Thursday 14 June 2018

अनधिकृत बांधकाम नावाचा भस्मासुर!




























आपल्याला गुन्हे नियंत्रित करता येत नसतील, तर मग सरळ गुन्ह्यांना कायदेशीरका करू नयेत आणि मग त्यांच्यावर व्यवसायीक कर का लादू नये?”... विल रॉजर्स.

विल्यम पेन ऍडेर उर्फ "विल" रॉजर्स हा नाटक व चित्रपट अभिनेता, रंगकर्मी, अमेरिकन काउबॉय, विनोदवीर, वृत्तपत्र स्तंभलेखक, व ओक्लाहोमासाठी सामाजिक टिप्पणीकार होता. विल्यमने अतिशय योग्य उपसाहात्मक शैलीत आपल्या देशातील सध्याच्याच नाही पण अगदी भूतकाळातल्या (आणि कदाचित भविष्यकाळातल्याही) सरकारांनाही सणसणीत चपराक दिली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या सरकारच्या कट्टर समर्थांसाठी म्हणून सांगतो (प्रत्येक सरकारचे असतातच) ते कदाचित एक बातमी विसरले सुद्धा असतील जी सध्या हेडलाईनसमेत होती मात्र लवकरच लोक ती विसरले. हिमाचल प्रदेशच्या कसौली या अतिशय निसर्गरम्य पर्वतरांगांच्या व पर्यटकांसाठी स्वर्ग मानल्या जाणाऱ्या गावात 18 एप्रिलला दिवसाढवळ्या एक अतिशय भयंकर गुन्हा झाला. एका हॉटेल मालकानं तेथील सहाय्यक नगर नियोजन अधिकारी शैल बाला यांची गोळी घालून हत्या केली. तिचा गुन्हा केवळ एवढाच होता की ती तिथे संबंधित हॉटेल मालकानं केलेलं अवैध बांधकाम पाडण्यासाठी आली होती. त्यासाठी तिच्याकडे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होता, तिनं न्यायालयाच्या आदेशाकडे व त्या अवैध बांधकामाकडे डोळेझाक करण्यासाठी लाच स्वीकारली नाही. एवढंच कारण होतं तर मग, ती सहाय्यक नगर नियोजन अधिकारी शैलबाला खरंच मूर्ख होती, नाहीतर तिनं शेकडो मैल दूर असलेल्या दिल्लीतील काळ्या कोटधारी न्यायाधीशांचं म्हणणं एवढं मनावर घ्यायची काय गरज होती. तिनं हॉटेलवर कारवाई केली नसती तरी ते काहीच करू शकणार नव्हते. खरंतर तिनं लाच स्वीकारायला हवी होती, त्यामुळे तिचा जीव वाचला असता एवढंच नाही पण दुबई, सिंगापूरसारख्या ठिकाणी आरामात उन्हाळ्याची सुट्टीही घालवता आली असती. मात्र असं करण्याऐवी त्या वेड्या बाईनं विरोध केला, प्रामाणिकपणानं वागण्याचा प्रयत्न केला आणि परिणामी तिला बंदुकी गोळी स्वीकारावी लागली, आता काय? सरकार त्या हॉटेल मालकाला अटक करायलाही तयार नव्हतं व तो पळून गेल्याचा त्यांचा दावा होता. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाला ही घटना कळली तेव्हा त्यांच्याच आग्रहावरून पोलीसांनी शेजारील राज्यातून मारेकऱ्याला कशीबशी अटक केलीव आता खटला सुरू होईल. आशा करूयात की या प्रकरणात कुणीतरी साक्षीदार त्यांनी जे पाहिलं त्याच्याशी ठाम राहील व सत्याचा विजय होऊन, मारेकऱ्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल !
 आता बरेच जण म्हणतील, या लेखाचं शीर्षक तसंच मी ज्या अवतरणानं सुरूवात केली व वर उल्लेख केलेली घटना यांचा काय संबंध आहे. एका चित्रपटामध्ये लोकप्रिय अभिनेता शाहरुख खानचा एक संवाद होता, “बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैंम्हणजेच मोठ्या शहरांमध्ये अशा लहान घटना होत असतात, इथे तर शहरही लहान आहे तर मग त्यावरून एवढा गहजब कशासाठी?  कसौली हे शहर लहान असलं व केवळ एकाच व्यक्तीचा जीव गेला असला (शैल बाला माफ कर, तू अशा एका देशात जन्मली होतीस जिथे कुणालाही जिवाचं मोल वाटत नाही, म्हणून मी फक्त एकच जीव म्हटलं), तरी त्यामुळे देशातली लहान-मोठी शहरं असोत किंवा महानगरं एक अतिशय स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. केवळ अंधळ्या व्यक्तींनाच तो दिसणार नाही व बहिऱ्यांना ऐकू येणार नाही, दुर्दैवानं गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक सरकार अंधळ्या व बहिऱ्यांनी भरलेलं आहे. हा संदेश सरकार नावाच्या यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्यांना असं वाटतं की ते कायद्यासाठी काम करतात (होय शैल बालानं अशी मूर्ख माणसं अजूनही आहेत हे दाखवून दिलं) व ज्या व्यक्तींना कायद्याच्या विरुद्ध बाजूला राहायला आवडतं (म्हणजे चुकीच्या बाजूला) त्यांच्यासाठीही आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी व कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांसाठी संदेश आहे की, कृपया तुम्ही अवैध बांधकामांच्या प्रकरणांमध्ये पडू नका, त्यापासून दूर राहा नाहीतर जीव धोक्यात येईल. असाही काही महिन्यांचाच प्रश्न आहे. या देशात कायदेशीर बांधकामांपेक्षा अवैध बांधकामं अधिक आहेत ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक राज्यातील सरकार (ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असले तरी) माननीय न्यायालयाचे अवैध बांधकामांविषयी काहीही मत असले तरीही कालांतराने ती नियमित करते. त्यामुळेच जे सरकारच कालांतरानं वैध करणार आहे ते पाडण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात कशाला घाला, शेवटी तुम्ही सरकारचेच नोकर आहात, हाच संदेश या हत्येमुळे कायद्याचे पालन करणाऱ्या सरकारी सेवकांपर्यंत पोहोचला आहे.

