Tuesday 29 December 2020

गवा, संत ज्ञानेश्वर व स्मार्ट नागरिक!

 


















आपल्याभोवती असलेल्या वन्य पशुंना पाहून माणसाचे बरेचसे वर्तन समजून घेता येऊ शकते. ते प्राणी आपल्याला सतत आपल्याविषयी जगरहाटीविषयी शिकवत असतात, मात्र बहुतेक लोक त्याकडे काणाडोळा करतात किंवा ऐकत नाहीत.”... सुझी कासीम  

 

सुझी कासीम या एक इजिप्शियन वंशाच्या अमेरिकी लेखिका, कवयित्री, तत्ववेत्त्या अष्टपैलू कलाकार आहेत. त्या कैरोतील १९व्या शतकातील सुप्रसिद्ध संतांची नात आहेत. म्हणूनच यदा कदाचित तत्वज्ञा त्यांच्या रक्तात नाईल नदीच्या पाण्याप्रमाणे वाहते त्याचप्रमाणे गूढवाद विद्वत्ताही त्यांच्या अंगातच आहे.  नाईल नदी विषयी उल्लेख मला विकीपिडीयावरून मिळाले. या लेखाची सुरूवात करताना माझे मन अतिशय बधीर झाले होते आहे, अशावेळी त्यांचे वरील शब्द माझ्या मदतीला आले. आता तुम्ही विचारात पडला असाल की माझे मन बधीर का झाले आहे (आजकाल बरेचदा अशीच स्थिती असते), तर त्याचे कारण म्हणजे पुणे नावाच्या स्मार्ट शहरातील स्मार्ट नागरिकांनी दिवसा ढवळ्या रान गव्याला (ज्याला चुकून बायसन असेही म्हणतात) ठार केले. हेच पुणे पूर्वेकडचे ऑक्सफर्ड महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते जे राज्य आज देशातील सर्वात पुढारलेल्या राज्यांपैकी एक मानले जाते! अर्थातच आतापर्यंत लोक रानगव्याला विसरून गेले असतील कारण त्यानंतर नुकतेच एका तथाकथित नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार केल्याची बातमी होती. ज्याने दहापेक्षाही अधिक जणांना (अर्थातच माणसांना) मारले होते बिबट्या हा रानगव्यापेक्षा अधिक प्रसिद्ध प्राणी आहे. त्यानंतर कदाचित एखाद्या वाघाला ठार केले जाईल आपण बहुतेक नरभक्षक बिबट्याला विसरूनही जाऊ. त्यानंतरच्या एखाद्या आठवड्यात आणखी एखादा प्राणी काहीतरी करेल वर्तमानपत्रांना टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांना बातम्या मिळत राहतील. संबंधितांचे बाईट्स दिसतील, मानवी वसाहतींमध्ये प्राण्यांनी हल्ला केला यासारख्या बातम्या वॉट्सॲपमधून फॉरवर्ड केल्या जातील परिणामी त्या प्राण्याला आपला जीव गमवावा लागेल हे असेच चालत राहील. मध्यंतरी एका हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला घातल्याची बातमी आली होती. ती गरोदर होती तो अननस खाल्ल्यानंतर तिचा पोटातल्या पिल्लासोबतच मृत्यू झाला. 

