Thursday 17 October 2019

आभाळ फाटले,स्मार्ट शहर बुडाले !


















पहिल्या पूरानी काहीच अक्कल आली नसेल म्हणूनच कदाचित देव दुसरा पूर पाठवतो”… निकोलस चँफर्ट

सबॅस्टियन-रॉश निकोलस, यांना निकोलस चँफर्ट व सबॅस्टियन निकोलस डी चँफर्ट म्हणूनही ओळखतात. ते एक प्रसिद्ध फ्रेंच लेखक होते व त्यांच्या लेखनात विनोदी वाक्यप्रचार व म्हणींचा सढळ वापर असायचा. निकोलस यांच्यासारख्या प्रगल्भ व्यक्तींमुळेच युरोपचा प्रदेश विज्ञान व  कला विषयात  प्रगत आहे तसंच त्यांची निसर्गाबाबतची जाणीवही प्रगल्भ आहे.वरील अवतरणात देवानं युरोपात पूर पाठवताना हात आवरता घेतला असला तरीहीतो आपल्या स्मार्ट पुणे शहरातला पूर थांबवण्याचं मात्र नाव घेत नाहीये आपल्या स्मार्ट नागरिकांना तरी या मॉन्सूनमध्ये असाच अनुभव येतोय. पुणे पावसाळ्यातील पुराच्या बाबतीत मुंबईलाही मागे टाकेल असा विचारही कुणी केला होता का?आपण वर्षानुवर्षे मुंबई पावसाळ्याला तोंड देण्यात कशी अपयशी ठरते हे अगदी जवळून पाहात असतानाआपल्याकडेही असं होणं ही काही अभिमानाची बाब नाही.आत्तापर्यंत पाऊस, पर्यावरण, माणसानं (बांधकाम व्यावसायिकांनी) नैसर्गिक जलस्रोतांवर केलेलं अतिक्रमण, झपाट्याने होत असलेली वृक्षतोड, काँक्रिटीकरण, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधलेली सदोष गटारे, प्लास्टिकच्या वापरामुळे तुंबलेली गटारे व अशा इतर अनेक कारणांमुळे पूर येतो व प्रचंड नुकसान होते याविषयी कितीतरी लिहीण्यात आलंय. मी तीस वर्षांहून अधिक काळापासून पुण्यात राहतोय व इथला पाऊसही पाहिलाय, पण यावेळी पावसामुळे आलेली आपत्ती अभूतपूर्व आहे. आपण नेहमीप्रमाणे पावसाला दोष देतोय पण हा निसर्ग आहे व निसर्गाला कुणी थांबवू शकत नाही.पण आपण निसर्ग चक्रात व्यत्यय नक्कीच आणू शकतो व आपण सध्या तेच पाहतोय नाही काआता हा लेख पुरासाठी कुणालातरी दोष देण्यासाठी नाही, ते करण्यासाठी बरेच जण आहेततर मला पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे तर्कशुद्ध विश्लेषण करण्यासोबतच त्यासाठीच्या उपाययोजना मांडायच्या आहेत. एक लक्षात ठेवा या पुरासाठी केवळ पाऊसच नाही तर आपल्यापैकी प्रत्येकजण जबाबदार आहे व म्हणून आपण यापुढे काय व कशाप्रकारे करू शकतो हे पाहू.

सर्वप्रथम आपण पावसामुळे आलेल्या पुरामुळे शहरात व नागरिकांना कायत्रास होतोय, गैरसोय होतेय किंवा नुकसान झालेय हे पाहू. सगळ्यात मनःस्ताप हा असंख्य सोसायट्यांच्या सिमा भिंतींचे / वा रिटेनिंग भिंतींचे झालेले नुकसान व त्यामुळे पार्किंगमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे वाहनांचे नुकसान झाले आहे.त्यानंतर जवळपासच्या नाल्यातले (जे आधी ओढे होते) किंवा अगदी रस्त्यावरचे (जे आता नाले झाले आहेत) पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे ही घरे कोसळली यामध्ये प्रामुख्याने पत्र्यांच्या व निकृष्ट दर्जाच्या (सांगायची गरजच नाही) विटांनी बांधलेल्या अवैध घरांचा समावेश होता, यामध्ये रहिवाशांचे जीव गेले तसेच मालमत्तेचे नुकसान झाले.दर्जेदार बांधकाम असलेल्या कायदेशीर घरांना म्हणजेच बंगल्यांनाही पुराचा फटका बसला ज्यामुळे फारशी जीवित हानी झाली नसली तरीही मालमत्तेचे नुकसान नक्कीच झाले. रस्त्यांवर हजारो वाहने पुराच्या पाण्यात अडकून राहिली व त्यातही काही दुर्दैवी वाहून गेली त्यामुळे वाहनांचे प्रचंड नुकसान झाले तसेच लोकांचे जीवही गेलेपाण्याच्या जोरदार प्रवाहात अनेक झाडेही उन्मळून पडली व अनेक ठिकाणी लहान पूल किंवा साकवही वाहून गेले.अनेक ठिकाणी मीटर, ट्रान्सफॉर्मर, वीजवाहक तारा वगैरे विजेचे साहित्य खराब झालेआणखी एक नुकसान अतोनात झालं ते म्हणजे पुराच्या पाण्यामुळे रस्त्यावरच्या वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडल्याने, बचाव कार्यात तसंच पुरानंतरच्या कामांमध्ये अनेक लोकांचा बहुमूल्य वेळ वाया गेला. आणखी एक गोष्ट म्हणजे लोकांनी आता पावसाचा धसका घेतलाय, आता थोडासाही पाऊस पडला की लोक घाबरून किंवा गोंधळून जातात. एकेकाळी शांत व आनंदी म्हणून नावलौकिक असलेल्या या शहराचं हे मोठं नुकसान आहे. आता हे शहर पूर्वीसारखं आहे असं आपल्याला म्हणता येईल का, संध्याकाळी ऑफिसमधून घराकडे निघताना आपली नजर आधी आकाशाकडे जाते. आकाशात ढग असतील तर भीतीनं काळवंडलेले चेहरे पुरामुळे काय नुकसान झालंय हे सांगतात.

