Tuesday 23 September 2014

एका मताची किंमत !
























मत न देणारा माणूस म्हणजे  स्वत:चे सुरक्षाकवच गमावणारा.” ...लिंडन जॉन्सन.

लिंडन बेन्स जॉन्सन, ज्यांना एलबीजे असे म्हटले जायचे अमेरिकेचे छत्तिसावे अध्यक्ष होते. मला पुण्याचे माननीय जिल्हाधिकारी श्री. सौरभ राव यांच्या कार्यालयातून एसव्हीईईपीच्या बैठकीसाठी संपर्क करण्यात आला तेव्हा माझ्या मनात अमेरिकी अध्यक्षांचे वरील अवतरण आले.  एसव्हीईईपी म्हणजेच मतदारांचे पद्धतशीर प्रशिक्षण व मतदारांचा सहभाग, यासारखी एखादी समिती असते हे मला माहितीच नव्हते! मला जेव्हा या समितीच्या बैठकीसाठी बोलवण्यात आले तेव्हा मी थोडासा गोंधळात पडलो, ही समिती कशासाठी आहे अशी शंका निर्माण झाली, मात्र कामात व्यस्त असल्यामुळे मला या बैठकीला जाता आले नाही, मी माझ्यावतीने उपस्थित राहण्यासाठी माझ्या सहका-यास पाठवले. त्याने मला त्या बैठकीचा जो वृत्तांत दिला तो अतिशय रोचक होता, माननीय जिल्हाधिका-यांनी समाजातील बहुतेक वर्गांसाठी अशा बैठका आयोजित केल्या होत्या व त्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त लोकांना संपर्क करुन, सर्व प्रकारची साधने वापरुन मतदानाविषयी जागरुकता निर्माण करण्याचे आव्हान केले. आम्ही लोकसभा निवडणुकीदरम्यान आमचे सर्व ग्राहक, पुरवठादार/कंत्राटदारांना त्यांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे असे पत्र पाठवले होते व त्या प्रयत्नाचे भरपूर चांगले कौतुक झाले; त्याचप्रमाणे यावेळीही सर्वांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा माननीय जिल्हाधिका-यांनी व्यक्त केली. खरेतर प्रौढ सुशिक्षित लोकांना मतदानासारख्या मूलभूत गोष्टीसाठी आग्रह करावा लागतो ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे! मात्र एक समाज म्हणून आपण तसेच आहोत, आपण एक व्यक्ती म्हणून अतिशय चांगले असू व आपापल्या क्षेत्रात किंवा व्यवसायात यशस्वी असू मात्र संघटितपणे एक समाज म्हणून आपण फारच निष्क्रिय आहोत!
यावेळी लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्याला सामान्य माणसाच्या दृष्टिकोनात अनेक वर्षात मोठा बदल दिसून आला. सुशिक्षित लोक कुणाचाही सत्ता आली तरी काय फरक पडतो असे म्हणून मतदानाकडे पाठ फिरवत असत, मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुटी न घेता रांगेत उभे राहून त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला! आपल्याला त्याचा परिणाम किमान सत्ता बदलातून तरी दिसून आला; हा काही राजकीय स्तंभ नाही व मी कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता नाही, मात्र आपण आपल्यापासून सुरुवात केली तर कोणताही बदल घडणे शक्य आहे! अनेक जण म्हणाले ती एका व्यक्तिची लाट आहे, तर अनेकांना तो सोशल मीडियाचा परिणाम वाटला, काहींना पक्षाच्या प्रचारामुळे ते साध्य झाल्याचे वाटले, मात्र परिणाम सर्वांनाच दिसून आला जो आपण अनेक वर्षात अनुभवला नव्हता हे खरे आहे! सुदृढ समाजाचे पहिले लक्षण म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला त्याच्या जबाबदारीची जणीव असते व कोणत्याही लोकशाही समाजाची मतदान करण्याहून दुसरी कोणती मूलभूत जबाबदारी असू शकते! माझ्या मते  स्वातंत्र्यास अडुसष्ट वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वातंत्र्य म्हणजे काय याचा आपण अर्थ शिकलो आहोत याची ती खूण होती! सुशिक्षित लोकांची नावे मतदार यादीत नव्हती म्हणून निदर्शने करण्यात आली, आपण कधीच विचारही केला नाही की समाजातील तथाकथित पांढरपेशा वर्गातील लोक मतदान करायला इतके उत्सुक असतील! इतकी प्रसिद्धी व गोंधळानंतर लोकांनी मतदान केले, मात्र तरीसुद्धा पुण्यातील मतदानाची टक्केवारी केवळ ५२ % होती जी देशातील मतदानाच्या टक्केवारीच्या जवळपास १०% कमी होती, देशातील टक्केवारीचा आपल्याला नक्कीच अभिमान वाटला पाहिजे! आपल्यालाकडे लोकसभेच्या गेल्या काही निवडणुकांपेक्षा मतदानाची टक्केवारी १०% वाढली असली तरीही देशातील दुर्गम ग्रामीण भागापेक्षा ती अतिशय कमी होती. याचाच अर्थ असा होतो की तथाकथित मागास भागातील लोक पूर्वेचे हार्वर्ड म्हणून ओळखल्या जाणा-या पुण्यापेक्षाही जबाबदार आहेत व पुण्याचा नागरिक म्हणून आपल्यासाठी ही नामुष्कीची बाब आहे!

आता विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की हा राजकीय लेख नाही मात्र तुम्हाला बदल हवा असेल किंवा आपल्याला अधिक चांगले, जबाबदार सरकार हवे असेल तर आपण सर्वप्रथम मतदान करणे आवश्यक आहे. लोकशाही म्हणजे केवळ काहींनी मतदानाची औपचारिकता पूर्ण करुन सरकार स्थापन करणे नाही तर आदर्श परिस्थितीत १००% पात्र मतदारांनी मतदान केले पाहिजे व त्यानंतर जे सरकार सत्तेवर येईल त्यास ख-या अर्थाने लोकशाही सरकार म्हणता येईल. विचार करा जेमतेम ४०% लोक मतदान करतात तेव्हा एकूण मतदानाच्या फक्त ४०% मते असलेले सरकार सत्तेत येते; म्हणजेच त्या पक्षाकडे एकूण मतांपैकी फक्त १६% मते असतात व तरीही तो सत्तेत येतो! याच सरकारने १००% जनतेच्या समस्या सोडवाव्यात अशी आपली अपेक्षा असते! आपण आपली मतदानाची जबाबदारीही पूर्ण करत नाही तर मग सरकार चांगले असावे अशी अपेक्षा करण्याचा आपल्याला काय नैतिक हक्क आहे, आणि ही जबाबदारी पाचवर्षातून फक्त एकदा पार पाडायची असते!

आपले राज्य साक्षरता तसेच स्वतःविषयीच्या जागरुकतेसंदर्भात देशातील अधिक विकसित राज्यांपैकी एक मानले जाते; विशेषतः पुणे ही राज्याची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी मानली जाते. मात्र ही तथाकथित संस्कृती आपल्या मतदानातून कधीही दिसून येत नाही ही विचार करण्याची बाब आहे! शैक्षणिक निकष, एक शहर म्हणून असलेला आपला दर्जा याचा विचार करता पुण्यामध्ये देशातील सर्वाधिक मतदान झाले पाहिजे, जे आत्तापर्यंत कधीही झालेले नाही. किंबहुना आपल्याकडे मतदानाचे प्रमाण राज्यातील गरीब व अविकसित शहरांच्या तुलनेत अतिशय कमी असते. मग आपली साक्षरता किंवा ज्ञान केवळ पुस्तकांपुरते मर्यादित आहे का, कारण आपला लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण त्याचा वापर करत नसू तर काय उपयोग आहे? त्यानंतर आपण वर्षभर वर्तमानपत्रांना विविध नागरी समस्यांविषयी एक जागरुक नागरिक या नावाने पत्र लिहीतो, एवढे केले म्हणजे आपण आपल्या जबाबदा-यांविषयी अतिशय सजग असल्याचे आपल्याला वाटते!  लक्षात ठेवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे वैशाली किंवा रुपालीमध्ये घोळक्यात चहा पिताना आपले मत व्यक्त  करणे नाही, तर या स्वातंत्र्यामध्ये आपण आपली मतदानाची व आपल्या शासनकर्त्यांना निवडण्याची जबाबदारी पार पाडणेही अपेक्षित आहे.

