Wednesday, 1 October 2014

मतदान एक जबाबदारी सुद्धा !आपल्याला मतदानाचा अधिकार आहे याला विशेष अर्थ नसतो ; आपण त्या अधिकाराचा कसा वापर करतो हे  जास्त  महत्वाचे असते.” …लो हेन्री हूवर.

लो हेन्री हूवर या अमेरिकेच्या प्रथम महिला होत्या, त्यांचे पती हर्बर्ट हूवर हे १९२९ ते १९३३ पर्यंतचे अमेरिकेचे अध्यक्ष होते. अमेरिकेच्या या माजी प्रथम महिलेची बुद्धिमत्ता तिच्या वरील शब्दांमधून दिसून देते! आपल्या विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना आपल्याकडील सध्याची दयनीय परिस्थिती पाहता हे विधान अतिशय योग्य वाटते! मी कुणी राजकीय तज्ञ नाही किंवा हा ब्लॉग कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाही किंवा मार्गदर्शनासाठी नाही. मला फक्त आपण ज्या समाजामध्ये राहतो त्याच्या विकासात रस आहे. त्या विकासासाठी प्रत्येक निवडणूक महत्वाची आहे, त्यातही विधानसभा निवडणुकीला विशेष महत्व आहे. महापालिकेच्या निवडणुका अगदी स्थानिक मुद्यांवर लढविल्या जातात तर लोकसभेच्या निवडणुका राष्ट्रीय मुद्यांवर लढविल्या जातात, राज्यातील कायद्या व सुव्यवस्था, नागरी विकासाची धोरणे ते पायाभूत सुविधांचा विकास, इत्यादी विषय राज्य प्रशासनावर अवलंबून असतात. म्हणूनच राज्यातील निवडणुका अतिशय महत्वाच्या असतात कारण पुढील पाच वर्षांमध्ये आपल्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी राज्यातील या निवडणुकाच अतिशय महत्वाच्या असतात! केवळ ही पाच वर्षेच नाही तर या पाच वर्षांमध्ये घेतलेल्या निर्णयांचा आपल्या भविष्यावर दीर्घकाळ परिणाम होतो!

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच पक्षांमध्ये अनेक उमेदवारांनी पक्षबदल केल्याचे आपण पाहिले, त्यामुळे माझ्यासारखा सामान्य मतदाता गोंधळात पडलाय तसेच आजूबाजूला जे दिसतेय त्यामुळे निराशही झालाय. ही चिंतेची बाब आहे कारण या नैराश्यातून अनेकजण कदाचित मतदान करणार नाहीत! आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ते प्रमुख पक्ष उमेदवार निवडताना नैतिकतेचे किंवा नैतिक मूल्यांचे पालन करत नाहीत, अशा पक्षांनी आपल्याला दिलेल्या आश्वासनांबाबत आपण काय अपेक्षा करायची? नैराश्याची ही एक बाजू झाली, उमेदवारही त्यासाठी तेवढेच जबाबदार असतात कारण स्वतःच्या भूतकाळाविषयी एकदाही विचार न करता केवळ तिकीट मिळविण्यासाठी पक्ष बदलतात, त्यांच्यादृष्टीने विजयापर्यंत पोहोचण्यासाठी ती फक्त एक शिडी असते! ज्या उमेदवारांचे स्वतःचेच काही चारित्र्य नसते ते आपल्याला काय भरवसा देणार, किंबहुना आपल्याला त्यांच्यात फक्त स्वार्थीपणा व सत्तेचा हव्यास दिसून येतो! बरेच मतदार म्हणतील की आता ‘नोटा’ म्हणजेच वरीलपैकी कुणीही नाही म्हणजेच कुणालाही मतदान करायचे नाही, हा पर्याय निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिला आहे! तो पर्याय आहेच, मात्र निवडणूक आयोगाविषयी पूर्णपणे आदर बाळगून, तो चुकीचा पर्याय आहे असे माझे मत आहे. विचार करा सर्व मतदारांनी ‘नोटा’ पर्याय वापरला तर कशी परिस्थिती निर्माण होईल? अशावेळी कदाचित पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील, मात्र मतदारांनी नाकारलेल्या कोणत्याही उमेदवाराला उभे राहता येणार नाही! आपल्याकडील परिस्थिती रोचक आहे, मला असे वाटते की सध्या बहुतेक लोक सर्व प्रकारच्या राजकीय कसरती करणा-या, एका पक्षातून दुस-या पक्षात कोलांटउड्या मारणा-या सर्व उमेदवारांना फेटाळण्याचा विचार करत असतील!  
तरीही मला असे वाटते की ‘नोटा’ वापरु नये कारण, बहुतेक लोकांनी ‘नोटाचा’ पर्याय वापरला तर अतिशय कमी मताधिक्याने सत्तेत आलेल्या सरकारने संपूर्ण समाजावर सत्ता गाजवावी असे होऊ शकत नाही, ज्यांनी मतदान केलेले नाही किंवा ‘नोटा’ वापरलेला नाही त्या सर्वांवर हा अन्याय असेल. मला कुतुहलापोटी आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो की, एखाद्या उमेदवाराला मिळालेल्या वैध मतांपेक्षा ‘नोटा’ मते अधिक असल्यास काय होईल? अशा परिस्थितीत निवडणूक रद्द होईल का व त्या मतदारसंघातून उभ्या राहिलेल्या सर्व उमेदवारांना पुन्हा निवडणुकीत उभे राहण्यास प्रतिबंध केला जाईल का? त्यातून एक बाब तर स्पष्ट होईल की त्या मतदारसंघातील बहुतेक उमेदवारांना मतदारांनी फेटाळले आहे, अशावेळी सर्व पक्षांना नवे उमेदवार शोधावे लागतील; कारण या सर्व उमेदवारांना मतदारांनी फेटाळले आहे, म्हणजेच मतदारांच्या मते ते निवडणूक लढवायला पात्रच नाहीत! मतदानामध्ये ‘नोटा’ मत देण्याचे गांभीर्य लक्षात घेतल्याशिवाय व सामान्य मतदारांमध्ये त्याचा वापर करण्याविषयी जागरुकता निर्माण केल्याशिवाय, ‘नोटा’मुळे मत वायाच जाईल असे माझे वैयक्तिक मत आहे!

