Thursday 30 April 2020

बांधकाम व्यवसायिकांनो, खंबीर राहा!








एखादा मूर्ख जर एखाद्या अफवेवर विश्वास ठेवणारच असेल, तर त्याला तो तसाच ठेवू देणंच शहाणपणा आहे”.

आता पर्यंत तुम्हा सगळ्यांना समजले असेल की हे सुद्धा लॉकडाऊनमध्ये सुचलेलंच तत्वज्ञान आहे. आता जवळपास चाळीस दिवस होऊन गेलेत, आणखी दहाएक दिवस राहिलेत (आशा करूयात). मी ज्या विषयी लिहीणार आहे त्यासाठी उपहासात्मक (काही त्याला कटुताही म्हणू शकतील) अवतरण वापरल्याबद्दल मला माफ करा, पण त्याचं कारण लॉकडाऊनमुळे आलेलं नैराश्य नाही कारण लॉकडाऊन आपल्याच भल्यासाठी आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे, पण आपण व्यावसायिक तसंच सामाजिक जीवनामध्ये ज्यांना अक्षरशः पूजतो -अश्या काही व्यक्तींच्या (लवकरच तो भूतकाळ होईल) प्रतिक्रिया किंवा विचार ऐकल्यावर केवळ उपहास हाच एक पर्याय उरतो. त्यांच्या नावांचा उल्लेख करायची गरज नाही (शहाण्यांना ते समजेलच) त्यातले एक अतिशय मोठ्या खाजगी बँकेचे अध्यक्ष आहेत व रिअल इस्टेट क्षेत्रात तसंच आंतरराष्ट्रीय अर्थ क्षेत्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. दुसऱ्या देशातल्या सर्वात जुन्या औद्योगिक व्यावसायिक कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यांची सामाजिक बांधिलकी व एवढे मोठे व्यावसायिक साम्राज्य सांभाळण्याची हातोटी याविषयी सगळ्यांना अतिशय आदर वाटतो व असे अनेक जणअजून पण आहेत पण काही हरकत नाही, कारण जेव्हा रिअल इस्टेटवर ताशेरे ओढायचे असतात तेव्हा या देशात सगळेच पुढे असतात.

