Thursday 7 September 2023

                                           ताडोबा,पाऊस  जंगल नावाची शाळा !!
















ताडोबा,पाऊस जंगल नावाची शाळा !!

जंगलामध्ये प्रत्येक वळणावर एक नविन  गोष्ट तुमची वाट पाहात असते ”… (मी)

       मी प्रत्येक वेळी जंगलाला भेट देतो तेव्हा हे शब्द अनुभवतो (म्हणजे जगतो) जेव्हा ती जागा ताडोबाचे जंगल असते, तेसुद्धा पावसाळ्यात तेव्हा आपण एखाद्या गोष्टींच्या दालनात प्रवेश करतोय असे वाटते. गाईडपासून ते झाडांपर्यंत,जिप्सी चालकांपासून ते वनमजूरांपर्यंत ते अगदी दुथडी भरून वाहणाऱ्या झऱ्यांपर्यंत,प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जागा काहीतरी गोष्ट सांगत असते.पावसामुळे एरवी जी दृश्ये दिसतात ती कदाचीत थोडीशी कमी होतात(म्हणजे वाघ दिसणे)परंतु त्यामुळे या गोष्टींच्या दालनाचे इतर कितीतरी दरवाजे उघडतात ज्याकडे आपण फक्त वाघ पाहण्याच्या नादात फिरकतही नाही.थोडक्यात,पावसामुळे तुम्ही एका वेगळ्या दृष्टीकोनातून जंगल पाहू शकता.

      पावसाळ्यामध्ये ताडोबाच्या जंगलात सगळीकडे हिरवाई पसरलेली असते,जमीनीवर जणू जंगली तुळशीचा गालीचा अंथरल्यासारखा वाटतो.जेव्हा जिप्सीच्या चाकांचा तिच्या पानांना संपर्क होतो तेव्हा सारा आसमंत ताज्या सुगंधाने भरून जातो,जो केवळ अनुभवावाच लागतो,तो शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही.मला गाईडने ही माहिती दिली कारण जंगलाचा आसमंत अचानक एका स्वर्गीय सुगंधाने भरून जायचा.मी गाईडला विचारले की हा कसला सुगंध आहे.तेव्हा त्याने सांगितले की,साहेब,ही जंगली तुळशीची रोपे आहेत,ती कुस्करल्यावर त्यातून असा सुगंध येतो,जिप्सीच्या टायरखाली येताच जंगलात त्यांचा सुगंध दरवळू लागतो ! त्याशिवाय,ढगांनी आच्छादलेल्या आभाळातून अधूनमधून सूर्य डोकावत असतो,यामुळे संपूर्ण जंगलात प्रकाश सावलीचा खेळ सुरू असतो.अशा वातावरणात,धुक्याने भरलेल्या रस्त्यावर जेव्हा तुम्ही एखादा भुतासारखा आकार समोरून येताना पाहता तेव्हा हे स्वप्न आहे किंवा सत्य असाच विचार तुमच्या मनात येतो.पावसाळ्यातील अशाच एका सकाळी,आपल्याला आज काय दिसेल असा आम्ही विचार करत होतो,कारण आदल्या दिवशी संपूर्ण संध्याकाळ रात्रभर मुसळधार पाऊस पडून गेला होता.आकाश नुकतेच निरभ्र झाले होते.अचानक लांबवरून एक धुसर आकार  आमच्या दिशेने येताना मला दिसला मला(तसेच जिप्सीतल्या सगळ्यांना)अतिशय आश्चर्य वाटले,कारण तो एक नर बिबट्या होता. पुन्हा एकदा माझ्या इच्छांच्या यादीतील एक इच्छा पूर्ण झाली कारण झाडांच्या महिरपीतून एक बिबट्या थेट समोरून चालत येतानाचे दृश्य पाहणे,हे माझे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते.मॉन्सून सफारीमध्ये मला असे काही पाहायला मिळेल याची अजिबात अपेक्षा नसताना,हे स्वप्न पूर्ण झाले. विशेष म्हणजे हा बिबट्या जवळपास वेगवेगळ्या रस्त्यांवर तासभर आमच्यासोबत होता,याचे कारण म्हणजे,आम्ही शांतता पाळली होती,इतर कोणत्याही जिप्सी नव्हत्या जंगलाच्या त्या भागात वाघही नव्हते, त्यामुळे बिबट्या निर्धास्तपणे फिरू शकत होता.वाघांप्रमाणे बिबट्यांचे काही निश्चित क्षेत्र नसले तरीही त्यांची हद्द त्यांनी आखून घेतलेली असते.या बिबट्याची म्हणूनच जंगलामध्ये सगळीकडे इतक्या मुक्तपणे भटकंती सुरू होती. त्याचप्रमाणे त्याचे आत गेलेले पोट तो भुकेला असल्याचे दर्शवत होते.आपले क्षेत्र निश्चित करण्यासोबतच तो अन्नाचाही शोध घेत होता. अभयारण्यामध्ये वाहने कमी असल्यामुळे मी माझ्या मनातल्या अनेक इच्छांपैकी एक इच्छा पूर्ण करू शकलो. मी पावसाळ्यातही ताडोबाला भेट देण्याचे धाडस दाखवल्यामुळे हे शक्य झाले होते.केवळ एकच अडचण होती ती म्हणजे माझे दोन्ही कॅमेरे खराब झाले एकही चांगले छायाचित्र मिळाले नाही(मी काही छायाचित्रे काढली)म्हणून स्वतःलाच दोष देत होतो.परंतु नंतर मला जाणीव झाली की काहीवेळा कॅमेरा असणे हा देखील एक शापच आहे कारण तुम्हाला काहीच पाहायला मिळत नाही तेव्हा तुम्ही वैतागता जेव्हा तुम्हाला काही पाहायला मिळते, परंतु तुम्हाला त्याचे छायाचित्र काढता येत नाहीत तेव्हाही तुम्ही वैतागता.जंगलामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगला पाहिजे, छायाचित्र घेता आले तर उत्तमच,असे मी स्वतःला पुन्हा एकदा समजावले बिबट्याच्या चांगल्या  छायाचित्रांविषयी विसरून गेलो.