ही सध्याची परिस्थिती आहे आणि माझा असा प्रश्न आहे की जर पावसामुळे पूर आला नसेल तर त्याला जबाबदार कोण, देव?या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी देण्याएवढे आपण मूर्ख असू असं मला वाटत नाही. मग जर आपण मूर्ख नसू तर पुरासाठी व त्यामुळे झालेल्या नुकसानासाठी जबाबदार कोणतसंच दुसरा प्रश्न म्हणजे आपण पाऊस नियंत्रित करू शकत नाही पण आपण पूरही नियंत्रित करू शकत नाही का, याचे उत्तर करू शकतो असा असेल तर पुन्हा पहिला प्रश्न त्याची जबाबदारी कुणाची आहे? तर या सगळ्या प्रश्नांचे उत्तर होय असं आहे, आपण पूर नियंत्रित करू शकतोआणि पूर टाळणं ही आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण ती जबाबदारी पार पाडली नाही तर पुरामुळे होणाऱ्या नुकसानाला आपण सगळे जबाबदार आहोत. विनोद म्हणजे शहरात काहीही वाईट झालं (उदाहरणार्थ पूर) तरी त्याला सगळे जबाबदार आहेत असं आपण म्हणतो तेव्हा एकमेकांना दोष द्यायची स्पर्धा सुरू होते, खरंतर दुसऱ्याला दोष देणे हा आपला राष्ट्रीय खेळ घोषित केला पाहिजे ईतके आपण त्यात पारंगत आहोतपूर नियंत्रणाची जबाबदारी सगळ्यांची असली तरीही प्रत्येकाची भूमिका निश्चित असली पाहिजे व आपण नेमके हेच करत नाही. आपण सगळ्यांनी आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकजण अपयशी ठरला आहे. आपल्या निष्काळजीपणासाठी आता आपण एकमेकांकडे बोट दाखवत आहोत.या पुरासाठी अनुक्रमे पुणे महानगरपालिका (म्हणजे तिचे कर्मचारी व लोकप्रतिनिधी), जलसिंचन विभाग, महसूल, पोलीस, न्यायव्यवस्था, स्वयंसेवी संस्था, वास्तुविशारद, नगर नियोजन, नागरी विकास, माध्यमं आणि हो बांधकाम व्यावसायिक (आपण त्यांना कसं विसरू शकतो) सगळे जबाबदार आहेत व त्यांच्यापैकी कुणीही हे स्वीकारणार नाही. त्याशिवाय सामान्य माणसंही (म्हणजेच नागरिक) पुरासाठी तितकीच जबाबदार आहेतकारण वर नमूद केलेल्या व्यक्ती कमी अधिक प्रमाणात पुरासाठी कारणीभूत असतील तर सामान्य माणूस वर नमूद केलेली माणसं करत असलेल्या प्रत्येक उद्योगात सहभागी आहेत.पुरामध्ये सर्वाधिक नुकसान झोपडपट्ट्यांचं झालंय, पण कुणीही या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या माणसाला तो तिथे राहायला का गेला हे विचारत नाही. अशा घरांमध्ये नैसर्गिक आपत्तींपासून काहीही संरक्षण नसते आणि हे संपूर्ण व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे झालं आहे. हा तर्क लावला तर मला माहितीय अनेक लोक माझ्यावरच आगपाखड करतील, “त्याला कायदेशीर घर परवडत नसल्यामुळे त्यानं अवैध घरात राहण्याचा पर्याय निवडला, हा त्याचा दोष आहे का?” मला मान्य आहे की हा त्याचा दोष नाही, पण असा तर्क लावला तर कुणीही कुशल किंवा सुशिक्षित बेरोजगार माणूस उद्या बँक लुटेल आणि म्हणेल मला नोकरी मिळाली नाही किंवा मी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाही, म्हणून मी बँक लुटली”, न्यायालय त्याचा युक्तिवाद मान्य करून त्याला सोडून देईल का? याचे उत्तर नाही असे आहे, मात्र या प्रकरणात आपण त्या व्यक्तीला शिक्षा देण्यात अपयशी ठरल्यामुळे, निसर्गानं न्याय केला आणि शिक्षा दिली. मी पीडितांविषयी पूर्णपणे सहानुभूती राखून हे विधान करतोय. मी हे म्हणतोय कारण मला माणसांचं तर माहिती नाही पण देवाचा न्याय अंधळा आहे. त्यानं नक्कीच चुकीच्या व्यक्तीला शिक्षा दिली आहे व निसर्ग देवता अशीच वागते. निसर्गासाठी माणसाने गुन्हा केला आहे म्हणून माणसांना शिक्षा देण्यात आली आहे. आपण जसं आपापली कामं ठरवून घेतो पण त्यानुसार ती करत नाही. कारण ती न करण्याची शिक्षा दुसऱ्या कुणाला तरी मिळेल हे आपल्याला माहिती असतं. पूर हे अशा गुन्ह्याचं उत्तम उदाहरण आहे.

