Tuesday 28 July 2015

सुरक्षित बांधकाम करताना !






















सुरक्षेची इच्छा ही प्रत्येक महान व चांगल्या उद्योगांचा जणु पायाच आहे.” … टॅसिटस.

रोमन सिनेटर व इतिहासतज्ञ असलेल्या या वरील ग्रीक लेखकाचे हे शब्द आपल्या देशातील सर्व उद्योगांसाठी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहेत, जेथे मानवी जीवनाचे मोल इतर अनेक वस्तुंपेक्षाही कमी आहे हे कटू वास्तव आहे ! कोणतेही वर्तमानपत्राचे पान वाचा  तुम्हाला सर्व पानांवर मृत्यू व विनाशाच्या बातम्या दिसून येतील, मग ते रस्त्यावरील अपघात असतील किंवा दरड कोसळली असेल किंवा एखाद्या कारखान्यामध्ये बॉयलर फुटले असेल किंवा एखादा मजूर उंचावरुन पडला असेल; इथे दररोज हजारो लोक मृत्यूमुखी पडतात किंवा आयुष्यभरासाठी अपंग होतात! विशेषतः बांधकाम उद्योगामध्ये सुरक्षेचे नियम आहेत मात्र त्यांचे पालन क्वचितच होते, त्यामुळेच अपघातांची टक्केवारी बरीच अधिक आहे. माझ्या स्वतःच्या बांधकामस्थळी झालेल्या एका अपघातामुळे मी आज माझे सुरक्षाविषयीचे विचार मांडायला प्रवृत्त झालो आहे. माझ्या एका अभियंत्याने अकुशल मजुरांना एका शेडवरुन छपराचे काही पत्रे काढून टाकायला सांगितले. त्यापैकी एक मजूर काम करत असताना खाली पडला व त्याच्या पायाचे हाड मोडले. सुदैवाने फारसे नुकसान झाले नाही, छोट्याशा शस्त्रक्रियेनंतर त्याच्या पायाला प्लॅस्टर घातले गेले. तो लवकरच चालू शकेल असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र यातून धडा घेऊन नेमके काय झाले याचा तपास करण्यासाठी मी संबंधित अभियंत्याला बोलवून घेतले. आपल्या व्यवस्थेचे नेमके हेच अपयश आहे, की आपण चुका झाकायचा प्रयत्न करतो, परंतु भविष्यात चुका टाळायच्या असतील तर प्रत्येक चुकीचे विश्लेषण झाले पाहिजे, असे मला वाटते!

मी जेव्हा संबंधित अभियंत्याला कार्यालयात बोलावले व विचारले तेव्हा त्यातून काही आश्चकारक बाबी समोर आल्या! सर्वप्रथम त्याने ज्या मजुराला काम सांगितले होते तो कुशल नव्हता म्हणजे तो  खोद काम करणारा मजूर होता. तो खणणे व साहित्य हलविणे वगैरेंसारखी कामे करायचा. त्याला छपरावर चढायची सवय नव्हती अर्थात ती शेड फक्त दहा फूट उंच होती! दुसरे, म्हणजे त्यांना सेफ्टी बेल्ट बांधायची सवय नसल्याने त्यांनी बांधला नाही, व उंची फारशी नसल्याने अभियंत्यानेही सेफ्टी बेल्ट बांधायचा आग्रह केला नाही. तिसरी गोष्ट म्हणजे सबेसटॉसचे पत्रे कधीही वरुन नाही तर खालच्या बाजुने काढायचे असतात ही बाब अभियंता विसरला. कारण ते कोणतेही वजन सहन करु शकत नाहीत व एखाद्या व्यक्तिचे वजन तर नक्कीच नाही! चौथी बाब म्हणजे त्याने फॅब्रिकेटर कंत्राटदाराच्या माणसांना हे काम करायला सांगायला पाहिजे होते ज्यांना अशा प्रकारची कामे करायची सवय असते, ज्यामुळे अपघात टाळता आला असता, सुदैवाने तो जीवघेणा नव्हता!

मी या घटनेमुळे आपल्या उद्योगातील परिस्थितीचा विचार करु लागलो. एका छोट्याश्या निष्काळजीपणामुळे मृत्यू ओढवू शकतो व त्यामुळे होणाऱ्या अप्रिय घटना होऊ शकतात. तरीही आपल्यापैकी अनेकांना त्याची जाणीव होत नाही, जणु आपण सगळे काही दैवावर सोडलेले आहे! एखादा जीवघेणा किंवा कायमचे अपंगत्व आणणाऱ्या अपघातामुळे त्यातील व्यक्तिचे नुकसान होतेच, मात्र त्यामुळे त्याच्या कुटुंबासाठीही तो आघात असतो. यामुळे प्रकल्पाचा तोटा होतो, आर्थिक नुकसान होते व कामाचा वेळ वाया जातो. प्रकल्पाची बदनामी होते, पोलीस, कामगार कल्याण संघटना तसेच स्वघोषित कामगार संघटनांचा ससेमिरा बांधकाम व्यावसायिकाच्या मागे लागतो, त्यामागचा हेतू व त्याची निष्पत्ती आपण जाणतोच. म्हणूनच प्रकल्पाच्या मालकांनी किंवा बांधकाम व्यावसायिकांनी वेळीच जागे होऊन अपघात गांभिर्याने घ्यायची गरज आहे. त्यासाठी आपण साधारणपणे कोणत्या प्रकारचे अपघात होतात व त्यामागची कारणे कोणती असतात हे समजून घेणे आवश्यक आहे!

