Thursday 21 March 2019

ताडोबा, जगण्याची नवी दिशा !























जंगलात गवतात लपुन एखादा वाघ आपल्याला पाहत असेल हे माहित असतानाही भटकंती करण्याचा थरार वेगळाच असतो”… ऍशलन गोर्से कॉस्ट्यू.

ऍशलन गोर्से कॉस्ट्यू हे अमेरिकी मनोरंजन पत्रकार असून सतत भटकंती करत असते. ती ई न्यूज, डिस्कव्हरी चॅनल व ट्रॅव्हल चॅनल यासारख्या वाहिन्यांवरील कामासाठी प्रसिद्ध आहे. तिचा विवाह फिलिप कॉस्ट्यू ज्युनिअर यांच्याशी झाला असून त्यांनी दोघांनी एकत्रितपणे विविध शैक्षणिक व पर्यावरणविषयक दूरचित्रवाणी कार्यक्रमांची निर्मिती व सादरीकरण केलं आहे. तिच्या कामामुळे तिनं अनेक जंगलांना भेट दिलीय विशेषतः भारतीय जंगलांना, कारण तिच्या वरील अवतरणामध्ये ज्या जंगलांमध्ये वाघ आढळतात तिथलंच वर्णन आहे. आणि तिचे वरील शब्द अनुभवण्यासाठी ताडोबाहून अधिक चांगलं ठिकाण कोणतं असू शकतं, कारण इथे इतर कोणत्याही जंगलापेक्षा बऱ्याच अधिक प्रमाणात वाघ पाहायला मिळतात (मी हे अगदी जड अंतःकरणाने सांगतोय कारण खरे तर जंगलामध्ये कान्हा हे माझं पहिलं प्रेम आहे). देशातल्या जवळपास प्रत्येक अभयारण्याला भेट दिल्यानंतर माझं  ताडोबाविषयी हे मत झालं आहे. मला असं वाटतं मार्च हा ताडोबाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. याची दोन कारणं आहेत, एक म्हणजे सगळ्यांच्या परीक्षा सुरू असतात त्यामुळे ऑनलाईन बुकिंग पूर्ण भरलेलं दिसत असलं तरीही पर्यटकांची संख्या कमी असते. विशेषतः अशा हौशी पर्यटकांची ज्यांना फक्त वाघ पाहण्यात रस असतो. दुसरं कारण म्हणजे हवामान उत्तम असतं, तुम्ही पहाटे 6.30 ला अभयारण्यात प्रवेश करता तेव्हा   हलकी अशी थंडी असते व मंद वारे वाहात असतात. छायाचित्रणासाठी निरभ्र निळं आकाश असते. सूर्य माथ्यावर आल्यानंतरही एप्रिल किंवा मेसारखी जीवाची लाहीलाही होत नाही. अर्थात या काळात वाघांनी किंवा इतर प्राण्यांनी जलशयाचा आसरा घ्यावा एवढी उष्णता नसते, तरीही सकाळी उशीरा किंवा संध्याकाळच्या सफारींमध्येही तुम्हाला निवांतपणे पाणवठ्यांपाशी प्राण्यांची बरीच हालचाल पाहता येतेत्यानंतर छोटी तारा तसंच मायासाठी (ही तिथल्या वाघिणींची नावं आहेत) पर्यटकांच्या कॅमेरासमोर आपल्या वेगवेगळ्या छटा दाखवणे हा आवडता विरंगुळा असतो. म्हणूनच या काळातही त्यांच्या  हालचालीवर परिणाम होत नाही. माझं हे बोलणं ताडोबा एखादं प्राणी संग्रहालय असून त्यात वाघांचा कार्यक्रम असल्यासारखं वाटत असेल तर मला माफ करा. मी मेमध्ये संपूर्ण दिवसाची सफारी घेतली होती व सहा फेऱ्या मारल्या. तरी मला एकही वाघीण दिसली नाही. शेवटी आपलं नशीब असेल तरच वाघ किंवा वाघीण दृष्टीस पडतात हेच खरं. मी आधी सांगितल्याप्रमाणे वाघीण तिच्या बछड्यांसोबत असेल तर तिच्या हालचालींवर मर्यादा येतात. ती बछड्यांपासून फार लांब जाऊ शकत नाही व एकदा तुम्हाला तिचा ठावठिकाणा कळल्यानंतर (अर्थातच गाईड व चालकांकडून) अशा ठिकाणी सुरक्षितपणे काही काळ घालवता येतो. तुमचं नशीब असेल तर तुम्हाला वाघीण व तिचे बछडे दिसू शकतात. तुमचं नशीब अगदीच जोरावर असेल तर तुम्हाला शिकारीविषयी माहिती मिळू शकते. अशावेळी तुम्हाला वाघीण व तिचे बछडे दिसण्याची शक्यता जास्त असते.