दुसऱ्या वर्गासाठीचा म्हणजे कायद्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या सर्व लोकांसाठी असलेला संदेश म्हणजे (आजकाल कायद्याची बाजू कोणती याची व्याख्या करणं खरंच अवघड असतं), काळजी करू नका तुम्ही जे करत आहात ते करत राहा. म्हणजे तुम्ही तुमची हॉटेलं, धाबे, इमारती, कारखाने किंवा तुम्हाला जे काही बांधायचं आहे ते बांधताना कोणत्याही कायद्याचे पालन करू नका. तुम्ही जे काही बांधकाम करताय त्यातून बक्कळ पैसे कमवा, कोणत्याही सरकारी विभागाच्या मार्गदर्शक तत्वाचा ताण घ्यायची गरज नाही, मग तो नागरी विकास विभाग असो, प्रदूषण नियंत्रण मंडळ असो, महसूल विभाग, नगर सर्वेक्षण, वीजमंडळ (मला अजूनही एमएसईबी असंच म्हणायला आवडतं), पोलीस किंवा अगदी सर्वोच्च न्यायालय. पर्यावरण किंवा निसर्ग संवर्धन वगैरे सारख्या गोष्टींचा तर अजिबातच विचार करू नका; एक लक्षात ठेवा हिरव्या निसर्गामुळे नाही तर तुमच्या खिशातल्या हिरव्या नोटांमुळेच तुम्हाला खरा आनंद मिळणार आहे. म्हणूनच कशाचाही विचार करू नका व तुमच्या प्रामाणिक हेतूवर (अवैध नाही) जो कुणी आक्षेप घेईल त्या व्यक्तीला गोळ्या घाला. कारण तुम्ही जे काही बांधकाम करताय त्याचा अवैध असा जे विचार करतात ते याच लायकीचे आहेत. तुमच्यासारख्या व्यक्तीच्या बाबतीत ते इतके क्रूर कसे होऊ शकतात, तुमचा केवळ कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणं व रोजगार निर्मिती करणं एवढाच प्रामाणिक उद्देश आहे. असे करताना तुम्ही एखाद्या नियोजन प्राधिकरणानं व न्यायालयानं घालून दिलेल्या बांधकामाच्या काही फालतू नियमांचं उल्लंघन केलं तर काय फरक पडतो. त्यानंतर तुम्ही जे अवैध बांधकाम केले आहे त्याबाबत आपल्या माय बाप सरकारचे मवाळ धोरण पाहता निवांत राहा, निवडून आलेल्या नगरसेवकापासून ते माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत, किंवा अगदी विरोधी पक्ष नेत्यापर्यंत सगळे तुमच्यासोबत आहेत. तुमच्या अवैध बांधकामामुळे तुमच्यावर आलेला ताण कमी करायला हे सगळे अगदी उत्सुक आहेत. म्हणूनच हे सगळे तुमचं बांधकाम नियमित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील, तोपर्यंत तुम्ही तुमच्याकडचे सगळे उपाय वापरू शैल बालासारख्या काही मूर्ख अधिकाऱ्यांना तुमच्या बांधाकामापासून दूर ठेवण्यासाठी वापरू शकता. तुम्ही लगे रहो मुन्नाभाई हा लोकप्रिय चित्रपट पाहिला नाही का, ज्यात बांधकाम व्यावसायिक झालेला बोमन इराणी पैशानं भरलेलं पाकीट व एक बंदूक महापालिका अधिकाऱ्यासमोर ठेवतो, जो त्याच्या नवीन प्रकल्पाच्या आराखड्याला मंजुरी देत नसतो. तो त्याला विचारतो, ये वॉलेट वो बुलेट, बोल क्या लेके साईन करेगा?” म्हणजे बंदुकीची गोळी तरी खा किंवा नाहीतर पैसे तरी (लाच म्हणून), कोणत्याही प्रकारे तुला आराखडा मंजूर करावाच लागेल. तो अधिकारी पाकीट निवडतो व आराखड्याला मंजुरी देतो हे सांगायची गरज नाही. शैल बालानं बहुतेक तो चित्रपट पाहिला नसावा, नाहीतर तिनंही कसौलीमध्ये शहाणपणानं निवड केली असती व मला हा लेख लिहावा लागला नसता.