मी या विषयावर बोलतोय, कारण पूर्वीही अनेक मोठ्या व्यक्तींनी (म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातल्या) ज्यांना आपणच मोठं बनवलं, बांधकाम व्यावसायिक व विकासकांविरुद्ध उघड वक्तव्य, ट्विट केलं आहे, त्याची कारणं काहीही असतील पण त्यातल एकही वक्तव्य एकही चांगल्या गोष्टीसाठी नव्हतं ही वस्तुस्थिती आहे. शहरातले रस्ते पुराच्या पाण्यामुळे तुंबले तर बांधकाम व्यावसायिकांचा दोष असतो, महानगरांमध्ये वाहतुकीची कोंडी झाली तर त्याचा दोष बांधकाम व्यावसायिकांचा असतो, झाडे कापली जात असतील तर त्यामागे बांधकाम व्यावसायिकांचा हात असतो, एखाद्या खेळाच्या मैदानाचे आरक्षण बदलले व तिथे इमारत बांधण्यात आली तर ते काम बांधकाम व्यावसायिकांशिवाय कोण करणार, नदीवर अतिक्रमण झालं तर त्यामागे बांधकाम व्यावसायिक असतो, प्रदूषणाची पातळी वाढली तर हे बांधकाम व्यावसायिकांच्या लॉबीचं काम असतं, ही यादी हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत जाते. सुदैवानं आत्तापर्यंत तरी कुणी बांधकाम व्यावसायिकांना साथीचे रोग व विषाणूच्या प्रसारासाठी जबाबदार धरलेलं नाही! पण या विषाणूचा प्रसार किंवा प्रसाराचा धोका झोपडपट्ट्यांमध्ये सर्वाधिक असतो हे आपल्या सगळ्यांना माहितीय. नेमक्या याच मुद्द्यावरून आपल्या देशातील सामाजिक आदर्श मानल्या जाणाऱ्या श्री. चारित्र्यवान व्यावसायिक महोदयांनी बांधकाम व्यावसायिकांवर (म्हणजेच रिअल इस्टेटवर) ताशेरे ओढले आहेत की बांधकाम व्यावसायिकांच्या हव्यासामुळेच अवैध बांधकामे म्हणजेच झोपडपट्ट्या फोफावल्या. मुंबई व पुण्यातल्या अशाच भागांमध्ये किंवा झोपडपट्ट्यांमध्ये साथीचा रोग पसरण्याचा धोका सर्वाधिक असताना, अगदी मोक्याच्या वेळी त्याचं हे विधान आलंय. संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्राच्या वतीनं तुमचे आभार श्री. चारित्र्यवान व्यावसायिक महोदय; इतर वेळी हे विधान आलं असतं तर मी केवळ मान झुकवली असती (इतरांप्रमाणे) आणि सोडून दिलं असतं, पण यावेळी नाही. तुमचा तसा हेतू नसेल किंवा माध्यमांनी तुमच्या विधानाचा विपर्यास केला असला किंवा चुकीचं छापलं असलं (विधान दिल्यानंतर नेहमीच असं म्हटलं जातं) तरीही, या देशामध्ये लाखो लोक काही जणांना अजूनही दैवत मानतात. जेव्हा नैतिक मूल्ये, चारित्र्य, चांगल्या पद्धतीं विषयी बोललं जातं तेव्हा तुमचं नाव आवर्जून घेतलं जातं, म्हणूनच मला उत्तर लिहावसे वाटले!

सर, सर्वप्रथम, कोणत्याही भूखंडाविषयी काहीही चुकीचे घडते तेव्हा (वर नमूद केलेल्या गोष्टी) मग ती कायदेशीर जमीन असो किंवा नदीखालची किंवा आरक्षण असलेली असो त्यात बांधकाम व्यावसायिकाचे नाव येणे स्वाभाविक आहे, कारण हाच व्यवसाय नवी इमारती बांधतो किंवा उभारतो. ज्याप्रमाणे नुकताच झालेला विषाणूचा प्रसार एखाद्या सूक्ष्मजीवशास्त्र किंवा विषाणूशास्त्रात संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळेत काहीतरी चूक झाल्यामुळे झाला असावा अशी शक्यता व्यक्त केलीय जातेय, तसंच हे आहे. पण या देशातील लक्षावधी लोक ज्या कायदेशीर घरांमध्ये राहात आहेत (तुमचाही त्यात समावेश आहे), त्या हजारो इमारतीही याच बांधकाम व्यावसायिकांनी बांधल्या आहेत, नाही का? या व्यवसायातही काही गैरप्रकार करणाऱ्या संस्था आहेत पण मग त्या ऑटोमोबाईल क्षेत्रातही आहेत ज्या बनावट किंवा नकली सुटे भाग तयार करतात. मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगाविशी वाटते की कुणीही बांधकाम व्यावसायिक तो सुपरमॅन असल्याखेरीज एकटा अवैध इमारत बांधू शकत नाही. प्रत्येक अवैध इमारतीच्या मागे एक बांधकाम व्यावसायिक असतो हे मान्य आहे, पण त्याचप्रमाणे प्रत्येक न-परवडणाऱ्या कायदेशीर घरामागेही एक बांधकाम व्यावसायिकच असला पाहिजे, पण त्याच्यामागे एक संपूर्ण व्यवस्था असते ज्यामध्ये आपलं सरकार, तसंच माध्यमे व समाजाचाही समावेश होतो, ज्याचा तुम्ही व आम्हीही एक भाग आहोत. कोणतीही अवैध इमारत एक रात्रीत उभारली जाऊ शकत नाही, अगदी चीनमध्येही नाही. ज्या व्यवस्थेच एका सामान्य बांधकाम व्यावसायिकाला (माझ्या सारख्या) एक योजना मंजूर करून घेण्यासाठी रेरा, आयओडी/सीसी अशी चक्रव्यूहासारखी प्रक्रिया तयार केली, ती काही महिने या अवैध इमारती बांधल्या जात असताना काय करत होतीमग अशा अवैध इमारतींमध्ये घर किंवा कार्यालय थाटलं जातं, त्यात जे राहतात, ते देखील याच देशाचे नागरिक आहेत सर ज्याप्रमाणे तुमच्या कंपनीच्या कारसाठी ते बनावट सुटे भाग खरेदी करतात त्याचप्रमाणे ते या इमारतींमध्येही राहतात. आता तुम्ही सगळ्या कायदेशीर ऑटोमोबाईल निर्मात्यांना चूक किंवा भ्रष्ट म्हणाल का? तसेच या सगळ्या चारचाकी व दुचाकीने होणाऱ्या प्रदूषणाबद्दल बोलतात तर बरे वाटेल आम्हाला आणि हो, आणखी वाहतुकीच्या दयनीय अवस्थेबद्दल पण बोलाल का सर?

