Monday, 21 July 2014

घर नावाची व्यक्ती -भाग २
तुम्ही घराशी सगळं काही बोलू शकता.”….जेरी स्पायनेली.

जेरी स्पायनेली ही अमेरिकी बाल कादंबरीकार आहे व घराला जाणून घेणे या आपल्या विषयावरील लेखाच्या उत्तरार्धात मला जे सांगायचे आहे त्याचे हे अवतरण अगदी नेमकेपणाने वर्णन करते असे मला वाटते. आपण घराला एक व्यक्ती म्हणून स्वीकारल्यानंतर किंबहुना समजून घेतल्यानंतर बोलण्यासाठी आपल्याला सर्वोत्तम साथीदार मिळतो. अलिकडेच मी एका रंगांच्या कंपनीची एक जाहिरात पाहिली त्यातले घोषवाक्य होतेदिवारें बोल उठेंगी”, म्हणजेच हा विशिष्ट रंग लावल्यानंतर भिंती बोलू लागतील! आता रंगामुळे भिंती बोलू लागतील की नाही हे मला माहिती नाही, मात्र बोलणा-या भिंती ही कल्पनाच किती सुरेख आहे! त्यानंतर आणखी एक चांगली जाहिरात माझ्या पाहण्यात आली, मी त्या उत्पादनाचे नाव विसरलो मात्र त्यातले घोषवाक्य होतेहर घर कुछ कहता है”, म्हणजेच प्रत्येक घराला काही सांगायचे असते! या जाहिरातींचा कल पाहता असे दिसून येते की तुम्ही खरेदी करत असलेले घर इतर उत्पादनांप्रमाणे केवळ एक उत्पादन राहिलेले नाही, तर त्याला तुमच्या माझ्याप्रमाणे सजीव मानले जाऊ लागले आहे! याचा अर्थ असा होतो की उत्पादकांनीही लोकांच्या भावना घराशी निगडित असतात हे स्वीकारले आहे. आपल्यासारख्या देशात घराला आदराचे स्थान आहे व बहुतेक ग्राहक त्याचा भावनीकदृष्ट्याही विचार करतात. इतर कोणत्याही उत्पादनासाठी आपण मुहूर्त पाहात नाही, मात्र घराचे बुकींग करायचे असो किंवा गृहप्रवेश करायचा असो आपण त्यासाठी मुहूर्त पाहतो, यातूनच आपल्या घराविषयीच्या भावना समजतात!

आपल्या विषयाचा हाच धागा पुढे पकडून, आपल्याशी संवाद साधू शकणा-या घर नावाच्या या व्यक्तिविषयी आपल्याला किती माहिती आहे हे आपण पाहणार आहोत. प्राण्यांच्या व झाडांच्या भाषेप्रमाणे आपण घराचीही भाषा जाणून घेतली पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या घराला एक व्यक्ती म्हणून समजून घेईपर्यंत ते तुमच्याशी काय बोलते आहे हे तुम्हाला समजणार नाही! अनेक लोक घरात रहायला लागल्यानंतर त्यात अनेक अडचणी असल्याच्या तक्रारी करतात. मात्र मी यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे तुम्ही हे घर कसे बांधले गेले किंवा ते कसे वाढविण्यात आले हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला फारशा समस्या जाणवणार नाहीत. इतर कोणत्याही अभियांत्रिकीप्रमाणे घरही चांगल्या कारागिरीतून तयार होते व ते बांधले जात असतानाच बहुतेक समस्यांची काळजी घेता येते. त्यानंतरही काही समस्या उरल्या असतील तर आपण घराला योग्यप्रकारे समजून घेतले असल्यास त्या सोडवता येतात. आपण याआधी पाणी गळणे, ओल लागणे व भिंतींना भेगा पडणे याविषयी चर्चा केली; त्यानंतर येते फ्लोअरिंग (फरशीकाम). 
फ्लोरिंगवर टाईल्स बसवताना रंग छटेत फरक पडल्याच्या तक्रारी केल्या जातात. घर हे वेगवेगळे भाग जोडून तयार केलेले शरीर असते ज्यातले सुटे भाग विविध उत्पादकांकडून येतात. ब-याचदा एकाच उत्पादकाकडून घेतलेल्या एकाच गटातील (बॅचमधील) टाईल्सच्या गुणधर्मांमध्ये थोडासा फरक असू शकतो व रंगामधील फरक त्यापैकी एक आहे. आपण जेव्हा संगमरवर किंवा कोटा यासारखे नैसर्गिक दगड वापरतो तेव्हा त्यांच्या छटांमध्ये तसेच रचनेत नैसर्गिक फरक असतो मात्र तो आपण स्वीकारतो. पोर्सेलिन किंवा काचेच्या टाईल्ससारख्या यांत्रिक उत्पादनांमध्ये या फरकाचे प्रमाण अतिशय कमी असते मात्र रंगछटेत थोडासा फरक असू शकतो व टाईल्स बसवताना हा फरक लवकर लक्षात येत नाही कारण तेव्हा प्रकाश फारसा नसतो, प्रत्येक टाईल एकसारखीच दिसते, मात्र त्यात थोडाफार फरक असेलच तर तो टाईल्स एकाच ठिकाणी बसविल्यावर, त्या साफ केल्यावर, दिवसाच्या प्रकाशात लक्षात येतो. रंगछटेतील फरक टाळण्यासाठी तुम्ही एकाच उत्पादन गटातील टाईल्स निवडण्याची खबरदारी घेऊ शकता. टाईल्स बसविल्यानंतर काही महिन्यांनी रंगछटेत फरक झाल्याचे प्रकारही झालेले आहेत. हे प्रामुख्याने प्रत्येक टाईलची पाणी शोषून घेण्याची क्षमता वेगळी असल्याने होते. इथे एक टाईल बदलून समस्या सोडवली जाऊ शकते फ्लोअरींगवरील सर्व टाईल्स बदलणे अशक्य असते. थोडाफार फरक असेल तर तो स्वीकारणे हा सर्वोत्तम पर्याय आहे व तुमच्या सदनिकेचे फ्लोअरिंगचे काम सुरु असताना तिथे जाऊन पाहणी करा व टाईल्स बसविल्यानंतर लगेच रंगछटेत बराच फरक वाटत असेल तर सांगा. मात्र रंगछटेतील फरक अगदी किंचित असेल तर सोडून द्या कारण काही काळाने, विशेषतः खोलीत फर्नीचरचे सामान आल्यानंतर तो लक्षातही येणार नाही!

