गुरु: देव: भवो:
“माझ्यासाठी जन्मदात्यापेक्षाही
ज्ञानदाता महत्वाचा आहे, कारण जन्म देणे म्हणजे जीवन देणे मात्र ज्ञान देणे म्हणजे
जीवनाला अर्थ देणे”... A^irsTa^Tla.
A^irsTa^Tla या महान ग्रीक तत्ववेत्त्याची
वेगळी ओळख करुन द्यायची गरज नाही, तो स्वतः एक महान गुरू सुद्धा होता. शिक्षक दिनाच्या
निमित्ताने मला पीसीसीओई म्हणजे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये व्याख्यान
देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, तेथील व्याख्यानाची सुरुवात करण्यासाठी मला
वर दिलेले अवतरण अतिशय योग्य वाटले. सर्वसामान्यपणे
लोक व्याख्यान लिहून काढतात मग बोलतात, मी त्याउलट करण्याचा विचार केला म्हणजे आधी
व्याख्यान दिले आणि आता त्याविषयी लिहीतोय! आपल्या देशात अनेक
वर्षांपूर्वी आपले माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक
दिन म्हणून घोषित करण्यात आला असला तरीही आपल्या देशात तो कधीपासून साजरा केला जाऊ
लागला हे मला माहीत नाही, कारण आमच्या कॉलेजच्या दिवसात तो साजरा केल्याचे
मला आठवत नाही, पण शिक्षक दिनाचे महत्व
वेगळेच आहे हे मात्र खरे:
मी विद्यार्थ्यांसमोर जे बोललो ते आपल्याशी
शेअर करीत आहे कारण या रूपाने जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे विचार पोचतील.
माझे मित्र प्रिय व पीसीसीओईचे धडाडीचे प्राचार्य
अजय सर व माझ्या सर्व अभियंत्या मित्रांनो नमस्कार! अभियांत्रिकी महाविद्यालयातील वातावरण कंटाळवाणे
व निरस असते असा एक समज असतो मात्र, मला आवर्जून सांगावेसे वाटते की पीसीसीओईमध्ये
उत्साह ओसंडून वाहतोय! केवळ तुमच्या चेह-यावरील
उत्सुकताच नाही तर इथल्या वातावरणातच एक चैतन्य आहे, आज तुम्ही मला येथे येण्याचे आमंत्रण
देऊन मला माझे कॉलेज जीवन पुन्हा अनुभवण्याची संधी दिलीत यासाठी तुमचे आभार मानले पाहिजेत! मला आज एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगाविशी वाटते
की तुमच्या प्राचार्यांच्या कक्षात शिरताना माझ्या हृदयाची धडधड वाढली होती कारण अभियंता
म्हणून माझ्या कारकिर्दीत कधी प्राचार्यांच्या कक्षात कोणत्याही कारणासाठीही जायची सवयच नव्हती, किंबहुना कधी बोलावण्यात
आलेच नाही! त्यामुळे आज मी स्वतःला बजावले, की मी इथे प्रमुख
पाहुणा आहे त्यामुळे मला त्यांच्याकडून काय व्याख्यान ऐकावे लागणार आहे याची चिंता
करण्याचे कारण नाही तर आज मला व्याख्यान द्यायचे आहे ! आणखी एक गोष्ट म्हणजे तुमच्या वर्गमित्राने इथे
माझ्याविषयी जी काही माहिती सांगितली ती विसरुन जा, केवळ वर्गात मागच्या बाकावर बसणारा
एक विद्यार्थी आज मंचावर उभा आहे व त्याच्या भावना व्यक्त करत आहे असा विचार करा. आमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये प्रमुख पाहुण्यांविषयी
माहिती जेवढी लांबलचक तेवढे त्यांचे व्याख्यान कंटाळवाणे असेल असा एक सर्वसाधारण आडाखा
असायचा व मी देखील त्याला अपवाद नव्हतो! माझ्या वैयक्तिक माहितीमध्ये मला आणखी थोडी भर घालाविशी वाटते, ती म्हणजे मला एम३ मध्ये म्हणजे
दुस-या वर्षाच्या गणित ३ या विषयात एकूण ९३ गुण मिळाले, अर्थात हे गुण म्हणजे माझ्या
तीन प्रयत्नांची बेरीज होती!! त्यापैकी मला तिस-या प्रयत्नात ६० गुण मिळाले तर पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये प्रत्येकी
१५ गुण मिळाले होते, यातला विनोदाचा भाग थोडासा बाजूला ठेवला तर त्याचे कारण मी पहिल्या
दोन प्रयत्नांमध्ये अभ्यासच केला नव्हता हे होते!