     दुसऱ्या दिवशी आणखी एक घटना (पावसाळी विशेष) झाली,जेव्हा चंद्रपूर ते मोहार्ली या मुख्य रस्त्यावर (हा रस्ता सर्व लोकांसाठी खुला आहे कारण तो दोन गावांना जोडतो अर्थात या रस्त्यावर थांबण्यास परवानगी नाही कारण तो बफर झोनमधील सफारीचा भागही आहे)एक फेरफटका मारताना,आम्हाला येणाऱ्या-जाणाऱ्यांकडून माहिती समजली की त्यांनी साधारण तीस मिनिटांपूर्वी मुख्य रस्त्यावरून वाघाला जंगलात येताना पाहिले आम्हा शेरलॉक होम्स प्रमाणे त्या वाघाचा माग घेण्याच्या कामाला लागलो. त्या भागात छोटी मधू नावाची एक वाघीण आहे,तिचे अतिशय लहान बछडे आहेत त्यांना रस्त्याच्या पलिकडे ठेवून तो ओलांडून ती जंगलात आली आहे.(आमच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार).ती सुद्धा शिकारीसाठी बाहेर पडली असेल ती इकडेतिकडे फिरून तिच्या बछड्यांकडे परत येईल,कारण ते जेमतेम महिनाभराचे आहेत,असा विचार करून आम्ही तिचा माग घेत राहिलो.रस्ता ओला असूनही आम्ही तिच्या पावलांचे ठसे कुठेही दिसले नाहीत.त्यानंतर आम्ही रस्त्यावर वाट पाहण्याचा निर्णय घेतला जेथे ती तिच्या बछड्यांकडे परत येईल अशी अपेक्षा होती. दहा मिनिटे वाट पाहिल्यानंतर, अचानक ठिपकेदार हरिणाचे इशारा देणारे चित्कार आमच्या चहू बाजूंनी ऐकू आले,त्यावरून वाघीण जवळपास असल्याचे हालचाल करत असल्याचे समजले आमचा अंदाज बरोबर होता, आम्ही त्या इशाऱ्यांनुसार हालचालींचा अंदाज घेत वाट पाहात राहिलो. आमच्या उजव्या बाजूला आणखी एक समांतर रस्ता होता आमच्या डाव्या बाजूला मुख्य रस्ता होता,ज्याच्या पलिकडे बछड्यांना ठेवण्यात आले होते. हरिणांचे इशारा देण्यासाठीचे चित्कार ऐकताना अचानक उजव्या बाजूने चक्क माणसांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला,ते स्थानिक मेंढपाळ होते. त्यांनाही वाघाची चाहूल लागली होती म्हणुन ते ओरडा आरडा करुन त्याला  दुर घालवत होतेजंगलाचा हा भाग बफर क्षेत्रात येत असल्यामुळे इथे मेंढपाळांना बकऱ्या चारायला परवानगी होती. आम्हाला असे वाटले की वाघीण त्या बाजूला जाणार नाही कारण तिथे माणसांची वर्दळ होती तसेच मेंढ्या चारायला रस्त्यावरही खूप चिखल होता आमची केवळ एकच जिप्सी होती.त्यामुळे चालक पुढे गाडी घेऊन जाण्याचा धोका पत्करण्यास तयार नव्हता,कारण जिप्सीची चाके चिखलात रुतून बसली तर अडचण होईल.त्यामुळे आम्ही घाईने मुख्य रस्त्यावर आलो वाघीण परत तिच्या बछड्यांकडे येईल या आशेने जवळपास तीन तास वाट पाहिली.रस्ता ओलांडण्यासाठी ती मुख्य रस्त्यावर येईल असे वाटले परंतु काहीच झाले नाही.त्यानंतर अजुन एक जिप्सी अभयारण्याच्या प्रवेशद्वारातून आली आम्ही त्यांना आत जाऊन वाघीणीच्या पावलांचे ठसे तपासण्यास सांगितले. आम्ही जंगलातून जिथून बाहेर पडलो तिथून त्यांनी प्रवेश केला ते पंधरा मिनिटे झाले तरी बाहेर आले नाहीत, ते आतमध्ये राहण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांनी वाघीण पाहिली असावी म्हणून आम्हीही त्या जिप्सीच्या मागे गेलो तिथे ती वाघीण एका डबक्यात निवांतपणे बसली होती,आम्ही तीन तासांपूर्वी जेथून माघारी गेलो होतो तिथून ती जेमतेम पन्नास फूट अंतरावर होती! ते मेंढपाळ अजूनही तिथेच होते,त्यांना तिच्या अस्तित्वाची कल्पना नव्हती,मात्र तिला त्यांच्या असण्याची पूर्णपणे जाणीव होती ती फक्त त्यांच्या जाण्याची वाट पाहात होती. आम्ही हरिणांचे इशारा देणारे चित्कार.ऐकत असताना एखादे वळण पुढे गेलो असतो,तर आम्हाला ती उघड्यावरच दिसली असती.परंतु आम्हाला असे वाटले ती मेंढपाळांमुळे विचलित होईल,ती तशी झालीही परंतु ती संयमाने तिथे वाट पाहात राहिलीआम्ही जेव्हा इशारा देणारे चित्कार ऐकत होतो,तेव्हाच वाघीणीने शिकार केली होती जवळपास लपून बसली होती ते मेंढपाळ निघून जाण्याची वाट पाहात होती,म्हणजे तिला निवांतपणे तिचे जेवण करता येईल; वाघ स्वतःच्या संरक्षणासाठी कसा वागतो आणि कीती संयम ठेऊ शकतो  याचे हे उत्तम उदाहरण होते,जे आम्ही नुकतेच अनुभवले होते !

