Thursday 22 April 2021

मोठे होणे म्हणजे काय!

 
















मोठे होणे म्हणजे काय!

 

मोठे होणे, म्हणजे जेव्हा तुम्हाला कुणालाही काही सिद्ध करावे लागत नाही, अगदी स्वतःलाही नाही”...

 

प्रिय दादा आणि छोटा आणि समस्ततरुण मित्रपरिवार जो माझी मुख्य ताकद आहे...

आणखी एक वर्ष संपत आले आहे आणि माझा आणखी एक वाढदिवस येऊ घातलाय. या वाढदिवशी तुम्हाला काय लिहू हे ठरवणे जरा अवघड जात आहे कारण या वर्षाने मला बरेच काही शिकवले तर त्याने तुमच्याकडून बरेच काही हिरावूनही घेतले. पण मला नेमके हेच तुम्हाला संपूर्ण नव्या पिढीला सांगायचे आहे, कारण तुम्ही सर्वजण माझा ऊर्जास्रोत आहात. तुम्हाला एक सांगू, विशिष्ट वयानंतर वाढदिवस साजरा करण्याचे फारसे कौतुक राहात नाही, विशेषतः जेव्हा तुम्ही चाळीशी किंवा पन्नाशीचा टप्पा ओलांडल्यानंतर. कारण वय ही तुमच्या शरीरापेक्षाही मनावर घाव घालणारी तलवार आहे. तुम्ही अचानक एकेदिवशी सकाळी उठता नेहमीप्रमाणे स्वतःला आरशात पाहू लागता तुम्हाला जाणवते की तुम्ही आता तुमच्या तिशीत नाही. तुमच्या त्वचेचा पोत, पांढरे केस (डोक्यावर पडू लागलेले टक्कल लपवण्याचा तुम्ही कसोशीने प्रयत्न करू लागता), डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे, झोप पूर्ण झाल्याचे दाखवू लागता या सगळ्या खुणा तुम्हाला आता आरसा तुमचा जिवलग मित्र राहिला नसल्याचीच जाणीव करून देतात. तुम्ही जॉगिंगच्यावेळी प्रत्येक पाऊल उचलताना, जिममध्ये वजन उचलताना तुम्हाला तुमच्या वयाची जाणीव होते. अगदी लहानशी जखमही बरी व्हायला बराच काळ लागतो, तसेच तुम्ही दिवसेंदिवस अशक्त होत चालल्याची तुम्हाला जाणीव होते. तुम्ही अगदी लहानसहान गोष्टींचीही काळजी करू लागतात, ज्या आधी कधी तुमच्या लक्षातही आलेल्या नसतात. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या वयाची भीती वाटू लागते. तुमच्या आयुष्यातले आणखी एक वर्ष कमी होत असल्यामुळे, जीवनाच्या सगळ्या आघाड्यांवर शक्ती आणखी कमी होणार असल्यामुळे त्याचा सोहळा साजरा करावासा वाटत नाही. वाढत्या वयाने बहुतेक पुरुषांचे बायकांचे (जरा जास्तच) असेच होते हे सर्वात मोठे आव्हान आहे ज्याला आपल्या सगळ्यांच एक ना एक दिवस सामोरे जावेच लागते!

म्हणूनच मला वरील अवतरण सुचले. वाढत्या वयाच्या या सगळ्या वाईट परिणामांमुळे बहुतेक पुरुष महिला अशाप्रकारे वागतात (करतात) की ते इतरांना कदाचित विचित्र वाटू लागते. त्यांना जणूकाही जगाला दाखवून द्यायचे असते की ते वाढत्या वयाला घाबरत नाहीत किंवा त्यांच्या वयामुळे त्यांचे काहीही नुकसान झालेले नाही. अचानक कुणीतरी जिमला जाऊ लागते स्लिव्हलेस (तो सर्वोत्तम ब्रँडचा असतो हे वेगळे सांगायची गरज नाही) घालून वेट लिफ्टिंग करू लागते जे त्याने विशीत असताना कधीही केले नसेल किंवा कुणालातरी जाणीव होते की त्याला माउंट एव्हरेस्टवर चढायचे होते म्हणून तो ट्रेकिंग करू लागतो. एखाद्याला आठवते की त्याने कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर कधी सायकलच चालवलेली नाही म्हणून तो केवळ छंद म्हणून नाही तर थेट दिल्ली गाठायच्या उद्देशाने सायकलिंग करू लागतो. एखाद्या व्यक्तीला पुण्यातल्या रस्त्यांवर अगदी स्कुटी चालवायचीही भीती वाटत असली तरी तो हर्ले डेव्हिडसन खरेदी करतो आणि ती गोव्यापर्यंत चालवत जायचा बेत आखतो. कुणी महागडा कॅमेरा खरेदी करून पक्षी वाघांची छायाचित्रे काढून स्वतःला पक्षीमित्र किंवा वन्यप्रेमी म्हणवतो. ही यादी हनुमानाच्या शेपटीएवढी लांबलचक आहे (म्हणजेच तिला अंत नाही). वयावर मात करायच्या या खेळात बायकाही मागे नसतात, बहुतेक जणी केसांना कलप लावू लागतात. या वयोगटातील लोकांमध्ये आढळणारी आणखी एक गोष्ट, मग त्या बायका असोत किंवा पुरूष ती म्हणजे त्यांची वेषभूषा अचानक बदलते. आपण जे नाही ते दाखवण्याचा म्हणजेच तरूण दिसण्याचा अतोनात प्रयत्न केला जातो. त्याचशिवाय ही सगळी कामगिरी फेसबुक, इन्स्टाग्राम, वॉट्सॲप ग्रूप डीपीवर टाकायची अहमिका असते नाहीतर तुम्ही काय सिद्ध करायचा प्रयत्न करत आहात वयरुपी राक्षसाविरूद्धच्या युद्धात तुम्ही कसे यशस्वी झालात हे लोकांना कसे कळणार?

