Monday 3 July 2023

टिपेश्वर, वन्यजीवनाचा छुपा ठेवा !

 




 














 




  







तुम्ही जंगलतोड केल्यानंतर, तुमच्याकडे झाडेच उरली नसतील तर तुमच्याकडे लाकडाच्या किती वखारी आहेत याने फरक पडत नाही सुझॅन जॉर्ज

सुझॅन मेलजी जॉर्ज या इंग्रजी चित्रपट व दूरचित्रवाहिनी अभिनेत्री आहेत. मला हॉलिवुडचे अभिनेते व अभिनेत्रींचे (ज्या त्यांची बुद्धिमत्ता किंवा बुद्धीसाठी फारशा ओळखल्या जात नाहीत) नेहमीच अतिशय कौतुक वाटते कारण त्यांना केवळ समाजातील अनेक सामाजिक पैलूंची जाणीवच नसते तर त्याविषयी ठामपणे आपले मतही मांडतात. आपल्या देशामध्ये अलिकडे वन्यजीवन म्हणजे एक फॅशनच झाली आहे, पेज ३ चे छायाचित्रकार आपल्या जंगलांना भेट देणाऱ्या अभिनेत्यांची (त्याहूनही जास्त अभिनेत्रींची) डिझायनर पोषाखातील व जंगलात भटंकतीसाठीच्या साधनसामग्रीसह छायाचित्रे काढण्यात व त्यांना वन्यजीवनाची किती काळजी आहे व तिथे त्यांना कशी शांतता मिळते अशा प्रतिक्रिया छापण्यात धन्यता मानतात. त्यांच्यापैकी काही जण हेतूशी प्रामाणिक असतील परंतु ही बहुतेकांना आपल्या देशातील सामाजिक वर्तुळात असे करणे सध्या लोकप्रिय आहे म्हणून, त्या लाटेवर स्वार व्हायचे असते व प्रसिद्धी मिळवायची असते. समाज माध्यमांवरही तुम्ही रिल्स आणि लाईक पाहिले तर वाघाशी संबंधित काहीही अधिक वेळ पाहिले जाते ही वस्तुस्थिती आहे, असो! परंतु जंगलाविषयी व त्यातील प्रजातींविषयी प्रत्यक्ष विचार करण्याची किंवा जाणून घेण्याची वेळ येते, तेव्हा आपल्या तथाकथित अभिनेत्यांपैकी किती जण यासाठी योगदान देतात?

