Saturday 3 December 2011

सज्जा ते गच्ची आणि गवाक्ष ते लोखंडी जाळी...



 
 
 
 
 

घर बांधणे हा अतिशय सुंदर अनुभव आहे कारण त्यामुळे मला पृथ्वीवरील सर्वात बुद्धीमान जीवासाठी घर बांधण्याचा आनंद मिळतो......कोर्बिझीयर

स्वतःचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या कुठल्याही अभियंत्याला, वास्तुरचनाकाराला किंवा विकासकाला तुम्ही हा प्रश्न विचारा, तुम्हाला कोर्बिझीयरचे म्हणणे किती खरे आहे याची जाणीव होईल! हे केवळ अवतरण नाही एका निर्मात्याच्या हृदयातली भावना आहे. घराच्या रचनेसाठी वापरले जाणारे शब्द अनेक वर्षात बदलले आहेत मात्र त्यांचा वापर बदलला आहे का हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे?
मला स्वतःला याचे उत्तर नाही असे वाटते. गेली २० वर्षे मी विविध आकारांची आणि गरजांसाठी घरे बांधतोय मात्र काही बाबी अजिबात बदलेलल्या नाहीत. वाढत्या किमती, जागेची कमतरता आणि नियमांमुळे निश्चितच बदल झाला आहे. काही काळ आपल्याला असे वाटू शकते की नियोजनाचा विशिष्ट घटक पूर्ण होतोय किंवा मागे पडलाय, मात्र त्याचा परिणाम तात्पुरता असू शकतो. मानवी संस्कृतीच्या विकासापासून त्याची निवासाची गरज फारशी बदललेली नाही.
घरामुळे तुम्हाला निर्भय आणि सुरक्षित वाटते आणि ते चांगलेही दिसते. टिकाऊ साहित्य, कुलूपे, दरवाजे इत्यादींचा वापर करुन प्रत्येकजण आपले घर सुरक्षित करुन शांततेने राहू शकतो, दुसरा घटक म्हणजे घर बाहेरुन कसे दिसते किंवा त्याचा सौंदर्य घटक याचा विचार केला जातो. इथे बांधकाम व्यावसायिक तसेच रचनाकार, घर अधिकाधिक निसर्गाला पूरक कसे होईल याचा विचार करतात. अशा घरांमुळेच त्यात राहणाऱ्याला खरी शांती मिळू शकते. आपल्याला असुरक्षित न वाटता पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासारखी जागा मिळावी म्हणून “सज्जा” ही संकल्पना निर्माण झाली, आता आपण त्याला बाल्कनी म्हणतो. मात्र प्रत्यक्षात बोलायचे झाले तर ती बाल्कनी नाही, सज्जा म्हणजे वरच्या मजल्यावर घराला लागून असलेली मोकळी जागा, जिथून मोकळे आकाश दिसते आणि तुम्हाला सभोवतालच्या निसर्गाच्या सान्निध्यात राहता येते. अधिक अचूकपणे बोलायचे झाले तर ती खोलीला लागून असलेली गच्ची असते, इमारतीच्या वरील नाही.
मध्यभारतामध्ये जिथे उन्हाळा अतिशय उष्ण असतो बऱ्याचदा सज्जाला “गवाक्षाचे” संरक्षण असते, ही एकप्रकारची खिडकी असते आणि त्याला बहुतेक वेळा दगडाने कोरलेली “जाळी” असते. यामुळे दोन उद्देश पूर्ण होतात, उष्ण वाऱ्यांमुळे संरक्षण होते तसेच सज्जा झाकला जातो त्यामुळे घरातील महिलांना सज्जातून बाहेरील दृश्य पाहता येते आणि येणारे जाणारे त्यांना पाहू शकत नाहीत. बऱ्याच हवेली आणि वाड्यांमध्ये मध्यभागी एक चौक असायचा जो तळमजल्यावर मोकळा असायचा मात्र याच्या स्वतःच्या मर्यादा असतात कारण त्यातून आकाश दिसत नाही आणि सज्जाप्रमाणे वाऱ्याची झुळूक आणि आजूबाजूचा परिसरही पाहता येत नाही. सज्जाचे अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे जयपूरचा हवामहाल! लाल दगडाच्या नक्षिदार जाळीने संरक्षण करणाऱ्या अनेक मजली सज्जामुळे महाल बाहेरुन अतिशय सुंदर दिसतो. उत्तर भारतातील इमारतींमध्ये प्रत्येक मजल्यावर सज्जा असतो त्यामुळे प्रत्येक मजल्यावर थंड हवाही मिळते आणि बाहेरचे दृश्यही पाहता येते. बऱ्याच हवेल्यांमध्ये अजूनही सज्जा आहे आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी योग्य ठिकाणी जाळ्या लावलेल्या असतात. बऱ्याचदा खोलीच्या बाहेरच्या भिंतीवर खिडकीसारखी खुली जागा तयार केली जाते, जिथे तुम्ही बसून आजूबाजूचे दृश्य बघू शकता. युरोपातही पुरातन काळापासून घरे बांधताना बाल्कनी किंवा वऱ्हांड्याच्या नावे अशी जागा बांधली जायची. बऱ्याचदा अशी जागा “बोगनवेलींसारख्या” वेलींनी अतिशय सुंदर पद्धतीने सजवल्या जायच्या, ज्यामुळे अतिशय रंगीत परिणाम साधला जायचा. बऱ्याच कुटुंबांमध्ये सकाळचा नाश्ता तसेच रात्रीचे जेवण अशा ठिकाणी घेण्याची आणि निसर्गाच्या सान्निध्यात निवांतपणा अनुभवण्याची पद्धत आहे.
