Saturday 29 July 2023

गोष्ट, "ऑर्चिड ,यश्विन जीवन च्या पाण्याची" !

 
























पाणी, हे सगळ्यात कमी महत्त्व दिले जाणारे पेय आहे.”… वेन जेरार्ड ट्रॉटमॅन

वेन जेरार्ड लिओनेल ट्रॉटमॅन हे ब्रिटीश-त्रिनिदाद येथील-पुरस्कारप्राप्त लेखक, चित्रपट निर्माता, कलाकार, छायाचित्रकार, संगीतकार, व इलेक्ट्रॉनिक संगीताचे निर्माते आहेत; एवढा बहुगुणी माणूसच पाण्यासारख्या गोष्टीचे अतिशय कमी पण समर्पण शब्दात वर्णन करू शकतो यात काहीच आश्चर्य नाही.पुणेकरांनी वेन यांच्या विधानाला एरवी साथच दिली असती, परंतु आजकाल त्यांनाही पाण्याचे महत्त्व जाणवते आहे. कारण लोकसंख्या वाढतेय व पाण्याचे स्रोत तेवढेच आहेत. अर्थात अजूनही असे बरेच आहेत (म्हणजे पुणेकर) ज्यांना मुबलक पाणी मिळणे हाच नव्हे तर पाण्याचा अपव्यय करणे हादेखील त्यांचा जन्मसिद्ध अधिकार वाटतो. खरे सांगायचे तर मी पुण्यातील तीन विषयांबद्दल लिहायचे किंवा सांगायचे किंवा अगदी विचारही करायचा नाही असे मी ठरवले होता; एक म्हणजे, अनाधिकृत बांधकाम आपल्या राज्याची नागरी विकासाची धोरणे, दुसरे म्हणजे, पुण्यातील वाहतूक/सार्वजनिक वाहतूक व तिसरे म्हणजे, पाणी! मला माहितीय की मला लेखन थांबवावे लागेल व हेदेखील खरे आहे की या तीन विषयांवर मी लिहूनही (काही वेळा वैतागून) या तीन विषयांच्या संदर्भात काहीही बदललेले नाही. तरीही कुठेतरी कुणीतरी विचारप्रवृत्त होईल व बदल होईल, एवढ्या साध्या (मूर्खपणाच्या) विचाराने मी माझी शपथ नेहमी मोडतो मात्र यावेळी मी पाण्याविषयी लिहीतोय कारण त्यासंदर्भातील एक सकारात्मक व चांगली गोष्ट सांगायची आहे, हे देखील दुर्मिळच आहे, असो!