    त्या रात्री इतका पाऊस पडला की दुसऱ्या दिवशी सकाळी पार्कच्या प्रवेशद्वारापर्यंतही जाणे शक्य नव्हते कारण अनेक रस्त्यांवर पूर आला होता त्या पुराच्या पाण्यातून कार चालविणे शक्य नव्हते त्यामुळे आम्ही रिसॉर्टमध्येच वाट पाहात बसलो.त्या संध्याकाळी मी रिसॉर्टच्या भोवती मुख्य रस्त्यावर पायी फेरफटका मारायचे ठरवले.भोवतालच्या मिट्ट काळोखात मला रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतांमधून हजारो बेडकांच्या डराँव-डराँवचे संगीत ऐकू येत होते व मी खरोखरच सांगतो काही आवाज रात्री अतिशय भयाण वाटतात, विशेषतः जेव्हा ते जंगल आहे व तिथे काहीही होऊ शकते हे तुम्हाला माहिती असते. मी चालत होतो तो मुख्य रस्ता होता, परंतु व्यवस्थित काळजी घेतली व माहिती असेल तर असे अनुभव खरोखरच घेण्यासारखे असतात. अनेक लोकांना आश्चर्य वाटते की मी इतके वेळा जंगलात का जातो, मीदेखील अनेकदा या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. परंतु जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तथाकथित वन्यजीव प्रेमींनाही प्रश्न पडतो, की वाघ दिसण्याची शक्यता कमी असताना जंगलांना भेट देण्यासाठी एवढा त्रास व कष्ट का सहन करायचे. मी त्यांना दोष देत नाही कारण त्यावर माझे उत्तर असते, त्यांना सर्वप्रथम जंगल काय आहे हे समजलेलेच नाही.  पावसाळ्यामध्ये वाघ दिसण्याची शक्यता कमी असते हे मला मान्य आहे, परंतु नशीब तुम्हाला कुठे साथ देईल हे सांगता येत नाही उदा.,अगदी रस्त्यावर सामोरा आलेला  एखादा बिबट्या दिसणे ! हिरव्यागार जंगलाचा अनुभव, जंगली तुळशीच्या सुगंधासारख्या गोष्टी व अशा इतरही अनेक बाबी माहिती असणे. आणखी एक गोष्ट, मग तो कडकडीत उन्हाळा असो, गोठवणारा हिवाळा किंवा चिंब भिजवणारा पावसाळा, जंगलातील आयुष्य कशासाठीही थांबत नाही. ते एखाद्या मुक्त शाळेसारखे असते जेथे तुम्ही या प्रजाती त्यांच्या दिमतीला कोणतेही तंत्रज्ञान नसूनही प्रत्येक मोसमाशी कसे जुळवून घेतात व निसर्गासोबत जगायला शिकता, जंगलांना वारंवार भेट देऊन मला झालेला हा सर्वात मोठा फायदा आहे.