शेवटी आपण मतदान का करतो? आपण मतदान करतो कारण ती आपल्या अस्तित्वाची खूण आहे, आपल्याला एक व्यक्ती म्हणून स्वतःची व समाज म्हणून आपल्या जबाबदारीची जाणीव असल्याची ती खूण आहे. केवळ एका मताने सर्वकाही बदलणार नाही मात्र सर्वांनीच असा विचार केला तर काय होईल असा विचार करा? असा विचार केल्यास कुणी मतदाताच उरणार नाही, त्यावेळी तो समाजातील वाईट तत्वांचा विजय असेल व त्याला मतदान न करणारे जबाबदार असतील. एकप्रकारे मतदानाचा हक्क म्हणजे आपल्याला देण्यात आलेली  आपलेच भविष्य निवडण्याची संधी आहे! लक्षात ठेवा आपण जास्तीत जास्त संख्येने मतदान केल्यास, सत्तेवर येणा-या सरकारवर मतांचा दबाव असेल कारण लोकांनी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या सरकारवर विश्वास ठेवलेला असतो व ते सरकार त्या सर्व मतदारांना उत्तरदायी असते. म्हणूनच त्या सरकारला चांगले काम करावेच लागते कारण केले नाही तर हेच लोक त्यांना जाब विचारतील.
आपण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे केवळ मतदान करुन व शाई लावलेल्या बोटाची छायाचित्रे फेसबुक किंवा वॉट्स अपवर टाकून आपली जबाबदारी संपत नाही. आपण आपल्या मताचा आदर करत असू तर आपण ज्याला मतदान केले आहे तो किंवा ती तुम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत आहेत का हे तुम्ही पाहिले पाहिजे व त्यासाठी पुढचे पाच वर्षे डोळे उघडे ठेऊन राज्यकर्त्यांवर दबाव ठेवला पाहिजे, जर शहरातील, राज्यातील व देशातील प्रत्येक व्यक्तिला हे समजले व त्याने त्याचे पालन केले तर आपल्या देशाला  ख-या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल. असे म्हणतात की, “प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात धाडसाने केलेल्या एका लहानशा कृतीने होते”, म्हणूनच चला तर मग आपण सर्वजण मतदान करु व केवळ आपल्यासाठीच नाही तर आपल्या भावी पिढ्यांसाठीही बदल घडवून आणू! वरील अवतरणात म्हटल्याप्रमाणे आपण मतदान केले नाही तर आपल्याला स्वतःचे संरक्षण गमवावे लागेल, आणि लक्षात ठेवा ज्या व्यक्तिला स्वतःच्या मताची काळजी वाटत नाही, त्या व्यक्तिची काळजी कोण करेल आणि का करावी?

संजय देशपांडे

 smd156812@gmail.com


संजीवनी डेव्हलपर्स

Thursday 18 September 2014

परवडण्यासारखी घरे; आव्हाने व परिस्थीती





















परवडणे ही एक प्रकारची मानसिक स्थिती असते जी थेट माणसाच्या खिशाशी संबंधित असतेमार्क  ट्वेन.

माझे सिडकोमधील कॉलेज मित्र सुरेश ठाकूर यांनी मला काही दिवसांपूर्वी फोन केला व मी अभियंता दिनानिमित्त परवडण्यासारखी घरे या विषयावर व्याख्यान व सादरीकरण देऊ शकतो का असे विचारले. मी त्याला एका क्षणात होकार दिला. मात्र नंतर मी त्याविषयी विचार करु लागलो, कारण मला माझ्या प्रत्येक व्याख्यानापूर्वी नेहमी थोडासा ताण येतो. यावेळी मात्र मला अतिशय ताण आला, मी ठाक-याला हो म्हणून चूक केली असे मला वाटू लागले.......ठाक-या हे त्याचे कॉलेजमधील टोपण नाव....माझे टोपण नाव पांड्या! ज्यांना कल्पना नसेल त्यांच्यासाठी सांगतो सिडको म्हणजे शहर व औद्योगिक विकास महामंडळ, नवी मुंबईमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ८० च्या दशकात ही सरकारी संस्था स्थापन करण्यात आली. आता तिचा विस्तार शेकडो चौरस किलोमीटरपर्यंत झाला आहे व जवळपास ४०० तांत्रिक कर्मचारी व मेट्रो ते विमानतळापर्यंत अनेक मोठ मोठे प्रकल्प साकार करणा-या या संस्थेच्या कर्मचा-यांपुढे मी काय बोलणार असा प्रश्न मला पडला? हे व्याख्यान सिडकोच्या अभियंता संघटनेसाठी द्यायचे होते, त्यामुळे सगळे श्रोते अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असलेले अभियंते होते. सिडकोने स्वतःच हजारो घरे व इमारतींचे प्रकल्प पूर्ण केले आहेत, त्यामुळेच मला माझे काम अधिकाधिक अवघड वाटू लागले. पुन्हा ठाक-याचा फोन आला तेव्हा त्याने व्याख्यानाचा विषय तंत्रज्ञान, आकडे वगैरे बोडजपणे न मांडता हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडावा अशी सूचना केली. तिथे मला हा विषय कसा मांडायचा आहे याविषयी थोडीशी कल्पना मिळाली व पुढील चार दिवस मी केवळ या व्याख्यानाचाच विचार करत होतो. मी माझ्या चमूसह या विषयावर माझ्याकडे उपलब्ध असलेल्या छायाचित्रांद्वारे एक संकल्पना तयार केली.  १५ सप्टेंबरला पोटात गोळा व धडधडना–या हृदयाचे ठोके ऐकत मी सिडकोला पोचलो . मी कधीच  माझे व्याख्यान लिहित नाही पण दिलेले व्याख्यान  लिहून तुमच्यापर्यंत पोचविण्याचा हा प्रयत्न ……

सिडकोतील अभियंत्या मित्रांनो
मी तुमचा आणि माझा मित्र व अभियंता सहकारी श्री. ठाकूर याचा अतिशय आभारी आहे. मी जवळपास २५ वर्षांपूर्वी अभियांत्रिकीच्या २-या व ३-या वर्षामध्ये असताना या महान संघटनेने बांधलेल्या प्रकल्पांना भेट द्यायचो, आज तोच अभियांत्रिकीचा विद्यार्थी तुमच्यासमोर तंत्रज्ञ म्हणून व्याख्यान द्यायला उभा आहे, ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे! माझ्या अभियांत्रिकी शिक्षणाचे मला सार्थक झाल्यासारखे वाटते! मला सर्वप्रथम तुम्हाला सांगावेसे वाटते की निमंत्रण स्वीकारल्यानंतरही मी काहीतरी कारण देऊन ते नाकारण्याचा विचार करत होतो, कारण माझ्याकडे तुमच्यासमोर उभे राहून बांधकामा विषयी काहीतरी बोलण्याचे धाडस नव्हते.... मात्र धीर केला. मी आज इथे केवळ व्याख्यान देणार नाही किंवा सादरीकरण करणार नाही तर आपण विचारांची देवाणघेवाण करणार आहोत. आपण सगळे अतिशय अनुभवी आहात, त्यामुळे मी जे काही बोलतोय ते कदाचित नवीन नसेल, मी आज परवडणारी घरे याविषयावर बोलणार आहे, जी केवळ सिडकोचीच नाही तर संपूर्ण देशाची गरज आहे; बांधकाम व्यवसायात गेल्या २४ वर्षांत मला मिळालेल्या अनुभवातून मी हा विषय मांडणार आहे.