तोपर्यंत, आपण परिस्थितीचा आदर केला पाहिजे व ज्यांना हा अधिकार वापरायचा आहे ते निवडणुकीत ‘नोटा’ बटण दाबू शकतात. मात्र ज्यांना कुणालातरी मत द्यायचे आहे त्यांचे काय? मला याबाबतीत नेहमी प्रश्न पडतो की आपल्या देशात उमेदवार जात, धर्म, पैसे, ताकद व सर्वात महत्वाचे म्हणजे लागेबांधे या आधारावर निवडला जातो, प्रत्येक पक्ष या निकषांना सोयीने जिंकून येण्याची क्षमता म्हणतो, अशा वेळी मी मत देण्याचा निकष काय ठरवला पाहिजे? उमेदवाराची दूरदृष्टी, त्याची समज, त्याच्या मतदारसंघातील समस्यांविषयी त्याची बांधिलकी, त्याची आत्तापर्यंतची कामगिरी, मतदारांशी त्याचा जनसंपर्क, कोणत्याही पक्षाशी बांधिलकी, त्याचे चारित्र्य तसेच सामाजिक पार्श्वभूमी यासारखे निकष कुठे आहेत! शिक्षण व व्यवसाय या बाबी तर नंतरच्या आहेत कारण अनेक जण चांगले शिक्षण मिळण्याइतके सुदैवी नसतात, व उमेदवार सुशिक्षित आहे याचा अर्थ तो एक चांगली व्यक्ती आहे असा होत नाही! आपल्याकडे अत्यंत सुशिक्षित उमेदवारही सत्तेवर आल्यानंतर अतिशय भ्रष्ट झाल्याची भरपूर उदाहरणे आहेत.

आपल्यापैकी सर्वांनीच उमेदवारांनी जाहीर केलेली संपत्ती पाहिली असेल जे करणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे! असे दिसते की सर्व मतदारसंघांवर करोडपतींची सत्ता आहे, म्हणजेच एक कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असलेले उमेदवार असंख्य आहेत! आपल्याकडे विदर्भात व मराठवाड्यामध्ये काही अतिशय ग्रामीण व गरीब मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये शेतक-यांच्या आत्महत्यांची समस्या अतिशय गंभीर आहे, मात्र त्याचवेळी येथील उमेदवार अतिशय श्रीमंत असल्याचे दिसते! पक्षाचे तिकीट मिळण्यासाठी करोडपती असणे हा केवळ योगायोग आहे की निकष झाला आहे? श्रीमंत असणे हा गुन्हा नसला तरीही सत्ताधारी पक्षातील ब-याच उमेदवारांची संपत्ती गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक पटींनी कशी वाढली आहे मात्र त्याचवेळी त्यांच्या मतदारांच्या आर्थिक परिस्थितीत विशेष काही बदल झाल्याचे दिसत नाही? पैसे मिळवणे हे बहुतेक लोकांचे उद्दिष्ट आहे, मात्र तुम्ही तो कसा कमावता यातून व्यक्तिचे चारित्र्य ठरते व मतदारांनी या आघाडीवर उमेदवाराबाबत डोळे मिटून घेतलेले नाहीत! दिवसेंदिवस निवडणुका महाग होत चालल्या आहेत व अधिकृत खर्चच जवळपास २५ लाखांपर्यंत पोहोचला आहे, अर्थातच हे केवळ हिमनगाचे टोक आहे! सामान्य माणूस क्वचितच एवढा खर्च करु शकेल. आजकाल लाखो मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मानवी, यांत्रिक तसेच इलेक्ट्निक्स अशा  ब-याच पायाभूत सुविधा आवश्यक असतात ज्यांना आपण सोशल मीडिया म्हणतो! या सर्व आघाड्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी पैसे लागतात हे खरे आहे! गेल्या काही वर्षात प्रचाराचे स्वरुप पूर्णपणे बदलले आहे, प्रत्येक उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांना भेटत असे ते दिवस आता गेले. ते निवडणुकीचे चांगले दिवस होते जिथे मतदार व उमेदवारांमध्ये प्रचारादरम्यान एक नाते निर्माण होत असे!

