Saturday, 2 September 2023

बांधकाम व्यवसाय वाढवितांना !


                                                बांधकाम व्यवसाय वाढवितांना !








                                                                                                                                            

 बांधकाम व्यवसाय वाढवितांना !


“यशाचा काहीही सिक्रेट फॉर्म्युला नसतो. यश हे सातत्य,मेहनत व अपयशातून शिकूनच मिळते”…कॉलिन पॉवेल.                                                                               

           कॉलिन ल्युथर पॉवेल हे अमेरिकी राजकारणी, मुत्सद्दी, राजनैतिक अधिकारी,अमेरिकेची लष्करी अधिकारी होते, जे २००१ ते २००५ पर्यंत अमेरिकेचे ६५ वे परराष्ट्रमंत्रीही होते. ते पहिले आफ्रिकी अमेरिकी परराष्ट्रमंत्री होते. श्री.पॉवेल यांचे हे शब्द आठवण्याचे कारण एक अतिशय रोचक प्रश्न किंवा एका मित्राने केलेली चौकशी आहे. (जो स्वतः महसूल सेवेमध्ये काम करतो, ज्यामुळे तुम्ही समाजातील जास्तीत जास्त व्यवसाय/व्यापाराच्या संपर्कात येता). त्याने मला विचारले की रिअल इस्टेटमधील डीएलएफ किंवा सोबासारख्या मोठ्या कंपन्या यशस्वी होण्याचे काय कारण आहे किंवा त्यांच्या यशाचा काय मंत्र आहे, या कंपन्या एवढ्या मोठ्या होतात, परंतु इतर अनेक कंपन्यांची अवस्था दयनीय होते असे का. मला पहिल्यांदा  वाटले की तो माझी थट्टा करतोय, कारण तो स्वतः अशा पदावर आहे जेथे त्याचा अनेक यशस्वी व मोठ्या व्यावसायिकांशी संपर्क येतो व त्याने त्यांच्या संस्था अतिशय जवळून पाहिल्या आहेत. त्याशिवाय माझ्या कंपनीपेक्षा सर्व बाबतीत अतिशय मोठ्या असलेल्या  कंपनीचे यश किंवा अपयश याविषयी टिप्पणी करणारा मी कोण ? परंतु हा प्रश्न माझ्याही मनात दडून राहिला, मी त्याला पुन्हा मेसेज पाठवला की मी या विषयावर थोडा वेळ घेऊन माझे विचार नक्की शेअर करीन! या नंतर मी स्वतःलाच प्रश्न विचारला का नाही, मत व्यक्त करायची ( मी स्वतःशी, अर्थात ते वेडेपणाचे लक्षण पण आहे,पण असो ) अशाप्रकारे लिहीण्याचा प्रयत्न करतो (मी तसे वारंवार करतो, अर्थात ते वेडेपणाचेच एक लक्षण आहे), मला समजून घेण्याच्या या पैलूविषयी झेनमधील (अजून कुठे सापडणार!) एक गोष्ट आठवली. ही गोष्ट एका तरूण चिनी विद्वानाविषयी होती, ज्याने धर्म व तत्वज्ञानाविषयी अनेक पुस्तके वाचली होती. मात्र धर्माविषयी त्याने वाचलेल्या एका पुस्तकामधील काही प्रकरणे त्याला समजली नव्हती, त्यामुळे त्याने आसपासच्या लोकांना विचारायला सुरुवात केली जे त्याला ती प्रकरणे समजून घेण्यास मदत करतील. परंतु त्याच्या गावातील किंवा जवळपासच्या परिसरातील कुणीही त्याला त्या प्रकरणांचा अर्थ समजावून सांगू शकला नाही. तो इतर शहरांमध्ये जाण्याचा निर्णय घेतो व प्रवासाला निघतो. प्रवासात एका शहरामध्ये त्याला एका वयोवृद्ध पण ज्ञानी महिलेविषयी समजते, जी त्याला मदत करू शकेल असे लोक त्याला सांगतात, म्हणून तो त्या वृद्ध महिलेला भेटायला जातो. तिला भेटल्यानंतर  तो तरुण विद्वान माणूस तिला विचारतो की त्या पुस्तकांमधील प्रकरणे समजून घ्यायला त्याला ती मदत करेल का. यावर, ती महिला सांगते की तिला अतिशय आनंद होईल परंतु एक अडचण आहे  तिला वाचता येत नाही किंबहुना ती कधी वाचायलाच शिकली नाही. त्यामुळे त्या तरुण माणसाने तिला ही पाने वाचून दाखवली तर ती त्याचा अर्थ समजाविण्याचा प्रयत्न करेल. हे ऐकून त्या तरुणाला धक्का बसतो व तो त्या वृद्ध महिलेला विचारतो की, जर तुम्हाला वाचताच येत नसेल, तर तुम्ही त्याचा अर्थ मला कसा समजून सांगाल. महिला हसते व आकाशातील चंद्राकडे तिचे बोट दाखवते व मुलाला चंद्राकडे पाहण्यास सांगते. तो तरूण बोटाच्या दिशेने पाहतो व त्यानंतर महिला त्याला विचारते, माझे बोट चंद्र आहे का, त्यावर तरुण उत्तरतो, नाही, तो चंद्र नाही. त्या महिलेने विचारते मी चंद्राला त्याच्या स्थानावरून हलवते का, मुलाने उत्तर दिले, नाही तुम्ही हलवत नाही! यावर, महिला म्हणते, तरीही मी माझ्या बोटाने तुला चंद्र दाखवु, बरोबर? हे ऐकताच तरुणाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो व त्याला तिचे म्हणणे समजते. तो वृद्ध महिलेला अभिवादन करतो व म्हणतो मला प्रकरणाचा अर्थ समजला आहे, तुमचे अतिशय आभार व आपल्या गावाकडे प्रयाण करतो ! 

