Wednesday 1 April 2020

निसर्ग, माणूस आणि लॉकडाऊन


























आपल्या हव्यासापेक्षाही निसर्ग खूप खूप मोठा आहे व तो नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला पुरून उरतो”...

आत्तापर्यंत तुम्ही कदाचित ओळखलं असेल की पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या तत्त्वज्ञानाविषयी बोलतोय. व्यायामासाठी इमारतीभोवती फेऱ्या मारणे एवढा एकमेव पर्याय उरला असताना मला भोवतालच्या झाडांवर किमान पाच प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला. मी थांबलो, चालत असताना मी शक्यतो असं करत नाही पण असा किलबिलाट ऐकू येणं हीसुद्धा माझ्यासाठी अतिशय दुर्मिळ बाब होती. मी दयाळ पक्षी, कोकीळ, बुलबुल, पारस व मैना (आणखीही काही असू शकतील) यासारख्या पक्षांचा किलबिलाट या स्मार्ट शहरात शेवटचा कधी ऐकला होता असं मी स्वतःलाच विचारलं. केवळ वर नमूद केलेले पक्षीच नाही तर चिमण्याही भोवताली नाचत होत्या, पोपटांचे थवे होते ज्यांचा कलकलाट ऐकू येत होता. मी क्षणभर विसरलो की मी पुण्यासारख्या शहराच्या मध्यवर्ती भागात आहे, कान्हा किंवा ताडोबासारख्या एखाद्या जंगलात नाही. 

आज सकाळी माझ्या इमारतीभोवती चालत असताना मला चिंचा (आम्ही विदर्भात तिला इंग्लिश चिंच किंवा विलायती चिंच म्हणतो) खाली पडलेल्या दिसल्या. मला आठवतंय मी शाळेत असताना उन्हाळ्यात तिच्या बिया गोळा करायला आम्ही धडपडायचोआता उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा येतो आणि जातो पण त्यामुळे आपण भोवतालच्या परिसरामध्ये प्रत्येक मोसमात होणाऱ्या बदलांकडे कधीच लक्ष देत नाही. आपण फक्त फार मुसळधार पाऊस पडला किंवा अतिशय कमी पाऊस पडला तर चिंता करतो.उन्हाळा आला की आपल्याला घरातल्या वातानुकूलन यंत्रांची आणि त्यांची दुरुस्ती करायची आठवण येते. मात्र बहाव्याच्या झाडांवर बहरलेले पिवळ्याधम्मक फुलांचे गुच्छ किंवा आपल्या घराभोवतीच्या रस्त्यावर पडलेल्या गाभुळलेल्या चिंचांकडे आपलं लक्षंच जात नाही. हिवाळा आला की आपण अद्ययावत फॅशनचे कपडे खरेदी करतो मात्र झाडांच्या पानांच्या रंगांकडे क्वचितच लक्षं देतो. हिवाळा असाच जातो.

आपण निसर्गाकडे दुर्लक्ष करतो मात्र निसर्ग कधीच स्वतःचं कौतुक किंवा वाहवा करणं थांबवत नाही. याचा पुरावा म्हणजे इमारतीभोवतीच्या जागेत (जी खरंतर वाहनं बाहेर काढायची जागा आहे) फिरताना मला ब्राह्मणी मैनांची एक जोडी दिसली, माझ्या अस्तित्त्वाची दखलही न घेता त्या चिंचेच्या बियांवर ताव मारण्यात गुंग होत्या. अर्थात मैना हा अतिशय निडर व आक्रमक पक्षी आहे. पण मला जाणवलं की आता कोणतीही वाहनं त्यांच्या आड येणार नाहीत हे त्यांना माहिती असावं, नाहीतर मी कोणताही पक्षी किंवा मैना एवढ्या निवांतपणे अगदी दुपारच्या वेळीही, जेव्हा वाहने व माणसांची वर्दळ कमी असते तेव्हा इमारतीच्या भोवती फिरताना पाहिलेलं नाही.