थोडे विषयांतर झाल्याबद्दल माफ करा, परंतु काही गोष्टी खरोखरच माझ्या डोक्यात जातात हे मी मान्य करतो कारण जंगलाला भेट देणाऱ्यांपैकी सगळ्यांनाच त्याविषयी प्रेम किंवा तळमळ वाटत नाही, त्यामुळे मला माफ करा व आपण आता या लेखाच्या विषयाकडे वळू, जे जंगल अस्तित्वात आहे हे देखील अनेकांना गेल्या दशकापर्यंत माहिती नव्हते. होय, मी टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याबद्दल बोलतो आहे व मी खरोखरच सांगतो काही खरे व्याघ्र व वन्यजीव प्रेमी वगळता अगदी आजही या ठिकाणाला नियमितपणे भेट देणारे पर्यटक अगदी थोडे आहेत. टिपेश्वर हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुमारे १५० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेले एक छोटेसे अभयारण्य, आपल्या राज्याच्या अगदी दक्षिणेला आहे. टिपेश्वर अभयारण्याच्या प्रवेशद्वारापासून, तेलंगणा राज्याची सीमा फक्त तीस किलोमीटर लांब आहे. परंतु केवळ एखादा मूर्खच वन्यजीवन किंवा जंगल किंवा एखाद्या अधिवासाला चौरस किलोमीटरच्या पट्टीवर मोजेल, तेथील जैवसमृद्धता किंवा त्या भूमीवर राहणारे जीवन सर्वाधिक महत्त्वाचे असते व त्या आघाडीवर टिपेश्वर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. नेहमीप्रमाणे लोकांना (म्हणजे तथाकथित वन्यजीवप्रेमींना व पर्यटकांना) या छोट्याशा जंगलामध्ये अतिशय समृद्ध वन्यजीवन आहे व तेथे वाघ नेहमी दिसतात हे समजण्यासाठी वाघ दिसावे लागले. त्याचशिवाय हा अतिशय महत्त्वाचा कॉरिडॉर आहे जो मध्य भारतातील वाघांच्या अधिवासांना भद्रावती व्याघ्र प्रकल्पासारख्या दक्षिणेकडील जंगलांशी जोडतो. अलिकडच्या काळात टिपेश्वरमधील एक वाघ प्रवास करत भद्रावतीपर्यंत पोहोचला व त्यानंतर परत विदर्भाच्या पश्चिम भागात असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात आला व त्यानंतर पुन्हा टिपेश्वरपर्यंत पोहोचला असे आढळून आले. त्याने जवळपास १८०० किलोमीटर प्रवास पूर्ण केला व हे खरोखरच अद्भूत आहे (तसेच त्या वाघाचे नशीबही आहे). विदर्भाच्या जंगलांना मध्य भारताशी जोडणाऱ्या उमरेड कऱ्हांडलाप्रमाणे, टिपेश्वरच्या जंगलाला वाघांसाठी दक्षिणेचे महाद्वार म्हणता येईल. मध्य भारतातील जंगले जास्त हिरवी व घनदाट आहेत, परंतु त्याउलट राज्यातील हा भाग कोरडा व पर्जन्यछायेत येणाऱ्या प्रदेशांपैकी एक आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत यात काही आश्चर्य नाही, अशी इथली सामाजिक परिस्थिती आहे. यामुळे वाघासाठी इथली परिस्थिती खडतर आहे कारण हरीणीच्या शिकारीसाठी इथे कमी वाव आहे व गुराढोरांची शिकार करणे धोकायदायक होऊ शकते कारण ते आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी उपजीविकेचे साधन आहे. तरीही वाघांची संख्या वाढतेय (यावरूनच ही प्रजाती किती चिवट आहे हे दिसून येते) व त्याचा परिणाम म्हणजे अभयारण्याच्या बाहेरही अनेकदा वाघाचे दर्शन होते. याचे प्रमाण एवढे आहे की एका वाघीणीला (नाव इथे दिलेले नाही) सध्या सहा  पिल्ले आहेत व ती पूर्णपणे गुराढोरांची शिकार करून जगतेय. ती पुरती हुशार असल्याने माणसांशी संघर्ष टाळण्यासाठी ती गुराची शिकार करते व ती घनदाट जंगलात घेऊन जाते व शिकार पूर्णपणे संपल्यानंतरच पुन्हा दुसऱ्या शिकारीसाठी बाहेर येते. अशाप्रकारे गुराढोरांना मारण्यासारख्या सर्व अप्रिय गोष्टी माणसाच्या नजरेआड केल्या जातात, यामुळे गुराढोरांच्या मालकांचा वाघांविषयीचा द्वेष थोडासा कमी होतो. केवळ तुम्ही स्थानिकांशी बोललात (गाईड/चालक) तर तुम्हाला जंगलातील व भोवतालच्या अशा सुरस कथा जाणून घेता येतील, हे मला पुन्हा एकदा सांगायचे होते. टिपेश्वरच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर सागवानाची लागवड होते, जी पूर्वी सामाजिक वनीकरणांतर्गत केली जात असेल परंतु वाघांमुळे आता सागवानाची झाडे तोडणे थांबले आहे व हे क्षेत्र आता वन खात्याच्या वन्यजीवन विभागाला देण्यात आले आहे. ज्या व्यक्तींना या संज्ञा समजत नाहीत, त्यांच्यासाठी सांगतो की वन खाते अनेक विभागांमध्ये विभागलेले आहे. त्यापैकी सामाजिक वनीकरण हा विभाग नवीन जंगले तयार करतो जो नंतर केवळ वाघच नव्हे तर वन्यजीवनाच्या विविध प्रजातींच्या वाढत्या संख्येसाठी अधिवास ठरतो. ही शाखा अतिशय महत्त्वाची कारण आपण वन्यप्राण्यांची संख्या तर वाढवू शकतो परंतु ते कुठे राहतील हेही विचारात घ्यावे लागते, कारण त्यांनी निवडून दिलेला कुणी नगरसेवक किंवा आमदार नसतो, ज्याचे हक्काचे मतदार असल्यामुळे त्यांना सरकारी जमीनीवर अवैधपणे त्यांची घरे बांधता येतील व नंतर ती नियमित करता येतील. त्यामुळेच माणसांना (शहाण्या माणसांना) वन्यप्राण्यांसाठी घर बांधण्याची जबाबदारी घ्यावी लागते, हे काम सामाजिक वनीकरणाचे असते. एकदा वन्यजीवांचा एखादा अधिवास विकसित झाला किंवा तो वन्यजीवन अधिवास म्हणून ओळखला जाऊ लागला किंवा वाघ किंवा काही महत्त्वाचे प्राणी आढळले तर ते वन्यजीवन अभयारण्य म्हणजेच संरक्षित जंगल आहे असे जाहीर केले जाते. त्यानंतर वन खात्याला त्याची देखभाल करणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते कारण त्यामुळे वन विभागाला अशा जंगलांमध्ये प्रवेशावर निर्बंध घालण्याचा कायदेशीर अधिकार मिळतो, टिपेश्वरची सद्यपरिस्थितीही अशीच आहे.