अन्न, वस्त्र व निवारा या समाजाच्या तीन मूलभूत गरजा आहेत, पहिल्या दोन गरजांसाठी आपण बरेच काम केले आहे मात्र आजही आपण शेवटच्या गरजेकडे दुर्लक्ष केले आहे ते म्हणजे घर! सर विश्वेश्वरैय्या यांचा आज जन्मदिवस, हा दिवस आपण अभियंता दिन म्हणून साजरा करतो, त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य मला इथे सांगावेसे वाटतेअभियंता म्हणजे जो केवळ समस्या सोडवणारा नाही तर अभियंता म्हणजे जो भविष्यातील समस्या पाहू शकतो व ती टाळतो”! आपण परवडण्यासारख्या घरांची समस्या पाहू शकलो नाही हे सत्य आहे व आता ती सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत, अर्थात उशीर झाला तरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण परवडण्यासारखी घरे म्हणजे काय व आपण त्यामध्ये का अपयशी ठरलो आहोत हे समजून घेतले पाहिजे? मला नेहमी असे वाटते की आपण सत्य स्वीकारल्यानंतर ही समस्या अधिक चांगल्याप्रकारे सोडवू शकतो. मी आज तुम्हाला आपल्याला आजच्या विषयाशी संबंधित दोन गोष्टी सांगणार आहे.

आपण सर्वांनी बहुतेक इजिप्तच्या लोककथांमधील बुद्धिमान, चतुर मुल्ला नसिरुद्दीन या व्यक्तिरेखेविषयी ऐकले असेल. एके दिवशी मुल्लाने त्याचे गाढव विकायचे ठरवले व त्यासाठी तो मुलासह गावच्या बाजाराकडे निघाला. रस्त्यात एक माणूस त्यांना भेटला वसलाम वालेकुम करुन विचारले ते कुठे जात आहेत, हेतू जाणून घेतल्यानंतर त्याने मुल्लाला सुचवले की चालत जाण्याऐवजी गाढवावर बसून जा. मुल्लालाही त्याची सूचना पटली व तो गाढवावर बसून जाऊ लागला. काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांना एक आणखी एक गावकरी भेटला व ते बाजारात का चालले आहेत हे ऐकल्यानंतर मुल्लाला रागवला व म्हणाला तुमचा लहान मुलगा चालतोय व तुम्ही गाढवावर बसून आरामात चालला आहात? मुल्लाला त्याची चूक पटली, तो गाढवावरुन उतरला व त्याच्या मुलाला बसवले. पुन्हा काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना आणखी एक गावकरी भेटला व त्याने विचारले अरे मुल्ला तू मूर्ख आहेस का? असेही ते गाढव विकणारच आहेत तर मग वडील व मुलगा दोघेही त्यावर बसून बाजारात का जात नाहीत? त्यानंतर मुल्ला व त्यांचा मुलगा दोघेही गाढवावर बसले व पुढे जाऊ लागले. काही अंतर पुढे गेल्यानंतर आणखी एक गावकरी भेटला व नमस्कार वगैरे झाल्यानंतर मुल्लावर ओरडला व म्हणाला गाढवाने आयुष्यभर तुमची सेवा केली आहे आता तो वृद्ध झाल्याने त्याला विकण्यापूर्वीही त्याच्याशी इतक्या अमानवी व क्रूरपणे वागत आहात! त्यांनी गाढवाला खांद्यावर उचलून बाजारात न्यावे असा सल्ला दिला! त्याचे ऐकून मुल्ला व त्याच्या मुलाने गाढवाला खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न केला, एका पुलावर हे सगळे  पोचले होते ,मात्र त्याला उचलण्याच्या प्रयत्नात गाढव घाबरुन पळू लागले व या गोंधळात नदीच्या पाण्यात पडले व वाहून गेले! इथे जमलेल्या सर्वांविषयी आदर व्यक्त करत असे सांगावेसे वाटते की आपल्या गोष्टीत परवडण्यासारखी घरे म्हणजे गाढव, मुल्ला म्हणजे आपले शासनकर्ते ज्यांना आपण निवडून दिले आहे व मुलगा म्हणजे सामान्य माणूस. गावकरी म्हणजे बांधकाम व्यवसायिक, स्वयंसेवी संघटना व सल्लागार. गोष्टीतल्या गाढवाचे जे झाले तीच गत परवडण्यासारख्या घरांची झाली आहे!

आणखी एक गोष्ट आहे आंधळ्या माणसाची आणि हत्तीची! यातील हत्ती म्हणजे परवडण्यासारखी घरे व आंधळा माणसे म्हणजे आपण सगळे, काहींना असे वाटते की एफएसआय वाढवला की परवडण्यासारखी घरे मिळतील, काहींना असे वाटते की उंच इमारतींमुळे परवडणारी घरे मिळतील व ही यादी वाढतच जाईल मात्र आपण याचा सर्वांगीण विचार केलेलाच नाही हे सत्य आहे, म्हणूनच आपल्याला ही संकल्पना समजलेली नाही!
परवडण्यासारख्या घरांचे विविध पैलू आहेत केवळ एकाच पैलुद्वारे त्याची व्याख्या करता येत नाही. आपल्याला थोडक्यात चर्चा करता येतील असे काही मुद्दे मी काढले आहेत ज्यावर आपण सविस्तर विचार करु शकतो. मी इतकेच करु शकतो!
परवडण्यासारखी म्हणजे काय हे ठरवणे
जमीन
पायाभूत सुविधा
आकार/नियोजन
जगण्याचा म्हणजे विविध सेवांचा खर्च
ग्राहकांपर्यंत वितरण
लोकसंख्या
पर्यावरण/जैवविविधता
यातील प्रत्येक मुद्याचा विचार करु, मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला अनेक गोष्टी माहिती असतील, मात्र एक अभियंता त्याच्याकडील माहितीचा कसा उपयोग करतो हे अधिक महत्वाचे असल्याचे विसरुन चालणार नाही!

परवडण्यासारखी म्हणजे काय हे ठरवणे
मार्क ट्वेन या महान विनोदी लेखकाने त्याच्या अवतरणात परवडण्यासारखे म्हणजे काय हे ठरवणे अतिशय अवघड असल्याचे म्हटले आहे कारण समाजामध्ये ही अतिशय व्यक्तिगत बाब आहे. मात्र इतर गोष्टींचा विचार करा तुम्हाला रस्त्याच्या कडेला एखाद्या टपरीत ५ रुपयाला चहा मिळू शकतो व ताज महालसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ५०० रुपयांना चहा मिळतो, त्यातले आपल्याला काय परवडू शकते हे आपल्यावर आहे, मात्र चहा व ते पिण्याचे समाधान दोन्हींचे जवळपास सारखेच असते. त्याचप्रमाणे एखाद्याला कार खरेदी करायची असेल तर १.५० लाखात टाटा नॅनो खरेदी करता येते त्याचवेळी १.५० कोटी रुपयांची बीएमडब्ल्यूही असते, दोन्हींचाही उपयोग होतो व दोन्ही गाड्यांना मुंबई-पुणे प्रवासासाठी तीन-साडेतीन तास लागतात, आपल्याला काय परवडू शकते हे आपण ठरवायचे आहे. मात्र घरांच्या बाबतीत असे आहे का? माझ्या खिशात ५ कोटी रुपये असतील तर मी कुठेही घर खरेदी करु शकतो, मात्र माझ्या खिशात केवळ ५ लाखच असतील तर मी काय करु? आपल्या सर्वांना माहिती आहे की ५ लाखांमध्ये घर मिळू शकत नाही, इथेच आपण सिडको किंवा कोणत्याही सरकारी गृहनिर्माण योजनांचे एलआयजी, एमआयजी किंवा एचआयजीसारखे जुने पुराणे नियम बदलले पाहिजेत. आता केवळ दोन वर्ग आहेत एक शहरी गरीब व शहरी श्रीमंत, आपण शहरी गरिबांचे सरासरी उत्पन्न पाहता त्यांचा विचार केला पाहिजे. शिक्षण, कार्यालयापर्यंत जाण्यासाठीचा प्रवास, वैद्यकीय यासारखे जीवनातील इतर खर्चही वाढल्याचे विसरुन चालणार नाही.  अशा परिस्थितीत परवडण्यासारखेची व्याख्या करायची झाल्यास एखादे कुटुंब घरासाठी किती पैसे खर्च करु शकते हे ठरवले पाहिजे. त्यानंतर ग्राहकाला तसेच विकासकाला लहान कर्जे उपलब्ध करुन दिली पाहिजेत ज्यामुळे परवडणारी घरे घेणे शक्य होईल. त्याचवेळी सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढवणेही तितकेच महत्वाचे आहे व आपण त्यासाठी काय करणार आहोत.

