Tuesday, 28 April 2015

पुण्याचा ऐतिहासीक वारसा आहे कुठे?


एका आईचे आपल्या मुलाशी जे नाते असते तेच एका व्यक्तिचे त्याच्या  ऐतिहासिक वारशाशी असते     जॉन हेन्रिक क्लार्क

जॉन हेन्रिक क्लार्क, हे अखिल-आफ्रिकी लेखक, इतिहासतज्ञ, प्राध्यापक, व ६० च्या दशकाच्या उत्तरार्धात अनेक आफ्रिकन व व्यावसायिक शिक्षण संस्थांचे प्रवर्तक होते. जॉन क्लार्कसारख्या व्यक्तिंमुळेच, अमेरिकेसारख्या देशाचा इतिहास अगदी अलिकडचा असूनही तिथे हजारो ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करण्यात आले आहे; मी जाणीवपूर्वक ऐतिहासिक वारसा इमारती असा शब्द वापरला नाही व त्याचे कारण मी या लेखात पुढे सांगेन. माझ्यासाठी सर्वोत्तम भाग किंवा एक जमेची बाब म्हणजे मी बांधकाम व्यावसायिक असण्यासोबतच मला पर्यावरण क्षेत्रातील कामाचाही थोडाफार अनुभव असल्याने मी समाजाच्या अनेक वर्गांच्या संपर्कात येतो, अशी संधी एक सामान्य माणूस म्हणून मला मिळाली नसती! अशाच एका संपर्कामध्ये सेंट मेरीज शाळे च्या  काही विद्याथिर्नी मला त्यांच्या प्रकल्पासंदर्भात भेटल्या ज्याचा विषय होता पुण्याचा ऐतिहासिक वारसा. सर्वात आदरणीय व जुन्या शाळांपैकी असल्यामुळे सेंट मेरी शाळेची इमारत अशा ऐतिहासिक वारसा इमारतींपैकी एक आहे, मात्र या मुलींची प्रश्नावली कशा प्रकारची असेल याचे मला कुतूहल होते. शाळकरी किंवा महाविद्यालयीन मुलांशी गप्पा मारायला मला नेहमीच आवडतं कारण त्यांच्या कुतुहल व उत्साहामुळे त्यांच्या डोक्यातून काय बाहेर येईल हे जादुच्या टोपीतून काय येईल याचा अंदाज लावण्यासारखं असतं!
यावेळीही माझी निराशा झाली नाही कारण त्या विद्यार्थ्यांशी पुण्याच्या जे काही शिल्लक आहे अशा ऐतिहासिक वारशाविषयी जी चर्चा झाली त्यातूनच मी हा लेख लिहीला!
मुलींनी मला त्यांचे प्रश्न मेलद्वारे पाठवले होते व या मुलाखतीचे ध्वनीचित्रमुद्रण केले जाणार होते, ज्यात मला पाठविण्यात आलेल्या प्रश्नांविषयी माझे काय मत आहे किंवा काय उत्तर आहे हे सांगायचे होते. मी इथे माझे शिक्षण व काम यासारखे वैयक्तिक प्रश्न वगळून ऐतिहासिक वारशाशी संबंधित प्रश्न देत आहे
. पुण्याच्या ऐतिहासिक वारशाविषयी तुमचे काय मत आहे?
. या ऐतिहासिक वारसा स्थळांचे संवर्धन करण्यासाठी काय केले पाहिजे?
. तुमच्या मते त्यांच्या ढासळत्या परिस्थितीचे काय कारण आहे?
.   ऐतिहासिक वारशाचे जतन करताना, नव्या इमारतींचा विकास थांबविता येणार नाही. या दोन्हींमध्ये कशाप्रकारे संतुलन साधता येईल असे तुम्हाला वाटते?
. पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी काय करता येईल असे तुम्हाला वाटते?
. तुम्हाला आम्हाला आणखी काही मार्गदर्शन करावेसे वाटते का?

