Thursday 15 February 2024


व्याघ्र प्रकल्प, लहान मुले आणि वाघांचे भवितव्य !















हे जग अधिक चांगले बनविण्यासाठी लहान मुलांच्या कुतुहलतेच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे म्हणजे आशा…”

    हे माझेच अवतरण आहे व मी जेव्हा वाघांचे संवर्धन व आपल्यासाठी त्याचे महत्त्व या विषयावरील माझे व्याख्यान संपवले तेव्हा माझ्यासमोर बसलेले चेहरे पाहून मला हेच जाणवले. संभाजीनगर (औरंगाबाद) येथील महाराष्ट्र पब्लिक स्कूलच्या जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांसमोर बोलताना माझ्या मनात याच भावना होत्या. तुम्हाला जर असे वाटत असेल की हा मला वाघांविषयी वाटणाऱ्या तळमळीतून लिहीलेला अजुन एक भावनिक लेख आहे, तर तुमचे तसे करणे चुकीचे नाही. परंतु मला वाघांविषयी काय वाटते याविषयी हा लेख नाही, तर त्या मुलांना माझ्या वाघांविषयीच्या सादरीकरणानंतर काय वाटले याविषयी हा लेख आहे व मला असे वाटते ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे कारण त्यांच्या वाघांविषयीच्या भावना त्यांच्या प्रश्नांमध्ये दिसून येत होत्या व हे प्रश्न जणू एखाद्या नदीला पूर यावा किंवा समुद्रामध्ये त्सुनामी निर्माण व्हावी तसे होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याआधी मला तुम्हाला त्याविषयी थोडीशी पार्श्वभूमी सांगाविशी वाटते, जंगल बेल्समध्ये (हेमांगी वर्तक व आरती कर्वे व त्यांचा चमू) महिला व लहान मुलांना वन्यजीवनाविषयी जागरुक करण्याचे काम करतो व त्यासाठी विविध उपक्रम राबवतो. त्यापैकी एक उपक्रम म्हणजे आपल्या व्याघ्र प्रकल्प ह्या संकल्पनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपल्या राष्ट्रीय प्राण्याविषयी म्हणजे वाघाविषयी एक ध्वनी चित्रफित आम्ही सादर करतो (व्याघ्र प्रकल्प काय आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर कृपया गूगल करा). या उपक्रमांतर्गत जंगल बेल्सचा चमू विविध शाळा/शैक्षणिक संस्थांमध्ये जातो (आपल्या स्वतःच्या खर्चाने) व त्यांना एकूणच व्याघ्र प्रकल्पाविषयी व त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व याविषयी समजून सांगतो व वन्यजीवनाचे संवर्धन करणे ही केवळ वन विभाग किंवा स्वयंसेवी संस्थांची जबाबदारी नसून वन्यजीवन संवर्धन ही मुलांचीही जबाबदारी आहे याची त्यांना जाणीव करून देतो.

       अलिकडेच जंगल बेल्सच्या चमूला महाराष्ट्र पब्लिक स्कूल, संभाजीनगर (औरंगाबाद) येथून आमंत्रण आले, मी देखील या चमूसोबत जाण्याची संधी घेण्याची दोन कारणे होती, एक म्हणजे या चमूचे नेतृत्व करणाऱ्या हेमांगीला घरच्या काही जबाबदाऱ्यांमुळे प्रवास करणे शक्य होणार नव्हते व दुसरे कारण म्हणजे श्रोते 2री ते 9वी पर्यंतच्या म्हणजे सात ते पंधरा वयोगटातील जवळपास पाचशे मुले होती. त्याच्यासमोर एकाचवेळी बोलणे हे एक आव्हान होते. मुख्याध्यापिका सौ. इप्सिता चौधरी यांनी स्वतः बऱ्याच जंगलांना भेट दिली होती हे समजल्यानंतर मला खरोखरच अतिशय आश्चर्य वाटले व या उपक्रमाविषयी त्या व इतर कर्मचारी अतिशय उत्साही होते. मी तुम्हाला सादरीकरणाविषयी सांगत बसणार नाही कारण तुम्ही ते लेखाच्या शेवटी दिलेल्या यूट्यूबच्या दुव्यावर तुम्ही ते पाहू शकता, परंतु या सादरीकरणानंतर जे प्रश्नोत्तराचे सत्र झाले तो या कार्यक्रमाचा सर्वात रोचक भाग होता. मुले (सगळीच्या सगळी) सादरीकरण शांतपणे व लक्ष देऊन ऐकत होती व पाहात होती (जी अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे). वाघांविषयी प्रश्न विचारण्यासाठी ती अतिशय उत्सुक होती व मी खरोखरच त्यातील काही प्रश्न ऐकून थक्क झालो. आपण अशाप्रकारे शिक्षणाद्वारेच शिकतो व मला असे वाटले ही प्रश्नोत्तरे जर लेखाच्या स्वरूपात दिली तर संवर्धनामध्ये लहान मुलांच्या बुद्धिची ताकद काय असू शकते याची जाणीव इतरांना करून देता येईल, चला तर मग ही प्रश्नोत्तर पाहू

१.      १. तुम्ही वाघ पाळू शकता का?

