Thursday, 15 September 2016

प्रकल्प नव्हे समाज बांधतांना !
समाज हा केवळ व्यक्तिंचा बनत नाही तर त्यांच्या परस्पर संबंधांमधून बनतो, या नात्यांचे बंध या व्यक्तिंना जोडून ठेवतात   … कार्ल मार्क्स

कार्ल मार्क्स हा तत्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार व क्रांतिकारी समाजवादी होता. प्रशियामध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला, त्याने नंतर राजकीय अर्थशास्त्र व हेगेलियन तत्वज्ञान यांचा अभ्यास केला. एखाद्याचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात असं म्हणतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे, माझ्याकडे कार्ल मार्क्स किती महान होता याचं वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत! त्याने स्वतःच्या विचारांनी जगाची विचार करण्याची पद्धत बदलली!  माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्याचं त्याचं विधान सर्वमान्य झालं व ते मार्क्सचं तत्वज्ञान म्हणून ओळखलं जाऊ लागलं, त्याला एखाद्या धर्माप्रमाणेच मान्यता मिळाली! मला त्याचे समाजाविषयीचे वरील शब्द आठवायचे कारण म्हणजे मला आमच्या दोन पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये अलिकडेच बोलावण्यात आले होते व त्यातले साधर्म्य इथेच संपत नाही. दोन्ही प्रकल्प पूर्ण होऊन एका वर्षापेक्षा अधिक काळ झाला, त्यातला एक प्रकल्प तर जवळपास चार वर्षांपूर्वी पूर्ण झाला! दोन्ही ठिकाणी तिथल्या सोसायटीचे सदस्य काही सांस्कृतिक उत्सव साजरा करत होते म्हणून मला आमंत्रण होतं. त्यापैकी एका कार्यक्रमात माझा रिअल इस्टेट ब्लॉगर गुरु रवी करंदीकर माझ्यासोबत होता व तो सदस्यांच्या भक्तिभावाने इतका भारावून गेला की दुसऱ्या दिवशी हे सदस्य करत असलेल्या पूजेचे संपूर्ण ध्वनीचित्रमुद्रण करण्यासाठी पुन्हा तिथे गेला!

आता तुमची उत्सुकता फार न ताणता तपशीलाने सांगतो; पहिला प्रकल्प होता दवबिंदू, जो तरुण आयटी अभियंत्यांच्या गरजेनुसार बनवलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पातील सर्व सदस्य धार्मिकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या जैन समुदायाचे आहेत. दुसरा प्रकल्प म्हणजे अष्टगंध, ही साधारण तीस सदनिकांची लहानशी सोसायटी आहे, दोन्ही प्रकल्प पुण्याच्या पश्चिम उपनगरांमध्ये आहेत. दोन्ही प्रकल्पांमध्ये तरण तलाव किंवा व्यायामशाळा यासारख्या उंची सुविधा नाहीत किंवा सुशोभित स्वागतकक्ष नाही, इथे इटालियन मार्बल किंवा केंद्रीय वातानुकूलन यंत्रणेसारख्या सुविधा नाहीत; तरीही एक गोष्ट मात्र इथे आहे, ती म्हणजे इथल्या रहिवाशांनी जेव्हा माझं स्वागत केलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला निःस्सीम आनंद व उत्साह
दवबिंदूमध्ये, सर्व रहिवासी जैन असल्यामुळे त्यांनी एक लहानसे जैन मंदिर बांधण्यासाठी त्यांच्या मोकळ्या जागेचा वापर केला आहे. इथेही बरेच जण म्हणतील की, मोकळ्या जागी त्यांनी क्लब हाऊस किंवा व्यायामशाळा बांधायला हवी होती किंवा लॉन करायला हवं होतं, जसं आपल्या बहुतेक प्रकल्पांमध्ये असतं. मात्र या प्रकल्पातील मोकळ्या जागांचा खरा उद्देश रहिवाशांना आनंद व शांतता मिळावी, त्यांना एकत्र येता यावं हाच आहे असं मला वाटतं. जर त्यांनी एखादं लहानसं जैन मंदिर बांधलं, जिथे ते एकत्र येऊ शकतील, प्रार्थना करू शकतील व त्यातून त्यांना आनंद व शांतता मिळली तर त्याला कुणाची काय हरकत असू शकते? किंबहुना हे तरुण त्यांचा धर्म ही त्यांची जीवनशैली व्हावी या हेतूनेच एकत्र आले व केवळ एक सोसायटी स्थापन करायची म्हणून हा प्रकल्प तयार झाला नाही तर स्वतःचा एक समुदाय तयार करणं हा त्यांचा उद्देश होता! मला अतिशय आनंद वाटतो की ते ज्या उद्देशाने माझ्याकडे आले होते तो पूर्ण झाला! रवीने त्यांची मुलाखत घेतली व त्यांना पेचात पाडणारे भरपूर प्रश्न विचारले (तो त्यात तरबेज आहे) मात्र त्यांनी एखाद्या साधूप्रमाणे अतिशय संयमाने त्याची उत्तरे दिली, आणि हो त्यातल्या बऱ्याचजणांची जीवनशैली खरोखरच साधूसारखीच आहे

