Wednesday, 7 May 2025

वैभव भारतीय क्रिकेटचे आणि आयपीएल..!!




































“तुम्ही प्रत्येक चेंडू मारायची गरज नसते परंतु प्रत्येक चेंडूला तुम्ही योग्य न्याय द्यावा लागतो.”
― अमित रे.

“प्रत्येक व्यक्तीची मैदानावर व बाहेर स्वतःला सादर करण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण शैली असते.”- सचिन तेंडुलकर.

इतिहास हा कधीही अपघाताने रचला जात नाही, त्यासाठी कठोर परिश्रम, समर्पण व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास लागतो.”—मी

अमित रे, हे “एन्लायटन्मेंट स्टेप बाय स्टेप” या सारख्या प्रेरणादायी पुस्तकांचे लेखक आहेत, तुम्हाला दुसऱ्या नावाची (सचिन) ओळख करून देण्याची गरज असेल तर त्यापेक्षा तुम्ही हा लेख न वाचलेलाच बरा व तिसरे अवतरण माझे आहे. ते अवतरण नाही तर माझ्या भावना आहेत, ज्यामुळे मला हा लेख लिहीणे भाग पडले. तर तुम्ही आत्तापर्यंत अंदाज बांधला असेल की हा लेख क्रिकेटविषयी आहे, विशेषतः मी आयपीएल  २०२५ च्या मौसमामध्ये जो डाव पाहिला त्याविषयी आहे. तो सोमवारचा दिवस होता, एक दिवस आधीच मी जंगलातल्या सफारीवरून परत आलो होतो, परंतु येथे बरीच  कामे हातावेगळी करायची शिल्लक असल्यामुळे मनस्थिती जरा वैतागलेलीच होती. मी जड डोक्याने व अस्वस्थ मनाने (धंद्यामध्ये/व्यवसायामध्ये २५ वर्षांनंतरही तुमच्या आयुष्यात असे दिवस येतात व मी यास जिवंतपणाचे लक्षण मानतो) घरी परत आलो. मी समान्यपणे रात्री पुस्तक वाचतो, क्वचितच टीव्ही पाहतो परंतु आयपीएलमधील सीएसकेच्या (कृपया गूगल करा) दारूण पराभवानंतर  फारसे आयपीएल जास्त पाहात नाही व आरआरच्या (पुन्हा गूगल करा) पहिल्या फळीतील फलंदाजांनी फलंदाजी करायला सुरुवात केली होती, त्यापैकी एक होता वैभव सूर्यवंशी, हा चौदा वर्षांचा तरुण (त्याला तरुणही म्हणता येणार नाही) आहे हे मला माहिती होते व कुतुहल म्हणून मी आरआरची फलंदाजी बघत राहिलो, ज्यातूनच हा लेख लिहित आहे.