फ्लोअरिंगविषयीचा आणखी एक गैरसमज म्हणजे ते रोज धुऊन साफ करणे आवश्यक आहे; लोक अक्षरशः खोलीतील फ्लोअरींगवर पाणी ओतून ती साफ करण्याचा प्रयत्न करतात! आजकालच्या आधुनिक टाईल्स व्हर्टिफाईड (काचेच्या) किंवा पोर्सेलिनच्या असतात व त्यांना अशा स्वच्छेतेची गरज नसते. तुम्ही केवळ आधी झाडून घेतले व नंतर ओल्या फडक्याने पुसून घेतले तरी पुरेसे असते. संगमरवरासारख्या नैसर्गिक दगडांची पाणी शोषून घेण्याची क्षमता भरपूर असली तरीही पृष्ठभागावर अतिरिक्त पाणी असेल तर त्यांची रंगछटा बदलते! अतिरिक्त पाणी वापरण्याचा आणखी एक धोका म्हणजे शौचालय, मोरी, डब्ल्यूसी व कपडे वाळत घालण्यासाठीची जागा (ड्राय बाल्कनी) यासारखे ओले भाग वगळता इतर खोल्यांमधील फ्लोअरींगवर वॉटरप्रूफिंगची प्रक्रिया केलेली नसते व पाणी ओतल्याने तुमच्या खालच्या सदनिकेत पाणी गळू शकते. तुम्ही जर तुमच्या खाली राहणा-या शेजा-यांची काळजी घेतली नाही तर लक्षात ठेवा तुमच्या वर राहणारे शेजारीही तुमच्या शोभिवंत फॉल्स सीलिंगची काळजी करणार नाहीत! बाथरूम/Ta^यलेट मधील फ्लोअरींगप्रमाणे इतर खोल्यांच्या फ्लोअरींगला पाण्याचा निचरा होण्यासाठी उतार दिलेला नसतो त्यामुळे तुम्ही फ्लोअरींग वर पाणी ओतल्यास ते एका ठिकाणी साचेल व ते निश्चितपणे खाली गळेल.

उतारावरुन मला एक गोष्ट आणखी आठवली, अनेक लोक तक्रार करतात की त्यांच्या मोरीच्या फ्लोअरींगवरुन पाण्याचा निचरा नीट होत नाही. लक्षात ठेवा तुमच्याच सुरक्षेचा विचार करुन मोरीतील फ्लोअरींगचा उतार घसरगुंडीप्रमाणे नसतो तर अगदी नकळत, केवळ पाणी वाहून जाळीपर्यंत (न्हाणी ट्रॅप) जाईल एवढाच असतो. सामान्यपणे मोरीतील टाईल्स घसरण्यास प्रतिबंध करणा-या म्हणजे थोड्याशा खरखरीत असतात, पृष्ठभाग खरखरीत असल्यामुळेही थोडेसे पाणी तसेच राहते, त्याचा अगदी पातळ थर असतो. तुम्ही केवळ थोडेसे थांबून ते पाणी न्हाणी ट्रॅपच्या (जाळीच्या) दिशेने लोटावे. मोरीत फार अधिक उतार असेल तर ओल्या फरशीवर तुम्हाला घसरायला होईल.
स्वयंपाकघरातील ओट्याच्याही अशाच समस्या आढळतात, त्यावरही भरपूर पाणी ओतण्याची गरज नसते. हे पाणी वाया जाते तसेच ओटा व भिंतीच्या सांध्यांमधून पाणी गळण्याची शक्यता असते कारण भिंती वॉटर प्रूफ नसतात. आजकाल बहुतेक ओट्यांचे पृष्ठभाग ग्रॅनाईट किंवा कृत्रिम संगमरवराचे असतात जे अच्छिद्र असते व त्यांना केवळ ओल्या कपड्याने पुसले तरीही ते स्वच्छ होऊ शकतात. मात्र तरीही ओट्याच्या पृष्टभागाला हलकासा उतार दिला जातो ज्यामुळे स्वयंपाक करताना त्यावर सांडलेले पाणी सिंकच्या दिशेने जाते.

