Wednesday 29 November 2023


मृत बजरंग, बेपत्ता माया आणि आपली जबाबदारी !











मृत बजरंग, बेपत्ता माया आणि आपली जबाबदारी !


"जेव्हा दोन वाघांची लढाई होते तेव्हा एक वाघ जखमी होणे, व एकाचा मृत्यू होणे निश्चित असते."…            मास्टर फुनाकोशी

" कोल्हा म्हणून शंभर वर्षे जगण्यापेक्षा वाघ म्हणून एकच वर्ष जगणे कितीतरी पटींनी अधिक चांगले असते."…- बेनिटो मुसोलिनी.

     मास्टर फुनाकोशी हे जपानचे आहेत व मुसोलिनी इटलीचा, आश्चर्य म्हणजे या दोघांच्याही देशात वाघ नसतात, त्यामुळे त्यांनी जंगलामध्ये प्रत्यक्षात एखादा वाघ कधी पाहिला असेल का अशी मला शंका आहे. तरीही त्यांच्या अवतरणांमध्ये या पट्टेरी प्रजातीचे चपखल वर्णन आहे. वाघांना आपल्या देशाच्या वन्यजीवनामध्ये तसेच वन्यजीवन पर्यटनामध्येही सर्वोच्च स्थान आहे व तसेच समाज माध्यमांवरही त्याला सर्वाधिक स्थान असते. आत्तापर्यंत माझे नियमित वाचक (असे काही वाचक आहेत) विचार करू लागले असतील की मी वाघांच्या विशेषतः ताडोबातील वाघांच्या विचारांनी झपाटलोय. मी झपाटलेला नाही परंतु वन्यजीवनाविषयी बोलायचे झाले तर तुम्ही वाघ व ताडोबा या दोन गोष्टी विसरू शकत नाही. ज्याप्रमाणे डॉक्टर एखाद्या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट प्रकरणाचा वापर करतात जे भविष्यातील अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये उपयोगी असते. ताडोबा एकीकडे वाघांच्या संवर्धनासाठी सर्वात यशस्वी प्रकरण अभ्यास ठरलेला असतानाच दुसरीकडे त्यातून आपल्याला संवर्धनाच्या प्रक्रियेतील अडथळेही दिसून येतात, जी अजूनही पूर्ण झालेली नाही. खरे सांगायचे तर या लेखाला केवळ ताडोबाची पार्श्वभूमी आहे, त्यातील अनुभव हे कुठलेही असू शकतात. माझे ताडोबाशी अतिशय घनिष्ट संबंध आहेत, ज्याप्रमाणे प्रसिंधी  माध्यमाचे छायाचित्रकार केवळ लोकप्रिय लोकांचा (तुमचा किंवा माझा नव्हे) सतत पाठलाग करत असतात त्याप्रमाणे व ताडोबा हे वन्यजीवनाच्या बॉलिवुडप्रमाणे असल्याने व इथे वाघ लोकप्रिय असल्यामुळे, हा लेख सुद्धा ताडोबातील वाघांविषयी आहे एवढी साधी तुलना मी करू शकतो. बजरंग आणि माया ही अनुक्रमे  ताडोबा जंगलातील वाघ व वाघीणींचे  नावे आहेत.

      अलिडेच ताडोबाच्या जंगलाभोवती बजरंग व छोटा मटका नावाच्या दोन वाघांची लढाई झाली, ज्यामध्ये शेवटी एकाचा नंतर मृत्यू झाला. त्याचप्रमाणे माया नावाची एक वाघीणही गेल्या तीन महिन्यांपासून गायब होती, जी ताडोबाचे मुख्य आकर्षण होती, तिचा रस्त्यावर मुक्त संचार असल्यामुळे पर्यटकांना अतिशय आनंद होत असे, परंतु शेवटी वनविभागाने  तिचा (मृत्यू झाला असावा असा अंदाज ) व्यक्त केला जात आहे.  वाघांना नावांऐवजी क्रमांकाने ओळखण्याच्या वन विभागाच्या पद्धतीविषयी पूर्णपणे आदर आहे, यापैकी बहुतेक नावे स्थानिकांनी दिलेली आहेत. परंतु तरीही मी वाघाचे नाव वापरण्यालाच अधिक प्राधान्य देतो कारण त्यामुळे मी या प्रजातीशी अधिक जोडला जातो! पहिली घटना ताडोबाच्या बफर क्षेत्रात एका गावाजवळ झाली व अनेक गावकऱ्यांनी तर या दोन वाघांची लढाई पाहिलीसुद्धा. यामध्ये बजरंग हा वाघ छोटा मटकाकडून मारला गेला, या लढाईत त्यालाही इजा झाली परंतु तो वाचला. हरवलेल्या मायाचा शोध महिनाभरापेक्षा अधिक काळ सुरू होता व वन विभागाला वाघाच्या शरीराचे अवशेष सापडले, ते मायाचेच असल्याची खात्री करण्यासाठी डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. समाज माध्यमांमध्ये या दोन्ही बातम्यांवर बरीच टीका टिप्पणी करण्यात आली, त्या शेअर करण्यात आल्या व वादविवादही झाले (नेहमीप्रमाणे). तुम्ही म्हणाल त्यात काय मोठेसे, वाघ लढतात, भटकी कुत्रीही लढतात व एक वाघीण हरवली व तिचा मृत्यू झाला असेलही पण, हा निसर्ग आहे व बहुतेकांच्या या मताशी मी असहमत नाही व अनेक लोक असेही होते ज्यांनी या दोन्ही बातम्यांची दखलही घेतली नाही, त्यामुळे असोमाझा लेख ज्यांचे वन्यजीवनावर प्रेम आहे, केवळ त्याची छायाचित्रे काढण्यावर नाही, त्यांच्यासाठी तर आहे. ज्यांना वन्यजीवनीविषयी व त्यासंदर्भातील त्यांच्या जबाबदारीविषयी फारशी माहिती नाही त्यांच्याविषयी जास्त आहे. छोटा मटकाशी लढाईमध्ये झालेला बजरंगचा मृत्यू, त्याचप्रमाणे जर मायाचा मृत्यू नैसर्गिक नसेल तर तो एकूणच वन्यजीवनाविषीच्या आपल्या अज्ञानाशी संबंधित आहे, याची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी माझा हा लेख आहे. मी आधीच मान्य करतो की अशा घटनांविषयी माझी मते किंवा लेख वन्यजीवनाशी आलेला माझा संपर्क, माझे निरीक्षण, वन्यजीवनाशी संबंधित लोकांकडून मिळालेली माहिती व अभियंता म्हणून माझा तर्कसंगत विचार यामधून तयार झाला आहे. मी कदाचित चूक असेन व लोकांचे माझ्यापेक्षा वेगळे मत असू शकते, परंतु कुणालातरी दोष देणे नव्हे तर जागरुकता निर्माण करणे हा या लेखाचा उद्देश आहे. इथे माया व बजरंग यांच्याविषयी फेसबुकवर जे काही लिहीण्यात आले होते त्यांची नावे जाहीर न करता ते देत आहे, या लेखनातून त्यांच्याविषयी कशाप्रकारची मते मांडण्यात आली होती याची कल्पना यावी यासाठी ते देत आहे