सर्वात महत्वाची बाब म्हणजे या सर्व अपघातांची माहिती नोंदवली पाहिजे, अपघातामध्ये सहभागी पक्ष घटनास्थळी सारवासारव करायचा प्रयत्न करतात. मी अशाप्रकारे सारवासारव करण्यामागचे कारण समजू शकतो. असे असले तरीही जी तथ्ये समोर येतील ती नोंदवणे व त्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यासंदर्भात विकासकांच्या क्रेडाई  व एमबीव्हीएसारख्या संघटना सरकारी संस्थांसोबत अशा प्रकारची माहिती संकलित करु शकतात, मात्र या माहितीचा गैरवापर होऊ नयेबहुतेकवेळा अपघात निष्काळजीपणामुळे किंवा निरीक्षक कर्मचाऱ्यांच्या अतिआत्मविश्वासामुळे होतात. म्हणूनच बांधकाम स्थळावरील सर्व तांत्रिक तसेच अभियंत्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. माझ्या बाबतीत घडले त्याप्रमाणे अभियंते किंवा पर्यवेक्षकांनी विशिष्ट कामासाठी कुशल कामगार वापरण्याची गरज ओळखली पाहिजे व सुरक्षा म्हणजे काय हे त्यांनीच समजावून घेतले पाहिजे! सुरक्षा म्हणजे केवेळ हेल्मेट घालणे किंवा सेफ्टी बेल्ट वापरणे नाही; तर सुरक्षा म्हणजे एखादे काम योग्य कारागिरीने कशाप्रकारे करायचे हे समजावून घेणे! यातली पहिली पायरी आहे प्रत्येक कामासाठी योग्य कामगार व साधनांचा वापर करणे, ज्यामुळे अकुशल कामगारांमुळे होणारे अपघात टाळले जातील. खोदकाम करणाऱ्या कामगाराला उंचावर काम करण्याची सवय नसते त्यामुळे तो काम करताना वरुन खाली पडला तर तुम्ही त्याला दोष देऊ शकत नाही! त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या सुताराला सांडपाण्यासाठी किंवा पायासाठी खणायला सांगितले तर त्याला ते करता येणार नाही व तो स्वतः खड्ड्यात पडेल किंवा खोदकामाचे साहित्य वापरताना आजूबाजूला उभ्या असलेल्या कुणाला तरी इजा पोहोचवेल! त्याशिवाय अपघात होण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे बांधकामाच्या ठिकाणी टाईल कटरपासून, तात्पुरत्या लिफ्टपासून ते क्रेनपर्यंतच्या विविध साधनांची व्यवस्थित देखभाल केली जात नाही. प्रत्येक साधनाच्या देखभालीचे कंत्राट दिले पाहिजे व विजेच्या सर्व जोडण्यांची नियमितपणे तपासणी केली पाहिजे!

अपघाताचे आणखी एक कारण म्हणजे प्लॅस्टर करण्यासाठी बाहेरुन चुकीच्या पद्धतीने मचाण बांधले जाते किंवा स्लॅब घालताना त्याला मजबूत आधार दिला जात नाही. हे प्रशिक्षित लोकांनी व योग्य त्या देखरेखीखालीच केले पाहिजे. इथे सुरक्षा नियमांची भूमिका अतिशय महत्वाची असते, कारण कामावर देखरेख करणारी माणसे बदलू शकतात मात्र नियम पाळणारी व्यवस्था कायम पाहिजे !
त्यानंतर कामाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तिला प्रशिक्षण दिले पाहिजे. सुरक्षा हे केवळ एका व्यक्तिचे काम नाही तर सगळ्यांनी एकजूटपणे काम केले तर ती साध्य होईल याची जाणीव कर्मचाऱ्यांना करुन दिली पाहिजे! कोणीही व्यक्ती हेल्मेटशिवाय नसावी व मानवी उंचीपेक्षा म्हणजे ७ फूटांपेक्षा अधिक उंचावरील कोणत्याही कामासाठी सेफ्टी बेल्ट वापरणे बंधनकारक आहे! या गोष्टी बांधकामाच्या ठिकाणी पर्यवेक्षकाने सांगणे आवश्यक नाही तर दररोज काम सुरु करण्यापूर्वी तुम्हीच बांधकामाच्या ठिकाणी या गोष्टींची मागणी केली पाहिजे, अशा प्रकारचे प्रशिक्षण असले पाहिजे! सुरक्षेसाठी केवळ हेल्मेट व सेफ्टी बेल्टशिवायच सुरक्षा शूजपासून ते योग्य कपड्यांपर्यंत सर्व काही महत्वाचे आहे. कामगारांनी घातलेले सैल कपडेही अपघाताला कारणीभूत ठरतात, त्यांना आग लागू शकते किंवा बांधकामाच्या ठिकाणी कोणत्याही यंत्राच्या फिरत्या भागात ते अडकू शकतात. तसेच जे मचाणावर काम करणाऱ्या कामगारांनी सुरक्षा शूज घालू नयेत, कारण पाईप किंवा लाकडी आधारावरुन हे शूज घसरण्याची शक्यता असते व या गोष्टी बांधकाम स्थळी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिच्या मनावर बिंबवल्या पाहिजेतबांधकामाच्या ठिकाणी अपघाताचे आणखी एक कारण म्हणजे कामाच्या ठिकाणी मद्यपान करणे, मद्यपान केलेल्या व्यक्तिचे आपल्या हालचालींवर नियंत्रण नसल्याने हमखास अपघात होऊ शकतोम्हणूनच पर्यवेक्षकांनी कुणीही व्यक्ती बांधकामाच्या ठिकाणी मद्यपान करुन किंवा कोणत्याही प्रकारच्या मादकपदार्थांचे सेवन करुन येणार नाही याची खात्री करावी. आम्ही आमच्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाला शिकवून ठेवले आहे, तो आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला तपासून त्याच्याकडून तंबाखू किंवा तत्सम कोणतेही पदार्थ काढून घेतो, असे साहित्य प्रवेशाद्वारापाशीच ठेवले जाते, कामगार बांधकामावरुन परत जाताना ते घेऊन जाऊ शकतात. वरच्या मजल्यांवर काम करताना बाहेरील कडांना अडथळे लावणे तसेच योग्य ठिकाणी सुरक्षा जाळी लावणे आवश्यक आहे.

