Wednesday 8 April 2020

चखदे इंडीया!
















तुम्ही अगतिक आहात, दुबळे आहात व शत्रू सामर्थ्यवान आहे हे तुम्हाला माहिती असतं तेव्हाच युद्धात तुमची खरी परीक्षा असते”...


हे सुद्धा लॉकडाऊनच्याच काळातलं तत्वज्ञान आहे. पण जशी दिनदर्शिकेची पानं उलटताहेत तसा मनावरचा ताण वाढत चाललाय. मी जेव्हा एकटा बसून विचार करत असतो तेव्हा मला माझ्या हृदयाच्या ठोक्यांमधून, प्रत्येक श्वासामधून हे जाणवत असतं व मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांनाही असंच वाटत असेल. त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही कारण शेवटी आपण सगळी माणसं आहोत व माणसांनाच (अगदी प्राण्यांना व वनस्पतींनाही) भाव-भावना असतात (काही अपवाद वगळता) व मानसिक ताण हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. दिवसागणिक साथीचा प्रादुर्भाव वाढतोय व आपल्यासारख्या लोकसंख्येची घनता प्रचंड असलेल्या देशामध्ये हे होणं स्वाभाविकच होतं मात्र अशा भीतीच्या वातावरणाला धैर्यानं तोंड देत विविध आघाड्यांवर झटणारी माणसंही तितकीच महत्त्वाची आहेत.

या आघाडीवर आपले खाकीवाले म्हणजेच पोलीस नक्कीच आघाडीवर आहेत. आता जवळपास एक महिना होऊन गेलाय, केवळ साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जनविरोधाला तोंड देत (जो आधीपासूनच होता) धार्मिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा योग्य निर्णय घेण्यापासून ते रस्त्यावरील प्रत्येक महिला व पुरुषाला लॉकडाऊनचं पालन करायला लावण्यापर्यंत प्रत्येक कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या पोलीसांचं समाजाच्या प्रत्येक वर्गातून जोरदार कौतुक झालं पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या लोकांना त्यांच्या वैयक्तिक गरजांसाठी बाहेर पडणं अत्यावश्यक आहे त्यांच्यासाठी पुणे पोलीसांनी ऑनलाईन यंत्रणा तयार केली आहे. यावर बरेच जण म्हणतील की त्यात काय मोठंसं, हे त्यांचं कामच आहे. त्यांनी सामान्य माणसाला आत्तापर्यंत कशी वागणूक दिलीय ते पाहा (अर्थात हे नाकारता येणार नाही). तरीही घरी सुरक्षितपणे विश्रांती घेत असलेल्या किंवा वेळ घालवत असलेल्या प्रत्येक माणसाची सुरक्षा त्यांच्याच खांद्यावर आहे. स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता, तोंडाला नुसता एक मास्क लावून किंवा साधा हातरुमाल बांधून मोकळ्या रस्त्यांवर उभं राहणं, लोकांवर त्यांच्या घरातच राहण्यासाठी सक्ती किंवा विनंती करणं, यातून महाराष्ट्र पोलीसांनी या कठीण काळातही विलक्षण शौर्य दाखवलं आहे. त्यासाठी आपण भूतकाळ विसरून, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलीच पाहिजे!

दुर्दैवानं आपण (म्हणजे आपल्यापैकी बरेच जण) लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करून त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्याऐवजी, नेमकं त्याच्या उलट करत आहोत. आपल्यापैकी कुणालाच लॉकडाऊनच्या काळात स्वतःच्या घरात अनेक आठवडे बंद राहायला आवडत नाही किंवा त्याचा अनुभव नाही हे मान्य आहे. पण पोलीसांनाही असा अनुभव नाही, तरीही स्वतःच्या जीव धोक्यात घालून खुल्या रस्त्यावर ते आपल्यासाठी उभे आहेत, एवढं तरी आपल्याला समजलं पाहिजे. पण पोलीसांचे आभार मानण्याऐवजी रस्त्यावर जाण्यासाठी आपण त्यांच्याशी वाद घालतो, आपण विलगीकरणाच्या सूचनांचं पालन करत नाही; आपण रस्त्यांवर सहज म्हणून  मारायला जातो, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करतो व इतरही बऱ्याच गोष्टी करतो. 

