Wednesday, 22 February 2017

दुबई, वाळवंटातले स्वप्न !

दुबईचा पाया व्यापारावर उभा आहे, तेलांच्या किंमतीवर नाही… शेख मुहम्मद बिन रशीद अल् मख्तुम

शेख मुहम्मद बिन रशीद अल् मख्तुम् हे संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष व पंतप्रधान व दुबईचे शासक (अमीर) आहेत. त्यांनी नेतृत्वाविषयी काही अतिशय प्रेरणादायी पुस्तके लिहीली आहेत. त्यांचे वरील अवतरण फ्लॅशेस ऑफ थॉट्स या अशा पुस्तकातून घेतले आहे, ज्यातून त्यांच्या विचारांची स्पष्टता दिसते. त्यांनी या विचारांतुनच दुबईला जगातील महत्वाचे व्यापारी केंद्र बनवले आहे. लक्षात ठेवा एका मुस्लिम बहुल देशाने कोणत्याही कारणासाठी बाहेरील लोकांना आकर्षित करणे कधीही सोपे नसते व युरोपीय व अमेरिकी नागरिकांच्या मानसिकतेचा विचार करता दुबईला त्यांच्यासाठी व्यापार व्यवसाय केंद्र बनविणे अतिशय अवघड होते, मात्र मुहम्मद रशीद व त्यांच्या चमूने नेमके हेच करून दाखवले. माझी दोन वर्षाच्या काळातली ही दुसरी दुबई भेट होती. हा देश ज्या सहजपणे व्यापारातील बदल स्वीकारतो, स्वतःला बदलतो व उत्तम कामगिरी करून दाखवतो ते पाहून मला खरच कौतुक वाटतं. खरतर तुम्ही दोन वर्षाच्या काळात एका शहरात काय फार बदल होईल अशी अपेक्षा करू शकता? माझी मागील भेट जवळपास बारा वर्षांनंतरची होती, त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी पाहिल्याने या भेटीची तितकीशी उत्सुकता नव्हती. मी फक्त माझ्या किशोरवयीन मुलांना सोबत म्हणून गेलो होते कारण त्यांनी दुबई पाहिले नव्हते. मात्र माझ्यासाठी आणखी एक आकर्षण होते ते म्हणजे माझे काही मित्र जानेवारीच्या सुरुवातीला दुबईला जाऊन आले होते व त्यांनी मला दुबईच्या नाईट लाइफविषयी सांगितले, जे अनुभवण्याचा योग मला आला नव्हता. खरंतर माझ्या आधीच्या दुबई भेटीत मी दुबईत फक्त बांधकामे पाहण्यासाठीच दुबईभर फिरलो, त्यामुळे दुबईतल्या प्रसिद्ध खरेदीसाठीच्या अनुभवासाठीसुद्धा मला वेळ मिळाला नव्हता. म्हणूनच यावेळी जेव्हा मुलं म्हणाली की त्यांना दुबई पाहायची आहे, तेव्हा मी सुद्धा त्यांना सामील झालो. अर्थात मी त्यांच्यासोबत जाणं त्यांना फारसं पटलं नव्हतं तरी आपल्याकडे वडिलधारे म्हणतील ती पूर्व दिशा असल्याने त्यांचा नाईलाज झाला! मात्र यावेळेस मला दुबईचं फक्त नाईट लाइफच नाही तर वाळवंटात अदभूत विश्व कसं उभारतात हे पाहता आलं!

