Friday 26 August 2022

निसर्ग, इमारती, वाघ आणि शाळा!!

                                                                           





















                                                 निसर्ग, इमारती, वाघ आणि शाळा!!

लहान मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे, हिंसाचार टाळणे, गुन्हेगारांना शिक्षा होणे नोकऱ्या मिळणे आवश्यक आहे. मात्र त्यांना त्याहूनही अधिक काही मिळणे आवश्यक आहे. मुलांनी केवळ वाचन गणितच शिकू नये तर, प्रामाणिकपणा, निसर्गाची काळजी, स्वाभिमान, कुटुंबाविषयीची बांधिलकी, नागरी कर्तव्य याविषयी शिकावे असे आम्हाला वाटते”… कॉलिन पॉवेल

जनरल कॉलिन ल्यूथर पॉवेल हे अमेरिकी राजकारणी,मुत्सद्दी, राजनैतिक अधिकारी अमेरिकेचे लष्करी अधिकारी होते. त्यांनी अमेरिकेचे ६५वे परराष्ट्र मंत्री म्हणून २००१ ते २००५ पर्यंत काम केले. ते अमेरिकेचे आफ्रिकी वंशाचे पहिले परराष्ट्र मंत्री होते. अगदी हाडाचे लष्करी अधिकारी असल्यामुळे पॉवेल यांची लहान मुलांकडून पहिली अपेक्षा शिक्षण, कायद्याचे पालन करिअर हीच आहे. मात्र ते त्यांच्या अवतरणाच्या अखेरीस त्याहूनही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे प्रामाणिकपणा, निसर्गाची काळजी, स्वाभिमान, कुटुंबाविषयीची बांधिलकी नागरी कर्तव्ये याविषयी सांगतात, या सगळ्या गोष्टींमधून माणसाचे चारित्र्य घडते! याच कारणासाठी मी लहान मुलांविषयी निसर्गाविषयी माझ्या लेखाच्या सुरुवातीला त्यांचे शब्द निवडले. कोव्हिडचा धोका अजूनही पूर्णपणे संपलेला नाही, तरीही मी असे म्हणू शकतो की आता आपण त्या धोक्यासोबत जगायला शिकलो आहोत. कारण एका महिन्याच्या कालावधीत, मला दोन वेळा लहान मुलांना (म्हणजेच विद्यार्थ्यांना) संबोधित करायची संधी मिळाली माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला खरोखरच तुमच्या संवाद कौशल्याची चाचणी घ्यायची असेल, मग ती कोणत्याही विषयाशी संबंधित असू दे, तर कोणतीही शाळा किंवा महाविद्यालयाला प्रमुख पाहुणे म्हणून भेट देऊन पाहा. आता जवळपास ४० वर्षांपासून मी व्यासपीठावर उभा राहून श्रोत्यांशी संवाद साधतोय, मात्र जेव्हा वक्ता म्हणून विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी आमंत्रित केले जाते तेव्हा मला अजूनही  ताण येतो ! जेव्हा विद्यार्थी इयत्ता १० वीतील असतात तेव्हा पोटात आणखीनच गोळा येतो. पुण्याच्या मिलेनियम शाळेतून त्यांच्या १०वी च्या विद्यार्थ्यांपुढे बोलण्याचे आमंत्रण आल्यानंतरही, याला अपवाद नव्हता. सर्वप्रथम म्हणजे विषय थोडा वेगळा होता, केवळ वन्यजीवन किंवा पर्यावरणाविषयी बोलायचे नव्हते तर माझ्या व्यवसायाशी (म्हणजे उपजीविकेशी) म्हणजेच बांधकामाशी त्याची सांगड घालायची होती. या वयोगटातील विद्यार्थी खूप लवकर कंटाळतात तुम्ही व्याख्याना दरम्यान त्यांच्या प्रतिक्रियेवरून हे प्रत्यक्ष पाहू शकता. मात्र एकदा गाडी घसरली की तुम्ही त्याविषयी काहीही करू शकत नाही. त्यांच्या नजरा, आपसात सुरू असलेली कुजबूज, अस्वस्थपणे चुळबुळ करणे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असतात, “भावा पुरे झाले, तुझा (म्हणजे आमचा) वेळ वाया घालवू नकोस, आवर आता”, मी खरोखरच सांगतो एखाद्या वक्त्यासाठी यापेक्षा अधिक वाईट अनुभव असू शकत नाही. यामुळेच, अशा वयोगटांमधील मुलांसमोर बोलण्याची संधी ही एक वक्ता म्हणून माझ्यासाठी एक आव्हानच असते!

