Tuesday 13 February 2024

जंगल बेल्स, 














महिलांनी महिलांसाठी चालविलेली वन्यजिव संवर्धनाची चळवळ !.. 💃🏻👧🏻🐾🌱

    जर तुम्ही फेसबुक किंवा ईन्स्टाग्राम मेंबर असाल तर तुम्ही समाज माध्यमे किंवा वन्यजीवनाची छायाचित्रे काढणाऱ्या छायाचित्रकारांच्या समूहात पाहिले तर या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या १०० छायाचित्रांपैकी ९५ छायाचित्रे पुरुषांनी काढलेली असतात कारण बहुतेक नामांकित वन्य छायाचित्रकार पुरुषच आहेत. आपण विसरतो की वन्यजीवन म्हणजे केवळ वाघांची छायाचित्रे काढणे नव्हे तर ते त्यापेक्षाही बरेच काही असते. वन्यजीवन समजून घेण्यासाठी तुम्ही जंगलास भेट देणे आवश्यक आहे. तुम्ही कधी जंगलात गेलाच नाही तर तुम्ही त्यावर प्रेम कसे कराल व तुमचे जंगलावर प्रेम नसेल तर तुम्ही त्याचे संवर्धन कसे कराल असा प्रश्न मी लोकांना नेहमी विचारतो. या पार्श्वभूमीवर जेव्हा एखादी पत्नी, आई, मैत्रीण, आजी जंगलाला भेट देईल, त्याचे महत्त्व समजून घेईल, तेव्हाच ती जंगलाविषयी व वन्यजीवनाच्या संवर्धनासाठी आपण काय करणे आवश्यक आहे याविषयी तिचा भाऊ, मुलगा, पती व मित्रांना समजून सांगू शकेल. असे झाले तरच जंगलांच्या संवर्धनासाठी तसेच ज्या मुलामुळे, वडिलांमुळे, पतीमुळे किंवा मित्रांमुळे (म्हणजेच पुरुषांमुळे) अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्या वाचण्याची थोडीशी आशा आहे! 

     जंगलाची सफर करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे शहरातील धकाधकीच्या जीवनापासून, घरातील दैनंदिन कामांपासून व कधीही न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांपासून लांब गेल्याने महिलांना मानसिक तसेच शारीरिक विसावा मिळतो, ही दुसरी बाजूही अतिशय महत्त्वाची आहे. याचसाठी हेमांगी वर्तक व आरती कर्वे यांनी स्थापन केलेली जंगल बेल्स ही संस्था विशेष आहे, ही प्रामुख्याने महिलांसाठी स्थापन करण्यात आलेली संस्था आहे जी त्यांना केवळ जंगलाविषयीच्या नव्हे तर स्वतःविषयीच्या त्यांच्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव करून देते. जेव्हा त्या दोघींनी जंगल बेल्सची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचा मित्र म्हणून व वन्यजीवप्रेमी म्हणून माझ्या कंपनीच्या म्हणजेच संजीवनीच्या माध्यमातून त्यात खारीचा वाटा उचलता येईल म्हणून मला अतिशय आनंद झाला. ही संस्था महिलांना स्वतः जंगलात जाता यावे यासाठी, तुम्ही त्याला लेडीज स्पेशल म्हणा हवे तर, आवश्यक त्या सर्व सेवा उपलब्ध करून देते. खरेतर या दोघी महिला, समाजाच्या उच्चभ्रू वर्गात मोडतात, ज्या इतरांप्रमाणेच केवळ जंगलाला भेट देऊन समाधान मानू शकल्या असत्या व त्यांच्या सफारींची छायाचित्रे इन्स्टाग्राम अथवा फेसबुकवर टाकून मित्र-मैत्रीणींकडून वाहवा मिळवू शकल्या असत्या. परंतु त्यांनी तेवढ्यावरच समाधान न मानता आणखी काहीतरी करायचा निर्णय घेतला कारण त्यांना केवळ जंगलाबद्दल प्रेमच नाही तर त्यांना जंगलावरील त्यांच्या प्रेमाला योग्य दिशा द्यायची आहे व जंगलांसाठी काहीतरी करायचे आहे. आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून इतर महिलांना जंगलाच्या सान्निध्यात घेऊन जाण्याशिवाय दुसरा आणखी चांगला मार्ग कोणता असू शकतो. जर एखाद्या महिलेने एखाद्या गोष्टीवर प्रेम करावे असे तुम्हाला वाटत असेल तर आधी तिला ती गोष्ट जाणून घेण्याची संधी मिळाली पाहिजे, ही साधी गोष्ट पुरुषांना कधीही समजत नाही व म्हणूनच या दोघी महिलांनी जंगल बेल्ससारखी संकल्पना मांडली!