या प्रश्नांमधूनच लेखात काय मांडले जाणार आहे याची झलक तुम्हाला मिळाली असेल मात्र मी उत्तर द्यायला सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांना एक प्रश्न विचारला जो त्यांच्याकडून किंबहुना त्यांच्या शिक्षकांकडून राहिला होता. तो प्रश्न म्हणजे तुम्ही ऐतिहासिक वारसा वास्तु किंवा स्थळाची व्याख्या कशी करता?” ९व्या इयत्तेतील वयोगटाकडून मला फार काही असाधारण उत्तरांची अपेक्षा नव्हती, केवळ यासंदर्भातील त्यांचे मत जाणून घ्यायचे होते. तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाले तर त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली, ऐतिहासिक वारसा इमारत म्हणजे जिला काही इतिहास आहे व तिचे वय जास्त आहे इत्यादी उत्तरे त्यांनी दिली. यात काहीच चुकीचे नव्हते, तुम्ही एखाद्या प्रौढ व्यक्तिला विचारले तरीही तिचे उत्तर साधारण असेच असेल. आपण जेव्हा पर्यावरण किंवा ऐतिहासिक वारसा यासारख्या विषयांचा विचार करतो तेव्हा आपला दृष्टिकोन चाकोरीबद्ध असतो, कारण आपल्याला चाकोरीबाहेरचा विचार करायला शिकवलंच जात नाही.
मी त्या मुलींना सांगितलं की ऐतिहासिक वारसा ही एखादी वास्तुच असली पाहिजे असं नाही तर मनुष्य किंवा पूर्णपणे निसर्गनिर्मित गोष्ट सुद्धा ऐतिहासिक वारसा स्थळ असू शकते! उदाहरणार्थ पुण्यातली सर्वात जुनी गोष्ट कोणती? त्यांनी उत्तर दिले शनिवारवाडा, याचे उत्तर खरंतर जेएम मार्गावरील पाताळेश्वर गुंफा आहे हे त्यांना माहिती नव्हते; अर्थात हे ब-याच जणांना माहिती नसते! मी त्यांना आपल्या नदीचे काय असे विचारले? यावर त्या हसल्या व नदी पुण्यात सर्वात जुनी असून शहराला सर्वोत्तमप्रकारे सेवा दिल्याचे त्यांनी मान्य केले. त्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही नदीचा विचार ऐतिहासिक वारसा म्हणून का केला नाहीविचार करा एंप्रेस उद्यानातील जुना वटवृक्ष असो, नदी असो किंवा पर्वती असो, आपल्याकडे कितीतरी नैसर्गिक स्थळे ऐतिहासिक वारसा आहेत व आपण ती विचारातही घेत नाही. अशा प्रकारे माझ्या उत्तरांना सुरुवात झाली. म्हणूनच माझ्या मते आपण सर्वप्रथम ऐतिहासिक वारसा म्हणजे काय हे निश्चित केले पाहिजे व आपण आपली व्याख्या केवळ काही इमारतींपुरतीच मर्यादित ठेवू नये ज्यामध्ये काही ऐतिहासिक व्यक्तिंचा निवास होता. तर इतिसाची साक्षीदार असलेले तसेच माणसाची कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवा केलेले प्रत्येक स्थळ किंवा अगदी परिसरही ऐतिहासिक वारसा मानला पाहिजे. मला असे वाटते ऐतिहासिक वारशाची व्याख्या तीच असली पाहिजे व हीच व्याख्या आपण मुलांच्या मनावर बिंबवली पाहिजे.
पुण्यातल्या ऐतिहासिक वारसा स्थळांची परिस्थिती आपण जाणतोच; आपण रस्ते, सार्वजनिक शौचालये यासारख्या दैनंदिन गरजेच्या गोष्टींची देखभाल करु शकत नाही तर मग काही जुन्यापुराण्या इमारती व स्थळांची देखभाल करायचा कुणाला वेळ किंवा रस आहे! आपल्या वर्तमानकाळाविषयी आपला दृष्टिकोन आपल्या वारशांना आपण कशी वागणूक देतो यातून दिसून येतो व आज आपण तो पाहात आहोत! मला शंका आहे की कुणाही शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेकडे पुण्यात नेमकी किती ऐतिहासिक वारसा स्थळे आहेत याची अचूक यादी असेल का, त्यांची परिस्थिती जाणून घेणे ही तर दूरची गोष्ट झाली! ज्या इमारतींचा आपल्याला विविध प्रकारे उपयोग झाला ज्यांना आपण ऐतिहासिक वारसा म्हणतो, त्यांची आपण देखभाल करु शकत नाही, तर मग नद्या किंवा पर्वतांची काय कथा? पुणे मनपा मध्ये एक ऐतिहासिक वारसा कक्ष आहे व राज्यपातळीवर पुरातत्वशास्त्र विभाग आहे ज्याने केवळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या वास्तु हाताळणेच अपेक्षित आहे. असे असुनही कुणीही ऐतिहासिक वारसा स्थळांची थेट जबाबदारी घेत नाही हे तथ्य आहे. सर्व ऐतिहासिक वारसा स्थळांची व इमारतींची एक यादीही आहे मात्र आपण त्यांचे काय करतो असे कोडे मला पडते! ऐतिहासिक वारसा स्थळांच्या ढासळत्या परिस्थितीचे कारण म्हणजे आजच्या समाजाचा आपल्या भूतकाळाविषयी दुर्लक्ष करण्याचा व भौतिकतावादी दृष्टिकोन. आपल्याला भौतिकदृष्ट्या लाभदायक आहेत असे वाटणा-या गोष्टींनाच आपण महत्व देतो! उदाहरणार्थ आपण मॉल किंवा मल्टिप्लेक्सची काळजी घेतो कारण त्या आपल्या बाजारहाटीच्या किंवा मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करतात व यांच्याबाबतीत काही गैर आढळले तर आपण लगेच सोशल मिडियासकट सगळीकडे  त्यावर आवाज उठवतो मात्र शनिवारवाड्यासमोर पर्यटकांसाठी व्यवस्थित वाहनतळ नसेल किंवा शौचालय नसेल तर त्याची काळजी कुणालाही नसते कारण आपण विरंगुळ्यासाठी शनिवारवाड्यावर क्वचितच जातो! म्हणूनच आपली ऐतिहासिक वारसा स्थळे आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तिंसारखी आहेत, आपल्याला त्यांची गरज नसते म्हणूनच आपण त्यांच्यासाठी काही करत नाही!

