Saturday 30 September 2023

घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती ?














घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती ?


आपण ज्याला पाहू शकत नाही अशा देवावर विश्वास ठेवणे व तो योग्य वेळी आपल्या मदतीला धावून येईल ही अपेक्षा करणे  म्हणजेच श्रद्धा .” … गिफ्ट गुग्यू मोना

तुम्हाला योग्य वेळ व योग्य दिशेची जाणीव नसेल तर सूर्योदय सुद्धा सूर्यास्तासारखा दिसतो.” … अमित कलंत्री

     या अवतरणांमुळे तुम्हाला असे वाटू शकते की हा लेख तत्वज्ञानाविषयी आहे ( तो आहे परंतु वेगळ्या अर्थाने ) कारण योग्य वेळेची आपण सर्वच जण आतूरतेने वाट पाहात असतो व विरोधाभास म्हणजे, मी झेन तत्वज्ञानाचा चाहता आहे (निस्सीम चाहता, अनुयायी वगैरे), ज्यामध्ये चुकीची वेळ असे काही नसते कारण निसर्गामध्ये जे काही होते ते योग्य वेळीच होते असे त्यामध्ये मानले जाते. परंतु तरीही प्रत्येक जण योग्य वेळेविषयी का बोलत असतो हा एक मोठा प्रश्न आहे ! आता हेसंवाद पाहा, ही सोने खरेदी करण्यासाठी योग्य वेळ आहे का किंवा कार खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का किंवा तुमच्यासाठी लग्न करण्याकरता ही योग्य वेळ आहे का व असे अनेक प्रश्न आहेत जे तुम्हाला ओळखीचे वाटत असतील नाही का? आपले पुर्ण आयुष्य या योग्य वेळेच्या अवती-भोवती फिरत असते कारण बरेचदा आपण यशाचे श्रेय योग्य वेळेला देत नाही परंतु अपयशाचे खापर मात्र योग्य वेळेच्या माथी निश्चितच फोडतो, हे आपण सगळ्यांनी नेहमी पाहिले आहे ( व आपलाही त्याला हातभार असतो ). तर रिअल इस्टेट उद्योगामध्ये, म्हणजे घर खरेदी करताना जी कोणत्याही माणसासाठी ( लग्नाव्यतिरिक्त ) सर्वात मोठी खरेदी असते किंवा घडत असलेली सर्वात मोठी गोष्ट असते, योग्य वेळेचा मुद्दा बाजूला कसा ठेवता येईल? आता पुन्हा योग्यपणाच्या मुद्द्याविषयी बोलू, मी रिअल इस्टेटमधील अनेक योग्य गोष्टींविषयी लिहीत होतो, ते म्हणजे योग्य घर, योग्य ठिकाण व माझ्या मनात येणारा पुढील विषय म्हणजे घराचे योग्य नियोजन. परंतु मध्येच माझ्यासमोर एक रोचक प्रश्न आला व त्यामुळे मालिकेच्या क्रमामध्ये मला बदल करावा लागला, हॉलिवुडमध्येही सध्या अशीच पद्धत प्रचलित आहे. गोंधळात पडलात, तुम्ही निश्चितपणे गोंधळून गेला असाल परंतु चित्रपट पाहताना असेच होते, जेव्हा तुम्हाला पहिला भाग येण्याआधीचे किंवा नंतरचे भाग बघावे लागतात. उदाहरणार्थ बाहुबली चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर ( आता याचा अर्थ काय होतो हे कृपया विचारू नका ), बाहुबलीचा दुसरा भाग आला, परंतु आता कल्पना करा की तिसऱ्या चित्रपटाच्या कथेमध्ये बाहुबली एक सुरू होण्यापूर्वी काय झाले हे सांगितले असेल तर त्याला आधीचा भाग किंवा प्रिक्वेल असे म्हणतात. त्याचप्रमाणे हा लेख म्हणजे योग्य घराच्या लेखमालेतील पहिला भाग आहे असे तुम्ही म्हणू शकता. माझ्या मित्राने मला एक प्रश्न विचारला होता, जो एक फिटनेस ट्रेनर आहे, त्याच्या बायकोलाही चांगली नोकरी आहे व दोघांचेही वय चाळीशीच्या आसपास आहे. त्याच्यासाठी सदनिका (म्हणजे घर) खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का असे त्याने विचारले, कारण सध्या तो कोथरुडमध्ये (पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पश्चिम उपनगर) भाड्याच्या सदनिकेमध्ये राहतो व त्याला आजूबाजूला कुठेतरी सदनिका खरेदी करायची असेल तर किमान ७० लाख रुपयांचे कर्ज काढावे लागेल व याचा अर्थ त्याला काम करत असतानाचे उर्वरित आयुष्य ( साधारण वीस वर्षे ) घराचे हप्तेच भरतच घालवावे लागेल. त्याऐवजी, तो भाड्याच्या घरामध्येच राहून, ज्या पैशातून तो घराचे हप्ते भरणार होता त्यांची बचत करत राहिला व साधारण दहा वर्षांनी सदनिका खरेदी करायला गेला तर ती योग्य वेळ ठरणार नाही का?