बांधकामाच्या ठिकाणी कामगारांसाठी बांधलेल्या झोपड्यांच्या बाबतीतही वारंवार अपघात घडतात, त्या बांधताना काही बाबी तपासल्या पाहिजेत. त्या कुंपणाच्या भिंतीला लागून उभारल्या जाऊ नयेत, कारण भिंत झोपड्यांवर पडल्याने कामगारांचा जीव गेल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. दुसरे म्हणजे झोपड्या कोणत्याही नैसर्गिक जल प्रवाहाजवळ किंवा सखल भागात असू नयेत म्हणजे पावसाळ्यात पुरामुळे जीवितहानी किंवा नुकसान होणार नाही. तसेच बहुतेक वेळा झोपड्या पत्र्यांपासून बनविलेल्या असतात त्यामुळे त्यामध्ये वीज पुरवठा योग्य प्रकारे दिला पाहिजे, नाहीतर या पत्र्यांमधून वीज प्रवाह जाऊ शकतो त्यामुळे आग लागू शकते किंवा शॉर्ट सर्किट होऊ शकते. तसेच लहान मुलांना बांधकामाच्या ठिकाणापासून लांब ठेवले पाहिजे व बांधकाम कितीही लहान असले तरीही तिथे एखादे पाळणाघर असले पाहिजे. लहान मुलांना बांधकामाच्या ठिकाणी अपघात होण्याचा अतिशय जास्त धोका असतो, उदाहणार्थ ती उंचावरुन पडू शकतात किंवा एखादी वस्तू अंगावर पाडून घेऊ शकतात. कामगार पालकांना आपली मुले कामाच्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी असल्याची खात्री पटली तर ते जास्त निर्धास्तपणे काम करु शकतात! प्रथमोपचाराचे साहित्य तसेच अग्निशामक साधने कामगारांच्या छावणीजवळ स्वतंत्र शेडमध्ये ठेवले पाहिजे व त्यावर आणीबाणीच्या वेळी आवश्यक असलेले सर्व क्रमांक दिलेला एखादा फलक लावला पाहिजे, म्हणजे काहीही अपघात झाला तर कुणाला संपर्क करायचा हे लोकांना माहिती असेल!

आणखी एक दुर्लक्षित पैलू म्हणजे कामगारांसाठीची शौचालये व त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय. बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल की याचा सुरक्षेशी काय संबंध, मात्र सुरक्षा म्हणजे केवळ बांधकामावरील कर्मचाऱ्यांना अपघातापासून वाचवणे असा होत नाही तर व्यवस्थित स्वच्छताही तितकीच महत्वाची आहे, कारण बहुतेक आजार किंवा साथीचे रोग पाण्यातूनच पसरतात. म्हणूनच या संदर्भात बांधकामावरील कामगारांना स्वच्छ व आरोग्यदायी पाण्याचा पुरवठा होणे अतिशय महत्वाचे आहे. आपण बांधकामावरील कामगारांची नियमितपणे आरोग्य तपासणीही करुन घेऊ शकतो व बांधकामाचे ठिकाण लहान असेल तर आपण त्यासाठी परिसरात सुरु असलेल्या प्रकल्पाच्या विकासकाची मदत घेऊ शकतो. दुबईमध्ये बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची परिस्थिती, त्यांना देण्यात आलेल्या सोयी तपासण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे हवाई सर्वेक्षण केले जाते व कुणी दोषी आढळ्यास त्यांना मोठा दंड आकारला जातो! स्थानिक प्राधिकरणांनीही विकासकांच्या मदतीने एक यादी बनवावी व त्यानुसार सोयी उपलब्ध आहेत का हे वेळोवेळी तपासून पाहावे ! साईट वरील कामगारांचा तसाच अभियंत्यांचा समूह विमा घेण्याचा पर्यायही प्रत्येकांनी अमलात आणायलाच  पाहिजे, म्हणजे काही दुर्घटना घडल्यास विम्याद्वारे आर्थिक मदत मिळू शकते.

याशिवाय, बांधकामाच्या ठिकाणी वेळोवेळी सुरक्षेचे लेखापरीक्षण झाले पाहिजे. सामान्यपणे सर्व खबरदारी घेऊनही लोक अति आत्मविश्वास बाळगतात व ज्याचा परिणाम निष्काळणजीपणात होतो; म्हणूनच अचानकपणे कुणी तिसऱ्या व्यक्तिने सुरक्षा यंत्रणेची तपासणी केल्याने मदत होऊ शकते! शेवटचे मात्र महत्वाचे म्हणजे तुमचे संभाव्य ग्राहक या प्रयत्नांची दखल घेतात असा माझा अनुभव आहे व याचा उपयोग तुम्हाला तुमच्या विपणनासाठी करता येऊ शकतोकारण, जो विकासक त्याच्या कामगारांची चांगली काळजी घेतो, विचार करा तो त्याच्या ग्राहकासाठी काय करेल; ग्राहकाच्या भूमिकेतून विचार केला तर या चांगल्या कामांचा असा हुशारीने वापर करता येईल. कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरणामुळे परिमाणही चांगलाच होतो हे वेगळे सांगायची गरज नाही कारण कामगार आपल्या सुरक्षेची चिंता न करता मोकळ्या मनाने काम करतील! या सर्व बाबी वरपासून खालपर्यंत सर्वांना समजल्या पाहिजेत, फक्त कामगारच नाही तर साईटशी संबंधीत प्रत्येक गोष्टीच्या सुरक्षेचा विचार झाला पाहिजे, कारण लक्षात ठेवा सुरक्षा ही केवळ कृती नाही तर तो एक दृष्टिकोन आहे


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स


Thursday 16 July 2015

स्मार्ट शहराचे स्वप्न बघताना !






















तुम्हाला तुमच्या शहराची सात किंवा सत्तर आश्चर्ये बघताना नाही, तर तुमचे शहर तुमच्या दररोजच्या प्रश्नांना जे उत्तर देते त्यातून जास्त आनंद होतो.” … इटॅलो कॅल्व्हिनो.