कदाचित याच कारणामुळे पुरानेचुकीच्या माणसांना शिक्षा दिली आहे कारण तथाकथित जबाबदार माणसं (जी पुरामुळे प्रभावित झाली नाहीत) पूर नियंत्रित करण्यातील आपापली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरली आहेत.आता त्याच्या जबाबदारीविषयी बोलू, सर्वप्रथम वर नमूद केलेल्या प्रत्येक संस्थेचे म्हणजेच सरकारी विभागांचे कर्तव्य, भूमिका, जबाबदारी किंवा कामाची कक्षा आधी निश्चित करा. त्यानंतर ती राजपत्रात प्रकाशित करा, कारण या देशामध्ये एखाद्या गोष्टीची कागदोपत्री नोंद झाल्याशिवाय, कुणीही त्याची दखल घेत नाही हे कटू सत्य आहे.कुणाची जबाबदारी काय आहे हे व्यवस्थितपणे स्पष्ट करा व एखादी जबाबदारी विहीत वेळेत पूर्ण झाली नाही तर त्यांना त्यासाठी शिक्षा द्या, उदाहरणार्थ नैसर्गिक जलस्रोतांवर झालेली अतिक्रमणे कोणत्या विभागाने व किती काळात हटवली पाहिजेत.त्याआधी या सगळ्या नैसर्गिक जलस्रोतांची सीमा निश्चित करा, मग ते नाले असतील, ओढे किंवा नद्या.त्यानंतर पावसाचे पाणी किंवा मुसळधार पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या वाहिन्यांची समस्या येते. ही गटारांचे बांधकाम बरेचदा सदोष असते तसेच ती तुंबलेली असतात, यामुळे पावसाचे पाणी या गटारांमधून वाहून जाण्याऐवजी रस्त्यावरून वाहू लागते.पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेली गटारे सुस्थितीत असावीत व त्यांची देखभाल केली जावी यासाठी कोण जबाबदार असेल. पुरामध्ये झालेलीजीवितहानी व वाहतुकीच्या खोळंब्याचे एक मुख्य कारण म्हणजे अनेक ठिकाणी झाडे पडली, म्हणूनच रस्त्याच्या कडेने असलेल्या सर्व झाडांचे सर्वेक्षण केले पाहिजे जे काँक्रिटीकरणातही बळी पडू शकते. आता काँक्रिटीकरणाला नावं ठेवण्यापेक्षा त्यामुळे झाडाचं जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई करणं महत्त्वाचं आहे. अशा झाडांभोवतीचा भाग मोकळा करा, म्हणजे पाणी आत झिरपू शकेल व मुळे खोलवर रुजू शकतील.असेही आढळून आले आहे की जी झाडे उन्मळून पडली ती परदेशी झाडे होती म्हणजे रेन ट्री ,गुलमोहर किंवा सुबाभूळ, म्हणूनच अशी झाडे आधीच शोधा व ती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा. अशा झाडांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या कापा. या फांद्या पावसामुळे जड होतात व झाडावरील भार वाढल्यामुळे ते उन्मळून पडते.पावसाळ्यामध्ये जी नासधूस झाली त्यानंतर सगळीकडे फरसबंदी करण्याच्या आपल्या योजनेचा विचार करण्याची व आणखी जागा उघडी ठेवण्याचा विचार करण्याची वेळ आली आहे, ज्यामुळे पावसाचे पाणी जमीनीत झिरपू शकेल.आपल्याकडे नगर नियोजन प्राधिकरण असले पाहिजे जे आपल्याला शहरातील विशेषतः पाणी तुंबणाऱ्या भागांचा आराखडा देईलत्यानंतर पाणी तुंबणाऱ्या भागांची तसेच पूरग्रस्त भागांची नोंद करेल व अशा भागांमधून पावसाच्या पाण्याची निचरा होण्यासाठी स्थानिक उपाययोजना देईल. म्हणून हे काम विशिष्ट काळात पूर्ण करण्यासाठी चमू तयार केले पाहिजेत.

