Sunday 25 April 2021

अरण्यनाद, अनुज आणि वन्यजीवन !

 
















आपल्याला ज्या गोष्टीविषयी तळमळ वाटते तिच्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्यांनाच यश मिळते. खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी, तुम्ही कायम नम्र असणे आणि प्रसिद्धी अथवा पैशाची हवा कधीही डोक्यात जाऊ देणे अतिशय महत्त्वाचे आहे”.... . आर. रहमान

अल्लारखा रहमान, ज्यांनी बॉलिवुड, टॉलिवुडमधील चित्रपट संगीताची सुरावटच बदलून टाकली, आपल्या दर्जेदार संगीताने चित्रपट संगीत अधिक समृद्ध केले, त्यांच्याशिवाय तळमळ, यश नम्रता याविषयी अधिक चांगल्याप्रकारे कोण बोलू शकेल? मी आज ज्या व्यक्तीविषयी लिहीत आहे ती या तिन्ही गुणांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यामुळे या व्यक्तीविषयी लिहीताना रहमानचे वरील शब्द माझ्या मदतीला धावून आले. माझा मित्र अनुज खरे त्याचे पुस्तक अरण्यनादविषयी हा लेख आहेअनुजला वन्यजीवनाविषयी अतिशय तळमळ आहे, तो नम्र आहे आणि यशाबद्दल सांगायचे तर त्याच्यासारख्या लोकांचे यश बँकेतील शिल्लक किंवा संपत्ती किंवा त्यांनी उभारलेले साम्राज्य अशा निकषात बसत नाही. तुम्ही जर असा प्रयत्न करत असाल तर कृपया या लेखाचा उर्वरित भाग वाचू नका हे मी सुरुवातीलाच सांगतो.

अनुजच्या संपत्तीविषयी बोलायचे तर त्याच्याकडे ती अमर्याद आहे. ही संपत्ती म्हणजे त्याने जमवलेली माणसे, मग जंगलाच्या अगदी दुर्गम भागामधील रूपचंद आरपी ओमरेसारखे गाईड असतील, अथवा श्री. प्रवीण परदेशी, श्री. अतुल किर्लोस्कर यासारखी प्रख्यात मंडळी असतील, हो या यादीत अंबानीचे नावही आहे. त्याची संपत्ती त्याच्या पुस्तकातील छायाचित्रांमधून दिसून येते, जी त्याच्या मित्रांनी काढली असून या पुस्तकासाठी आनंदाने देऊ केली आहेत. यामध्ये मोहन थॉमस, क्लेमंट फ्रान्सिस, विनोद बारटक्के, राकेश बेदी विक्रम पोतदार आणि  ध्रुतिमान मुखर्जी यांसारख्या नावाचा समावेश होतो ज्यांनी पुस्तकाला प्रस्तावनाही लिहीली आहे. याशिवाय इतरही व्यक्तींनी काढलेली छायाचित्रेही यात वापरण्यात आली आहेत (मला अतिशय आनंद वाटतो की अनुजने मी काढलेली काही छायाचित्रेही या पुस्तकासाठी वापरली आहेत, अनुज मला तुला सांगावेसे वाटते की वरील प्रसिद्ध व्यक्तींसोबत माझे नाव येणे ही माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे)!

स्वतःचे साम्राज्य तयार करण्याविषयी बोलायचे तर, अनुजने महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील सर्व जंगलांमध्ये साम्राज्य निर्माण केले आहे, जे कोणत्याही पैशाने विकत घेता येणार नाही किंवा कोणतेही सैन्य ते जिंकू शकणार नाही. कारण तुम्ही निसर्गाचा भाग होऊनच त्यावर विजय मिळवू शकता, अनुजही निसर्गाशी एकरूप झाला आहे. त्याच्याकडे निसर्गाच्या या साम्राज्यावर विजय मिळविण्यासाठी खडतर परिश्रम ज्ञान यासारखी शस्त्रे आहेत. हे सगळे असताना प्रसिद्धी आपसूक मिळतेच. जर वन्यजीवनामध्ये सुपर स्टारसारखे वगैरेसारखे काही पद असते तर ते हमखास अनुजलाच मिळाले असते. हे सगळे असूनही . आर. रहमान यांनी म्हटल्याप्रमाणे तो नम्र आहे.