XXXX एकाच वाघीणीचे उदात्तीकरण ही समस्या नाही. वाघांचे व्यवस्थित निरीक्षण केले जात नाही ही समस्या आहे. ती बऱ्याच काळापासून दिसत नव्हती, परंतु पर्यटकांनी माया कुठेही दिसत नसल्याची ओरड सुरू केल्यानंतर शोध मोहीम राबविण्यात आली. वन विभागाला पर्यटकांनी हे सांगायची गरज का पडते?

YYYY ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात १०० हून अधिक वाघ आहेत. संवर्धन म्हणजे प्रत्येक वाघाचे रोज निरीक्षण केले जाते असे नाही.

संवर्धन परिणामकारक होण्यासाठी, या परिसरातील वाघांची संख्या नेहमी चांगली राहिली पाहिजे किंवा अगदी वाढलीही पाहिजे.

पर्यटकांना कुणा टी ५३ ची फारशी काळजी का नसते? कारण तो विशिष्ट वाघ कदाचित बेधडकपणे रस्त्यावर चालत जात नसेल किंवा कदाचित चांगली छायाचित्रे काढण्याच्या संधीही देत नसेल.

संवर्धन एक विज्ञान आहे हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे व परिस्थितीकीमधील वाघांची भूमिका इतर मित्रांना समजून सांगितली पहिजे ज्यांचा कधीही वन्यजीवनाशी संबंध आलेला नाही परंतु त्याविषयी जिव्हाळा वाटतो. नाहीतर वन्यजीवनाला धोका निर्माण होईल व लवकरच केवळ छायाचित्र काढण्यासारखे वाघ व वाघीणीच नव्हते तर त्यातील रहिवाशांसह विकासाला बळी पडेल.

वरील संभाषण ही केवळ एक झलक आहे, अजूनही बऱ्याच गोष्टी होत आहेत.

    बजरंगच्या मृत्यूविषयी, बरेचजण म्हणतील की दोन नर वाघांमध्ये प्रदेशावरून होणारी लढाई व त्यात कुणाचातरी मृत्यू होणे व कुणीतरी जखमी (मास्टर फुनाकोशी) होणे नैसर्गिकच आहे; तरीही मी असे  म्हणेन की अजून एक तिसरा मार्गही आहे, ज्यामध्ये एक वाघ माघार घेतो व त्याचा अधिवार म्हणून जंगलातील दुसरा भाग शोधतो. ज्यांना हा वाघाचा अधिवार म्हणजे काय हे माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, आपण ज्याप्रमाणे आपले शेत आखून घेतो त्याप्रमाणे प्रत्येक वाघाचा प्रदेश ठरलेला असतो व तो इतर वाघांना त्या भागामध्ये येऊ देत नाही, ज्याप्रमाणे आपण आपल्या शेतामध्ये नांगरायला किंवा पेरणी करायला दुसऱ्या व्यक्तींना किंवा कुटुंबांना येऊ देत नाही. जर एखादा वाघ दुसऱ्या वाघाच्या प्रदेशात चुकून शिरला तर गुरकावून किंवा खोटा-खोटा हल्ला करून इशारा दिला जातो. परंतु वाघाला त्या प्रदेशावर सत्ता गाजवायची असेल किंवा दुसऱ्या वाघाच्या प्रदेशावर आक्रमण करायचे असेल तर मरेपर्यंत लढाई होते. याचे कारण म्हणजे माणसांच्या समाजामध्ये न्याय व्यवस्था असते तसेच कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणाही आहे, वाघांच्या बाबतीत मात्र तशी परिस्थिती नाही, त्यामुळे त्यांना स्वतःच न्याय करावा लागतो. आता हा निसर्ग असेल, जो शेकडो, हजारो वर्षांपासून आहे तर काही हरकत नाही परंतु गेल्या काहीशे वर्षांपासून माणूस नावाच्या प्रजातीने निसर्गामध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली आहे, मग ती गरज, वाढ, विकास काहीही असेल व तुम्ही त्याला काहीही नाव द्या. हे कदाचित दोन नर वाघांच्या लढाईशी संबंधित नसेल परंतु आपण त्यांची जागा (म्हणजे जंगल) कमी केली आहे जी वाघांची संख्या संतुलित ठेवण्यासाठी आवश्यक आहे व आता तीच नसल्यामुळे त्यांच्या लढाया वाढल्या आहेत. कारण एकीकडे आपण व्याघ्र प्रकल्प तयार करतो जेथे वाघ माणसांपासून सुरक्षित असतात, परंतु या वाघांच्या वाढलेल्या संख्येचे काय, त्यांच्यासाठी जागा कुठे आहे, म्हणूनच सध्याचे व्याघ्र प्रकल्प प्रत्यक्षात एखाद्या खुल्या प्राणी संग्रहालयासारखे झाले आहेत (अधिकाऱ्यांविषयी पूर्णपणे आदर राखून हे विधान करत आहे). दुर्दैवाने, व्याघ्र प्रकल्प व प्राणीसंग्रहालयातील एकमेव फरक म्हणजे, जर प्राणी संग्रहालयामध्ये वाघीणीने बछड्यांना जन्म दिला तर ते बछडेही तिथेच राहतात. परंतु व्याघ्र प्रकल्पामध्ये मात्र बछड्यांना मोठे झाल्यानंतर तिथे असलेल्या वाघांशी जागेसाठी लढावे लागते किंवा माघार घ्यावी लागते व माणसांच्या जंगलात म्हणजेच व्याघ्र प्रकल्पाच्याभोवती असलेल्या नागरी वसाहतींमध्ये जावे लागते व जगण्याचा प्रयत्न करावा लागतो. दोन्ही परिस्थितीत वाघासाठी त्याचा परिणाम मृत्यूच होतो, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे!