मला खरोखरच आश्चर्य वाटते की आपण कोणत्या वृत्तीचे लोक आहोत कारण कोणताही प्राणी इतर प्रजातीला निष्कारण मारत नाही किंवा दुसऱ्या प्राण्याच्या किंवा प्रजातीच्या जीवनाविषयी इतका अडाणी (म्हणजेच निष्काळजी किंवा निर्दयी असत नाही) नाही. निसर्गामध्ये एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला केवळ आपली गरज भागविण्यासाठीच मारतो, ही गरज भूक किंवा वाघाच्या बाबतीत प्रदेशावर मालकीहक्क सांगण्यासाठी असू शकते. हा मालकी हक्क सुद्धा जगण्यासाठी असततो कारण एकाच प्रदेशात दोन वाघ म्हणजे अन्नाची कमतरता किंवा शिकारीवरून भांडणे होण्याची शक्यता असते. अलिकडेच रानगव्याला (मी याचा उल्लेख बायसन असा करत नाहीये कारण बहुतेक लोकांना तो शब्द माहिती आहे प्रत्यक्षात भारतात बायसन नाही) मारण्याच्या प्रकरणाचे उदाहरण घ्या. सर्वप्रथम तो पुण्यासारख्या शहरात एवढ्या लांबवर कसा पोहोचलाच कसा हा पहिला प्रश्न आहे कारण येथून शंभराहून अधिक किलोमीटर  पर्यंत रान गव्याचे वसतिस्थान नाही दुसरा प्रश्न म्हणजे तो काही नरभक्षक प्राणी नाही (सुदैवाने रानगवा, हत्ती गेंडा हे सगळे शाकाहारी प्राणी आहेत), त्याने चुकूनही कुणा माणसावर हल्ला केला नव्हता तरीही लोकांनी त्याला ठार केले. होय, मी योग्य शब्द वापरतोय की, गर्दीने त्याला ठार केले! आपण त्याला लोखंडी गजांनी मारले नसेल किंवा बंदुकीने गोळ्या घातल्या नसतील. पण आपण त्याला विश्रांती घेऊ दिली नाही किंवा खाऊ घातले नाही किंवा त्याला तहान लागल्यावर पाणी पाजले नाही ज्याची रानगव्यांसारख्या प्राण्यांना सर्वाधिक गरज असते त्यामुळे अतिश्रमाने तो मरण पावला. तो गर्दीपासून लांब पळून थकला होता कुठेतरी जरा निवांत बसता येईल या आशेत इकडे तिकडे पळत असताना आपण निर्लज्जपणे त्या बिचाऱ्याचे  व्हिडीओ चित्रित करण्यात गुंग होतो. एवढेच नाही तर आपण इतके अडाणी होतो की वनाधिकाऱ्यांना त्या रानगव्याला पकडून त्याच्यावर उपचार करू देण्याऐवजी आपण त्याच्यासोबत सेल्फी काढण्यात दंग होतो. यामुळे तो रानगवा  दिसभर पळत राहिला शेवटी अतिश्रमाने कोसळला. मी अलिकडच्या काळात याहून अधिक अमानवी कृत्य पाहिलेले नाही आपल्याला त्याचे काहीच वाटत नाही ही अधिक दुःखद बाब आहे. आता प्रश्न असा आहे की या हत्येचा दोष कुणाला द्यायचा, माध्यमांना की पोलीसांना ज्यांनी वनाधिकाऱ्यांना वेळेत संरक्षण द्यायाला हवे होते किंवा वनाधिकाऱ्यांना ज्यांना स्मार्ट शहरहामध्ये अशी परिस्थिती उद्भवल्यास कशी हाताळायची याचे प्रशिक्षण नव्हते तसेच अशावेळी कसे वागावे याविषयी त्यांनी लोकांना जागरुक केले नव्हते किंवा पूर्ण समाजाला दोष द्यायचा ज्याने रानगव्याला इतके दमवले की त्याचा मृत्यू झाला किंवा रानगव्यालाच दोष द्यायचा कारण तो जंगलातून बाहेर येऊन माणसांच्या शहरात का शिरला, म्हणूनच स्वतःच्या चुकीमुळेच अखेर त्याचा मृत्यू झाला!