    त्याचा प्रश्न तर्कसंगत होता ( ही पिढी जेव्हा त्यांच्या हिताचा प्रश्न असतो तेव्हा अतिशय तर्कशुद्ध विचार करते ) व माझ्यावरील कुणाच्याही विश्वास ह्या गोष्टीनंतर मी तर्काचा सर्वाधिक आदर करतो, त्यामुळे या प्रश्नामुळे मी विचार करू लागलो की खरंतर माझा पहिला लेख असला पाहिजे होता “ घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती”, कारण त्यानंतरच योग्य घराचा निर्णय घेण्याविषयी इतर सर्व गोष्टींची सुरुवात होते, बरोबरमी त्याला जे काही सांगितले, ते आधी सांगतो त्यानंतर या विषयावर सर्वांच्या संदर्भात बोलू.

    प्रत्येकाचा त्यांच्या भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यानुसार प्रत्येकासाठीची योग्य वेळ वेगळी असू शकते असे माझे वैयक्तिक मत आहे. म्हणूनच, मी म्हणालो मित्रा, तुला योग्य वाटेल तो निर्णय घे, कारण भाड्याच्या घरामध्ये राहण्यात गैर काहीच नाही, परंतु लोकांना त्यात राहताना आपल्या डोक्यावर टांगती तलवार आहे असे वाटू शकते, कारण घरमालक तुमचा अकरा महिन्यांचा भाडे करार संपल्यावर कधीही भाडे वाढवू शकतो किंवा ती सदनिका विकण्याचा निर्णय हा घेऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे घर बदलणे, तसेच त्याच भागामध्ये सदनिका मिळणे, नवीन जागी तुमचे तसेच तुमच्या कुटुंबाचे दैनंदिन जीवन रुळणे ही मोठी अडचण असते. परंतु तुम्हाला पुढील दहा वर्षांसाठी एकाच जागेची खात्री मिळणार असेल ( भाड्याचे घर ) तर काही हरकत नाहीतसे असल्यास आणखी एक गोष्ट, तुम्ही जे काही भाडे देता ते हळूहळू वाढणार आहे, त्यामध्ये अचानक वाढ होणार  नसली तरीही ! कारण सध्या ( व भविष्यकाळात ) पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये व भोवताली झपाट्याने होत असलेला पुनर्विकास पाहता, भाड्याच्या घरांची मागणी अतिशय मोठी आहे, कारण या पुनर्विकास प्रकल्पातील सध्याचे रहिवासी दुसऱ्या जागेत राहायला जात आहेत. ते खऱ्या गरजू व्यक्तींपेक्षा बरेच जास्त पैसे देऊ शकतात कारण त्यांच्यासाठी बांधकाम व्यावसायिक भाडे भरत असतो. बांधकाम व्यावसायिकासाठी हा त्याच्या प्रकल्पाच्या खर्चाचा एक भाग असतो जो त्याच्या सदनिकेच्या विक्रीतून तो वसूल करणार असतो त्यामुळे त्याला काळजी नसते. त्यामुळे जो खरा भाडेकरू असतो त्याला या प्रक्रियेमध्ये भाड्याच्या जास्त दरांशी स्पर्धा करावी लागते जो त्यासाठी तोटा असतो. हा कल पुढील पाच वर्षात वाढत जाईल कारण सध्या दर दुसऱ्या सोसायटीचा पुनर्विकास होत आहे, परंतु त्या प्रमाणात भाड्याच्या सदनिका उपलब्ध नाहीत त्यामुळे निश्चितपणे जास्त भाडे भरावे लागेल, मध्य वा उपनगरातील घरांसाठी.