       बजरंग व छोटा मटका यांच्यादरम्यानच्या लढाईच्या तपशीलांवर एक नजर टाका, वय किंवा शिकार करता न येणे यासारख्या नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू होण्यासारखे त्यांचे वय नव्हते, त्यामुळे दुसऱ्या वाघाच्या प्रदेशात गेल्यामुळे झालेला मृत्यू नैसर्गिक नाही. स्थानिक तसेच वन विभागाच्या गाईडच्या मते तसेच पर्यटकांनी दिलेल्या माहितीनुसार बजरंग साधारण आठ वर्षांचा होता व त्याच्या स्वतःच्या क्षेत्रात स्थायिक होण्याचा प्रयत्न करत होता. परंतु प्रत्येक क्षेत्रातून त्याला दुसऱ्या अधिक बलशाली वाघाने हुसकावून लावले. शेवटच्या लढाईपूर्वी छोटा मटकाचे जेथे वर्चस्व होते तेथे तो एका गाईची शिकार करण्याच्या प्रयत्नामध्ये होता. दोन्ही वाघ गुराची शिकार करत होते कारण दोघांनाही तरूण वाघांनी मुख्य जंगलातून हिसकावून लावले होते व जगण्यासाठी गुरांची शिकार करणे त्यांना सोपे वाटत होते. त्यामुळे तेथे दुसरा कुणी वाघ आल्यानंतर लढाई होणे स्वाभाविक होते कारण हा निसर्ग आहे व म्हणूनच जगण्यासाठी व माणसांनी पाळलेल्या गुरावरून लढाई झाली, याला आपण अजूनही निसर्ग म्हणणार का? मायाच्या मृत्यूविषयी बोलायचे तर (जर तो खरोखरच झाला असेल), तर तिचाही नैसर्गिक मृत्यू होण्यासाठी तिचे वय कमी होते व तिची समस्या अशी होती तिच्या आजूबाजूला चार नर वाघ फिरत होते व ती गरोदर राहिली व तिला बछडे झाले तर तिला चारही बछड्यांना सुरक्षित ठेवणे आवश्यक होते. कारण सामान्यपणे नर वाघ इतर नर वाघापासून झालेली बछडी मारून टाकतो, हा निसर्ग आहे. मायाची याआधीची दोन बछडी तिच्या क्षेत्रातील कुणा ना कुणा नर वाघांनी ठार केली होती व म्हणूनच गरोदरपणाच्या वेळी ती सुरक्षित ठिकाणी गेली असावी व यादरम्यान त्या भागातील इतर वाघीणींकरून मारली गेली असावी किंवा नर वाघापासून बछड्यांना वाचविताना तिला जीव गमवावा लागला असावा, जर तो नैसर्गिक मृत्यू नक्कीच मानता येणार नाही. या सगळ्या जर-तरच्या गोष्टी आहेत परंतु माया कोअर क्षेत्रात राहात होती जे संरक्षित जंगल आहे, आपण केवळ असा अंदाज बांधू शकतो की तिने इतकी वर्षे टिकवून ठेवलेल्या प्रदेशातून ती दुसरीकडे का गेली हे एक गूढच राहील व हा नक्कीच निसर्ग नाही. कारण केवळ निसर्गाला दोष देण्याऐवजी एका वाघीणीच्या प्रदेशामध्ये चार नर वाघांनी गर्दी करण्याचे काय कारण आहे याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे, बरोबर? याचाच अर्थ असा होतो की आपण ताडोबा अभयारण्यातील वाघांची संख्या वाढविण्यात यशस्वी ठरलो आहोत ही चांगली बातमी आहे, परंतु त्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्यात आपण अपयशी ठरत आहोत हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे व त्यासाठी आपण केवळ वन विभागाला जबाबदार धरू शकत नाहीवन विभाग त्यांना जे करणे शक्य आहे ते सर्व काही करत आहे व त्यांनी ताडोबामध्ये केलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसांना वाघांसोबत जगायला लावले आहे. म्हणूनच बजरंग व मटका त्यांच्या सावजासाठी ते माणसाच्या मालकीचे असूनही एकमेकांशी लढू शकले. म्हणुनच त्यांच्यापैकी किमान एक तरी जगला, कारण जर त्यांची लढाई जर माणसांशी झाली असती तर दोघांचाही मृत्यू झाला असता. काही वाघांचा मृत्यू नैसर्गिकपणे झाला असे म्हणून आपल्याला वन्यजीवनाबाबत असलेली आपली जबाबदारी झटकता येणार नाही, कारण आपण दररोज वाघांच्या मालकीची जागा शक्य त्या सर्व प्रकारांनी कमी करत आहोत हे कटू सत्य आहे. लोकहो विचार करा, जर एखाद्या माणसाचे कुटुंब २ बीएचके सदनिकेमध्ये राहात असेल व त्यांना एक मूल असेल व कुटुंबात आणखी एका सदस्याचा जन्म झाला, तर नव्या सदस्यासाठी जागा व्हावी म्हणून ३ बीएचके घेता आला नाही तर आपण दोन्ही भावंडांना एकच खोली वाटून घ्यायला लावतो व आपण त्यांना तसे जगायला शिकवतो. याचे कारण म्हणजे आपण माणसे आहोत व तो आपला स्वभाव आहे. परंतु वाघाचे कुटुंब आपण ज्याप्रकारे जगतो त्याप्रकारे निसर्गामध्ये राहू शकत नाही व परिणामी आपल्याला वाघांच्या लढाया वाढल्याचे पाहायला मिळते. वाघांना आपल्या कुटुंबाचाच एक सदस्य बनवून घेण्याची व त्यांनी आपली संस्कृती किंवा जगण्याच्या पद्धती शिकाव्यात अशी अपेक्षा करण्याऐवजी त्यांना त्यांच्या स्वभावानुसार जगता यावे यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी एकत्रितपणे एक प्रतिज्ञा घेऊ, “ आता एकाही बजरंगचा मृत्यू होणार नाही किंवा कोठल्याही मायाला लपुन बसायची गरज पडणार नाही, ” एवढे सांगून लेख संपवितो!