हा प्रश्न अतिशय नैसर्गीक होता व केवळ एक लहान मूलच असा प्रश्न गोड पण अवघड विचारू शकते. मी त्याला सांगितले की तुम्ही वाघ नक्कीच पाळू शकता, परंतु तुमचे तुमच्या पाळीव प्राण्यावर प्रेम असेल व त्याची काळजी असेल व तो आनंदी असावा असे तुम्हाला वाटत असेल, तर त्याला जे हवे आहे ते तुम्ही केले पाहिजे व वाघाला तर जंगलात राहावेसे वाटते म्हणुन तुम्ही वन अधिकारी म्हणून किंवा वन्यजीवनामध्ये करिअर घडवू शकता व त्यानंतर तुम्ही वाघ पाळू शकता म्हणजेच नेहमी त्यांच्यासोबत राहू शकता व त्यांचे रक्षण करून त्यांची काळजी घेऊ शकता!

१.    २. तुम्हाला वाघांच्या संवर्धनाची प्रेरणा कशी मिळाली?

यावर मी असे उत्तर दिले की मी विदर्भाचा आहे, जेथे फार पूर्वीपासून जंगले व वाघ दोन्ही अस्तित्वात आहेत, त्यामुळेच मला माझ्या सुदैवाने लहानपणापासूनच जंगलात वाघ पाहता आला व मी त्याच्या प्रेमातच पडलो. हे दृश्य असे असते की क्वचितच एखादा त्याच्या प्रेमात पडणार नाही व तुम्ही जे काही पाहता त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळते. मलाही वाघांविषयीची प्रेरणा अशाचप्रकारे मिळाली व म्हणूनच जंगलात जाणे आवश्यक आहे, म्हणजे प्रेरणा मिळू शकेल!

३. ताडोबातील लोक वाघाला घाबरत नाहीत का, तो त्यांना खात नाही का?

हा प्रश्न थोडासा चक्रावून टाकणारा होता, आता जो तुम्हाला गट्टम करू शकतो अशा प्राण्यावर तुम्ही प्रेम करा हे तुम्ही कसे समजावून सांगणार? मी त्यांना सांगितले की औरंगाबादमध्ये दररोज दोन/तीन माणसे दुचाकी/चारचाकीच्या अपघातात मरण पावतात व पुण्यामध्ये हाच आकडा पाच ते सहा एवढा आहे. परंतु म्हणून आपण रस्त्यावर चालणे किंवा दुचाकी किंवा सायकल चालवणे थांबवतो का, तर त्याचे उत्तर नाही असे होते. मी त्यांना सांगितले की, ज्याप्रमाणे आपण व्यवस्थित काळजी घेतो व जगायला शिकतो, तेच आपण वाघांच्या बाबतीत करतो, आपण सुरक्षित अंतर ठेवले व जंगलाच्या नियमांचे पालन केले, तर आपल्याला वाघांची भीती बाळगळण्याचे कारण नाही, ताडोबातील लोक हे शिकले आहेत, म्हणुन त्यांना वाघाची भिती वाटत नाही.

४. तुम्ही वाघाचे वय कसे मोजता?

वाघांचे वय त्याच्या शरीरावरील पट्ट्यांवरून तसेच पावलांच्या ठशांवरून मोजले जाते व जंगलामध्ये सातत्याने निरीक्षण करून हे केले जाते!

. वाघीण जेव्हा दुसरा वाघ (नर) तिच्या बछड्यांना मारतो तेव्हा तिच्या बछड्यांसाठी लढत का नाही?

हा प्रश्न अतिशय मनोरंजक होता कारण मी त्यांना नर वाघ दुसऱ्या नर वाघांच्या बछड्यांना मारतो असे साधे सांगितले होते. मी उत्तर दिले की वाघीण ही अतिशय धाडसी आई असते, अगदी या मुलांच्या आईसारखीच, ती नर वाघ तिच्यापेक्षा मोठा व अधिक ताकदवान असूनही पूर्ण शक्तीनिशी त्याच्याशी लढते, परंतु तिला काहीवेळा स्वतःचा जीव वाचविण्यासाठी माघार घ्यावी लागते म्हणजे ती आणखी बछड्यांना जन्म देऊ शकेल!