त्याचसोबत न्यायालय व पोलीस विभागाने संबंधित जबाबदार विभागांनी केलेल्या कारवाईला पाठिंबा दिला पाहिजे, नाहीतर अशा कारवाईला स्थिगिती मिळवणे किंवा काम थांबवणे हीच अतिक्रमण करणाऱ्या संस्थांची काम करण्याची पद्धत दिसते. ही प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित असतात, त्यामुळे प्रकरण न्यायालयांतर्गत असल्याचे कारण देऊन जबाबदारी टाळणे सहज शक्य होते. पोलीसांची भूमिकाही अतिशय महत्त्वाची असते कारण या देशात लोक खाकीचा आदर करत नसले तरी तिला किमान घाबरतात (किमान आत्तापर्यंत अशीच परिस्थिती आहे). जोपर्यंत पोलीसांकडून व्यवस्थित संरक्षण मिळत नाही तोपर्यंत जलसिंचन विभाग असो किंवा पुणे महानगरपालिका अथवा वन विभाग कोणताही विभाग अवैध बांधकाम पाडू शकत नाही. मात्र पोलीस विभाग आत्तापर्यंत अशाप्रकारे संरक्षण देण्यात अपयशी ठरला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची दैनंदिन कामे पार पाडण्यासाठीही त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. म्हणून पोलीस विभागाला इतर विभागांना मदत करता यावी यासाठी पुरेसे मनुष्यबळ व पायाभूत सुविधा द्या. पूर नियंत्रणासाठी कारवाई करणे ही सुद्धा एक जबाबदारी आहे. त्याचवेळी न्यायालयाने पूर नियंत्रणातील कोणत्याही अडथळ्याच्या वादासंबंधी वेगाने कारवाई करावी एवढीच विनंती मी करू शकतो, कारण न्यायालयालाच आदेश कोण देणार?राजकारण्यांना (म्हणजे निवडून आलेल्या सदस्यांना) माफ करू नका  ते कोणत्याही कृती योजनेच्या आड आल्यास त्यांना निवडून आलेल्या पदावरून निलंबित करा किंवा पुढील निवडणूक लढविण्यापासून प्रतिबंधित करा,  हाच एकमेव उपाय आहे.

मी काल रात्री हा लेख लिहीत असताना, पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनीक वाहतुकीच्या सर्विस व्हॅनवर एक मोठे पिंपळाचे झाड पडले. पिंपळासारखे देशी वृक्ष का उन्मळून पडतात याची कारण शोधता येऊ शकतात पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या सर्विस व्हॅनचा चालक झाड पडल्याने दोन तास व्हॅनमध्येच अडकून पडला, बाहेर पडू शकला नाही कुठुनही काहीच मदत न आल्यानं त्याचा अखेर तडफडुन मृत्यू झाला.या स्मार्ट शहराच्या मध्यवर्ती भागात एका माणसाचा अपघात होतो, आपण दोन तासांनंतरही त्याची सुटका करू शकत नाही तरीही निर्लज्जपणे आपण स्मार्ट शहर म्हणून मिरवतो,धन्य आहे!पुरानंतरच्या नाहीतर कुठल्याही आपत्तीनंतरच्या परिस्थितीसाठीही जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आलीय हे आता तरी मान्य करा . या सगळ्या जबाबदाऱ्या असल्या तरीही त्या वेळेत पूर्ण केल्या जात नाहीत हे वारंवार सिद्ध झाले आहे. म्हणूनच मी वाचकांना पुन्हा एकदा जाणीव करून द्यायचा प्रयत्न करतोय, एवढंच मी म्हणू शकतो.  

हे झालं सरकारी विभागांविषयी, पण खाजगी क्षेत्रं, तसंच माध्यमं, बांधकाम व्यावसायिक, सामान्य माणूस यांच्यावर कोणत्याही पगारी नोकरीच्या कर्तव्याचं बंधन नसलं तरीही नैतिक कर्तव्याचं बंधन असतं. हे नैतिक कर्तव्य केवळ निसर्गाप्रतीच नाही तर संपूर्ण शहराच्या सुरक्षेप्रती आहे. खाजगी क्षेत्रातील लोकांनी स्वतःला याची आठवण करून दिली पाहिजे.माध्यमांनीही केवळ पूर येऊन गेल्यानंतर जागे होऊ नये, बातम्यांचे मूल्य वाढविण्यासाठी पुरामुळे झालेल्या नुकसानाची छायाचित्रे दाखवू नयेत. तर वर्षभर वरील सर्व विभाग व त्यांच्या कामगिरीवर लक्षं ठेवले पाहिजे, यंत्रणा जिथे अपयशी ठरेल त्याविषयी लोकांना जागरुक केले पाहिजे. त्यानंतर येतात बांधकाम व्यावसायिक, मी जेव्हा बांधकाम व्यावसायिक म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ केवळ एखाद्या विकास योजनेच्या दृष्टिनं नाही तर निसर्गाच्यादृष्टिने अवैध असलेल्या इमारती किंवा बांधकामाशी संबंधित कुणीही व्यक्ती असा होतो. अनेक जण माझ्या या विधानाशी सहमत होणार नाही, म्हणजे याचा अर्थ तथाकथित डीपी निरुपयोगी आहे कायावर मला एकच प्रतिप्रश्न करावासा वाटतो आपण एवढे नुकसान झाल्यानंतरही केवळ कार्यालयात बसून तयार केलेल्या एखाद्या नकाशानुसार काम करणार आहोत की आपल्याला खरोखरच माणसाच्या जिवाची काळजी आहे.बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद, बांधकाम सल्लागार, बांधकामस्थळावरील अभियंते, प्लंबिंग तसंच इलेक्ट्रिकल सल्लागार या सगळ्यांनी केवळ एफएसआय, खर्चाची बचत, विक्रीयोग्य क्षेत्र यांचा विचार करू नये तर मानवी जीवनाचा विचार करून इमारतीचे नियोजन करावे.प्रत्येक व्यक्तीने घर खरेदी करताना विजेच्या मीटरची जागा, तळमजल्यावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठीची गटारे या सगळ्या सुविधा व्यवस्थित पाहिल्या पाहिजेत, केवळ उंची सोयीसुविधांवर भाळू नये. कारण पुरासारख्या आपत्तीच्यावेळी त्या काही कामाच्या नसतात. मला जातक कथामधली एक गोष्ट आठवतेय, त्यात एक पंडित (म्हणजे एक शिकलेला माणूस) बोटीत बसून नदी ओलांडून दुसऱ्या गावात चाललेला असतो, ही बोट एक स्थानिक माणूस वल्हवत असतो. या प्रवासात तो पंडीत नावाड्याला विचारतो, तू वेद वाचले आहेत का, यावर नावाडी खजील होऊन उत्तर देतो, नाही. त्यावर पंडित म्हणतो तुला सांगतो, तुझं निम्मं आयुष्य वाया गेलंय. थोडं अंतर गेल्यानंतर पंडित पुन्हा नावड्याला विचारतो, तू उपनिषदे (तत्वज्ञान व पौराणिक ज्ञानाविषयी पुस्तके) वाचली आहेस का, त्यावर पुन्हा नावाडी उत्तर देतो, नाही. पंडित नावाड्याला म्हणतो, तुझं तीन चतुर्थांश आयुष्य वाया गेलंय. नाव आणखीन पुढे जाते, तेवढ्यात वादळ सुरू होतं, नाव हेलकावे घेऊ लागते.आता नावाडी पंडिताला विचारतो, महाशय तुम्हाला पोहता येतं का, त्यावर पंडित घाबरून म्हणतो नाही, मला पोहता येत नाहीयावर नावाडी म्हणतो, अहो तुमचं तर संपूर्ण आयुष्य वाया गेलं आता!