मी त्या मुलांना एक ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरण केले. मला तुम्हाला असे सांगावेसे वाटते की बहुतेक लोक स्लाईड फक्त वाचून दाखवून सादरीकरण करतात, ते श्रोत्यांसाठी विशेषतः जर श्रोते लहान मुले असतील तर अतिशय कंटाळवाणे असते. कारण ती स्क्रीनवर जे काही लिहीले आहे ते ती मुले तुमच्यापेक्षा वेगाने वाचू शकतात तुम्ही जर त्याच शब्दांची पुनरावृत्ती करत असाल तर त्यांच्यासाठी ते जास्तच कंटाळवाणे होते. त्याऐवजी तुम्ही एखाद्या विषयावर (अभ्यासाचा सोडून) व्याख्यान देत असाल किंवा सादरीकरण करत असाल तर ते गोष्ट सांगितल्यासारखे करा. मी हे माझ्या अनुभवातून सांगतोय कारण बहुतेक लहान मुलांना गोष्ट आवडते (डिस्ने मार्व्हल स्टुडिओंना विचारा), अर्थात गोष्ट मोठ्यांनाही आवडते मात्र ते उघडपणे हे मान्य करणार नाहीत. म्हणूनच तुमचे सादरीकरण किंवा व्याख्यान अशाप्रकारे तयार करा की तुम्ही एखादी गोष्ट सांगत आहात किंवा ते एखाद्या गोष्टीविषयी असले पाहिजे, म्हणजे तुम्हाला कंटाळलेल्या चेहऱ्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता अधिक आहे. मीसुद्धा निसर्ग माझ्या व्यवसायाभोवती म्हणजेच बांधकाम व्यवसायाविषयी एक गोष्ट गुंफली, कारण मी बांधकाम व्यवसायातील करिअरच्या संधींविषयी बोलावे अशी शाळेची इच्छा होती. एक लक्षात घ्या, ही १०वीची मुले होती ज्यांना अजून स्वतःसाठी कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे याची निवड करायची होती. त्यांना जास्तीत जास्त क्षेत्रांची ओळख व्हावी असा शाळेचा प्रयत्न होता बांधकाम हे केवळ त्यापैकीच एक आहे. तसेच या मुलांना पर्यावरण संवर्धन, प्रामुख्याने वाघांचे संवर्धन हा विषय समजावा अशीही शाळेची इच्छा होती.

म्हणूनच मी, निसर्ग मी असे नाव निवडले कारण पर्यावरण हा महत्त्वाचा शब्द आहेच मात्र त्यातून तुम्हाला कोरडी, शास्त्रीय भावना जाणवते, तर निसर्ग हा शब्द ऐकताना छान वाटते, तुमचे त्या शब्दाशी चटकन नाते जुळते, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी त्यांना निसर्ग या शब्दाचा अर्थ सांगण्यापासून सुरुवात केली, म्हणजे आपण जी हवा श्वासावाटे आत घेतो, आपल्याला पावसाच्या स्वरुपात मिळणारे पाणी, झाडे, जमीन, आकाश, वारा हे सगळे काही निसर्ग आहे ज्यामुळे आपण जगतो. जोपर्यंत आपण खुल्या वातावरणात जात नाही निसर्गाला भेटत नाही, तोपर्यंत आपल्याला केवळ वर्गात बसून कशाचे संवर्धन करायचे आहे हे समजणार नाही. शाळेचे वर्ग अर्थातच महत्त्वाचे आहेत कारण त्यामुळे आपण अभ्यास करतो आपल्याला निसर्गाविषयी जाणून घेता येते जे आपण नंतर खुल्या वातावरणात निसर्गाला भेटायला गेल्यावर आपल्याला अनुभवता येऊ शकते. खरेतर, निसर्गाने आपल्याला सर्वकाही अतिशय सुंदर स्वरुपात दिले आहे, हिरव्या कुरणांपासून, ते बर्फाच्छादित पर्वतांपर्यंत, नितळ निळ्या आकाशापासून ते समुद्रापर्यंत, अगदी वाळवंटेही सुंदर आहेत, अर्थात जोपर्यंत तिथे मानवाचा हस्तक्षेप (म्हणजेच अडथळा) होत नाही तोपर्यंत. इथे संघर्ष होऊ शकतो (मुलांच्या मनात भरपूर संघर्ष सुरू असतो) कारण माणसांची निर्मितीही निसर्गानेच केली आहे ज्याप्रमाणे जंगले, समुद्र, पर्वत, नद्या निसर्गाने तयार केलेल्या आहेत, अशावेळी निसर्गाला अपाय करण्यासाठी केवळ माणसांनाच दोष कसा देता येईल? आपल्याला नेमके हेच समजून घ्यावे लागेल (किंवा विद्यार्थ्यांना समजून सांगावे लागेल) कारण तरच आपण निसर्गाला वाचवू शकू किंवा आपली निसर्गाप्रती असलेली जबाबदारी समजून घेऊ शकू. माणसे जिथपर्यंत पोहोचलेली नाहीत किंवा जेथे अगदी कमीत कमी मानवी अस्तित्व आहे अशा जमीनीला आपण भेट देऊ (अशी जागा शोधणे शहरात अतिशय अवघड आहे) पण आपल्या शहराभोवती अशा अनेक जागा आहेत. तुम्ही साधारण १०-१५ किमी शहराबाहेर गेल्यास तुम्हाला खुल्या जमीनी, टेकड्या दिसू शकतात. तुमच्या कारमधून किंवा बाईकवरून उतरा, ती रस्त्याच्या कडेला लावा अशा जमीनीवर काहीशे मीटर अंतर चालत जा तुमचा अनुभव काय आहे किंवा तुम्ही काय पाहिले किंवा तुम्हाला काय वाटले ते सांगा? पृथ्वी, झाडे, गवत, आकाश, ओढे, टेकड्या हे सर्व इतके एकरूप झालेले असते की तुम्ही यातील कोणत्याही घटकाला एकमेकांपासून वेगळे करू शकत नाही तुमचे शरीरही त्याचाच एक भाग होऊन जाते. म्हणूनच तुम्ही निसर्गाचीच निर्मिती असे म्हणू शकता तुम्ही तुमच्या नैसर्गिक स्वरुपात जेव्हा निसर्गाशी एकरूप होता तेव्हाच हे शक्य होते.