हा अशा काही आयटी व्यावसायिकांचा समूह आहे की जे शनिवार-रविवारी मित्रमंडळींसोबत पबमध्ये दारूच्या पार्ट्या करत नाहीत, सूर्यास्तापूर्वी जेवतात व पहाटे लवकर उठतात, थंड पाण्याने अंघोळ करतात व त्यांच्या मंदिरात पूजेसाठी तयार होतात! आम्हाला त्यांना त्यांच्या संकुलामध्ये मंदिरासाठी जागा करून द्यायची होती! दवबिंदूच्या रहिवाशांनी मला त्यांच्या पर्यूषण पर्वानिमित्त आमंत्रण दिलं होतं. या पवित्र महिन्यात बहुतेक जैन लोक उपवास करतात व जैन साधू व साध्वी शांत व निरामय जीवनाविषयी व्याख्याने देतात. मी रवीलाही माझ्यासोबत घेऊन गेलो कारण त्याला त्यांच्या जीवनशैलीविषयी प्रश्न विचारायचे होते व त्यांच्या घर खरेदी करायच्या अनुभवाविषयी जाणून घ्यायचे होते. यापैकी बहुतेक तरूण मध्यप्रदेश किंवा राजस्थान या राज्यांमधील आहेत. यातली सर्वोत्तम गोष्ट म्हणजे त्यांचे आईवडील आधी त्यांचे मूळ गाव सोडून त्यांच्यासोबत राहायला तयार नव्हते मात्र जेव्हा त्यांनी दवबिंदूमधील संस्कृती व सामुदायिक जीवन पाहिले, तेव्हा त्यांनी स्वतःहून पुण्याला यायला व मुलांसोबत राहायला सुरुवात केली!

मला असं वाटतं आम्ही केलेल्या बांधकामातून ही सर्वात चांगली बाब झाली, कारण आपल्या कुटुंबामुळे घर तयार होतं आपण दिलेल्या सुविधांमुळे नाही. जर आमच्या घरांमुळे लोक एका कुटुंबाप्रमाणे जवळ येणार असतील तर याहून अधिक चांगलं काय होऊ शकतं? त्यांच्या मुलाखतींमधून या तरूण पिढीला त्यांच्या बांधकाम व्यावसायिकांसोबतच्या संवादाविषयी काय वाटतं हे समजलं; त्यांना असं वाटतं की चांगला बांधकाम व्यावसायिक ठरवताना योग्य संवाद हा अतिशय महत्वाचा घटक आहे. ते अनेक बांधकाम व्यावसायिकांना भेटले मात्र त्यांच्या चौकशीला वेळेत उत्तरे कधीच मिळाली नाहीत, त्यांच्यादृष्टिने हे कामाशी बांधलकी नसल्याचे लक्षण आहे! इथे बांधकाम व्यावसायिक म्हणजे केवळ एक व्यक्ती असं नाही तर त्याचा संपूर्ण चमू असा अर्थ होतो, रिअल इस्टेटने याची दखल घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर या सोसायटीच्या सदस्यांनी आमच्या चमूचं कौतुक केलं कारण त्यांच्यापैकी कुणीही ईमेलद्वारे काही विचारणा केल्यास आम्ही त्यांना चोवीस तासात उत्तर दिलं होतं! मी इथे आमचा मोठेपणा सांगत नाही मात्र या अनुभवाचा इतरांना फायदा होऊ शकतो, कोणत्याही व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारे संवाद साधणं हे अतिशय महत्वाचं आहे, मला पूर्णपणे आदर राखत एक कटू सत्य सांगावसं वाटतं की आपण भारतीय त्यात कमी पडतो!