यावेळी आमचं नशीब नक्कीच जोरावर होतं. आम्हाला मोहार्लीला पोहोचायला आदल्या रात्री बराच उशीर झाला होता, त्यामुळे आम्हाला पहिल्या सफारीसाठीही आत जायला उशीर झाला. सकाळचे 6.45 वाजले होते. जिप्सी ताडोबा जंगलाच्या दिशेनं जाऊ लागली तशी वाऱ्याची मंद झुळूक जाणवू लागली. अभयारण्य मुक्त हस्ते आमचं स्वागत करण्यासाठी सज्ज होतं, मला अगदी घरी आल्यासारखंच वाटलंइतकी वर्षं जंगलाला भेट देऊनही पहिल्या सफारीसाठी प्रवेशद्वारातून आत जाताना माझी उत्कंठा पहिल्यांदा जंगलाला भेट देण्यासारखीच असते. कारण ताडोबाला भेट देताना तर कधीही काहीही घडु शकतं. यावेळच्या दोऱ्यातल्या पहिल्या सफारीतही अशीच अवस्था होती. जेव्हा तुम्ही समविचारी मित्रांसोबत असतात तेव्हा ही उत्कंठा, मजा द्विगुणित होते. प्रत्येकजण कुठल्यातरी झुडुपाकडे बोट दाखवून त्यांनी काहीतरी पाहिल्याचं किंवा ऐकल्याचं सांगतो. माझा वन्यप्रेमी गटही याला अपवाद नव्हता. एका जीपमध्ये हेमांगी, सलील, आरती, शिल्पा व मी असे दाटीवाटीने बसलो होतो. तरीही जंगलात गेल्यावर तुम्ही सगळ्या अडचणी विसरता ही एक चांगली गोष्ट म्हटली पाहिजे. याच कारणानं प्रत्येकानं जंगलाला भेट दिली पाहिजे. यामुळे तुम्ही शरीरानं व मनानं बाह्य जगापासून, एवढंच काय अगदी शेजारी बसलेल्या व्यक्तीपासूनही अलिप्त होता. असं होऊनही त्याची किंवा तिची हरकत नसते कारण ते देखील जंगलाचं तेच मोहिनी घालणारं रूप अनुभवत असतात. एकप्रकारे हे ध्यान किंवा विपश्यनेसारखं असतं कारण तुम्ही पूर्णपणे स्वतःशी तसंच निसर्गाशी एकरूप होता (अर्थात तुम्हाला जंगलाचा आनंद उपभोगता येत असेल तर, नाहीतर मी सफारीमध्येही गाढ झोपलेली व घोरणारी माणसं पाहिली आहेत, देव त्यांना माफ करो एवढंच मी म्हणू शकतो). आम्हाला सांगण्यात आले होते की छोटी तारा वाघिणीला सहा महिन्यांची तीन बछडी आहेत. तिनं  गोसेखानार रस्त्यावर अलिकडेच सांभार हरिणाची शिकार केली होती. हे अर्थातच तिचे आवडते क्षेत्रं होते कारण हा रस्ता बांबूच्या बनातून जातो, त्यामुळे बछड्यांना लपवण्यासाठी ती उत्तम जागा होती. या बछड्यांवर कोल्हा किंवा चित्ता यासारखे लहान शत्रू किंवा दुसरा एखादा नर वाघ हल्ला करण्याची शक्यता असते कारण या तीन बछड्यांपैकी दोन नर होते. या बछड्यांना बांबूच्या बनात लपवून वाघीण शिकारीसाठी भोवताली फिरू शकते तसंच शांतपणे  स्वतःचे जेवणही खाऊ शकते. इथेच जंगलातलं नशीब फार महत्वाचं असतं, इथे काय झालं हे मी पुढे सांगेनच. जिप्सी गोसेखानार रस्त्यावर खातोडा गेटनंतर (मुख्य मोहार्ली गेटदरम्यान आणखी एक गेट आहे ज्याचे कारण केवळ वनविभागालाच माहिती आहे) शिकार झाली होती. खरंतर अशा गेटची गरज नाही कारण तुम्ही मोहार्लीशिवाय इतर कोणत्याही गेटनी आलात तर तुम्हाला दोनदा एंट्री करावी लागत नाही. प्रवेश केल्यानंतर आम्ही गोसेखानार रस्त्याच्या दिशेने निघालो. आमचं लक्षं पुढील जिप्सींच्या टेल लँपकडे