कॅल्व्हिनो हा इटालियन पत्रकार होता व त्याने ब-याच लघुकथा व कादंब-यांचे लेखन केले. त्याच्या सर्वोत्तम लेखनामध्ये इन्व्हिझिबल सिटीज या पुस्तकाचा समावेश होतो व त्याने प्रत्येक नागरिक ज्या शहरामध्ये राहतो त्याच्याकडून त्याच्या काय अपेक्षा असतात हे किती समर्पक शब्दात व्यक्त कले आहे! पुणे शहर विशेषतः पुणे महानगरपालिका म्हणजेच पीएमसी  ही आपली प्रशासकीय संस्था मला नेहमी आश्चर्यचकित करते व फार क्वचित हा अनुभव सुखद असतो. एका बातमीने अलिकडेच मला असाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला, ती म्हणजे पीएमसीने नागरिकांसाठी एक स्पर्धा घोषित केली आहे, ज्यामध्ये त्यांना स्मार्टसिटीविषयी आपल्या संकल्पना द्यायच्या आहेत! त्यासाठी देण्यात आलेले विषय खाली नमुद केल्याप्रमाणे होते व त्यापुढेही एक पाऊल जात पीएमसीने नागरिकांना आवाहन केले की यादीमध्ये ज्या विषयांचा समावेश करणे आवश्यक आहे असे नागरिकांना वाटते ते विषयसुद्धा त्यांनी समाविष्ट करावेत! आता त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे नागरिकांवर अवलंबून आहे कारण स्मार्ट सिटीज केवळ सहभागातून व नागरिकांनी ही संकल्पना समजावून घेतली तरच उभारता येतील! पीएमसीने या स्पर्धेसाठी दिलेले विषय खाली देत आहे
तुम्ही या विषयांवर लिहू शकता

परवडणारी घरे
) नागरिकांचा सहभाग
) शिक्षण
) वीज
) पर्यावरण
) कचरा व्यवस्थापन
) प्रशासन
) आयटी जोडणी व डिजिटायझेशन
) आरोग्य
१०सौर उर्जा
११शौचालये व स्वच्छता
१२) रहदारी व्यवस्थापन
१३पाणी पुरवठा
 एक नागरिक म्हणून व एक अभियंता बांधकाम व्यावसायिक म्हणून हा विषय माझ्या व्यवसायाच्या म्हणजेच रिअल इस्टेटच्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे. म्हणूनच स्मार्ट सिटीच्या वरील व ईतरही काही बाबींबाबत माझे माझे मत इथे देत आहे

१.    परवडणारी घरे.

मला असे वाटते की नागरिकांना एक राहण्यायोग्य व परवडणारे घर देणे हे कोणत्याही शहराचे कर्तव्य आहे. परवडणारे म्हणजे फक्त स्वस्त नाही मात्र दुर्दैवाने आपल्या देशात असाच समज आहे. परवडणारे या शब्दाला अनेक पैलू आहेत, माझ्या मते पडवणारे म्हणजे केवळ खरेदी करतानाच नाही तर आयुष्यभर देखभालीच्या दृष्टीनेही ते परवडणारे असले पाहिजे.
आपल्याकडे विविध उत्पन्न गटातील तसेच विविध जीवन शैली असलेल्या व्यक्ती आहेत, म्हणूनच समाजातील अशा सर्व प्रकारच्या वर्गांना परवडणारी घरे असली पाहिजेत. डेव्हलपमेंट pla^न (डीपी) मध्ये परवडणा-या घरांसाठी आरक्षण असले पाहिजे तसेच त्यांना विशेष एफएसआय दिला पाहिजे व या विभागातील घरांच्या रचनेचे नियमही निश्चित केले पाहिजेत. नियोजन तसेच रचनेची एक प्रमाणभूत पद्धत असली पाहिजे व पीएमसी या आरक्षणांचा खुल्या निविदेद्वारे लिलाव करेल म्हणजे विकासक पीएमसीला ती निश्चित दराने विकतील व त्यानंतर पीएमसी ती गरजू लोकांना वितरित करु शकेल व उरलेला एफएसआय विकासक त्याला हवा तसा वापरु शकतो मात्र तरीही तो खुल्या बाजारामध्ये ठराविक रकमेपेक्षा अधिक विकला जाऊ नये! इथे सार्वजनिक वाहतुकीच्या सोयीपासून ते सांडपाण्यावर प्रक्रिया करणाच्या प्रकल्पांपर्यंत सर्व पायाभूत सुविधा केवळ विकासांनीच दिल्या पाहिजेत. त्यावर कोणतेही अधिभार आकारले जाऊ नयेत मात्र पीएमसीला जेवढी घरे मिळत आहेत त्यातून ते वसूल केले जावेत. हे विभाग संपूर्ण शहराभोवती विशेषतः नव्याने समाविष्ट गावांभोवती नियोजित केले असले पाहिजेत.

२.    नागरिकांचा सहभाग

ही स्पर्धा जाहीर करुन पीएमसीने नागरिकांच्या सहभागाच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे, या सहभागातून काय साध्य होते हे पाहणेही महत्वाचे आहे. नागरिकांच्या सहभागातून मिळणारा डाटा संकलित करण्यासाठी व त्याचे काय झाले याविषयी त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची गरज आहे!  बरेच लोक यात सहभागी होत नाहीत कारण आपण जे काही सुचवू त्याचा काहीही उपयोग होणार नाही असे त्यांना वाटते!  त्यामुळेच लोकांना यामध्ये केवळ सूचना किंवा कल्पना देण्यासाठी सहभागी करुन घेणेच महत्वाचे नाही तर त्या सूचनांवर कृतीही झाली पाहिजे, तरच लोक पीएमसी किंवा कोणत्याही सार्वजनिक संस्थेसोबत काम करण्यास सहभागी होण्यासाठी पुढे येतील. यासाठी एक पूर्ण वेळ काम करणारी व संपर्क साधण्यात प्रशिक्षित व्यक्ती नियुक्ती केली पाहिजे!
शहर अधिक चांगले व्हावे यासाठी विविध क्षेत्रात योगदान देणा-या व्यक्तिंसाठी आपण दरवर्षी सर्वोत्तम नागरिक पुरस्कार देऊ शकतो व आपण त्यासाठी विविध वर्गवा-या ठरवू शकतो. मात्र हे पुरस्कार निःपक्षपातीपणे दिले जातील राजकीय हेतुने नाही याची खात्री केली पाहिजे!