मला खात्री आहे की अनुजचे चाहते माझ्याशी सहमत असतील, अनुज मात्र लाजेल कारण काहीजणांसाठी नम्रता हा एक अभिशापच असतो, त्यांचे कौतुक कितीही खरे असले तरीही त्यांना ते आवडत नाही, असो. तर असा हा अनुज खरे, वन्यजीवप्रेमी तरुणांमध्ये अनुज दादा म्हणून किंवा अनेकांसाठी केवळ अनुज म्हणून लोकप्रिय आहे. त्याने मार्केटिंगमध्ये एमबीए केलेले असून नेचर वॉक (तो याहून अधिक समर्पक नाव कोणते देऊ शकला असता) जंगल बेल्स तसेच वन्यजीवनाशी निगडित इतरही अनेक संघटना/संस्थांच्या माध्यमातून वन्यजीवन संवर्धनासाठी स्वतःला झोकून दिले आहे. तो पोटापाण्यासाठी काय करतो वगैरेसारखे प्रश्न विचारू नका. मी अनुजविषयी बरेच काही लिहू शकतो मात्र या लेखात तरी त्याच्या पुस्तकाविषयीच लिहीणार आहे. अनुजने नुकतेच अरण्यनाद नावाचे पुस्तक लिहीले जे एकप्रकारे त्याचे छोटेखानी आत्मचरित्रच आहे, यामध्ये त्याने त्याचे अनुभव तसेच जंगलातील भटकंतीदरम्यान त्याने केलेली निरीक्षणे दिलेली आहेत. अरण्यनाद हा संस्कृत शब्द आहे; अरण्य म्हणजे हिरवे, घनदाट जंगल जे सृजन, विपुलता, समृद्धता, औदार्य, साधन संपन्नता, ऐश्वर्य दर्शवते नाद म्हणजे बोलताना किंवा संगीतातून निर्माण होणारा ध्वनी. थोडक्यात अरण्यनाद म्हणजे जंगलांचे संगीत, अनुज याहून अधिक समर्पक नाव कुठले देऊ शकला असता? त्याच्यासाठी जंगल हेच त्याचे जीवन आहे, या जंगलाच्या भाषेवर किंवा संगीतावर त्याचे प्रभुत्व आहे (या नावाचा आणखी एक अर्थ आहे जो मी या लेखाच्या शेवटी सांगणार आहे). लेखकाचे मनोगत वाचतानाच अनुज हा किती साधा पारदर्शी माणूस आहे हे लक्षात येते. तो काहीही लपवत नाही, एमबीए मार्केटिंगचे करिअर सोडल्याबद्दल त्याला अजिबात पश्चात्ताप होत नाही. आपल्या पालकांप्रमाणे वैद्यकीय शाखेमध्ये जाऊन यश अथवा प्रसिद्धीच्या पारंपरिक वाटेने गेलो नाही याची त्याला अजिबात लाज वाटत नाही. तो तबलावादनातही पारंगत आहे, मात्र त्याच्यातील वन्यजीवप्रेमाने या सगळ्यावर मात केली. मला, इथे जिम कॉर्बेट यांचे शब्द आठवतात, “निसर्गामध्ये पश्चात्ताप किंवा दुःख असे काहीही नसते, केवळ वास्तवाचा स्वीकार असतो. अनुजही या तत्वज्ञानाचे तंतोतंत पालन करतोय. कदाचित म्हणूनच तो जेव्हा जंगलांविषयी बोलतो तेव्हा त्याचे शब्द दऱ्या-खोऱ्यांमधून, कडे-कपाऱ्यांमधून खळाळत वाहणाऱ्या झऱ्यासारखे वाटतात.

अनुजने देशातील बहुतेक जंगलांच्या कानाकोपऱ्यात भटकंती केली आहे मात्र अरण्यनादमध्ये त्याने काही निवडक जंगलांचाच समावेश केला आहे. यात प्रामुख्याने मध्य भारतातील किंवा दख्खनच्या पठारावरील जंगलांचे अनुभव आहेत. याचे कारण म्हणजे त्याने आपल्या जंगलातील भटकंतीची सुरुवात इथून केली आणि अरण्यनाद हे पहिलेच पुस्तक आहे, आपल्याला पुढे इतर जंगलांविषयीही अनेक भाग वाचायला मिळतील यात शंका नाही.