कोणत्याही ऐतिहासिक वारसा स्थळाचे जतन करणे म्हणजे ते जुन्या स्वरुपात ठेवणे असे नाही तर आपण त्याला कार्यरत ठेवले पाहिजे. शेरलॉक होम्सच्या प्रसिद्ध बेकर स्ट्रिट हाउसप्रमाणे, कोणतेही ठिकाण ज्या हेतूने वापरले जात होते त्या भावनेचे जतन झाले पाहिजे. अलिकडेच सर्व वर्तमानपत्रांमध्ये राज्य सरकार डॉ. आंबेडकर लंडनमध्ये ज्या घरात राहिले ते घर ताब्यात घेणार व त्यासाठी काही अब्ज पौंड खर्च केले जातील अशी एक मोठी बातमी होती. या निर्णयाविरुद्ध काही आकस नाही, मात्र डॉ आंबेडकर ज्या घरात जेमतेम दोन वर्ष राहिले त्यासाठी आपण काही अब्ज डॉलर खर्च करु शकतो, मात्र त्यांच्या जन्मस्थळाविषयी व जेथे त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य घालवले त्याचे काय? त्यांचा जन्म कुठे झाला व त्या ठिकाणाची परिस्थिती नेमकी कशी आहे हे कुणाला माहिती तरी आहे का व आता त्या ठिकाणाची परिस्थिती काय आहे? त्याचप्रमाणे पुण्यामध्ये लोकमान्य टिळक व आगरकर यासारख्या अनेक महान व्यक्तिंचे वास्तव्य होते, ही यादी वाढतच जाईल, त्यांच्या निवासस्थानांचे व त्यांनी जेथे काम केले त्या वास्तुंचे काय?

आधुनिक वास्तुरचनेच्या मदतीने नव्या व जुन्याचा अचूक मेळ घालून ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करता येईल. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात जिथे शनिवार वाडा किंवा इतरही अनेक जुन्या इमारती आहेत तिथल्या इमारती पाहा. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला अगदी लागून बांधल्या जात असलेल्या उड्डाण पुलाचंच उदाहरण घ्या. अभियांत्रिकी महाविद्यालय अतिशय उत्तम ऐतिहासिक वारसा इमारत आहे. महाविद्यालयातल्या इमारतींच्या रचनेचा विचार करुन उड्डाण पूल बांधला जाऊ शकत नाही का? त्याशिवाय फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नावाने प्रसिद्ध असलेला एफसी रस्ता विकसित करताना महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाशी त्यांचे संतुलन राखता आले असते मात्र त्याची काळजी कुणाला आहे? एक लक्षात ठेवा आपण आज जी काही रचना करतोय व बांधतोय ती उद्याचा ऐतिहासिक वारसा असणार आहे. आपण त्यानुसारच नियोजन केले पाहिजे, कारण येत्या अनेक पिढ्या या इमारती वापरणार आहेत व तिचा ऐतिहासिक वारसा होण्यासाठी तिला काळाची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे! आपल्याला अशा एका धोरणाची गरज आहे जे कोणत्याही ऐतिहासिक वारसा इमारतीच्या आजूबाजूचा परिसर विकसित करताना अडथळा ठरणार नाही. संपूर्ण परिसरच ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करण्यात मदत करेल मात्र नदी किंवा पर्वती पाहा, या ठिकाणांच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्ट्या, कच-याने तुंबलेली गटारे पाहा व आपल्याला असे वाटते की आपण ऐतिहासिक वारशाचे जतन करत आहोत!

आपल्याला ऐतिहासिक वारसा ओळखता आला पाहिजे व त्याचा आदर करता आला पाहिजे कारण तो आपल्या संस्कृतीचा कणा आहे. या ठिकाणांना आपल्या शहराच्या सुशोभिकरण योजनेचा एक भाग बनवा व त्यांच्यासाठी निधी देऊन तसेच खाजगी सहभागातून त्यांची देखभाल करा. शहराचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काय महत्व आहे याविषयी सर्व भागधारकांना जागरुक करा, आपल्याला त्यांचा व्यावसायिक वापरही करता येईल. उदाहरणार्थ सिंगापूरच्या जुन्या शहराचा व भविष्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांचा ऐतिहासिक वारसा नकाशा आहे, त्यांनी या स्थळांचा मार्ग तयार केला आहे. आपण अशा कल्पना का राबवत नाही? आपल्या आजूबाजूला असे अनेक देश आहेत ज्यांना ऐतिहासिक वारसा पर्यटनाचा व्यावसायिक फायदा झाला आहे, नेपाळ त्यापैकीच एक आहे! आपण अतिशय अभिमानाने स्वतःला ऐतिहासिक वारसा शहर म्हणून मिरवतो मात्र प्रत्यक्षात तो केवळ पोकळ दावा आहे! स्वतःला एक प्रश्न विचारा की कुणी बाहेरील व्यक्ती आपल्याकडे आली आणि आपल्याला पुण्याचा ऐतिहासिक वारसा दाखवायला सांगितला तर आपण तिला काय दाखवणार आहोत? म्हणूनच पर्यावरणाप्रमाणेच ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यालाही प्राधान्य द्या व आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश करा. आपण लवकरात लवकर या दिशेने विचार करायला सुरुवात केली पाहिजे कारण जे शहर किंवा जो देश आपल्या भूतकाळाचा आदर करत नाही तो लवकरच इतिहासजमा होतो! आपला ऐतिहासिक वारसा ही आपली सर्वोत्तम संपत्ती आहे व आपण हे समजून घेतले पाहिजे. घटना चिकित्सा म्हणून शहरातील मुख्य दहा ऐतिहासिक वारसा स्थळे घ्या, त्यांच्यावर काम करा, त्यांचा एक आदर्श नमुना तयार करा व त्यानंतर तेच सूत्र इतर सर्व ऐतिहासिक वारसा ठिकाणांसाठीही वापरा व हे लवकर करा. या शहरातल्या बिचा-या वारशांसाठी वेळ आधीच हातातून निघून गेली आहे. आता आपण पावले उचलली नाही तर आपल्याकडे या स्थळांची केवळ छायाचित्रे व त्याविषयीचे लेख उरतील व आपण कोणताही सामाजिक पैलू नसलेला समाज होऊ!

मी त्या मुलींना सांगितले की हा केवळ तुमचा आणखी एक शालेय प्रकल्प होऊ नये, तर तुम्ही हे जास्तीत जास्त व्यासपीठांवर सांगितले पाहिजे. माहिती देणे ही सुरुवात आहे, त्यामुळे कधी ना कधी, कुणामुळे तरी काही चांगला फरक पडेल. ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वर्तमानकाळात इतिहासाचा एक भाग बनणे व तो पुढे नेणे. काय कमावले यापेक्षा आपण मागे काय सोडतो ते महत्वाचे असणार आहे, हे आपण स्वतःला बजावले पाहिजे, असे झाले तरच आपल्या ऐतिहासिक वारसा स्थळांसाठी काही आशा आहे!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्सhttps://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif


No comments:

Post a Comment