पहिली गोष्ट म्हणजे, मला पुणे महानगरपालिकेने स्थापन केलेल्या भूजल समितीमध्ये (किंवा कक्ष)काम करण्याची संधी मिळाली आहे. हे खरोखरच अतिशय चांगले पाऊल आहे व सरतेशेवटी यंत्रणा (केवळ पुणे महानगरपालिका नव्हे) या अत्यंत महत्त्वाच्या पैलूसंदर्भात किंवा स्रोतासंदर्भात जागी झाली आहे, याला कारण म्हणजे नागरिकांची पाण्याची वाढती मागणी. या समितीमध्ये अनेक उच्चशिक्षित व अनुभवी लोकांचा समावेश आहे,एक स्थापत्य अभियंता म्हणून माझ्यासाठीही हा वैयक्तिक अतिशय चांगला अनुभव आहे. त्याचवेळी आणखी दोन गोष्टी झाल्या, एक म्हणजे यावर्षी उन्हाळा जून अखेरपर्यंत लांबला. या काळात पावसाचा थेंबही न पडल्याने पुण्याच्या मध्यवर्ती भागांमध्येही (म्हणजेच पुणे प्रदेश, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगरक्षेत्र विकास प्राधिकरण) पाणी टंचाई जाणवू लागली. नेहमीप्रमाणे वर्तमानपत्रे टँकरने पाणीपुरवठा व राजकारणी व पाण्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे साटेलोटे, तसेच गृहनिर्माण सोसायट्या पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असल्याच्या बातम्या छापण्यातच समाधानी होती. दुसरी घटना ही उन्हाळ्यामध्ये थंड हवेच्या झुळुकेसारखी होती व मी पाण्याविषयी लेख लिहीण्याचे मुख्य कारण होती. सुस हे पुण्याच्या पश्चिम भागातील अतिशय झपाट्याने वाढत असलेले  एक उपनगर,जे आधी पुणे महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाचा भाग होतेव आतापुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आले आहे, तेथे आमच्या एका पूर्ण झालेल्या प्रकल्पातील पाण्यासंदर्भातील ही गोष्ट आहे. आता कृपया मला आधी पुणे महानगरविकास प्राधिकरणामध्ये होते व आता पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आले आहे म्हणजे काय यासारखे तपशील विचारू नका, कारण त्यामुळे मला नागरी विकास धोरणांविषयी न लिहीण्याची माझी दुसरी शपथ मोडावी लागेल, तर त्याविषयी पुन्हा कधीतरी सांगेन. थोडक्यात सांगायचे तर, सुस हे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असले तरीही पाणी पुरवठ्यासंदर्भात तेथे व्यवस्थित पायाभूत सुविधा नाहीत (अजूनपर्यंत) व बहुतेक सोसायट्या पाण्याच्या स्रोतासाठी पाण्याचे टँकर तसेच भूजलावरच (कूपनलिका) अवलंबून आहेत व पुण्याच्या अनेक उपनगरांमध्ये हीच परिस्थिती आहे.

सुदैवाने, पुणे प्रदेशामध्ये भूजल पातळी चांगली आहे व शेतीचे प्रमाण कमी होत असल्यामुळे, भूजल उपसाही कमी आहे त्यामुळे घरगुती वापरासाठी ते पुरेसे ठरतेपरंतु, ही परिस्थिती गेल्या दशकापर्यंत होती, झपाट्याने होत असलेले शहरीकरण व पाणी पुरवठ्याची अपुरी व्यवस्था वितरण व सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे पावसाचे पाणी नंतर जमीनीत जाते त्यासंदर्भातील आपल्या निष्काळजीपणाच्या दृष्टिकोनामुळे, पाण्याचा स्रोत म्हणून भूजल पातळीची परिस्थिती आता गंभीर (म्हणजे वाईट) झाली आहे. अनेक भागांमध्ये कूप नलिका कोरड्या पडत आहेत व तुम्ही २०० फूट खोल गेलात तरीही पाण्याचा प्रवाह अतिशय कमी असतो जो पिण्यासाठीही पुरेसा नसतो व मध्यवर्ती भागांमध्ये कूपनलिकेची पातळी अतिशय निकृष्ट आहे म्हणजेच ते विविध कारणांमुळे प्रदूषित आहे उदाहरणार्थ सांडपाण्यामुळे प्रदूषण, विविध रासायनिक द्रव्ये तसेच वाहनांमधील इंधन गळून त्यामध्ये मिसळतात व असे पाणी घरगुती कारणासाठी वापरणे अशक्य होऊन जाते. त्याचशिवाय एक गोष्ट आपण सगळेजण जाणतो परंतु त्यासंदर्भात कुणीच काही करत नाही ती म्हणजे (याच कारणामुळे मी आता त्याविषयी लिहीणेही थांबवले आहे) संपूर्ण शहरामध्ये सर्रास काँक्रिटीकरण होत आहे व झाडांची मुख्यतः मोठ्या झाडांची संख्या कमी होतेय, या दोन्ही गोष्टींमुळे भूजलाचे प्रमाण तसेच दर्जा या दोन्ही गोष्टींवर थेट परिणाम होत आहे. आपण आपल्या सर्व पृष्टभागांची फरसबंदी केली आहे, त्यामुळे जेव्हा पावसाचे पाणी या भागात पडते तेव्हा या पृष्ठभागांवरील रसायनांचा व धुळीचा त्याच्याशी संपर्क येतो व ते त्यामध्ये मिसळून वाहात साठवणूक टाक्यांमध्ये जाते (पावसाचे पाणी साठविण्यासाठी केलेल्या तथाकथित टाक्या किंवा खड्डे). हे पाणी जमीनीच्या पृष्ठभागावर (मातीवर) पडले असते तर ते तिच्या विविध थरातून गाळले गेले असते जे प्रत्यक्ष व रासायनिक गाळण्यांसारखे काम करतात व यामुळे पाण्याचा दर्जा अधिक चांगला झाला असता. तसेच पावसाचे पाणी सर्वत्र जिरवले जात नाही ज्याचे आधी संपूर्ण शहरात समान वितरण होत असे, यामुळे जलधारक (जमीनीखाली असलेले पाण्याचे नैसर्गिक साठे) कोरडे पडतात, त्यामुळेच कूपनलिकांमध्येही आणखी पाणी उपलब्ध नसते