             माफ करा फारच फिलॉसॉफी बद्दल, कारण मी ती वृद्ध महिलाही नाही किंवा कुणी झेन मास्टरही नाही. मी त्या वाचकांसाठी वरील गोष्ट वापरली जे पुढे वाचन सुरू ठेवतील, की मी जे काही सांगणार आहे ते फक्त मला रिअल इस्टेटविषयी किंवा एकूणच व्यवसायाविषयी मला जे काही थोडेफार समजले आहे तेच आहे. मला असे वाटले की माझ्या मित्राने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला माझ्या धाडसाचे समर्थन करण्यासाठी,मी ही झेनची गोष्ट वापरली !  तर,आता पुन्हा मुळ प्रश्नाविषयी बोलायचे झाले,तर त्यामुळे तो म्हणजे अनेक प्रश्नांची जादुची पेटी (विशेषतः रिअल इस्टेटमधल्या ) उघडण्यासारखे आहे. मी तीन दशकांपेक्षा अधिक काळ या व्यवसायाशी संबंधित आहे व माझ्या भोवतालच्या अनेक बांधकाम कंपन्या अतिशय मोठ्या होताना व त्यानंतर अक्षरशः हवेत विरून जाताना पाहिल्या  आहेत. त्याशिवाय अशाही कंपन्या आहेत ज्या अतिशय उत्तम काम करताहेत तर ज्या काही कंपन्या लहान होत्या त्या आता मोठे होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. माझ्याविषयी बोलायचे तर मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझा स्वतःचा व्यवसाय असेल. मी जवळपास दिड दशकांहून अधिक काळापासून माझा स्वतःचा व्यवसाय चालवतो आहे. मी फार काही मोठे किंवा महान करू शकलो नाही, परंतु मी जे काही करू शकलो, त्याबाबत मी समाधानी आहे, असे मी सुरुवातीलाच मोकळेपणानी सांगु इच्छितो व मी आजपर्यंत टिकून राहिलो ही देखील वस्तुस्थिती आहे, जी महत्त्वाची आहे. काही वर्षांपूर्वी डीएलएफ नावाची महाकाय बांधकाम कंपनी सुद्धा अतिशय अडचणीत होती, बहुतेक अजूनही अडचणीत आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे सोबा ही कंपनी निश्चितपणे आपल्या देशातच नव्हे तर मध्यपूर्वेतही अतिशय चांगली कामगिरी करत आहे. माझ्या मित्राने डेव्हलपर्स उल्लेख  केल्यामुळे  मी ही दोन नावे घेतली, माझा त्यांच्याशी वैयक्तिक काहीही संबंध नाही. माझ्या मते, एखादी रिअल इस्टेट कंपनी योगायोगाने किंवा नशीबानेही मोठी होऊ शकते,जर तुम्ही मोठेपणा (म्हणजे यश) कमावलेले पैसे किंवा फायद्याच्या संदर्भात मोजत असाल, कारण जेव्हा तुमचा कच्चा माल जमीन असतो व देशाची लोकसंख्या सतत वाढत जातेय अशावेळी ज्यांच्याकडे जमीन आहे तो श्रीमंत होईल हे तुम्हाला सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही. अर्थात हेदेखील अर्ध-सत्यच आहे कारण तुमच्याकडे वाळवंटामध्ये हजारो एकर जमीन असली तरी, तुम्ही गरीबच राहाल (वाळवंटातील त्या जमीनींच्या खाली तेलाच्या खाणी असतील तरच परिस्थिती वेगळी असेल), त्यामुळे कोणती जमीन खरेदी करायची व कधी खरेदी करायची हे समजण्याइतपत तुमच्याकडे हुशारी हवी. कारण आपल्या देशामध्ये प्रत्येक जमीनीवर सरकारी नियंत्रण असते व जमीनीमुळे नव्हे तर तुमच्या जमीनीच्या अवती भोवती होणाऱ्या विकासामुळे त्या जमीनेचे भवितव्य निश्चित होते. एखाद्या जुगारी माणसालाही कधी थांबायचे याची हुशारी दाखवावीच लागते (किंबहुना इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा अधिक दाखवावी लागते), त्यावरूनच जुगारी माणसाचे भवितव्य ठरते. मात्र, रिअल इस्टेटमधील सर्व मोठ्या व यशस्वी कंपन्यांबाबत पूर्णपणे आदर राखत असे सांगावेसे वाटते की जुगार व रिअल इस्टेटमधील साधर्म्य इथेच संपते,ते म्हणजे जमीनीच्या स्वरूपातील कच्चा माल व नशीब, इथून पुढे मोठे होण्याचा प्रवास सुरू होतो व तो मोठेपणा टिकवून ठेवणे म्हणजे खरे यश !