मी इतक्या तीव्र शब्दात भावना व्यक्त करतोय म्हणून मला माफ करा. हे सगळं मला विल रॉजर्ससारखं उपहासानं लिहावं लागतंय इतकी परिस्थिती वाईट आहे, विशेषतः तुम्ही जेव्हा विकासक किंवा अभियंता म्हणून नाही तर अगदी सामान्य माणूस म्हणून भोवताली पाहता. मी एवढ्यात आणखी बातमी एक वाचली व ती पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समितीविषयी होती. ही निवडून आलेल्या सदस्यांची समिती शहराच्या विकासाचे भविष्य ठरवते, त्यात निर्णय घेण्यात आला की या भागात कोणत्याही नवीन बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिका या भागांमध्ये झपाट्याने होणाऱ्या बांधकामांना पाणी पुरवठा करण्यास सक्षम नाही. तार्किकदृष्ट्या विचार केला तर अतिशय उत्तम निर्णय आहे. कुणीही शहाणा माणूस म्हणेल की तुम्ही पाण्यासारख्या पायाभूत सुविधा देऊ शकत नसाल तर इथे बांधकामाला परवानगी द्यायचीच कशाला. मात्र आपण एका बाबीकडे दुर्लक्ष करतोय की हा फार विचारपूर्वक घेतलेला निर्णय नाही तर फक्त पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी टाळण्याचा प्रकार आहे. याचे कारण म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा असं पाहिलं तर कोणत्याही नियोजन प्राधिकरणानं एवढ्या झपाट्यानं विकास होईल अशी अपेक्षा केली नव्हती. हे त्यांचेच काम आहे, त्यांनी जेव्हा विकास योजनेला मंजुरी दिली तेव्हा होणाऱ्या विकासाची त्यांना कल्पना होती. म्हणजे तुम्ही विकास योजनेमध्ये काहीतरी पिवळ्या रंगाने रंगवले असेल (म्हणजे निवासी विभाग अशी खूण केली असेल) तर या पिवळ्या पट्ट्यात पाणी, सांडपाणी, रस्ते यासारख्या पायभूत सुविधा पुरविण्याचे काम कुणाचे आहे? ज्या विकासकांनी हे निवासी भाग असल्याची खात्री करून इथे जमीनी खरेदी केल्या त्यांचे काय. त्याचशिवाय ज्या भागांमध्ये पायाभूत सुविधांचा अजून पूर्णपणे विकास व्हायचा असतो तिथेच जमीनी थोड्या स्वस्त असतात व घर घेणाऱ्या बहुतेक ग्राहकांना अशा ठिकाणी परवडणारी घरे मिळू शकतात. तुम्ही एका रात्रीत घाईघाईनं घेतलेल्या निर्णयात एखाद्या नवीन बांधकामाला परवानगी दिली नाही तर लोकांकडे अवैध बांधकांमांमध्ये घर घेण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय उरतो? हे फार काही विशेष नाही कारण आपल्या नागरी नियोजनाचा इतिहास अशा विनोदांनी भरलेला आहे. आधी तुम्ही एखाद्याचा गळा घोटून जीव घेऊ लागता. जेव्हा ती व्यक्ती प्रतिकार करते आणि मग तेव्हा तुम्ही तो व्यवस्थेवरचा हल्ला असल्याचं म्हणता व त्यावर बेकायदेशीर असा ठपका बसतो, अवैध बांधकामांचंही न्यायालयासमोर असंच झालं आहे.