त्याचवेळी विकासाच्या नावाखाली (पुनर्विकासाच्याही) आपण अनेक मोठी झाडे कापून टाकतो, त्यामुळे जमीनीची जलधारण क्षमता तसेच गाळण क्षमताही कमी होते, यामुळेही भूजल पातळी खालावण्याचे प्रमाण वाढते. तुम्ही जेव्हा एक मोठे झाड कापता तेव्हा त्याबदल्यात किमान तीन झाडे लावली पाहिजेत असा कायदा आहे, परंतु अशा कायद्यांचे पालन कोण करते व दुसरे म्हणजे अशी किती झाडे प्रत्यक्षात जगवली जातात व तिसरे म्हणजे ही झाडे पुन्हा मोठी होईपर्यंत पावसाचे पाणी जमीनीमध्ये जिरवण्यासंदर्भात काय केले जात आहे. हे सगळे घटक भूजल भरणाशी थेट संबंधित आहेत व मी म्हटल्याप्रमाणे त्याची काळजी कोण करतो, कारण सगळे सरकारकडून (म्हणजे पुणे महानगरपालिकेकडून) त्यांच्याकडे असलेले सगळे पाणी, त्यांच्या ज्याकाही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी दिले जावे अशी अपेक्षा करतात. या पार्श्वभूमीवर जेव्हा आम्हीपुण्यात, सुस येथे दोनशे हून अधिक घरांची यश्विन जीवन ऑर्किड ही सोसायटी बांधताना, सुरुवातीपासूनच ही सोसायटी पाण्याच्या संदर्भात स्वयंपूर्ण करायची असा निर्णय घेतला होता. सुदैवाने आम्हाला पुरेशी जागा उपलब्ध होती, म्हणून आम्हाला फक्त थोडा सखोल अभ्यास, नियोजन व अंमलबजावणी करायची होती, जी आम्ही केली व सोसायटीचा ताबा देऊन आज पाच वर्षे उलटून गेली आहेत. परंतु आजपर्यंत सोसायटीमध्ये पाण्याचा एकही टँकर आणावा लागलेला नाही (दृष्ट ना लागो)