माणूस आत्मचरित्र लिहीताना, अनुभव लिहीताना किंवा व्यक्त होताना जो विषय त्याला अगदी जवळचा वाटतो त्यापासूनच सुरुवात करतो. त्यामुळेच अनुजने अरण्यनादमध्ये त्याच्या जंगलातील भटकंतीच्या वर्णनाची सुरुवात मेळघाट, किका म्हणजेच किरण पुरंदरे, तात्या साहेब म्हणजेच व्यंकटेश माडगुळकर (मराठीमध्ये निसर्गाविषयी लेखन करणारे ज्येष्ठ लेखक) डब्ल्यूडब्ल्यूएफपासून केली आहे, कारण इथूनच त्याच्या वन्यजीवनप्रेमाचा पाया रचला गेला. माझा प्रवासही मेळघाटाच्या जंगलापासूनच सुरू झाला, कारण मी मेळघाटाच्या अकोला-बुलढाणा सीमेवर असलेल्या खामगावचा आहे, हा भाग साधारण चाळीसवर्षांपूर्वी जसा होता तसाच आजही आहे. म्हणूनच अनुज माझे अतिशय चांगले जमते (आमच्या काम करण्याच्या पद्धतीत बराच फरक असूनही, सॉरी अनुज, आईकडून पुणे ३० चे रक्तही माझ्यात आहे) कारण आमच्या दोघांसाठीही मेळघाट एकूणच जंगल हेच पहिले प्रेम आहे.

मी अरण्यनादचे प्रत्येक पान, प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द वाचलाय, ते वाचताना असे वाटते की अनुज तुमच्यासमोर बसलाय या गोष्टी सांगतोय. तो जेव्हा या गोष्टी सांगत असतो तेव्हा त्याच्या आवाजातून उत्साह, उत्तेजना आनंद ओथंबून वाहत असतो, अरे दादा, तू तिथे आवर्जून जा, इतके भारी आहे ना, बोल कधी जायचे! हे पुस्तक वाचताना मी ते वाचत नाहीये तर एखादे ऑडि बुकच ऐकतोय असे वाटत होते मला असे वाटते की विशेषतः निसर्गाविषयीचे पुस्तक असेच असायला हवेआणखी एक चांगली गोष्ट म्हणजे अनुज वाघांची संख्या, वर्षे, तारखा, जंगलांचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे किंवा त्यांची टक्केवारी यासारख्या आकडेवारीच्या फंदात फारसा पडला नाही, कारण तुम्ही निसर्गाचे वर्णन आकडेवारीमध्ये करू शकत नाही, तुम्हाला ते अनुभवावे लागते. अनुजही अरण्यनादमध्ये त्याच्या शब्दांच्या माध्यमातून वाचकांना जंगलाचा जिवंत अनुभव देतो, जणू तुम्ही एखादे चित्र रंगवावे किंवा संगीत निर्माण करावे त्याप्रमाणे. म्हणूनच तुम्ही केवळ पुस्तक वाचतच नाही तर ते ऐकू शकता पाहू शकता. हे पुस्तक तुम्हाला केवळ मेळघाटच नाही तर नागझिरा, पेंच, दाजीपूर, कोयना पाणलोट क्षेत्र, तसेच ताडोबाची सफर घडवते. ज्या लोकांनी या ठिकाणांना भेट दिलेली आहे त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद देते इतर जण आपल्या बॅगा भरून जंगलाला भेट देण्यासाठी सज्ज होतात, एवढे त्याचे लेखन प्रभावी आहे. पेंचवरील प्रकरणाच्या सुरुवातीला, अनुज लिहीतो की, “तुम्ही या जंगलाला आवर्जून भेट दिली पाहिजे कारण हे जंगल मला अतिशय प्रिय आहे. तो पुढे लिहीतो की, “तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी प्रत्येक जंगलाविषयी असेच का लिहीतो त्यानंतर तोच स्पष्टीकरण देतो की याचे अगदी साधे सोपे उत्तर आहे की प्रत्येकच जंगल विशेष आहे वेगळे आहे म्हणून!