विचार करा तुम्ही एखाद्या लहान मुलीचे बाबा आहात किंवा तुमच्यावर अवलंबून असलेल्या म्हाताऱ्या वडिलांचा तरूण मुलगा आहात, तुम्ही कुणाचीतरी आई आहात जिचा मेंदू कर्तव्य बजावतोय पण मन मात्र घरी वाट पाहणाऱ्या लहान मुलांकडे धाव घेतंय, तुम्ही एक पत्नी आहात, नवरा घरी आहे व तुम्ही रस्त्यावर कर्तव्याच्या नावाखाली तासन् तास अडकून पडला आहात. या सगळ्यात, तुम्ही ज्या लोकांसाठी हे करताय त्यांच्याकडूनही टीका व शिव्याशाप मिळत असल्यानं तुम्ही सातत्यानं एका अदृश्य तणावाखाली जगताय. अशावेळी किती जणांना खाकी वर्दीचा व त्यासोबत मिळणाऱ्या अधिकारांचा हेवा वाटेल असा प्रश्न मला पडलाय? त्याचवेळी स्पायडर मॅनचं महान तत्वज्ञान आता आपल्याला अगदी लागू होतंयमोठ्या सामर्थ्यासोबत मोठी जबाबदारीही येते”,  हे लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो. आता संपूर्ण पोलीस दल रस्त्यावर असल्यावर सुद्धा गुन्हे थांबवणे व तपास करणे हे पोलिस दलाचे मुख्य काम आहे हे तुम्ही विसरू शकत नाही, जे रस्त्यावर गस्त घालण्याच्या काळातही सुरूच आहे.

त्यानंतर संपूर्ण देशभरात धर्याचाच्या बाबतीत इतर कुणापेक्षाही आपले डॉक्टर्स एक पायरी वर आहेत, कारण त्यांना संसर्ग होण्याचा थेट धोका सर्वाधिक आहे, तरीही ते रुग्णाला नाकारू शकत नाही, विचार करा आज डॉक्टर व त्यांच्या कुटुंबाची मनस्थिती कशी असेल? या देशातल्या बहुतेक ओपीडीमध्ये (बाह्य रुग्ण विभाग) किंवा जीपीच्या (सर्वसाधारण वैद्यकीय व्यवसायिक) प्रतीक्षा कक्षात अर्ध्याहून अधिक रुग्ण या विषाणूजन्य साथीच्या रोगासारख्या तब्येतीच्या तक्रारी घेऊन येत आहेत. अशावेळी दवाखान्यात जाण्यासाठी व स्वतःची भीती बाजूला ठेवून घाबरलेल्या रुग्णांना समजावण्यासाठी सिंहाचं (सिंहीणीचंही) हृदय असलं पाहिजे. असे अतुल्य शौर्य दाखवण्यासाठी प्रत्येक डॉक्टर व त्यांना मदत करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना माझा सलाम. पुण्यातल्या ससूनसारख्या सार्वजनिक रुग्णालयातल्या किंवा दवाखान्यातल्या डॉक्टरांचं (व सहाय्यक कर्मचाऱ्यांचं) काम आणखी अवघड असतं. त्यांच्याकडे अतिशय मर्यादित सोयीसुविधा व रुग्णसंख्या जास्त असल्यानं कामाचा किती ताण असतो हे आपण सगळे जाणतो. पोलीसांप्रमाणेच त्यांना केवळ याच आजाराला तोंड द्यायचेय असे नाही, त्यांना इतर रूग्णही पाहायचे आहेत व त्यांना सुरक्षित ठेवायचे आहे. डॉक्टरांवर ही एक अतिरिक्त जबाबदारी आहे.

