Wednesday 31 January 2024


पर्यावरण शास्त्र , नगर रचना आणि ताडोबाचे वाघ !












पर्यावरण शास्त्र , नगर रचना आणि ताडोबाचे वाघ !


“तुम्ही जर  मला एक झाड तोडण्यासाठी सहा तास दिले तर  मी पहिले चार तास कुऱ्हाडीला धार लावण्यात वापरीन.” … अब्राहम लिंकन

भविष्य आधीपासूनच दिसतेय – फक्त ते अजिबात एकसमान वितरित नाही… विल्यम गिब्सन

  माझ्या बहुतेक वाचकांना पहिल्या अवतरणाच्या लेखकाविषयी माहिती आहे, तरीही ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी म्हणून सांगतो. अब्राहम लिंकन हे नाव अमेरिकेसाठी काय आहे त्यापेक्षाही अधिक म्हणजे ते एक माणूस म्हणून, एक नेते म्हणून, स्वतःला जगातील सर्वात महान देश मानणाऱ्या अमेरिकेसाठी कसे आहेत याची तुलना आपल्या देशासाठी गांधीजी किती मोठे आहेत याच्याशी केली तरच समजू शकेल आणि विल्यम फोर्ड गिब्सन हे अमेरिकी-कॅनडियन काल्पनिक कथा व निबंध लेखक आहेत. त्याचप्रमाणे सायबरपंक या वैज्ञानिक काल्पनिक कथांच्या प्रकाराचेही ते प्रणेते मानले जातात, जो एक गोष्टीवर आधारित ऑनलाईन गेमही आहे, सीडी प्रोजेक्ट रेडमधील ओपन वर्ल्ड आरपीजी ऑफ डार्क फ्यूचर, जो द विचर सिरीज ऑफ गेम्सच्या निर्मात्यांनी तयार केला आहे. लिंकन यांचे अवतरण झाडे तोडण्याविषयी असले तरीही ती केवळ एक उपमा म्हणून घ्या, कारण त्या कामासाठी लागणाऱ्या तयारीविषयी ते बोलत होते, ज्याला आपण नियोजन म्हणतो. म्हणूनच मी हे अवतरण वापरले कारण विषय नियोजनाचा आहे व लिंकन यांचे विद्वत्तापूर्ण शब्द त्याची सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम ठरतील असे वाटले. मला सीओईपी, म्हणजेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे या देशातील अभियांत्रिकीचे शिक्षण देणाऱ्या संस्थांपैकी सर्वाधिक आदर केल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या महाविद्यालयामध्ये नगर रचनेच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसमोर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी नियोजन विभागाचे विभागप्रमुख असलेल्या डॉ. प्रताप रावल यांनी मला स्वतःच विषय निवडण्याची परवानगी दिली होती ही माझ्यासाठी आनंदाची बाब होती. ही पर्वणी होती तसेच आव्हानही होते, कारण मीपर्यावरण अभियांत्रिकी, नगर नियोजन व ताडोबाचे वाघहा माझा विषय म्हणून निवडला होता, जे त्यांनी व त्यांच्या सहकारी डॉ. इशा पानसे यांनी मान्य केले, हे खरोखर अतिशय धाडसाचे होते असेच मी म्हटले पाहिजे.

   आता मी स्वतःला अनुभवी वक्ता म्हणू शकतो (स्वघोषित) कारण व्यासपीठावर उभे राहण्याची आता मला भीती वाटत नाही. परंतु तरीही यावेळी व्याख्यान देण्यापूर्वी माझ्या पोटात गोळा आला होता, कारण समोर कुणी सामान्य श्रोते नव्हते. मला अशा ठिकाणी व्याख्यान द्यायचे होते जिथे साधारण तीस एक वर्षांपूर्वी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मला स्वतःलाच प्रवेश मिळू शकला नव्हता. त्यामुळे या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले जाणे म्हणजे मला जीवन चक्रच पूर्ण झाल्यासारखे वाटले. आणि मला माझ्या आत्मसन्मानासाठी (किंवा ईगोसाठी) सर्वोत्तम व्याख्यान देणे आवश्यक होतेम्हणून मी असा काहीतरी विषय निवडण्याचे ठरवले जो त्यांच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचा भाग नसेल, तसेच ज्याचा त्यांना फारसा अनुभव नसेल, व जे माझ्या फायद्याचे असेल (हास्य). परंतु त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे त्यांना जे शाळा किंवा महाविद्यालयामध्ये किंवा पुस्तकामध्ये आत्तापर्यंत शिकवण्यात आले नसेल व ते म्हणजे पुढील आयुष्याच्या नियोजनाच्या पैलूविषयी त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेण्यासाठी वन्यजीवनाचा वापर करणे.  मी असे जाहीर करून सुरुवात केली की तुम्ही सगळे माझ्या लेखाच्या शीर्षकामुळे बुचकळ्यात पडले असाल, जे अनुराग कश्यपच्या (कृपया त्याच्याविषयीची माहिती गूगल करा) एखाद्या चित्रपटासारखे वाटते, परंतु जंगलात गेल्यामुळेच मला नियोजनाचे महत्त्व समजले. नियोजनाचा पहिला पैलू म्हणजे, तुम्ही कशासाठी नियोजन करत आहात हे समजून घेणे व म्हणूनच ताडोबासारख्या ठिकाणांना भेट देणे महत्त्वाचे आहे, जे नियोजनाच्या बाबतीत अत्यंत यशस्वी आहे. याचे कारण म्हणजे जगभरात जेथे वाघांची संख्या कमी होतेय, ताडोबामध्ये मात्र ती वाढतेय. हे नियोजनाशिवाय शक्य झाले नसते, म्हणूनच मी नियोजनाविषयीच्या व्याख्यानासाठी उदाहरण म्हणून ताडोबाची निवड केली. मी त्या मुलांना वाघांविषयी, तसेच कोअर क्षेत्र व बफर क्षेत्र व ताडोबातील व भोवतालच्या भागातील लोक याविषयी व हा प्रकल्प यशस्वी का झाला व तो कसा चालवला जातो व आता यापुढची आव्हाने कोणती आहे व भविष्यातील प्रवास, याविषयी समजून सांगितले व यासाठीच त्यांच्याशी संवाद साधत असल्याचे सांगितले.