तुम्हाला तेवढे भाडे परवडत असले तरीही तुम्ही मुदत ठेव ( एफडी ) किंवा म्युच्युअल फंडात उरलेल्या रकमेची गुंतवणुकीच्या स्वरूपात बचत कराल. मी काही आर्थिक विषयातील तज्ञ नाही त्यामुळे मी त्याबाबत काहीही टिप्पणी करणार नाही. परंतु एफडीचे व्याजदर कमीच होत जाणार आहेत व मालमत्तेच्या दरात मध्यम स्वरूपात वाढच होत राहणार आहे ( इतर कोणत्याही वस्तुप्रमाणे ), जी व्याजदरांपेक्षा अधिकच असेल. तुम्ही सध्या ज्या उपगनरामध्ये राहात आहात तेथे तुम्ही जेव्हा कधी घर खरेदी करण्याचा निर्णय घ्याल, तेव्हा तुमची बचत व मालमत्तेचा दर याचा ताळमेळ असणार नाही हा माझा तर्क आहे. परंतु तुम्ही जे काही म्हणता तेदेखील बरोबर आहे की आत्ता खरेदी करायचे व कायमस्वरूपी ईएमआय भरत राहायचे. त्यामुळे मी असे सुचवेन की, पुढील पाच वर्षे भाड्याच्या घरात राहा व तुम्हाला आजूबाजूला ज्या दराने सदनिका मिळत आहे त्यापेक्षा निम्म्या दरात जेथे मिळेल तेथे ती घेऊन ठेवा, परंतु तो भाग विकसित असला पाहिजे (भाग २, योग्य ठिकाण हा लेख वाचा, परत भविष्यात ) व सदनिका लगेच ताबा मिळेल अशी असली पाहिजे. यामुळे तीन गोष्टी साध्य होतील, एक म्हणजे तुमचे गृहकर्जाच्या हप्त्याचे ओझे निम्म्याने कमी होईल, कारण सदनिकेचा ताबा लगेच मिळणार असल्यामुळे तुम्ही ती भाड्याने देऊ शकता ज्यामुळे हप्त्याचा भार जवळपास एक चतुर्थांश कमी होईल. पाच वर्षांनी तुम्हाला जेव्हा तुमच्या करिअरची तसेच तुमच्या मुलांच्या करिअरची दिशा कशी असेल याची खात्री असेल, तेव्हा एखाद्या ठिकाणी स्थायिक व्हायचा निर्णय घ्या. त्यावेळी तुमच्या मालकीची सदनिका विकून तुम्ही जेवढी गुंतवणूक केली आहे त्यापेक्षा निश्चितच जास्ती रक्कम मिळेल. यामुळे तुम्हाला आज जेवढे कर्ज घ्यावे लागणार आहे त्याची रक्कमही जवळपास निम्म्याने कमी होईल, त्यामुळे त्याचे हप्ते भरणेही शक्य होईल एवढेच सांगावेसे वाटते. त्यामुळेच तुम्ही आत्ताही व नंतरही घर खरेदी करण्यासाठी योग्यच वेळ असेल, तुम्हाला कशाप्रकारचे आयुष्य जगायचे आहे हे महत्त्वाचे आहे, कारण केवळ त्यामुळेच तुम्हाला घर खरेदी करण्यासाठी योग्य वेळ ठरवता येते.

     इथेही अनेक ( बहुतेक ) वाचक म्हणतील की, आला आपल्या जातीवर ( ही फक्त एक म्हण आहे, ज्याचा अर्थ बांधकाम व्यावसायिक आपले खरे रंग दाखवतो असा होतो, त्याचा जात व्यवस्थेशी काही संबंध नाही ), कारण तुम्ही आत्ताही घर खरेदी करायला सांगताय व नंतरही तेच सांगाल , बांधकाम व्यावसायिक नेहमी हेच सांगतात. तुम्हाला असे वाटत असेल, तर मला माफ कर, पण मग मी जे काही म्हणालो ते तुम्हाला  समजलेच नाही, माझ्या फिटनेस ट्रेनर मित्राशी सुरू असलेला संवाद मी वरील लॉजीक सांगुन  मी संपवला. मी म्हणालो, घर खरेदी करण्यासाठी तुझ्यासाठी योग्य वेळ कोणती हे तुलाच ठरवावे लागेल कारण दुसरे कुणीही ते तुझ्यासाठी ठरवू शकणार नाहीमी फक्त तुला योग्य वेळ ठरविण्याच्या तुझ्या निर्णयाचे फायदे व तोटे समजून सांगू शकतो. कारण आता घर खरेदी करणे ही काही गरज राहिलेली नाही जी तुझ्या सामाजिक गरजांसाठी आधी होती, तसेच ती एक जबाबदारीही ठरू नये ( म्हणजे घराच्या हप्त्यांचे ओझे जाणवू नये ). तर तुला मनातून आरामदायक वाटले पाहिजे व याचा संबंध थेट तुझ्या आर्थिक बाबींशी तसेच जीवनशैलीशी आहे, त्यामुळे घर खरेदी करण्याच्या योग्य वेळेविषयी केवळ तूच निर्णय घेऊ शकतोस. हा तर्क तू ज्यांना घर खरेदी करायचे आहे अशा प्रत्येक व्यक्तीला किंवा कुटुंबाला लावल्यास, ते आयुष्याच्या कोणत्या टप्प्यात आहेत त्यानुसार त्यांचे स्वतःचे घर खरेदी करण्यासाठीची योग्य वेळ वेगवेगळी असू शकते. त्यात काहीच चुकीचे नाही कारण घरेही वेगवेगळी असू शकतात. वेगवेगळ्या वेळी त्यापैकी प्रत्येक घर योग्य असू शकते कारण अगदी भाड्याचे घरही कुणाच्यातरी मालकीचे असते, बरोबर?