      शेवटचा परंतु माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा (जो शेकडोवेळा सांगून झाला आहे) म्हणजे, आपण पावसाळ्यामध्ये बफर क्षेत्र खुले ठेवू शकतो तर कोअर क्षेत्रही खुले ठेवायला काय हरकत आहे. किंबहुना जंगलाचे सगळेच भाग खुले ठेवायला काय हरकत आहे, त्यामुळे जंगलाभोवती राहणाऱ्या हजारो माणसांना उपजीविका मिळेल ज्यामुळे वन्यजीवनाला थेट मदत होईल. परंतु त्यामुळे वन्यजीवन सर्व शहरी लोकांसाठी खुले होईल ज्यांना निसर्गाच्या या खजिन्याची व त्याचे संरक्षण करण्याच्या जबाबदारीची जाणीव नाही. हे सगळे म्हणजे पर्यटक, जिप्सी चालक, गाईड जंगलाचे डोळे, कान व नाकासारखे असतात ज्यांच्यामुळे वन्यजीवनाचा शत्रू असलेल्या सर्व वाईट घटकांवर वचक राहतो. म्हणून सर्व जंगले सगळे ३६५ दिवस खुली ठेवा व त्यासाठी वनविभागाला पायाभूत सुविधांचा व्यवस्थित आधार द्या !

       मी या लेखाचा शेवटचा परिच्छेद लिहीत होतो तेव्हा मध्य प्रदेश मधील  बिबट्याची एक अतिशय विचलित करणारी ध्वनिचित्रफीत व बातमीही माझ्यासमोर आली, जो भुकेमुळे किंवा दुखापतीमुळे बधिर अवस्थेत गावात भटकत होता. व गावकरी एखाद्या शेळी मेंढी प्रमाणे त्यांच्याशी खेळत होते तो बिचारा प्राणी एखाद्या झोंबीप्रमाणे फिरत असल्याचे पाहणे अतिशय त्रासदायक होते. परंतु सुदैवाने कुणीतरी वन विभागाला माहिती दिली व आता तो बिबट्या भोपाळमधील पुनर्वसन केंद्रामध्ये आहेएक सुन्न झालेला बिबट्या एखाद्या पाळीव प्राण्यासारखा गावभर भटकतो हे मनुष्य व प्राण्यांमधील संघर्षाचे अतिशय उत्तम उदाहरण आहे कारण आपल्याभोवती सगळीकडे जंगलाचे आच्छादन कमी होत आहे. तसेच जंगलाभोवती राहणाऱ्या लोकांनी या संघर्षाविषयी जागरुक होणेही आवश्यक आहे. आणि वन्यजीव पर्यटनच माणसांना प्राण्यांसोबत सहजीवन शिकविण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे, ज्यांनी अतिशय संयमाने इथपर्यंत हा लेख वाचला, त्यांनी तो कृपया शेअर करावा, म्हणजे कुठेतरी कुणीतरी त्यानुसार कृती करेल, एवढे बोलून निरोप घेतो.

तुम्ही खाली दिलेल्या  दुव्यावर ताडोबातील पावसाचे काही क्षण पाहू शकता...

https://www.flickr.com/photos/65629150@N06/albums/72177720310689088

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

कृपया पुण्यातील रिअल इस्टेटविषयी माझे विचार खालील यूट्यूब दुव्यावर पाहा..

                                                                                                                                   

 

 



No comments:

Post a Comment