दुसरा प्रसंग बाणेरच्या अष्टगंधमधला होता ज्याचा पहिला टप्पा आम्ही चार वर्षांपूर्वीच पूर्ण केला व हस्तांतरित केला! ज्यांना रिअल इस्टेट उद्योगाविषयी फारशी माहिती नसेल त्यांना कदाचित प्रकल्प हस्तांतरित होऊन चार वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमाला बांधकाम व्यावसायिकाला सपत्निक बोलावण्याचे विशेष महत्व वाटणार नाही! प्रकल्प हस्तांतरित केल्यानंतर चार वर्षांनी बांधकाम व्यावसायिकाने पुन्हा तिथे भेट द्यायला हिंमत लागते एवढे मात्र मी निश्चित सांगू शकतो! अष्टगंधचे रहिवासी गणेशोत्सव साजरा करत होते व त्यांनी नृत्य, गायन, पाककला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं व त्यांनी मला पारितोषिक वितरणाला प्रमुख पाहुणा म्हणून हजर रहावं अशी विनंती केली होती. मी अतिशय आनंदानं त्यांचं आमंत्रण स्वीकारलं कारण अशा भेटागाठींमधून मला ग्राहकांना भेटता येतं, त्यांची जीवनशैली जाणून घेता येते व यातून व्यवसायाविषयी बरंच काही शिकता येतं. यामध्ये बांधकाम व्यवसायिकाला एक धोका असतोच कारण अशा कार्यक्रमांमध्ये तुम्ही सगळ्या ग्राहकांना समाधानी करू शकत नाही व असे ग्राहक तुम्हाला सार्वजनिकपणे तोंडघशी पाडू शकतात. मात्र तुम्ही आपल्या कामाशी शंभर टक्के बांधील असाल तर कशाला काळजी करायची व मला वैयक्तिकपणे असे वाटते की अशी आव्हाने स्वीकारली पाहिजेत. मला आश्चर्यच वाटलं कारण अध्यक्ष/सचिवांनी माझा फक्त सत्कारच केला नाही तर त्यांना स्वर्गासारखं घर दिल्याबद्दल माझे आभारही मानले! माझ्यासाठी हा अतिशय हृदयस्पर्शी अनुभव होता, त्यातल्या कुणीही इमारतींच्या समस्यांविषयी गाऱ्हाणी सांगितली नाहीत, सर्व रहिवासी अतिशय आनंदी व उत्साही होते. दहा दिवस वेगवेगळी कुटुंबं गणपतीची आरती करत होती व आवर्जुन घरी बनवलेलाच प्रसाद वाटला जात होता. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सगळ्यांनाच त्यांच्या सहकार्यासाठी व सहभागासाठी बक्षिस देण्यात आलं ज्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच समावेश होता! या सोसायटीला फार मोठी मोकळी जागा नाही किंवा कॉमन रूमही नाही मात्र सगळेजण पार्किंगची जागा अशा कार्यक्रमांसाठी आनंदाने वापरतात.