तुम्हाला हे सगळे वाचून हसू येत असेल कारण तुम्ही सुदैवाने अजून तरुण आहात (वयाने) तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. म्हणूनच मी तुम्हाला हे सांगत आहे, कारण तुम्ही वरीलपैकी कोणतीही गोष्ट केली नाही तर तुम्ही विक्षिप्त मानले जाता, जो नेहमीच माझा नावलौकिक राहिला आहेमला माझ्या वयाची कधीच भीती किंवा काळजी वाटली नाही किंवा वाटत नाही. माझ्यामध्ये, टक्कल पडणे, थकवा, अशक्तपणा, इजा, तंदुरुस्ती कमी होणे अशी वाढत्या वयाची सगळी लक्षणे कदाचित जाणवत असतील. वयाने मला शारीरिकदृष्ट्या थोडे कमजोर केले असले तरी ते नैसर्गिक आहे असे मला वाटते. मग मी माझ्या डोळ्यांकडे पाहतो आणि माझ्या वयाने मला काय भेट दिली आहे याची मला जाणीव होते. माझे डोळे पूर्वीपेक्षा जास्त स्थिर, शांत आत्मविश्वासपूर्ण आहेत माझ्या वयामुळे मिळालेल्या अनुभवाचा हा परिणाम आहे असे मला वाटते. तुमच्या वयाने तुम्हाला दिलेली ही सर्वोत्तम भेट आहे त्यानंतर तुम्हाला जाणीव होते की खरेतर वय तुमचा शत्रू नाही तर तुमचा सर्वोत्तम मित्र आहे, जो तुम्हाला आयुष्याचा खरा अर्थ काय आहे याची जाणीव करून देतो. तुम्हाला जाणीव होते की यापुढचा प्रवास बाहेरून आतल्या दिशेने आहे, तुम्ही काय करू शकता हे आता तुम्हाला जगाला दाखवायची गरज नाही तसेच यापुढे तुम्हाला आरशात पाहायची भीती वाटणार नाही तसेच तुम्हाला स्वतःविषयी काहीही इतरांना सिद्ध करून दाखवायची गरज नाही. बेटा, जर स्वतःला आरशात पाहून तुम्हाला हे समजू शकले तरच तुम्ही मोठे व्हाल, नाहीतर तुम्ही केवळ वयाने मोठे व्हाल. आता आरशात पाहून काय घ्यायचे आहे याचा निर्णय़ तुमचा तुम्ही घ्यायचा आहे, मी माझा निर्णय घेतला आहे तो काय आहे हे तुम्हाला माहिती आहे!