मला असे वाटते आम्ही अशी एक सोसायटी बांधण्याच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झालो, जेथे पावसाचे पाणी, ज्याचसोबत भूजल व पुनर्प्रक्रिया केलेले पाणी यांचा वापर व झाडांची पुरेशी लागवड करून सोसायटीच्या पाण्याच्या गरजा भागवल्या जातील व उन्हाळ्यामध्येही ती स्वयंपूर्ण होऊ शकेल, जे खरोखरच झाले.  आम्ही मुख्य प्रवेशापाशी व मागील बाजूस (हा आयताकृती भूखंड आहे व पुढील बाजू, लांबीपेक्षा अरुंद आहे) दोन मोठ्या विहीरी बांधल्या व त्यानंतर प्रकल्पाचे नियोजन अशाप्रकारे केले की पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब या दोन विहीरींमध्ये जाईल. प्रकल्पाच्या सर्व बाजुंनी तीनशे जमीनीच्या रचनेचा हायड्रो-जिओटेक (मातीचा अभ्यास करणारी यंत्रणा) अभ्यास करून आम्ही मध्ये तीन कूपनलिकाही बांधल्या व या सगळ्या विहीरी पाणी उपसा यंत्रणेला जोडल्या.त्याचवेळी आम्ही प्रकल्पाच्या कडेने २०० हून अधिक देशी झाडे लावली आहेत व त्यांची व्यवस्थित देखभाल केली आहे. ती झाडे आता मोठी झाली आहेत (आम्ही प्रत्येक झाडापाशी सदनिकाधारकाच्या कुटुंबांचे नाव असलेली पाटी लावून त्यांना ती दत्तक घ्यायला लावली आहेत), या सगळ्या झाडांच्या मुळांमुळे जमीनीची जलधारण क्षमता वाढण्यास मदत झाली ज्यामुळे विहीरी व जलधारक भरण्यास हातभार लागला.त्याचवेळी पुनर्प्रक्रिया केलेले सांडपाणी पाणी जेव्हा जास्त असते (पावसाळ्यामध्ये) तेव्हा आम्ही त्यावर प्रक्रिया करून ते जलधारक तसेच खुल्या विहीरी भरण्यासाठी वापरले. ते वापरण्यापूर्वी आम्ही त्यावर आवश्यक त्या रासायनिक पातळ्यांपर्यंत पुनर्प्रक्रिया करतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आम्ही जे काही केले आहे व ते का बरोबर आहे हे रहिवाशांना समजून सांगितले आहे. यामध्ये झाडांची देखभाल करण्यापासून ते वेळोवेळी पावसाचे पाणी साठवण्याच्या टाक्या, गाळण्या तसेच पाणी उपसा यंत्रणास्वच्छ करणे, व परिसर स्वच्छ ठेवणे या सगळ्या गोष्टी सोसायटी पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या होत्या. रहिवाशांच्या यासंदर्भातील शिस्तबद्ध दृष्टिकोनाशिवाय हे शक्य झाले नसते.तसेच दैनंदिन गरजांसाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या किंवा विहीरीच्या पाण्याच्या वापराविषयी असलेले गैरसमज किंवा ते निषिद्ध मानणे वगैरेगोष्टींचा त्यांच्या मनावरील पगडा सुटला पाहिजे, कारण रहिवाशांचा पाणी पुरवठ्यासंदर्भातील दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे.किंबहुना आकडेवारीतून असे दिसून आले आहे की पाणी प्रक्रिया केल्यानंतर अगदी जवळपास बिसलेरीसारखे (म्हणजे बाटलीबंद पाण्यासारखे) असते कारण ते दोनदा फिल्टर केले जाते, एक निसर्गाद्वारे (म्हणजे जमीनीमध्ये) व दुसरे यंत्राद्वारे. मी आकडेवारीच्या फारसे खोलात जाणार नाही, परंतु माझे सांगण्याचा सारांश असा की, पुण्यामध्ये वर्षाला सरासरी ३० इंच पाऊस झाला तर यशविन जीवन ऑर्किडच्या संपूर्ण जमीनीवर १५ कोटी लीटर (पावसाच्या स्वरूपात) पाणी असेल, तर सोसायटीला दरवर्षी अंदाजे ५ कोटी लीटर पाणी लागते (जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार) व जर गेल्या पाच वर्षात एकही लीटर पाणी बाहेरून घ्यावे लागले नसेल, तर भूजल + पावसाच्या पाण्याची मोहीम बरीच यशस्वी झाली आहे असे म्हणता येईल. तसेच येथे तीनशे हून अधिक झाडे मोठी झाली आहेत ज्यावर अनेक पक्ष्यांची घरे आहेत, आम्ही याहून अधिक आणखी काय चांगली अपेक्षा करू शकत होतो?