केदारला म्हणजेच माझ्या मावस भावाला अनेकदा दुबईला जाण्याचा अनुभव असल्याने त्यानंच प्रवासापासून ते राहण्यापर्यंत सगळं आरक्षण केलं. एक सूचना म्हणजे तुम्ही जाताना उपलब्ध असलेल्या कोणत्याही विमानानी थेट पुण्याहून दुबईला जा कारण तुमचा जवळपास एक दिवस वाचतो, मात्र परत येताना अमिरात एअरलाईन्सने मुंबईमार्गे या म्हणजे तुम्हाला अमिरात टर्मिनल पाहता येईल जो खरंच पाहण्यासारखा आहे. दुबईत राहणे कोणत्याही महानगरपेक्षा अधिक स्वस्त आहे कारण अनेक पर्याय उपलब्ध आहेत मात्र रेस्तराँची सुविधा असलेली व मेट्रो स्थानक जवळपास असलेली एखादी सर्विस अपार्टमेंट घेणं कधीही चांगलं, आम्हीही तसंच केलं.

दुबई विमानतळावर अमिरात टर्मिनलवरील रोलेक्सची घड्याळं शहरातल्या समृद्धीची साक्ष देत होती, मात्र तरीही विमानतळाबाहेर आल्यानंतर मला जाणवलेली पहिली गोष्ट म्हणजे तापमान. ते साधारण २० अंशाच्या आसपास होतं, त्यामुळे मला उन्हाळ्यात मध्य पूर्वेतल्या नाही तर एखाद्या युरोपीय देशाला भेट देत असल्यासारखं वाटत होतं. कोणत्याही शहरातली माझी अतिशय आवडती गोष्ट म्हणजे पायी भटकंती, कारण त्यामुळे तुम्हाला शहराची भौगोलिक रचना समजते व संस्कृती समजते. रस्त्यावरील गर्दीचा हिस्सा बनल्याशिवाय, त्यात एकजीव झाल्याशिवाय तुम्हाला शहर खऱ्या अर्थानं अनुभवता येत नाही. त्यामुळे आणखी एक सूचना, तुम्ही कोणत्याही नवीन शहरात गेल्यानंतर तुम्हाला शक्य होईल तेवढी रस्त्यावर पायी भटकंती करा, मेट्रो किंवा बस यासारखी सार्वजनिक वाहने वापरा तसंच सहप्रवाशांसोबत टॅक्सीने प्रवास करा, गजबजलेल्या रस्त्यांवरून चाला व गर्दीचा एक भाग व्हारहिवाशांशी बोला व तुम्हाला शक्य तितके जास्तीत जास्त प्रश्न विचारा, केवळ लोकप्रिय पर्यटन स्थळांविषयीच नाही तर स्थानिक वैशिष्ट्यांविषयी, त्यांना शहरात सर्वाधिक काय आवडते याविषयी विचारा म्हणजे तुम्हाला विकीपिडीया किंवा गुगलवर शोधण्यापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने शहर जाणून घेता येईल. विशेषतः दुबईसारख्या शहरात बहुतांश लोकांना हिंदी बोलता येते किंवा समजते, त्यामुळे तुम्ही या शहरात स्वतःहून भटकंती केली पाहिजे, इथल्या लोकांशी बोलूनच तुम्हाला शहराची नाडी जाणून घेता येते, ते कशाप्रकारे प्रगती करतंय किंवा वाईट परिस्थिती व त्या शहरातून नागरिकांना काय मिळते हे समजतं.