होतं आणि आमच्या अपेक्षेप्रमाणे तिथे वाघ होता. आश्चर्य म्हणजे पुढील जिप्सी संथपणे का होईना पुढे-पुढे जात होत्या. आम्ही अनेक कॅमेरे जिथे रोखले होते त्या ठिकाणापर्यंत पोहोचलो. वाहने हळूहळू पुढे का जात होती याचं कारण मला समजलं, अभयारण्याचं उप संचालक तिथे आपली गाडी लावून उभे होते. ते रहदारीवर लक्षं ठेवून होते. छोटी तारानं शिकार केलेली होती व तिथे वनविभागाचा अधिकारी नसता तर ते दृश्य फक्त तिच्या जवळ असणाऱ्यांनाच दिसलं असतं. त्यानंतर मागच्या वाहनांमधील लोकांनी वादावादी व आरडाओरड सुरू केली असती. मात्र यामुळे सगळ्यांनाच शांतपणे दृश्य दिसत होतं. मला असं वाटतं गाईड तसंच चालकांनी हे आपणहूनच समजून घेतलं पाहिजे पण ते सुद्धा पर्यटकांच्या (म्हणजेच छायाचित्रकारांच्या) दबावाला बळी पडतात व रस्ता अडवतात. मी आधी म्हटल्याप्रमाणे वाघ दिसण्यासाठी तुमचं नशीब असलं पाहिजे. कारण बांबूच्या संपूर्ण वनात जेमतेम 15 फूट रुंद  मोकळी जागा होती. वाघिणीनं शिकार ओढत थेट तिथे नेली होती, ज्यामुळे सगळ्या पर्यटकांना तिचं जेवण जवळून दिसत होतं. ती अगदी काही पावलं इकडे तिकडे बसली असती तरीही आम्हाला ती दिसली असती पण तिची छायाचित्रं घेता आली नसती. आम्हाला छायाचित्रं घेता आली म्हणूनच मी त्या दिवशी आमचं नशीब जोरावर होतं असं म्हटलं. गंमत म्हणजे आई जेवत असताना बछडी तिच्याभोवती बागडत असतानाची मस्त छायाचित्रं आम्हाला घेता आली. आम्हा वन्यप्रेमींच्या सफारीची सुरूवात जोरदार झाली होती. मी पुन्हा एकदा सांगतो जंगल म्हणजे फक्त वाघ पाहणं नाही, मी वर उल्लेख केलेल्यासारखी दृश्यंही जंगलात वारंवार पाहायला मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अर्थात वाघ हा जंगलाचा चेहरा आहे ही वस्तुस्थितीही आपण नाकारू शकत नाही. मला आणखी एक गोष्ट गाईडकडूनच नंतर कळली. आम्ही तारा आणि तिच्या बछड्यांना व्यवस्थित पाहिलं मात्र काही पर्यटकांना आणखी पाहायचं होतं (मी त्यांना दोष देत नाही). हा एकतर्फी रस्ता होता व वनअधिकारी कोणत्याही जिप्सीला पाच मिनिटांहून अधिक वेळ थांबू देत नव्हता, जे एकप्रकारे चांगलंच होतं. त्या पर्यटकांनी विनंती केली की ते पुढे जाऊन वळसा घालून परत येतील जे जवळपास 20 किलोमीटरचं अंतर होतं. मात्रं त्या अधिकाऱ्यानं अशाप्रकारे पुन्हा प्रवेश करण्यास नकार दिला जे माझ्यामते चुकीचे होते. एखादी व्यक्ती पुढे जाऊन वळून मागे का येऊ शकत नाही? एक लक्षात ठेवा लोक इथे वाघ पाहण्यासाठी येतात. सरकार, वन विभाग तसंच जाहिरातदारही त्याची तशीच जाहिरात करतात. असं असताना असे विचित्रं नियम बनवण्याचं काय कारण आहे. मला असं वाटतं वन विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी पर्यटकांमध्ये फेरफटका मारून नेमक्या समस्या जाणून घ्याव्यात. कारण यामुळे केवळ वनविभागाविरुद्धच नाहीच तर एकूण जंगलाच्या अनुभवाविषयी नकारात्मक वातावरण निर्माण होतं.