३.    शिक्षण

शहराच्या पाणी व रहदारीसारख्या गरजांच्या तुलनेत या बाबीकडे अतिशय दुर्लक्ष केले जाते; “पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया हे घोषवाक्य केवळ जाहिरातीसाठी आहे असे वाटते! महापालिकेच्या कोणत्याही शाळेला भेट देऊन तिथली परिस्थिती पाहिल्यावर तुम्हाला समजेल की कोणतेही शहाणे पालक आपल्या पाल्यांना तेथे का पाठवत नाहीत. किंवा कोणत्याही माननीय नगरसेवक  किंवा पीएमसीच्या वरिष्ठ अधिका-यांना त्यांची मुले कोणत्या शाळेत जातात ते विचारा व त्यांच्या उत्तरातून तुम्हाला महापालिकेच्या शाळांची काय परिस्थिती आहे ते समजेलसर्वप्रथम पायाभूत सुविधांसाठी एक आदर्श शाळा तयार करा व त्यानंतर सर्व महापालिका शाळांना त्या आदर्श शाळेनुसार रुपांतरित करा. तसेच महापालिका निवडणुकीसाठी नामांकन भरताना मुले पीएमसी शाळेमध्येच शिकत असली पाहिजेत असे बंधन घाला. तसेच प्रत्येक पीएमसी कर्मचा-याला पदोन्नती देताना किंवा गोपनीय अहवाल लिहीताना या निकषाचाही विचार केला पाहिजेयामुळे ते शाळेकडे तसेच एकूणच शैक्षणिक आघाडीवरील त्यांच्या जबाबदारीकडे अधिक लक्ष देतील. तसेच ज्यांची मुले पीएमसी शाळांमध्ये शिकतात त्यांना कर सवलतीही द्या! व्यावसायिक संस्था तसेच कॉर्पोरेट कंपन्यांना अशा शाळा दत्तक घ्यायला सांगा व दत्तक घेणे केवळ निधी देण्यापुरतेच मर्यादित नसावे तर त्यांच्या कर्मचा-यांनी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, म्हणजे त्यांच्याकडे जो बाह्य जगाचा व्यापक अनुभव आहे त्याचा त्यांना लाभ होऊ शकेल! चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी आधी चांगल्या शिक्षकांची आवश्यकता असते व त्यासाठी शिक्षकांना सातत्याने प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे!

४.    वीज

एक चांगली बाब म्हणजे महापालिकेने वीज पुरवठा केवळ एमएसईडीसीएलची नाही तर आपलीही जबाबदारी असल्याचे स्वीकारले आहे! सर्वप्रथम एमएसईडीसीएलच्या अधिका-यांसोबत एकत्र चर्चा करा  व आपल्या शहराची सध्याची तसेच भविष्यातील विजेची गरज किती आहे हे काढा. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर, ग्रहण केंद्रे, विजेच्या तारांचा आकार व त्यांचे मार्ग या सगळ्या बाबी संयुक्तपणे ठरवा.  येत्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे बॅटरीवर चालणारी अधिक वाहने असतील जी चार्ज करण्यासाठी आपल्याला चार्जिंग स्टेशन लागतील, त्यासाठी किती वीज लागेल याचाही विचार झाला पाहिजे. सार्वजनिक पार्किंगची ठिकाणेही सार्वजनिक वाहन चार्जिंग स्टेशनमध्ये रुपांतरित करता येतीलत्याचवेळी सौर तसेच वायू ऊर्जा निर्मितीसाठी पर्यायी स्रोत वापरण्याचाही विचार केला पाहिजे ज्यामुळे पारंपरिक उर्जेचा वापर कमी केला जाईल.

५.   पर्यावरण

पर्यावरणाचा संबंध प्रत्येक क्षेत्रात येतो त्यामुळे त्याचा वेगळा विचार करण्याऐवजी शिक्षणापासून ते प्रशासनापर्यंत सर्वकाही पर्यावरणाला अनुकूल बनविले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तिला पर्यावरणाविषयी त्याच्या भूमिकेची जाणीव करुन देणे महत्वाचे आहे. लक्षात ठेवा की कोणत्याही एका विभागाच्या, उद्योगाच्या किंवा स्वयंसेवी संस्थेच्या प्रयत्नांमुळे नाही तर आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. म्हणूनच पर्यावरणाचा एक स्वतंत्र विषय म्हणून विचार करण्याऐवजी शहराच्या प्रत्येक आघाडीवरील कार्यक्रम त्या अनुषंगाने तयार करा!

६.   कचरा व्यवस्थापन
यासंदर्भात प्रोत्साहन देण्यासोबतच नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे धोरण अवलंबले पाहिजे. ज्या सोसायट्यांमध्ये गांडुळखत प्रकल्पासाठी एनओसी देण्यात आले आहे किंवा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तो निकष असल्यास तिथून ओला कचरा उचलणे बंद कराप्रत्येक प्रभाग, रस्ता किंवा सोसायटीसाठी कचरा निर्मिती तसेच कच-याचे संकलन मोजण्यासाठी काही मोजमाप तयार करा व त्याचे निरीक्षण करा. सध्या आपल्याला कोणत्या ठिकाणाहून किती व कोणत्या प्रकारचा कचरा तयार होत आहे माहिती नाही कारण त्याचे कोणतेही मोजमाप किंवा नोंद नाहीआपल्याला किती कच-याचे निरीक्षण करायचे आहे हे माहिती नसेल तर आपण त्याचे निरीक्षण कसे करणार आहोत?