तेव्हा आता तुम्हाला तुमच्या
प्रमुख पाहुण्यांविषयी पुरेशी स्पष्ट कल्पना मिळाली असेल, सर्वप्रथम मी तुमचे अभियांत्रिकी
महाविद्यालयामध्ये व तेही सर्व शाखांची जननी मानल्या जाणा-या स्थापत्य अभियांत्रिकी
शाखेमध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो. तुम्ही स्थापत्य अभियांत्रिकीच्या प्रत्यक्ष
जगात प्रवेश करणार आहात कारण तुम्ही आता अभ्यासक्रमाच्या तिस-या वर्षाला आहात! मला मोकळेपणे सांगावेसे वाटते की आज स्थापत्य अभियंता
म्हणून उभा राहताना मला अभिमान वाटतो, मात्र मला कधीही स्थापत्य अभियंता व्हायचे नव्हते! जवळपास २८ वर्षांपूर्वी मला दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर
स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमामध्ये दाखल करण्यात आले, तेव्हा मला स्थापत्य
या शब्दाचा अर्थही माहिती नव्हता! मी स्थापत्य अभियंता व्हावे असे माझ्या वडिलांना वाटायचे म्हणून त्यांनी माझा
अर्ज भरला व त्या काळी मुलांनी वडिलांच्या निर्णयाविरुद्ध बंड करणे अपेक्षित नव्हते,
त्यामुळे मी त्याच्यावर स्वाक्षरी केली मात्र मला प्रत्यक्षात यांत्रिकी (मेकॅनिकल)
अभियंता व्हायचे होते! मला स्थापत्य अभियांत्रिकीची
पदविका घेतल्याने त्याच शाखेतील पदवी घ्यावी लागली. मात्र मला माझ्या शिक्षकांनी स्थापत्य
अभियांत्रिकी म्हणजे काय व स्थापत्य अभियंत्याची समाजातील भूमिका काय आहे हे समजावून
सांगितले, व आज २८ वर्षांनंतर मी अभिमानाने म्हणू शकतो की या शाखेमध्ये आल्याचे मला
अजिबात वाईट वाटत नाही!
तुमच्यापैकी बहुतेक जण इथे प्रवेश मिळाला म्हणून
अतिशय आनंदी असतील मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही स्थापत्य अभियांत्रिकी
शाखा का निवडली व तुम्ही पदवी मिळाल्यानंतर काय करणार आहात? आज शिक्षक दिन म्हणजेच ५ सप्टेंबर आहे व आणखी दहा
दिवसांनी १५ सप्टेंबरला अभियंता दिवस आहे, जो आपण श्री. डॉ. विश्वेश्वरैय्या यांच्या
स्मरणार्थ साजरा करतो!
इथे मला अभियंत्यांविषयी
एक विनोद सांगावासा वाटतो,…” गरम हवेच्या बलुन मधुन प्रवास
करणा-या एका माणसाला जाणवते की त्याची दिशा चुकली आहे. त्याला तेवढ्यात जमीनीवर एक माणूस दिसतो, तो ओरडून
त्या माणसाला सांगतो, "अहो मला तुमची मदत
हवी आहे, माझी दिशा चुकली आहे." जमीनीवरचा माणूस ओरडून उत्तर देतो, "तुम्ही फुग्यात बसला आहात, हवेत ५० फूट उंच आहात,
४० अंश उत्तरेला तर ८० अंश पश्चिमेला आहात." फुग्यातील माणूस अतिशय कुत्सितपणे विचारतो, "तुम्ही नक्कीच अभियंता असाल." अभियंता म्हणतो, "तुम्हाला कसे माहिती?" फुग्यातील माणूस उत्तर देतो, "तुम्ही दिलेली माहिती तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे,
मात्र ती माझ्या फारशी उपयोगाची नाही. माझी दिशा अजूनही चुकलेलीच आहे." अभियंत्याने उत्तर दिले, "तुम्ही नक्कीच व्यवस्थापक आहात." फुग्यातून प्रवास करणारा माणूस थक्क होतो. "अगदी बरोबर, तुम्हाला कसे कळले?" अभियंता उत्तर देतो, "खरे तर ते अगदी सोपे आहे. तुम्ही हे कुठे आहात हे तुम्हाला माहिती नाही, तुम्ही काय करत आहात हे तुम्हाला माहिती नाही. मात्र मी तुमची समस्या सोडवावी अशी तुमची अपेक्षा
आहे व तसे केले नाही तर ती मात्र माझी चूक आहे."