                सर्वप्रथम,उत्पादन कोणतेही असले तरीही, कोणत्याही कंपनीला मोठी किंवा तिच्या ग्राहकांच्या नजरेत विश्वसनीय बनविणारा महत्त्वाचा गुण म्हणजे, तुम्ही जे काही आश्वासन दिले आहे ते सातत्याने पूर्ण करणे. इथे ग्राहक म्हणजे केवळ ज्यांनी सदनिका किंवा दुकान किंवा कार्यालय आरक्षित केले आहेत अशा व्यक्ती नाही तर ज्यांना तुम्ही काहीतरी आश्वासन दिले आहे, मग ते एखाद्या सेवेचे पैसे द्यायचे असतील किंवा एखाद्या कॉलला उत्तर द्यायचे असेल किंवा एखादी चूक वेळच्यावेळी मान्य करायची असेल, प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते, कारण जेव्हा तुमच्या बरोबर लोकांचाही विकास होतो तेव्हाच तुम्ही मोठे होता, नेमके हेच रिअल इस्टेटमधील बहुतेक मोठ्या कंपन्या विसरतात व याच कारणामुळे दीर्घकाळ मोठ्या व यशस्वी कंपन्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आहेत. त्याचप्रमाणे, हा साधा मंत्र कदाचित सोपा वाटू शकतो परंतु जेव्हा तुम्ही मोठे होत असता तेव्हा तो साध्य करणे अतिशय अवघड आहे. 

            कारण मोठे होण्यासाठी तुम्हाला एक संघ तयार करावा लागतो, या संघाला तुमच्या योग्य व अयोग्याच्या कल्पनेवर  विश्वास असतो, कारण तेव्हा तो संघ तुम्ही जे आश्वासन देत आहात त्याची पूर्तता करू शकतो. मी अनेक कंपन्यांमध्ये हे पाहिले आहे, कारण जेव्हा त्या आकाराने (म्हणजे उलाढालीच्या संदर्भात) लहान किंवा मध्यम होत्या तेव्हा त्यांनी अतिशय कार्यक्षमपणे आपल्या आश्वासनांची पूर्तता केली, परंतु जेव्हा त्या मोठ्या झाल्या तेव्हा त्या मोठ्या झाल्या तेव्हा त्या अपयशी ठरल्या  कारण त्यांचा संघही मोठा झाला परंतु त्यांच्यात व त्यांच्या मालकांमध्ये एकवाक्यता नव्हती व त्यामुळे आश्वासनांची पूर्तता करण्यात कित्येक पटींनी अपयश आले. इथेही पुन्हा, आपल्याला  एक सक्षम यंत्रणा तयार करायची फारशी आवड नसते, त्यामुळे त्यांचा पाठपुरावा घेणे लांबच राहिले( प्रिय देशवासियांनो याचा स्वीकार करा ) व तुम्हाला मोठे व्हायचे असेल, त्यापेक्षाही तो मोठेपणा टिकवायचा असेल, तर सातत्याने विकसित होत जाणारी एक यंत्रणा व नियमावली असलीच पाहिजे, जिचे पालन संपूर्ण संघाने केले पाहिजे, जे एक कठीण काम आहे व त्यासाठी पूर्णपणे केंद्रित दृष्टिकोन असावा लागतो जो अनेक विकासकांकडे नसतो किंवा तो महत्त्वाचा आहे असे त्यांना वाटत नाही. ज्या कंपन्यांची उलाढाल अतिशय मोठी असते, त्यांच्यापैकी प्रक्रियेची कामाच्या प्रत्येक आघाडीसाठी एक व्यवस्थित यंत्रणा असते व देखरेख करणारी यंत्रणाही असली पाहिजे. एक लक्षात ठेवा, कोणतीही यंत्रणा आपणहून काम करत नाही, असे एका ज्येष्ठ भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार मला एकदा सांगितले होते. ब्रिटीशांनी हजारो मैल अंतरावरून आपल्यावर  दोन शतके राज्य केले व तेव्हा कोणतीही आधुनिक इलेक्ट्रॉनिक दळणवळण यंत्रणा उपलब्ध नव्हती, परंतु माहिती नोंदविण्याची व दस्तऐवजीकरणाची एक यंत्रणा होती (७/१२ सारखी) व कामाच्या यंत्रणेचे निरीक्षण व त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी नोकरशाहीची यंत्रणा होती, ज्यामुळेच हे शक्य झाले.