लॉकडाऊन सुरू असताना अशाच एका संध्याकाळी मी माझ्या अभ्यासिकेच्या गच्चीत उभा होतो. तिथून खालील रस्ता दिसत होता ज्याच्या दुतर्फा अनेक झाडं आहेत. त्या झाडांभोवती मी अनेक वटवाघुळं फिरताना पाहिली. हिंदू पुराणांमध्ये वटवाघुळाला अशुभ मानतात खरतर आपल्याकडे कुठल्याच निशाचर प्राण्याला शुभ मानत नाहीत कारण आपल्याला नेहमीच अंधाराची भीती वाटते. पण जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून संध्याकाळी लवकर वटवाघुळे मुक्त संचार करत आहेत ही निसर्गासाठी चांगली बाब आहे. मला माहितीय की रस्त्याच्याकडेला असलेल्या या झाडांवर अनेक वटवाघुळे असतात मात्र पूर्वी जेव्हा माणसांची वर्दळ, आपण केलेले ध्वनी व प्रकाशाचे  प्रदूषण (रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या अनेक मॅरेज लॉनची कृपा) कमी होते तेव्हा रात्री उशीरा त्यांचा संचार सुरू झालेला मी पाहिला होता. यामुळे वटवाघुळांना शिकारीसाठी (अन्न शोधण्यासाठी) अतिशय कमी म्हणजे मध्यरात्रीनंतरचे काही तास एवढाच वेळ मिळत असल्याने त्यांचे जीवन अतिशय त्रासदायक झाले होते. आता लॉकडाऊनमुळे संध्याकाळ व रात्रीचा काळही वटवाघुळे तसेच माणसांच्या भाऊगर्दीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या इतरही अनेक प्राण्यांसाठी बराच सुसह्य झाला आहे.

माझ्या मनात विचार आला कीइतक्या सुंदर दृश्यांकडे माझं एरवी लक्षं का गेलं नाही?या पक्षांनी काही पंधरा दिवसातच इथे येऊन किलबिलाट करायला सुरूवात केलेली नाही. सुदैवानं मी शहराच्या ज्या भागात राहतो तिथे काँक्रिटच्या इमारतींसोबतच अजूनही भरपूर हिरवळ आहे, मोठी झाडेही टिकून आहेत. एक म्हणजे मला भोवताली पाहायला, अशी दृश्य अनुभवायला कधीच वेळ मिळत नाही (अर्थात हे मीच जाहीर केलं आहे) दुसरे म्हणजे, इतर प्रत्येक गोष्टीच्या आवाजात, म्हणजे वाहनांची इंजिने, हॉर्न, मोबाईल फोनचे कॉल आणि मनात सतत सुरू असलेला विचारांचा कल्लोळ यामुळेशहरामध्ये निसर्गाप्रती आपल्या संवेदना बोथट झालेल्या असतात. म्हणूनच मला माझ्याभोवती असलेल्या या पक्षांचे अस्तित्व जाणवले नाही व मला आधी त्यांचे संगीत ऐकू आले नाही. आता प्रत्येक माणूस (म्हणजे बहुतेकजण) आपल्या घरात टाळेबंद झालाय व त्यांचे पक्षी म्हणजेच वाहनं पार्किंगमध्ये लावल्यानं, खरे पक्षी तेही तुमचे शेजारी आहेत याची तुम्हाला जाणीव करून देऊ शकताहेत,त्यांच्या मागण्या अतिशय कमी आहेत व तुमची लॉकडाऊन हे खरंतर त्यांच्यासाठी स्वातंत्र्य आहे! जेव्हा बहुतेक बांधकाम व्यावसायिक अभिमानानं त्यांच्या प्रकल्पांची जाहिरात पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागे व्हा अशी करतात, तेव्हा मला प्रश्न पडतो की आपण नक्की कुणाची फसवणूक करतोय; स्वतःची किंवा आपल्या ग्राहकांची किंवा त्या बिचाऱ्या पक्षांची? कारण बहुतेक पक्ष्यांना आता या शहरांमध्ये त्यांची घरटी बांधण्यासाठी धड जागाही नाहीत. अशा परिस्थितीतही काही पक्ष्यांनी या काँक्रिटच्या जंगलांमध्ये आपली घरटी बांधली आहेत, ते किलबिलाट करायचं धाडस दाखवतात, आपल्याला त्यांचं सुमधूर संगीत ऐकवतात, पण अडचण अशी आहे की आपल्यापैकी किती जणांना हे संगीत ऐकायला वेळ आहे किंवा आपल्यापैकी किती जण या संगीताची दखल घेतात?माझं बोलणं कदाचित काही जणांना अतिशय कटू वाटेल पण हेच वास्तव आहे, आपण कार पार्किंगसाठी आपल्या इमारतीच्या आवारातली झाडे कापतो, आपण झाडांचा पालापाचोळा, फांद्या खाली पडून जास्त कचरा होतो म्हणून लांब फांद्या छाटून टाकतो (झाडांनो माफ करा पण माणसं असाच विचार करतात). झाडांमुळे आपल्या तथाकथित घरांमध्ये प्रकाशात व हवा खेळती राहण्यात अडथळा येतो, आपण फक्त त्यांचा बुंधा शिल्लक ठेवून बाकी सगळं काही छाटून टाकतो, कालांतरानं तीही मरून जातात.या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पक्ष्यांना आपल्या आयुष्यातून काढून टाकतो. आपण विसरतो की आपणक्ष्यांच्या किलबिलाटानं जागे व्हा अशी जाहिरात वाचून सदनिका आरक्षित केली होती, खरंच आपण दयनीय आहोत!