अशा चांगल्या गोष्टींमुळेच माझे  वैतागलेपण थोडे कमी होते व एकूणच निसर्गासाठी अजूनही आशा आहे याची मला जाणीवही होते, कारण तुम्ही जेव्हा पाणी वाचवता व ते योग्य प्रकारे वापरता तेव्हा तुम्ही केवळ माणसांचेच नव्हे तर इतरही अनेक प्रजातींचे संवर्धन करू शकता ज्या या यंत्रणेचा तितकाच महत्त्वाचा भाग आहेत. पण पुण्यात व प्रत्येक शहरी भागात डोळे झाकून एखाद्या विशिष्ट प्रकारचा विकास करण्याऐवजी, याचीच पुनरावृत्ती करू शकतो. तसेच तुम्ही कोणताही विकास करताना तुम्हाला काय साध्य करायचे आहे हे समजून घ्या व अधिकाधिक चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरण्याचा आपला हव्यास थोडा कमी करूया. सरकारही जेव्हा विकासकांना पावसाच्या पाण्याचा वापर व तत्सम गोष्टी करायला सांगते तेव्हा त्यांनी स्वतःचे-विश्लेषण केले पाहिजे, तुम्हाला भोवताली काय दिसते हे पाहिले पाहिजे. रस्त्याचा प्रत्येक इंच व अवती-भोवती काँक्रिटीकरण केले जाते, पाणी जमीनीत झिरपण्यासाठी जागाच ठेवली जात नाही, तसेच पावसाचे पाणी साठवणाऱ्या टाक्या वर्षभर तुंबलेल्याच असतात. सगळीकडे काँक्रिटीकरण/फरसबंदी केल्यामुळे गवत, कीटक यांच्यासाठी जागाच उरत नाही, यामुळे फुलपाखरे, चिमण्यांसारखे पक्षी कमी होतात व यामुळेच तुमचे शहर काँक्रिटचे जंगल होते.एक लक्षात ठेवा, पावसाच्या पाण्याचे संवर्धन/भूजल यंत्रणा या सगळीकडे सारख्याच पद्धतीने बागडताना येणार नाहीत, तर प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक परिस्थीनुसार राबवाव्या लागतील व ही अशक्यप्राय गोष्ट नाही. 

मी आज जेव्हा यश्विन जीवन ऑर्किडला भेट देतो व रहिवाशांचे आनंदी चेहरे पाहतो (उन्हाळ्यातही), मला जेव्हा पक्षी, फुलपाखरे, खारी जांभुळ व कडुनिंबाच्या झाडांवरून बागडताना  दिसतात, तेव्हा माझ्या मनात विचार येतो की सोसायटी ही अशीच असली पाहिजे, जेथे प्रत्येकासाठी स्वतःची योग्य अशी एक जागा असेल, अगदी पावसाच्या पाण्याच्या एका थेंबाचीही, या समाधानाच्या भावनेनेच परत पाण्याविषयी लिहिण्याची प्रेरणा दिली !

(तुम्हाला याविषयी काहीही मदत हवी असेल तर यश्विन जीवन सोसायटीचे पदाधिकारी श्री. शास्त्री व श्री. मुळे यांचे, तसेच आमच्या चमूचे संपर्काचे तपशील देत आहे.

श्री.शास्त्री09822463687 / श्री.मुळे09822979690

sales@sanjeevanideve.com )

तुम्ही खाली दिलेल्या दुव्यावर या गोष्टीचे तपशील प्रत्यक्ष पाहू शकता

https://www.flickr.com/photos/sanjeevani_developers/albums/72177720309891298/with/53057155319/


संजय देशपांडे.

smd156812@gmail.com




















No comments:

Post a Comment