आता झोपडपट्ट्यांविषयी बोलू, या शहरांसाठी त्या एक शाप आहेत हे मान्य आहे पण झोपडपट्ट्यांसाठी तुम्ही केवळ बांधकाम व्यावसायिकांना दोष कसा देऊ शकता? या लाखो लोकांना कायदेशीर घरे परवडत नाहीत म्हणून ते झोपडपट्ट्यांचा आश्रय घेतात. कोणतीही झोपडपट्टी शासनकर्त्यांच्या म्हणजेच सरकारच्या पाठिंब्याशिवाय किंवा संमतीशिवाय शक्य नाही हे ढळढळीत सत्य या देशातल्या अगदी लहान मुलालाही माहिती असतं. पण तुम्ही किंवा इतर तथाकथित चारित्र्यवान व्यावसायिक झोपडपट्ट्यांसाठी सरकारला दोष देत नाहीत, याचं काय कारण आहे हे मी विचारू शकतो का? पोलीस आज त्यांच्या अधिकारांचा वापर करून लॉकडाऊनची अगदी काटेकोर अंमलबजावणी करत आहेत, हेच पोलीस व यंत्रणा धारावीसारखी झोपडपट्टी उभी राहात असताना त्यांचे कान व डोळे का बंद करते, ती उभारली जात असतानाच का पाडत नाहीधारावी नक्कीच एका वर्षात तयार झालेली नाही, तुम्ही जेव्हा तरूण होता तेव्हा तिचा आकार कदाचित लहान असेल. धारावी आजचं अक्राळ विक्राळ रूप धारण करेपर्यंत तुम्ही सगळे तथाकथित दक्षिण मुंबईत  राहणारे उच्चभ्रू नागरिक कुठे होतात? ती पूर्णपणे अवैध आहे म्हणून पाडली जावी अशी कुणी मागणी केल्याचं आठवत नाही.
त्यावर जर तुमची प्रति युक्तिवाद असेल की बिल्डरांच्या नफ्याच्या हव्यासामुळे घरे परवडेनाशी झाली व म्हणूनच झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या तर, हाच तर्क हजारो बेकादेशीर हॉटेल्सनाही लागू होतो. कारण ज्या गरीब प्रवाशांना ताजमहाल हॉटेलसारखी महागडी हॉटेलं परवडत नाहीत त्यांना ही बेकायदेशीर हॉटेल्सच आसरा देतात, नाही का? सर दूरवर टिंबकटूसारख्या एखाद्या भागात बांधलेल्या लहान घरांना परवडणारी घरे म्हणता येत नाही. खरंतर तुम्ही परवडणारी म्हणजे काय याची इतरांसाठी व्याख्याकरू शकता, पण नॅनोसारखी सामान्यांना परवडणारी कार बनवण्याचं एखादं स्वप्न पूर्ण करताना काय होतं हे तुम्हाला चांगलेच माहितीय आहे! संपूर्ण उभारणी, जमीनीचा खर्च, पायाभूत सुविधा, बांधकाम, बाजारपेठेची गरज तसंच ग्राहकाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती या सगळ्यागोष्टी ती परवडण्यासारखी आहे का हे ठरवतात, मूठभर अर्धशिक्षित व्यावसायिक नक्कीच ठरवत नाहीत ज्यांना तुम्ही बांधकाम व्यावसायिक म्हणता.