रस्त्यावरील सर्व उघड्या कचरा पेट्या बंद करा व त्यासाठी स्वतंत्र रचना करा कारण या कचरा पेट्यांमधून ओसंडून वाहणारा कचरा शहरासाठी शरमेची बाब आहे! कचरा पेट्यांची रचना करण्यासाठी एक स्पर्धा घ्या. त्यानंतर कचरा पेटया तयार करा कारण सध्या कचरा पेटी कधी रिकामी केली जाईल याचे काहीही वेळापत्रक नाही. ज्याप्रमाणे रेल्वे स्थानकावर रेल्वे कधी येईल याची माहिती दाखवली जाते त्याप्रमाणे कचरापेटी कधी रिकामी केली जाईल हे दाखविणारा इलेक्ट्रॉनिक फलक बसविण्याचा विचार करता येईल! व्यावसायिक संस्थांना कचरा पेट्या दत्तक घ्यायला लावा व तिथे त्यांना जाहिरात करण्याची परवानगी द्या तसेच एखादी कंपनी कचरा खरेदी करत असेल तर त्यांना खुल्या निविदेद्वारे तसे करण्याची परवानगी द्या! त्याशिवाय प्रत्येक प्रभागामध्ये    कच-यावर प्रक्रिया करणारा लहान प्रकल्प अत्यावश्यक आहे व डीपीमध्ये त्यासाठी जागा आरक्षित करा व त्याची रचना अशा प्रकारे केली जावी की आजूबाजूच्या भागांना काहीही त्रास होणार नाही. त्याची रचना योग्य प्रकारे केल्यास त्या जागेचे सुशोभीकरण करता येईल.
आपल्या शहरातील प्रत्येक शाळेची सध्याच्या कचरा डेपोला सहल नेली पाहिजे किंबहुना तो त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग बनविला पाहिजे, म्हणजे प्रत्येक मुलाला या समस्येचे गांभार्य व तिला तोंड देण्यासाठी त्याची भूमिकाही समजेल!

७.   प्रशासन
आपल्या संपूर्ण यंत्रणेतील या सर्वात कमजोर दुवा आहे कारण कुणालाही पीएमसीच्या प्रशासनात विश्वासच वाटत नाही हे कटू सत्य आहे! सर्वप्रथम नागरिकांना पीएमसीविषयी विश्वास वाटेल असे वातावरण तयार करा, त्यासाठी आपल्याला पादर्शकता आणणे अतिशय महत्वाची आहे! मोबाईलवर एक ऍप तयार करा ज्यावर महापालिकेच्या आयुक्तांपासून ते प्रभाग कार्यालयातील मुकादमापर्यंत कुणाची काय जबाबदारी असेल व त्यांना संपर्क करण्यासाठीचे तपशील यासारखी माहिती द्यासध्या कुणाची काय जबाबदारी आहे हे कुणालाही माहिती नाही व म्हणूनच लोकांना महापालिकेच्या प्रशासनावर विश्वास वाटत नाही! कायद्याचे उल्लंघन करणा-या प्रत्येकाविरुद्ध केलेली कारवाई पादर्शक तसेच निःपक्षपाती असली पाहिजे. प्रशासनामध्ये हे सर्व केले जाईल याची खात्री करण्यासाठी काही यंत्रणा असली पाहिजे.

पीएमसीत एका विभागातील प्रत्येक कर्मचा-याला दुस-या विभागात काही दिवस काम करायला लावा म्हणजे त्यांना इतर कामांचे महत्व व इतर विभागांची काम करण्याची पद्धत समजेल.


८.    ईनफॉरर्मशन टेक्नोलॉजी व डिजिटायझेशन

महापालिकेचे व्हर्च्युअल कार्यालय असलेले एक संकेतस्थळ तयार करा ज्यावर कायम प्रत्येक कार्यालय व्हर्च्युअल स्वरुपात उपलब्ध होईल व या संकेतस्थळाचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करा. मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवा तरच डिजिटायझेशन यशस्वी करता येईल.  प्रत्येक चौकात संपर्क केंद्रांद्वारे इंटरनेट जोडणी उपलब्ध करुन द्या व तक्रारींपासून ते विविध देयकांचे पैसे भरणे तसेच एनओसी यासारख्या सेवा या संकेतस्थळावर उपलब्ध करुन द्या. ऑनलाईन पैसे भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी काउंटरवर पैसे भरणे थोडे महाग करा. कोणतीही समस्या सोडविण्यासाठी आधी त्याविषयी तपशीलवार माहिती असली पाहिजे व पीएमसीकडे शहराशी संबंधित प्रत्येक बाबीसाठी सर्वोत्तम माहिती असली पाहिजे मग त्यामध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येपासून ते शहरातील शाळा तसेच सार्वजनिक वाहनांपर्यंत म्हणजे रस्त्यावरील पीएमपीएमएल बसचा समावेश होतो व ही सर्व माहिती नागरिकांना एका क्लिकमध्ये उपलब्ध करुन द्या. प्रत्येक नागरिकाला या संकेतस्थळावर त्याचा वापरकर्ता ओळख क्रमांक तयार करुन ही माहिती घ्यायला सांगा. पीएमसीमध्ये डाटा संकलन व त्याच्या विश्लेषणासाठी स्वतंत्र विभाग तयार करा, हा विभाग एका विशेष कृती दलासारखा असेल जे गरजू व्यक्तिंना त्यांच्या हेतुची खात्री केल्यानंतर हा डाटा उपलब्ध करुन देईल.

तसेच डीपी व्हर्च्युअल ३डी स्वरुपात असला पाहिजे, ज्याद्वारे जमीनीच्या किंवा विभागाच्या वापराची चित्रे दाखवली जातील म्हणजे प्रत्येक नागरिकाला डीपी वाचता येईल व समजेल !

९.     आरोग्य

याला आरोग्य व लोकसंख्या नियंत्रण असे म्हटले पाहिजे. कारण लोकसंख्या हा आपल्यासाठी एक शाप किंवा आपले प्रत्येक धोरण अपयशी होण्याचे कारण आहे व त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहेपीएमसी शाळांप्रमाणे पीएमसीच्या आरोग्य केंद्रांची स्थितीही अतिशय वाईट आहे व त्यांची देखभाल करणे आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य केंद्रे नागरिकाभिमुख बनवून त्यांच्या वापरास प्रोत्साहन दिले पाहिजे व पीएमसीच्या नगरसेवकांना तसेच कर्मचा-यांना त्यांचा वापर करणे बंधनकारक केले पाहिजे. नागरिकांनी सार्वजनिक आरोग्य सेवा केंद्रावर येण्याऐवजी, आरोग्य केंद्राच्या कर्मचा-यांनी लोकांपर्यंत पोहोचून गरजूंना मदत केली पाहिजे.