. वाघ वेगाने का धावू शकत नाही?

मी त्यांना सांगितले होते की वाघाचे नशीब असेल तर तिसाहून अधिक प्रयत्न केल्यानंतर त्याला हरिण किंवा रानडुकराची शिकार करण्यात यश मिळते, त्यामुळे हा प्रश्न विचारण्यात आला. यावर मी म्हणालो, हे साधे-सरळ भौतिकशास्त्र आहे, जर वाघ वेगाने धावू शकत असता तर त्याचे वजन कमी असते, तर मग हरिण किंवा रानडुकराची शिकार करण्यासाठी लागणारी ताकद कुठून आली असती? म्हणूनच वाघाचे वजन जास्त असते व तो वेगाने धावू शकत नाही, अशाप्रकारे निसर्ग प्रत्येक प्रजातीची रचना एका विशिष्ट हेतूने करतो!”

. माया वाघीण आकाराने किती मोठी आहे?

इथे, मी जरा अडखळलो परंतु मी जरा तर्कसंगत विचार करून अंदाज बांधला व म्हणालो नाकापासून ते शेपटीपर्यंत जवळपास ११ फूट व वजन अंदाजे १७० किग्रॅ! (व माझा अंदाज जवळपास बरोबर होता)

. जंगलातल्या वाघांना नाव देणे बंधनकारक असते का?

मी माझ्या सादरीकरणामध्ये वाघांना दिलेल्या नावांचा उल्लेख करत असल्यामुळे उत्सुकतेपोटी हा प्रश्न विचारण्यात आला होता. मी त्यांना सांगितले की, वाघांची संख्या मोजण्यासाठी त्यांना टॅग लावणे आवश्यक असते, वन विभाग वाघांना टी१, टी१२ इत्यादी संख्यांनी ओळखतो, परंतु स्थानिक त्यांच्या सोयीनुसार किंवा एखाद्या गोष्टींशी त्यांच्या साधर्म्यानुसार त्यांना नावे देतात. उदाहरणार्थ एका नर वाघाला मटकासूर असे नाव देण्यात आले होते कारण त्याचे डोके मटक्यासारखे (माठासारखे) होते!

. वाघ सिंहांसारखे कळपात किंवा समूहात का राहात नाहीत?

हा खरोखर विचार करायला लावणारा प्रश्न होता व त्या लहान मुलाला माहिती नव्हते की हा वन्यजिवनाच्या सध्याच्या अभ्यासाचा विषय आहे कारण त्याचा संबंध वाघांच्या जगण्याच्या सहजप्रवृत्तीशी आहे. अर्थात मी त्यांना सांगितले की, प्रत्येक प्रजातीचा एक स्वभाव असतो व आपल्याकडे ज्याप्रकारची जंगले आहेत त्यामुळे वाघासारख्या मोठ्या प्राण्यांना तसे राहणे शक्य होत नाही. कोरड्या व उष्ण प्रदेशातील गवताळ भागासारख्या जंगलांमध्ये ते सोपे असते, त्यामुळे सिंह तशाप्रकारे राहतात!

१०. आपण वाघाला वाचवण्याचा प्रयत्न करत असलो तरीही ते आपली शिकारच करतात, आपल्याला त्यांचे रक्षण कसे करता येईल?

हा पुन्हा एकदा मूलभूत संवर्धनाविषयीची उत्सुकता, गैरसमजुती किंवा मिथकांवर आधारित प्रश्न होता. त्यावर मी उत्तर दिले की, वाघ माणसांची शिकार करतात हे चूक आहे, कारण अन्नासाठी आपण त्यांची पहिली पसंती नसतो, बहुतेकवेळा अपघाताने किंवा नैसर्गिक शिकार मिळविण्यात असमर्थ असल्यामुळे वाघ माणसांची शिकार करतो, जे त्यांना समजले!

११. जगामध्ये किती वाघ आहेत?

मी त्यांना सांगितले की, जंगलांमध्ये जवळपास पाच ते सहा हजार वाघ आहे परंतु तो एक अंदाज आहे. जंगलांचा प्रचंड विस्तार पाहता, तसेच वाघांची प्रगणना करण्यातील मर्यादा विचारात घेता त्यांची नेमकी संख्या सांगणे अवघड काम आहे. उदाहरणार्थ सैबेरियातील वाघाचा वावर १००० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात असतो, त्यामुळे जगातील सर्व वाघ मोजणे जवळपास अशक्य काम आहे!

१२भारतामध्ये, कोणत्या राज्यात सर्वाधिक वाघ आहेत?