आता पुढील पंधरा दिवसात अनेक स्वप्ने दाखवली जातील, अनेक आश्वासने दिली जातील, वैयक्तिक तसेच समाजाच्या विकासाची! मात्र एक जागरुक मतदार म्हणून तुम्ही मतदान केले पाहिजे. तुम्हाला काय सांगितले जात आहे व दाखवले जात आहे याचे विश्लेषण करुन शहाणपणाने मतदान केले पाहिजे! तुमचे मत आत्तापर्यंत आश्वासनांची पूर्तता करणा-या व एक चांगली व्यक्ती असलेल्या उमेदवारालाच द्या. लक्षात ठेवा मतांसाठी ब-याचवेळा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लाच देण्याचा प्रयत्न केला जाईल, ही लाच रोख रकमेच्या स्वरुपात असू शकते किंवा गृहसंकुलामध्ये इमारतीभोवती फरशी घालणे किंवा पाण्याचे पंप किंवा जनरेटर किंवा बोअरवेल देणे  इत्यादी लहान-सहान कामे करुन देण्याच्या आश्वासनाच्या स्वरुपात असू शकते. मात्र जी व्यक्ती तुमचे मत खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे तिच्या हाती सत्ता आल्यास ती काय करेल याचा विचार करा? मत नेमके कुणाला द्यायचे, ज्याच्या तिकीटावर उमेदवार उभा आहे त्या पक्षाला किंवा त्या उमेदवाराला याविषयी अनेकांच्या मनात नेहमी गोंधळ असतो, अगदी माझ्याही मनात असतो? याचे उत्तर थोडे किचकट आहे, एका प्रसिद्ध पौराणिक प्रश्नानुसार आपण माणूस म्हणजे काय, शरिरातील आत्मा किंवा तो आत्मा ज्यामध्ये आहे ते शरीर? मला असे वाटते दोन्हींचा संयुक्त परिणाम साधला पाहिजे.    ब-याचदा असे होते की एखादा उमेदवार व्यक्ती म्हणून चांगला असेल मात्र तो ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतो त्याने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसेल किंवा त्याचे तत्वज्ञान समाजासाठी हितकारक नसेल. असेही शक्य आहे की पक्षाची नैतिक मूल्य चांगली आहेत मात्र त्यांनी त्या पक्षाची पार्श्वभूमी नसलेला व चारित्र्यहीन उमेदवार निवडला आहे! अशा वेळी तुम्ही तर्कसंगत विचार करुन आपण नेमके कशासाठी मतदान करायचे आहे हे ठरवले पाहिजे
शेवटी लक्षात ठेवा आपण लोकशाहीमध्ये राहतोय जेथे प्रत्येक मत बहुमोल असले व अपक्ष उमेदवार निवडून आला तरी तो कदाचित इच्छित प्रभाव पाडू शकणार नाही, त्याचप्रमाणे एखाद्या पक्षामध्ये एकच चांगला उमेदवार असला तरीही तो त्याच्या इच्छेने व वर्तनाने बदल घडवून आणू शकतो. लोकसभा निवडणुकीत आपण हे पाहिले आहे!
अमेरिकेच्या प्रथम महिलेच्या वरील विधानानुसार मत ही आपली जबाबदारीही आहे, व ती जबाबदारी पार पाडणे हे आपल्यासाठी महत्वाचे आहे; कारण आपण काम करतो तेव्हाही अनेकवेळा अशी परिस्थिती येते ज्यावेळी आपण कोणता पर्याय निवडायचा याविषयी गोंधळात पडतो व इथेच शहाणपणाने मतदान करण्याची क्षमता आपल्या मदतीला येते!
सध्या आपल्या राज्यासाठी तसेच आपल्या समाजासाठी आपण जाणीवपूर्वक निवड करणे आवश्यक आहे, आपल्याला ती जबाबदारी पार पाडता आली नाही तर आपल्या भविष्यासाठी आपणच दोषी असू, जे फारसे आशादायक नसेल हे सांगायची गरज नाही! त्यामुळे चला तर मग मोकळ्या मनाने मतदान करा, तुमच्या मताच्या शक्तिने संपूर्ण समाजात बदल घडवून आणा!

संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स


No comments:

Post a Comment