     कालांतराने पुण्याच्या मध्यवर्ती भागात किंवा विकसित भागात भाड्याने देण्यासाठी घर घेणे ही एक गुंतवणूक होऊ शकते जे न्यूयॉर्क किंवा लंडनसारख्या शहरांमध्ये सध्या होत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांमधील मुदत ठेवींचे घटते व्याजदर. मी खाजगी बँकांबाबत टिप्पणी करणार नाही कारण हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे, तसेच मी स्थापत्य अभियंता आहे, अर्थतज्ञ नाही. आता घर खरेदी करण्याच्या योग्य वेळेच्या व्यापक मुद्द्याविषयी बोलू, यामध्ये एक महत्त्वाचे तथ्य म्हणजे तुम्ही तुमच्या करिअरसाठी पुण्यामध्ये स्थायिक व्हायचा निर्णय आधीच घेतला असेल, तर जेवढा लवकरात लवकर निर्णय घ्याल तेवढे अधिक चांगले कारण पुण्यामध्ये जमीन अतिशय मर्यादित आहे तसेच तुमची कमावती वर्षेही मर्यादित आहेत. परंतु कुठे स्थायिक व्हायचे याचा निर्णय तुम्ही घेतला नसेल व काही काळ “अनोळखी समुद्रात” ( डिस्नेचा लिटिल मरमेड नुकताच पाहिल्यामुळे हा शब्द आठवला ) प्रवास करण्याची तयारी असेल, तर राहण्यासाठी घर खरेदी करण्याचा तुमचा निर्णय थोडा लांबणीवर टाकण्यात काहीच अडचण नाही. तुम्हाला तुमची गुंतवणूक इतर कशामध्येही गुंतवायची इच्छा नसेल तर तुम्ही तोपर्यंत गुंतवणुकीसाठी नेहमी घर खरेदी करू शकता.

    व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी योग्य वेळेविषयी बोलायचे तर, मी तुम्हाला इथे माझे स्वतःचे उदाहरण देऊ शकतो. साधारण अठरा वर्षांपूर्वी जेव्हा मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, तेव्हा तो कसा वाढवायचा  ( टिकवायचा ) याविषयी मला खात्री नव्हती व हे कुणाही उद्योजकासोबत होऊ शकते. त्यामुळे मी भाड्याच्या जागेतून सुरुवात करायचा निर्णय घेतला परंतु जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा अजिबात वेळ वाया न घालवता “स्वतःवर श्रद्धा ठेवून उडी मारली ( लिप ऑफ फेथ- हा स्पायडर मॅन इन द स्पायडर व्हर्समधील शब्दप्रयोग आहे ), तीच माझ्यासाठी योग्य वेळ आहे असे मला वाटले व मी माझ्या ऑफिसची जागा खरेदी केली. तेव्हा तो व्यवहार जरा महाग वाटला, परंतु कालांतराने तो निर्णय योग्य ठरला. कारण नंतर जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा जेथे माझ्यासाठी ऑफिसची जागा असणे सोयीचे होते त्या परिसरामध्ये जागाच उपलब्ध नव्हती, म्हणूनच मी जेव्हा माझ्या ऑफिसच्या जागेचा व्यवहार केला ती योग्य वेळ होती. ज्यांना आपल्या ऑफिससाठी जागा खरेदी करायची आहे त्यांना मी सांगेन की, तुमच्या गरजा समजून घेईपर्यंत वाट पाहा कारण त्यानंतरच तुमच्या ऑफिसची जागा खरेदी करण्यासाठी योग्य वेळ असेलपरंतु तुम्हाला दुकानासाठी व्यावसायिक जागा खरेदी करायची असेल म्हणजे जेथे प्रत्यक्ष उत्पादनाची विक्री केली जाईल अशी जागा हवी असेल व तुम्हाला अशी जागा कुठे हवी आहे याविषयी तसेच दुकानाच्या हेतूविषयी स्पष्टता असेल, तर तुम्ही ती जागा लवकरात लवकर खरेदी करणे हीच तुमच्यासाठी योग्य वेळ ठरेल. कारण त्याचे भाडे दिवसेंदिवस वाढत जाईल, त्यामुळे योग्य जागी तुमचे स्वतःचे दुकान खरेदी करण्याच्या संधीस उशीरच होत जाईल, असा माझा सल्ला आहे.

      सरतेशेवटी मी म्हणेन की,तुमचे घर खरेदी करण्यासाठीची योग्य वेळ तुमच्या स्वतःच्या सोयीशी थेट संबंधित असते,जी तुमच्याशिवाय दुसरे कुणी ठरवू शकत नाही.तुम्ही थोडासा तर्कशुद्धपणे विचार केला तर तुम्ही तुमच्यासाठी घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती आहे याचा निर्णय घेऊ शकता,तुम्हाला कायमस्वरूपी मानसिक शांती मिळण्यासाठी, हे निश्चितच महत्त्वाचे आहे !

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

कृपया पुण्याच्या रिअल इस्टेटविषयी माझे विचार खालील यू ट्यूब लिंकवर पाहा...

https://www.youtube.com/watch?v=4MvtE0oodZ8&t=13s

 








Saturday 23 September 2023

 पुण्याची वाढ आणि नितीन गडकरीजी !














पुण्याची वाढ आणि नितीन गडकरीजी !