यावर, मी अंदाजे उत्तर दिले ज्यानुसार मध्यप्रदेशचा पहिला क्रमांक, महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक व त्यानंतर कर्नाटक व आंध्र-प्रदेशचा क्रमांक असल्याचे सांगितले.

१३. जर जुळे बछडे असतील व दोघेही दिसायला सारखे असतील तर तुम्ही त्यांना कसे ओळखाल व त्यांचे नामकरण कराल?

लहान मुलांनी त्यांच्या बालसुलभ स्वभावानुसार विचारलेला हा प्रश्न होता, ज्यावर आम्ही सगळेच हसलो, परंतु तो अतिशय मनापासून विचारलेला होता. मी त्यांना समजून सांगितले की बछडे मोठे होतात तसे त्यांच्या पट्ट्यांचे स्वरूप बदलत जाते, ज्याप्रमाणे माणसांची जुळी असली तरीही त्यांच्या बोटांचे ठसे वेगळे असतात, त्यामुळे आपण त्यांच्यात फरक करू शकतो!

१४. वाघाची छायाचित्रे कशी काढायची? तुम्ही छायाचित्रे काढत असताना वाघ तुम्हाला न्याहाळत असतो का?

मी त्यांना सांगितले की तुम्हाला वाघाचे छायाचित्र काढताना अतिशय संयम ठेवावा लागतो व जंगल तुम्हाला हेच शिकवते कारण तिथे सगळे काही वाघाच्या इच्छेनुसारच होते व हो तुम्ही वाघाची छायाचित्रे काढत असताना त्याला त्याची जाणीव असते व तुम्ही नेहमी त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून ती काढली तर वाघाची काही हरकत नसते!

१५. भविष्यात वाघ कसे जिवंत राहतील?

 एका दहा वर्षांच्या मुलाने विचारलेला हा प्रश्न सर्व प्रश्नांमधील सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, त्यावर मी उत्तर दिले की मुलांनो त्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत व तुम्ही सगळे या प्रश्नाचे उत्तर आहात. वाघ जिवंत राहण्यासाठी आमच्याकडे केवळ तुम्ही सगळे हेच एकमेव उत्तर आहात. तुम्हा सर्वांना वाघाचे महत्त्व समजले व त्यांचे नैसर्गिक स्वरूपात रक्षण केले पाहिजे असे तुम्हाला वाटले तरच वाघ जिवंत राहतील असा विश्वास मला वाटतो.

   असे उत्तर देऊन, मी सत्र संपवले परंतु त्यानंतरही जवळपास तीस एक विद्यार्थी हात उंचावून प्रश्न विचारण्यासाठी इच्छुक होते. मी मुख्याध्यापिका इप्सिता मॅडम यांना विनंती केली की त्यांचे प्रश्न नोंदवून घ्या व मला ईमेल करा व मी त्यांना उत्तर देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी त्यानंतर अतिशय आनंदाने व समाधानाने शाळेच्या परिसरातून बाहेर पडलो, वाघांच्या संवर्धनासाठी कदाचित सर्वात महत्त्वाचे साधन घेऊन, ते म्हणजे आशा

       मी पुण्याला परत आल्यानंतर, मला आणखी ईमेलद्वारे काही प्रश्न पाठवण्यात आले होते, जे शाळेच्या सूचना पेटीमध्ये जमा झाले होते, मी ते प्रश्न व त्यांना मी दिलेली उत्तरेदेखील येथे देत आहे…

* वाघावर संशोधन करणारी पहिली व्यक्ती कोण होती?

संस्कृती पवार (५वी अ)

अनौपचारिकपणे, श्री. जिम कॉर्बेट ही वाघांवर संशोधन करणारी पहिली व्यक्ती होती. त्यांनी जवळपास शंभरएक वर्षांपूर्वी हिमालयाच्या जंगलांमधील नरभक्षक वाघांची शिकार करण्याच्या त्यांच्या कामाच्या प्रक्रियेत वाघांचा अभ्यास केला. हा त्यांनी शैक्षणिक अभ्यास म्हणून केला नाही, परंतु त्यांनी वाघांचे निरीक्षण करताना जे काही अनुभवले त्या सर्वाची नोंद करून ठेवली. वाघांच्या वर्तनाचा विचार करता ती आजही खरी आहे. त्यानंतर डॉ. उल्हास कारंथ, डॉ. वाल्मिक थापर, श्री. राजेश गोपाल वगैरे लोकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाघांचा अभ्यास केला व आता आपल्याला वाघांविषयी बरीच माहिती आहे, म्हणूनच आपण वाघांची संख्या वाढवू शकलो आहोत!

* केवळ वाघिणीच बछड्यांचे रक्षण का करतात?