मला वाटतं अशा प्रकारच्या होत असलेल्या सोसायट्यांमधून समाज तयार होतो, या दोन्ही प्रकल्पांमध्ये आम्ही फार काही उल्लेखनीय काम केले आहे असे मी म्हणणार नाही. त्या साध्या इमारती आहेत व त्यामध्ये पावसाळ्यात क्वचित गळणे किंवा झिरपणे यासारख्या समस्या होतात. पायाभूत सुविधांच्या आघाडीवर या भागामध्ये सांडपाण्याच्या वाहिन्यांचे जाळेच नसणे यासारख्या बाबी आमच्या नियंत्रणाच्याबाहेरच्या होत्या व रहिवाशांना त्याचा जरूर त्रास झाला असता, मात्र संवाद व एकमेकांवर विश्वास सदैव होता

बांधकाम व्यावसायिक म्हणून या प्रकल्पांमध्ये झालेल्या दोन्ही कार्यक्रमांमधून मला जे काही शिकायला मिळाले ते कोणत्याही व्यवस्थापन महाविद्यालयात शिकायला मिळाले नसते; यातून मला समजले की ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी त्यांना महागड्या भेटवस्तू दिल्या पाहिजेत किंवा कारागिरी अद्ययावत असली पाहिजे असे नाही. तुम्ही त्यांना जे काही आश्वासन दिले आहे ते पूर्ण करा. तुमचे काम घर बांधणे आहे ते प्रामाणिकपणे करा व सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही केवळ बांधकाम व्यावसायिक म्हणून नाही तर त्यांच्यातलेच एक आहात अशाप्रकारे त्यांच्यासाठी उपलब्ध व्हा! बांधकाम व्यावसायिक म्हणून आपण पूर्ण केलेल्या प्रकल्पांविषयी आपण विचारही करत नाही त्यामुळे त्यांना भेट देणे ही तर फार दूरची गोष्ट झाली, मात्र हळूहळू हा कल बदलतोय. केवळ समाजकार्याच्या दृष्टिकोनातूनच नाही तर विपणनाच्या दृष्टिकोनातूनही शक्य असेल तेव्हा स्वतः तुमच्या ग्राहकांशी संपर्क साधणे ही व्यवसायाची गरज आहे. आपण आपल्या पूर्ण झालेल्या प्रकल्पांमधील रहिवाशांनी एकत्र येऊन असे सणवार साजरे करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतो, तसंच अशा कार्यक्रमांसाठी आपणही थोडाफार निधी द्यायचा विचार करू शकतो. आपण बांधलेल्या एखाद्या इमारतीला आपण जेव्हा घर म्हणतो तेव्हा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एकत्र येणं हा कुठल्याही घराचा पाया आहे व बांधकाम व्यावसायिक म्हणून तुम्हाला फक्त पायाभरणी करायची आहे! रिअल इस्टेटमधल्या लोकांनी व्यवसायाचं हे साधं सोपं गणित समजून घ्यायची वेळ आली आहे, त्यासाठी फार खर्च येत नाही फक्त तुमच्या हातात असलेलं काम तुम्हाला प्रामाणिकपणे करावं लागतं.

बांधकाम व्यावसायिकाचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर मला दवबिंदू व अष्टगंधमध्ये झालेल्या कार्यक्रमांमधून मिळालं. नफा मिळवणं हे उद्दिष्ट आहेच, मात्र रहिवाशांचे आनंदी चेहरे मला सांगत होते की तुम्ही एक अशी सोसायटी तयार केली आहे जिथे अनेक पिढ्या नांदणार आहेत, त्यांची सांस्कृतिक भरभराट होणार आहे व त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत; बांधकाम व्यावसायिक म्हणून हे माझं काम आहे याची मी स्वतःला आठवण करून दिली. मी त्या रहिवाशांना सांगितलं; खरंतर मी तुमचा आभारी आहे कारण तुम्ही मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली, कारण कोणत्याही ध्येयाशिवाय जीवनाला काय अर्थ आहे! कार्ल मार्क्सने म्हटल्याप्रमाणे समाजातील व्यक्तिंमधील परस्पर संबंध हा समाजाचा सर्वात महत्वाचा घटक असतो व बांधकाम व्यावसायिकाला केवळ पहिले पाऊल उचलावे लागते; समाज निर्मितीचा हाच मार्ग आहे, केवळ आपल्या नावावर नवे प्रकल्प जमा झाल्याने ते होणार नाही!


संजय देशपांडे


Mobile: 09822037109

No comments:

Post a Comment