 

बरेचदा, आयुष्य हे  एक नवीन व्यक्ती बनण्यापेक्षाही,तुम्हाला जी व्यक्ती व्हायचे होते परंतु कसे व्हायचे हे माहिती नव्हते याविषयीच असते.” …  हीथ एल.बकमास्टर

       हीथ बकमास्टर हे विपणन, निधी संकलन व व्यवसाय विकास सल्लागार आहेत, व तरुणांसाठी व प्रौढांसाठी काल्पनिक  कादंबऱ्या लिहीणारे अमेरिकी लेखक आहेत. हीथ यांच्या कारकिर्दीतील प्रौढांसाठीच्या कादंबऱ्यांचा भाग सोडा, परंतु त्यांनी कुणीतरी होण्याविषयी जे लिहीले आहे ते व्यक्तीच्या संदर्भात असले तरीही ते आपल्या पुणे  शहरातील अनेक गोष्टींनाही लागू होते. मला हीथ यांचे हे अवतरण आठवण्याचे कारण म्हणजे आपले माननीय केंद्रीय परिवहन (रस्ते) मंत्री, श्री. नितीन गडकरी ! आपण सगळे जाणतो की हाती घेतलेले काम तडीस नेणारच अशी नितीन भाऊंची ( मी देखील नागपूरचाअसल्यामुळे त्यांच्यासाठी हक्काने नितीन भाऊ हे लाडके टोपणनाव वापरणार आहे ) ख्याती आहे व त्यांनी १५० कोटी लोकसंख्येच्या या विशाल देशात रस्ते बांधणीचे महाकाय काम केले आहे. परंतु व्यक्तीमत्वात बदल व शहर यांच्यात काय संबंध आहे, मला वाचकांच्या कपाळाला पडलेल्या आठ्या दिसताहेत. तर नितीन भाऊ अलिकडेच “आपल्या ” पुण्यामध्ये क्रेडाई पुणे या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या एका बैठकीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आले होते व विषय होता रिअल इस्टेट व पायाभूत सुविधांची भूमिका, कारण कोणत्याही देशामध्ये पायाभूत सुविधांच्या आघाडीवर रस्त्यांना अनन्य साधारण महत्त्व असते, तसेच रिअल इस्टेटलाही ( अर्थात रिअल इस्टेटला त्यासाठीचे वलय किंवा श्रेय कधी मिळाले नाही हा स्वतंत्र मुद्दा झाला ) व कोणत्याही देशाच्या विकासाचे इंजिन असलेल्या या दोन पैलूंविषयी बोलण्यासाठी नितीन भाऊंशिवाय अधिक चांगली व्यक्ती कोण असू शकते ?

      म्हणुनच  या कार्यक्रमामध्ये नितीन भाऊ आले व आपल्या खास रोखठोक शैलीत मनापासून वरील विषयांवर बोलले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की पुण्यात आता इमारती पुरे झाल्या  व विकासकांनी ( म्हणजे बांधकाम व्यावसायिकांनी ) पुण्याच्या पलिकडे सुद्धा घरे बांधण्याचा विचार केला पाहिजे , वाटल्यास पश्चिम महाराष्ट्रातील गावांवर लक्ष केंद्रित करा कारण तेथील सधन  शेतकऱ्यांकडे भरपूर पैसा असतो व बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्यासाठी त्यांच्या गावामध्येच चांगली घरे बांधली तर दोघांचाही फायदाच होईल. तसेच बांधकाम व्यवसायिकांनी बांधकामाच्या जुन्या-पुराण्या पद्धती सोडून दिल्या पाहिजेत, बांधकाम खर्च वाचविण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची मदत घेतली पाहिजे ( गैरफायदा नव्हे ), म्हणजे घराच्या किमती नियंत्रणात राहतील ( कुणाच्या हा एक प्रश्नच आहे ). बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी आयआयटीसारख्या तांत्रीक शिक्षण  संस्थांशी नाविन्यपूर्ण कल्पना तसेच संशोधन व विकासासाठी हात मिळवणी केली पाहिजे, ज्यामुळे वापरकर्त्याचा, म्हणजे घर घेणाऱ्या ग्राहकांचाही फायदा होईल. नितीन भाऊंनी पुण्यातील बदललेल्या  दृश्यावरही ( परिस्थितीवरही ) टिप्पणी केली, इथे प्रदूषण किती वाढले आहे व या शहराने काय होणे अपेक्षित होते व ते आज काय झाले आहे व पुण्याला त्याचा जो जुना दिमाख पुन्हा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असेही ते म्हणाले. त्यांनी अशीही घोषणा केली की वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी पुण्यात व भोवतालच्या परिसरात 50,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे उड्डाणपूल/रस्त्यांचे जाळे उभारले जाईल परंतु तो खरा तोडगा नाही. हे पण ते म्हणाले ! त्यांनी प्रश्न विचारला की ( कुणाला ) मुंबईजवळ ज्याप्रमाणे नवी मुंबई उभारण्यात आली, नवी दिल्लीजवळ नोएडा उभारण्यात आले त्याप्रमाणे पुण्याभोवती नवे पुणे का उभारले गेले नाही. पुण्याची आहे त्याच स्वरुपामध्ये कोंडी का होत आहे, तरीही वेगवेगळ्या भागातील लोकांना इथे यायची व स्थायिक व्हायची इच्छा असते व इतर प्रदेश विकसित का होत नाहीत ( म्हणजे नागपूर ) व यासारखे अनेक मुद्दे त्यांनी मांडले. नितीन भाऊंनी पुण्यातील लोकसंख्येविषयी किंवा वाढीविषयी जे काही मुद्दे मांडले ते खरे आहेत,त्याविषयी पूर्णपणे आदर आहे, परंतु त्यांनी हे प्रश्न त्यांच्या लोकांना किंवा सरकारला विचारायला हवे होते,जे पुण्याचा विकास ज्याप्रकारे होत आहे त्यासाठी जबाबदार आहेत व बांधकाम व्यावसायिक या खेळातील केवळ एक प्यादे आहेत, मी हा लेख लिहीण्याचे हेच कारण आहे.