   मी त्यांना ताडोबातील वन्यजीवनाची अनेक सुंदर छायाचित्रे दाखवली, परंतु नंतर मी त्यांना तिथले जीवन किती खडतर आहे व तिथल्या लोकांना कशाची गरज आहे हे दाखवले. मी त्यानंतर त्यांना माणसाच्या हस्तक्षेपामुळे (म्हणजे अतिक्रमणामुळे) वन्य प्रजातींच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडथळ्याची अनेक छायाचित्रे दाखवली. नागरी नियोजन किंवा नगर नियोजन हे दुर्दैवाने माणसांद्वारे माणसांसाठीच केले जाते व कदाचित काही दशकांपूर्वी त्याची गरज होती, कारण आपण विसनशील प्रजाती होतो. परंतु आता आपण विकसित प्रजाती आहोत (म्हणजे असे अपेक्षित तरी आहे), त्यामुळे आपण इतर प्रजातींचाही आपल्या नियोजनामध्ये समावेश करून घेण्याची वेळ आली आहेकारण, “आपण ज्याचे नियोजन करतो तेच आपण तयार करतो,” असा एक लोकप्रिय मानशास्त्रीय वाक्प्रचार आहे; उदा, तुम्ही गाड्यांसाठी नियोजन कराल तर तुम्ही उड्डाणपूल बांधता, तुम्ही गुन्हेगारांसाठी नियोजन कराल तर तुम्ही आणखी कारागृहे बांधता व आपल्या घराच्या संदर्भात बोलायचे झाले तर आपण वस्तुंच्या साठवणुकीसाठी आणखी जागेचे नियोजन केले तर आपण नको असलेल्या आणखी गोष्टी गोळा करतो (अडगळीच्या जागा). याचप्रमाणे, आपण जोपर्यंत शहरासाठी (म्हणजे माणसांसाठी) नियोजन करत आहोत तोपर्यंत आपण इतर प्रजाती नष्ट करत राहू किंवा त्यांच्या गरजांविषयी अजिबात विचार करणार नाही, हे त्यांच्यापुढील खरे आव्हान असेल जेव्हा ते नगर नियोजक म्हणून त्यांच्या कारकि‍र्दीला सुरुवात करतील. म्हणून आपण आपले नियोजन करताना त्यामध्ये सर्व प्रजातींवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला पाहिजे किंवा त्यावर भर दिला पाहिजे, तरच आपण त्यांच्यासाठी जागा तयार करू शकू. हा पैलू महत्त्वाचा आहे कारण एकीकडे ताडोबातील वाघांची संख्या वाढली आहे (म्हणजे चंद्रपूरमधील), तर वाघांच्या मृत्यूंची संख्याही आत्तापर्यंतची सर्वाधिक आहे. परिणामी, देशामध्ये २०२३ या वर्षामध्ये जवळपास २०० वाघांचा मृत्यू झाला. या वाघांचा मृत्यू वेगवेगळ्या प्रकारे झाला असला तरीही या सर्व मृत्यूंमागचे मूलभूत कारण एकच आहे ते म्हणजे वाघांसाठीची जागा कमी होणे. ज्याचा अप्रत्यक्षपणे अर्थ असा होतो की वनक्षेत्र कमी होणे किंवा अधिवास नाहीसा होणे व हे वनविभागाचे अपयश नसून एक यंत्रणा म्हणून आपल्या नियोजनाच्या क्षमतेचे अपयश आहे. तुम्हाला जर असे वाटत असेल की २०० वाघांच्या मृत्यूमध्ये काय एवढे मोठेसे, तर ही तुलना पाहा; आपल्या देशामध्ये माणसांची संख्या 150 कोटी आहे तर वाघांची संख्या 3750 आहे. म्हणजेच जवळपास 4,00,000 माणसांच्या मागे एक वाघ आहे व वर्षभरात २०० वाघांचा मृत्यू म्हणजे वर्षभरात जवळपास आठ कोटी माणसांचा मृत्यू होण्यासारखे आहे, आता तुम्हाला या आकड्यांचे गांभिर्य समजू शकेल. तुम्ही असे म्हणू शकता की मला वेड लागले आहे किंवा ही तुलना मुर्खपणाची आहे, परंतु मला नावे ठेवल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही की आपण अशा एका जगाची निर्मिती करण्यात अपयशी ठरलो आहोत ज्यामध्ये प्रत्येक प्रजातीचा जगण्यासाठी व भरभराट होण्यासाठी त्यांची स्वतःची जागा असेल, परंतु आपण आपल्या नियोजनामध्ये केवळ माणसांवरच लक्ष केंदित केल्यामुळे, आपण इतर प्रजातींना संपवित आहोत कारण आपण केवळ माणसांच्या गरजांसाठी नियोजन करत आहोत. खरेतर, इथेही आपण अपयशी ठरलो आहोत कारण तुम्ही प्रदेशनिहाय वाढ बघितली (अर्थातच माणसांची) तर मुंबई-नाशिक-पुणे हा त्रिकोण वगळता महाराष्ट्राचा उर्वरित भाग केवळ काही ठिकाणीच विकसित आहे व या त्रिकोणाच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे, यामुळे पुणे – मुंबईत पाणी व वाहतूक यासारख्या पायाभूत सुविधांच्या आघाडीवर सुद्धा परिस्थिती ढासळलेली आहे, त्याचप्रमाणे इथे परवडणारी घरे बांधणीचीही समस्या आहे. राज्याच्या इतर सर्व भागांमध्ये रिअल इस्टेटची परिस्थिती फारशी चांगली नाही कारण लोक त्यांच्या करिअरसाठी किंवा चांगल्या जीवनशैलीसाठी स्थलांतर करतात, जो नियोजन अपयशी झाल्याचा थेट परिणाम आहे, ज्यांना आपण धोरणे म्हणतो व त्यांच्यापुढे हेदेखील आव्हान आहे, असे मी त्यांना सांगितले.