(५वी क)

कारण तो वाघांचा स्वभाव आहे, निसर्गाने त्यांची रचनाच तशा प्रकारे केली आहे, ते कुटुंबासोबत राहात नसल्यामुळे जोपर्यंत बछडी स्वावलंबी होत नाहीत, कुणीतरी त्यांची काळजी घेणे आवश्यक असते व हे काम आई करते. ती काही महिन्यांची होईपर्यंत ती त्यांना दूध देते व त्यानंतर तिचे क्षेत्र नर वाघांच्या तुलनेत लहान असते, ज्यामुळे ती अधिक चांगल्याप्रकारे शिकार करू शकते. बछडी दोन वर्षे व त्याहून मोठी झाल्यानंतर वाघीणही बछड्यांना तिच्यासोबत ठेवत नाही व तिच्या क्षेत्रातून हुसकावून लावते!

* रॉयल बेंगाल वाघ व सैबेरियन वाघ यांच्यात काय फरक आहे?

(५वी अ)

रॉयल बेंगाल वाघ भारतात सापडतो व आकाराने लहान असतो. त्याचा साधारण पन्नास चौरस किलोमीटर क्षेत्रात वावर असतो. तर सैबेरियन वाघ आकाराने व ताकदीने मोठा असतो. त्याचे क्षेत्र पाचशे चौरस किलोमीटरपेक्षाही अधिक असते व बेंगाल वाघापेक्षा त्याचा रंग हलका असतो, ज्यामुळे तो बर्फाच्या पार्श्वभूमीमध्ये सहजपणे मिसळुन जाऊ शकू शकेल! सैबेरियाच्या वाघांचे डोके व जबडाही अधिक मोठा असतो, तसेच तेथील थंडीपासून संरक्षण करण्यासाठी अंगावर अधिक दाट केस असतात.

* जगभरात किती वाघ आहेत?

त्रिशा लाहोटी (५वी अ)

मी माझ्या व्याख्यानामध्ये जगभरात साधारण सात हजाराहून अधिक असतील किंवा असू शकतात असा उल्लेख केला होता व माझ्या माहितीप्रमाणे जगभरातील एकशे ऐंशी देशांपैकी केवळ आठ देशांमध्ये वाघ आढळतात, ज्यामध्ये रशिया, चीन, इंडोनेशिया, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांग्लादेश व भारताचा समावेश होतो. मी म्हटल्याप्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनही आपल्या देशातील सर्व वाघ मोजणे अतिशय अवघड असते, त्यामुळे नेमक्या आकडेवारीमध्ये दहा ते वीस टक्क्यांचा फरक असू शकतो.

* तुम्ही आयोजित करत असलेल्या सहलींना कसे येता येईल? 

तुम्ही जंगल बेल्सला त्यांच्या ईमेलवर तसेच दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकता, junglebelles.pune@gmail.com / http://junglebelles.com  / ०७७५६०८१९२२

* सर्व वाघांचे अंदाजे वय किती असते?

विराज मोतिंगे (५वी क)

जंगलातील वाघांचे अंदाजे वय चौदा ते पंधरा वर्षे असते व पिंजऱ्यातील (म्हणजे प्राणी संग्रहालयातील) अठरा ते वीस वर्षे असते.

* काही लोक वाघ पाळतात, तर तो वाघ विकणाऱ्या विक्रेत्याचे वागणे चूक आहे की बरोबर?

शेख साद अहमद (५वी अ)

तुम्ही वाघाला पाळीव बनवू शकत नाही, कारण निसर्गतःच तो वन्य प्राणी आहे, अशी काही उदाहरणे आहेत म्हणजे थायलंडच्या बौद्ध मठांमध्ये पाळीव वाघ आहेत परंतु असे म्हणतात की त्यांना गुंगीची औषधे दिली जातात. आपल्या देशामध्ये वाघ पाळणे किंवा त्याला खाजगी मालकीत ठेवण्यास कायद्याने परवानगी नाही व तो गंभीर गुन्हा आहे.  

     तुम्ही संपूर्ण सादरीकरण प्रश्नोत्तरांसहित खालील यूट्यूब दुव्यावर पाहू शकता व इतर मुलांना जागरुक करण्यासाठी त्यांनाही सांगा…..

https://youtu.be/9XEor1L_VVY?si=CcvFbElB33K6YRsE   (presentataion)

https://youtu.be/CHeHr8rWyyM?si=ZxdbPQlvlhoivMj2     (Q & A)

 

संजय देशपांडे

smd156812@gmail.com




























 