        नितीन भाऊ, मी तुमचे आभार मानले पाहिजेत कारण तुम्ही पुण्याच्या अवतीभोवती ज्याप्रकारे घडामोडी घडत आहेत त्याचा किमान उघडपणे उल्लेख तरी केला.तरीही अनेक जण त्यांच्या स्वप्नातील घर घेण्यासाठी या शहराला प्राधान्य देतात, पण यामध्ये कुणाची चूक आहे किंवा दोष आहे, हा वादाचा मुद्दा आहे. परंतु तुम्ही पुण्याविषयी व बांधकाम व्यावसायिकांविषयी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील गावांसह इतर भागांविषयी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यावर लक्ष केंद्रित करू. यातून कदाचित आपल्याला काही उपाययोजना सुचू शकतील ज्या तुम्हीच बदल घडवून आणण्यासाठी वापरू शकता. तर, बांधकाम व्यावसायिकांनी पुण्याच्या पलिकडे विचार करण्याविषयी बोलायचे झाले, तर पुण्यामध्ये चाळीस एक वर्षांपूर्वी जेव्हा ते एक शहर होते तेव्हा काय परिस्थिती होती हे मला तुम्हाला सांगावेसे वाटते ( परंतु तोपर्यंत आजची सर्व शहरे त्या काळी लहान गावे किंवा खेडेगावे होती) व मला आठवतेय की तेव्हा नागपूरही पुण्यापेक्षा आकार, विस्तार व व्यवसायाच्या बाबतीत मोठे होते. पुण्याला शैक्षणिक क्षेत्र असल्यामुळे निश्चितच एक वलय होते, परंतु आपण सगळेजण जाणतो की आपल्या देशामध्ये अगदी आजही ( केवळ नोकरी मिळवणे सोडून ) शिक्षणाचे काय मोल आहे. पुणे तेव्हा निवृत्तीवेतनधारकांचे गाव ( शहरही नाही ) मानले जात असे. लोकांना पुणे म्हटले की, चितळेंची बाकरवडी, इथे दुपारी 1-4 मध्ये  दुकाने बंद असतात व पुणे 30 म्हणजे सदाशिव पेठेतील रहिवाशांचा स्वभाव एवढेच माहिती होते. अचानक 70-80 च्या दशकात काहीतरी घडले व बजाज- टेल्कोचा  इथे प्रवेश झाला व पुणे नावाची ट्रेन सुरू झाली. नितीन भाऊ मी देखील तुमच्यासारखाच एक नागपूरकर आहे व माझ्यावर विश्वास ठेवा काही व्यक्तींचा अपवाद वगळता बहुतेक लोकांना ( त्यांच्यापैकी काही आता पुण्यामध्ये बांधकाम व्यावसायिक आहेत ) ही पुण्याची महाराष्ट्र एक्स्प्रेस केवळ चार दशकात वंदे - भारत सुपर फास्ट ट्रेन कशी झाली हे  समजलेच नाही. पुण्याचेही हेच झाले आहे व या ट्रेनचा वेग किती आहे हे ओळखण्याचे व त्यानुसार आवश्यक ते बदल करण्याचे व इतर पॅसेंजर ट्रेनना एक्सप्रेस ट्रेनमध्ये रुपांतरित करण्याचे म्हणजेच इतर प्रदेशांचाही विकास करण्याचे काम कुणाचे आहे. तर  ते काम  सरकारचे होते परंतु कोणत्याही सरकारला किंवा विरोधकांना पुण्यामध्ये असलेल्या क्षमतेची तसेच वाढीच्या वेगाची जाणीवच झाली नाही. म्हणूनच वाढीच्या संदर्भात पुण्याचे आज जे काही झाले आहे त्यामध्ये त्यांची काही भूमिका नाही. तसेच यामध्ये बांधकाम व्यावसायिकांची किंवा पुण्याच्या व्यापारी वर्गाची किंवा समाजाच्या कोणत्याही घटकाची काहीच भूमिका नाही. प्रत्येकाने ते जास्तीत जास्त जे चांगले करू शकतात तेच केले, ते म्हणजे या ट्रेनचा फायदा घेत राहणे. त्यामुळेच कोणत्याही वर्गाला विशेषतः बांधकाम व्यावसायिकांना प्रदूषणासाठी किंवा पुण्याची आज जी काही वाईट परिस्थिती आहे असे तुम्हाला वाटते त्यासाठी दोष देता येऊ शकत नाही व माझेही त्याविषयी वेगळे मत आहे.