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com














 

Tuesday 28 November 2023


क्रिकेट वर्ल्ड कप 23, भारतीय टिम आणि जिवनातील धडा !













क्रिकेट वर्ल्ड कप 23, भारतीय टिम आणि जिवनातील धडा !


तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, एक म्हणजे आपण गोलंदाजी करत असू किंवा फलंदाजी आपण प्रत्येक चेंडूसाठी झुंज देणार आहोत. दुसरे म्हणजे, खेळावर लक्ष केंद्रित करा व १००% प्रयत्न करा. तिसरे म्हणजे, हसत राहा व खेळाचा आनंद घ्या, ते कोणत्याही विजयापेक्षा किंवा पराभवापेक्षा महत्त्वाचे आहे”... सामन्यापूर्वी राशीद खानने त्याच्या अफगाण क्रिकेट संघातील खेळाडूंना दिलेला सल्ला.

सामन्यापूर्वी दिखावा करणे हा तुम्ही स्वतःवर केलेला एक वाईट विनोदच म्हणावा लागेल. त्यात अडकू नका. तुमची बलस्थाने ओळखा, तुमच्या कमकुवत बाबी सुधारण्यासाठी मेहनत घ्या. खरी कामगिरी म्हणजे, तुम्ही दररोज सकाळी आरशामध्ये जे पाहता ते आवडणे”... विराट कोहली त्याच्या ३५व्या वाढदिवशी.


एका सामन्यात जरी खराब खेळ झाला तर मी सर्वात वाईट कप्तान ठरेन”… रोहित शर्मा विश्व चषकातील भारतीय संघाच्या विजयांच्या मालिकेविषयी.


“ विजेते नशीबावर विसंबून राहात नाहीत; ते नशीबाला त्यांच्यावर विसंबून राहायला लावतात “ मी.


   तुम्ही जोपर्यंत हा लेख वाचत असाल, तोपर्यंत चारपैकी एक गोष्ट घडली असेल, भारत अंतिम फेरीपर्यंत पोहोचला असेल, किंवा न्यूझिलंडविरुद्ध पराभूत होऊन उपांत्यफेरीत सामन्यातून बाहेर पडला असेल किंवा अंतिम सामना जिंकून विश्वविजेताही झाले असते किंवा अंतिम सामन्यात पराभुत झाला असेल! (दुर्दैवानी चवथी शक्यताच खरी ठरली)  मी आयसीसीच्या पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेविषयी बोलतोय जो सध्या आपल्या देशात सुरू आहे व ही स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात आहे. मी आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे या देशात क्रिकेटचा द्वेष करणाऱ्या व्यक्तीही असल्या तरीही या देशात लोकांना दोन गोष्टी सर्वाधिक आवडतात त्या म्हणजे सिनेमा व क्रिकेट, ही वस्तुस्थिती अगदी क्रिकेटचा द्वेष करणारेही नाकारू शकणार नाहीत, त्यामुळे असो. माझ्याविषयी बोलायचे झाले, तर मला माझा खेळ आवडतो व मी स्वतः क्रिकेटचा निस्सीम चाहता होतो, परंतु आता नाही कदाचित क्रिकेटचा अतिरेक झाला असावा किंवा कदाचित माझे वय झाले असावे. म्हणुन मी पहिले ईतर 9 क्रिकेटचे सामने मिव टाकून बघत नाही. परंतु हा एक सांघिक खेळ आहे व तो पाहताना मला त्यातून जे काही शिकायला मिळते त्यासाठी मी तो पाहतो. उद्या भारतासाठी कसोटीचा दिवस असणार आहे, कारण गेल्या दशकात जेव्हा दोन किंवा तीन देशांमधील क्रिकेटच्या स्पर्धा असतात तेव्हा त्यावर आपले वर्चस्व राहिले आहे. परंतु क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ असलेले देश जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात तेव्हा आपले आव्हान साखळी सामन्यांमध्ये किंवा पात्रता सामन्यांमध्येच संपुष्टात येते असा अलिकडचा इतिहास राहिलेला आहे. भारतीय संघ ज्या मानसिकतेने या क्रिकेट विश्वचषकाला सामोरा गेला आहे ते सांगणे हेच माझ्या लेखाचे उद्दिष्ट आहे, ही स्पर्धा म्हणजे एकप्रकारे मर्यादित देशांच्या ऑलिम्पिकसारखीच असते. आपण सर्व साखळी सामने जिंकले आहेत, विश्वचषक स्पर्धेमध्ये अशी कामगिरी करणारा आपण एकमेव संघ आहोत. इतर 9 संघांना कुठल्या ना कुठल्या संघाकडून पराभूत व्हावे लागले आहे. अनेकदा त्यांच्यापेक्षा क्रमवारीत खालच्या स्थानी असलेल्या व अनुभवाने कमी असलेल्या संघाकडूनही पराभव स्वीकारावा लागला आहे. आपण हे या स्पर्धेतून शिकू शकतो व या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने सर्व सामने जिंकणे विशेष होते. आत्तापर्यंत केवळ ऑस्ट्रेलियन संघाने हे साध्य केले आहे व त्यांनी हे दोनदा केले आहे व आपला संघ साखळी सामन्यात अपराजित राहिला तर तोही या यादीत पोहोचेल व हेच विजेत्यांचे लक्षण आहे.