Tuesday 13 February 2024

जंगल बेल्स, 














महिलांनी महिलांसाठी चालविलेली वन्यजिव संवर्धनाची चळवळ !.. 💃🏻👧🏻🐾🌱

    जर तुम्ही फेसबुक किंवा ईन्स्टाग्राम मेंबर असाल तर तुम्ही समाज माध्यमे किंवा वन्यजीवनाची छायाचित्रे काढणाऱ्या छायाचित्रकारांच्या समूहात पाहिले तर या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या १०० छायाचित्रांपैकी ९५ छायाचित्रे पुरुषांनी काढलेली असतात कारण बहुतेक नामांकित वन्य छायाचित्रकार पुरुषच आहेत. आपण विसरतो की वन्यजीवन म्हणजे केवळ वाघांची छायाचित्रे काढणे नव्हे तर ते त्यापेक्षाही बरेच काही असते. वन्यजीवन समजून घेण्यासाठी तुम्ही जंगलास भेट देणे आवश्यक आहे. तुम्ही कधी जंगलात गेलाच नाही तर तुम्ही त्यावर प्रेम कसे कराल व तुमचे जंगलावर प्रेम नसेल तर तुम्ही त्याचे संवर्धन कसे कराल असा प्रश्न मी लोकांना नेहमी विचारतो. या पार्श्वभूमीवर जेव्हा एखादी पत्नी, आई, मैत्रीण, आजी जंगलाला भेट देईल, त्याचे महत्त्व समजून घेईल, तेव्हाच ती जंगलाविषयी व वन्यजीवनाच्या संवर्धनासाठी आपण काय करणे आवश्यक आहे याविषयी तिचा भाऊ, मुलगा, पती व मित्रांना समजून सांगू शकेल. असे झाले तरच जंगलांच्या संवर्धनासाठी तसेच ज्या मुलामुळे, वडिलांमुळे, पतीमुळे किंवा मित्रांमुळे (म्हणजेच पुरुषांमुळे) अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्या वाचण्याची थोडीशी आशा आहे! 

     जंगलाची सफर करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे शहरातील धकाधकीच्या जीवनापासून, घरातील दैनंदिन कामांपासून व कधीही न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांपासून लांब गेल्याने महिलांना मानसिक तसेच शारीरिक विसावा मिळतो, ही दुसरी बाजूही अतिशय महत्त्वाची आहे. याचसाठी हेमांगी वर्तक व आरती कर्वे यांनी स्थापन केलेली जंगल बेल्स ही संस्था विशेष आहे, ही प्रामुख्याने महिलांसाठी स्थापन करण्यात आलेली संस्था आहे जी त्यांना केवळ जंगलाविषयीच्या नव्हे तर स्वतःविषयीच्या त्यांच्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव करून देते. जेव्हा त्या दोघींनी जंगल बेल्सची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचा मित्र म्हणून व वन्यजीवप्रेमी म्हणून माझ्या कंपनीच्या म्हणजेच संजीवनीच्या माध्यमातून त्यात खारीचा वाटा उचलता येईल म्हणून मला अतिशय आनंद झाला. ही संस्था महिलांना स्वतः जंगलात जाता यावे यासाठी, तुम्ही त्याला लेडीज स्पेशल म्हणा हवे तर, आवश्यक त्या सर्व सेवा उपलब्ध करून देते. खरेतर या दोघी महिला, समाजाच्या उच्चभ्रू वर्गात मोडतात, ज्या इतरांप्रमाणेच केवळ जंगलाला भेट देऊन समाधान मानू शकल्या असत्या व त्यांच्या सफारींची छायाचित्रे इन्स्टाग्राम अथवा फेसबुकवर टाकून मित्र-मैत्रीणींकडून वाहवा मिळवू शकल्या असत्या. परंतु त्यांनी तेवढ्यावरच समाधान न मानता आणखी काहीतरी करायचा निर्णय घेतला कारण त्यांना केवळ जंगलाबद्दल प्रेमच नाही तर त्यांना जंगलावरील त्यांच्या प्रेमाला योग्य दिशा द्यायची आहे व जंगलांसाठी काहीतरी करायचे आहे. आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून इतर महिलांना जंगलाच्या सान्निध्यात घेऊन जाण्याशिवाय दुसरा आणखी चांगला मार्ग कोणता असू शकतो. जर एखाद्या महिलेने एखाद्या गोष्टीवर प्रेम करावे असे तुम्हाला वाटत असेल तर आधी तिला ती गोष्ट जाणून घेण्याची संधी मिळाली पाहिजे, ही साधी गोष्ट पुरुषांना कधीही समजत नाही व म्हणूनच या दोघी महिलांनी जंगल बेल्ससारखी संकल्पना मांडली!