     जंगल बेल्स केवळ महिलांना जंगलातच घेऊन जात नाही तर पुण्यासारख्या शहरामध्ये वन्यजीवन क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुप्रसिद्ध व्यक्तींच्या माध्यमातून जंगलालाही त्यांच्या दरवाजापर्यंत आणते. या व्यक्ती वन्य जीवनाविषयी त्यांनी केलेले काम, तसेच त्यांना वाटणारी तळमळ श्रोत्यांना (ज्या बहुतेक महिला असतात) सांगतात, यामुळे महिला व जंगलांमध्ये एक नाते निर्माण होऊ शकते. जंगल बेल्स पुण्यामध्ये वन्यजीवन प्रेमींसाठी व विशेषतः वन्यजीवप्रेमी नसलेल्यांसाठी गेली तीन  वर्षे  एक उपक्रम वेबीनार रुपाने राबवत आहे जो  कायम सुरू ठेवण्याचीही त्यांची योजना आहे. या माध्यमातून या क्षेत्रातील तसेच शहरातील लोकांसाठी एक सामाईक एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे ज्यामुळे दोन्हीकडच्या लोकांची एकमेकांशी ओळख होईल. यामध्ये वन विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे जे प्रत्यक्षात जंगलाचे संरक्षण करण्याचे काम करतात उदाहरणार्थ श्री. नितीन काकोडकर, आयएफएस, पीसीसीएफ (वन), नल्ला मुथ्थू व बेदी बंधूंसारखे वन्यजीव चित्रपट निर्माते, विक्रम पोतदार व मोहन थॉमस यांच्यासारखे वन्यजीवन छायाचित्रकार यांचा समावेश होतो. या यादीमध्ये लवकरच काही महिलांची नावेही समाविष्ट होतील, या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या कमी असली तरी ती आहे. किंबहुना पुण्याच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते जंगल बेल्सचे उद्घाटन करण्यात आले होते, ज्या पर्यावरणाविषयीच्या त्यांच्या जागरुकतेसाठी ओळखल्या जातात. तुम्ही जंगल महिलांच्या दरवाजापर्यंत घेऊन गेलात तरीही, महिलेला आपल्या दरवाजापर्यंत घेऊन जाणे अतिशय अवघड असते विशेषतः जेव्हा वन्यजीवन हा विषय असतो. याचे कारण म्हणजे दुर्दैवाने बहुतेक महिलांसाठी वन्यजीवन हे प्राधान्य नाही व जेव्हा महिलांना वन्यजीवनासंबंधीच्या एखाद्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाते तेव्हा त्या कार्यक्रमाला हजर राहण्याची शक्य तितकी सगळी कारणे त्या देतात (मग तो सुट्टीचा दिवस असो किंवा आठवड्याचे दिवस); उदाहरणार्थ, मुलांचा क्लास आहे, सुट्टी आहे त्यामुळे नवऱ्याला मी घरीच हवी, मला एका कौटुंबिक कार्यक्रमाला जायचे आहे, मला येण्या-जाण्यासाठी काहीच साधन नाही, आज माझी कामवाली बाईच आली नाही, माझ्या सासू-सासऱ्यांना बरे नाही, अशाप्रकारे ही यादी कधी संपतच नाही. या मोहिमेमध्ये आत्तापर्यंत महिला शक्तीचा हातभार लागला नसल्यामुळेच आपण जंगले व नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवू शकत नाही. यामुळेच जंगल बेल्सने निवडलेल्या संकल्पनेचा रस्ता अतिशय सोनेरी व महान वाटत असला तरीही प्रत्यक्षात मात्र तो एखाद्या जंगलातल्या वाटेपेक्षाही अधिक खडतर व थकवणारा आहे, कारण जंगल किंवा निसर्ग वाचवणे हे महिलांच्या हातात आहे याची जाणीव त्यांना करून देणे हे सर्वात कठीण काम आहे. तरीही हेमांगी व आरती (अनुज यांच्या मदतीने) यांनी या मार्गावरून जाण्याचे धाडस दाखवले व अजूनही त्या लढत आहेत, म्हणून त्या विशेष आहेत.