आता, परवडण्यासारखं काय आहे याविषयी चर्चा सुरू झाली तर कुणीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतच  की! तर आणखी एक नाव जे अतिशय आदरानं घेतलं जाते व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी गृहबांधणी म्हणजेच रिअल इस्टेट क्षेत्राच्या नफ्यातूनच  भरारी घेतलीय, त्यांनीही अगदी नेमक्या वेळी बांधकाम व्यावसायिकांना तडाखा दिलाय, सदनिकांच्या विक्री दरामध्ये जवळपास २०% घट करावा असे विधान त्यांनी केलेय, ज्यामध्ये ताबा देण्यासाठी तयार सदनिकांचा समावेश होतो. सर, आम्ही तुमचाही अतिशय आदर करतो, मी तुमच्या दोघांचीही माफी मागतो व लहान तोंडी मोठा घास घेतोय पण सर, घर किंवा कुठलेही उत्पादन विक्रेता व ग्राहक या दोघांनाही परवडलं पाहिजे नाहीतर ते केवळ धर्मदाय कार्य होईल, नाही का? मी समजा असं म्हणालो की माझा प्रकल्प उभारणं मला परवडावं यासाठी आपल्या बँकेने व्याजदर २०% कमी करावा, तर त्यावर एका बँकरचं उत्तर काय असेल? मला उत्तर जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे बांधकाम व्यावसायिकांना टिकून राहण्यासाठी तुम्ही जो काही फॉर्म्युला सुचवत आहात त्याविषयी माझ्या ज्ञानात मोलाची भर पडेल. केवळ पुणे, मुंबई किंवा दिल्लीच नाही तर देशात कुठेही जा घरे हे  महागच उत्पादन आहे. अगदी ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती आहे. नाहीतर, लग्न पाहावे करून व घर पाहावे बांधून ही म्हण मराठीत आलीच नसती. अर्थात तुमच्यासारख्या दिग्गजांना ती माहिती नसेल कारण ती मराठीभाषेत आहे. मी तुम्हाला त्याचा अर्थ समजावून सांगतो, याचा अर्थ असा होतो की माणसानं त्याच्या आयुष्यात दोन गोष्टी नक्की करून पाहिल्या पाहिजेत एक म्हणजे लग्न करणे व दुसरे म्हणजे घर घेणे कारण माणसाला तोंड द्याव्या लागणाऱ्या या दोन सर्वात अवघड गोष्टी आहेत. रिअल इस्टेट हा अतिशय विचित्र उद्योग आहे यात शंका नाही कारण विचार करा वर्षानुवर्षं या देशात स्वतःचं एक घर बांधणे हे इतके त्रासदायक मानले जाते तर हजारो घरे बांधणे ती सुद्धा इतरांसाठी, किती अवघड असेल!
मोठ्या शहरांमध्ये, अगदी दहा सदनिकांची एक लहान इमारत बांधायला किती वेळ लागतो व तास असतो. हे पण एकदा जाणून घ्या! काही दशकांपूर्वी बांधकाम व्यावसायिक होणं अगदी सोपं होतं व बक्कळ पैसा होता पण सध्याच्या पिढीतल्या बांधकाम व्यावसायिकाचं तसं नाही. मी असं म्हणत नाही की रिअल इस्टेट हा सर्वात अवघड किंवा वाईट व्यवसाय आहे, आजही त्यात पैसा आहे पण त्यात अडथळेही अनेक आहेत ही वस्तुस्थिती आहे. स्वच्छ कायदेशीर जमीन मिळवण्यापासून ते परवानग्या मिळवणे, घरे बांधणे, ती विकणे हे अजिबात सोपे काम नाही, याला आपल्याकडची व्यवस्था जबाबदार आहे. लोकहो, मला तुम्हाला सांगावसं वाटतं की सरकार तसंच माध्यमांना रिअल इस्टेट व तिच्या समस्यांशी काहीही घेणंदेणं नाही. एखादा पूर आला किंवा साथीचा रोग आला तर प्रत्येक सरकारी संस्थेला बांधकाम व्यावसायिकांकडून (म्हणजे क्रेडईकडून) विविध प्रकारची किंवा आर्थिक मदतीची अपेक्षा असते. आणि आज स्वतः कितीही अडचणीत असला तरी बिल्डर सढळ हाताने व दिलदारपणे मदत करतो. पण जेव्हा बांधकाम विषयीक धोरणे तयार केली जातात किंवा मत व्यक्त केले जाते तेव्हा बांधकाम व्यावसायिकांची आठवण कुणालाच होत नाही कारण त्यावेळी आमच्यासोबत काम करणे या देशात निषिद्ध मानले जाते. तुम्हाला परवडणारी कायदेशीर घरे, कमी दरात हवी असतील तर आपण हे बदलायला हवे. ही सगळी वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतरही जर तुम्ही टीका करत असाल किंवा बांधकाम व्यावसायिकांनाच झोपडपट्ट्या बांधल्या जाण्यासाठी दोष देत असाल किंवा बांधकाम व्यावसायिकांना घरांचे दर कमी करायला सांगत असाल, तर माफ करा सज्जनहो, हे म्हणजे एखाद्या गुरूनं त्यांचे  पोट भरलेले असताना कुणा भुकेल्या भक्ताला उपवासाचं महत्त्व सांगण्यासारखं आहे!