आणखी एक गोष्ट, म्हणजे अनुजने केवळ वाघ अथवा बिबट्यांविषयीच लिहीलेले नाही (त्याच्याकडे येणाऱ्या पर्यटकांना मात्र त्यातच अधिक रस असतो हे वन्यजीव पर्यटनाचे दुर्दैव आहे), अस्वलापासून ते गरुडासारख्या पक्ष्यांपर्यंत वाचकांना जंगलाच्या प्रत्येक पैलूची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामुळे वन्यजीवन पूर्ण होते. त्याचवेळी त्याने पाहिलेली विविध ठिकाणे, परिस्थिती, हंगाम वेळा या सगळ्यांविषयी अतिशय तपशीलवार नेमकी माहिती दिली आहे (वन्य जीवनामध्ये तपशील अतिशय महत्त्वाचे असतात). अनुज आपल्याला जाणीव करून देतो की जंगल तुम्हाला पाहणे, ऐकणे, वास घेणे अनुभवणे यासारख्या विविध ज्ञानेंद्रियांचा वापर करायला शिकवते, जी आपण शहरी जीवनामध्ये जवळपास विसरून गेलो आहोत. जंगल तुम्हाला एक अधिक चांगला माणूस व्हायला मदत करते. अनुज अतिशय नम्र माणूस आहे, म्हणूनच त्याच्या लेखनात आरपी ओमरे, रूपचंद यासारख्या जंगलातील गाईडचा उल्लेख येतो, तसेच श्री. मूर्ती, श्री. आलोक कुमार यासारख्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा उल्लेख येतो, मात्र या सर्वांना जोडणारा एकच दुवा आहे तो म्हणजे वन्यजीवन संवर्धन. याचशिवाय अनुज खाद्यप्रेमी आहे, त्यामुळे या जंगलांमध्ये कोणते स्थानिक पदार्थ मिळतात कुठे मिळतात हेसुद्धा तुम्हाला समजते. अनुजने या पुस्तकात जंगलांभोवतालच्या प्रदेशालाही न्याय दिला आहे, कारण कोणतेही जंगल केवळ झाडे वाघांचे बनलेले नसते, तर त्याभोवती राहणारी माणसे, जागा, त्यांच्याशी निगडीत रंजक कथा यामुळेच जंगल खऱ्या अर्थाने जिवंत होते अनुज त्याच्या लेखनातून आपल्याला नेमके हेच शिकवतो.

म्हणूनच, अरण्यनाद हे तुम्हाला जंगलांविषयी माहिती देणारे आणखी एक पुस्तक नाही तर, ते तुम्हाला घरातच किंवा तुमच्या कारमध्येच बसलेले असताना जंगलाची सफारी घडवून आणते, ते तुम्हाला खऱ्याखुऱ्या जंगलाचा अनुभव देते. या पुस्तकासाठी आणखी एका व्यक्तीचे कौतुक करणे आवश्यक आहे, ते म्हणजे ओंकार बापट. तो अनुजचा जिवलग मित्र आहे, त्यानेच अनुजच्या शब्दांना मूर्त रूप दिले आहे कारण अनुजने अनुभवलेला निसर्ग शब्दात मांडणे सोपे काम नव्हते. अरण्यनाद या शब्दाचा अर्थ मी वरच समजावून सांगितला, मात्र मला जाणवलेला आणखी एक अर्थ असा की अरण्य म्हणजे जंगल कोल्हापुरी भाषेत नाद म्हणजे एखाद्या गोष्टीचा ध्यास अथवा वेड. म्हणूनच अरण्यनादचा एक अर्थ असाही होऊ शकतो की जंगलांचा ध्यास घेणे. मला असे वाटते अनुजलाही हा अर्थ जास्त आवडला. अनुज तुला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा, तू आहेस तसाच राहा, कारण जंगल हे आपले भविष्य आहे तू एक चालते बोलते जंगल आहेस, एवढेच मी म्हणेन!


संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स 

smd156812@gmail.com