तर आत्तापर्यंत केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला वैभव सूर्यवंशी हा १४ वर्षांचा मुलगा आहे (हो तुम्ही बरोबर वाचलेत), तो बिहारचा आहे, त्याला क्रिकेट खेळता यावे म्हणून त्याच्या पालकांनी अनेक खस्ता खाल्ल्या, आरआरच्या व्यवस्थापनाने विशेषतः राहुल द्रविडने त्याला हेरले व त्याला लिलावामध्ये फक्त २५ लाखांच्या बोलीवर (आता फक्त म्हणता येणार नाही) खरेदी केले व हा आयपीएल खेळणारा सर्वात लहान  खेळाडू आहे हे सर्व माहिती झाले आहे. आत्तापर्यंत बहुतेक लोकांना हेदेखील माहिती झाले आहे की तो केवळ आयपीएलच नव्हे तर पुरुषांच्या टी२० प्रकारामध्ये शतक ठोकणारा सर्वात लहान खेळाडू झाला आहे, आयपीएलमध्ये भारतीय फलंदाजाचे केलेले सर्वात वेगवान शतक त्याच्या नावावर झाले आहे, वगैरे, वगैरे. मी तुम्हाला आणखी तपशील सांगत बसणार नाही व खरेतर  याहूनही मोठ्या सामन्यांमध्ये अनेक खेळाडूंनी अशा खेळी केल्या आहेत, कपील देवने 83च्या विश्वचषकात 175 धावा केल्या, तर मॅक्सवेलने 2024 च्या विश्वचषकात जवळपास अशक्य अशाच कामगिरीची पुनरावृत्ती केली. क्रिकेटच्या इतिहासाची पुस्तके असे महान खेळाडू व त्यांच्या विक्रमी खेळाने भरलेली आहेत. त्यामुळे एका वेगळ्या मंचावर, फारशा महत्त्वाच्या नसलेल्या सामन्यामध्ये झालेल्या एका खेळीविषयी मला का लिहावेसे वाटले. याचे एकमेव कारण म्हणजे हा तडाखेबंद खेळ कुणी केला आहे ते पाहा, एका चौदा वर्षांच्या मुलाने, तुम्हाला अशी कामगिरी करणारी इतर एकही या वयाची व्यक्ती माहिती आहे का ते सांगा, म्हणूनच मी हा लेख लिहीत आहे. माझा वाचकांना एक साधा प्रश्न आहे, वयाच्या चौदाव्या वर्षी तुमची कोणत्याही क्षेत्रातील, मग ती अभ्यासातील का असेना सर्वोच्च कामगिरी सांगा व त्याची तुलना वैभवने जे साध्य केले आहे त्याच्याशी करा व त्यानंतर तुम्हाला त्याच्या तडाखेबंद खेळाचे महत्त्व समजेल. लोकहो, चौदाव्या वर्षी आपल्यापैकी बहुतेक जण नववीमध्ये असतील, त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्याही फार काही आव्हानात्मक सिद्ध करण्यासारखे नव्हते, नाही का व आता त्याने वयाच्या चौदाव्या वर्षी काय केले आहे ते पाहा, हे सगळे केवळ त्याच्यासाठीच नव्हे तर लक्षवधी मुलांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना आपण काहीतरी मोठे करून दाखवू शकतो असे वाटते, त्यांच्यासाठी ही खेळी महत्त्वाची आहे, हा तडाखेबंद खेळ महत्त्वाचा आहे कारण तो तुमच्या अगदी शेजारी राहणाऱ्या एखाद्या लहान मुलाने केल्यासारखा आहे!

सचिन तेंडुलकरही मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो व त्याने वयाच्या सोळाव्या वर्षी विक्रम रचण्यास सुरुवात केली, परंतु सोळा म्हणजे तरी किशोरवयीन तरुण म्हणता येईल, वैभव तर अजूनही अगदी लहान मुलगा आहे. आणि त्याला कुणाविरुद्ध खेळायचे होते तर मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, प्रसिद्ध कृष्णा, वाशिंग्टन सुंदर व रशिद खान, ही सर्व नावे देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करत आहेत, यापैकी अनेकांनी जेव्हा त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली तेव्हा वैभवचा जन्मही झालेला नव्हता, हे खरोखरच विशेष आहे. त्याने आयपीएलमध्ये खेळत असलेल्या पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानेही तो आधीच बातम्यांमध्ये होता, पुन्हा एकदा पदार्पणातच या लहान खेळाडूने विक्रम रचला आहे व तो जेव्हा पहिल्या खेळीत 38 धावांवर बाद झाला तेव्हा एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्याला रडू कोसळले व केवळ तिसऱ्याच डावात त्याने शतक केले, हे विशेष आहे!