त्यानंतर पुढचे तीन दिवस आम्ही ताडोबामय झालो होतो. मी अनुभवलंय अनेक लोकांचा वाघ पाहिल्यानंतर जंगलात आणखी काही पाहण्याचा उत्साह संपतो. वाघाची जादू काही वेगळीच असते हे मान्य केलं तरी पर्यंटकांना जंगलाचा सर्वांगीण अनुभव देणंही केवळ वन विभाग किंवा गाईडच नाही तर संपूर्ण व्यवस्थेसमोर असलेली एक मोठी समस्या आहे जिला आपण वन्य जीवन संवर्धन असं म्हणतोमाझा वाघ पाहिल्यानंतरचा अनुभव वेगळाच असतो, जेव्हा मला सफारीच्या पहिल्या काही तासातच वाघ दिसतो तेव्हा उत्साह द्विगुणित होतो व सगळं काही सुंदर वाटू लागतं. ही सफारीसुद्धा त्याला अपवाद नव्हती. तारा आणि बछड्यांना पाहून आम्ही “पो” नावाचा पांडा पोट भरल्यानंतर जसा चालतो तसे पुढे चाललो होतो. मी वर सांगितल्याप्रमाणे मार्च महिन्यात थोडं उजाडल्यानंतर पक्षी निरीक्षणासाठी उत्तम काळ असतो. सकाळी थोडं उशीरा गरूड, ससाणा यासारखे शिकारी पक्षी दिसतात. हे पक्षी झाडांच्या वाळलेल्या फांद्यांवर बसलेले दिसतात. निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमीवर हे दृश्य विलक्षण असतं. जे जंगलाला नियमितपणे भेट देतात, त्यांच्यासाठी पक्षी निरीक्षण हे अधिक आनंददायक असतं तसंच त्याचं छायाचित्रण आनंददायक असतं. ताडोबामध्ये भरपूर पक्षी आहेत. ताडोबात तुम्हाला क्वचित अस्वल किंवा बिबट्यासारखे प्राणीही दृष्टीस पडू शकतात. हे प्राणी दिसणं वाघ दिसण्यापेक्षाही दुर्मिळ आहे हे मला तुम्हाला सांगावसं वाटतं कारण या दोन्ही प्राण्यांचं निश्चित ठिकाण किंवा क्षेत्रं नाही, ते कुठेही भटकू शकतात. म्हणूनच अस्वल किंवा बिबट्या नशीबानंच दिसतो. त्यानंतर जंगलात भटकंती करताना तुमच्या वास घेणे, ऐकणे व पाहणे या जाणीवा अधिक प्रगल्भ होत जातात. तुमची नजर जेव्हा जंगलाला सरावते तेव्हा तुम्हाला पिवळ्या-करड्या गवताच्या पार्श्वभूमीवर मुंगूसासारखा लहानसा प्राणी अन्नाचा शोध घेत असताना दिसू शकतो व त्याची छायाचित्रे घेता येतात. याचसाठी तुमच्यासोबत एक चांगला गाईड व चालक असणे आवश्यक आहे. त्यांचे डोळे चालत्या जिप्सीतूनही असे लहान प्राणी पाहण्यासाठी सरावलेले असतात व काही वेळानी तुम्हीही त्यात गुंग होऊन जाता.