एफएसआय आणि बहुमजली इमारतींच्या काळात बाल्कनी आली, हिची संकल्पना सज्जासारखीच असली तरीही आकाराच्या बाबतीत ती अतिशय लहान होती, केवळ ४रुंद जागेत तुम्हाला फारशी ये-जा करता येत नाही तसेच आजूबाजूचे दृश्यही फारसे दिसत नाही. जागेच्या कमतरतेमुळे या जागेचाही खोलीतच समावेश केला जाऊ लागला. मात्र स्वतःच्या घरातून मोकळं आकाश दिसायलं हवं असा विचार वास्तुरचनाकारांच्या मनात निर्माण झाला आणि घराला लागून गच्ची किंवा अटॅच्ड टेरेस ही संकल्पना निर्माण झाली. बऱ्याच जणांना असे वाटते की हे विकासकांचे पैसे कमावण्याचे आणखी एक साधन आहे, मात्र मला असे वाटते की ही जागा तुमच्या घराच्या आकाराच्या प्रमाणात हवी आणि त्यातून मोकळे आकाश किंवा आजूबाजूचा परिसर दिसावा, जिथे तुम्ही चार भिंतींनी घेरलेले नसाल. अशा खुलेपणामुळेच तुमचे मनही निसर्गाचे मोकळेपणाने स्वागत करते. दुर्देवाने मी अशा अनेक गच्च्या पाहिल्या आहेत ज्यावर विचित्र पद्धतीने आच्छादन असते किंवा झाकलेल्या असतात, त्यामुळे संपूर्ण इमारतीचे सौंदर्यच नाहीसे होते आणि गच्चीचा हेतू पूर्ण होत नाही. लोक स्टीलचे पत्रे, फायबरचे पत्रे, एमएस ग्रील किंवा तत्सम गोष्टी सुरक्षेच्या नावाखाली वापरतात आणि गच्ची बंदिस्त करायचा प्रयत्न करतात. घरातील लोकांच्या सुरक्षिततेचा निश्चितच विचार झाला पाहिजे मात्र त्यासाठी इतरही मार्ग आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे.
या वाढत्या काँक्रिटच्या जंगलात आपण एक गोष्ट विसरतो की केवळ आपल्यालाच निवारा आणि सुरक्षित घरांची गरज नाही तर इतरांनाही आहे, आपण त्या जीवांना त्यांच्या घरातून बाहेर काढतोय!  तुम्ही पाहिलं असेल की पुणे शहर किंवा कुठल्याही वाढत्या शहरामध्ये आधी भारद्वाज, चिमण्या, बुलबुल, मैना आणि अगदी फुलपाखरंही भरपूर दिसायची मात्र आता दिसत नाही. याचे साधे कारण म्हणजे त्यांना काही काळ विश्रांती घेण्यासाठी जागा नाही, निसर्गतः काही अन्न आणि पाणी उपलब्ध नाही. आता ते त्यांची घरटी दगडी भितींवर किंवा सिमेंटच्या स्लॅबवर किंवा घराच्या दर्शनी भागात बनवतात! सज्जा किंवा गच्ची अशा पक्षांसाठी उत्तम घर होऊ शकते, जिथे त्यांना पाणी अन्न सहजपणे मिळेल त्यासाठी आपल्याला केवळ थोडेसे लक्ष द्यावे लागेल आणि मदत करावी लागेल. यामुळे जैवविविधतेला थोडासा आपला हातभार लागेल, त्यासाठी आपल्याला केवळ पक्ष्यांसाठी थोडेसे पाणी आणि अन्न ठेवावे लागेल, असे करुन त्यानंतर फरक पहा! माझ्या कार्यालयाला लागून असलेल्या लहानश्या गच्चीवर मी हा प्रयोग केला आहे. मी केवळ पाण्याचा वाडगा ठेवायला सुरुवात केली आणि आता दररोज दुपारी तिथे अनेक पक्षी अंघोळ करायला आणि पाणी प्यायला येतात, केवळ त्यांना बघूनही माझा थकवा दूर होतो. इथे येणाऱ्या पाहुण्यांमध्ये दररोज नव्या पाहुण्यांची भर पडते आणि त्यांचं एक रंगीबेरंगी संमेलनच भरतं.
सुरक्षेच्या नावाखाली चित्रविचित्र आकाराच्या लोखंडी जाळांनी वेढलेल्या गच्च्या पाहिल्यावर मला अतिशय वाईट वाटते!
मित्रांनो, तुमच्या धकाधकीतून थोडासा वेळ काढून “सज्जा” नावाच्या जागेत घालवा. तुमच्याकडे सुदैवाने सज्जा असेल तर तिथे निवांतपणे घालवलेल्या काही क्षणांमुळे तुमचे जीवन कसे बदलते ते पहा! आपल्या घरात आणि आजूबाजूला अशा जागांचे महत्व आपण समजून घ्यायला हवे आणि या जागा ज्या हेतूने तयार करण्यात आल्या आहेतच त्यासाठीच वापरल्या जाव्यात. आपण ज्या ठिकाणी राहतो तिथे आपल्याला शांती मिळणार नसेल तर त्या सुरक्षिततेचा आणि आरामाचा काय फायदा!
संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!


संजीवनीची सामाजिक बाजू!

http://www.flickr.com/photos/65629150@N06/sets/72157627904681345/
शहराविषयीच्या तुमच्या काही तक्रारी असतील, तर खालील लिंकवर क्लिक करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx


हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा

No comments:

Post a Comment