्वी ओढा होता). पुणे महानगपालिकेच्या सांडपाणी विभागाने अलिकडेच आमच्या तसेच शेजारच्या सोसायटीला आमच्या कुंपणाच्या भिंती तोडू देण्याची विनंती केली, जेणेकरून त्यांची यंत्रसामग्री साफसफाईसाठी नाल्यामध्ये जाऊ शकेल. ही परिस्थिती कशी निर्माण झाली याचा कुणीही विचार करत नाही कारण या नाल्याच्या अनेक किलोमीटरच्या पट्ट्यात त्याला लागून असलेल्या इमारतींच्या कुंपणाच्या भिंती आहेत, ज्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही तिथपर्यंत पोहोचणे अवघड होते, अशावेळी पावसाचे पाणी त्या दिशेने कसे वाहून जाईल. इथेही आपण असंख्य वैध - अवैध बांधकामांद्वारे पावसाचे पाणी वाहून जाण्याचा असा प्रत्येक नैसर्गिक मार्ग अडवून टाकला आहे व परिणामी आता वाहण्यासाठी मार्ग शोधणे आपण पाण्यावरच सोपवले आहे, जे सरतेशेवटी होईलच. माझ्यावर विश्वास ठेवा आपण खरोखरच पाण्याच्या बाँबवर बसलोय! आमच्या इमारतीबाहेर असलेला हा नाला शहरातील हजारो अशा पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांपैकी एक आहे जे काही दशके पूर्वीपर्यंत पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे काम करत असत. विकसित परिसरांमधून पावसाचे जे काही पाणी बाहेर येत असे ते एकतर जमीनीमध्ये झिरपत असे किंवा अशा नैसर्गिक ओढ्यांमार्फत वाहत जाऊन नदीला मिळत असे. आता या सर्व स्रोतांमध्ये काही अडथळा आला आहे किंवा अतिक्रमणे झाली आहेत व पाणी वाहून नेण्याचे काम आता रस्ते करत आहेत, हेच पावसाळ्यामध्ये रस्ते खराब होण्यामागचे मुख्य कारण आहे.

शेवटचा परंतु अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागातील हरित क्षेत्र कमी होत आहे, त्यामुळेही रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहण्याचे प्रमाण वाढले आहे. आपण मोठी झाडे लावता येतील अशा आणखी जागा तयार केल्या पाहिजेत व त्यांची मुळे जमीनीमध्ये पावसाचे पाणी शोषून घेतील. आपण रस्तांवर मोठ-मोठे दुभाजक बांधतो व त्यांच्यामध्ये झाडे लावतो. परंतु त्यांच्या मुळांपर्यंत कधी पावसाचे पाणी पोहचतच नाही त्याचे काय. झाडांचे हे जे काम आहे त्या पैलूविषयी कोण विचार करत आहे, पुन्हा एकदा उत्तर आहे, कुणीही नाही. या सर्व समस्या पुरेशा नसतील तर रस्त्यावर प्रत्येक ज्ञात व अज्ञात कारणांसाठी वर्षभर रस्ते खोदण्याचे काम सुरू असते व या प्रक्रियेमध्ये रस्त्याचे पृष्ठभाग खराब होतात. यामागची कारणे सरकारी विभागांधील समन्वयाचा अभाव तसेच संबंधित सेवांचे ढिसाळ नियोजन हे असू शकतात, परंतु ही रस्त्याच्या पृष्ठभागासाठी एक महत्त्वाची समस्या आहेसरतेशेवटी, एखाद्या रस्ते विभागाला याचा दोष स्वीकारावा लागतो परंतु आपण सर्वजण या ना त्या मार्गाने रस्त्यावरील खड्ड्यांना, रस्त्यांच्या स्थितीला व वाहतुकीच्या कोंडीला जबाबदार आहोत हा माझ्या लेखाचा विषय आहे.

शहराने (म्हणजेच सरकार/नियोजनकर्ते/नागरी संस्थांनी) रस्त्यांच्या पृष्ठभागांवर खुल्या गटारांद्वारे पावसाचे पाणी वाहून नेणारी यंत्रणा विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच काँक्रिटच्या रस्त्यांना योग्य उतार दिला पाहिजे, तसेच नैसर्गिक जलस्रोतांमधील अडथळे दूर केले पहिजेत, म्हणजे ते हे पावसाचे पाणी (वाहून जाणारे) नद्यांपर्यंत नेऊ शकतील, जे काही दशके पूर्वीपर्यंत होत असे. रस्त्याच्या कडेला जमीनीवर झाडांसाठी पुरेशी जागा सोडा म्हणजे पाणी जमीनीमध्ये झिरपू शकेलत्याचवेळी नवीन तसेच पूर्ण झालेल्या प्रत्येक प्रकल्पासाठी पावसाच्या पाण्याचे संधारण परिणामकारकपणे होईल याकडे लक्ष ठेवा (आपण आशा तरी ठेवू शकतो), म्हणजे पावसाचे कमी पाणी रस्त्यांवरून वाहील. विकासाच्या या पैलूसाठी विकास नियमांमध्ये बदल करा व हे वेगाने करा म्हणजे वाहनतळासाठी आणखी जागा मिळावी या हव्यासापोटी आपण जमीन खणणार नाही, किंबहुना त्याऐवजी ते वर बांधा म्हणजे जमीनीला तिचे काम करता येईल, म्हणजेच पावसाचे पाणी शोषून घेणे व झाडांना आधार देणे. सार्वजनिक वाहतूक सशक्त करणे ही उपाययोजना काही एका रात्रीत राबवता येणार नाही, तसेच नागरिकांचा जीवनाविषयीचा दृष्टिकोन कसा आहे यावरही ते अवलंबून आहे, परंतु रस्त्यावरील खड्डे वाहतुकीचा खोळंबा होण्यासाठीचे कारण होऊ नयेत. स्मार्ट शहरासाठी हे नक्कीच भूषणावह नाही व एकमेकांकडे बोटे दाखवून दोषारोप करून ते साध्य होणार नाही तर एकमेकांना सहकार्य करूनच ते साध्य होईल; एवढे सांगून निरोप घेतो!

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी -  smd156812@gmail.com