स्मार्ट नागरिकांनो, जातक कथा हजारो वर्षं जुन्या असल्या तरीही अजूनही आपल्या भोवती पंडित व नावाड्यांसारखी माणसं आहेत,प्रश्न असा आहे की आपल्याला पंडित व्हायचंय की नावाडीयाच्या उत्तरावरच पुढील पुराच्या वेळी आपलं आयुष्य वाया गेलं की सार्थकी लागलं हे ठरेल. तोपर्यंत पावसाचा आनंद घ्या!

संजय देशपांडे
संजीवनीडेव्हलपर्स

Thursday 10 October 2019

स्मार्ट सिटीचे अभिमन्यु !





















आपण जेवढे पहिल्या आपत्तीपासून लांब जातो, खरंतर तेवढेच आपण पुढील आपत्तीच्या जवळ जात असतो .”… डॅनियल सिल्ह्वा
ते त्यांच्या पिढीतील अमेरिकेतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय कट व गुप्त हेरकथा लेखक मानले जातात. डॅनियल सिल्ह्वा या न्यूयॉर्क टाईम्सच्या यादीनुसार सर्वाधिक खपाची पुस्तकं असणाऱ्या, पुरस्कार विजेत्या लेखकाच्या लेखनासाठी गुंतवून ठेवणारं, तळमळीनं लिहीलेलं, मनाला पछाडणारं, बुद्धिमान अशी कितीतरी विशेषणं लावली जातात.25 सप्टेंबर 19 च्या रात्री आपल्या स्मार्ट शहरानं या हेरकथा लेखकाचे शब्द खरे ठरवले. त्यादिवशी भीषण पाऊस झाला. पण आपण जी भयंकर परिस्थिती अनुभवली ती फक्त पावसामुळे झालेली नव्हती. ती माणसाच्या निष्कळाजीपणामुळे, आपण केवळ निसर्गाकडेच नाही तर स्वतःकडे केलेल्या दुर्लक्षामुळे आलेली आपत्ती होती. तथाकथित सरकारी अधिकारी (म्हणजे विभाग) ज्यांनी कारवाई करणं किंवा खबरदारी घेणं अपेक्षित होतं, तसंच बांधकाम व्यावसायिक (म्हणजे मला म्हणायचंय की ज्याने कुणी नाल्यांवर काहीतरी बांधकाम केले आहे अशी प्रत्येक व्यक्ती)ज्यांनी बहुतेक नाले किंवा ओढे किंवा पाणी वाहून नेणारे नैसर्गिक स्रोत बुजवून टाकले आहेत, त्याशिवाय ज्यांनी या पुरात आपला जीव तसंच आयुष्यभर गाठीशी जोडलेला पैसा गमावला तेसुद्धा या आपत्तीसाठी कुठेतरी जबाबदार आहेत असं मी म्हणेन.