प्रिय श्री. चारित्र्यवान व्यावसायिक व श्री. आर्थिक गुरू (व इतर सर्व) ज्यांना बांधकाम व्यावसायिक व रिअल इस्टेटवर ताशेर ओढण्यात अभिमान वाटतो, मी अशाप्रकारे राग किंवा नैराश्य व्यक्त केलं म्हणून मला माफ करा. आम्हाला देशासाठी तसंच समाजासाठी तुम्ही केलेल्या कामगिरीविषयी व योगदानाविषयी अतिशय आदर वाटतो. पण आमची रेषा पुसूनस्वतःची रेषा मोठी करू नका (हे सुद्धा अकबर बिरबलमधलं उदाहरण आहे)!  आम्हाला तुमचे ज्ञान, बुद्धिमत्ता व अनुभवाविषयी आदरच आहे, पण या सगळ्या गुणांचा वापर इतर सामान्य मर्त्य माणसांना (म्हणजेच बांधकाम व्यावसायिकांना) थोडे शहाणे करण्यासाठी, अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी केला तर त्यांच कौतुक होईल. तसे  न करता केवळ बिल्डरांना दोष देण्याचे काम ईतर सर्व घटक करतच असतात, एव्हढेच मला सांगावेसे वाटते. ज्यावेळी आपण एकजूट होऊन, एका विषाणूने आपल्यावर लादलेल्या आर्थिक युद्धात लढा दिला पाहिजे त्याच वेळी आपल्याकडून अशा प्रतिक्रिया नक्कीच अपेक्षित नव्हत्या. माफ करा, मी कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर, मिच्छामी दुकडम्म्हणजेच मनापासून माफी मागतो!


संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलोपर्स
इमेल: smd156812@gmail.com

No comments:

Post a Comment