बरेच जण म्हणतील यामध्ये काय विनोद आहे? अभियंत्याने सर्व माहिती दिली नाही का? मित्रांनो माहिती किंवा ज्ञानापेक्षाही तुम्ही
तिचा आयुष्यात कसा वापर करता हे अधिक महत्वाचे असते! अभियांत्रिकी व विपणन, लेखा, व्यवस्थापन इत्यादी
इतर शाखांमध्ये काय फरक आहे? सर्वप्रथम लक्षात घ्या मी कोणत्याही शाखेवर टीका करत नाही कारण कोणत्याही स्वरुपातील
कोणत्याही विषयाच्या ज्ञानाचा आदर केला पाहिजे. केवळ या ज्ञान शाखांच्या संकल्पनांमधील फरक दाखवायचा
माझा प्रयत्न आहे; एखाद्या व्यक्तिचा
उपजतच विपणन किंवा व्यवस्थापनाकडे कल असतो किंवा त्यातील कौशल्य असते! तुम्ही शून्यातून चांगला विपणनकर्ता तयार करु शकत
नाही, त्याचा दृष्टिकोन तुम्ही अधिक सुस्पष्ट करु शकता, मात्र एखाद्यात नसेलच तर तो
तयार करता येत नाही. कलेच्या बाबतीतही
हे लागू होते, कलाकार उपजतच असावा लागतो, तुम्ही केवळ त्याच्या कलागुणांना विकसित करु
शकता, चालना देऊ शकता. मात्र अभियांत्रिकी
हे विज्ञान आहे, तुम्ही ते मनापासून
शिकलात तर ते शिकता येते. तुम्ही मनापासून शिकलात तरच तुम्ही खरे अभियंते व्हाल, नाहीतर
तुम्ही पुस्तके वाचून अभ्यास कराल, तुमच्या शिक्षकांच्या व्याख्यानांना हजर राहाल,
सूत्रे पाठ कराल, परीक्षेत ती लिहाल व पदवी मिळवाल! तुम्हाला अभियंत्याची पदवी तर मिळेल मात्र तुमचा
दृष्टिकोन किंवा मानसिकता अभियंत्याची नसेल! अभियंता होणे म्हणजे काय तर तुम्ही चार वर्ष इथे
जे काही शिकला आहात त्याचा वापर करायला शिकणे! इथेच तर्क हा शब्द समोर येतो! थोडक्यात सांगायचे झाले तर माझ्या मते, अभियांत्रिकी म्हणजे तर्काचा वापर करणे! समाजाला भेडसावणा-या समस्या सोडविण्याच्या अभियंत्यांच्या
क्षमतेमुळे त्यांचा आदर केला जातो. मात्र माझ्या मते खरा अभियंता तोच असतो ज्याला भविष्यातील
समस्या जाणवते, ती सोडविण्याऐवजी ती टाळण्यासाठी तो स्वतःचे ज्ञान वापरतो! याप्रकारे तुम्ही एक चांगले अभियंते होऊ शकता, म्हणूनच
तुम्हाला तुमच्या मेंदुचा प्रत्येक कोपरा तुमचे शिक्षक जे शिकवत आहात ते शिकण्यासाठी
वापरायचा आहे, कारण उद्या तुम्हाला एखादी समस्या आधीच जाणून घेण्यासाठी त्या ज्ञानातील
प्रत्येक शब्दाची गरज पडणार आहे. मला मान्य आहे, की स्थापत्य अभियांत्रिकी अतिशय व्यापक संज्ञा आहे व तुमच्या नावापुढे
स्थापत्य अभियंत्याची पदवी लागावी यासाठी तुम्हाला जवळपास वीस विषयांचा अभ्यास करावा
लागतो, मात्र प्रत्यक्ष काम करताना तुम्ही जे काही शिकलात त्यापैकी दोन किंवा तीन विषयांपेक्षा
अधिक विषयांवर काम करण्याची संधी
मिळाली तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात!
मग हे सगळे विषय आपण का शिकतो? माझ्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या दिवसात गणितात
उत्तीर्ण होण्याच्या विविध प्रयत्नांमध्ये मी नेमका हाच प्रश्न स्वतःला विचारत असे! आपल्याला एखाद दोन विषयांपेक्षा अधिक विषय वापरावे
लागत नाहीत, तर मग आपण हे सगळे का शिकायचे? त्याचे उत्तर आहे तुम्ही नेमक्या कोणत्या क्षेत्रात
काम कराल हे तुम्हाला माहिती नसते, त्यामुळे तेव्हा तुमच्यासोबत तुमची सूत्रे व काम
करताना ती वापरण्यासाठी आवश्यक असलेला तर्क एवढेच असते!