आम्हाला दुसऱ्या दिवशी बफर क्षेत्रात असाच अनुभव आला. ज्यांना बफर क्षेत्रं म्हणजे विरळ जंगल असलेला भाग वाटत असेल तर जरा लक्षं द्या. ताडोबाचे बफर क्षेत्रं हा मुख्य जंगलाच्या भोवतालचा भाग आहे जिथे सध्या सर्वाधिक घडामोडी सुरू आहेत. इथे जंगल घनदाट आहे, वर्दळ फारशी नाही. या भागात पाच वाघीणी असून त्यापैकी तिघींचे बछडे आहेत. त्यामुळेच सध्या इथे किती घडामोडी होत असतील याची कल्पना तुम्ही करू शकता. दुसऱ्यादिवशी सकाळी आमची जिप्सी घनदाट बफर क्षेत्रातून जात असताना सलील व हेमांगीला दाट झुडुपांच्या पलिकडे एक जिप्सी थांबलेली दिसली. तिथली स्थब्धता पाहून त्यांना नेमकं काय दिसत असेल याची कल्पना आम्ही करू शकत होतो. एक वाघीण शांतपणे त्या जिप्सीच्या समोरून चालत जात होती. यावेळी मी फक्त वाघीणच नाही तर भोवतालच्या संपूर्ण परिसराची छायाचित्रे काढण्यासाठी लहान लेन्सचा वापर केला. जंगलातल्या घनदाट झाडीत स्वतःच्याच नादात असलेल्या वाघीणीला पाहण्यासारखा दुसरा अनुभव नाही, हे दृश्य वेगळ्याच विश्वातलं असल्यासारखं वाटत होतं. खरी मजा नंतर आली, आम्ही वाघीणीच्या मागून जात नंतर वळलो व समांतर रस्त्यावरून तिच्या हालचाली टिपत होतो. हा अविस्मरणीय अनुभव होता कारण बफर क्षेत्रात शिकारीला थोडा कमी वाव असल्यामुळे इतर प्राण्यांचे इशारे फारसे मिळत नाहीत. वाघीणीचं क्षेत्रं जवळपास ४० किलोमीटरचं होतं व ती स्वतःच्या क्षेत्राची सीमा मार्क करत जात होती. म्हणून आम्ही पुढे गेलो व झुडुपातून बाहेर येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर तपासू लागलो जिथे ती शिरली होती. त्यानंतर आम्हाला ती जंगलातल्या एका रस्त्यावरून बाहेर येताना दिसली. कोलंबसला अमेरिकेचा शोध लागल्यानंतर जेवढा आनंद झाला असेल त्यापेक्षा हा आनंद यत्किंचितही कमी नव्हता. यावेळी वाघीण थेट आमच्या समोरून येत होती, प्रत्येक वन्यजीवन छायाचित्रकाराचं अशी छायाचित्रं मिळवण्याचं स्वप्न असतं!