    नितीन भाऊ, पुण्याचे प्रदूषण(हवा,नदी) वाहतुकीची कोंडी या काळजी करण्यासारख्या बाबी आहेतच.परंतु एखाद्या शहराच्या किंवा समाजाच्या संदर्भात या वाईट गोष्टी आहेत असे तुम्हाला वाटत असेल,तर भाऊ आपण आपल्या  लाडक्या ताडोबाच्या जंगलाजवळ असलेल्या  कोलारा सारखा गावांमध्ये काय परिस्थिती आहे ते पाहू.इथे तुम्हाला काहीही प्रदूषण दिसणार नाही कारण हा जंगलाचा भाग आहे,परंतु तुम्हाला इथे प्रत्येक गावाकडे ये-जा करण्याच्या रस्त्यावर माणसांच्या शौचाचा कचऱ्याचा उग्र दर्प येईल. हे देखील प्रदूषणच आहे आपण इथे कुणाला दोष देऊ, इथे कुणा बांधकाम व्यावसायिकांनाही दोष देता येणार नाही.हा आपल्या व्यवस्थांचा दोष आहेपुण्यातील प्रत्येकाने त्याला किंवा तिला जे काही सर्वोत्तम करता येते केवळ ते करून त्याच्या वाढीमध्ये योगदान दिले आहे, सरकारने पुढाकार घेतला नाही व भवितव्याला दिशा दिली नाही तर शहरांचे भवितव्य असेच घडते, पुण्याच्या बाबतीतही काही वेगळे झाले  नाहीसरकारनेच(ते कोणतेही असो)नवीन मुंबई नोएडाच्या विकासाचे नियोजन केले घोषणा केली त्यानंतर नगर नियोजनामध्ये ज्याप्रकारने सरकारने एखाद्या प्रदेशाविषयी किंवा शहराविषयी जे काही ठरवले आहे त्याचे बांधकाम व्यावसायिक केवळ पालन करतात,त्याप्रमाणे बांधकाम व्यावसायिकांनी त्याचे पालन केले, मला असे वाटते की तुम्ही रिअल इस्टेटचा हा पैलू विचारात घेतला नाही.नगर नियोजन म्हणजे ज्याप्रमाणे केवळ रस्ते, विकास नियंत्रण नियम, पाणी पुरवठा, किंवा सांडपाण्याची यंत्रणा व सार्वजनिक वाहतूक नाही, तर त्यामध्ये पर्यावरण व संस्कृतीचाही, तसेच लोकांच्या दृष्टिकोनाचाही समावेश होतो. इथेच इतर सर्व प्रदेश पुण्याच्या तुलनेत मागे पडले, पुणे प्रदेशाच्या विकासासंदर्भात हे मोठे तथ्य आहे. आणि नवीन पुणे अस्तित्वात आहे, फक्त सरकारने अधिकृतपणे तशी घोषणा केलेली नाही , कुणाही अस्सल पुणेकराला विचारा ( पुणे 4 किंवा पुणे 30 ) तो वाकड, प्राधिकरण, फुरसुंगी, आंबेगाव, खराडीला पुणे म्हणून कधीच स्वीकारणार नाही . तरीही या उपनगरांमध्ये  घर घेणारी व्यक्ती या सर्व ठिकाणांचा विचार व स्वीकार पुणे म्हणून करते, रिअल इस्टेटसाठी हेच महत्त्वाचे आहे !