माझ्या मागील भेटीपेक्षा मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे व्यापार थोडा मंदावला होता. मला अनेक टॅक्सी रिकाम्या दिसल्या; कदाचित डीएसएफ म्हणजेच दुबई शॉपिंग फेस्टिव्हल नुकताच संपल्याचा हा परिणाम असेल व मॉल नव्या पर्यटकांच्या शोधात होतेदुबई सरकारकडे कोणतंही शहर फक्त खरेदीचे केंद्र म्हणून टिकू शकत नाही हे समजण्याइतकं शहाणपण आहे कारण त्यासाठी बँकॉक, क्वालालंपूर व सिंगापूर यासारखे बरेच स्पर्धक आहेत.
याशिवाय अमेरिका नेहमीच सर्व इलेक्ट्रॉनिक व फॅशन ऍक्सेसरीजसाठी सर्वात मोठी बाजारपेठ राहिली आहे. तेथील कॉस्को व वॉल-मार्ट सॊबत आउटलेट मॉल्स यात सर्वात आघाडीवर असतातआता दुबईतही आउटलेट मॉल उघडण्यात आले आहे, ज्यात प्रत्येक फॅशन ऍक्सेसरीचा थक्क करून टाकणारा साठा तितक्याच आकर्षकांना दरांना उपलब्ध होऊ लागला. आता खरेदीवेड्यांसाठी मॉल ऑफ अमिरात, दुबई मॉल तसंच रस्त्याच्या कडेला होणारी खरेदी, गोल्ड सुख मार्केट असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र खरेदीमध्ये बहुतेकवेळा फक्त मोठ्यांना रस असतो, मात्र लहान व किशोरवयीन मुलांना खरेदी किंवा दिवसभर पालकांसोबत फिरण्यात विशेष रस नसतो. त्यामुळेच जेव्हा सुटीसाठी दुबईला जाण्याविषयी घरी चर्चा सुरु होते तेव्हा बहुतेक सर्ववयीन मुले दुबईला मोठ्ठा नकार देतात कारण दुबईत आपल्या पालकांचं खरेदीचं वेड पाहून त्यांना कंटाळा येतो.

येथे दुबई सरकारनं संपूर्ण परिवाराची सुट्टीची गरज ओळखली कारण मुलांनाही आकर्षित करणारं काहीतरी विकसित केलं तर संपूर्ण कुटुंबासाठीच ते फायद्याचं ठरतं. शेवटी एखाद्या व्यवहारात सगळ्या पक्षांना खुश करणं हाच सर्वोत्तम व्यापार असतो. दुबई सरकारने चतुराई दाखवत मुलांसाठी अम्युझमेंट पार्क सुरु केली. पण मग डिज्नेलँड, युनिवर्सल स्टुडिओसारखी आकर्षणं आधीपासूनच आहेतच की. माझी पिढी टॉम अँड जेरी, डोनाल्ड डक आणि मिकी माउस पाहात मोठी झालीय. मात्र आजची पिढी सुपर हिरो आणि त्यांच्या राईड्सच्या दुनियेत वावरत असते, त्यांना परिकथाही आवडत नाहीत (फ्रोझन प्रिंसेस वगळून). म्हणून दुबईमध्ये मुलांसाठी मार्व्हल स्टुडिओ नावाचं अगदी नवीन आकर्षण सुरु करण्यात आलं व त्याच्या सुपर हिरोंना ऍव्हेंजर म्हणून ओळखलं जातं. ऍव्हेंजर्सची निर्मिती करणारा आयएमजी स्टुडिओ व कार्टुन नेटवर्कसह त्यांनी वाळवंटातलं आणखी एक आश्चर्य उभं केलं. एक लक्षात ठेवा जगातली सगळी अम्युझमेंट पार्क खुल्या जागेवर आहेत. मात्र भारतासारख्या देशात जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी असते तेव्हा दुबईमध्ये या चार महिन्यांच्या काळात तापमानाचा पारा ५० अंशांपर्यंत जातो, त्यामुळे दुबईला खुल्या जागेवर अम्युझमेंट पार्क शक्यच नाहीत. म्हणूनच दुबईला बंदिस्त अम्युझमेंट पार्कची शक्कल लढवली. जवळपास ऐंशी एकरांवर म्हणजेच ४० लाख चौरस फुटांवर पसरलेल्या या थीम पार्कची सरासरी उंची सत्तर फुटांची आहे व ते पूर्णपणे वातानुकूलित आहेहे ऐकताना एखादा विनोद किंवा स्वप्नासारखं वाटेल? पण हे वास्तव आहे तुम्ही जेव्हा आयएमजी स्टुडिओला भेट देता तेव्हा त्यात मुलांच्या आयर्न मॅन, स्पायडर मॅन, हल्क यासारख्या सगळ्या सुपरहिरोंच्या स्वप्नवत वाटाव्यात अशा राईड असतात. हे सगळं बदिस्त असल्यामुळे वाळवंटातल्या जीवघेण्या उकाड्यापासून तुमचं रक्षण होतं, बाहेर दिवस आहे की रात्र हे सुद्धा समजत नाही!