 लोकहो, मला माहिती आहे, अनेक लोकांना क्रिकेट अजिबात आवडत नाही परंतु केवळ 35 चेंडूंमध्ये शतक करणे हा केवळ योगायोग किंवा नशीबाचा भाग नाही, तर त्यासाठी दर्जा, समर्पण, मनोवृत्ति, कठोर परिश्रम, ताकद व संयम हे सगळे गुण महत्त्वाचे असतात व त्या लहान मुलाकडे ते आहेत व त्याने काल अतिशय मोठ्या मंचावर ते दाखवून दिले. आयपीएल ही कदाचित एक खाजगी लीग असेल किंवा क्रिकेटचा अतिरेक होत असेल परंतु फुटबॉलमध्ये ला लिगा किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा अमेरिकेमध्ये बास्केटबॉलमध्ये एनबीए लीगही खाजगीच असतात, आपला देश क्रिकेटप्रेमी आहे व लोकांना जे हवे असते ते आयपीएल देते, त्यामुळे त्याला नावे ठेवणारे तुम्ही व मी कोण आहोत असे मला वाटते. क्रिकेट हा एक खेळ आहे, अब्जवधी लोकांना तो पाहायला आवडते व त्यामध्ये करिअर करण्याची लाखों मुलांची ( आणि  त्यांच्या पालकांची सुद्धा) महत्त्वाकांक्षा असते व त्यातल्या केवळ काही शंभर खेळाडूंना आयपीएल  लीगमधील दहा संघात जागा मिळते व त्यापैकी केवळ दोन अंकी खेळाडू पुढे जाऊन उत्तम कामगिरी करून देशाच्या संघात सामील होऊ शकतात, म्हणूनच अगदी आय़पीएल लीगमध्येही चांगली कामगिरी करणे हा काही विनोद नाही जे वैभवने करून दाखवले व म्हणूनच त्याचा तडाखेबंद खेळ विशेष महत्त्वाचा आहे!

गोट mhanje G.O.A.T (कृपया गूगल करा) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने त्याच्या अलिकडच्याच एका मुलाखतीमध्ये जवळपास एकोणीस वर्षांपूर्वी आयपीएलच्या पहिल्या आवृत्तीमध्ये खेळण्याचा त्याचा अनुभव सांगितला जेव्हा तो एकोणीस वर्षांचा होता व तो इशांत शर्माविरुद्ध खेळत होता (विशेष म्हणजे वैभवविरुद्धही बॉलर इशांत शर्माच होता) व येथे एका पूर्णपणे वेगळ्या गोलंदाजाविरुद्ध खेळणे कसे वाटत होते, हे तो समजून सांगत होता, अर्थात विराटने इशांतविरुद्ध नेटमध्ये बराच खेळला होता कारण ते दोघेही एकाच दिल्ली संघातले होते. आयपीएलसारख्या स्पर्धेत तुमचे असे होते, कारण इथे स्पर्धा अतिशय अटीतटीची असते हे प्रत्येक खेळाडूला माहिती असते की तुम्ही चांगली कामगिरी केली नाही तर तुम्हाला बसवून ठेवले जाईल व पुढील लिलावामध्ये तुम्हाला कुणीही खरेदी करणार नाही, म्हणजे पैसे नाहीत, करिअर नाही, हे आयपीएलचे कटू वास्तव आहे. म्हणूनच प्रत्येक खेळाडू इथे त्याचा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो व इथे दयामाया नसते, कुणीही गोलंदाज एखादा उसळी चेंडू टाकताना तुम्हाला समोर एक लहान मुलगा आहे असा विचार करणार नाही, तरीही वैभवने त्याचा स्वाभाविक खेळ केला, म्हणूनच तो विशेष ठरतो!