                त्याशिवाय, ही यंत्रणा पृष्ठभागावर लवचिक असली पाहिजे कारण रिअल इस्टेट हा अतिशय स्थानिक व्यवसाय आहे जेथे धोरणे तसेच लोक, सगळे काही प्रत्येक शहरागणिक बदलते, तसेच ज्या कंपनीला मोठे व्हायचे आहे तिने सहजपणे बदल स्वीकारले पाहिजेत,आपले व्यावसायिक ( म्हणजे बांधकाम व्यावसायिक ) या गुणासाठी प्रसिद्ध नाहीत.प्रत्येक शहराची घरांची गरज  वेगळी असते तसेच आपल्याला जे लोक हाताळायचे आहेत तेदेखील वेगळे असतात. तुमच्या संघाने तसेच यंत्रणेने हे सगळे बदल स्वीकारले पाहिजेत. केवळ ज्या कंपन्या यंत्रणेच्या मूळ गाभ्याला स्पर्श न करता असे बदल करण्यासाठी लवचिक आहेत त्या मोठ्या झाल्या आहेत. एक मोठी कंपनी केवळ नफ्याच्या प्रमाणावर डोळा ठेवण्याऐवजी स्वतःची यंत्रणा भक्कम अधिक लक्ष केंद्रित करते. त्याचशिवाय रिअल इस्टेटमधील आणखी एक कच्चा दुवा म्हणजे डेटा. रिअल इस्टेटमधील अनेक कंपन्यांनी अलिकडे जेव्हा वाढीला पाठबळ देणारी संसाधने नसतानाही फार वेगाने विस्तार केला तेव्हा त्यांना गाळात जावे लागेल (आपण सर्वजण हे जाणतो), हा देखील डेटाच्या अभावाचाच परिणाम आहे, बरोबर? कारण तुम्हाला कुठे, आणि किती घरांची मागणी आहे हे माहिती असेल व तेवढेच बांधकाम केले तर तुमचा अंदाज कधीच चुकणार नाही, हा साधा तर्क समजून घेण्यात व स्वीकारण्यात अनेक जण अपयशी ठरतात. संसाधनांचे पाठबळ नसतानाही विस्तार करण्यासोबत, रिअल इस्टेटमध्ये ज्या कंपन्या मोठ्या झाल्या आहेत त्यांनी आणखी एक गोष्ट केली आहे व ती म्हणजे त्या जे काही चांगल करतात तेच करत राहणे व केवळ रिअल इस्टेटमध्ये यशस्वी झाल्यामुळे इतर व्यवसायांमध्ये पदार्पण करू नका. याचा अर्थ असा होत नाही की मी विस्तार किंवा वैविध्य आणण्याच्या विरोधात आहे, परंतु त्याचा अर्थ असा होतो की, प्रत्येक व्यवसाय किंवा व्यापारासाठी त्यांची मूलतत्वे सारखी असली तरीही वेगळी कौशल्ये आवश्यक असतात. रिअल इस्टेटमधून कमावलेला पैसा माहिती तंत्रज्ञान, किंवा हॉटेल किंवा सिनेमा निमीत्त इतर व्यवसायांमध्ये गमावलेल्या  अनेक मोठ्या रिअल इस्टेट कंपन्या मी पाहिल्या आहेत. 

            सरते शेवटी, त्या व्यावसायिकामध्ये स्वतःहून मोठे होण्याची एक आग मनात असली पाहिजे, कारण तरच वरील सर्व गुण किंवा सवयी किंवा वैशिष्ट्यांचा काही उपयोग होतो (उदाहरणार्थ माझ्यात ती नाही, हे मी अतिशय मोकळेपणाने मान्य करतो) ! एक लक्षात ठेवा, प्रत्येक यशस्वी कंपनी जी मोठी होते व तो मोठेपणा टिकवते, ती कोणत्याही व्यवसायातील असली तरीही तिने एकच मार्ग अवलंबलेला असतो. परंतु अपयश मात्र अनेक मार्गांनी येते, असे मला थोडक्यात समजले आहे ; एवढे बोलून मी मोठे होण्याविषयी व मोठे राहण्याविषयीचा माझा छोटासा लेख संपवतो !

संजय देशपांडे  

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com






 

No comments:

Post a Comment