     खरे तर क्रिकेट हा खेळ अधिकृतपणे केवळ पंधरा देश खेळतात व त्यापैकी केवळ दहा देश विश्वचषकासाठी पात्र झाले आहेत. या फेऱ्यांमध्ये प्रत्येक संघाला प्रत्येकी नऊ सामने खेळावे लागतील व सर्वोच्च चार संघ उपांत्यफेरीमध्ये पोहोचतील. विनोद म्हणजे जागतीक पहिल्या क्रमांकावर असलेला पाकिस्तानसारखा अग्रमानांकित संघ साखळी सामान्यात बाहेर झाला आहे, तसेच इंग्लंडही बाहेर झाला आहे, जो गतविजेता होता. ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेचे संघही त्यांच्यापेक्षा जे संघ कमजोर मानले जात होते उदाहरणार्थ बांग्लादेश, नेदरलँड्स व अफगाणिस्तान यांच्याकडून पराभूत झाले, म्हणूनच क्रिकेट पाहणे अतिशय रोचक असते तुम्हाला खेळाचा आनंद उपभोगताना आयुष्याचे धडेही मिळतात. या संघांना एकमेकांशी खेळताना पाहणे हे एखाद्या वर्गामध्ये बसून प्रयत्न, कौशल्य, चिकाटी, रणनीती, अडचणी, निर्धार यांचे शिक्षण घेण्यासारखे आहे व नशीबाचा फायदा घेण्यासारखे किंवा नशीब गमावण्यासारखे आहे, तुम्हाला हा खेळ कितीतरी गोष्टी शिकवतो. उदाहरणार्थ, नेदरलँड्ससारखा संघ दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हरवतो, हे म्हणजे एखाद्या कमजोर संघाने कितीतरी पटीने अधिक चांगल्या संघाचा धुव्वा उडवण्यासारखे होते. नेदरलँड्सच्या संघामध्ये अनेक खेळाडू हा खेळ अर्ध वेळ खेळतात. यात कुणी शिक्षक आहे, कुणी प्लंबर आहे, कुणी ऑनलाईन डिलेव्हरी बॉय आहे व अशा खेळाडूंनी तयार झालेल्या नेदरलँड्सच्या संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हरवले ज्यांच्याकडे केवळ अनुभवच नाही तर कौशल्य व खेळाविषयी व्यावसायिक दृष्टिकोनही आहे. या स्पर्धेमध्ये इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यांच्या अशा इतिहासाची पुनरावृत्ती झाली परंतु भारतीय संघाच्या बाबतीत असे घडले नाही.

    राशीद खान याचे शब्द वाचा, जो अफगाणिस्तानच्या इतर खेळाडूंना संबोधित करणाऱ्या दोन खेळाडूंपैकी एक होता, ज्यांच्यापैकी बहुतेकांना इंग्रजी बोलता येत नाही. त्याने त्यांना खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा, शंभर टक्के प्रयत्न करण्याचा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे हसत राहण्याचा म्हणजेच केवळ जिंकण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी खेळाचा आनंद घेण्याचा विचार करा असा सल्ला दिला, जगभरातील व्यवस्थापन गुरू आपल्याला नेहमी हेच तत्वज्ञान शिकवत असतात असे तुम्हाला वाटत नाही का. या दृष्टिकोनामुळे खेळाच्या बाबतीत काय घडू शकते याचे हे जिवंत उदाहरण आहे, अशा एका देशातील खेळाडूंचा संघ जेथे धड सरकारही अस्तित्वात नाही तसेच डोक्यावर युद्ध व दहशतवादाची सतत टांगती तलवार असते, पात्रता फेरीच्या लढतीत शेवटपर्यंत झुंज देत होता त्याने क्रमवारी, अनुभव व संसाधनांमध्ये त्यांच्यापेक्षा वरचढ असलेल्या संघांची अक्षरशः कोंडी केली. या परिस्थितीतून तुम्ही काय शिकण्यासारखे आहे, माझ्याकडे जे नाही त्यासाठी रडत बसण्याऐवजी, मी माझ्याकडे जे काय आहे त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे व आपले काम सर्वोत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अफगाणिस्तान संघाने मला हा दृष्टिकोन शिकवला. खेळामध्ये (आणि जिवनामध्ये सुद्धा) नेहमी शक्ती किंवा अनुभव किंवा ताकद किंवा क्रमवारी महत्त्वाची नसते, त्या दिवशी ज्यांचा खेळ सर्वोत्तम होईल व जे खेळाचा आनंद घेतील ते देखील जिंकू शकतात. यातून मी शिकलो की, इतिहास महत्त्वाचा असतो परंतु तो कधीच कायमस्वरूपी नसतो व तुम्ही दररोज जेव्हा मैदानावर उतरता तेव्हा तो नव्याने लिहीला जाऊ शकतो. अफगाणिस्तान व नेदरलँड्ससारख्या संघांनी मला शिकवले की आपला प्रतिस्पर्धी कितीही शक्तीशाली असला तरीही आपण आपल्या कौशल्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला तर आपण त्यांना हरवू शकतो. त्याचवेळी पहिले दोन सामने हरल्यानंतर ऑस्ट्रिलिया व दक्षिण आफ्रिका खडबडून जागे झाले व त्यांनी त्यांच्या उरलेल्या सर्व सामन्यांमध्ये पुन्हा मुसंडी मारली व अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. परंतु इतर संघांची मात्र घसरण झाली व त्यातून ते कधीच सावरले नाहीत. यातून आपल्या प्रतिस्पर्ध्याला कधीही कमी लेखू नये हे मला समजले (आयुष्यात, त्याच्या परिस्थितींमध्ये) व खेळाला कधीही गृहित धरू नये. तसेच पराभवामुळे माझ्यामते दोन गोष्टी घडू शकतात, एकतर त्यामुळे मी हताश होऊन लवकरच माझा पुन्हा पराभव होईल किंवा त्यामुळे मला माझ्या चुकांची जाणीव होईल व त्या सुधारून पुढचा सामना जिंकता येईल, आता यापैकी काय करायचे आहे हा निर्णय माझा आहे.