अनेकांना माझे वरील विधान आवडणार नाही, कारण आत्तापर्यंत नेहमीप्रमाणे समाज माध्यमं, वृत्त माध्यमं, राजकारणी, सरकार, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणवादी व सामान्य माणूस (म्हणजेच नागरिक), सगळेजण पावसामुळे जो पूर आला व त्यामुळे तथाकथित निष्पाप नागरिकांचं जे नुकसान झालं त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना व संपूर्ण व्यवस्थेला दोष देण्यात व्यग्र आहेत.तीसहून अधिक लोक मरण पावले आहेत व विविध कुटुंबातल्या व्यक्तींना आपल्या प्रियजनांना वाचवताना कसा जीव गमवावा लागला याच्या हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. रोहित आमले नावाचा एक केवळ पंधरा वर्षांचा आईविना मुलगा त्याच्या आजीचा जीव वाचवताना मरण पावला. एका माणसाच्या घरात जवळपासच्या ओढ्याच्या पाण्याचा लोंढा शिरल्यानंतर घरातून बाहेर पडत असतानातो केवळ त्याच्या एका मुलाला वाचवू शकला, मात्र बायको व दुसऱ्या मुलाला वाचवू शकला नाही.त्यानंतर दोन उच्चशिक्षित तरूण होते, त्यातील सलीम शेख आयटी कंपनीमध्ये अभियंता होता व त्याचा मित्र सीएचा अभ्यास करत होता. दोघंही जण पाणी वाहत असलेला ओढ्यावरचा पूल कारनं ओलांडत असताना त्यांची कार वाहून गेली.त्यानंतर अनेक सोसायट्यांच्या तळघरात हजारो कार व दुचाकी अजूनही बुडालेल्या आहेत, यामुळे अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या सगळ्यात काही आश्चर्यकारक घटनाही घडल्या आहेत. एका मध्यमवयीन माणसाची कार नाल्यातून आलेल्या पाण्याच्या लोंढ्यातून वाहात जात होती. मात्र त्याने काही झुडुपांना धरून ठेवल्याने तो वाचला. तीन तास पाण्यात आणि अंधारात घालवल्यावर त्याची सुटका करण्यात आली.अर्थात सगळे एवढे सुदैवी नव्हते. या पुरामुळे झालेली जीवितहानी व मालमत्तेचं नुकसान याची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बहुतांश गरीब लोकांचीमाती व पत्र्यापासून बांधलेली हजारो घरं वाहून गेली आहेत. लहान विक्रेत्यांची दुकानं किंवा दैनंदिन उपजीविकेची साधनंही हातची गेली आहेत.त्या भयाण रात्रीनंतर पाच दिवसांनीही नक्की किती नुकसान झालंय याची अंतिम आकडेवारी आलेली नाही. बचाव व शोध मोहीम सुरू आहे, स्मार्ट शहराची ही अवस्था आहे.केवळ तीन तासांच्या पावसातच ही आपत्ती ओढवली, चांगलंयआणि हा निसर्गाचा पहिला प्रस्ताव  आहे शेवटचा नाही !
आतापर्यंत या आपत्तीच्या कारणांचं विश्लेषण करण्यासाठी तज्ञ समिती स्थापित झाली असेल. प्रत्येक जण आपापली बाजू मांडताना इतरांना दोष देईल (सरकार, बांधकाम व्यावसायिक, झोपड्या इत्यादी)व त्यानंतर विश्लेषण करून गोगलगाईच्या गतीनं त्यावरील उपायोजना सादर केल्या जातील. म्हणूनच मला माझा किंवा वाचकांचा वेळ नैसर्गिक जलस्रोतांवर अतिक्रमणे झाली, अवैध बांधकामे पाडली पाहिजेत, पूर रेषा आखल्या पाहिजेत, पावसाचे पाणी शोषण्यासाठी जमीन उघडी ठेवली पाहिजे, म्हणजेच शहरातल्या प्रत्येक जमीनीचे काँक्रिटीकरण करू नका असं सांगण्यात घालवायचा नाही. पण हे काहीच थांबणार नाही, लोक काही काळानी हे सगळं विसरून जातील व आयुष्य पुन्हा सामान्य होईल, जसं ते पूर्वी होतं. मला एक मुद्दा मांडायचा आहे तो म्हणजे या सगळ्या घटनांमध्ये विशेषतः जिथे मृत्यू झाले तसंच घरातल्या वस्तू व रस्त्यावरील किंवा इमारतीमध्ये लावलेल्या गाड्यांचं नुकसान झालं, तिथे कुणाच्याच लक्षात आली नाही अशी एक महत्त्वाची एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे कासत्य असं आहे की आपण सर्वप्रथम पुरासारख्या अशा आपत्तीसाठी तयारच नव्हतो, हे आपल्या अजिबात लक्षात आलेलं नाही. मी सरकारविषयी बोलत नाही, खरंतर अग्निशमन दल व पोलीसांनी त्यांच्या मर्यादित संसाधनांमध्ये उत्तम कामगिरी केली, (तो सुद्धा आपल्या अपुऱ्या तयारीचाच एक भाग आहेव जीव तसंच मालमत्ता वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मी आपण नागरिकांविषयी बोलतोय. आपण काही वर्षांपूर्वी जपानमध्ये आलेल्या त्सुनामीमुळे आलेले पूर विसरलोय का (अर्थातच आपण विसरलोय), असाल तर तुम्ही यू ट्यूबवर जा व त्या ध्वनीचित्रफिती पाहा. त्यात लोकांनी त्या आपत्तीला कसं तोंड दिलं व प्रतिसाद दिला हे तुम्हाला समजेल.त्यातून आधी जीव वाचण्यासाठी व जमल्यास मालमत्ता वाचवण्यासाठी अतिशय शिस्तबद्धता, परिपक्वता व दृढ निश्चय दिसून आलामाफ करा, पण जेथे हेल्मेट घालणे, रस्त्याच्या योग्य बाजूने वाहने चालवणे यासारखे वाहतुकीचे साधे नियम पाळले जात नाहीत तेथे तुम्ही बेसावध असताना पुरासारखी नैसर्गिक आपत्ती आल्यावर गोंधळ व गदारोळाशिवाय दुसऱ्या कशाची अपेक्षा करू शकताखरंतर आपल्यासाठी बेसावध हा अतिशय चुकीचा शब्द आहे कारण आपल्याला सावध असणे म्हणजे काय हेच माहिती नाही ही दुर्दैवानं वस्तुस्थिती आहेआपल्याला आपत्तीला कसं तोंड द्यायचं हे माहिती नव्हतं,आपत्तीचं मुख्य कारण काय होतं, आहे व असेल हे माहिती नाही त्यामुळेच मृतांचा आकडा एवढा वाढला, दर आपत्तीच्या वेळी हा आकडा वाढत राहिला तर मला आश्चर्य वाटणार नाही.आपल्याला आपत्ती थांबवता येत नसेल तर आपल्याला कमीत कमी नुकसान होईल अशाप्रकारे त्याला तोंड देता यायला हवं, नाही का?