माझ्याविषयी इथे
माहिती सांगितली जात असताना मी ऐकत होतो, त्यांनी नमूद केले की
श्री. संजय देशपांडे हे एक यशस्वी व्यावसायिक
आहेत! मला निश्चितच याचा
अभिमान वाटते, मात्र मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही माझे यश कसे
मोजाल? मी किती मोठी गाडी
चालवतो किंवा माझी उलाढाल किती कोटी रुपये आहे, किंवा मी कोणत्या हॉटेलांमध्ये जेवतो
किंवा फॅशनमधील कोणकोणते नवीन ब्रँड वापरतो याद्वारे? माझ्या मित्रांनो, यश आम्ही या कोणत्याही पट्टीवर मोजता येत नाही. मला मान्य आहे पैसा महत्वाचा आहे, कारण मी काही
धर्मदाय काम करत नाही मात्र केवळ पैसा हेच यशाचे मोजमाप नाही; मी माझे यश आम्ही पूर्ण केलेल्या प्रकल्पांसमोर उभे राहून मोजतो,
त्यात आनंदाने राहणारे लोक पाहून मी त्या प्रकल्पांचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो! मी रिअल इस्टेटमध्ये काम करतो, माझ्या इमारती हे माझे उत्पादन असते ज्या माझ्या
चमूने बांधलेल्या असतात, उद्या तुमच्यापैकी सर्वजण प्रत्यक्ष काम कराल, काही जण महामार्गांवर
काम करतील, काही जण विमानतळ, काहीजण धरणे बांधतील, स्थापत्य शाखेमध्ये ही यादी अमर्याद
आहे. एक गोष्ट लक्षात
ठेवा एखादे दिवशी तुम्ही बांधलेल्या रस्त्यावरुन तुमचा भाऊ बाईक चालवत असेल, कधी तुमचे पालक विदेशातून येत असतील व तुम्ही बांधलेल्या
धावपट्टीवर त्यांचे विमान उतरणार असेल, कुठेतरी तुमच्या मित्राच्या शेतीला तुम्ही बांधलेल्या
धरणातून पाणी मिळत असेल! कितीतरी लोक तुमच्या
ज्ञानावर व त्याच्या वापरावर अवलंबून असतील व त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे यातच तुमचे
खरे यश आहे! आणखी एक गोष्ट म्हणजे
कधीही मी हा प्रकल्प बांधला असे म्हणू नका, मी या चमूचा भाग होतो असेच नेहमी म्हणा, कारण विद्या विनयेन शोभते!
इथे मला हाती घेतलेल्या
कामाविषयीचा दृष्टिकोन कसा असावा याविषयी एक गोष्ट सांगाविशी वाटते … “काही वर्षांपूर्वी एका कंत्राटदाराकडे एक बांधकाम
पर्यवेक्षक होता, तो कंत्राटदार घरे बांधत असे. वर्षानुवर्षे काम केल्यानंतर पर्यवेक्षकाला वाटले
की आता निवृत्तीची वेळ झाली आहे म्हणून त्याने त्याच्या मालकाकडे आपला राजीनामा दिला. मालकाला एक चांगला कर्मचारी गमावण्याची इच्छा नव्हती
मात्र पर्यवेक्षकाने हातातील काम पूर्ण करावे अशी अट घातली. पर्यवेक्षकासमोर ते मान्य करण्याशिवाय दुसरा काहीही
पर्याय नव्हता, त्यामुळे त्याची कंपनी जी घरे बांधत होती तिथे तो आपले काम करु लागला
मात्र त्याचे त्यात लक्ष नव्हते, तो मनाने आधीच निवृत्त झाला होता. त्याने कसेबसे ते घर पूर्ण केले मात्र त्याला माहिती
होते की हे त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट काम आहे कारण हे आता त्याचे काम नाही असेच
त्याला वाटत होतो. जेव्हा त्याने घर
पूर्ण केले व त्याची किल्ली मालकाला दिली मात्र त्याला आश्चर्याचा धक्का बसला, कारण
मालकाने हसून ती किल्ली पर्यवेक्षकाला परत केली, त्याच्या अनेक वर्षांच्या सेवेचे प्रतीक
म्हणून त्याने ते घर पर्यवेक्षकाला द्यायचे ठरवले होते! त्या दिवशी पर्यवेक्षकाला त्याची चूक समजली त्याने
स्वतःच तयार केलेल्या अतिशय वाईट घरात त्याला राहायचे होते!”