     भारतीय संघाविषयी बोलायचे झाले, तर आपण काही जबरदस्त विजय पाहिले व आत्तापर्यंत प्रत्येक खेळाडूने त्यामध्ये योगदान दिले आहे व विजेता संघ असाच असला पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळी काही नावांवरच अवलंबून राहू शकत नाही, ते अगदी तुमच्यासाठी देवासमान असले तरीही. तुम्ही जेव्हा काही व्यक्तींच्या समूहाला संघ म्हणता तेव्हा प्रत्येक सदस्याला त्याची (किंवा तिची) भूमिका समजली पाहिजे व त्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे, त्यानंतरच तुम्ही विजयी होता, जे भारतीय संघाच्या बाबतीत घडत आहे. म्हणूनच कुणी महान खेळाडूच म्हणजे एखादा फलंदाजच धावा करत नाही किंवा एखादा प्रसिद्ध गोलंदाजच बळी घेत नाही, तर प्रत्येकजण योगदान देत आहे. तुम्ही सध्या बहुतेकवेळा अशाचप्रकारे जिंकता. वर्षानुवर्षे भारतीय संघ नेहमीच प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मानसिकदृष्ट्या एका किंवा दोन नावांवर अवलंबून राहिला आहे. जर त्या खेळाडूचा खेळ अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर संपूर्ण संघच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळत असे, आता मात्र तशी परिस्थिती नाही. तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिल्यास, आपण 1983 व 2011 या दोन्ही वर्षी क्रिकेट विश्वचषक जिंकला तेव्हा सगळ्या खेळाडूंनी त्यांची जी काही भूमिका होती त्यामध्ये योगदान दिले, तसेच आत्ताही होताना दिसत आहे. जेव्हा प्रत्येक सदस्य योगदान देतो तेव्हा प्रत्येक खेळाडू आरामात, मोकळेपणाने त्याचा नैसर्गिक खेळ खेळू शकतो जे त्यांच्या यशाचे गमक आहे. हे आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या दैनंदिन कामासाठीही लागू होते. जेव्हा प्रत्येक सदस्य त्याचे काम चांगल्याप्रकारे करत असतो, पूर्णपणे समर्पित होऊन करत असतो, तेव्हा कामाचा भार जाणवत नाही. आपल्या पौराणिक कथांमध्ये भगवान श्रीकृष्णांनीही गोवर्धन पर्वत अशाचप्रकारे उचलला, ज्यासाठी प्रत्येक गावकऱ्याने हातभार लावला व भगवान श्रीकृष्णांच्या नेतृत्वाखाली ते खरोखरच पर्वत उचलू शकले!

    तुम्ही जेव्हा सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे करता, तेव्हा नशीब नावाचीही गोष्ट असते व तुमचे त्यावर काहीही नियंत्रण नसते हे मान्य असले तरीही नशीबाची मेहेरनजर कुणावरही होऊ शकते, ते कधीही भेदभाव करत नाही. किंबहुना नशीब हे कुंपणावर बसून असते व दोन्हींबाजूंना सारखेच महत्त्व देत असते, जी बाजू त्यांचा वाटा घेण्यासाठी सज्ज असते सामान्यपणे तिचा विजय होतो, मला असे वाटते भारतीय संघही त्यांचे नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला पाहिजे. माझ्यापुरते बोलायचे झाले, तर भारत विश्वचषक जिंको किंवा न जिंको मला भारतीय म्हणून काहीही फरक पडत नाही. कारण मला तुम्हाला सांगावेसे वाटते की आपला संघ आत्तापर्यंत जसा खेळला आहे त्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे व मला आपल्या संघाचा अतिशय अभिमान आहे. मला असे वाटते की हाच सर्वोत्तम निकाल आहे.

    मी हा लेख लिहीपर्यंत भारत उपांत्य फेरीमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याच्या मार्गावर होता, विराटने एक दिवसीय सामन्यामध्ये ५०वे शतक केले होते. तो अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडु आहे, त्यामुळे प्रार्थना करत राहा व भारतीय संघ आपल्या खेळाचा आनंद लुटत असताना त्यांना पाहण्याचा आनंद उपभोगा, एवढेच मी सांगेन!



संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com











 

Tuesday 21 November 2023

वायूप्रदूषण,सरकार आणि रिअल इस्टेटच्या मानेभोवतीचा फास !













वायूप्रदूषण,सरकार आणि रिअल इस्टेटच्या मानेभोवतीचा फास !


कायद्यामुळे भरडल्या गेलेल्या लोकांना जेव्हा काही आशा नसते तेव्हा ते त्यातून पळवाटा काढतात. जर कायदा त्यांचा शत्रू असेल, तर ते सुद्धा कायद्याचे शत्रू होतील ; व ज्यांच्याकडे आशा करण्यासारखे बरेच काही असेल व गमवण्यासारखे काहीच नसेल असे लोक नेहमीच धोकादायक ठरतील” … एडमंड बर्की

    एडमंड बर्की हे अँग्लो-आयरिश मुत्सद्दी, अर्थतज्ञ व तत्ववेत्ते होते. त्यांचा जन्म डब्लिनमध्ये झाला, बर्की यांनी १७६६ ते १७९४ दरम्यान ब्रिटनच्या संसदेतील हाउस ऑफ कॉमन्समध्ये व्हिग पक्षाचे सदस्य म्हणून काम केले. एक तत्वज्ञ व मुत्सद्दी (राजकारणी),हे काही पचनी पडत नाही” (म्हणजेच, तर्कसंगत नाही) परंतु कदाचित म्हणूनच ग्रेट ब्रिटन (तेव्हा महान होता) महान होऊ शकला. कारण जे शासनकर्ते तत्वज्ञ व ज्ञानी असतात, तेच तर्कसंगत व एकूणच लोकांचे भले होईल असे समाजाचे नियम ( कायदे ) तयार करू शकतात. इथे नियम म्हणजे कायदे किंवा सरकारी धोरणे किंवा केवळ तुम्ही ज्याप्रकारे लोकांवर शासन करता असा अर्थ आहे. तुम्हाला कल्पना आली असेल की हा लेख कुठल्या दिशेने चालला आहे (अर्थात बऱ्याच काळाने मी या विषयावर लिहीतो ), तो रिअल इस्टेट क्षेत्रातील धोरणांविषयी व या उद्योगातील धोरणात्मक गोंधळाविषयी आहे, कारण या क्षेत्राशी संबंधित सर्वांची परंतु प्रामुख्याने सरकार व शासनकर्त्यांची कृपा !

  गेल्या काही दिवसांपासून, माध्यमे देशातील सर्वच शहरांमध्ये हवेचा दर्जा खालावत चालल्याबद्दल वारंवार बातम्या छापत आहेत, याची सुरुवात दिल्लीपासून झाली व हे लोण पुणे, पिंपरी-चिंचवडपर्यंत पसरले, ज्याला आपण पुणे परिसर असे म्हणू. माध्यमांना नेहमी असे काहीतरी हवे असते जे लोकांना वाचायला आवडते, मग साथीचा रोग असो किंवा प्रदूषण, त्यामागची खरी कारणे ते विचारात घेत नाहीतनेहमीप्रमाणे सरकारही जाणकार लोकांच्या विनंतींबाबत (म्हणजेच सूचनांबाबत) अतिशय असंवेदनशील असते, ज्या खरेतर महत्त्वाच्या असतात व केवळ माध्यमांमधील मथळ्यांवर प्रतिक्रिया देते व परिणामी अपेक्षेप्रमाणे, “ज्या व्यक्तीची मान फासामध्ये बरोबर अडकेल त्याला फाशी द्या,” अशा स्वरूपाचा फतवा काढला जातो. रिअल इस्टेटसंदर्भातील धोरणे अशाप्रकारे तयार केली जातात, कारण रिअल इस्टेटची मान प्रत्येक सरकारच्या फासामध्ये अगदी सहजपणे अडकते.

    ज्यांना ही म्हण माहिती नाही, त्यांनी कृपया पंचतंत्रातील गोष्टी (समाज व जीवनाविषयी लोक कथा) वाचाव्यात. त्यातील एका गोष्टीमध्ये राजा ज्या दोरखंडाने खऱ्या गुन्हेगाराला फाशी देणे अपेक्षित होते त्याऐवजी अशा एका निर्दोष (आणि सामान्य) व्यक्तीला फाशीची शिक्षा देतो ज्याचा गुन्ह्याशी काहीही संबंध नसतो, केवळ त्याची मान फाशीसाठी तयार केलेल्या फासामध्ये व्यवस्थित अडकत असते. इथेही नेहमीप्रमाणे प्रदूषण नावाच्या गुन्ह्यासाठी, सामान्य माणूस ( मी निष्पाप असे म्हणण्याचे धाडस करणार नाही कारण बांधकाम व्यावसायिकांना तसे म्हणणे हाच गुन्हा आहे) किंवा उद्योग म्हणजे रिअल इस्टेट व एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेने (म्हणजे पुणे  मनपा /पिंपरी चिंचवड मनपा / पीएम आडीए ) सुरू असलेल्या बांधकामांच्या स्थळांविषयी मार्गदर्शक तत्वे प्रसारित केली असतील, तर दुसरी एखादी स्थानिक संस्था दिवाळीच्या आठवड्याच्या काळात बांधकाम थांबवायला सांगते. नेहमीप्रमाणे, अनेकजण म्हणतील की त्यात काय मोठेसे, बांधकाम स्थळांमुळे वायू व ध्वनीप्रदूषण होतेच, त्यांच्यामुळे नेहमी किती धुरळा उडतो ते पाहा, खणण्याचा तसेच त्यांच्या यंत्रसामग्रीचा आवाज असह्य असतो, त्यामुळे हे चांगले आहे. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकच त्यांच्या फायद्यासाठी (म्हणजे इमारतींसाठी) झाडे तोडतात, अर्थातच त्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त केला पाहिजेच ! (उपरोधिकपणे)!

   त्याचशिवाय देशातील माननीय न्यायालयांनीही वायू प्रदूषण कमी किंवा नियंत्रित करण्यासंदर्भात परिणामकारक पावले उचलण्यासाठी स्थानिक प्रशासकीय संस्थांवर ताशेरे ओढल्यामुळे, त्यांना काहीतरी पावले उचलणे भाग होते. मला पर्यावरणाविषयी पूर्णपणे आदर आहे ( माननीय न्यायालयांविषयीही आदर आहे ),परंतु मी माझ्या भावना तथ्यांपेक्षा वरचढ होऊ देणार नाही, तुम्ही धोरणे किंवा कायदे अशाचप्रकारे तयार केली पाहिजेत. मी सुरुवातीलाच स्पष्टपणे सांगतो की, मला माझ्या शहरा भोवतालच्याच नव्हे तर संपूर्ण जगातील पर्यावरणाची व निसर्गाची काळजी आहे व परंतु म्हणून भावनीकपणे कृती करून व अतार्किक धोरणे तयार करून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकणार नाही तर त्याचा अधिक विनाशच करू. बांधकाम स्थळामुळे वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण होते, परंतु ते इतर शेकडो गोष्टींमुळे सुद्धा होते. फटाक्यांचेच उदाहरण घ्या, न्यायालयाने पोलीसांना व स्थानिक स्वराज्य संस्थांना फटाके उडविणे थांबविण्यास किंवा नियंत्रित करण्याचे आदेश दिले आहेत, मला सांगा, दिवाळीच्या आठवड्यामध्ये एखाद्या व्यक्तीवर त्यासंदर्भात किती गुन्हे दाखल करण्यात आले. जर फटाक्यांचा वापर केला जाऊ नये हे न्यायालयाने स्वीकारले असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या विक्रीला परवानगीच का देतात ! कारण फटाक्यांच्या दुकानांसाठी परवाना देऊन त्यांना पैसे कमवता येतात व या लिलावातून मिळाणाऱ्या उत्पन्नाचे आकडे सुद्धा अभिमानाने जाहीर करतात.

   त्याचशिवाय न्यायालयाने फटाके उडविण्यासाठी वेळेची मर्यादाही घालून दिली होती व माझ्या माहितीप्रमाणे ती फक्त रात्री ८ ते १० वाजेपर्यंत होती. परंतु प्रत्यक्षात मात्र पुण्याच्या आकाशात रात्रं-दिवस पुण्याच्या आकाशामध्ये फटाके व त्यांच्यामुळे झालेला धूरच दिसत होता, आपली संपूर्ण सरकारी यंत्रणा आंधळी व बहिरी आहे का की त्यांना अशाप्रकारे फटाके उडविले जात असताना दिसत नाही किंवा ऐकू येत नाही, असल्यास त्यासंदर्भात काहीही पावले का उचलण्यात आली नाहीत वा गुन्हे दाखल करता आले नाही व केवळ बांधकाम स्थळांनाच का लक्ष् केले जात आहे, हा माझा प्रश्न आहे / याचे उत्तर सोपे आहे, आमची (मला स्वतःला आठवण करून द्यावी लागते की मी अजूनही बांधकाम व्यावसायिक आहे) मान प्रत्येक फासामध्ये अडकते व आम्ही निषेध करत नाही कारण आमचा निषेध कुणीही ऐकणार नाही हे आम्हाला माहिती आहे. पुणे प्रदेशात जवळपास ८० लाख खाजगी वाहने आहेत ज्यापैकी 50% जरी रस्त्यावर असली तरीही या ४० लाख वाहनांमध्ये, बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनॉक्साईडमुळे किती प्रदूषण होते याचा विचार करा. याचे कारण म्हणजे सरकार सशक्त सार्वजनिक वाहतूक सुविधा तसेच रस्त्यांचे जाळे उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले आहे, परंतु मग आपण नविन वाहनांच्या विक्रीवर बंदी का घालत नाही किंवा पारंपरिक इंधनाचा वापर करणाऱ्या वाहनांची निर्मिती का बंद करत नाही; आपण मर्सिडीज, टाटा, महिंद्रा व बजाज यांना दिवाळीच्या आठवड्यात त्यांचे कारखाने बंद ठेवायला का सांगत नाही तसेच दिवाळीच्या आठवड्यासाठी सर्व पेट्रोल वा डिझेल वर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीवर बंदी का घालत नाही, असा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे. उत्तर सोपे आहे: कारण या सर्व उद्योगांची मान सरकारी फासासाठी फार मोठी आहे व रिअल इस्टेटची मान पकडणे तसेच ती मोडणेही अतिशय सोपे आहे ! त्यानंतर सरकारच्या धोरणांवर एक नजर टाकू, जी प्रदूषणाला आळा घालण्याच्या त्यांच्या आग्रहाच्या (तसेच प्रयत्नांच्या) ती पूर्णपणे विरोधात आहेत, उदाहरणार्थ मेट्रोचा नफा वाढविण्यासाठी मेट्रोच्या पट्ट्यामध्ये घरांची घनता वाढविणे, परंतु यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व भोवती बांधकामामध्येही वाढ होणार आहे, यामुळे प्रदूषणही वाढणार नाही का, सरकार असे दुटप्पीपणे का वागते त्याचवेळी एवढ्या इमारती व पायाभूत सुविधांसाठी जागा करून देण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर झाडे तोडावी लागतील, शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाचे हेदेखील मुख्य कारण आहेयाची किंमत कुणाला मोजावी लागणार आहे (म्हणजे कुणाला फासावर लटकवले जाणार आहे )? त्याचप्रमाणे आपल्याकडे आपण जी झाडे कापणार आहोत त्यांच्या वयाएवढी झाडे लावण्यासारखी विचित्र धोरणे आहेत, कहर म्हणजे आपल्याकडे ईतकी नवीन झाडे लावण्यासाठी जागाच नाही कारण आपल्याला कार व दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी जागा हवी जेदेखील सरकारी धोरणांनुसार आवश्यक आहे. परंतु या प्रदूषणासाठी आपण फक्त रिअल इस्टेटलाच जबाबदार धरू, लोकहो तुम्ही कुणाला मूर्ख बनवताय मला मान्य आहे दुसऱ्याच्या चुकांकडे बोट दाखवुन तुम्ही स्वतःच्या चुका झाकु शकत नाही पण फक्त एका गटाला किंवा उद्योगाला प्रदूषणासाठी जबाबदार ठरवुन तुम्ही प्रदूषण रोखु पण शकणार नाही , हा माझा मुद्दा आहे ! मी म्हटल्याप्रमाणे, वायू प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी सर्व प्राधिकरणांच्या प्रयत्नांना माझा (आणि माझ्या सारख्या ईतर विकसकांचा ) संपूर्ण पाठिंबा आहे, मात्र त्यासाठी आपण सर्व अनुभवी (व जाणकार व्यक्तींना) व्यक्तींना विश्वासात घेतले पाहिजे व त्यानंतर सर्व दिशांना पळापळ करण्याऐवजी दीर्घकाळ-टिकणारे परिणामकारक धोरण तयार केले पाहिजे. एकेदिवशी सकाळी अचानक तुम्ही वर्तमानपत्र किंवा वॉट्सॲपचा चॅट बॉक्स उघडता व तुम्हाला तुमच्या स्वतःच्याच उद्योगातील प्रदूषण नियंत्रणासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वांविषयी समजते, ही कोठली योग्य न्यायव्यवस्था आहे ? खरे म्हणजे यावरील उपाय तिहेरी आहे, सर्वप्रथम वायूप्रदूषणाच्या स्रोतालाच आळा घाला, दुसरे म्हणजे प्रदूषित हवा स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करा व तिसरे म्हणजे प्रदूषणाच्या संदर्भात दीर्घकाळ (तसेच व्यवहार्य असतील अशी ) टिकणारी धोरणे तयार करा आणि ती अमलात आणणारी प्रभावी यंत्रणा ऊभारा !

    लोकहो, प्रदूषण हा अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे व बहुतोंडी राक्षसाप्रमाणे, समाज म्हणून आपणच या राक्षसाला चेहरा देतो. त्यामुळे या प्रदूषणरुपी राक्षसाचे केवळ एक डोके छाटून समस्या सुटणार नाही, तर एकमेकांना विश्वासात घेऊन एकजूट होऊ या व त्यानंतर कोणताही शत्रू अदृश्य नसेल, तोपर्यंत रिअल इस्टेटने इतर करत असलेल्या गुन्ह्यांसाठी आपल्या मानेभोवती फास आवळला जाण्याची तयारी ठेवा, एवढे बोलून निरोप घेतो !


संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

कृपया पुण्यात हक्काचे घर/ऑफिस शोधण्याबाबतचे माझे शेअरिंग खालील YouTube लिंकवर पहा आणि आवडल्यास  शेअर करा..                   

https://youtu.be/27j3I3rwGPQ?si=-ODYBxVI2Dl_C345