आयएमजी स्टुडिओ शिवाय दुबईतलं मुलांसाठीचं खास आकर्षण म्हणजे लेगो लँड नावाचं थीम पार्क. लेगो कॉमिक्स लहान मुलांना अतिशय आडवतात. या लेगो लँडमध्ये दुबईच्या क्षितीजाची, जगातल्या सात आश्चर्यांच्या छोटेखानी प्रतिकृती आहेत, तसंच शिशु गटातल्या मुलांसाठीही इथे राईड्स आहेत. ही लहान मुलं त्यांच्या हिरोंसोबत धमाल-मस्ती करत असताना पालक या थीम पार्कमधल्या विविध दुकानांमधून खरेदीचा मनमुराद आनंद घेत असतात. उन्हाची काहीली कमी करण्यासाठी वॉटर पार्कची संकल्पनाही अतिशय लोकप्रिय ठरतेय, ज्यात पर्यटक मोठमोठ्या तलावांमध्ये आपल्या कुटुंबासह वेगवेगळ्या राईड्सचा आनंद घेऊ शकतात. हिंदी चित्रपटांच्या निस्सीम चाहत्यांसाठी बॉलिवुड स्टुडिओही आहे ज्यात हिंदी चित्रपट प्रेमी लोकप्रिय हिंदी चित्रपटांच्या राईड घेऊ शकतात. मी या सगळ्या राईडचा मनमुराद आनंद घेतला, मात्र हे पाहून मला एक प्रश्न पडला की दुबई आपल्या  
हिंदी लोकप्रिय चित्रपटांवर थीम पार्क बनवू शकते तर मग आपण आपल्या देशात असं काहीतरी निर्माण का करू शकत नाही?

मला तिथली आणखी एक संकल्पना आवडली ती म्हणजे ग्लोबल व्हिलेज; इथे एका विस्तीर्ण भूखंडावर जवळपास ऐंशी देशांचे शामियाने उभारण्यात आले आहेत, त्यात हिरवळ, कालवे, वाळूच्या टेकड्या असं काय काय पाहायला मिळतं. या शामियांन्यांमध्ये प्रत्येक देशाची वैशिष्ट्ये प्रदर्शित करण्यात आली आहेत जी तुम्हाला त्या देशाची संस्कृती तसेच व्यापाराची ओळख करून देतात. इथे मुलांना गुंतवून ठेवणाऱ्या अनेक गोष्टी आहेत हे वेगळं सांगायला नको. मग त्यात सर्कस आहे, शकिराच्या गाण्यांवर नृत्य असं बरंच काही आहे. पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी प्रत्येक देशाचे फूड स्टॉल आहेत, कुणालाही यापेक्षा आणखी मौजमजा काय हवी असते? त्यानंतर
दुबईत आणखी एक आश्चर्य विकसित करण्यात आलं आहे ते म्हणजे मिरॅकल गार्डन, ज्यात तुम्हाला रेन फॉरेस्टसपासून ते वाळवंटातील कॅक्टसपर्यंत वनस्पतीशास्त्रातील प्रत्येक प्रजाती व फुलांच्या सजावटीतून तयार केलेल्या विविध रचना एकाच ठिकाणी पाहायला मिळतात.