फ्लोअरिंग व संबंधित समस्यांनंतर घराविषयी व्यक्त केली जाणारी आणखी एक भीती सर्वात वरच्या मजल्यावरील सदनिकांविषयी आहे. आणि यातील प्रमुख गैरसमज म्हणजे, छत गळते व खालच्या मजल्यांच्या तुलनेत सर्वात वरचा मजला अधिक गरम होतो. आपण आधी चर्चा केल्याप्रमामे योग्य उतार व पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा केल्याने छताची स्लॅब गळत नाही. उष्णतेचा विचार केला तर आजकाल पुण्यातही उन्हाळ्यामध्ये तापमान ४२ अंशांपर्यंत वर जाते, अशावेळी छताची स्लॅब ताबते! यासाठी तुम्ही तुमच्या बिल्डरला स्लॅबची जाडी किती आहे हे विचारु शकता, सामान्य निवासी मजल्याच्या स्लॅब ”- जाड असतात, मात्र आपण छताच्या स्लॅबची जाडी वाढवली तर त्यामुळे उष्णता शोषून घेण्यास मदत होते. त्यानंतर स्लॅबच्या जाडीवरही मातीच्या विटांचा एक थर दिला व त्यानंतर मेटल (खडी) वॉटर प्रूफिंग केल्यास छताची एकूण जाडी जवळपास होते जे उष्णता शोषून घेणारे अतिशय चांगले माध्यम आहे. त्यानंतर सूर्यकिरणांची उष्णता परावर्तित करण्यासाठी छताच्या स्लॅबच्या पृष्ठभागावर उष्णता रोधक रंग दिल्यास त्याचा अतिशय उपयोग होतो व खोलीचे तापमान सामान्याच्या खाली राहण्यास मदत होते. आणखी एका घटकाकडे आपण लक्ष दिले पाहिजे ते म्हणजे क्रॉस व्हेंटिलेशन (समोरासमोर दार किंवा खिडकी), हवा खेळती नसेल तर ती लवकर तापते. प्रत्येक खोलीत क्रॉस व्हेंटिलेशन असेल तर हवा नक्कीच खेळती राहते जी सर्वात वरच्या मजल्यावर भरपूर असते व अशाप्रकारे सदनिका थंड राहते.

मानवी शरीराप्रमाणेच घरही अनेक घटकांचे बनलेले असते व आपण त्याविषयी जेवढी अधिक माहिती घेऊ तेवढे आपल्याला त्याला अधिक चांगले समजून घेता येईल. बहुतेक कुटुंबे आयुष्यात एकदाच घर खरेदी करतात व त्या चार भिंती आपला एक अविभाज्य भाग बनतात. या चार भिंती कितीतरी भावभावना अनुभवतात, आपल्यासोबत त्यांची देवाणघेवाण करतात, त्यानंतरच ते घर बनते. खरेतर घराची व्याख्या करणे अतिशय अवघड आहे; घर हा केवळ एखाद्या वस्तूचे वर्णन करणारा शब्द नाही, तर माझ्या मते ही एक अनुभवण्याची भावना आहे! आपण एखाद्या व्यक्तिशी संवाद साधण्यासाठी त्याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेतो. आपण त्याला काय आवडते, काय आवडत नाही, कशामुळे त्याचे नुकसान होईल अशी माहिती घेतो! त्यानंतरच आपण आपल्या भावना त्या व्यक्तिसमोर व्यक्त करु शकतो किंवा ती व्यक्ती तिच्या भावना आपल्यासमोर व्यक्त करु शकते. याचप्रकारे आपल्याला घर हे आपल्या कुटुंबाचा एक भाग व्हावे असे वाटत असेल तर घराच्या आवडी व नावडी जाणून घेणे महत्वाचे आहे.
चला तर मग तुमच्या घराला अधिक चांगल्याप्रकारे जाणून घ्या, म्हणजे ते देखील तुम्हाला अधिक चांगले जाणून घेईल व तुम्हाला सर्वोत्तम सेवा देईल! एक घर कुटुंबाचा सदस्य म्हणून अनेक पिढ्यांना आपल्या चार भिंतींमध्ये मोठे होताना, त्यांची भरभराट होताना पाहते, घरातील मंडळी त्याला आमचे घर असे म्हणतात, याहून अधिक ते काय करु शकते! हे सर्व करताना त्या घराला आपल्याकडून फक्त थोड्याशा काळजीची व समजुतदारपणाचीच अपेक्षा असते!


संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स

No comments:

Post a Comment