खरंतर रोहित आमलेसारख्या मुलाचा मृत्यू पुरामुळे झालेला नाही तर यंत्रणेमुळे झालाय. कारण या यंत्रणेनं त्याला अशा परिस्थितीत काय करायचं हे शिकवलंच नाही. आपली यंत्रणा इतकी गहाळ (घमेंडीत) राहिली की रोहितला त्याच्या म्हाताऱ्या व असाहाय्य आजीला पुराच्या पाण्यातून वाचवावं लागेल अशी परिस्थिती कधी निर्माण होईल असा विचारच तिनं कधी केला नाहीत्या मुलाला फक्त एवढंच माहिती होतं की त्यांच्या घरात पाणी शिरत असताना आजीला एखाद्या सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं, पण हे करत असताना स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं हे त्याला कुणी शिकवलंच नव्हतं. ज्या देशाच्या पुराणांमध्ये अभिमन्यूची गोष्ट आहे तिथे आणखी काय अपेक्षा करता येईल? या शूर अभिमन्यु नावाच्या तरुणाला चक्रव्यूहात (सैन्याची रचना) पाठवण्यात आलं, त्यात आत कसं शिरायचं हे त्याला माहिती होतं पण बाहेर कसं पडायचं हे माहितीच नव्हतं, या प्रक्रियेमध्ये त्याला जीव गमवावा लागला.रोहित आमले हा खरंतर आपल्या स्मार्ट शहरातला अभिमन्यूच आहे, या पुरामध्ये ज्यांना जीव गमवावा लागला त्या प्रौढांच्या बाबतीतही असंच म्हणावं लागेल. सलीम शेख व त्याचा मित्र पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यांना गाडी चालवता येत होती व त्याचा मित्र पट्टीचा सायकलपटू होता. त्यानं अनेक प्रदेशांमध्ये सायकल चालवली होती, पण त्या दोघांना हे माहिती नव्हतं की पाणी फुटभरही असलं तरी वेगाने वाहत असेल तर त्यात कार उलटू शकते व त्यामुळे कारमधल्या लोकांचा जीव जाऊ शकतो. त्यांना असं वाटलंकी त्यांच्या कारला वाहत्या पाण्यात काहीही होणार नाही, पण ते चूक होते. त्यांच्या या चुकीमुळे त्यांचा जीव गेला, आता मागे त्यांची दुःखी कुटुंब आहेत.ज्या माणसानं पुरात घराची भिंत कोसळल्यामुळे आपला एक मुलगा व बायको गमावली त्याला एक गोष्ट माहिती नव्हती की पूर आल्यानंतर घरातून बाहेर पडण्यासाठी फार वेळ वाट पाहू नये. पाण्याची पातळी अतिशय वाढल्यास त्यामुळे तुमच्यावर भिंत कोसळून मृत्यू ओढवू शकतो. असा मृत्यू पाण्यामुळे नाही तर इमारतीच्या मलब्यामुळे होऊ शकतो, जो तुमच्याही घराचा असू शकतो.एका स्थापत्य अभियंत्याच्या बाबतीतही हेच झालं तो कारमध्ये वाट पाहात बसला होता मात्र पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गात होता व त्याच्या चुकीमुळे (म्हणजे अज्ञानामुळे) त्याला जीव गमवावा लागला, कारण त्याची कार पाण्यात वाहून गेली व तो कारमध्येच होता.
हे झालं मृतांविषयी, हजारो वाहनांच्या मालकांनी आपली वाहने आहेत तिथेच सोडली पण ती सुरक्षितपणे बांधून ठेवली नाहीत. त्यांचा जीव वाचला, पण दुसऱ्या दिवशी त्यांना वाहनांची अतिशय नासधूस झालेली दिसली किंवा त्यांनी दुचाकी किंवा चारचाकी जिथे सोडल्या होत्या त्यापासून कित्येक मैल लांब जाऊन पडलेल्या दिसल्या. पाण्याच्या प्रवाहानं या गाड्या लांबवर वाहून नेल्या व बुडून झाले असते त्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान झाले. तुम्ही कोणतीही कार तपासा (दुचाकी बाजूला ठेवा), त्यापैकी किती कारमध्ये नायलॉनचा दोरा, हुक, फ्लॅश लाईट तसंच कुऱ्हाडीसारखी साधने ठेवलेली असतात जी अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी आवश्यक आहेत. मी पैजेवर सांगतो की एकाही कार मालकानं असं साहित्य कारमध्ये ठेवलं नसेल. ज्या व्यवस्थेमध्ये तो मोठा झाला तिनं त्याला फक्त गाडी चालवायला शिकवलं. तो चालवत असलेली कार कधीतरी पाण्याच्या प्रवाहात अडकेल व त्याला कार सोडून द्यावी लागेल असं तिला कधी वाटलंच नाही.त्याशिवाय त्या रात्री अशा अनेक घटना झाल्या जिथे दुचाकी किंवा चारचाकी चालकांना स्थानिक स्वयंसेवकांनी पाणी तुंबलेल्या रस्त्यावरून पुढे जाऊ नका असा सल्ला दिला, मात्र लवकरात लवकर घरी पोहोचायची घाई असल्यामुळे चालकांनी इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. या सगळ्यात त्यांनी स्वतःचा जीव तसंच वाहनं धोक्यात घातली. मी यापैकी कोणत्याही चालकांना दोष देत नाही. त्यांच्यापैकी कुणालाही, कधीही शाळा किंवा महाविद्यालयामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये अशा आपत्तींच्या वेळी पुढील धोक्याच्या इशाऱ्यांचं पालन करण्याविषयी व शिस्तबद्धपणे कृती करण्याविषयी कधीच शिकवण्यात आलं नाही.त्यानंतर ज्या लोकांची इमारतीमध्ये किंवा तळघरात लावलेली वाहनं वाहून गेली त्यांच्याविषयीत्यांनासुद्धा अडाणीच म्हटलं पाहिजे. त्यांनी कधी विचारच केला नाही की त्यांच्या इमारतीशेजारच्या नाल्याची भिंत तुटली तर पाण्याच्या प्रवाहाला वाट कशी करून द्यायची. पाणी साचलं तर ते उपसून काढायला कोणत्याही सोसायटीकडे पंपिंग यंत्रणा नाहीकिंवा डिझेल पंप्स नाहीत जे लाईट गेल्यावर पण चालतात !
तसंच कोणत्याही सोसायटीनं पुराच्या पाण्यामध्ये सुरक्षा सिमा भिंत कशी टिकून राहील हे तपासलं नाही.लोक आता म्हणतील की हे तपासायची जबाबदारी बांधकाम व्यावसायिक किंवा पुणे महानगरपालिकेची नव्हती का, अर्थातच होती पण आता वाहनं कुणाची बुडाली, बांधकाम व्यवसायिकांची का पुणे महानगरपालिकेची? लोकहो तुम्ही दरवर्षी तुमच्या वाहनाचा विमा काढता (आरटीओच्या नियमांची कृपा नाहीतर मला शंका वाटते आपल्यापैकी किती जणांनी तो काढला असता), तर मग तुम्ही तुमच्या इमारतींच्या पायाभूत सुविधांचं पूर किंवा अगदी आगीसाठी सुरक्षा लेखापरीक्षण का करून घेत नाही?