१०.सौर/पर्यायी ऊर्जा

सध्याची तशीच नवीन बांधकामे कुठेही असली तरीही त्यामध्ये सौर उर्जेद्वारे पाणी तापवणे बंधनकारक करा. त्याचा डीसी नियमांमध्ये समावेश करा तसेच इमारतींच्या छपरांवर, मोकळ्या जागेमध्ये तसेच डोंगरांवर सौर क्षेत्रांचीही तरतूद करा! सर्व बस थांब्यांवर सौर छप्पर बसवा व पीएमसीच्या इमारतीच्या गच्च्यांसह प्रत्येक चौरस इंच सौर ऊर्जा निर्मितीसाठी वापरा.

११. शौचालये व स्वच्छता

डीपीमध्ये शौचालयांसाठीही आरक्षण ठेवा. तसेच प्रत्येक इमारतीमध्ये महिला व पुरुषांशाठी सार्वजनिक शौचायल बंधनकारक करा व जनतेसाठी उपलब्ध करा. सार्वजनिक शौचालयांना दत्तक घेण्यासाठी शहरातील प्रत्येक व्यावसायिक संस्थेचे सहकार्य घ्या व त्यांना तेथे जाहिरात करण्याची परवानगी द्या तसेच अशी शौचालये दत्तक घेतलेल्या कार्यालयांना वेगळ्या दराने कर आकारणी करासार्वजनिक शौचालयांची प्रमाणभूत रचना तयार करण्यासाठी तसेच प्रत्येक वर्षी सर्वोत्तम देखभाल केलेल्या शौचालयांसाठीही एक स्पर्धा आयोजित करा!

१२.                        रहदारी व्यवस्थापन
ही बहुदा सर्वात गंभीर समस्या आहे! यावरील एकमेव उपाय म्हणजे सार्वजनिक वाहतूक सशक्त करणे व लोकांना खाजगी वाहने वापरण्यापासून परावृत्त करण्यासाठी ती वापरणा-या लोकांवर वाहन कर आकारणे! वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे व नियंत्रण कक्ष तयार केला पाहिजे. शहराचे नियोजन असे असले पाहिजे की लोकांना कमीत कमी कारणांसाठी रस्त्यावर यावे लागेल. विविध सुविधांसाठी राखून ठेवलेल्या जागां केवळ दोन हेतुंनी रुपांतरित करा एक म्हणजे जैवविविधता किंवा सशुल्क वाहनतळ कारण आपल्याकडे पुरेसे मॉल्स व व्यावसायिक ठिकाणे आहेत.


१३.                        पाणी पुरवठा 

पाणी पुरवठ्यासाठी मीटर बसविणे आवश्यक आहे व उंचावर बसविलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून पाणी वाहून नेणा-या वाहिन्यांवर सुद्धा मीटर बसवा, कारण आपण जोपर्यंत किती पाणी वापरतो हे मोजत नाही तोपर्यंत आपण त्याचा वापर कसा नियंत्रित करणार आहोत?  बंद जलवाहिन्यांद्वारे पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब संकलित करा व विविध ठिकाणी ते साचवून त्यावर प्रक्रिया करा व पावसाळ्यामध्ये ते पुन्हा वापरा यामुळे पावसाळ्यामध्ये ताज्या पाण्याचा पुरवठा कमी करावा लागेल. यासाठी गटारांचे नाही तर पावसाचे पाणी वाहून नेणा-या वाहिन्यांचे एक जाळे तयार करा! खाजगी विकासांमध्ये पावसाच्या पाण्याच्या संधारणाची सक्ती करा व त्यामुळे ताज्या पाण्याचा वापर किती कमी झाला हे मोजा. शहराला पाणी पुरवठा करणा-या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पाण्याची संधारण ही देखील महापालिकेचीच जबाबदारी असली पाहिजे. नदी पात्रामध्ये अधिक पावसाचे पाणी साठवता येईल असे खोल खड्डे तयार करुन नदीमध्ये लहान बंधारे बांधण्याचा विचार करा. इथे आपण भू जलभरण करुन जमीनीतील पाण्याची पातळी वाढविण्याचाही विचार करु शकतो. यासाठी शहरातील भूजल पातळीची सातत्याने माहिती नोंदवली पाहिजे.

सांडपाण्याचा फेरवापर हा देखील अतिशय महत्वाचा पैलू आहे, आपण लहान सोसायट्यांनी एकत्र येऊन स्वतःचा सामाईक ड्रेनेज ट्रीटमेंट प्लांन्ट बसवायचा विचार करु शकतो विशेषतः जेथे नवीन विकास झाला आहे किंवा गावे शहरात विलीन करण्यात आली आहेत.

१४.                       जैवविविधता

शहराचा हरित पट्टा आरक्षित म्हणून जाहीर केला पाहिजे व त्यासाठी टीडीआर किंवा बाजार दर देऊन तो अधिग्रहित करा, याठिकाणी विविध प्रकारची झाडे लावा व शहरातच जंगल तयार करा! येथे कोणतेही खाजगी क्लब हाउस किंवा तरण तलावास परवानगी देऊ नका तर या खुल्या जागा जैवविविधतेच्या संरक्षणासाठी वापरा. प्रत्येक नागरिकाला त्याच्या किंवा तिच्या आयुष्यात एक झाड लावायला व जगवायला लावा. ते झाड ज्याने लावले त्याला त्या व्यक्तिचे नाव द्या व त्याची देखभाल करायला सांगा. प्रत्येक शाळेमध्ये व प्रभागात नेचर क्लब स्थापित करा व निसर्गाच्या विविध पैलुंविषयी जागरुकता निर्माण करणारे कार्यक्रम राबवा. आपल्याला सार्वजनिक उद्यानांची गरज आहे व विविध सुविधांसाठी राखीव जागांवर ही उद्याने उभारता येतील. तसेच नदीच्या काठाने असलेले हरित पट्टेही यात महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. हरित पट्टे व डोंगर उतार अधिग्रहित करण्यासाठी मिळालेला टीडीआर केवळ परवडणा-या घरांसाठीच वापरा!