इथे सागवानाची लागवड अलिकडच्या काळातील म्हणजे जंगल तरुणच आहे व उर्वरित भागामध्ये प्रामुख्याने झुडुपे आहेत, तरीही या जंगलाच्या मध्यवर्ती भागात असलेले पाण्याचे बारमाही स्रोत हे वन्यजीवनासाठी वरदान आहेत. त्याचप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश अस्वले व बिबट्यासाठी अतिशय उत्तम घर आहे व त्यांचे नियमित दर्शन हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे. ताडोबामध्ये ज्याप्रमाणे एक तलाव आहे, इथेही तिपाई देवीचे मंदिर व जवळच असलेला तलाव अभयारण्याच्या केंद्रस्थानी आहे, जेथे अनेक घडामोडी घडत असतात. तीन सफारींमध्ये नेहमीप्रमाणे एक वाघीण व तिचे छोटे बछडे आमच्याशी लपंडाव खेळत होते, आम्हाला त्यांचे दर्शन झाले नाही परंतु एक अस्वल व जंगली कुत्री दिसली. येथे गवताळ कुरणे फारशी नसल्यामुळे प्रामुख्याने ठिपकेदार हरिणांसारख्या शिकारीसाठीच्या प्राण्यांची उपलब्धता कमी आहे. वाघाला प्रामुख्याने सांबर हरिण व भोवतालच्या परिसरातील पाळीव गुराढोरांवर जगावे लागते. हे जंगल व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत नसल्यामुळे त्याचे फायदे व तोटे दोन्हीही आहेत, उदाहरणार्थ खाजगी वाहनांना पर्यटनाला परवानगी आहे ज्यामुळे खऱ्या वन्यजीवप्रेमींना उपद्रव होतो मात्र त्याचवेळी पर्यटनासाठी येणारा खर्च बराच कमी म्हणजे ताडोबासाठी होणाऱ्या खर्चाच्या जवळपास निम्मा आहे. येथील गाईड व जिप्सी चालक अतिशय उत्साही आहे कारण त्यांची उपजीविका ही थेट पर्यटकांशी संबंधित असल्याची जाणीव त्यांना आहे, तरीही आपण त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण दिले पाहिजे, त्यांचे संभाषण कौशल्य विकसित केले पाहिजे तसेच शक्य होईल त्या स्वरूपात मदत केली पाहिजे (उदाहरणार्थ कपडे, बूट, पक्ष्यांची माहिती देणारी पुस्तके इत्यादी) कारण येथे वन्यजीवन पर्यटन वगळता उत्पन्नाचा दुसरा काहीही स्रोत नाही. तुम्हाला प्रवेशद्वाराशी पोहोचताना वाटेत अनेक लहान गावे लागतात (सुन्ना हे त्यापैकी एक), तिथे तुम्हाला भोवतालची गरीबी जाणवते. २०२३ सालातही माणसे व पाळीव प्राणी एकाच पाणवठ्यावरून पाणी पितात अशी ठिकाणे आहेत, यावरून गरिबीची तुम्ही कल्पना करू शकता. मी इरफान नावाचा जिप्सी चालक व गाईड सागर यांच्यासोबत होतो. दोघेहीजण आम्हाला भोवतालचा परिसर दाखविण्याच्या बाबतीत अतिशय उत्साही होते व त्यांना या ठिकाणाविषयी जे काही माहिती आहे ते आम्हाला सांगत होते.