सगळ्यात शेवटी आपला अग्निशमन विभाग व पोलीस दलाच्या जवानांच्या शौर्याविषयी. त्यांनी त्यांचे जीव धोक्यात घालून शक्य त्या सर्व माणसांना तसंच  पाळीव प्राण्यांनाही वाचवलं. एक लक्षात ठेवा हे जवान लोकांचे जीव वाचवत असताना त्यांच्या जीवाला असलेला धोका त्यांच्या वरिष्ठांना नक्कीच माहिती असेल, पण या वरिष्ठांच्याही वर बसलेले लोक अडाणी, अनुत्सुक व निष्काळजी आहेत. असं नसतं तर त्यांनी अग्निशमन विभागाला इतकं कमी मनुष्यबळ तसंच संसाधनांसह एवढ्या भयंकर परिस्थितीला तोंड देण्यासाठी वाऱ्यावर सोडलं नसतं. आपण सगळे हॉलिवुड चित्रपटांमध्ये पाहतो की कोणतीही नैसर्गिक किंवा मनुष्यनिर्मिती आपत्ती आल्यानंतर हेलिकॉप्टरपासून सगळी आधुनिक यंत्रसामग्री कामाला लागते, इथे अग्निशमन दलाच्या जवानांकडे नागरिकांना वाचवताना साधी लाईफ जॅकेटही नव्हती. यानंतरही आपण या आपत्तीसाठी निसर्ग देवतेलाच दोष देतोय, केवळ ती आपल्याला उलट दोष देत नाही म्हणून पण लक्षात ठेवा  निसर्ग देवता  तिच्या पद्धतीने उत्तर देते  आणि त्यालाच आपण नवीन नैसर्गिक आपत्ती असं म्हणतो, हे लक्षात ठेवा स्मार्ट शहराच्या अभिमन्युनो!

संजय देशपांडे
संजीवनीडेव्हलपर्स