आता अचानक एका विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे निसर्गानंचआपलं आयुष्य स्तब्ध केल्यानं आपल्याला पुन्हा आपल्या भोवताली असलेल्या निसर्गाचं अस्तित्व व त्याचं महत्त्व जाणवू लागलं आहे. नेहमीप्रमाणे वॉट्सपवर मला अनेक पोस्ट (म्हणजे फॉरवर्ड) पाहायला मिळाल्या, ज्यात चुकवू नका किंवा हे सुंदर आहे अशा सूचनाही केलेल्या होत्या. त्यात कविता होत्या किंवा कुणा चिनी अथवा इटालियन लोकांचं मनोगत होतं त्यात ते जगाला सांगत होते की अचानक त्यांना भोवतालचं जग किती शांत आहे व पक्षी कसे पुन्हा गाऊ लागले आहेत, फुले बहरली आहेत, हवेच्या मंद झुळूकेवर गवत डोलत आहे इत्यादी गोष्टींची जाणीव होऊ लागली. आपल्या देशवासियांनीही अशा पोस्ट अरे व्वा, किती छान, अप्रतिम वगैरेसारख्या प्रतिक्रिया देऊन शेअर केल्या. अशा पोस्ट टाकणाऱ्या व त्या फॉरवर्ड करणाऱ्या सर्व व्यक्तींविषयी पूर्णपणे आदर राखत सांगावसं वाटतं की निसर्ग नेहमीच आपल्याभोवती होता, आहे व राहील, आपल्याला अजूनही निसर्गाची क्षमता समजलेली नाही.तो प्रत्येक प्रजातीच्या आधीपासून अस्तित्वात आहे, किंबहुना प्रत्येक प्रजाती हे त्याचंच रूप आहे आणि आपण माणसे या संपूर्ण जीवन चक्रातील एक लहानसा दुवा आहोत.

निसर्गानेच ज्या प्रजातींची निर्मिती केली आहे त्यातील केवळ माणसानेच महामूर्ख ही उपाधी पटकावली आहे, आपल्याला असे वाटते की निसर्गाचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. वेड्या माणसांनो, हा लॉकडाऊनचा काळ या काँक्रिटच्या जंगलात राहणाऱ्या रहिवाशांनी निसर्गाला वाचवण्यासाठी आधी स्वतःला वाचवावं हे समजून घेण्यासाठी दिलेली एक संधी आहे. आपण किमान एवढा धडा शिकलो तरी, लॉकडाऊनचा आदेश ज्यासाठी देण्यात आला होता त्यापेक्षाही बराच मोठा हेतू साध्य होईल. मी हा धडा घेतलाय, तुमचं काय?

संजय देशपांडे 

No comments:

Post a Comment