       आता बांधकाम उद्योगातील तंत्रज्ञानाच्या मुद्द्याविषयी बोलू व आयआयटीसारख्या संस्थांशी हातमिळवणी करण्याबाबत तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी बरोबर होता, पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, हा प्रश्न आहे. निश्चितपणे, रिअल इस्टेट क्षेत्राने संघटित होणे अपेक्षित आहे जे होत आहे परंतु या गोष्टी एखाद्या उद्योगाला मान्यता मिळाल्यावर येतात व मान्यता केवळ आदर असेल तरच मिळते. रिअल इस्टेटचा कुणीच आदर करत नाही ही वस्तुस्थिती आहे. नितीन भाऊ, एक व्यक्ती म्हणून तुम्ही विषेश आहात, कारण तुमच्यासारख्या मोठ्या पदावरची एखादी व्यक्ती पहिल्यांदाच बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेला संबोधित करत होती व तुम्ही ज्वलंत मुद्द्यांना स्पर्श केलात. हा तुमचा उद्योग नसला तरीही राज्यातील किंवा केंद्रातील नगर  विकास विभागाच्या प्रमुखाने पुण्याच्या समस्यांना कधीही वेळ दिला नाही किंवा त्याकडे लक्ष दिले नाही व या शहराचा ऱ्हास होण्याचे हेच मुख्य कारण आहे. रिअल इस्टेटला उद्योग क्षेत्राचा दर्जाही देण्यात आलेला नाही त्यामुळे जीएसटीसारखे कर इथे अतिशय वाईट आहेत व धोरणे म्हणजे चेष्टा आहे. कारण ताबा देण्यासाठी तयार घरावर काहीही जीएसटी आकारला जात नाही परंतु बांधकाम सुरू असलेल्या घरावर 12 % जीएसटी आकारला जातो, हे कोणत्या प्रकारचे धोरण आहे. अनेक अत्यावश्यक घटकांचीही हीच गत आहे व सरकारचेच प्रशासन असलेल्या आयआयटीला त्यांच्याकडे बांधकाम उद्योगावर व साहित्यावर लक्ष केंद्रित करणारी संशोधन शाखा सुरू करण्यापासून कुणी रोखले आहे, रिअल इस्टेट उद्योग आनंदाने त्यांना मदत करेल याची मला खात्री आहे, परंतु हे उलट पद्धतीने होऊ शकत नाही, बरोबर ? रिअल इस्टेटशी संबंधित व्यक्तींनी व्यक्तींनी  यासंदर्भात काहीतरी केले पाहिजे हे मी एका दशकभरापासून लिहीतो आहे, तुमच्या शब्दांमुळे या प्रक्रियेला थोडा वेग येईल अशी अपेक्षा करू. त्याचप्रमाणे रिअल इस्टेट क्षेत्राचे नियंत्रण करणारे नियम व कायदे ( विकास नियंत्रण नियम ) बांधकामातील बदल विचारात घेऊन करण्यात आले तर बांधकाम खर्चात बरीच बचत करत येऊ शकते. इथे एक विभाग इमारतीची उंची ज्या मजल्यावर लोक राहतात तिथपासून मोजतो तर दुसरा विभाग इमारतीची रस्त्याच्या पातळीपासून मोजतो. अशाप्रकारचे विनोद घडत असतात, त्यामुळे विकासक प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष खर्चाविषयी नेहमी अंधारात असतात. एकीकडे तुम्ही म्हणता की पुण्याच्या मध्यवर्ती भागातील गर्दी कमी केली पाहिजे व दुसरीकडे नगर  विकास विभाग मेट्रोच्या मार्गावरील घरांची घनता वाढविण्याविषयी आग्रही आहे यामुळे पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये घरे ( सदनिका ) लहान होत आहेत, ज्यामुळे बांधकाम खर्चामध्ये थेट वाढ होते, हे केवळ मेट्रो फायदेशीर व्हावी यासाठी होत आहे. इथेही, तुम्ही तुमच्या वजनाचा वापर करून संबंधित विभागांना लोकोपयोगी धोरणे तयार करण्यासाठी रिअल इस्टेटमधील काही लोकांना विश्वासात घेण्यास सांगू शकता. आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे, तो म्हणजे शहरांच्या विकास योजना तयार करणे व त्यांची एका ठराविक वेळेत अंमलबजावणी करणे, त्यामुळे आपोआपच बांधकाम खर्चात मोठी कपात होईल. कारण सध्या विकास योजना मंजूर होईपर्यंत बांधकाम व्यावसायिकांना  लक्षावधी चौरस फूट जमीन अडकवुन ठेवावी लागते , या गुंतवणुकीवरील व्याज हे घरांच्या वाढत्या दरांचे कारण आहे. ही यादी हनुमानाच्या शेपटीपेक्षाही मोठी आहे परंतु अशा संवेदनशील मुद्द्यावर उघडपणे बोलायचे तुम्ही धाडस केलेत म्हणून मी अतिशय आनंदी व आभारी आहे

        शेवटचा मुद्दा म्हणजे, तुम्ही बांधकाम व्यावसायिकांनी आतिथ्य ( उपाहारगृहे ) व पर्यटन क्षेत्रामध्ये शिरण्याविषयी जे काही बोलतात त्यावर विचार केला पाहिजे, कारण पुणे अतिशय महत्त्वाचे शहर  असून या दोन्ही गोष्टींचा विकासाशी घनिष्ट संबंध आहे तसेच रिअल इस्टेटमधील नफ्याचे प्रमाण घटत चालले आहे व तुम्ही फक्त त्यावर अवलंबून राहू शकत नाही , विशेषतः पुण्याची नागरी विकासाची सध्याची धोरणे पाहता.

       नितीन भाऊ, सरतेशेवटी मला एवढेच सांगावेसे वाटते की, मीसुद्धा तुमच्यासारखाच पक्का वैदर्भीय माणूस आहे, परंतु आपल्या  भागातून किंवा पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून लोक इथे येऊन का स्थायिक होतात? या लोकांचे पुण्यावर अतिशय प्रेम आहे किंवा या शहरामध्ये त्यांना काहीतरी जगावेगळे मिळते असे नाही, तर त्यांच्या मूळ गावी त्यांच्या जीवनाच्या मूलभूत गरजा म्हणजे रोजगार, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य किंवा अगदी पिण्याचे पाणी यांचीही पूर्तता होत नाही. यामध्ये पुणेकरांचा काहीही दोष नाही, पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांचाही नक्कीच दोष नाही तर हे सरकार ( मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असो ) नावाच्या यंत्रणेचे अपयश आहे. आपल्याला  पुण्याचे गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचे असेल तर आपण सगळ्यांनी याचा स्वीकार केला पाहिजे. आम्ही या कामामध्ये तुमच्यासोबत आहोत याची मी निश्चितपणे खात्री देऊ शकतो.

--

संजय देशपांडे 

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स

कृपया पुण्यामध्ये योग्य घर/कार्यालय शोधण्याविषयी माझे विचार, तुम्ही खालील यूट्यूब लिंकवर जाणून घेऊ शकता व आवडले तर शेअर करा...

https://youtu.be/27j3I3rwGPQ?si=-ODYBxVI2Dl_C345