  माणसांचे स्थलांतर केवळ एका विशिष्ट प्रदेशाच्या दिशेने झाल्यामुळे त्या प्रदेशातील माणसांसाठी समस्याच निर्माण होतात. त्याचप्रमाणे यामुळे ज्या प्रदेशातून स्थलांतर होत आहे तेथील जीवनाच्या शाश्वततेचेही नुकसान होते. म्हणूनच आपण जेव्हा एखाद्या प्रदेशातील शहरांसाठी नियोजन करण्यात किंवा नियोजनाचा मूळ हेतूच समजून घेण्यात अपयशी ठरतो तेव्हा एकप्रकारे दुहेरी नुकसान होते. या आघाडीवर गिब्सनच्या अवतरणात म्हटल्याप्रमाणे, आपण पायाभूत सुविधांच्या नियोजनाच्या आघाडीवर जो काही गोंधळ करून ठेवला आहे त्यामुळे आपण आधीच अपयशी ठरलो आहोत, नाही का? सर्वप्रथम कुठल्याही प्रजातीला जगण्यासाठी कायमस्वरुपी स्थलांतर करावे लागू नये परंतु हा अतिशय आदर्शवादी विचार झाला किंवा अतिमहत्वाकांक्षी नियोजन झाले. आपण किमान स्थलांतर कमीत कमी व्हावे असा प्रयत्न करू शकतो. आपण अशा एका जगाचे नियोजन केले पाहिजे जेथे वाघ असो किंवा माणूस ते जिथे आहेत तिथे त्यांना सुरक्षीतता आणि स्वतःची जागा मिळू शकेल व त्यांची भरभराट होऊ शकेल. त्यांच्यावर स्थलांतर (जो निसर्गनियम आहे) करायची वेळ आलीच तर त्यांच्यासाठी सुरक्षित मार्ग असले पाहिजेत तसेच योग्य अधिवास असले पाहिजेत ज्यांना आपण माणसे घर म्हणतो व वाघ जंगल म्हणतात. त्यासाठी आपण आता शहर नियोजन किंवा नगर नियोजन यासारखे शब्द न वापरता आता अधिवास नियोजन असा शब्द वापरला पाहिजे, शेक्सपिअरने नावात काय आहे असे म्हटले असले तरीही जेव्हा आपण नियोजनाविषयी बोलतो तेव्हा त्या नावातून हेतू दर्शवला जातो व हा हेतूच आपले भवितव्य निश्चित करेल; एवढे सांगून मी माझ्या व्याख्यानाचा समारोप केला. नियोजनकर्ते म्हणून हे जग एक अधिक चांगले ठिकाण बनविण्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या!

 

 संजय देशपांडे

smd156812@gmail.com





















 

No comments:

Post a Comment