जमीन:  

यानंतर आपण गृहबांधणीच्या सर्वात महत्वाच्या घटकाचा विचार करु, तो म्हणजे जमीन! अगदी १०वीच्या भूगोलात आपण शिकलो आहोत की जमीनीचा संतुलित वापर सुदृढ समाजासाठी अतिशय महत्वाचा आहे, मात्र आपण या समस्येसाठी काय पावले उचलली आहेत. जमीन मर्यादित आहे व मागणी सतत वाढत जातेय, त्यामुळे वाढत्या लोकसंख्येची प्रत्यक्ष गरज विचारात घेऊन जमीनीचा वापर निश्चित करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण जुन्या प्रादेशिक विकास योजना म्हणजे आरपी व विकास योजना म्हणजे डीपीऐवजी एकच राज्य विकास योजना तयार करायला काय हरकत आहे, ज्यामध्ये राज्यातील प्रत्येक इंच जमीनीचा वापर कसा होईल हे ठरवले जाईल व त्यानुसार सूक्ष्म नियोजन केले जाईल? स्वातंत्र्य मिळून अडुसष्ट वर्षांनंतरही सरकारने हे का केले नाही, अनेक जिल्ह्यांमध्ये अजून आरपीही नाही व अशा परिस्थितीत आपण घरांसाठी जमीनी कशा देणार आहोत?
आपण एखाद्या हेतूने जमीन आरक्षित केल्यानंतर ती त्याच कारणाने वापरली जात आहे का हे पाहिले पाहिजे. अमेरिका व ब्रिटनसारख्या देशांमध्ये, घरांसाठी आरक्षित जमीन विकसित न करता तशाच ठेवल्यास त्यावर मोठा अतिरिक्त मालमत्ता कर आकारला जातो, ज्यामुळे जमीनीचा मालक ती जमीन ज्या कारणासाठी आरक्षित आहे त्यासाठी ती वापरतो यामुळे जमीनीच्या कमतरतेचा प्रश्न सुटतो. आपण अशा पद्धती का वापरु शकत नाही?
त्यानंतर मुद्दा येतो जमीनीच्या दरांचा केवळ उपलब्ध जमीनीसाठी अधिक एफएसआय दिल्याने तोडगा निघणार नाही, तो एफएसआय वापरण्यासाठी आपल्याला उंच इमारती बांधाव्या लागतील, मात्र त्यासाठी बांधकामाचा खर्च व इतर घटकांमुळे घरे परवडण्यासारखी राहात नाहीत, त्यामुळे घर बांधणीसाठी वेगाने अधिक जमीन लागते हा खरा मुद्दा आहे! त्याचवेळी जमीनीचे दर नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे, केवळ तिचे एमआरपी म्हणजेच किमान किरकोळ विक्री मूल्य नसते. आपला रेडी रेकनर (सिद्ध गणक) निर्देशांक जमीनीचे किमान दर दाखवतो मात्र कमाल दरावर कुणाचे नियंत्रण आहे का, एखाद्या माणसाकडे जमीन पडून असते व तिचे दर वाढत असतात, हे थांबले पाहिजे. अंतिम उत्पादन म्हणजेच घरासाठीही हाच नियम वापरला पाहिजे. आपण जमीनीचे दर निश्चित केल्याशिवाय व करेपर्यंत परवडण्यासारखी घरे हे एक स्वप्नच राहील! आपल्याकडे घरांच्या किंमती नियंत्रणात ठेवणारा नागरी जमीन धारणा कायदा होता, घरांच्या किमती वाढण्यासाठी आपण यूएलसीलाच जबाबदार धरले व हा कायदा रद्द केला, मात्र यामुळे नक्की काय परिणाम झाला याचे विश्लेषण आपण केले आहे का?

पायाभूत सुविधा:  
तीन प्रकारच्या पायाभूत सुविधा आहेत; एक म्हणजे प्रत्यक्ष म्हणजेच रस्ते, सार्वजनिक वाहतूक, पाणी, सांडपाणी, ऊर्जा, कचरा, उद्योग व नोक-या. दुसरा प्रकार म्हणजे सामाजिक, ज्यामध्ये मनोरंजन, कला, आरोग्य व शिक्षणाचा समावेश होतो.
जमीनीच्या किमतींमध्ये हा घटक अतिशय महत्वाचा आहे आधी अंडे की आधी कोंबडी या प्रश्नासारखेच आधी पायाभूत सुविधा की आधी घरे हा प्रश्न आहे. आपण आधी पायाभूत सुविधा उभारल्या तर जमीनीच्या किमती वाढतात व घरेही महाग होतात. मात्र पायाभूत सुविधाच नसतील तर घरे उपलब्ध होणार नाहीत व विकलीही जाणार नाहीत! यांचे संतुलन साधले पाहिजे कारण कोणत्याही ठिकाणच्या पायाभूत सुविधांमुळे विकासाचा लोलक कुठल्या दिशेने जाईल हे ठरते. उदाहरणार्थ विदर्भ किंवा मराठवाड्यासारख्या प्रदेशात पाणी नाही, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प नाहीत, उद्योगधंदे नाहीत किंवा रस्त्यांचे जाळे नाही व नोक-याही नाहीत. म्हणूनच या भागातील लोकसंख्या सातत्याने पुणे, मुंबई, नाशिकसारख्या शहरांमध्ये स्थलांतर करते त्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांवर ताण येतो व इथल्या जमीनींचे दर सतत वाढतच असतात. 
आपण संपूर्ण राज्यासाठी पायाभूत सुविधांचे व्यवस्थित नियोजन केले तर केवळ काही भागांवरच अतिरिक्त ताण पडणार नाही. पुरेशा पायाभूत सुविधा नसल्याने बांधकामाचा खर्च वाढतो उदाहरणार्थ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नसेल तर लोक खाजगी वाहने घेतात व वाहने लावण्यासाठी जागा बांधावी लागते ज्यामुळे बांधकामाचा खर्च वाढतो. सिंगापूरमध्ये मोठमोठ्या संकुलांना पार्किंगसाठी एकही स्वतंत्र मजला नाही व कुणालाही खाजगी वाहनाची गरज पडत नाही. त्याशिवाय प्रत्येक परिसरासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प आहेत, ज्या योगे एक इमारतीवर हा ताण येत नाही.तिस-या प्रकारच्या पायाभूत सुविधा म्हणजे सरकारी पायाभूत सुविधा ज्याकडे आपले क्वचितच लक्ष जाते म्हणजेच घरांच्या विकासाचे नियंत्रण करणारी यंत्रणा. आपल्याकडे सध्या, म्हाडा, सिडको, नागरी विकास, नगर नियोजनासह महापालिका, नगरपालिका, जिल्हाधिकारी व बांधकाम विभाग अशा विविध संस्था आहेत; या सर्वांनी गृहनिर्माण धोरणांवर काम करणे व सामान्य माणसाला घरे उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे, मात्र त्याचा परिणाम काय झाला आहे? आपल्याला भोवताली घर बांधणीसंदर्भात पॉलिसी तयार करताना केवळ उशीर, वाद व गोंधळ दिसतो. घरबांधणीशी संबंधित सर्व बाबींसाठी एकच संस्था असावी, ती जिल्हास्तरीय संस्था असू शकते किंवा महसूल यंत्रणेनुसार तिची व्यवस्था असू शकते. यामुळे प्रकल्प मंजूरीची यंत्रणा जलद व सोपी होईल याची खात्री केली जाईल. सध्या विविध ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी व स्थानिक कायद्यांच्या गर्दीतून वाट काढण्यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळे घरे परवडण्यासारखी राहात नाहीत.