मित्रांनो मला खात्री
आहे या गोष्टीमुळे आपल्यापैकी अनेकांचे डोळे उघडतील, आपण सर्वजण अशाप्रकारे वागतो,
हे काम आपले नाही असा दृष्टिकोन ठेवतो, मात्र शेवटी तुम्हाला काय मिळणार आहे हे तुम्हाला
माहिती नसते!सर्वात शेवटी ब-याच जणांना आश्चर्य वाटेल की आज
मी माझ्या आईला इथे का आणले; माझा दर्जा किंवा स्टाईल दाखवायला म्हणून नाही तर ती देखील एक शिक्षिका आहे, व
तिच्यासाठी तिचा मुलगा अभियांत्रिकीच्या एवढ्या मुलांना व प्राध्यापकांना व्याख्यान
देतोय हे पाहण्यापेक्षा मोठी अभिमानाची बाब काय असू शकते! एक आई म्हणून तसेच एक शिक्षिका म्हणून तिने तिच्यापरीने
मला जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तिने माझ्यासाठी जे काही
केले आहे त्याची परतफेड करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे असे मला वाटते! तुम्ही तुमच्या सर्व शिक्षकांनी व पालकांनी तुमच्यासाठी
जे कष्ट घेतले आहेत त्याची कशी परतफेड कराल असे तुम्हाला वाटते? ते तुमच्याकडून पैसे किंवा महागड्या भेटवस्तुंची
अपेक्षा करत नाहीत, तुम्ही सर्वोत्तम रचना करुन व इमारती बांधून ज्या समाजामध्ये राहता
त्याला एक चांगले भविष्य देण्याची भेट त्यांना देऊ शकता! तुम्ही त्या बांधल्यानंतर तुमच्या शिक्षकांना व
पालकांना तिथे घेऊन जा, व त्यांना त्याचा वापर करायला लावा त्यांच्यासाठी ती अभिमानाची
बाब असेल, त्यांच्या ऋणांची परतफेड असेल! माझ्यावर विश्वास ठेवा तो तुमच्या आयुष्यातील सुद्धा सर्वोच्च अभिमानाचा क्षण असेल ज्याचा आनंद फक्त
तुम्हालाच उपभोगता येईल!
आणखी एक गोष्ट म्हणजे
ही तुमच्या जीवनाची सर्वोत्तम वर्षे आहेत, ती वाया घालवू नका! कारण आत्ता तुमच्याकडून केवळ तुम्ही शिकावे व जास्तीत जास्त
आत्मसात करावे एवढीच अपेक्षा आहे. मी जाणीवपूर्वक अभ्यास हा शब्द वापरलेला नाही, कारण अभियंता होण्याचा केवळ तेवढाच अर्थ नाही. तुमच्या जाणीवा उघड्या ठेवा; आजूबाजूची प्रत्येक गोष्ट आत्मसात करा कारण आगामी
वर्षांमध्ये तुम्हाला त्याचाच उपयोग होणार आहे. एक अभियंता हा नेहमी अभियंताच असतो असे म्हणतात, त्यामुळे तुम्हाला कदाचित ज्यासाठी पैसे दिले जातात
त्याच नाही तर इतरही समस्या
सोडवाव्या लागतील, तुमच्या आजूबाजूला असलेल्या समस्या पाहा व त्या सोडविण्यासाठी तुमची
बुद्धी वापरा. त्यामुळे तुमच्यातील
अभियंता सतत जिवंत व कार्यरत राहील व कोणत्याही लढाईसाठी तयार असेल! पुढे भरपूर चिंता, काळजी असणार आहे त्यामुळे कॉलेजच्या
दिवसात हवी तेवढी मजा करा, तुमच्या हाती पडणारे
प्रत्येक पुस्तक वाचा, चांगले चित्रपट पाहा, मैदानावर तुमच्या मित्रांशी खेळा! हा काळ तुम्हाला नेहमी लक्षात राहील; तुम्ही तुमच्या कारकिर्दीत यशस्वी झाल्यानंतर मागे
वळून पाहताना तुम्हाला या आठवणींची लाज किंवा पश्चात्ताप वाटायला नको, हे नेहमी लक्षात
ठेवा!
एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो, धमाल करा! तुम्हाला अनेक शुभेच्छा व मनःपूर्वक धन्यवाद!
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment