Sunday 29 March 2020

श्रद्धा, सबुरी आणि लॉकडाऊन





























जेव्हा जीवन जगणे कठीण करते, तेव्हा सर्वसामान्य माणूस झुकतो व शरण जातो, मात्र काही माणसं जीवनाहूनही कणखर होतात व जगण्याला पुरून उरतात”...

वरील वाक्य दुसरं कुणी नाही तर मीच म्हटले आहे, त्यासाठी लॉकडाऊनच्या काळातल्या तत्वज्ञानाचे आभार! सर्व काही थंडावून अप्रत्यक्षपणे जवळपास पंधरा दिवस उलटून गेलेत व संपूर्ण देशात पूर्णपणे लॉकडाऊन होऊन आता एक आठवडा झालाय. यातली सगळ्यात चांगली बाब म्हणजे लोक सहकार्य करताहेत (त्यांच्याकडे दुसरा काय पर्याय आहे) व सर्वात वाईट बाब म्हणजे आपण सगळे निरुपयोगी झालो आहोत व आपल्याकडे वेळ असूनही आपण आपली सृजनशीलता वायफळ (मजेशीर नाही) विनोद करण्यात, गोंधळ निर्माण करण्यात व नकारात्मकता पसरवण्यात वाया घालवतोय. थोडक्यात आपल्याला शांतपणे बसून काहीतरी सृजनशील करायची सवयच नाही. मी हे बहुसंख्य लोकांविषयी बोलतोय, असे थोडेफार लोक आहेत जे हा लॉकडाऊनचा काळ काहीतरी उत्पादक तयार करण्यासाठी वापरताहेत, ज्यामुळे इतरांना नैराश्यावर मात करता येईल. तासन् तास काहीही न करता बसून राहिल्यानं बऱ्याच जणांना नैराश्य यायला सुरूवात झालीय. 

उदाहरणार्थ काही जण ऑनलाईन व्यायामाचे कार्यक्रम आयोजित करत आहेत, काही जण ऑनलाईन कलाकुसरीच्या वस्तू बनवायला शिकवतंय, काही महिला (पुरुषही) स्वयंपाकाचे ऑनलाईन वर्ग घेत आहेत, जागतिक आरोग्य संघटनाही शांत राहण्यासाठी ऑनलाइन सूचना देत आहे, अशी ही यादी लांबलचक आहे. मात्र एकीकडे बहुतेक वॉट्सप ग्रुप्स पुन्हा पुन्हा तेच ते फॉरवर्ड पाठवण्यात व्यग्र आहेत, यातल्या १०० पैकी ९९ जणांनी ते वाचले किंवा आपण काय फॉरवर्ड करतोय हे पाहिलेही नसते. अशाप्रकारेफॉरवर्ड करून ते दोन गोष्टी साध्य करायचा प्रयत्न करत आहेत, एक म्हणजे त्यांचा मोकळा वेळ घालवताहेत व दुसरे म्हणजे वॉट्सपवर आपलं अस्तित्व जाणवून देण्याचा प्रयत्न करताहेत. 

त्यानंतर काही माणसं अशीही आहेत, जी बाहेर जाऊ शकताहेत जी इतरांना शक्य होईल ती सर्व मदत करताहेत, ती रस्त्यावर, त्यांच्या कार्यालयातून या युद्ध परिस्थितीला तोंड देताहेत, यातले बहुतेक सरकारी कर्मचारी व काही सामाजिक संघटनांची माणसं आहेत. 

काल पाऊस पडला आणि वॉट्सपवर एक संदेश आला की, "आज तारीख व वार काय आहे याविषयी तुम्ही कदाचित गोंधळून गेला असाल तर आता पाऊस पडल्यामुळे हा कोणता हंगाम आहे असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल!" हे जरी कल्पक असलं तरी आपण आपली सृजनशीलता अधिक चांगल्या कारणांसाठी वापरायला काय हरकत आहे कारण सृजनशीलता चुकीच्या कारणानं वापरण्यासारखा दुसरा अपव्यय नाही. मी असं म्हणत नाही की विनोद करणं चूक आहे व विनोद करूच नका पण तो केवळ आयुष्याचा एक भाग आहे हे विसरू नका. नाहीतर विनोदाचा अतिरेक झाल्यानं आयुष्यच एक विनोद होऊन जाईल.