आणखी एक गोष्ट म्हणजे, तुम्हाला आरशात पाहण्याचे धाडस देणाऱ्या स्वतःसाठी योग्य निवड करण्यास मदत करणाऱ्या जीवनाच्या प्रत्येक पैलूचे आभार मानले पाहिजेत हे समजतेतुम्हाला आता तुमच्या तथाकथित कामगिरीचे श्रेय घेण्यात रस नसतो तर त्याचे श्रेय इतरांना देण्यात आनंद वाटतो. याचा अर्थ अजिबात असा होत नाही की तुम्ही निष्क्रिय झाला आहात किंवा संत होण्याच्या मार्गावर आहात. याचा केवळ असा अर्थ होतो की तुम्हाला जीवनाचा अर्थ समजला आहे ते जगायला शिकत आहात. वाढत्या वयाचे पुरुष ( महिला) मी वर नमूद केलेल्या गोष्टी केवळ जगाला सिद्ध करून दाखवायलाच करत असतील असे नाही. परंतु तुमच्या पिढीला ज्या गोष्टी अगदी सहजपणे उपलब्ध झाल्या उदाहरणार्थ बाईक खरेदी करणे, ट्रेकिंगला जाणारे किंवा कॅमेरा खरेदी करणे इत्यादी. यासारख्या गोष्टी आमच्या पिढीला (ज्यांचे वय पंचेचाळीसहून अधिक आहे) तितक्या सहजपणे उपलब्ध नव्हत्या. आमच्याकडे फारसा वेळही नसायचा, किंबहुना तुम्हाला जे करायला आवडते ते करण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागतो हे आम्हाला माहितीही नव्हते. म्हणूनच आता आमच्या हातात पैसा वेळ आहे तसेच या गोष्टी उपलब्ध आहेत त्यामुळे आम्ही त्या करतो. परंतु आता मला हेदेखील समजले आहे की मी एखादी गोष्ट करत असेन तर आता मीती फक्त माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी करतो. मी काय करू शकतो हे अगदी स्वतःलासुद्धा सिद्ध करत नाही. मला असे वाटते मोठे होण्याचा वय वाढण्याचा हाच खरा अर्थ आहे. 

आता चांगल्यावाईटाचा विचार करता हे वर्ष खडतरच गेले, म्हणजे अगदी वाईटही म्हणता येईल, तुमच्या अगदी आवडत्या गोष्टी तुमच्यापासून हिरावल्या. हे नुकसान कधीही भरून निघणारे आहे, पण पोरवय जाऊन पुरूष होण्याचा हा प्रवास असाच असतो. बेटा, आपण दररोज काही ना काहीतरी गमवत असतो पण आपण काहीतरी मिळवतोही, दुर्दैवाने बहुतेक जण केवळ त्यांनी काय गमावले याचाच विचार करतात त्यांनी काय मिळवले यात आनंद मानत नाहीतमी २०२० या वर्षात केवळ माझ्या आजूबाजूच्या माणसांनाच गमावले नाही तर मी माझ्या मुलांचे बालपणही गमावले, पण मला त्याबदल्यात आता दोन उमदे तरूण पुरुष मिळाले आहेत आणि मी त्याबाबत आनंदी आहे. मला ही जी जाणीव झाली कदाचित त्यामुळेच मला पुढील वाटचालीस हुरूप आलासगळ्यात शेवटी मला तुम्हा दोघांचे, भिक्या, केतकी, रोहित एम, श्रुती, तनिषा, सिया आणि तुमच्या तरुण मित्रमंडळींचे आभार मानायचे आहेत, तुमच्यामुळे मीही तरुण राहतो. तुम्ही मला केवळ ॲनिमेशन किंवा सुपर हिरो चित्रपट पाहायलाच नाही तर पाव भाजीवर ताव मारायलाही साथ देता. मी तुमच्याशी संवाद साधायला तुम्हाला नेहमी पत्रं लिहीतो. तुमच्यामुळे मला जगाकडे तरुण दृष्टिकोनातून पाहता येते हीच माझी सर्वात मोठी भेट आहे. तुमचे पालक वडिलधाऱ्यांचे आभार मानण्यात कधीच कुचराई करू नका. मुलगा किंवा मुलगी जे काही करत असेल त्यात यशस्वी झाले तर कुठल्याही आई-वडिलांचे ऊर अभिमानाने भरून येते. मला आनंद वाटतो की मी काही प्रमाणात का होईना माझ्या पालकांना समाधान देऊ शकलो (अर्थात अब्बू ते कधीच स्वीकारणार नाहीत हा भाग निराळा, हा हा हा). तुमच्या आयुष्यातील दोन व्यक्तींची नेहमी काळजी घ्या त्यांना पाठिंबा द्या, एक म्हणजे तुमचे बहिण किंवा भाऊ दुसरी म्हणजे तुम्ही जिला मित्र म्हणता. मी या बाबतीतही अतिशय सुदैवी आहे मला एक गोष्ट उमगली आहे की तुम्हाला काही गोष्टी नशीबाने मिळतात मात्र नात्यांची संपत्ती तुम्हाला जपावी लागते.

तुम्हा सगळ्यांचे, मनापासून आभार, प्रत्येक गोष्टीसाठी आणि वयाचा आणखी एक टप्पा आनंदाने पार करण्यासाठी! ...


तुमचा,

बाबा, मामा, काका, संज्या आणि संजय

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स 

smd156812@gmail.com

 













No comments:

Post a Comment