Friday 3 June 2022

मदर्स डे


 













मदर्स डे

 

८ मे

 

असे म्हणतात जगात सात आश्चर्ये आहेत, मी ती पाहिलेली नाहीत मात्र मला माझ्या जगातील आठवे आश्चर्य माहिती आहे (ते म्हणजे माझी आई) व मी खरोखरच अतिशय सुदैवी आहे की मी तिला रोज पाहू शकतो” ...

 

वरील शब्द माझेच आहेत कारण मदर्सडेच्या निमित्ताने मी जेव्हा माझ्या आईविषयी काहीतरी लिहीण्याचा विचार केला तेव्हा माझ्या मनात पहिल्यांदा हाच विचार आला! तुमची तब्येत बरी नसते तेव्हाच नाही तर तुमचे अतिशय उत्तम चालेले असते तेव्हाही जर तुमच्याविषयी नेहमी कुणी काळजी करत असेल तर ती असते तुमची आई. तिला तुमच्या क्षमतेवर विश्वास असतो, मात्र तिला तुमची कमजोरी तुमच्यापेक्षाही अधिक चांगल्याप्रकारे माहिती असते. म्हणूनच जेव्हा तिचा मुलाचा किंवा मुलीचाप्रश्न असतो तेव्हा तिला अधिक काळजी असते व तसेच ती काळजी घेतही असते

 

म्हणूनच प्रत्येक मुलाला दोन्ही पालकांची म्हणजेच वडील व आई दोघांचीही गरज असते, तरीही आईची भूमिका ही नेहमीच अतिशय महत्त्वाची असते कारण आई व बाळामध्ये निसर्गतःच एक विशेष बंध असतो. दुर्दैवाने, जेव्हा श्रेय द्यायचे असते, तेव्हा बहुतेक वेळा कोणतेही मूल मोठे झाल्यानंतर त्याच्या किंवा तिच्या वडिलांच्याच नावाने ओळखले जाते. मात्र खरे म्हणजे आईच मुलाला तो वारसा समर्थपणे पुढे चालविण्यायोग्य बनवते!! 

मात्र बहुतेक पुरूष म्हणजेच वडीलमुलांना वाढविण्याची जबाबदारीसोयीस्करपणे त्यांच्या आईला देऊन मोकळे होतात. ते फारसे महत्त्वाचे काम नाही असा विचार केला जातो. मात्र विचार करा तुमची आई नसती तर अशा किती यशोगाथा प्रत्यक्ष साकार होऊ शकल्या असत्या? नेमक्या याच कारणामुळे, “प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते ही म्हण प्रचलित झाली असावी व ती स्त्री बहुतेक वेळा आईच असते (जे सुदैवी आहेत)! फक्त एक गोष्ट मला कधीच समजलेली नाही, जी व्यक्ती (म्हणजेच आई) अतिशय काळजी घेते, आपल्या मुलांवर जीव ओवाळून टाकते, ती आपल्या सुनेच्या बाबतीत मात्र या भावना हातच्या राखून का ठेवते? (अर्थातच बहुतेक प्रकरणांमध्ये). बहुतेक कुटुंबांमध्ये आई आणि तिच्या मुलाच्या आयुष्यात आलेली नवीन सहचारिणीयांच्यातील नातेसंबंधांमुळे वाद निर्माण होतात. आपल्या मुलाविषयी असलेल्या अति प्रेमाचे व काळजीचे रुपांतर अधिकार वृत्तीमध्ये होणे हेच कदाचित अशा वर्तनाचे एकमेव कारण असावे. आईला आपल्या मुलांच्या कर्तबगारीविषयीही तितकाच अधिकार गाजवासा वाटतो व त्याविषयीची कोणतीही गोष्ट ती मनाला अतिशय लावून घेते. तुमच्या अपयशामुळे तिला सर्वात दुःख होते व वाईट वाटते, मग ती शाळेची परीक्षा असो किंवा एखादा खेळाचा समाना असो, अथवा नोकरीत पदोन्नती, तुमच्या आईला तो केवळ तुमचाच नव्हे तर तिचा वैयक्तिक पराभव किंवा विजय वाटतो, आईचे आपल्या मुलांवर असे जिवापाड प्रेम असते.  

 

आज, या दिवशीही, तुमच्या आईला तुमच्याकडून कोणत्याही भेटवस्तूची गरज किंवा अपेक्षा नसते, तसेच ती तुमच्याकडून काही मागणारही नाही. मात्र तिच्यासाठी थोडा वेळ काढा व ती म्हणजे तुमच्याकडील सर्वोत्तम ठेवा आहे असे तिला सांगा व तिला वाईट वाटेल किंवा तिची निराशा होईल असे तुम्ही काहीही करणार नाही असे आश्वासन तिला द्या, तिच्यासाठीच हीच सर्वात मोठ भेट असेलजर तुमची आई आता या जगात नसेल, तर फक्त तुमचे डोळे मिटा आणि तुमच्या अवती-भोवती तिचे अस्तित्व अनुभवा व तिला सांगा, तुम्हाला तिची कमतरता जाणवत नाही कारण तुम्हाला माहितीय की ती तुम्हाला पाहतेय व तिला तुमचा अभिमान वाटेल अशीच कामगिरी तुम्ही करून दाखवाल. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला खरोखरच तिचे हसू आणि आनंदाश्रूंनीपाणवलेले डोळे जाणवतील. ही तुम्ही तिला दिलेली सर्वोत्तम भेट असेल, जी जगातील कितीही पैसा किंवा ताकद खरेदी करू शकणार नाहीत. तिच्यासाठी एवढे करा, तुम्ही तिचे एवढे तरी देणे लागता...

संजय देशपांडे      

संजीवनी डेव्हलोपर्स

ईमेल आयडी - smd156812@gmail.com

 

 


No comments:

Post a Comment