घरांचा आकार/नियोजन:
घरे परवडावीत यासाठी झोपडपट्टी पुनर्विकासातील किंवा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील घरांसारखी लहान घरे बांधा अशी एक सर्वसाधारण संकल्पना आहे, ही घरे साधारण ३०० चौ. फुटांची असतात, माझ्यावर खरोखर विश्वास ठेवा हा एक विनोद आहे! बांधकाम खर्चाच्या दृष्टीने लहान घरे बांधणे व त्यांना विविध सुविधा देणे अवघड आहे, दुसरे म्हणजे एवढ्या लहान जागेत चार ते पाच जणांचे कुटुंब राहण्याची कल्पना तुम्ही करु शकता का. म्हणूनच लहान म्हणजे परवडण्यासारखे नाही, हे स्वीकारा! लोकांना राहण्यासाठी पुरेशी जागा द्या, त्यासाठी जागा व खर्च यांचा समतोल साधला जाईल अशा विविध नमुना योजना तयार करा. केवळ चार किंवा पाच पट एफएसआय देणे व उंच इमारती बांधणे हा उपाय नाही. कारण तसे करताना सेवांचा खर्च वाढतो हे तथ्य आहे. केवळ उंचीच नाही तर विस्तारही करणे आवश्यक आहे, लोकांना एकत्र येण्यासाठी भरपूर मोकळ्या जागा ठेवा व त्यानंतर खर्च काढा. अशा सामाईक जागांचे व भागांचे दर आपण कमी केले पाहिजेत म्हणजे नियोजक अशा अधिकाधिक जागा देतील. असे नियोजन करा ज्यामध्ये नैसर्गिक प्रकाश असेल व हवा खेळती असेल म्हणजे विजेची बचत होईल.

बांधकाम, पर्यायी साहित्य व पद्धती, संशोधन व विकास:
आपण पूर्वापार चालत आलेल्या काँक्रीट तंत्रज्ञानाला उत्तर शोधले पाहिजे कारण त्यातील घटक नैसर्गिक स्त्रोतांमधून मिळतात म्हणजेच वाळू, धातू, चिखल इत्यादी व ते एकेदिवशी संपणार आहेत, त्यादिवशी आपण काय करणार आहोत? त्याचप्रमाणे आपल्याला बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी बांधकामाच्या नव्या पद्धती आवश्यक आहेत. आपल्याकडे परवडण्यासारख्या घरांवर संशोधन करणारी एकही संशोधन व विकास संस्था नाही हे मोठे दुर्दैव आहे, जी पर्यायी साहित्य किंवा बांधकामाच्या पद्धतींविषयी माहिती गोळा करेल व घरबांधणीविषयी आवश्यक असलेल्या प्रत्येक घटकाविषयी माहिती संकलित करेल. लक्षात ठेवा कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्याविषयी पुरेशी माहिती असली पाहिजे व सध्या आपल्याकडे नेमकी माहितीच उपलब्ध नाही. इथे सिडको, विकासकांची संघटना असलेल्या क्रेडईच्या सहकार्याने पुढाकार घेऊ शकते व परवडण्यासारखी घरे या विषयावर संशोधन व विकास करणारी एखादी संस्था उभारु शकते.

दैनंदिन खर्च/सेवा:
परवडणारे घर म्हणजे केवळ सुरुवातीला ज्याचे पैसे कमी द्यावे लागतात असे घर नाही तर त्याचा दैनंदिन खर्चही कमी असला पाहिजे! इथे गरज व देखभाल खर्च तसेच बांधकाम खर्च यांचा नाविन्यपूर्ण पद्धतीने समन्वय साधणे आवश्यक आहे, उदाहरणार्थ, सौरऊर्जेवर तापवलेले पाणी प्रत्येक मजल्यावर एका सामाईक ठिकाणी देणे. यामुळे पहिल्या टप्प्यात सर्व वाहिन्यांमधून थंड पाण्याचा अपव्यय कमी होईल आपण सौरऊर्जेवर चालणारे गरम पाण्याचे नळ सुरु केल्यानंतर वाहिन्या बसविण्याचा खर्चही कमी होईल. याचप्रकारे आपण प्रत्येक मजल्यावर सामाईक कपडे धुण्याच्या यंत्राचा विचार करु शकतो. एखादे गृहसंकुल दररोज ज्या सेवा वापरते त्यांच्या देखभालीचा खर्च कमी करण्यासाठी अशा अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात. आपण अपव्यय व गरज यात समतोल साधण्यासाठी नियोजन करु शकतो. पावसाचे पाणी मध्यभागी साठवून ते वापरण्याचा विचार करा, मोकळ्या-जागाही पावसाळी पाण्याच्या तळ्यांसाठी वापरल्या जाऊ शकतात, ज्यामुळे पाण्याची मागणी कमी होईल.सेवांची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र व्यावसायिक संस्था असली पाहिजे व ही सेवा वापरणारा प्रत्येक जण त्यासाठी पैसे देईल अशी व्यवस्थाही असली पाहिजे. या सेवांची देखभाल करण्याचे काम नागरिकांनाच देऊन रोजगार निर्मिती करण्याचाही आपण विचार करु शकतो.

अंतिम वापरकर्त्यापर्यंत वितरण:
सर्वात शेवटी गरजू लोकांना परवडण्यासारखी घरे मिळावीत याची खात्री केली जाण्यासाठी एक यंत्रणा असली पाहिजे, ही घरे ज्या हेतूने बांधली आहेत ती त्यासाठी वापरली जात असल्याची खात्री करण्यासाठी ठराविक काळाने तपासणी किंवा ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे! ही घरे परवडण्यासारखी असावीत यासाठी त्यांचे वितरण करताना अनेक गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो उदाहरणार्थ एकाच उद्योगात काम करणारे लोक जवळपास राहात असतील तर त्यांच्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय सहजपणे करता येईल, स्वतःचे खाजगी वाहन वापरण्यापेक्षा यामुळे बरीच बचत होईल! अशाप्रकारे उपलब्ध असलेल्या सर्व घरांची माहिती इंटरनेटवर प्रसिद्ध करा व अशा घरांसाठी कसा अर्ज करायचा, त्यांच्या वितरणाची प्रक्रिया यासारखी ताजी माहिती वेळोवेळी देत राहा, म्हणजे प्रत्येक गरजू सामान्य माणसाला ती माहिती मिळू शकेल. यातच परवडणा-या घरांचे यश आहे!

लोकसंख्या:
परवडण्यासारख्या घरांसाठी ही सर्वात मोठी समस्या आहे कारण जमीन वाढणार नाही व आपली लोकसंख्या मात्रा सातत्याने वाढतेय! आपली लोकसंख्या ज्या वेगाने वाढतेय त्या वेगाने आपण कधीही सर्वांना घर देऊ शकणार नाही, वरकरणी याचा परवडणा-या घरांशी काहीही संबंध नसल्याचे वाटेल मात्र प्रत्यक्षात त्यांचा थेट संबंध आहे! लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी तळागाळातून मोहीम चालवणे आवश्यक आहे व ती नियंत्रणात आणणे हे उद्दिष्ट असले पाहिजे. लोकसंख्येवर नियंत्रण न ठेवता आल्याने झोपडपट्ट्या वाढल्या आहेत कारण आपण या लोकांना परवडण्यासारखी घरे देऊ शकत नाही!