इथे राहणे थोडे अडचणीचे आहे, कारण अलिकडेच इथे एक सर्व सुखसोयींनी युक्त रिसॉर्ट सुरू झाले आहे परंतु ते श्रीमंत व्यक्तींसाठी आहे व त्याचशिवाय निवासाच्या काही घरगुती सोयीही आहे, परंतु महाराष्ट्रातील सर्व जंगलांच्या परिसरातील निवासाच्या घरगुती सुविधांमध्ये बरीच सुधारणा झाली पाहिजे तसेच होम-स्टे या संकल्पनेसंदर्भात आपला दृष्टिकोनही बदलला पाहिजे. केवळ काही स्थानिकांकडे काही खोल्या उपलब्ध करून देणे म्हणजे होम-स्टे नव्हे, हे वन खात्याने स्थानिकांना समजावून सांगितले पाहिजे व त्यांना सुधारणा करण्यासाठी मदत/मार्गदर्शन केले पाहिजे, नाहीतर पर्यटक अशा होम-स्टेमध्ये पुन्हा येणार नाहीत. या पार्श्वभूमीवर टिपेश्वरमध्ये अनंत हेरिटेज नावाच्या जागेची ओळख झाली, हे रिसॉर्ट असून येथे निवासाची सोय आहे, शिशीर कुलकर्णी नावाचा एक स्थानिक ते चालवतो. या तरुणाने पुण्यातून एमबीए केले आहे व या अभयारण्याच्या जवळ त्याच्या कुटुंबाचे शेत व वडिलोपार्जित बंगला आहे. शिशीरने त्याच्या या शेतघरात आवश्यक सोयी-सुविधा करून घेतल्या व त्याला एका लहान हॉटेल/रिसॉर्टमध्ये रुपांतरित केले. हे सर्व ऐषोआरामांनी युक्त असे ठिकाण नाही परंतु स्वच्छ, हवेशीर, सोयीचे व प्रशस्त आहे, इथे उत्तम स्थानिक जेवण मिळते व सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक स्थानिक तरुणांना त्यातून उपजीविचे साधन मिळाले आहे. त्याने मूळ रचना व तपशील तसेच ठेवून बंगला पुन्हा बांधला आहे, जे आवर्जून प्रत्यक्ष अनुभवले पाहिजे. आपण शिशीर व त्याच्यासारख्या लोकांना प्रसिद्धी दिली पाहिजे कारण हेच लोक वन्यजीवन पर्यटन यशस्वी होण्यासाठी थेट जबाबदार आहेत, कारण पर्यटकांना वाघ पाहायचा असेल तर ते काही हवेतून थेट जंगलात उतरू शकत नाहीत. त्यांच्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे व त्याकरता शिशीरचे आभार, कारण त्याच्यामुळे पर्यटकांना केवळ जंगलातील सफारीच लक्षात राहात नाहीत तर तिथले उत्तम वास्तव्यही लक्षात राहते!

अलिकडे, फेसबुक तसेच इन्स्टाग्रामवर टिपेश्वरची अनेक छायाचित्रे दिसतात व यामुळे पर्यटक या ठिकाणांना भेट देण्यासाठी व त्या काळ्या पिवळ्या पट्ट्यांच्या प्राण्याला प्रत्यक्ष पाहण्यासाठी उत्सुक असतात. परंतु मला तुम्हाला वन्यजीवनाविषयी थोडेसे सांगावेसे वाटते की, आपल्या सगळ्यांना वाघ पाहायचा असतो व आपण त्यासाठी पैसे देतो. तरीही प्रत्येक सफारीमध्ये वाघ दिसेल अशी आपली अपेक्षा असेल तर ती आपली चूक आहे, त्याचसोबत आपल्याला जंगलाचा अर्थच समजलेला नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणूनच, टिपेश्वरला आवर्जून भेट द्या पण फक्त वाघांसाठी नव्हे तर त्याचा आत्मा म्हणजेच वन्यजीवन अनुभवण्यासाठी, ज्याचा वाघ फक्त एक भाग आहे, एवढे बोलून निरोप घेतो!

संजय देशपांडे.

संजीवनी डेव्हलपर्स.

smd156812@gmail.com

 

पुण्यातील रिअल इस्टेटविषयी माझे विचार खालील यू ट्यूब दुव्यावर पाहा..

 https://www.youtube.com/watch?v=g4xX7eopH5o&t=5s

















No comments:

Post a Comment