आता लॉकडाऊनच्या अंमलबजावणी विषयी बोलू, हळूहळू आपल्याला परिस्थितीची जाणीव होतेय. आपल्याकडे बाँबस्फोट, दहशतवादी हल्ले, भूकंप, पूर, स्वाईनफ्लू यासारख्या अनेक आपत्ती येऊन गेल्या आहेत, तरीही आपण त्यातून काही शिकलो नाही, किमान यावेळी तरी आपत्तीला तोंड देण्याचा धडा आपण विसरणार नाही अशी आशा आहे. प्रशासनाला लोकांना घरात ठेवण्यासाठी व या आपत्तीमध्ये स्वतःची जबाबदारी समजून घ्यावी यासाठी जेवढे प्रयत्न करावे लागता हेत त्यावरून कुणीच यासाठी तयार नव्हतं हे आपल्याला दिसून येतंय.तुम्ही सतत भीतीखाली जगू नये हे मान्य आहे पण तुम्ही किमान काळजी तरी घेतली पाहिजे हे तुमच्या सारख्या शिकल्या सवरलेल्या लोकांकडून अपेक्षित आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणा तेवढीच जबाबदार आहे कारण साथीच्या रोगांमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी बचाव प्रशिक्षण कुठे आहे. जाऊ द्या हा केवळ विनोद होता जिथे आग लागणे किंवा बाँबस्फोट यासाठी सराव प्रशिक्षणही आयोजित केले जात नाही तिथे मी साथीच्या रोगांसाठी सराव प्रशिक्षणाची अपेक्षा कशी करू शकतो. आपल्या येथे काही पोलीस सराव प्रशिक्षण आयोजित करतात, त्यासाठी एखाद्या प्रसिद्ध मॉलमध्ये दहशतवादी आल्याची कल्पना केली जाते (हा मॉल प्रसिद्ध असणे अतिशय आवश्यक आहे नाहीतर आपल्याला प्रसिद्धी कशी मिळेल). त्यानंतर कमांडो येऊन त्यांची सुटका करतात, दुसऱ्या दिवशी सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये पोलीस शिपायांची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. त्यांनी मॉलमध्ये प्रवेश करताना काहीही संरक्षण नंतर आपत्ती काळाचे संरक्षनार्थ साधने घातलेली नसतात (पोलीस रस्त्यावर फिरत असतात त्याप्रमाणे) आणि खेळ संपतो. मला आठवतंय एक पोलीस शिपाई अशाच एका सराव प्रशिक्षणात लाईफ जॅकेटसारखं मूलभूत संरक्षणही न घेता ती बाँबसदृश वस्तू हाताळत होता, जाऊ दे; ते सराव प्रशिक्षण असल्याचं त्याला माहिती होतं.जर संबंधित सरकारी विभागांमध्ये अशी परिस्थिती असेल तर या स्मार्ट शहरातल्या निम्म्याहून अधिक बहुमजली इमारतीतल्या अग्निशामक यंत्रणा बंद आहेत, कधीच दुरुस्त केलेल्या नाहीत व पूर्ण झालेल्या इमारतींमध्ये राहणारी माणसे इमारतीच्या सुरक्षा लेखा परीक्षणावर १०% ही खर्च करत नाहीत. अशावेळी मी सरकारनं आपत्तीसाठी सराव प्रशिक्षणं घ्यावीत व सज्ज राहावं अशी अपेक्षा कशी करू शकतो. शेवटी सरकारही "लोकांनी, लोकांचे व लोकांसाठी चालवलेले असते", खरंच आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा सरकार आणि लोकांचा ताळमेळ उत्तमच आहे नाही का!
मी उपहासात्मक किंवा नकारात्मक बोलतोय असं तुम्हाला वाटत असेल, एक चाचणी घ्या; तुमच्या कोणत्याही दहा मित्र मैत्रिणींना कॉल करा/वॉट्सप करा (या चाचणीत तुमचाही समावेश होतो) व त्याला/तिला स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा संपर्क क्रमांक, पत्ता व इतर क्रमांकविचारा (त्याला किंवा तिला याचा काय अर्थ होतो हे देखील विचारा) व अगदी दोन लोकांनीही बरोबर उत्तर दिलं तर मी माझे शब्द या शेयारिंग मधून शब्दशाहा परत घेईन. खरतर मी तुम्हाला आव्हान देतोय हाच समाज म्हणून आपण याच नाही तर कोणत्याही आपत्तीबाबत किती अजाण आहोत याचा पुरावा आहे. खरी आपत्ती कोणताही इशारा देऊन येत नाही. खरंतर बहुतेक आपत्तींचा इशारा आधी मिळालेला असतो, मात्र आपण मूर्खासारखे वॉट्सप संदेश पाठवत बसतो आणि या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो, अर्थात हा स्वतंत्र विषय आहे.

जेव्हा एखाद्या साथीच्या रोगासारखी आपत्ती येते, तेव्हा मानवी शरीराच्या वैयक्तिक रोगप्रतिकारक्षमतेचा प्रश्न येतो. या बाबतीत आपण जगातील कुठल्याही देशाच्या पुढे आहोत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार आपल्या देशातल्या जवळपास ९०% लोकांना पीण्यायोग्य पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीही उपलब्ध नाहीत व तरीही ते जगत असतात. मी साधारण दोन दशकांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा युरोपच्या सहलीला गेलो होतो, तेव्हा मी मित्राला हॉटेलमधून निघायच्या वेळी सोबत प्यायला पाणी घ्यायचं का असं सहज विचारलं, कारण पाणी विकत घेणं महाग पडेल हे मला माहिती होतं.त्यावर माझा मित्र अभिमानानं मला म्हणाला, पाणी सोबत न्यायची गरज नाही, युरोपात तू कुठलाही नळ उघडून त्याचं पाणी पिऊ शकतोस, ते पिण्यासाठी सुरक्षित असेल आपल्या देशात, नेमकी याच्या उलट परिस्थिती असते, तुम्ही कुठलाही नळ उघडा किंवा पाण्याची भांडी पाहा, ते पाणी पिण्यासाठी असुरक्षित असतं तरीही आपण ते पितो, आपलं आयुष्य सुरळीतपणे सुरू असतं, त्यामुळे आपण काहीही पचवू शकतो, आपल्यामध्ये बहुतेक विषाणू किंवा जीवाणूंच्या हल्ल्यांविरुद्ध रोगप्रतिकार क्षमता असते. ही पुण्यासारख्या स्मार्ट शहरातली परिस्थिती आहे, तुम्ही खेड्यांमध्ये किंवा अगदी गावांमध्ये गेलात तर लोक जिथलं पाणी पितात ते पाहून तुम्हाला चक्कर येईल. हे कटू सत्य आहे, भारतातल्या पाण्याच्या स्थितीविषयी ताजी (वास्तविक जीवनातील) दृश्य पाहण्यासाठी गुगलवर शोध घ्या. मी चेष्टा करत नाहीये रोग प्रतिकार क्षमते विषयी बोलायचं तर पाणीच काय लोकांना स्वच्छते विषयक मूलभूत सोयीही मिळत नाहीत, आपली सार्वजनिक रुग्णालये गलिच्छ आहेत (त्यातली बहुतेक) व अगदी आपल्या डॉक्टरांनाही कोंदट खोल्यांमध्ये मोठमोठ्या शस्त्रक्रिया करायची सवय असते जिथे पुरेशी प्रकाश व्यवस्था किंवा जीवनावश्यक ती साधनेही नसतात. या देशामध्ये हजारो महिलांना आगगाडीच्या डब्यात, बस स्थानकावर, रस्त्यावर, शेतात प्रसूती वेदना सुरू होतात व तिथेच त्यांची प्रसूती होते. त्यांना फारशी सुटीही मिळत नाही की लगेच बाळाला छातीशी घेऊन कामाला जुंपतात; तरीही या देशात आयुष्य थांबत नाही, सुरूच राहतं!

मात्र आता आपला भूतकाळ मागे सोडू आणि यातून धडा घेऊन काहीतरी नवीन लिहू. कारण प्रत्येक वेळी काहीतरी चमत्कार होऊन आपण वाचणार नाही. आपण आपल्यातल्या रोगप्रतिकारक क्षमते सोबतच चांगल्या सवयीही लावून घेतल्या पाहिजेत. याची सुरूवात स्वतःपासून केली पाहिजे, वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छता राखून थोडा अधिक चांगला नागरी समाज घडवला पाहिजे. केवळ पेट्रोल व गॅसच्या किमती किंवा आरक्षण यासारख्या विषयांवरच आवाज न उठवता सार्वजनिक आरोग्याचे मुद्देही मांडले पाहिजेत.

काही वेळा मला आपल्या देशवासियांची शारीरिक पेक्षाही मानसिक रोगप्रतिकार क्षमता जास्त आहे असं वाटतं, नाहीतर जिथे प्रत्येक दिवशी यातना भोगाव्या लागतात (बहुतेकांना) अशा विपरित परिस्थितीत कुणी कसा जगू शकतो? पण यामुळेच मला आपण सध्याचं युद्ध जिंकू अशी आशाही वाटते. आपल्या देशामध्ये श्रद्धा सबुरी आणि सबुरी हे दोन शब्द परमपवित्र मानले जातात, या दोन्हींमुळेच आपली रोगप्रतिकार क्षमताही जास्त आहे, जय हो!

संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलोपर्स
इमेल: smd156812@gmail.com

No comments:

Post a Comment