पर्यावरण व जैवविविधता संवर्धन:
परवडण्यासारखी घरे तयार करताना आपण या पृथ्वीवर एकटे नाही हे विसरु नका. पोपटापासून ते वाघापर्यंत अनेक प्रजाती आहेत व त्यांनाही घर हवे आहे, मात्र त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा किंवा परवडणा-या घरांची सोय करण्यासाठी सिडको नाही! म्हणूनच आपण जेव्हा घरांची रचना करतो तेव्हा अशा सर्व प्रजातींसाठी जागा राहील हे व जैवविविधता राखली जाईल हे पाहण्याची जबाबदारी आपली आहे, तसे झाले तरच आपण त्याला आपले घर म्हणू शकू, नाहीतर आपण केवळ क्राँकिटची जंगले उभारु ज्यात कोणताही जिवंतपणा नसेल!
सर्वात शेवटचे म्हणजे परवडण्यासारखी घरे ही काळाची गरज आहे हे विकासकांनी विसरु नये, कारण कोणत्याही प्रकल्पातून आपण किती नफा मिळवायचा आहे हे आपणच ठरवायचे आहे! ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर आपल्यापैकी प्रत्येकाची आहे. शेवटी आपल्या तयार घरांचे विक्री मूल्य किती आहे याच्याशी जमीनीच्या किमती निगडित आहेत

माझे बोलणे संपवण्यापूर्वी, मला स्पायडरमॅन या माझ्या आवडत्या चित्रपटातील संवाद सांगावासा वाटतो, “विथ ग्रेड पॉवर्स कम्स अलाँग ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटीज, म्हणजे जास्त शक्तीं सोबत जास्त जबाबदा–या   अभियंता असणे ही आपल्याला आपल्या ज्ञानामुळे मिळालेली शक्ती असेल तर ती शक्ती आपण परवडण्यासारखी घरे तयार करण्यासाठी वापरली पाहिजे, म्हणजे या देशातील कोणत्याही कुटुंबाला स्वतःच्या घराची काळजी करावी लागणार नाही, ही आपल्या शक्तिसोबत आलेली जबाबदारी आहे! यासाठी आपण संघटित व्हावे व सर्वोत्तम काम करावे अशी माझी इच्छा आहे, श्री. विश्वेश्वरैय्या यांना ती खरी आदरांजली असेल! मला आज हा सन्मान देण्यासाठी पुन्हा एकदा आभार, हे क्षण आयुष्यभर माझ्या स्मरणात राहतील.

जय महाराष्ट्र, जय हिंद!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स

https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/images/cleardot.gif






https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/images/cleardot.gif






https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/images/cleardot.gif


Sunday 7 September 2014

गुरु: देव: भवो:



















गुरु: देव: भवो:

  “माझ्यासाठी जन्मदात्यापेक्षाही ज्ञानदाता महत्वाचा आहे, कारण जन्म देणे म्हणजे जीवन देणे मात्र ज्ञान देणे म्हणजे जीवनाला अर्थ देणे”... A^irsTa^Tla.

A^irsTa^Tla या महान ग्रीक तत्ववेत्त्याची वेगळी ओळख करुन द्यायची गरज नाही, तो स्वतः एक महान  गुरू  सुद्धा होता. शिक्षक दिनाच्या निमित्ताने मला पीसीसीओई म्हणजे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, तेथील व्याख्यानाची सुरुवात करण्यासाठी मला वर दिलेले अवतरण अतिशय योग्य वाटले. सर्वसामान्यपणे लोक व्याख्यान लिहून काढतात मग बोलतात, मी त्याउलट करण्याचा विचार केला म्हणजे आधी व्याख्यान दिले आणि आता त्याविषयी लिहीतोय! आपल्या देशात अनेक वर्षांपूर्वी आपले माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला असला तरीही आपल्या देशात तो कधीपासून साजरा केला जाऊ लागला हे मला माहीत नाही, कारण आमच्या कॉलेजच्या दिवसात तो साजरा केल्याचे मला आठवत नाही, पण शिक्षक दिनाचे महत्व वेगळेच आहे हे मात्र खरे:

 मी विद्यार्थ्यांसमोर जे बोललो ते आपल्याशी शेअर करीत आहे कारण या रूपाने जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे विचार पोचतील.
 माझे मित्र प्रिय व पीसीसीओईचे धडाडीचे प्राचार्य अजय सर व माझ्या सर्व अभियंत्या मित्रांनो नमस्कार! अभियांत्रिकी महाविद्यालयातील वातावरण कंटाळवाणे व निरस असते असा एक समज असतो मात्र, मला आवर्जून सांगावेसे वाटते की पीसीसीओईमध्ये उत्साह ओसंडून वाहतोय! केवळ तुमच्या चेह-यावरील उत्सुकताच नाही तर इथल्या वातावरणातच एक चैतन्य आहे, आज तुम्ही मला येथे येण्याचे आमंत्रण देऊन मला माझे कॉलेज जीवन पुन्हा अनुभवण्याची संधी दिलीत यासाठी तुमचे आभार मानले पाहिजेत! मला आज एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगाविशी वाटते की तुमच्या प्राचार्यांच्या कक्षात शिरताना माझ्या हृदयाची धडधड वाढली होती कारण अभियंता म्हणून माझ्या कारकिर्दीत कधी प्राचार्यांच्या कक्षात कोणत्याही कारणासाठीही जायची सवयच नव्हती, किंबहुना कधी बोलावण्यात आले नाही! त्यामुळे आज मी स्वतःला बजावले, की मी इथे प्रमुख पाहुणा आहे त्यामुळे मला त्यांच्याकडून काय व्याख्यान ऐकावे लागणार आहे याची चिंता करण्याचे कारण नाही तर आज मला व्याख्यान द्यायचे आहे ! आणखी एक गोष्ट म्हणजे तुमच्या वर्गमित्राने इथे माझ्याविषयी जी काही माहिती सांगितली ती विसरुन जा, केवळ वर्गात मागच्या बाकावर बसणारा एक विद्यार्थी आज मंचावर उभा आहे व त्याच्या भावना व्यक्त करत आहे असा विचार करा. आमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये प्रमुख पाहुण्यांविषयी माहिती जेवढी लांबलचक तेवढे त्यांचे व्याख्यान कंटाळवाणे असेल असा एक सर्वसाधारण आडाखा असायचा व मी देखील त्याला अपवाद नव्हतो! माझ्या वैयक्तिक माहितीमध्ये मला आणखी थोडी भर घालाविशी वाटते, ती म्हणजे मला एम३ मध्ये म्हणजे दुस-या वर्षाच्या गणित ३ या विषयात एकूण ९३ गुण मिळाले, अर्थात हे गुण म्हणजे माझ्या तीन प्रयत्नांची बेरीज होती!! त्यापैकी मला तिस-या प्रयत्नात ६० गुण मिळाले तर पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये प्रत्येकी १५ गुण मिळाले होते, यातला विनोदाचा भाग थोडासा बाजूला ठेवला तर त्याचे कारण मी पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अभ्यासच केला नव्हता हे होते!