त्यानंतर दुपारी छोटी तारा व तिचे बछडे आम्हाला पुन्हा एकदा भेटले. गोसेखानार रस्ता एकतर्फी आहे व या कुटुंबानं थेट रस्त्यावरच फतकल मारल्यानं कुठल्याही वाहनाला पुढे जायला वाव नव्हता. अशावेळी तुम्हाला फक्त संयमानं वाट पाहावी लागते. माझा अनुभव असा आहे की छोटी तारासारखी वाघीण तुमची प्रतीक्षा वाया जाऊ देत नाही. जवळपास  ४५ मिनिटे थांबल्यानंतर अचानक पुढच्या जिप्सी सरकायला सुरूवात झाली. जिप्सीतल्या लोकांना वाघीणीचं संपूर्ण कुटुंब दिसल्यानं त्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं, यालाच जंगल म्हणतात असं माझ्या मनात आलं. खरंतर काही वेळा कॅमेऱ्याचा जाच वाटू लागतो कारण तुम्ही घटना प्रत्यक्ष पाहायचं विसरून जाता. पण आता मी आधेमधे कॅमेरा बाजूला ठेवायला व उघड्या डोळ्यांनी आपल्या विषयवस्तूकडे (वाघाकडे) पाहायला शिकलो आहे. यातूनच तुम्हाला खऱ्या आठवणी मिळतात ज्या तुमच्या मेंदूच्या हार्डडिस्कमध्ये कायमस्वरूपी साठवलेल्या असतात. ते अगदी काही महिन्यांचे बछडे दिसायला गोंडस असले तरीही त्यांच्या डोळ्यात एक करारीपणा असतो, जणू ते प्रेक्षकांना वाघाचे बछडे असल्याचा इशाराच देत असतात. मी नेहमी म्हणतो की उन्हाळ्यामध्ये पाणवठ्यापाशी वाट पाहणं उत्तम कारण इथेच प्राण्यांची सर्वाधिक वर्दळ असते. रानगव्यापासून ते अस्वलापर्यंत अनेक प्राणी तसंच पक्षी पाणवठ्याच्या आश्रयाला येतात, त्यामुळे इथे बऱ्याच घडामोडी सुरू असतात. ताडोबाच्या सफारीतील जरा आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे ताडोबामध्ये सेलफोनवर असलेली बंदी. मोबाईल कॅमेऱ्यांमुळे लोक प्राण्यांच्या अगदी जवळ जायचा प्रयत्न करतात मात्र किमान गाईडकडे तरी सेलफोन असायला हवेत. ते त्यांचा वापर जंगलात घडणाऱ्या अनेक घटनांची नोंद करण्यासाठी करू शकतील ज्यातून अमूल्य माहिती मिळेल. नाहीतर स्वयंसेवी संघटनांच्या मदतीने आपण गाईडना डिजिटल कॅमेरे द्यायचा विचार करू शकतो. प्रत्येक सफारीनंतर त्यातील छायाचित्रे त्यांनी वनविभागाला द्यावीत.
आणखी एक गोष्ट म्हणजे आपण नवीन मार्ग उघडण्याचा किंवा मार्ग फिरवण्याचा विचार केला पाहिजे म्हणजे नवीन भाग पाहता येईल. पर्यटकांसाठी ते अधिक रोचक असेल कारण त्यांना जंगलाचं अधिक वैविध्य पाहता येईल तसंच यामुळे जंगलातील गस्त वाढेल ज्यामुळे वनसंवर्धाला अतिशय मदत होईल. मला असं वाटतं वन विभागानं याबाबतीत थोडी सौम्य भूमिका घ्यायला हवी. वनसंवर्धन हे कुण्या एका विभागाचं नाही तर प्रत्येकजण त्यात सहभागी झाला पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी त्यांना जंगलाच्या कानाकोपऱ्यात जाता आलं पाहिजे. हे सगळं नियमांच्या चौकटीत बसवणं थोडं अवघड असलं तरीही शेवटी नियम संवर्धनासाठीच असतात ना?

