Wednesday, 25 February 2015

डिपी नावाचा तमाशा !नोकरशाही म्हणजे कोणत्याही चांगल्या कामाचा दु:खद अंत करणारी यंत्रणा.                … अल्बर्ट आईनस्टाईन!

हे काही माझ्या तोंडचे शब्द नाहीत तर हे ज्यांचे विधान आहे त्यांची बुद्धिमत्ता व विज्ञानामध्ये उत्तरोत्तर प्रगतीसाठीचे त्यांचे समर्पण वादातीत आहे, म्हणूनच मी बिनधास्तपणे त्यांच्या विधानानेच लेखाची सुरुवात करतोय. कोणत्याही पीढीमध्ये ज्यांची ओळख देण्याची गरज नाही अशी अगदी बोटावर मोजण्याइतकी नावं आहेत व आईनस्टाईन हे त्यापैकीच एक आहेत. बरेच जण विशेषतः माझे अनेक नोकरशाहीतील मित्र नक्कीच नाराज झाले असतील की मी हे विधान का निवडले व हा विषय कोणत्या दिशेने चालला आहे? फारसा तर्क लावण्याची गरज नाही कारण आपण ज्या शहरात राहतो ते आपल्या मेंदुला पुरेसे खाद्य देते, केवळ आपण त्याचा वापर केला पाहिजे. या लेखात मी सध्याचे शहर किंवा जुने शहर किंवा तुम्ही त्याला जे काही म्हणत असाल त्याच्या विकास योजनेविषयी म्हणजेच डीपीविषयी सांगणार आहे

ज्या भाग्यवान महाभागांना एखाद्या शहराचा डीपी म्हणजे काय हे माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, त्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक शहराला भविष्यातील विकासासाठी एक योजना हवी असते. शहरातील नागरी प्रशासनाला शहरातील विकासाचे नियोजनबद्धपणे नियंत्रण करता यावे म्हणून नियम व कायद्यांसह तपशीलवार योजना तयार केली जाते. त्यामध्ये शहराच्या हद्दीतील सर्व जमीनीचे  नकाशे तयार करण्याचा व ही जमीन योग्य हेतूने वापरली जात आहे का हे पाहण्याचा समावेश होते जे एका चांगल्या शहरासाठी आवश्यक आहे. उदाहरणार्थ घर बांधणीसाठी कितीही प्रचंड मागणी असली तरीही आपण सर्व जमीन निवासी हेतूने आरक्षित ठेवू शकत नाही. कुठल्या नियोजनाच्या केंद्रस्थानी घर बांधणी असली तरीही केवळ घरे बांधून उपयोग नाही तर त्यांच्यासाठी इतर पायाभूत सुविधाही उभाराव्या लागतात उदाहरणार्थ कार्यालयांसाठी जागा, बाजार व मॉलसारख्या व्यावसायिक जागा, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, पाणी पुरवठा योजना, सांडपाणी व कचरा प्रकल्प, मनोरंजन व इतर अशा अनेक सुविधाही जेवढी घरे असतील त्या प्रमाणात असल्या पाहिजेत. त्याचवेळी सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक बागा व मैदाने असली पाहिजेत, व या सर्वांचे नियोजन करताना आपण निसर्गाचे म्हणजेच शहरातील व आजूबाजूच्या भागातील झाडा-झुडुपांच्या, प्राणी-पक्षांच्या रुपातील जैवविविधतेचे संवर्धन केले पाहिजे. म्हणजेच शहरातील नद्या, डोंगर, जंगल व जैवविविधतेचे म्हणजेच प्राणी व पक्षांच्या प्रजातींचे संवर्धन केले पाहिजे. या सर्व घटकांचेच एकत्रितपणे चांगले शहर बनते. या सर्व हेतूने केवळ जमीनीची तरतूद करुन पुरेसे होत नाही तर तुम्हाला ते प्रत्यक्ष साकार करण्यासाठी मूलभूत नियम तयार करावे लागतात. म्हणजेच विशिष्ट भूखंडामध्ये आपण किती चौरस फूट जागेवर घरे बांधू शकतो किंवा इमारतीची उंची किती असली पाहिजे व उंच इमारतींसाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे. ये-जा करण्याच्या रस्त्यांची रुंदी व त्यांचा इमारतीच्या स्वरुपाशी संबंध व अशा इतर अनेक अटींचा प्रत्येक इमारतीचा आराखडा मंजूर करताना विचार करावा लागतो, हा आराखडा भविष्यातील प्रत्येक स्थितीचा विचार करुन तयार करावा लागतो. हा डीपी जवळपास वीस वर्षांसाठी असतो, त्यामुळे त्यामध्ये लोकसंख्या वाढीसारख्या भविष्यातील आव्हानांचा व शहराच्या गरजांचा विचार झाला पाहिजे. आजचे रस्ते सध्याच्या वाहनांसाठी कदाचित पुरेसे वाटतील; बरेच जण माझ्या विधानावर हसतील मात्र माझ्यावर विश्वास ठेवा मी केवळ एक उदाहरण देत आहे, आपण सार्वजनिक वाहतुकीची चांगली तरतूद केली नाही तसेच कार्यालय, शाळा, मनोरंजानाची ठिकाणे यासारख्या जागी घेण्यासाठी कमीत कमी प्रवास करावा लागेल असे आपण नियोजन केल्याशिवाय पाच वर्षांनंतर हेच रस्ते पुरेसे पडणार नाहीत! हे सर्व नियोजन व नियमावली व धोरणांना विकास योजना व डीसीआर म्हणजे विकास नियंत्रण नियम असे म्हणतात, जो सध्या आपल्या शहरातील चर्चेचा विषय झाला आहे!

मात्र आपण हे करण्यात अपयशी झाल्याचाच अनुभव आपल्याला सगळीकडे येत आहे. याआधी तयार करण्यात आलेले डीपी शहराच्या वाढीचा अंदाज बांधण्यात अतिशय अपयशी ठरले आहेत व परिणामी आपल्याला रहदारीचा गोंधळ व अपुरी सेवा दिसत आहे. दररोज रस्ते खणले जातात, अगदी नव्याने तयार केलेले रस्तेही खणले जातात! मग ते ऑप्टिकल फायबरसाठी असोत किंवा गॅस पाईपलाईनसाठी किंवा एमएसईबीच्या वीजेच्या केबल्स घालण्यासाठी,  या सेवांसाठी रस्त्यांचे नियोजन करतानाच तरतूद करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत व संपूर्ण शहराला त्यामुळे त्रास होतो. आधीच्या डीपींमध्ये कचरा डेपो म्हणजेच कचरा टाकण्यासाठीच्या ठिकाणासारख्या आवश्यक मूलभूत गोष्टींसाठी तरतूद करण्यात आली नव्हती व वर्षानुवर्षे आपण फक्त फुरसुंगी कचारा डेपोवरच अवलंबून आहोतशहरामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहासारख्या अत्यावश्यक सेवांचीही कमतरता आहे व याआधीच्या डीपींमध्ये त्यासाठी काहीही तरतूद नाही. रोहित्र केंद्रांसाठी कोणतीही तरतूद नव्हती जी संपूर्ण शहरात वीज वाहिन्यांचे जाळे तयार करण्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे एमएसईबीचे जाळे शहराच्या मध्य भागात अतिशय कमकुवत झाले. डीपी व्यवस्थित तयार केलेला नसेल तर शहराचे व नागरिकांचे काय होते याची ही काही उदाहरणे आहेत व गेल्या काही वर्षाच असेच चालले आहे.

आता डीपीविषयी ज्ञान मिळाल्यानंतर लोक विचारतील की जुन्या किंवा सध्याच्या शहराचा डीपी म्हणजे काय? सध्याचे शहर म्हणजे काय? पूर्वीपासूनच संपूर्ण शहर अस्तित्वात नव्हते का? त्याचा अर्थ असा होतो की १९५० साली अस्तित्वात आलेल्या पुणे महानगरपालिकेची हद्द व जवळपास पंधरा वर्षे पूर्वीपर्यंत ही हद्द तशीच होती. त्यानंतर आजूबाजूची अठरा गावे पीएमसीच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आली ज्याला आपण नवीन शहर म्हणतो व जुन्या हद्दीतल्या शहराला जुने शहर म्हणतो. आता कृपया मला विचारु नका की जुन्या व नवीन शहरासाठी दोन स्वतंत्र डीपी बनविणे हा काय विनोद आहे, कारण मला शंका वाटते की मीच कशाला देवाकडेतरी त्याचे उत्तर असेल का? एकाच शहरासाठी दोन डीपी का आहेत हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. म्हणूनच आपण सध्यातरी जुन्या शहराच्या डीपीवर लक्ष केंद्रित करणार आहोत, तुम्हाला आत्तापर्यंत या संपूर्ण डीपीनाम्याविषयी पुरेशी माहिती मिळाली असेल! भरपूर वाद व चर्चेनंतर जुन्या शहराचा डीपी तयार करण्यात आला व सार्वजनिक करण्यात आला कारण डीपीच्या मसुद्यावर भागधारकांकडून म्हणजे सोप्या शब्दात जनतेकडून किंवा नागरिकांकडून सूचना व हरकती मागवणे बंधनकारक आहे! आपल्या नावाला जागत पुणेकरांनी भरपूर प्रतिसाद दिला व डीपीविषयी जवळपास ऐंशी हजार सूचना आल्या! म्हणूनच पीएमसीने नियुक्ती केलेले तीन व राज्य सरकारने नियुक्त केलेले चार सदस्य असे मिळून सात सदस्यांची एक समिती नागरिकांनी दिलेल्या सूचनांची सुनावणी करण्यासाठी स्थापित करण्यात आली व हे काम जवळपास चार महिने चालले! रस्त्यांची आखणी बदलण्यापासून ते संबंधित भूखंडाचे आरक्षण रद्द करण्यापर्यंत (जे स्वाभाविक आहे) सर्व सूचनांची सुनावणी झाली व त्यामागचा तर्क ऐकून घेण्यात आला, त्यानंतर या समितीने पीएमसीला आपले मत एका अहवालाच्या स्वरुपात देणे अपेक्षित होते! इथपर्यंत सर्व काही सुरळीत चालले होते, मात्र या सुनावणीचा निष्कर्ष काढण्याची वेळ आली तेव्हा खरी गंमत झाली! समितीने दोन अहवाल तयार केले म्हणजे राज्याने नेमलेल्या तज्ञ सदस्यांनी वेगळ्या सूचना दिल्या व पीएमसीने नेमलेल्या सदस्यांनी आपल्या सूचना दिल्या! आता हे असं फक्त पुण्यातच होऊ शकतं. आता या दोन्ही अहवालांमधील निष्कर्ष निवडण्यासाठी आणखी एक समिती निवडायची का? माध्यमांमध्ये डीपीशी संबंधित प्रत्येकाकडून जी विधाने केली जात आहेत त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात शहराच्या भविष्याबद्दल फक्त गोंधळच निर्माण होईल. तज्ञ असे म्हणतात की त्यांना शहराचे तपशीलवार नकाशे किंवा नदीची पूररेखा किंवा डोंगराचा आकार यासारखे व इतरही बरेच मूलभूत तपशील देण्यात आले नाहीत! तसेच बहुतेक सूचना वैयक्तिक भूखंडांवरील आरक्षण रद्द करण्याविषयी किंवा प्रस्तावित रस्ते रुंदीकरण रद्द करण्याविषयी होत्या, तसेच काही तज्ञांनी तर असाही दावा केला आहे की त्यांच्या अहवालातील पानेच बदलण्यात आली आहेत! हा गंभीर आरोप आहे व प्रशासनातील किंवा महापालिकेतील कुणीही तो ठामपणे फेटाळलेला नाही! समितीला पुरेशी माहिती देण्यात आली नव्हती तर मग तिच्या सदस्यांनी हरकतींच्या सुनावणीचे काम सुरु का ठेवले? महापालिका किंवा संबंधित अधिका-यांनी समितीच्या सदस्यांना एकत्र बसून, विचारविनिमय करुन एकच अहवाल तयार करण्याची सूचना देण्याऐवजी दोन अहवाल का स्वीकारले? त्यांच्यातील मदतभेद अतिशय गंभीर आहेत. एका समितीचे म्हणणे आहे की संपूर्ण शहरात तिप्पट एफएसआय द्या तर बाकिच्यांचे म्हणणे आहे की केवळ मेट्रोच्या मार्गाच्या बाजूनेचे तेवढा एफएसआय द्या! एफएसआयसारख्या मूलभूत मुद्यावर एवढे मतभेद असतील तर मग देवच शहराचे रक्षण करो व काही तज्ञांनी याच शब्दात सांगितले आहे की या डीपीची अंमलबजावणी झाली तर शहराचं वाटोळं होईल 

कारण आपण एफएसआयसारख्या मूलभूत गोष्टीवर निर्णय घेऊ शकत नसू तर जमीनीचा वापर, नदीची मरणप्राय अवस्था, नामशेष होत चाललेली जैवविविधता व दिवसाच्या कोणत्याही वेळी होणारी वाहतुकीची कोंडी व सतत वाढती रहदारी, या सर्व नागरी समस्या दुर्लक्षितच राहतील! अलिकडेच आणखी एक बातमी आली होती जी दुर्लक्षितच राहीली की या वर्षी मेट्रोसाठी करण्यात आलेली तरतूद कोणत्यातरी उड्डाणपुलाच्या कामासाठी वापरण्यात आली; ही बातमी खरी असेल तर मग अर्थसंकल्प किंवा डीपी कशाला तयार करायचा? कारण आपण ज्याचे नियोजन करत असू त्याचे पालन करणार नसू व आपण अर्थसंकल्पातील तरतूद नियोजित कारणाऐवजी इतर गोष्टींसाठीच वापरणार असू, तर हे शहराच्या संपूर्ण नियोजनाची खिल्ली उडविण्यासारखेच आहे! सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सध्या डीपी संपला आहे व नवीन डीपी अजून निश्चित झालेला नाही व तो कधी निश्चित केला जाईल हे कुणालाही माहिती नाही, म्हणूनच सध्या कोणताही डीपी नाही तरीही विकासाची कामे सुरुच आहेत! यामुळे शहराचे जे नुकसान होत आहे त्याला कोण जबाबदार आहे? आपले शासनकर्ते म्हणजेच आपण निवडलेले लोकप्रतिनिधी जेव्हा प्रशासनाने अमूक दिले नाही किंवा प्रतिसाद दिला नाही किंवा प्रशासन अकार्यक्षम आहे अशी तक्रार करतात, व माध्यमेही ब-याचदा जेव्हा त्यांचीच री ओढळतात तेव्हा मला खरोखरच आश्चर्य वाटते. हे लोकप्रतिनिधी अशा तथाकथित प्रशासकांची किंवा पदाधिका-यांची नावे का जाहीर करत नाहीत? म्हणजे दोषी व्यक्ती सापडेल व तिच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. तथाकथित तज्ञांची मते जर एवढी नकारात्मक असतील तर हा डीपी रद्द करुन एक नवीन तयार करा किंवा आणखी एक समिती नियुक्त करा व सर्व सुनावण्या पुन्हा घ्या! कारण एकतर तज्ञांचे म्हणणे बरोबर आहे किंवा ते मूर्ख आहेत, दोन्ही परिस्थितीत त्यांचा निष्कर्ष स्वीकारता येणार नाही जे सध्या होत आहे! खरं तर माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी हे सगळे रँबो सर्कसमधील विदुषकाच्या खेळाप्रमाणे आहे, ते एकमेकांना पोकळ बांबूने मारल्याचं नाटक करतात व मारण्याचा आवाज काढतात! दुर्दैवाने इथे कुणी जखमी झाल्याचेही नाटक करत नाही! खरं तर ज्या शहरातील नागरिक स्वतःच्या संरक्षणासाठीही हेल्मेट घालत नाहीत, वाहतुक पोलीस असल्याशिवाय रस्त्यावरील सिग्नलचे पालन करत नाहीत किंवा नदी स्वच्छ ठेवा असे लिहीलेल्या फलकाखालूनच नदीत कचरा टाकतात, ते सर्व अशा सर्कशीच्याच लायकीचे आहेत चांगल्या दिवसांच्या (अच्छे दिन) नाही!  

असे म्हणतात की आपण जे बी पेरतो त्याचीच फळे झाडाला येतात; आपण शहराच्या बाबतीत निष्काळजीपणाचे व निर्लज्ज स्वार्थी दुष्टिकोनाचे बीज पेरले आहे! त्यामुळे आपल्या शहराच्या या अवस्थेसाठी आपणच जबाबदार आहोत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपण काळा गॉगल  घालून बसलोय व आपल्याला असे वाटते की आपण स्वर्गाचे दार उघडले आहे मात्र प्रत्यक्षात ते नरकाचे दार आहे! जोपर्यंत आपण आपला गॉगल दूर करत नाही व योग्य रस्त्यावर चालत नाही, आपल्या लोकप्रनिधींना आपण ज्या कामासाठी निवडलं आहे ते काम करायला लावत नाही तोपर्यंत, आपण नरकाच्याच लायकीचे आहोत त्यामुळे आपण तेथेच जाऊ!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स
Thursday, 19 February 2015

बांधकाम क्षेत्रातील संधी शोधताना !

रिअल इस्टेट ही जगातली सर्वोत्तम गुंतवणूक आहे, मात्र जेव्हा मंदी असते, जी कधीतरी येतेच, तेव्हा स्वतःचे स्थान भक्कम ठेवा.”…. स्टीव्हन आयव्ही, वकील.

या न्यूयॉर्क स्थित वकिलाने किती नेमक्या शब्दात रिअल इस्टेट उद्योगाचे वर्णन केले आहे, अर्थात त्याला उद्योग म्हणायचे का असा प्रश्न पडतो!
माझ्यासाठी नवीन वर्षातील चर्चा सत्रे व व्याख्यांनाचे सत्र जानेवारीतही सुरु होते, त्यातल्याच विषयावर हा लेखप्रपंच! मी स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या फेररचनेच्या कामात सहभागी होतो व त्यामध्ये रिअल इस्टेटमधील संधी विद्यार्थ्यांना समजाव्यात म्हणजे विद्यार्थ्यांना या उद्योगाचा आवाका समजेल असे सुचवले होते. त्यामुळे या विषयाचा स्थापत्य अभियांत्रिकी पदविकेच्या अंतिम वर्षात समावेश करण्यात आला व शासकीय तंत्रनिकेतनाने रिअल इस्टेटविषयी माझे विचार मांडण्यासाठी मला आमंत्रित केले होते. मला असे वाटले होते की एखाद्या लहानशा गटासमोरच बोलायचे आहे, त्यामुळे मी फारशी तयारी न करताच गेलो होतो. मात्र सर विश्वेशरैय्या समागृहात पोहोचताच जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात माझं स्वागत केल्यावर मला जरा टेन्शनच आलं ! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर कोणत्याही तयारीशिवाय न बोलणं मी टाळतोच कारण त्यांचं लक्ष सलग पंधरा मिनिटही वेधून घेणं हे मोठं काम असतं, इथे तर मला रिअल इस्टेट उद्योगाविषयी तासभर बोलायचं होतं! मला अनेकदा वन्यजीवन निरीक्षक, पर्यावरणवादी किंवा बांधकाम व्यवस्थापनातील तज्ञ म्हणून अनेक मंचांवर व्याख्यान देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं, मात्र आज पहिल्यांदाच रिअल इस्टेटमधील व्यक्ती किंवा सामान्य माणसाच्या शब्दात मांडायचं झालं तर बांधकाम व्यावसायिक म्हणून बोलवण्यात आलं होतं! मात्र आता परतीचा मार्ग नव्हता मी कॉलेजच्या चमूला नकार देण्यापूर्वीच माझी ओळख देण्यास सुरुवात झाली होती व विद्यार्थी मोठ्या कुतुहलाने माझ्याकडे बघत होते कारण त्यांच्यापैकी बहुतेक पहिल्यांदाच कोणा बांधकाम व्यावसायिकाला प्रत्यक्ष पाहात होते!

मी त्यांच्या डोळ्यातील या कुतुहलाचाच धागा पकडून बोलायला सुरुवात केली, कारण जेव्हा सामान्य माणूस रिअल इस्टेटविषयी व बांधकाम व्यावसायिकांविषयी विचार करतो तेव्हा त्याच्या मनात विचार येतो तो पैशांचा! हाच या उद्योगातील सर्वात मोठा उपहास आहे कारण कुणीही अंतिम उत्पादनाकडे पाहात नाही तर सगळ्यांना त्यातल्या झगमगाटाचं अधिक आकर्षण असतं जो अर्थातच पैशामुळे येतोप्रत्यक्ष व्यवसायात असलेल्या प्रौढ व्यक्तिंनाही रिअल इस्टेट उद्योग कशाप्रकारे चालतो हे समजावून सांगणं कठीण असतं त्यामुळे नुकतीच एक पदविका घेऊन हा व्यवसाय मार्ग म्हणून स्वीकारण्याची इच्छा असलेल्या तरुणांना ते समजावून सांगणं कर्मकठीणच म्हणावं लागेल. मी त्यांना काय सांगणं अपेक्षित होतं? एक बांधकाम व्यावसायिक होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पदविची किंवा अगदी शिक्षणाचीही गरज नाही! किंबहुना या उद्योगात मी असे अनेक महाभाग पाहिले आहेत जे विनोदाने म्हणतात की तुम्ही जितके अधिक शिकलेले असाल तितकी रिअल इस्टेट उद्योगामध्ये अपयशी होण्याची शक्यता अधिक असते! कारण शिक्षणामुळे तुम्ही विचार करु लागता व रिअल इस्टेटमध्ये तुम्ही जेवढे अधिक विचार करता तेवढी तुम्हाला त्यातील अनिश्चिततेची जाणीव होते व त्यानंतर तुम्ही निर्णय लांबणीवर टाकता व उशीर हा रिअल इस्टेट उद्योगाचा सर्वात मोठा शत्रू आहे! त्याचवेळी मी विकासकाच्या जबाबदा-या काय आहेत असा विचार करतो, तेव्हा कोणत्याही नाहीत असे उत्तर मिळते! फक्त तुमच्याकडे थोडाफार पैसा असला पाहिजे, तुम्ही या क्षेत्रातील उपलब्ध गुणी कर्मचा-यांना नियुक्त करता व कुणाना कुणाच्या खांद्यावर सर्व जबाबदारी देऊन इमारत पूर्ण करता; मग तो तुम्ही बांधकामाच्या ठिकाणी नियुक्त केलेला वास्तुविद्याविशारद असेल किंवा रचनात्मक सल्लागार किंवा अभियंता!

किंवा त्या विद्यार्थ्यांना मी असे सांगणे अपेक्षित आहे की पीएमसीपासून ते नागरी विकास विभागापर्यंत अनेक प्रशासकीय संस्थांचे नियम सतत बदलत असतात त्यामुळे इथे काहीही शाश्वत नसते! तुम्ही शक्य तेवढी सगळी कागदपत्रे तपासून खरेदी केलेल्या जमीनीच्या मालकी हक्काविषयी वाद असू शकतात कारण, जमीन मालकाच्या एखाद्या वारसाने इतर कोणत्या तरी बांधकाम व्यावसायिकाशी नोंदणी न केलेला करार केला असतो व तुम्ही जमीन मालकाला संपूर्ण पैसे दिल्यानंतर हे तुमच्या लक्षात येते! यात सर्वात वाईट गोष्ट म्हणजे असा नोंदणी न केलेल्या कराराचा दावा कायद्याद्वारे स्वीकारण्यात येतो व तुम्ही केलेला व्यवहार पाण्यात जातो, हे मी त्यांना सांगावे का? तुम्ही स्पष्ट मालकी हक्क असलेली जमीन खरेदी केल्यानंतरही तुमच्या जमीनीलगत असलेला रस्ता तुमच्या भूखंडात येऊ शकतो किंवा तुमच्या भूखंडापासून काही अंतरावरुनच मेट्रोचा मार्ग जाणार असतो, किंवा तुमचा भूखंड ज्या परिसरात येतो तेथील एफएसआयचे निकष निश्चित करण्यात आलेले नसल्याने तुमचा आराखडा मंजूर होत नाही! उद्याची स्वप्ने पाहणा-या या तरुणांना मी अशा गोष्टी सांगू का? किंवा तुम्ही तुम्हाला माहिती असलेल्या सर्व नियमांचे पालन करुन एखाद्या इमारतीचे नियोजन केल्यानंतर स्थानिक प्रशासकीय संस्थेने तयार केलेल्या नवीन नियमांच्या छपाईत चूक होते व आता ही चूक कधी दुरुस्त होईल हे संस्थेला माहिती नसते व तोपर्यंत तुम्हाला योजना मंजूर करुन घ्यायची असेल तर कमी एफएसआय मिळेल, यामुळे संपूर्ण प्रकल्पाचे आर्थिक नियोजनच कोलमडते, या उद्योगात अशा गोष्टीही होतात हे मी या उत्सुक श्रोत्यांना सांगणार आहे का? सर्व कायदेशीर पेच, सरकारी निकषांतून पार पडण्याइतपत तुम्ही सुदैवी असाल व स्तंभ आलेख, सीपीएम व पीईआरटी सारख्या तंत्रांनी सर्व तांत्रिक निकषांचे पालन करुन तुम्ही प्रकल्प सुरु करु शकला; तर एखादी दगड व खडी उत्पादक संघटना संपावर जाते कारण आरटीओने वाळू व खडीसारखे साहित्य वाहून नेण्याच्या नियमांमध्ये बदल केलेला असतो व या साहित्याचे दर दुप्पट करावे लागतात, त्यामुळे एकतर त्यांना वाढीव दराने पैसे द्या नाहीतर त्या संपावर जातील, त्यामुळे तुमच्या ईमारतीच्या बांधकामातील प्रत्येक संबंधित काम खोळंबतेकोणताही सरकारी विभाग या संपात किंवा दर वाढीच्या मागणीत हस्तक्षेप करत नाही! त्यानंतर तुम्हाला कुठूनतरी बातमी समजते की स्थानिक प्रशासनानं वाळू उपशाचा लिलाव केला नसल्यामुळे बाजारात वाळू नाही व तुमच्या कंत्राटदारांचे मजूर काही काम नसल्यामुळे बसून आहेत! या सर्व अडचणींवर मात करत तुम्ही तुमचा प्रकल्प सुरु ठेवता तेव्हा तुम्हा माध्यमांच्या टीकेला तोंड द्यावे लागते की तुम्ही फक्त  पैसे कमावताय व घर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाण्यास केवळ तुम्हीच कारणीभूत आहात!

एक बांधकाम व्यावसायिक म्हणून मी अनुभवलेले असे किती तरी प्रसंग माझ्या डोळ्यासमोर तरळले व मी एक अभियंताही आहे! मात्र मी स्वतःला बजावले की मी इथे बांधकाम व्यावसायिक म्हणून माझा बडेजाव करण्यासाठी आलेलो नाही तर या तरुणांनी रिअल इस्टेटचा एक भाग बनावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यास आलो आहे! रिअल इस्टेट विकासक होण्यासाठी तुम्ही प्रशिक्षित अभियंतेच असायलाच हवे असे नसले तरीही परिस्थिती झपाट्याने बदलतेय व हे आधीच्या पिढीतल्या विकासकांच्या बाबतीत लागू होते. आता नव्या पिढीतील रिअल इस्टेटमध्ये येणा-या व्यक्ती प्रशिक्षित आहेत व तेही रिअल इस्टेटशी संबंधित स्थापत्य अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रातील. याचे कारण म्हणजे ग्राहक बदलतोय, आता ग्राहक म्हणजे केवळ निवृत्त जोडपी नाही तर बरेच परिपक्व तरुण रक्त आहे जो रिअल इस्टेटच्या ग्राहकांचा चेहरा आहे, ते स्वतः तंत्रज्ञ आहेत किंवा सुशिक्षत आहेत. कोणतीही सुशिक्षित व्यक्ती घरासारख्या, आयुष्यात बहुधा एकदाच घेतल्या जाणा-या उत्पादनाच्या बाबतीत बाबतीत अशिक्षित बांधकाम व्यावसायिक निवडणार नाही! म्हणूनच सर्व अभियंत्यांसाठी ही चांगली बातमी आहे, असे मी या विद्यार्थ्यांना सांगितले. त्याचवेळी एखादी अशिक्षित व्यक्ती बांधकाम करत असेल तर एक स्थापत्य अभियंता म्हणून त्याच्यापेक्षा अधिक चांगले बांधकाम करणे व तुमच्याकडे अधिक चांगले ज्ञान असल्यामुळे तुम्ही अधिक चांगले बांधू शकता हे समाजाला दाखवण्याची जबाबदारीही तुमची आहे. म्हणूनच रिअल इस्टेटमध्ये अभियंता असल्यामुळे तुम्हाला अभियंता नसलेल्या किंवा अशिक्षित स्पर्धकांपेक्षा निश्चितच अधिक वाव आहे! अर्थात हे शक्य करणे हे मोठे आव्हान आहे, मात्र आव्हानाशिवाय कामात काय मजा! शिक्षण हे शस्त्र आहे व त्याचा वापर कसा करायचा हे आपल्यावर आहे; त्याला तुमच्या क्षमतांवर मर्यादा घालणारा फास होऊ देऊ नका तर तुमचे काम अधिक चांगल्या प्रकारे करण्याचे नवीन मार्ग शोधा

गेल्या काही वर्षात ब-याच गोष्टी बदलल्या आहे व ग्राहकांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असते व ते त्याचे कौतुकही करतात. आपल्या ज्ञानामुळे आपण जुन्याच गोष्टी नवीन पद्धतीने करण्याचे मार्ग शोधू शकतो, ज्यामुळे शेवटी ग्राहकांचाच लाभ होईल. यातील सर्वात चांगली बाब म्हणजे रिअल इस्टेटचा आजच्या ग्राहक हे जाणतो.
त्याचवेळी रिअल इस्टेटमध्ये येणे म्हणजे केवळ बांधकाम व्यावसायिक होणे असा अर्थ होत नाही, या उद्योगामध्ये इतरही भूमिका आहेत. या उद्योगाला चांगल्या कंत्राटदारांची गरज आहे, बांधकाम व्यवस्थापन सल्लागर, वास्तु रचनाकार हवे असतात, नळजोडणी व वॉटरप्रूफिंग करण्या-यांची सेवा व इतरही ब-याच गोष्टी आवश्यक असतात. या उद्योगामध्ये जितके अधिक सुशिक्षित लोक येतील तेवढे उद्योगात अधिक सुधारणा होईल. सध्या तिचे स्वरुप अतिशय अव्यावसायिक आहे हे मान्य आहे मात्र तो रिअल इस्टेटचा नाही तर त्यातील लोकांचा दोष आहे. कारण कोणताही व्यवसाय किंवा उद्योगाचा लौकिक त्यात मिळणा-या पैशांवरुन नाही तर त्याच्याशी संबंधित लोकांच्या दर्जावरुन ठरत असतो! रिअल इस्टेटची धोरणे व अव्यावसायिक चेहरा हा त्यातील लोकांमुळे आहे व ज्यांचे अंतिम उद्दिष्ट केवळ पैसा होता, चांगले घर नाही! रिअल इस्टेटसाठी आपल्या देशाची शंभर कोटींहून अधिक लोकसंख्या एक प्रकारे वरदानच आहे; कारण याचाच अर्थ असा होतो की अनेक घरांची आवश्यकता आहे. घर ही माणसाची मूलभूत गरज आहे व अन्न व निवारा या गरजांच्या बाबतीच आपण स्वयंपूर्ण झालो आहोत मात्र घरांची मागणी अधिक व पुरवठा कमी अशीच परिस्थिती आहे. सध्याच्या केंद्र सरकारने घरबांधणीविषयी अतिशय गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली आहे व माननीय पंतप्रधानांनी येत्या तीन वर्षात जवळपास दोन कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यास सांगितले आहे व त्यामुळे या क्षेत्रात किती मोठ्या प्रमाणावर पैसा तसेच संधी असतील याचा विचार करा! यामुळे रिअल इस्टेट हा व्यवसाय मार्ग म्हणून निवडण्यासाठी सर्वोत्तम उद्योग आहे व स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका घेतल्यानंतर तुम्हाला इतर कोणत्याही बिगर तांत्रिक व्यक्तिपेक्षा इथे टिकण्याची जास्त संधी आहे.

आणखी एक मुद्दा आहे रिअल इस्टेटमधील सृजनशीलता, एखाद्या बिगर तांत्रिक व्यक्तिला मोकळ्या जागेवर बांधकामाचा विचार करुन त्यावर ते प्रत्यक्ष साकार करण्यात काय मजा आहे हे कदाचित कधीच कळणार नाही! सध्या या उद्योगामध्ये जुन्यापुराण्या संकल्पना बदलण्यासाठी नव्या कल्पनांची कमतरता आहे, यामध्ये रचनेपासून ते बांधकाम तंत्रांपर्यंत ते उत्पादनाच्या विपणनापर्यंत सर्व बाबींचा समावेश होतोनिसर्गाला पूरक इमारती व परवडण्यासारखी घरे या सारख्या क्षेत्रांमधल्या शक्यता अजूनही पडतळाण्यात आलेल्या नाहीत; व यामध्ये संशोधन व विकास हा सर्वात कमजोर दुवा आहे! तुमच्याकडे असलेल्या तांत्रिक ज्ञानाने तुम्ही उद्योगाला जाणवत असलेली ही कमतरता भरुन काढू शकता. ऑटोमोबाईल किंवा इतर कोणत्याही उद्योगाकडे पाहा ग्राहकांना त्यांच्या गरजा व खरेदीची क्षमता यानुसार हजारो पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत व त्याचवेळी रिअल इस्टेटकडे पाहा व आपण ग्राहकांना कोणते पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत हे पाहा; आपण यातही बरेच मागे आहोत! मला शिक्षणाच्या प्रत्येक शाखेविषयी अतिशय आदर आहे मात्र तरीही रिअल इस्टेटचा प्रामुख्याने संबंध स्थापत्य अभियांत्रिकीशी संबंध येतो व स्वाभाविकपणे यातील  प्रशिक्षित व्यक्तिला अधिक महत्व मिळेल हे सत्य आहे. तसेच ज्याला शिक्षण मिळू शकत नाही तो या व्यवसायासाठी अपात्र आहे असा अर्थ होत नाही, त्याला शिक्षण उपलब्ध झाले नाही त्यामुळे तो शिकला नाही; कुणी स्वेच्छेने अशिक्षित राहात नाही हेच खरे! त्यामुळे ज्यांना शिक्षण मिळू शकले नाही त्यांच्यापेक्षा तुम्ही स्वतःला सुदैवी समजा व आता तुमचे उत्पादन अधिक चांगल्या प्रकारे देण्याची जबाबदारीही तुमच्यावर आहे हे लक्षात ठेवा; मग तुम्ही बांधकाम व्यावसायिक नसलात तरी बांधकाम रचनाकार असाल किंवा कंत्राटदार असाल!

आपल्या देशात घर हे सर्वात महाग उत्पादन आहे व बहुतेक ग्राहक आयुष्यात एकदाच ते खरेदी करतात. तुम्ही ग्राहकांना तुमचे उत्पादन विकून रिअल इस्टेटमध्ये यशस्वी व्यक्ती बनता तेव्हा तुमची सामाजिक जबाबदारी विसरु नका ती म्हणजे समाजाप्रती तुमची जबाबदारी ज्याने तुम्हाला एक पात्र अभियंता बनविले आहेमाझ्यासाठी रिअल इस्टेट क्षेत्रातील यशस्वी व्यावसायिक होणे म्हणजे तुमच्या बँक खात्यात किती पैसे आहेत किंवा तुमच्या कारचा ताफा किती मोठा आहे असा अर्थ होत नाही तर तुम्ही उद्योगाला व समाजाला काय परत दिले आहे असा होतो! यश तुम्ही किती चौरस फूट बांधकाम केले आहे किंवा तुम्ही किती सदनिका बांधल्या आहेत यातून दिसत नाही तर तुम्ही किती कुटुंबांना त्यांच्या स्वप्नातले स्वतःचे घर देऊन आनंद दिला आहे यातच खरे यश आहे! यशाच्या या व्याख्येमुळेच तुमच्या शिक्षकांची तसेच तुमची मान अभिमानाने उंचावेल नाहीतर रिअल इस्टेटमध्ये पुरेसे बांधकाम व्यावसायिक आहेत जे पैशांनी यशस्वी आहेत. सर्वात शेवटची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे तुम्ही आधी अभियंते आहात व नंतर बांधकाम व्यावसायिक, याच्या उलट होऊ देऊ नका, हीच रिअल इस्टेट उद्योगाची तुमच्याकडून अपेक्षा आहे!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स


Thursday, 12 February 2015

जैवविविधता ; जबाबदारी माझी, तुमची, प्रत्येकाची !
मित्रांनो, पुण्यातल्या जैवविविधतेविषयी थोडंसं, याबाबतची परिस्थिती सगळीकडे सारखीच असली, तरी कृपया वाचा व इतरांनाही सांगा...

काही दिवसांनी आपल्याकडे कोक विरुद्ध पेप्सी एवढीच जैवविविधता उरेल. आपण एकाच वेळी संपूर्ण जगाची भूरचना एखाद्या बिनडोक चुकीप्रमाणे करत आहोत.”... चक पालनिक 

चार्ल्स मायकल चक हा अमेरिकी कादंबरीकार व मुक्त पत्रकार आहे, तो त्याचे लेखन रुढी, परंपरा, कायदे, नियम इत्यादींचे उल्लंघन करणारे असल्याचे सांगतो. तो फाईट क्लब या पुरस्कारप्राप्त कादंबरीचा लेखक आहे, ज्यावर एक चित्रपटही तयार झाला. मात्र त्याचे वरील विधान काल्पनिक नाही, आपण दररोज वाचतो की एखादा प्राणी, पक्षी किंवा झाडाची प्रजाती नामशेष होत चालली आहे, त्यामुळे आज ना उद्या त्याचे शब्द खरे ठरणार आहेत! जैवविविधता हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे व पुणेही त्याला अपवाद नाही! यातली सकारात्मक बाब म्हणजे या शहरात ब-याच जणांना त्याची जाणीव आहे व जैवविविधता संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणा-या अनेक स्वयंसेवी संस्था आपल्याकडे आहेत; मात्र यातली खेदाची बाब म्हणजे या प्रयत्नांना सरकार, सामान्य माणूस व माध्यमांची साथ मिळत नाही! सर्वजण सोयीस्करपणे बांधकाम व्यावसायिक नावाच्या प्राण्याच्या माथ्यावर खापर फोडतात जो सामान्य माणसांसाठी घरे बांधण्याचे काम करतो!

मी नमूद केल्याप्रमाणे आपल्या शहरात अनेक स्वयंसेवी संस्था प्रामाणिकपणे काम करत आहेत व लोकांना शहरातील व आजूबाजूच्या जैवविविधतेच्या महत्वाविषयी जागरुक करत आहेत. आपल्यापैकी ब-याच जणांना जैवविविधता म्हणजे काय हे माहिती असेल मात्र आपल्या शहरी जीवनामध्ये त्याचे काय महत्व आहे याची जाणीव नसेल. ब-याचजणांना त्याविषयी काहीच माहिती नसेल केवळ वृत्तपत्रातून किंवा त्यांच्या मुलांचा अभ्यास घेताना हा शब्द गेला असेल, सुदैवाने पर्यावरणशास्त्र हा विषय शाळेमध्येच सक्तिचा करण्यात आला आहे! किंवा हा शब्द अजिबात न ऐकलेल्या सुदैवी व्यक्तिंसाठी म्हणून सांगतो, जैवविविधता हा शब्द एखाद्या विशिष्ट ठिकाणी आपल्याला मिळणा-या विविध प्रजातींचे समृद्ध वैविध्य स्पष्ट करतो किंवा दर्शवतो. उदाहरणार्थ आपण जेव्हा पुण्याच्या जैववैविध्याविषयी बोलत असतो तेव्हा आपण पुणे व आजूबाजूच्या परिसरातील पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या, कीटकांच्या, माशांच्या व झाडांच्या प्रकारांविषयी व संख्येविषयी सांगत असतो. इथे प्राणी म्हणजे खारीपासून ते कुत्र्यांपर्यंत व झाडांमध्ये वडापासून ते अगदी काँग्रेस गवतापर्यंत, पक्षांमध्ये स्थानिक कबुतरांपासून नेहमीच्या चिमण्यांपर्यंत व मासे म्हणजे नदीमध्ये रहाणा-या सजीवांपैकी जे काही मिळते ते सर्व; अर्थात इथे आपल्या  नदीला नदी म्हणायचं का असा प्रश्न पडतो पण तो मुद्दा नंतर! मित्रांनो हा खरोखरच काळजीचा विषय आहे व अलिकडेच मला बायोस्फिअर नावाच्या प्रसिद्ध स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या एका परिसंवादात सहभागी होण्याची संधी मिळाली, या परिसंवादाचा विषय होतापुणे जैव विविधता, दशा आणि दिशा. पुण्याचं खरोखर भाग्य आहे की पुण्यामध्ये काही व्यक्ती झपाटल्याप्रमाणे नद्या, वृक्ष, डोंगर इत्यादींचे संवर्धन करत आहेत, अशी माणसे हीच पुण्याचा सांस्कृतिक कणा आहेत. याच ख-या अर्थाने आपल्या संस्कृतीमधील सेलिब्रिटी व्यक्ती आहेत, सचिन पुणेकर, हेमा साने मॅडम, निनाद घाटे सर, राजगुरु सर व महाजन सर ही यापैकीच काही नावे आहेत; या सर्वांनी जैवविविधतेच्या विविध पैलुंचा अभ्यास केला आहे व पुण्याच्या पर्यावरणाचा ते चालता बोलता विश्वकोश आहेत! परिसंवादात सहभागी झालेले पाहुणे पुण्याच्या जैवविविधता क्षेत्रात काम करणारे दिग्गज होते व मी एकटा वगळून सगळे वयाने सत्तरीच्या पुढचे होते! या विषयातील त्यांचा अधिकार सांगायचा तर त्यापैकी एका वक्त्याने पुण्यातील नद्यांवर १९६० साली पीएचडी केली होती जेव्हा माझा जन्मही झाला नव्हता! हे सर्वजण पुण्यातल्या नद्या, डोंगर व आजूबाजूच्या परिसराचा गेली ६० वर्षे अभ्यास करत आहेत व हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. या तुलनेत माझा पुण्याशी संबंध बराच नंतरचा म्हणजे १९८६ सालापासूनचा आहे व मी नदी केवळ प्रदूषित स्वरुपातच पाहिली आहे! त्यामुळे मी सर्वप्रथम या सगळ्या दिग्गजांचं काय म्हणणं आहे हे ऐकण्याचा त्यानंतर या विषयावर स्वतःची बाजू मांडण्याचा निर्णय घेतला!

ज्या व्यक्ती इथे ७० वर्षांहूनही अधिक काळ राहात आहेत त्यांच्याकडून शहराच्या जैवविविधतेविषयी जाणून घेणं अतिशय रोचक होतं; शहराच्या गतकाळात गेल्यासारखं वाटत होतं! यातून काही रोचक तथ्ये मला समजली की, १९४० साली नदीचे पाणी गाळलेल्या पाण्याइतके स्वच्छ होते व लोक थेट नदीतील पाणी पीत असत, १९६० साली नदीतील सजीवांचा अभ्यास करण्यात आला तेव्हा नदीत माशांच्या जवळपास ७० प्रजाती होत्या. सध्या नदीमध्ये माशांच्या जेमतेम २ प्रजाती उरल्या आहेत, ज्यापैकी बहुतेक तिलापिया हे आफ्रिकी प्रकारचे मासे आहेत जे स्थानिक नाहीत व त्यांनी इतर सर्व माशांच्या प्रजातींना मारुन टाकले आहे. नदीच्या काठाने ऑर्किडची झाडी होती व जैवविविधता इतकी समृद्ध होती की शहरापासून ते विठ्ठलवाडी म्हणजे सिंहगड रोडपर्यंत जवळपास २०० विविध प्रकारची रोपे, वेली, झाडे होती; आता नदीकाठी सगळीकडे जलपर्णीची वाढ झालेली दिसते, क्वचितच कुठेतरी झाडेझुडुपे आढळतात, ऑर्किड तर कुठेच दिसत नाहीत! सर्वात वाईट बाब म्हणजे नदीवर कुणाचे नियंत्रण आहे हे कुणालाच माहिती नाही, तिची देखभाल करणे हे जलसिंचन विभागाचे काम आहे असे महापालिका म्हणते तर जलसिंचन विभाग ते महापालिकेचे काम असल्याचा दावा करतो! खवले मांजर (मुंगी भक्षक), मुंगूस, घोरपड, विविध प्रकारचे साप, मोर, ससे व हरिणे असे प्राणी किंवा पक्षी शहरात सगळीकडे भरपूर दिसत. माकडांच्या टोळ्या दिवसा शहराच्या मध्यवर्ती भागात फिरत असत व संध्याकाळी कात्रज किंवा सिंहगडसारख्या जंगली भागात परत जात असत. त्यांचे वास्तव्य असलेले शहरातील तसेच शहराबाहेरील भागांना जोडणा-या  रस्त्यांलगतचे मोठ्या झाडांचे लांबलचक पट्टे तोडून टाकण्यात आले, त्यामुळे त्यांच्या शहरातील खेपाही संपल्या ! पुण्यात व आजूबाजूच्या परिसरात जवळपास ४० प्रकारचे बेडूक होते आता तुम्हाला फारफार तर ३ किंवा ४ प्रकारचे पाहायला मिळतात ते देखील पावसाळ्यामध्ये कारण त्यांना प्रजननासाठी जागाच उरलेली नाही! नदीला नियमितपणे पूर येत असे व आजच्या मॉर्डन कॉलेजपर्यंत पाण्याची पातळी वाढत असे! रात्रीचे आकाश स्वच्छ असायचे व उघड्या डोळ्यांनी हजारो तारे पाहता यायचे व आता आपल्याला केवळ धुरकट व अंधूक चंद्र दिसतो! वरील वर्णन वाचले की आपण एखाद्या पुरातन शहराविषयी विस्मरणात गेलेल्या साम्राज्याप्रमाणे बोलतोय असं वाटेल; हे साम्राज्य आहे जैवविविधतेचं! वक्त्यांपैकी एक, वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या,त्या त्यांच्या विद्यार्थ्यांना नदीकाठी भटकंती करायला घेऊन जात व निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचा विषय शिकवत असत हे आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी आले, आता मात्र  या सर्व विविध प्रकारच्या वनस्पती नष्ट झाल्या आहेत! मी जेव्हा शहरातली जैवविविधता नष्ट झाल्याचे नमूद केले तेव्हा त्यावर सर्वजण सहमत झाले! हे अतिशय गंभीर नुकसान आहे व दुर्दैवाची बाब अशी की आजच्या पिढीला त्यांनी काय गमावले आहे हेच समजत नाही! किंबहुना बरेच जण प्रश्न विचारतात की त्यात काय मोठेसे, आपण प्रगती केलेली नाही का, काही वेली व फुलझाडांपेक्षा विकास अधिक महत्वाचा नाही का, आपल्या आजूबाजूला साप व माकडे दिसली नाही तर काय मोठासा फरक पडतो, आपल्यासमोर यापेक्षा अधिक चांगले विषय नाहीत का ज्याविषयी आपण वादविवाद करु शकू! ज्या व्यक्तिने निसर्ग अनुभवलेला नाही किंवा ती निसर्गासोबत राहिलेली नाही तिला जैवविविधतेचे महत्व पटवून देणे अतिशय अवघड आहे हे खरे आहे! कारण आजकालची गरज किंबहुना हाव वेगळी आहे, आपण केवळ आपल्या घरामध्ये कोणत्या सोयी सुविधा आहेत, आपल्या इमारतीची उंची व आपल्या कार्यालयातील वातावरणाचा विचार करतो. आपल्या कार व त्यासाठी पुरेसे इंधन हवे असते, अर्थात कार लावायला जागा व चालवायला रस्ते हवे असतात. आपल्याला आपल्या नळांना पाणी हवे असते, ते जोपर्यंत मिळतंय तोपर्यंत ते कुठून येतंय याची आपल्याला चिंता नसते! आपले रस्ते नदी काठांवर अतिक्रम करताहेत, तिथली हिरवाई नष्ट करताहेत, नदीत आपण फेकत असलेल्या कच-यामुळे शेकडो पक्षी व माशांचे वसतीस्थान नष्ट होत आहे याची आपल्याला काळजी नसते. आपण स्वतःला शहाणे व हुशार म्हणतो व त्याचवेळी पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक संसाधनांवर केवळ आपलाच हक्क आहे असे आपल्याला वाटते! आपण आपल्या हव्यासापोटी इतके आंधळे झालो आहोत की विकास म्हणजे इतर प्रजाती नष्ट करणे नाही हे आपण विसरलो आहोत! जेव्हा आपण केलेल्या नुकसानाची जबाबदारी घ्यायची वेळ येते तेव्हा आपण एकमेकांकडे बोटे दाखवतो! अर्थात या परिसंवाद काही चांगली तथ्येही सांगण्यात आली, की पुणे व आसपासच्या परिसरात मोठ्या झाडांच्या सर्वाधिक म्हणजे जवळपास ५०० प्रजाती आढळतात त्यामुळे या जैवविविधतेच्या बाबतीत पुणे देशातील बहुतेक सर्वात समृद्ध शहर आहे! १९४० साली शहरात केवळ १४ उद्याने होती ही संख्या आता ११४ वर गेली आहे! मात्र हे पुरेसे नाही, जोपर्यंत आपण काही ठोस सकारात्मक पावले उचलत नाही तोपर्यंत जैवविविधतेच्या बाबतीत भविष्यात काळोखच आहे हे कटू सत्य आहे व त्यासाठी कुणीतरी पुढे येऊन जैवविविधतेची संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे! तो कुणीतरी एखादा सरकारी विभाग किंवा स्वयंसेवी संस्था नाही तर आपल्या सर्वांमध्येच आहे!