तुम्ही अगदी शहराबाहेर जाऊ शकत नसाल, तरीही तुम्ही तुमच्या जवळपास एखाद्या खुल्या जमीनीला भेट देऊ शकता तिचे काळजीपूर्वकपणे निरीक्षण करू शकता. इथेही तुम्हाला थोडे गवत, कीटक, सरडे, चिमण्यांसारखे काही स्थानिक पक्षी दिसतील, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जीवन दिसेल. आता, कल्पना करा की याच जागी जमीन खणण्यासाठी बुलडोझर फिरवला जात आहे, झाडे कापली जात आहेत, अशी जमीनींच्या तुकड्यावर असलेले पक्षी, मुंग्या, सरडे, खारी यासारख्या सर्व प्रजातींना हुसकावून लावले जात आहे त्याऐवजी जमीनीमध्ये काँक्रीट भरले जात आहे, स्टील, माती, इत्यादी साहित्याचा वापर करून इमारत बांधली जात आहे, ज्या जागी काही क्षणांपूर्वी तुम्ही उभे होता निसर्गाशी एकरूप झाला होता, आता तुम्हाला कसे वाटेल? याच कारणामुळे माणूस निसर्गनिर्मित असूनही, निसर्गाचा विध्वंसक झाला आहे. तुम्हाला बांधकाम उद्योगामध्ये करिअर बनवायचे असेल, तर तुमच्या सर्वांसमोरील मोठे आव्हान असेल ते म्हणजे विकास निसर्गाचा समतोल साधण्याचे.