खरंतर जंगलामध्ये सहा सफारी हा अगदी कमी काळ आहे (अर्थात किती सफारींनी माझं समाधान होईल याविषयी शंकाच आहे). तरीही आम्ही देवाडा गेटपाशी बफरमध्ये चहाला जाता एक उत्तम क्षण अनुभवता आला. आम्ही गेटपाशी आलो तेव्हा काही जिप्सी कशाचीतरी वाट पाहात होत्या (म्हणजेच वाघाची). वाघीणीने त्या सगळ्या जिप्सींच्या मागून रस्ता ओलांडला. प्रवेशद्वारावर निराश झालेले सगळे चेहरे गेटवरील चहाच्या दुकानावर गेले. मी माझ्या मित्रमंडळींसोबत गेटच्या बाहेर मुख्य रस्त्यावरच्या भेटवस्तूंच्या दुकानाकडे गेलो. तिथे मला अनिरुद्ध चाओजी नावाचा आणखी एक मित्र भेटला जो शहरी जीवन सोडून ताडोबामध्ये वनसंवर्धनाचं अतिशय चांगलं काम करतो आहे. खरंच असं करायला मनाचा मोठा निर्धार हवा. मी अनिरुद्धसोबत चहा घेत असताना अचानक एक आरोळी ऐकू आली, अर्र वो निकला टायगर. जी वाघीण जिप्सींच्या मागून रस्ता ओलांडून गेली होती ती मोहार्ली-चंद्रपूर या मुख्य रस्त्यावर आली होती. खरंतर ताडोबाचे बफर क्षेत्रं या रस्त्यामुळे विभागले गेले आहे. या सीमा, ही प्रवेशद्वारं वगैरे फक्त माणसांसाठी असतात, वाघासाठी हे सगळं त्याचं घर असतं. सुदैवानं माझी मैत्रीण हेमांगीकडे कॅमेरा होता व मी वाघीण मुख्य रस्ता ओलांडतानाचं छायाचित्रं वेळेत घेऊ शकलो. जंगलात अनेकदा तुम्ही एखाद्या घटनेची छायाचित्रं घेताना नेमकं कायकाय चित्रित करताय याची तुम्हाला जाणीव नसते. मी छायाचित्रं तपासल्यानंतर मला दिसलं की वाघीण झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडत होती. पार्श्वभूमीवर एक दुचाकीस्वारही (तो वाघीणीला रस्त्यावर पाहून पूर्णपणे थक्क झाला होता) छायाचित्राचाच भाग झाला होता. या सगळ्यामुळे हे छायाचित्रं फक्त एक वाघीण रस्ता ओलांडतानाचं नसून त्यात इतरही बरंच काही होतं. हे सगळं नाट्य जेमतेम दोन मिनिटांमध्ये घडलं पण त्याचे प्रेक्षक झालेल्या पन्नासएक सुदैवी लोकांसाठी त्या आयुष्यभराच्या आठवणी होत्या. असेच अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी आपण जंगलांना भेट देतो. त्यात काही विदेशी पर्यटकही होते. ते नक्कीच त्यांच्या देशात परत गेल्यावर भारतात अजूनही रस्त्यांवरून वाघ फिरतात असं सांगतील. मी जेव्हा वाघीण मुख्य रस्ता ओलांडत असल्याची छायाचित्रे एफबीवर टाकली तेव्हा रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातात अनेक प्राण्यांचा मृत्यू होतो अशा आशयाच्या अनेक टिप्पण्या करण्यात आल्या. माझे निरीक्षण असे आहे की जंगलाच्या भोवती राहणारी माणसं नाही तर जंगलातून जाणारे प्रवासी हीच मुख्य समस्या आहे. विशेषतः अवजड वाहनांचे चालक व वन्यजीवनाविषयीच्या जबाबदारीविषयी त्यांचा अडाणीपणा या सगळ्या गोष्टींवर आपण काम केले पाहिजे. आपण जंगलातून जाणाऱ्या रस्त्याच्या प्रत्येक मैलाचे संरक्षण करू शकत नाही, प्राण्यांना आपले वाहतुकीचे नियम समजू शकत नाहीत. म्हणूनच आपण एकत्रितपणे (म्हणजे वन विभाग, परिवहन मंत्रालय) एक जागरुकता मोहीम सुरू करू शकतो. अशी मोहीम हाती घेण्याची वेळ आता आली आहे. त्याचप्रमाणे जंगलाच्या पट्ट्यात रस्त्यांवर दुतर्फा संरक्षक कठडा किंवा कुंपण घातले तर किमान काही आयुष्य वाचतील. सरकार जंगले, वाघ तसंच इतर प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी लाखो रुपये खर्च करते. मात्र एखाद्या चालकाच्या अडाणीपणामुळे सगळे मुसळ केरात जाते. वन्यजीवनाचे हे दुर्दैव आपणच बदलू शकतो.

सरतेशेवटी मी अलिकडेच टीव्हीवर लुफथांनसा विमान कंपनीची जाहिरात पाहात होतो. त्या जाहिरातीचं घोषवाक्य होतं काही ठिकाणं तुमचं आयुष्य बदलतात. लुफ्तांजाची विमानं ताडोबापर्यंत येत नसली तरीही या ठिकाणाला मी जेव्हा भेट देतो तेव्हा माझ्या आयुष्यात काही चांगले बदल होतात एवढंच सांगायचं होतं. म्हणून ताडोबाचे शतशः आभार व मी पुन्हा येईपर्यंत... टा टा !

तुम्ही आणखी काही अविस्मरणीय क्षण खाली दिलेल्या दुव्यावर पाहू शकता...


संजय देशपांडे 
smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स


No comments:

Post a Comment