त्यानंतर स्थानिक प्रशासकीय संस्थांच्या (पुणे महानगरपालिका/पिंपरी चिंचवड महानगरपालिका/महावितरण म्हणजेच एमएसईबी) पाणी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, अग्निशमन दल, वीज पुरवठा त्याशिवाय रस्ते तसेच सार्वजनिक जागांची स्वच्छता, कचरा उचलणे इत्यादी कितीतरी अत्यावश्यक सेवा शांतपणे सुरू आहेत व म्हणूनच आपल्याला आपल्या आयुष्यातलं त्यांचं महत्त्व जाणवत नाही. या काळात वर नमूद केलेल्यापैकी कोणतीही सेवा तुम्ही खंडित करू शकत नाही व अनेक लोक त्यासाठी काम करत आहेत.खाजगी क्षेत्रामध्येही आपल्याकडे वैद्यकीय दुकाने, किराणामालाची दुकाने यांचाच एकमेव आधार आहे. हे लोक केवळ पैसे कमावण्यासाठी नाही तर आपल्याला सेवा देण्यासाठी दुकानं उघडी ठेवत असल्यामुळे त्यांना संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो याकडे आपण दुर्लक्ष करतोसगळ्यात शेवटी येतात ते म्हणजे ऑनलाईन खाद्यपदार्थ, अत्यावश्यक सामान तसेच वर्तमानपत्रं पोहोचवणारी मुले, यामध्ये वृत्तपत्र माध्यमांमधील सर्व कर्मचाऱ्यांचाही समावेश होतो, हे सगळे खरंतर आपण सुरक्षित राहावे यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात, आपण कोणत्या शब्दात त्यांचे आभार व्यक्त करायचे? 
मित्रांनो, आपण केवळ बाहेर जाता येत नसल्यामुळे, काम करता येत नसल्यामुळेच वैतागलेलो नाही तर हा आपल्याला थेट आपल्या तथाकथित स्वातंत्र्यावरच घाला वाटतोय.विचार करा आपण आपल्या घरात सुरक्षित व आरामात राहावं यासाठी वर उल्लेख केलेल्या सर्व पुरुष व महिलांना किती धोका पत्करावा लागतोय. पण त्या बदल्यात आपण त्यांना काय देतोय, तर आपण फक्त निरर्थक संदेश पुढे पाठवतोय, ऑनलाईन खेळ खेळतोय, टीव्हीवरील कार्यक्रम किंवा चित्रपट पाहतोय, पिझ्झा मागवतोय व ऑनलाईन पिझ्झा मागवण्यासाठी एकही दुकान उघडं दिसलं नाही तर यंत्रणेला दोष देतोय.
अशा परिस्थितीतही सकारात्मक, आशादायक गोष्टी समोर येताहेत, यातही पुन्हा पोलीस आघाडीवर आहेत. लातूरमधल्या किल्लारीच्या एका पोलीस उप निरीक्षकानं त्याचा एक महिन्याचा पगार या आपत्तीविरोधात लढण्यासाठी दिला. अगदी रतन टाटांसारख्या उद्योजकांपासून ते मोठमोठ्या व्यक्तींपर्यंत अनेकजण एकजूट होऊन मदत करताहेत. अनेक डॉक्टर कोणतेही शुल्क न आकारता त्यांच्या सेवा देत आहेत. अनेक संघटना तसेच व्यक्ती पुढे येत आहेत व रस्त्यावर अहोरात्र झटणाऱ्या पोलीस दलाला सर्वतोपरी मदत करत आहेत. सॅनिटायझरपासून ते जेवणाच्या पाकिटांपर्यंत विविध गोष्टी पुरवून पोलीस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत. आमच्या सोसायटीच्या प्रवेशद्वारापाशी आम्ही दररोज गस्त घालणारे पोलीस कर्मचारी व पुणे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांसाठी गरम चहाचा थर्मास भरून ठेवायला सुरूवात केली आहे. अशा लहान कृतींमधूनच एकीची भावना वाढते, नाही का? बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय पातळीवरील शिखर संस्था क्रेडई बांधकामावरील मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतेय. त्यांना अन्न व अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा करून ते सुरक्षित राहावेत, त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी स्थानिक पोलीस तसेच नागरी प्रशासनाच्या मदतीने प्रयत्न सुरू आहे.लॉकडाऊनचा अप्रत्यक्षपणे फटका बसलेले जंगलातले गाईड व तिथले स्थानिक यासारख्या लोकांना मदत करायचाही अनेक जण प्रयत्न करताहेत. कारण त्यांच्या कमाईचा हंगाम निघून गेलाय, जो त्यांच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत आहे.असे अनेक लोक आहेत जे आपल्या वाढदिवसाचे कार्यक्रम, लग्न सोहळे रद्द करून ते पैसे गरजूंसाठी दान करत आहेत. अशा सत्कृत्यांची यादी वाढतच आहे ही अतिशय चांगली बाब आहे. यामुळे आपल्या देशाला जुने दिवस आठवू लागले आहेत, जेव्हा अगदी अनोळखी माणसाचंही घरात कोणत्याही वेळेस स्वागतच केलं जायचं म्हणूनच आपण अभिमानाने भारतीय आहोत व त्यांला आपल्या ताटातला घास दिला जायचा. हे सगळं करताना त्या माणसाचं नावही विचारलं जायचं नाही, हीच आपली परंपरा आहे, म्हणूनच आपण भारतीय आहोत!

आता या लेखाचा समारोप एका माणसाचे व त्याच्या सहकार्यांचे नाव घेतल्याशिवाय करता येणार नाही, ते म्हणजे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, त्यांच्यासोबतच इतरही सर्व राज्यकर्ते (सर्व राज्यांसहित), ते कोणत्याही पक्षाचे असले तरी ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने सर्वतोपरी झटत आहेत, त्यांच्या प्रयत्नांमधून तसंच देहबोलीतूनही हे जाणवत आहे. खरंच या आपत्तीमुळे आपल्याला असं दृश्य पाहायला मिळतंय जे आपल्यापैकी कुणीच अलिकडच्या काळात अनुभवलं नसेल, ते म्हणजे जीवनाच्या बहुतांश आघाड्यांवर भारतीय म्हणून एकजूट होणे. त्यासाठी सर्वशक्तिमान परमात्म्याचे आभार ज्याला आपण देव, अल्लाह किंवा येशू म्हणतो, कारण जर त्याने (किंवा तिने) आपल्याला ही आपत्ती दिली असेल तर त्यानेच (किंवा तिनेच) आपल्याला माणुसकीचे वरदानही दिले आहे, याचा विसर पडू देऊ नका.

संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
इमेल आयडी: smd156812@gmail.com

No comments:

Post a Comment