मी कोणत्याही प्रकारे अवैध बांधकामांचे समर्थन करत नाही व कोणत्याही परिस्थितीत आपल्या कर्तव्याचे पालन करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यावरील हल्ला योग्य म्हणता येणार नाही. मात्र तरीही लोक टोकाची भूमिका का घेतात ही नाण्याची दुसरी बाजूही आहे. हिंदी चित्रपटामध्ये एक प्रसिद्ध संवाद आहे, “इन्सान गुनहगार नही होता, हालात उसे मजबूर कर देते हैं!” म्हणजेच जन्मानं कुणीही गुन्हेगार नसतं, मात्र परिस्थिती त्याला तसं करायला भाग पाडते. प्रत्येक कायद्याला अपवाद असतात, अवैध बांधकामांमध्येही अशा व्यक्ती असतात, खरंतर बऱ्याच असतात. काही माणसं मात्र अट्टल गुन्हेगार असतात, अवैध इमारती बांधणे हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असतो, सरकार मात्र अशा गुन्हेगारांना टिकू देते व वाढूही देते हे वास्तव आहे. अशा लोकांकडे असलेलं आर्थिक बळ व सातत्याने बदलणारी व जिचे पालन करणे जवळपास अशक्य आहे अशी मंजुरी यंत्रणा पाहता, बरेच लोक अवैध मार्ग स्वीकारतात. या वस्तुस्थितीकडे आपल्याला डोळेझाक करून चालणार नाही. शैल बालावर हल्ला करणारा माणूसच कशाला, आपण आपल्या राज्यातील शहरांमध्ये आपलं कर्तव्य बजावणाऱ्या अतिक्रमणविरोधी पथकांवर हल्ला करणारे जनसमुदाय पाहिले नाहीत का? अशा अनेक प्रकरणांमध्ये निवडून आलेले सदस्य कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी जनसमुदायाला चिथवण्या देत असतात. अशा लोकप्रतिनिधींवर काय कारवाई करण्यात आली आहे असा प्रश्न मला विचारावासा वाटतो? आता बरेच जण असा प्रश्न विचारतील की अवैध बांधकाम किंवा अतिक्रमण एका रात्रीत होत नाही, अशा वेळी संबंधित अधिकारी काय करत होते, मात्र एका चुकीच्या गोष्टीला परवानगी दिल्याने ती गोष्ट बरोबर होत नाही ही वस्तुस्थिती आहे. एक गोष्ट म्हणजे शैल बाला प्रकरणामुळे अशा अनेक अधिकाऱ्यांचे डोळे उघडले असतील ज्यांनी अवैध बांधकाम नावाच्या राक्षसाला (आपल्या पुराणातल्या भस्मासुरासारखा) महाकाय रूप धारण करू दिलं, मग तो कोणत्याही प्रदेशात असेल. आता हा अवैध बांधकामांचा राक्षस एवढा मोठा व धीट झाला आहे की पैशानं काम झालं नाही तर कायद्याच्या रक्षणकर्त्यावरच गोळी चालवायलाही तो मागे पुढे पाहात नाही. केवळ शैल बालाच्या मारेकऱ्याला शोधून शिक्षा देणं हा अवैध बांधकामरूपी राक्षसावरचा तोडगा नाही, त्या हॉटेल वाल्याला कधीतरी शिक्षा होईलच. यावरचा उपाय म्हणजे काय कायदेशीर आहे व काय बेकायदेशीर आहे याची स्पष्ट व लवकरात लवकर व्याख्या करणं. तसंच तुम्ही कायदेशीर बांधकाम करत असाल तर परवानग्याही शक्य तितक्या लवकर द्या मात्र एखाद्या गोष्टीला बेकायदेशीर घोषित करण्यात आल्यानंतर लगेच, कोणतीही हयगय न करता त्या बेकायदेशीर बांधकामाला तोडून टाका.

खरंतर प्रत्येक व्यक्तीनं आता काय बरोबर आहे व काय चूक याबाबत स्वतःचा दृष्टिकोन तपासण्याची वेळ आली आहे, शेवटी सरकार म्हणजे तरी काय ते आपल्या सगळ्यांच्याच चेहऱ्यांचं सामूहिक प्रतिबिबंबच आहे. भोवताली घडणाऱ्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी सरकारला दोष देणं नेहमी सोपं असतं, मात्र आपण सोयीस्कररित्या विसरतो की सरकार हे आपलंच प्रतिनिधित्व करतं.  एका सहाय्यक नगर नियोजन अधिकाऱ्यानं हिमाचल प्रदेशातल्या कसौलीसारख्या दुर्गम भागात अवैध बांधकामं थांबवण्यासाठी आज आपला जीव दिला आहे, उद्या तुमच्या तथाकथित सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात तुमच्याच कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीवरही अशी वेळ येऊ शकते आणि  हा उद्याचा दिवस फार लांब नाही एवढंच मला सांगायचं आहे. 


संजय देशपांडे

Mobile: 09822037109




No comments:

Post a Comment