१५.                     शहराची सौंदर्य मूल्ये, संस्कृती व वारसा!

आपले शहर यात सर्वात मागे पडते. आपल्या शहराचे क्षितीज पाहा, आपल्याला सर्वत्र फक्त होर्डींग्स व डिश टीव्ही केबल्स दिसतील. बस थांब्यापासून ते पादचारी पुलापर्यंत प्रत्येक सार्वजनिक सुविधेसाठी रचनेची विशिष्ट पद्धत असली पाहिजे, यामध्ये सोयीचा विचार करतानाच सौंदर्याचाही विचार केला पाहिजे! शहराच्या प्रत्येक भागात नदी किना-यापासून ते खुल्या नाट्यगृहांपर्यंत अधिकाधिक सार्वजनिक जागा तयार करणे हे आणखी एक उद्दिष्ट असले पाहिजे! एखाद्या शहरामध्ये संस्कृतीचा अभाव असेल तर ते स्मार्ट शहर होऊ शकणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. अलिकडेच एक बातमी आली होती की ब्रिटीश काळातील धोक्याची सुचना देणारे ७२ जुने सायरन बंद करण्यात आले कारण त्यांची देखभाल करणे महापालिकेला शक्य नव्हते! अशी जुनी स्थळे किंवा बांधकामे किंवा संस्थांची यादी तयार केली जावी व त्यांच्यापाशी योग्य ते माहिती फलक लावून त्यांना पर्यटन स्थळात रुपांतरित करावे!

आपल्या शहराचा माहितीकोष नाही, तसेच कोणतेही पुस्तक किंवा नकाशा शहरातील कोणती ठिकाणे त्यांच्या वारशासाठी प्रसिद्ध होती, आपण शहरात काय पाहावे याची माहिती देत नाही! तशी एक पुस्तिका करून दरवर्षी ती अपडेट करावी.

१६.सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन

पीएमसीच काय अगदी पोलीस दलही या महत्वाच्या बाबतीत पिछाडीवर आहे व आग, भूकंप किंवा पूर आल्यास आपण काय केले पाहिजे याविषयी आपण सामान्य माणसाला जागरुक केले पाहिजे. तसेच सुरक्षा उपाययोजना अधिक सशक्त केल्या पाहिजेत कारण नागरिकांना सुरक्षित वातावरण देणे ही कोणत्याही चांगल्या स्मार्ट शहराची मूलभूत गरज आहे!

आपण संपूर्ण शहरात द्रोन (आकाशातील मानव विरहीत यान ) कॅमेरे फिरवून नद्या व दाटीवाटीच्या भागांमध्ये होणा-या आपत्तींवर तसेच साखळी खेचण्यासारख्या गुन्ह्यांवर नजर ठेवू शकतो !  सीसी टीव्ही चांगल्या दर्जाचा असला पाहिजे व लोकांना त्याचे ठिकाण, त्याचा वापर तसेच ठराविक काळाने त्याची देखभाल याविषयी माहिती दिली पाहिजे! बहुतेक वेळा त्यातून मिळाणा-या ध्वनीचित्रमुद्रणाचा दर्जा सुमार असतो व त्याचा काहीही उपयोग होत नाही असा अनुभव आहे!
कोणत्याही अपघातामध्ये त्यातील व्यक्तिंसाठी प्रतिसादासाठी लागणारा वेळ अतिशय महत्वाचा असतो व त्यासाठी नियमितपणे प्रशिक्षण दिले पाहिजे व एक स्वतंत्र कक्ष तयार केला पाहिजे, आपण अशा उपक्रमांसाठी माजी लष्करी अधिका-यांची मदत घेऊ शकतो!


१७.                       अतिक्रमणविरोधी धोरण व अंमलबजावणी

कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणाविरुद्ध तात्काळ कारवाई झाली पाहिजे, त्यात वरच्या पातळीवरुन येणारा दबाव किंवा हस्तक्षेप जुमानला जाऊ नये. असे झाले तरच लोक कायद्यावर व नियमांवर विश्वास ठेवतील! अतिक्रमणाशी संबंधित प्रकरणे निकाली काढण्यासाठी स्वतंत्र न्यायालय किंवा लवादाची स्थापना करावी. याचे सर्वप्रथम उद्दिष्ट सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये हा असावा; मग तो कोणत्याही अवैध इमारतीमुळे होणारा असेल किंवा अगदी पादपथावरील लहानशा टपरीमुळे होणारा असेल!

१८.                        सार्वजनिक सेवा चमुसाठी पायाभूत सुविधा

पीएमसी कर्मचारी वसाहती किंवा पोलीसांच्या वसाहती पाहा, त्यानंतर तुम्हाला ते कामावर सतत का वैतागलेले असतात हे समजेलकोणत्याही सार्वजनिक सेवा संस्थेत काम करणा-या    कर्मचा-याला व्यवस्थित घर तसेच वैद्यकीय व मनोरंजनासारख्या सुविधा दिल्या पाहिजेत. आपण त्यानंतरच त्यांना त्यांच्या कर्तव्यासाठी म्हणजे सामान्य माणसाची सर्वोत्तम सेवा करण्यासाठी जबाबदार धरु शकू!
सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे व स्मार्ट शहर हे आपले सामाईक उद्दिष्ट असले पाहिजे, तरच ते साकार होऊ शकेल! हे केवळ एका माणसाने पाहिलेले स्वप्न असेल मात्र त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने अहोरात्र झटले पाहिजे, असे झाले तरच ते प्रत्यक्ष होईल. नाहीतर तर ते केवळ एक स्वप्नच राहील व काळाच्या ओघात विस्मृतीत जाईल! आपण संघटितपणे हे स्वप्न साकार करताना अतिशय संयम ठेवला पाहिजे तसेच सातत्य राखले पाहिजे!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स