     जंगल बेल्स केवळ महिलांना जंगलातच घेऊन जात नाही तर पुण्यासारख्या शहरामध्ये वन्यजीवन क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुप्रसिद्ध व्यक्तींच्या माध्यमातून जंगलालाही त्यांच्या दरवाजापर्यंत आणते. या व्यक्ती वन्य जीवनाविषयी त्यांनी केलेले काम, तसेच त्यांना वाटणारी तळमळ श्रोत्यांना (ज्या बहुतेक महिला असतात) सांगतात, यामुळे महिला व जंगलांमध्ये एक नाते निर्माण होऊ शकते. जंगल बेल्स पुण्यामध्ये वन्यजीवन प्रेमींसाठी व विशेषतः वन्यजीवप्रेमी नसलेल्यांसाठी गेली तीन  वर्षे  एक उपक्रम वेबीनार रुपाने राबवत आहे जो  कायम सुरू ठेवण्याचीही त्यांची योजना आहे. या माध्यमातून या क्षेत्रातील तसेच शहरातील लोकांसाठी एक सामाईक एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे ज्यामुळे दोन्हीकडच्या लोकांची एकमेकांशी ओळख होईल. यामध्ये वन विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे जे प्रत्यक्षात जंगलाचे संरक्षण करण्याचे काम करतात उदाहरणार्थ श्री. नितीन काकोडकर, आयएफएस, पीसीसीएफ (वन), नल्ला मुथ्थू व बेदी बंधूंसारखे वन्यजीव चित्रपट निर्माते, विक्रम पोतदार व मोहन थॉमस यांच्यासारखे वन्यजीवन छायाचित्रकार यांचा समावेश होतो. या यादीमध्ये लवकरच काही महिलांची नावेही समाविष्ट होतील, या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या कमी असली तरी ती आहे. किंबहुना पुण्याच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते जंगल बेल्सचे उद्घाटन करण्यात आले होते, ज्या पर्यावरणाविषयीच्या त्यांच्या जागरुकतेसाठी ओळखल्या जातात. तुम्ही जंगल महिलांच्या दरवाजापर्यंत घेऊन गेलात तरीही, महिलेला आपल्या दरवाजापर्यंत घेऊन जाणे अतिशय अवघड असते विशेषतः जेव्हा वन्यजीवन हा विषय असतो. याचे कारण म्हणजे दुर्दैवाने बहुतेक महिलांसाठी वन्यजीवन हे प्राधान्य नाही व जेव्हा महिलांना वन्यजीवनासंबंधीच्या एखाद्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाते तेव्हा त्या कार्यक्रमाला हजर राहण्याची शक्य तितकी सगळी कारणे त्या देतात (मग तो सुट्टीचा दिवस असो किंवा आठवड्याचे दिवस); उदाहरणार्थ, मुलांचा क्लास आहे, सुट्टी आहे त्यामुळे नवऱ्याला मी घरीच हवी, मला एका कौटुंबिक कार्यक्रमाला जायचे आहे, मला येण्या-जाण्यासाठी काहीच साधन नाही, आज माझी कामवाली बाईच आली नाही, माझ्या सासू-सासऱ्यांना बरे नाही, अशाप्रकारे ही यादी कधी संपतच नाही. या मोहिमेमध्ये आत्तापर्यंत महिला शक्तीचा हातभार लागला नसल्यामुळेच आपण जंगले व नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवू शकत नाही. यामुळेच जंगल बेल्सने निवडलेल्या संकल्पनेचा रस्ता अतिशय सोनेरी व महान वाटत असला तरीही प्रत्यक्षात मात्र तो एखाद्या जंगलातल्या वाटेपेक्षाही अधिक खडतर व थकवणारा आहे, कारण जंगल किंवा निसर्ग वाचवणे हे महिलांच्या हातात आहे याची जाणीव त्यांना करून देणे हे सर्वात कठीण काम आहे. तरीही हेमांगी व आरती (अनुज यांच्या मदतीने) यांनी या मार्गावरून जाण्याचे धाडस दाखवले व अजूनही त्या लढत आहेत, म्हणून त्या विशेष आहेत.