शहरातल्या रिअल इस्टेटला चालना देण्यासाठी मोठमोठी सार्वजनिक उद्याने, सार्वजनिक मनोरंजनाच्या जागा विकसित करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना खरेदीचे आकर्षण असू शकते पण शहरातल्या नागरिकांचे काय, त्यांनाही विरंगुळ्यासाठी, मनोरंजनासाठी जागा हवीच. त्यांच्यासाठी दुबईचा समुद्र किनारा आहे जो गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यासारखा फेरफटक्यासाठी विकसित केला जातोय. त्याचप्रमाणे शहराच्या मधोमध एक महाकाय कालवा (आपल्या नद्याही त्या तुलनेत लहान वाटतील) विकसित करण्यात आलाय. त्याच्या किनारी विविध मनोरंजनाची साधने विकसित करून रिअल इस्टेट अधिक फायदेशीर करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. इथे लोक फेरफटका मारू शकतात किंवा सायकल चालवू शकतात किंवा घरून जेवण आणून कुटुंबासोबत हिरवळीवर सहभोजनाचा आनंद घेऊ शकतात; एखाद्या कुटुंबाला सुटीसाठी याहून अधिक काय हवं असतं. मी जेव्हा या ठिकाणाला भेट दिली तेव्हा मला आपल्या पुण्यातल्या नदीकिना-याच्या विकासाविषयी अतिशय वाईट वाटलं. आपल्याला फक्त अशी स्वप्न दाखवण्यात आली मात्र गेल्या अनेक वर्षात नदी किनाऱ्यातील अगदी १०० मीटरचा पट्टाही विकसित झालेला नाही. 

दुबईमध्ये संस्कृती, अभियांत्रिकी व सौंदर्यशास्त्र यांचा सुंदर मिलाफ साधून मनोरंजनाचा गाभा कसा अबाधित ठेवण्यात आलाय हे अभियंते, नियोजनकर्ते व वास्तुविशारदांना शिकण्यासारखं आहे. एका उद्यानात मी काँक्रिटच्या मार्गावर सुंदर रंगी-बेरंगी आकृत्या चितारलेल्या पाहिल्या. अशी रंगांची उधळण झाल्यामुळे रखरखीत वाटणाऱ्या काँक्रिटच्या पट्ट्यावर आकर्षक परिणाम साधला गेला होता, ते दृश्य डोळ्यांनाही सुखावत होतं. आपण दुबईकडून हेच शिकण्यासारखं आहे ते म्हणजे फक्त पैसा नाही तर दूरदृष्टी व ती दूरदृष्टी साकार करण्याच्या इच्छेने खऱ्या अर्थानं फरक पडतो.

एकदा टॅक्सीनं जाताना चालकानं आम्हाला माहिती दिली की, साहेब, शेख इथे बुर्ज खलिफाहूनही एक उंच इमारत बांधत आहेत. याचं कारण म्हणजे जगभरात कुठेतरी बुर्ज खलिफाच्या उंचीचा विक्रम मोडणारी इमारत उभारली जातेय. मी एक फलक पाहिला होता त्यावर श्री. रशीद मख्तुम यांचं विधान होतं, दुबई अव्वल स्थानापेक्षा इतर कशावरही समाधान मानणार नाही. याच प्रबळ इच्छाशक्तिच्या जोरावर तुम्ही फक्त पहिल्या स्थानी पोहचत नाही तर तुम्ही स्वतःसाठी पहिले स्थान तयार करतामी सर्वसाधारणपणे जंगल सोडून इतरत्र जायला फारसा उत्सुक नसतो, कारण मला असं वाटतं निसर्ग तुम्हाला बहुतेक गोष्टी शिकवतो. मात्र मी चूक होतो कारण दुबईमध्ये जंगल नसले तरीही सत्ताधीश श्री. रशीद व त्यांचा चमू त्यांचा स्वतःचा निसर्ग तयार करण्याचे काम करतोय, ज्यातून बरेच शिकण्यासारखे आहे. थोडक्यात सांगायचं तर दुबई विमानतळाबाहेर एका मोठ्ठ्या फलकावर लिहीलेले आहे, दुबईमध्ये आम्ही एखादी गोष्ट घडण्यासाठी वाट पाहात नाही, तर आम्ही ती गोष्ट घडवून  आणतो! हे शब्द मनात साठवून, पुन्हा नवीन काहीतरी शिकण्यासाठी यायचा निर्धार करून मी दुबईचा निरोप घेतला.


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स