    आज 2024 मध्ये जंगल बेल्सची सुरुवात होऊन चार वर्षे उलटून गेली आहेत व आरतीला तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे परत अमेरिकेत जावे लागले, त्यामुळे सध्या हेमांगी सगळे कामकाज बघत असून, फक्त एक महिला सुद्धा समाजात केवढा बदल घडवून आणू शकते हे तिने दाखवून दिले आहे. चार वर्षांमध्ये, जंगल बेल्सचा आर्थीक ताळेबंद फार काही आकर्षक नसला तरीही त्यांनी वन्यजीवनासाठी दिलेले योगदान अतिशय मोठे आहे, मग शेकडो महिलांना निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाणे, त्यांना वन्यजीवनाचे व ‘स्वतःसाठी वेळ’ काढण्याचे महत्त्व समजून सांगणे, जंगलाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना शक्य त्या सगळ्या स्वरूपात मदत करणे (अगदी कोव्हिडच्या काळातही), ते वन्यजीवनासंदर्भात या क्षेत्रातील तज्ज्ञांचे (यामध्ये महिलांचाही समावेश होतो) पन्नासाहून अधिक वेबिनार आयोजित करणे, वन्यजीवनावरील माहितीपट तयार करणे, शाळकरी मुलांसाठी व्याघ्र प्रकल्पांविषयी जागरुकता आणणारी सादरीकरणे आयोजित करणे, सलग तीन वर्षांपासून केवळ महिलांसाठी वन्यजीवन छायाचित्रकारिता स्पर्धा आयोजित करणे, असे विविध उपक्रम जंगल बेल्स आयोजित करते व या यादीत सतत भरच पडत आहे. हे सगळे उपक्रम कोणतीही मोठी आर्थीक मदत अथवा एखाद्या कंपनीच्या प्रयोजकत्वाशिवाय, केवळ काही महिलांच्या संपूर्ण समर्पणामुळे व इच्छाशक्तीच्या जोरावर सुरू आहेत. 

     वन्यजीवनाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी, जंगल बेल्स अनेक आघाड्यांवर काम करत असून, त्यांना फारशी आर्थिक मदत मिळालेली नाही. तसेच केवळ महिलांसाठी काम करायचा निर्णय घेऊन त्यांनी बऱ्याच मोठ्या ग्राहक वर्गावर जणु पाणी सोडले आहे, कारण एखाद्या ऑनलाईन वेबिनारला गैरहजर राहण्यासाठीही महिलांकडे हजारो कारणे असतात मात्र जंगल बेल्स ती कारणे केवळ समजूनच घेत नाही तर अशा प्रत्येक कारणाचा आदर करते. मी वर सांगीतल्याप्रमाणे एका बाईची संसारामध्ये असंख्य प्राधान्ये असतात व या यादीमध्ये तिचा स्वतःचा क्रमांक सर्वात शेवटचा असतो, तरीही जंगल बेल्सचा चमू हार मानत नाही व महिलांना वन्यजीवनाविषयी समजून सांगण्यासाठी प्रयत्न करत राहतोय, ज्यामुळे त्या त्यांच्या मुलांना तसेच संपूर्ण कुटुंबाला जागरुक करू शकतील, यामुळेच वन्यजीवन संवर्धनासाठी आपल्याला अजूनही आशा आहे. जंगल बेल्सला अनेक जणांचा पाठिंबा मिळत आहे (संजीवनी समूहाव्यतिरिक्तसुद्धा) परंतु जेव्हा वन्यजीवनविषयक संस्थेला तेदेखील केवळ महिलांद्वारे चालविल्या जाणाऱ्या संस्थेला आर्थिक पाठिंबा देण्याची वेळ येते तेव्हा तो अनेक कॉर्पोरेट कंपन्या फारसा पुढाकार घेत नाहीत. अर्थात मगरपट्टा सिटीसारखे काही अपवाद आहेत ज्यांनी पुण्यातील वन्यजीवनाविषयी एक सुंदर माहितीपट बनविण्यासाठी सहकार्य केले, व या लघुपटात अलिकडेच लघुपटांवरील एका महोत्सवात सर्वोत्कृष्ट वन्यजिव लघुपटाचे पारितोषिक देखील मिळाले, त्याचशिवाय सोनी व चितळे फूड्स यांनीही मदत केली. परंतु आता जंगल बेल्ससारख्या उपक्रमांना आपण जास्तीत जास्त मदत करण्याची वेळ आता आली आहे कारण तो केवळ वन्यजीवनाविषयी नसून, महिलांनी महिलांसाठी चालवलेला उपक्रम आहे व हे अतिशय मोठे व धाडसाचे पाऊल आहे. एक जागरुक महिलाच संपूर्ण कुटुंबाचा दृष्टिकोन बदलू शकते, जी आजच्या युगाची गरज आहे, व त्यावरच वन्यजिवनाचे भवितव्य अवलंबुन आहे.

तुम्ही वन्यजीवन, सहली, जागरुकता अभियान, वेबिनार, किंवा आर्थिक मदत जंगलांसाठीच्या उपक्रमात, तुम्ही कशाप्रकारे योगदान देऊ शकता यापैकी कशाविषयीही विचारण्यासाठी जंगल बेल्सला  संपर्क करू शकता. 
...  junglebelles.pune@gmail.com / 

http://junglebelles.com  / call : 07756081922

हेमांगी वर्तक, जंगल बेल्स
09923558588



 संजय देशपांडे

smd156812@gmail.com


















No comments:

Post a Comment