हे शहर आधी काय होते व आता काय झाले आहे हे ऐकल्यानंतर, क्षणभर मी निःशब्द झालो; अर्थात मी देखील या शहरात आलो तेव्हा थोडीफार जैवविविधता पाहिली आहे, जवळपास तीस वर्षांपूर्वी ते राहण्यासाठी नक्कीच अधिक चांगले होते. मात्र आपल्या या शहराला लोकसंख्या, प्रदूषण व नियोजनातील अपयश हे शाप मिळालेले आहेत, त्यामुळे शहरातील जैवविविधता पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जेव्हा सर्वांच्या नजरा माझ्याकडे वळाल्या, तेव्हा मी फक्त एवढेच म्हणू शकलो, कीहोय, जैवविविधतेच्या पातळीवर शहराचे जे काही नुकसान झाले आहे त्यासाठी मी सुद्धा जबाबदार आहे व एक बांधकाम व्यावसायिक म्हणून ती पूर्ववत व्हावी म्हणून मी माझी भूमिका पार पाडली पाहिजे!” आपले निसर्गावर कितीही प्रेम असले, आपण पर्यावरणाचा कितीही आदर करत असलो तरीही आपण झाडावर किंवा उघड्यावर राहू शकत नाही. मात्र आपण आजूबाजूच्या जैवविविधतेचे किती नुकसान केले आहे व आपण त्याची भरपाई कशी करु शकतो हे विचारात घेऊन आपल्या इमारती बांधू शकतो. निसर्गामध्ये संगणकासारखी परत मागे अशी काही आज्ञा नसते, आपण जे काही नष्ट केले ते हजारो इथे होते, आपण मात्र काही वर्षातच ते नष्ट केले! आपण ज्या भल्या मोठ्या नाल्याला नदी म्हणतो तिचा प्रवाह सामान्य होण्यासाठी व लोकांनी थेट तिचे पाणी पिण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतील त्यानंतर नदीत व तिच्या काठाने जीवन निर्माण होईल; मात्र आपण किमान ही प्रक्रिया आज व माझ्यापासून सुरु करु शकतो! मी माझ्या इमारती बांधताना जास्तीत जास्त झाडे लावू शकतो व ती जगवू शकतो. आणखी एक महत्वाची बाब म्हणजो लोकांना जैवविविधतेचे रक्षण करण्यात त्यांच्या वैयक्तिक जबाबदारीची जाणीव करुन देणे, एक बांधकाम व्यावसायिक म्हणून मी नक्कीच माझ्या ग्राहकांना ती करुन देऊ शकतो. मी ब-याचदा जेव्हा माझ्या घराजवळ नदीवरील पुलावरुन चालत जातो तेव्हा तिथे नदीत कचरा विशेषतः घरातील निर्माल्य टाकू नये असे लोकांना आवाहन करणारा फलक दिसतो. मात्र दररोज कुणीतरी त्या फलकाखाली उभा राहून नदीत कचरा फेकताना मी पाहतो. हे कचरा  टाकणारे काही बांधकाम व्यावसायिक नाहीत, ते तुमच्या-आमच्यासारखेच सामान्य नागरिक आहेत व साध्याशा कृतीने अनेक प्रजातींचे घर असलेल्या जलाशयाचे नुकसान करत आहेत. मात्र त्यांना त्यांच्या लहानशा कृतीचा परिणाम जाणवत नाही व त्यांना हे कुणी सांगायला जात नाही! मला असे वाटते एक बांधकाम व्यावसायिक म्हणून मी केवळ माझ्या इमारतींचाच नाही तर निसर्गाचे संवर्धन करण्याचाही प्रसार केला पाहिजे व हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे माझी स्वतःची कृती!
हे शक्य व्हावे यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी अधिकाधिक लोकाभिमुख व्हायला पाहिजे व कोणत्याही प्रकल्पाचे नियोजन करतानाच साने मॅडम किंवा महाजन सरांसारख्या व्यक्तिचा सल्ला घेतला पाहिजे. पर्यायवरणवाद्यांनीही बांधकाम व्यावसायिकांविषयीचा त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे कारण शेवटी बांधकाम व्यावसायिकच घरे बांधणार आहेत, त्यामुळेच त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा बदल शक्य होणार नाही! बांधकाम व्यावसायिक व पर्यावरणवादी एकत्र येऊ शकतील अशा एखाद्या सामाईक मंचाशी नितांत गरज आहे कारण त्यातच जैवविविधतेचे भविष्य आहे. यामध्ये माध्यामांनीही आपली भूमिका पार पाडली पाहिजे अशा प्रयत्नांना किंवा परिसंवादांना पहिल्या पानावर कधीच प्रसिद्धी मिळत नाही, असे असेल तर मग सामान्य माणूस या समस्यांविषयी कसा जागरुक होईल? प्रत्येक वृत्तपत्रामध्ये क्रीडा किंवा अर्थविषयक पानांसारखे हरित पान का नसावे, ज्यामध्ये विविध व्यक्तिंनी हिरवाईसाठी केलेल्या प्रयत्नांविषयी माहिती देता येईल, प्रसिद्धी देता येईल! जैवविविधतेचे जे काही नुकसान झाले आहे त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येक जण कुठेतरी जबाबदार आहे, मग ते प्रत्यक्षपणे असेल किंवा अप्रत्यक्षपणे. बरेच जण म्हणतील मी कसा काय जबाबदार आहे कारण मी कधीच नदीत कचरा फेकत नाही, मी कधीही झाड तोडलेले नाही किंवा एखादी चिमणी मारलेली नाही! मात्र काहीही न करुन आपली जबाबदारी संपते का, मी जैवविविधचे नुकसान होऊ नये म्हणून काय केलेले नाही याच्या बढाया मारण्यापेक्षा तिचे रक्षण करण्यासाठी मी काय केले आहे हे स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे! स्वतःला प्रश्न विचारा की मी किमान एक तरी झाड लावून ते जगवण्याचा प्रयत्न केला आहे का. तुमच्या बांधकाम व्यावसायिकाला विचारा तो त्याच्या इमारती बांधताना जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी काय करतो. तुमच्या लोकप्रतिनिधींना विचारा नाल्याचे काँक्रिटीकरण करण्याऐवजी त्याच्या बाजूने झाडे व रोपे का लावण्यात आली नाहीत. महापालिकेच्या क्षेत्र अभियंत्यांना विचारा रस्त्यांच्या दुतर्फा अजिबात माती मोकळी न सोडता संपूर्ण फरसबंदी का करण्यात आली आहे, ही माती पावसाचे पाणी शोषण्यासाठी तसेच चिमण्यांना धुलीस्नान करण्यासाठी वापरता आली असती. तुम्हाला आजूबाजूच्या निसर्गाविषयी काय वाटते याविषयी फेसबुकसह सर्व माध्यमांवर लिहा व त्याविषयी आपल्या काय जबाबदा-या आहेत याची जाणीव प्रत्येक व्यक्तिला करुन द्या. निसर्गाच्या संवर्धानासाठी ज्या गोष्टी करायला हव्या होते असे तुम्हाला वाटते, मात्र ते करण्यात आलेले नाही त्याविषयी किमान आवाज उठवायला सुरुवात करा!

मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या जैवविविधतेमुळे आपले आयुष्य रंगीत व जगण्यासाठी योग्य होते; ते शब्दांमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण त्यासह जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे म्हणतात की प्रत्येक प्रजातीचे सत्तर लाख वर्षांचे जीवनचक्र असते, व मानव जातीने वीस लाख वर्षे आधीच पूर्ण केलेली आहेत, मात्र आपण ज्याप्रकारे इतर प्रजातींची जीवन चक्रे नष्ट केलेली आहेत त्यानुसार ही वीस लाख वर्षे सत्तर लाख वर्षांएवढी किंवा त्यापेक्षा अधिक आहेत व या प्रक्रियेमध्ये आपण स्वतःचे जीवनचक्रही नष्ट करत आहोत! त्यामुळेच आता आपल्या हातात पन्नास लाख वर्षे नाहीत, म्हणूनच आपण निसर्गाचे संवर्धन आजच केले पाहिजे; आपल्याला हे मूलभूत सत्य समजले तरच आपण स्वतःला माणूस म्हणवून घेऊ शकू नाहीतर डायनासॉरना जितकी वर्षे जगता आले तितकी वर्षे जगण्याची संधीही आपल्याला मिळणार नाही! शेवट आपल्या कल्पनेपेक्षाही वाईट असेल सगळीकडे कोणताही रंग किंवा सुवास नसेल, फक्त काळे पांढरे रंग आणि धूर असेल! आपण जगलो तरीही जगण्यासाठी योग्य काहीही शिल्लक नसेल!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स