आपल्याला हे मान्य आहे की आपण आपल्या घरांसाठी जमीनीमध्ये बिळ करून राहू  शकत नाही किंवा झाडांवर घरटे बांधू शकत नाही, माणूस म्हणून आपल्याला जगण्यासाठी घर अन्नाव्यतिरिक्त अजूनही बऱ्याच गोष्टी आवश्यक असतात. मात्र म्हणूनच आपण जेव्हा आपले आयुष्य आरामदायक व्हावे असा प्रयत्न करत असतो तेव्हा निसर्गाचे संवर्धन करण्याची आपली अधिक जबाबदारी आहे कारण निसर्गाने तयार केलेल्या इतर कोणत्याही प्रजातीपेक्षा आपल्या गरजा अधिक आहेत. हा सगळा बदल मुलेच घडवून आणू शकतात याच कारणासाठी मी इथे आहे तुम्हाला शनिवारी सकाळी हा लेक्चरचा त्रास देतोय, असे मी त्या मुलांना सांगितले. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे दिवाळीतील फटाके, शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमांमुळे सर्व वयोगटातील लहान मुलांमध्ये आलेल्या जागरुकतेमुळे फटाके उडविण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. यामुळे दिवाळीदरम्यान संपूर्ण देशभरात, विशेषतः पुण्यासारख्या शहरामध्ये हवेच्या प्रदूषणास आळा घालण्यास मदत झाली आहे. मला असे वाटते की बांधकाम उद्योग हे अतिशय उत्तम क्षेत्र आहे कारण घर ही केवळ माणसांचीच नव्हे तर प्रत्येक सजीवाची मूलभूत गरज आहे. कोणत्याही व्यवसाय किंवा उद्योगासाठी मागणी किंवा गरज हा थोडेफार पैसे कमावण्याचा मुख्य निकष आहे, नाही का? घरांना नेहमीच मागणी असेल, त्याचसोबत आपण घरे बांधत असताना निसर्गाचे संरक्षण करण्याची जबाबदारी असेल, हे मला तुम्हाला सांगावेसे वाटते. तुम्ही माणसांसाठी घरे बांधत असताना, ज्या घरांमध्ये इतर प्रजातींसाठी, झाडे-झुडुपे प्राण्यांसाठीही जागा असेल असे पाहा; किंबहुना, असे केल्यानेच आपली घरे परिपूर्ण होतील. निसर्गपूरक विकास करण्यासाठी, तुम्हाला सगळ्यांना सरकारी नियमांची धोरणांची ओळख असली पाहिजे तुम्हाला जेथे त्रुटी आढळतील तेथे तुमचा आवाज उठविण्याची तयारी असली पाहिजे, तरच तुम्ही स्वतःला यशस्वी मानू शकाल.

आता माझ्या गोष्टीचा शेवटचा भाग, तो वाघांशिवाय म्हणजेच जंगलांशिवाय पूर्ण होणार नाही. मी त्यांना विविध अधिवास इतर प्राण्यांची छायाचित्रे दाखवल्यानंतर, काही वाघांची छायाचित्रे दाखवली. स्क्रीनवर मी काढलेली छायाचित्रे पाहताना त्या तरुण चेहऱ्यांवरील आश्चर्याचे भाव स्पष्टपणे दिसत होते. नेहमी वाघ वाचविण्याविषयीच का बोलले जाते, याचे उत्तर म्हणजे, वाघ जंगलाचे चक्र पूर्ण करतो वाघांना वाचविण्याचा रस्ता जंगल नावाच्या संपूर्ण व्यवस्थेतून जातो. त्याचसाठी आपल्याला निसर्गाचे सर्वोत्तम स्वरूप म्हणजेच जंगल समजून घ्यावे लागेल ते केवळ जंगलांना भेटी देऊनच शक्य आहे त्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे, बरोबर? जंगलांना भेटी देऊन तुम्ही कितीतरी गोष्टी शिकता कारण जंगलामध्ये कारणाशिवाय काहीच होत नाही प्रत्येक गोष्ट प्रमाणबद्ध असते. हा अतिशय महत्त्वाचा पैलू आहे ज्याची तुम्ही तुमचे करिअर म्हणून निवडाल त्या प्रत्येक क्षेत्रात मदत होईल. तुम्हाला कुठल्याही वर्गात बसून एखाद्या पुस्तकातून हे समजून सांगितले जाणार नाही. अगदी पालक शिक्षकांनी मुलांना निसर्गाशी एकरूप होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, तो वेळ वाया जाणार नाही, हे कृपया लक्षात ठेवा.

शेवटी, मी फक्त एकच गोष्ट सांगेन, आपल्याला पुस्तकांमधून, वर्गातून जे शिक्षण मिळते ते निश्चतच महत्त्वाचे आहे पण त्यापेक्षाही महत्त्वाचा आहे तो  शिक्षणाचा वापर. तो वापर कसा करायचा हे शिकवण्यासाठी निसर्गाशिवाय दुसरा कुणीही चांगला शिक्षक असू शकत नाही. म्हणूनच माझ्या छोट्या दोस्तांनो, तुम्हाला अनेक शुभेच्छा. मिलेनियम शाळेच्या चमूने मला या तरुणाईपुढे माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल आभार. मला खात्री आहे की एक दिवस ते या विचारांना स्वतःच्या बुद्धीची जोड देऊन आणखी वरच्या पातळीवर नेतील.

तुम्ही खाली दिलेल्या यूट्यूबच्या लिंकवर व्हिडिओ किंवा सादरीकरण पाहू शकता...

निसर्ग मी

you tube link-

https://www.youtube.com/watch?v=pHLr4LsYriw

संजय देशपांडे      

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी - smd156812@gmail.com

You can find our English version @ link below

https://visonoflife.blogspot.com/2022/08/