तेव्हा आता तुम्हाला तुमच्या प्रमुख पाहुण्यांविषयी पुरेशी स्पष्ट कल्पना मिळाली असेल, सर्वप्रथम मी तुमचे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये व तेही सर्व शाखांची जननी मानल्या जाणा-या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो. तुम्ही स्थापत्य अभियांत्रिकीच्या प्रत्यक्ष जगात प्रवेश करणार आहात कारण तुम्ही आता अभ्यासक्रमाच्या तिस-या वर्षाला आहात! मला मोकळेपणे सांगावेसे वाटते की आज स्थापत्य अभियंता म्हणून उभा राहताना मला अभिमान वाटतो, मात्र मला कधीही स्थापत्य अभियंता व्हायचे नव्हते! जवळपास २८ वर्षांपूर्वी मला दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमामध्ये दाखल करण्यात आले, तेव्हा मला स्थापत्य या शब्दाचा अर्थही माहिती नव्हता! मी स्थापत्य अभियंता व्हावे असे माझ्या वडिलांना वाटायचे म्हणून त्यांनी माझा अर्ज भरला व त्या काळी मुलांनी वडिलांच्या निर्णयाविरुद्ध बंड करणे अपेक्षित नव्हते, त्यामुळे मी त्याच्यावर स्वाक्षरी केली मात्र मला प्रत्यक्षात यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियंता व्हायचे होते! मला स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका घेतल्याने त्याच शाखेतील पदवी घ्यावी लागली. मात्र मला माझ्या शिक्षकांनी स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे काय व स्थापत्य अभियंत्याची समाजातील भूमिका काय आहे हे समजावून सांगितले, व आज २८ वर्षांनंतर मी अभिमानाने म्हणू शकतो की या शाखेमध्ये आल्याचे मला अजिबात वाईट वाटत नाही!
 तुमच्यापैकी बहुतेक जण इथे प्रवेश मिळाला म्हणून अतिशय आनंदी असतील मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही स्थापत्य अभियांत्रिकी शाखा का निवडली व तुम्ही पदवी मिळाल्यानंतर काय करणार आहात? आज शिक्षक दिन म्हणजेच ५ सप्टेंबर आहे व आणखी दहा दिवसांनी १५ सप्टेंबरला अभियंता दिवस आहे, जो आपण श्री. डॉ. विश्वेश्वरैय्या यांच्या स्मरणार्थ साजरा करतो!
इथे मला अभियंत्यांविषयी एक विनोद सांगावासा वाटतो,…” गरम हवेच्या बलुन मधुन प्रवास  करणा-या एका माणसाला  जाणवते की त्याची दिशा चुकली आहे. त्याला तेवढ्यात जमीनीवर एक माणूस दिसतो, तो ओरडून त्या माणसाला सांगतो, "अहो मला तुमची मदत हवी आहे, माझी दिशा चुकली आहे." जमीनीवरचा माणूस ओरडून उत्तर देतो, "तुम्ही फुग्यात बसला आहात, हवेत ५० फूट उंच आहात, ४० अंश उत्तरेला तर ८० अंश पश्चिमेला आहात." फुग्यातील माणूस अतिशय  कुत्सितपणे विचारतो, "तुम्ही नक्कीच अभियंता असाल." अभियंता म्हणतो, "तुम्हाला कसे माहिती?" फुग्यातील माणूस उत्तर देतो, "तुम्ही दिलेली माहिती तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे, मात्र ती माझ्या फारशी उपयोगाची नाही. माझी दिशा अजूनही चुकलेलीच आहे." अभियंत्याने उत्तर दिले, "तुम्ही नक्कीच व्यवस्थापक आहात." फुग्यातून प्रवास करणारा माणूस थक्क होतो. "अगदी बरोबर, तुम्हाला कसे कळले?" अभियंता उत्तर देतो, "खरे तर ते अगदी सोपे आहे. तुम्ही हे कुठे आहात हे तुम्हाला माहिती नाही, तुम्ही काय करत आहात हे तुम्हाला माहिती नाही. मात्र मी तुमची समस्या सोडवावी अशी तुमची अपेक्षा आहे व तसे केले नाही तर ती मात्र माझी चूक आहे."
 बरेच जण म्हणतील यामध्ये काय विनोद आहे? अभियंत्याने सर्व माहिती दिली नाही का? मित्रांनो माहिती किंवा ज्ञानापेक्षाही तुम्ही तिचा आयुष्यात कसा वापर करता हे अधिक महत्वाचे असते! अभियांत्रिकी व विपणन, लेखा, व्यवस्थापन इत्यादी इतर शाखांमध्ये काय फरक आहे? सर्वप्रथम लक्षात घ्या मी कोणत्याही शाखेवर टीका करत नाही कारण कोणत्याही स्वरुपातील कोणत्याही विषयाच्या ज्ञानाचा आदर केला पाहिजे. केवळ या ज्ञान शाखांच्या संकल्पनांमधील फरक दाखवायचा माझा प्रयत्न आहे; एखाद्या व्यक्तिचा उपजतच विपणन किंवा व्यवस्थापनाकडे कल असतो किंवा त्यातील कौशल्य असते! तुम्ही शून्यातून चांगला विपणनकर्ता तयार करु शकत नाही, त्याचा दृष्टिकोन तुम्ही अधिक सुस्पष्ट करु शकता, मात्र एखाद्यात नसेलच तर तो तयार करता येत नाही. कलेच्या बाबतीतही हे लागू होते, कलाकार उपजतच असावा लागतो, तुम्ही केवळ त्याच्या कलागुणांना विकसित करु शकता, चालना देऊ शकता. मात्र अभियांत्रिकी हे विज्ञान आहे, तुम्ही ते मनापासून शिकलात तर ते शिकता येते. तुम्ही मनापासून शिकलात तरच तुम्ही खरे अभियंते व्हाल, नाहीतर तुम्ही पुस्तके वाचून अभ्यास कराल, तुमच्या शिक्षकांच्या व्याख्यानांना हजर राहाल, सूत्रे पाठ कराल, परीक्षेत ती लिहाल व पदवी मिळवाल! तुम्हाला अभियंत्याची पदवी तर मिळेल मात्र तुमचा दृष्टिकोन किंवा मानसिकता अभियंत्याची नसेल! अभियंता होणे म्हणजे काय तर तुम्ही चार वर्ष इथे जे काही शिकला आहात त्याचा वापर करायला शिकणे! इथेच तर्क हा शब्द समोर येतो! थोडक्यात सांगायचे झाले तर माझ्या मते, अभियांत्रिकी म्हणजे तर्काचा वापर करणे! समाजाला भेडसावणा-या समस्या सोडविण्याच्या अभियंत्यांच्या क्षमतेमुळे त्यांचा आदर केला जातो. मात्र माझ्या मते खरा अभियंता तोच असतो ज्याला भविष्यातील समस्या जाणवते, ती सोडविण्याऐवजी ती टाळण्यासाठी तो स्वतःचे ज्ञान वापरतो! याप्रकारे तुम्ही एक चांगले अभियंते होऊ शकता, म्हणूनच तुम्हाला तुमच्या मेंदुचा प्रत्येक कोपरा तुमचे शिक्षक जे शिकवत आहात ते शिकण्यासाठी वापरायचा आहे, कारण उद्या तुम्हाला एखादी समस्या आधीच जाणून घेण्यासाठी त्या ज्ञानातील प्रत्येक शब्दाची गरज पडणार आहे. मला मान्य आहे, की स्थापत्य अभियांत्रिकी अतिशय व्यापक संज्ञा आहे व तुमच्या नावापुढे स्थापत्य अभियंत्याची पदवी लागावी यासाठी तुम्हाला जवळपास वीस विषयांचा अभ्यास करावा लागतो, मात्र प्रत्यक्ष काम करताना तुम्ही जे काही शिकलात त्यापैकी दोन किंवा तीन विषयांपेक्षा अधिक विषयांवर काम करण्याची संधी मिळाली तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात!
 मग हे सगळे विषय आपण का शिकतो? माझ्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या दिवसात गणितात उत्तीर्ण होण्याच्या विविध प्रयत्नांमध्ये मी नेमका हाच प्रश्न स्वतःला विचारत असे! आपल्याला एखाद दोन विषयांपेक्षा अधिक विषय वापरावे लागत नाहीत, तर मग आपण हे सगळे का शिकायचे? त्याचे उत्तर आहे तुम्ही नेमक्या कोणत्या क्षेत्रात काम कराल हे तुम्हाला माहिती नसते, त्यामुळे तेव्हा तुमच्यासोबत तुमची सूत्रे व काम करताना ती वापरण्यासाठी आवश्यक असलेला तर्क एवढेच असते!