    आज 2024 मध्ये जंगल बेल्सची सुरुवात होऊन चार वर्षे उलटून गेली आहेत व आरतीला तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे परत अमेरिकेत जावे लागले, त्यामुळे सध्या हेमांगी सगळे कामकाज बघत असून, फक्त एक महिला सुद्धा समाजात केवढा बदल घडवून आणू शकते हे तिने दाखवून दिले आहे. चार वर्षांमध्ये, जंगल बेल्सचा आर्थीक ताळेबंद फार काही आकर्षक नसला तरीही त्यांनी वन्यजीवनासाठी दिलेले योगदान अतिशय मोठे आहे, मग शेकडो महिलांना निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाणे, त्यांना वन्यजीवनाचे व ‘स्वतःसाठी वेळ’ काढण्याचे महत्त्व समजून सांगणे, जंगलाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना शक्य त्या सगळ्या स्वरूपात मदत करणे (अगदी कोव्हिडच्या काळातही), ते वन्यजीवनासंदर्भात या क्षेत्रातील तज्ज्ञांचे (यामध्ये महिलांचाही समावेश होतो) पन्नासाहून अधिक वेबिनार आयोजित करणे, वन्यजीवनावरील माहितीपट तयार करणे, शाळकरी मुलांसाठी व्याघ्र प्रकल्पांविषयी जागरुकता आणणारी सादरीकरणे आयोजित करणे, सलग तीन वर्षांपासून केवळ महिलांसाठी वन्यजीवन छायाचित्रकारिता स्पर्धा आयोजित करणे, असे विविध उपक्रम जंगल बेल्स आयोजित करते व या यादीत सतत भरच पडत आहे. हे सगळे उपक्रम कोणतीही मोठी आर्थीक मदत अथवा एखाद्या कंपनीच्या प्रयोजकत्वाशिवाय, केवळ काही महिलांच्या संपूर्ण समर्पणामुळे व इच्छाशक्तीच्या जोरावर सुरू आहेत. 

     वन्यजीवनाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी, जंगल बेल्स अनेक आघाड्यांवर काम करत असून, त्यांना फारशी आर्थिक मदत मिळालेली नाही. तसेच केवळ महिलांसाठी काम करायचा निर्णय घेऊन त्यांनी बऱ्याच मोठ्या ग्राहक वर्गावर जणु पाणी सोडले आहे, कारण एखाद्या ऑनलाईन वेबिनारला गैरहजर राहण्यासाठीही महिलांकडे हजारो कारणे असतात मात्र जंगल बेल्स ती कारणे केवळ समजूनच घेत नाही तर अशा प्रत्येक कारणाचा आदर करते. मी वर सांगीतल्याप्रमाणे एका बाईची संसारामध्ये असंख्य प्राधान्ये असतात व या यादीमध्ये तिचा स्वतःचा क्रमांक सर्वात शेवटचा असतो, तरीही जंगल बेल्सचा चमू हार मानत नाही व महिलांना वन्यजीवनाविषयी समजून सांगण्यासाठी प्रयत्न करत राहतोय, ज्यामुळे त्या त्यांच्या मुलांना तसेच संपूर्ण कुटुंबाला जागरुक करू शकतील, यामुळेच वन्यजीवन संवर्धनासाठी आपल्याला अजूनही आशा आहे. जंगल बेल्सला अनेक जणांचा पाठिंबा मिळत आहे (संजीवनी समूहाव्यतिरिक्तसुद्धा) परंतु जेव्हा वन्यजीवनविषयक संस्थेला तेदेखील केवळ महिलांद्वारे चालविल्या जाणाऱ्या संस्थेला आर्थिक पाठिंबा देण्याची वेळ येते तेव्हा तो अनेक कॉर्पोरेट कंपन्या फारसा पुढाकार घेत नाहीत. अर्थात मगरपट्टा सिटीसारखे काही अपवाद आहेत ज्यांनी पुण्यातील वन्यजीवनाविषयी एक सुंदर माहितीपट बनविण्यासाठी सहकार्य केले, व या लघुपटात अलिकडेच लघुपटांवरील एका महोत्सवात सर्वोत्कृष्ट वन्यजिव लघुपटाचे पारितोषिक देखील मिळाले, त्याचशिवाय सोनी व चितळे फूड्स यांनीही मदत केली. परंतु आता जंगल बेल्ससारख्या उपक्रमांना आपण जास्तीत जास्त मदत करण्याची वेळ आता आली आहे कारण तो केवळ वन्यजीवनाविषयी नसून, महिलांनी महिलांसाठी चालवलेला उपक्रम आहे व हे अतिशय मोठे व धाडसाचे पाऊल आहे. एक जागरुक महिलाच संपूर्ण कुटुंबाचा दृष्टिकोन बदलू शकते, जी आजच्या युगाची गरज आहे, व त्यावरच वन्यजिवनाचे भवितव्य अवलंबुन आहे.

तुम्ही वन्यजीवन, सहली, जागरुकता अभियान, वेबिनार, किंवा आर्थिक मदत जंगलांसाठीच्या उपक्रमात, तुम्ही कशाप्रकारे योगदान देऊ शकता यापैकी कशाविषयीही विचारण्यासाठी जंगल बेल्सला  संपर्क करू शकता. 
...  junglebelles.pune@gmail.com / 

http://junglebelles.com  / call : 07756081922

हेमांगी वर्तक, जंगल बेल्स
09923558588



 संजय देशपांडे

smd156812@gmail.com