रानगवा शहरात आला ही केवळ एक घटना असेल मात्र त्यामुळे सुसंस्कृत नागरिक म्हणून आपल्या मर्यादा वन्यजीवन संवर्धनाच्या बाबतीतला आपला अडाणीपणा उघड झाला आहे. गर्दीचा गोंगाट (गोंधळ), वय वाढलेल्या लोकांचा थट्टा-मस्करी करण्याचा दृष्टिकोन अधिकाऱ्यांची बेफिकिरी बातम्यांसाठी हपापलेली माध्यमे, यातून एकच गोष्ट सूचित होते की आपण अशा प्राण्यांचा समूह आहोत ज्यांना फक्त कपडे शिवून घालता येतात, नाहीतर आपण आपल्या आसपास असलेल्या सगळ्या प्राण्यांपेक्षाही मूर्ख आहोत. त्या रानगव्याला शांत करून मग पकडण्यात कुणालाच रस नव्हता जे खरेतर योग्य ठरले असते. असे करू शकणाऱ्या व्यक्तींना जागा वेळ द्यायलाही आपण तयार नव्हतोयात सर्वाधिक अपयश वनविभागाचे आहे(माफ करा लोकहो पण रानगवा हा वन्य प्राणी आहे) कारण जर एखादा दहशतवादी हल्ला झाला तर आपण कुणाला दोष देतो (म्हणजे मला म्हणायचे आहे की सर्वप्रथम कुणाला दोष देतो) तर पोलीसांना. म्हणून वनविभागाने शहरातील किंवा शहरी लोकांना वन्य जीवनाविषयी त्यांची जबाबदारी अशा घटनांविषयी जागरुक करण्यासाठी मोहिम हाती घेतली पाहिजेहे अर्थातच अतिशय अवघड काम आहे कारण ज्या प्राण्यांना (म्हणजे माणसांना) त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट किंवा मास्क घालण्याची सक्ती करावी लागते, त्यांना क्वचितच उद्भवणाऱ्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे दुसऱ्या प्राण्याच्या सुरक्षेचा विचार कसा करायचा हे शिकवणे जवळपास अशक्य कोटीतील गोष्ट आहे, मात्र वनविभागाला हेच करावे लागते. त्याचशिवाय हे माध्यमांचेही अपयश आहे कारण वन्यजीवनासंदर्भात एखादी दुर्घटना घडल्यानंतरच ते त्याच्या बातम्या छापतात किंवा दाखवतात. माध्यमे मग ती डिजिटल असोत, वृत्तपत्रे किंवा टीव्हीतील  वन्यजीवन संवर्धनाची मोहिम हाती घेण्याचा कधीच गांभीर्याने विचार करत नाही किंवा ज्यात ग्लॅमर किंवा पैसा नाही अशा कोणत्याच मोहिमेला प्रसिद्धी देत नाहीत हे कटू सत्य आहे.  त्यानंतर येतात पोलीस, त्यांच्यावर आधीच कामाचा भरपूर ताण आहे तरीही वन्य जीवनाशी संबंधित कोणतीही घटना झाल्यानंतर प्राधान्याने सुरक्षा दिली पाहिजे हे संपूर्ण पोलीस विभागाला माहिती असले पाहिजे, कारण शेवटी वन पोलीस दोघेही एकाच रंगाचा गणवेश घालतात, तो म्हणजे खाकी!

शेवटी क्रमांक येतो आपला म्हणजेच लोकांचा, त्यांच्याविषयी मी जितके कमी बोलेन तितके चांगले. कारण आपल्यापैकी काही जणांसाठी वन्यजीवन म्हणजे फक्त मोठमोठ्या लेन्स घेऊन भारी कपडे घालून वाघ किंवा पक्षांची छायाचित्र काढणे. तर इतरांसाठी वन्य जीवन फक्त नॅशनल जिओग्राफिक किंवा ॲनिमलप्लॅनेटपुरते मर्यादित असते, कारण त्यांना बिबट्या विहिरीत पडला किंवा हत्तीणीने फटाक्यांनी भरलेला अननस खाल्ला किंवा एखादा रानगवा शहरात इकडेतिकडे धावून अतिश्रमाने मेला याव्यतिरिक्तही अनेक अडचणींना तोंड द्यायचे असते. समस्या अशी आहे की आपली संख्या (लोकसंख्या) झपाट्याने वाढतेय त्यामुळे आपण इतर कोणत्याही प्रजातीला राहण्यासाठी किंवा जगण्यासाठी जागाच देत नाही त्यामुळे रानगव्याच्या बाबतीत झालेली घटना किंवा यासारख्या इतरही घटना होतच राहतात.

लोकहो अजूनही थोडी आशा शिल्लक आहे, डोळे मन उघडा आपल्या जीवनशैली अशी असू द्या की ज्यामध्ये सर्व प्रजाती टिकाव्यात आनंदाने जगाव्यात यासाठी धोरणे, नियम कायदे असतील. आपल्याला संत ज्ञानेश्वरांनी  गवामुखी वेद वदवल्याची गोष्ट माहितीच असेल. त्यांच्या धार्मिक अधिकाराला आव्हान देण्यात आल्यावर त्यांनी चक्क गवामुखी संस्कृत वेद वेदवले. संत ज्ञानेश्वर आज जिवंत असते तर त्यांनीही तथाकथित शिकली सवरलेली सुसंस्कृत माणसे गव्याला कसे वागवतात हे पाहून हात टेकले असते. ते म्हणाले असते मी गव्याला माणसांची भाषा बोलायला लावू शकतो परंतु माणसाला गव्याची भाषा बोलायला लावणे हे माझ्याही क्षमतेपलिकडचे आहे! लोकहो, ती एक गोष्ट होती आज आपल्याला गव्याची भाषा शिकवायला संत ज्ञानेश्वर नाहीत परंतु म्हणूनच आपण माणूस आहोत, आपणही वन्यप्राण्यांची भाषा शिकली पाहिजे, ती सगळ्यात सोपी भाषा आहे कारण ती निसर्गाची भाषा आहे ती शिकलात तरच तुम्ही जगाल हे लक्षात ठेवा!


संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स 

smd156812@gmail.com