माझ्याविषयी इथे माहिती सांगितली जात असताना मी ऐकत होतो, त्यांनी नमूद केले की       
 श्री. संजय देशपांडे हे एक यशस्वी व्यावसायिक आहेत! मला निश्चितच याचा अभिमान वाटते, मात्र मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही माझे यश कसे मोजाल? मी किती मोठी गाडी चालवतो किंवा माझी उलाढाल किती कोटी रुपये आहे, किंवा मी कोणत्या हॉटेलांमध्ये जेवतो किंवा फॅशनमधील कोणकोणते नवीन ब्रँड वापरतो याद्वारे? माझ्या मित्रांनो, यश आम्ही या कोणत्याही पट्टीवर मोजता येत नाही. मला मान्य आहे पैसा महत्वाचा आहे, कारण मी काही धर्मदाय काम करत नाही मात्र केवळ पैसा हेच यशाचे मोजमाप नाही; मी माझे यश आम्ही पूर्ण केलेल्या प्रकल्पांसमोर उभे राहून मोजतो, त्यात आनंदाने राहणारे लोक पाहून मी त्या प्रकल्पांचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो!  मी रिअल इस्टेटमध्ये काम करतो, माझ्या इमारती हे माझे उत्पादन असते ज्या माझ्या चमूने बांधलेल्या असतात, उद्या तुमच्यापैकी सर्वजण प्रत्यक्ष काम कराल, काही जण महामार्गांवर काम करतील, काही जण विमानतळ, काहीजण धरणे बांधतील, स्थापत्य शाखेमध्ये ही यादी अमर्याद आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा एखादे दिवशी तुम्ही बांधलेल्या रस्त्यावरुन तुमचा भाऊ बाईक चालवत असेल, कधी तुमचे पालक विदेशातून येत असतील व तुम्ही बांधलेल्या धावपट्टीवर त्यांचे विमान उतरणार असेल, कुठेतरी तुमच्या मित्राच्या शेतीला तुम्ही बांधलेल्या धरणातून पाणी मिळत असेल! कितीतरी लोक तुमच्या ज्ञानावर व त्याच्या वापरावर अवलंबून असतील व त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे यातच तुमचे खरे यश आहे! आणखी एक गोष्ट म्हणजे कधीही मी हा प्रकल्प बांधला असे म्हणू नका, मी या चमूचा भाग होतो असेच नेहमी म्हणा, कारण विद्या विनयेन शोभते!
इथे मला हाती घेतलेल्या कामाविषयीचा दृष्टिकोन कसा असावा याविषयी एक गोष्ट सांगाविशी वाटते … “काही वर्षांपूर्वी एका कंत्राटदाराकडे एक बांधकाम पर्यवेक्षक होता, तो कंत्राटदार घरे बांधत असे. वर्षानुवर्षे काम केल्यानंतर पर्यवेक्षकाला वाटले की आता निवृत्तीची वेळ झाली आहे म्हणून त्याने त्याच्या मालकाकडे आपला राजीनामा दिला. मालकाला एक चांगला कर्मचारी गमावण्याची इच्छा नव्हती मात्र पर्यवेक्षकाने हातातील काम पूर्ण करावे अशी अट घातली. पर्यवेक्षकासमोर ते मान्य करण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नव्हता, त्यामुळे त्याची कंपनी जी घरे बांधत होती तिथे तो आपले काम करु लागला मात्र त्याचे त्यात लक्ष नव्हते, तो मनाने आधीच निवृत्त झाला होता. त्याने कसेबसे ते घर पूर्ण केले मात्र त्याला माहिती होते की हे त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट काम आहे कारण हे आता त्याचे काम नाही असेच त्याला वाटत होतो. जेव्हा त्याने घर पूर्ण केले व त्याची किल्ली मालकाला दिली मात्र त्याला आश्चर्याचा धक्का बसला, कारण मालकाने हसून ती किल्ली पर्यवेक्षकाला परत केली, त्याच्या अनेक वर्षांच्या सेवेचे प्रतीक म्हणून त्याने ते घर पर्यवेक्षकाला द्यायचे ठरवले होते! त्या दिवशी पर्यवेक्षकाला त्याची चूक समजली त्याने स्वतःच तयार केलेल्या अतिशय वाईट घरात त्याला राहायचे होते!”
मित्रांनो मला खात्री आहे या गोष्टीमुळे आपल्यापैकी अनेकांचे डोळे उघडतील, आपण सर्वजण अशाप्रकारे वागतो, हे काम आपले नाही असा दृष्टिकोन ठेवतो, मात्र शेवटी तुम्हाला काय मिळणार आहे हे तुम्हाला माहिती नसते!सर्वात शेवटी ब-याच जणांना आश्चर्य वाटेल की आज मी माझ्या आईला इथे का आणले; माझा दर्जा किंवा स्टाईल दाखवायला म्हणून नाही तर ती देखील एक शिक्षिका आहे, व तिच्यासाठी तिचा मुलगा अभियांत्रिकीच्या एवढ्या मुलांना व प्राध्यापकांना व्याख्यान देतोय हे पाहण्यापेक्षा मोठी अभिमानाची बाब काय असू शकते! एक आई म्हणून तसेच एक शिक्षिका म्हणून तिने तिच्यापरीने मला जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तिने माझ्यासाठी जे काही केले आहे त्याची परतफेड करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे असे मला वाटते! तुम्ही तुमच्या सर्व शिक्षकांनी व पालकांनी तुमच्यासाठी जे कष्ट घेतले आहेत त्याची कशी परतफेड कराल असे तुम्हाला वाटते? ते तुमच्याकडून पैसे किंवा महागड्या भेटवस्तुंची अपेक्षा करत नाहीत, तुम्ही सर्वोत्तम रचना करुन व इमारती बांधून ज्या समाजामध्ये राहता त्याला एक चांगले भविष्य देण्याची भेट त्यांना देऊ शकता! तुम्ही त्या बांधल्यानंतर तुमच्या शिक्षकांना व पालकांना तिथे घेऊन जा, व त्यांना त्याचा वापर करायला लावा त्यांच्यासाठी ती अभिमानाची बाब असेल, त्यांच्या ऋणांची परतफेड असेल! माझ्यावर विश्वास ठेवा तो तुमच्या आयुष्यातील सुद्धा सर्वोच्च अभिमानाचा क्षण असेल ज्याचा आनंद फक्त तुम्हाला उपभोगता येईल!
आणखी एक गोष्ट म्हणजे ही तुमच्या जीवनाची सर्वोत्तम वर्षे आहेत, ती वाया घालवू नका! कारण आत्ता तुमच्याकडून केवळ तुम्ही शिकावे व जास्तीत जास्त आत्मसात करावे एवढीच अपेक्षा आहे. मी जाणीवपूर्वक अभ्यास हा शब्द वापरलेला नाही, कारण अभियंता होण्याचा केवळ तेवढाच अर्थ नाही. तुमच्या जाणीवा उघड्या ठेवा; आजूबाजूची प्रत्येक गोष्ट आत्मसात करा कारण आगामी वर्षांमध्ये तुम्हाला त्याचाच उपयोग होणार आहे. एक अभियंता हा नेहमी अभियंताच असतो असे म्हणतात, त्यामुळे तुम्हाला कदाचित ज्यासाठी पैसे दिले जातात त्याच नाही तर इतरही समस्या सोडवाव्या लागतील, तुमच्या आजूबाजूला असलेल्या समस्या पाहा व त्या सोडविण्यासाठी तुमची बुद्धी वापरा. त्यामुळे तुमच्यातील अभियंता सतत जिवंत व कार्यरत राहील व कोणत्याही लढाईसाठी तयार असेल! पुढे भरपूर चिंता, काळजी असणार आहे त्यामुळे कॉलेजच्या दिवसात हवी तेवढी मजा करा, तुमच्या हाती पडणारे प्रत्येक पुस्तक वाचा, चांगले चित्रपट पाहा, मैदानावर तुमच्या मित्रांशी खेळा! हा काळ तुम्हाला नेहमी लक्षात राहील; तुम्ही तुमच्या कारकिर्दीत यशस्वी झाल्यानंतर मागे वळून पाहताना तुम्हाला या आठवणींची लाज किंवा पश्चात्ताप वाटायला नको, हे नेहमी लक्षात ठेवा!
एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो, धमाल करा! तुम्हाला अनेक शुभेच्छा व मनःपूर्वक धन्यवाद!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स