आणखी एक सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे, वैभव हा एका लहान शहरातील सामान्य भारतीय कुटुंबातला आहे जे त्याच्या मूलभूत गरजा जेमतेम भागवू शकतात व त्याला दुसरी संधी देण्यासाठी कुणीही गॉडफादर नाही जसा रोहन गावस्कर व अर्जुन तेंडुलकर यांना मिळाला ( नावे घेण्याबद्दल माफ करा, परंतु ही वस्तुस्थिती आहे) कारण कुणाच्याही पाठबळाच्या जोरावर तुम्ही खेळात फार काळ टिकून राहू शकत नाही पण तुमचा खेळ कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला एक-दोन वेळा जास्त संधी मिळण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकते. त्यामुळेच वैभवसाठी परिस्थिती अनुकूल नव्हती व सर्वोत्तम गोष्ट म्हणजे त्या मुलाला हे माहिती आहे त्यामुळे त्याने मिळालेली संधी अक्षरशः दोन्ही हातांनी स्वीकारली व उत्तम कामगिरी करून दाखवली. त्याचा हा खेळ खेळातील विक्रम मोडण्याच्यादृष्टीने अनेकप्रकारे विशेष होता परंतु माझ्यासाठी वैभवसारख्या हजारो मुलांच्या नजरेतून जास्त विशेष होता ज्यांना मी बाहेर फिरताना सरावासाठी जाताना रोज भेटतो, ही मुले कडक उन्हात घाम गाळत असतात, थंडीत कुडकुडत असतात तरीही मैदानावर सराव करत असतात, असे करताना त्यांच्या मनात केवळ एकच विचार असतो की  कधीतरी आपणच उल्लेखनीय यश मिळवू आणि लोकं आपला खेळ बघायला गर्दी करतील आणि आपण टीम इंडिया चा हिस्सा असु! आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या गोलंदाजाविरुद्ध वैभवला 14 व्या वर्षी षट्कार मारताना पाहून , अशा प्रत्येक मुलाने व मुलीने विचार केला असेल, “होय, काहीच अशक्य नाही”, म्हणून वैभवचा तडाखेबंद खेळ आवर्जून सांगण्यासारखा व दखल घेण्यासारखा आहे. वैभव हा अगदी शेजारी राहणाऱ्या एखाद्या लहान मुलासारखा आहे व तो त्याच्या सर्व मर्यादांवर मात करून (आर्थिक, सामाजिक इत्यादी) एवढी मोठी कामगिरी करू शकतो तर मीसुद्धा ती करू शकतो, यालाच मी आशा म्हणतो व आशा हा केवळ एक शब्द नाही, त्याच अतिशय मोठी ताकद असते ज्यामुळे कुणीही त्याला किंवा तिला ज्या उंचीवर पोहोचायचे आहे तिथे पोहोचू शकते. विशेष म्हणजे, अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये माजी भारतीय बॅडमिंटनपटू व प्रशिक्षत गोपीचंद यांनी मुलांना करिअर म्हणून कोठल्याही खेळाची निवड करू देण्याबाबत इशारा दिला होता कारण यामध्ये प्रचंड स्पर्धा आहे व कमविण्याची वर्षे कमी आहेत. परंतु सुदैवाने, क्रिकेटमध्ये परिस्थिती बरीच चांगली आहे, आयपीएलसारख्या लीगची कृपा, यामुळे केवळ पैसे कमवण्याचा मार्गच खुला झाला आहे असे नाही तर त्याद्वारे राष्ट्रीय संघामध्ये प्रवेश करणेही शक्य झाले आहे व म्हणूनच यासारख्या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करणे व ते देखील चौदाव्या वर्षी अत्यंत विशेष ठरते. दैवदुर्विलास म्हणजे, विरोधी संघातील गोलंदाजांचा वैभव चांगला समाचार घेत असताना व त्याची आगमनाची खेळी संस्मरणीय करत असताना, आणखी एक तरूण त्याच सामन्यामध्ये त्याचे पहिले आयपीएल खेळत होता, करीम जन्नत, आयपीएलमधील त्याच्या पहिल्या षटकाने त्याच्या संघाला 30 धावांचा फटका बसला, याचे श्रेय वैभवच्या फलंदाजीला जाते व बिचाऱ्या करीमला त्या सामन्यामध्ये दुसरे षटकही मिळाले नाही व आता कदाचित खेळण्याची दुसरी संधीही मिळणार नाही, आयपीएलमध्ये (म्हणजेच जीवनात सुद्धा) अशी अटीतटीची चुरस असते व वैभवला हे नक्की माहिती आहे.

वैभवसाठी आता यापुढचा प्रवास अधिक महत्त्वाचा ठरेल कारण, कारण यश मिळवणे अवघड असतेच परंतु त्याहीपेक्षा ते पुढे नेणे व टिकवणे जास्त अवघड असते, नाहीतर तुमचे यश “अल्पजीवी” ठरते. आपल्याकडे विनोद कांबळीचे उदाहरण आहेच, तज्ज्ञांच्या मते त्याचा खेळ सचिनपेक्षा उजवा होता परंतु तो यश व खेळासोबच ओघानेच येणारे प्रसिद्धीचे वलय पचवू  शकला नाही आणि अपयशाचा धनी झाला. इथेच व्यक्तीची जडणघडण (म्हणजेच संस्कार) अतिशय महत्त्वाचे ठरतात, वैभव यश व प्रसिद्धी कशी हाताळतो ही खरेतर त्याच्या पालकांची कसोटी असणार आहे. परंतु वैभव, तू या खेळासाठी जे काही केले आहेस त्यासाठी तुझे आभार, कारण हा खेळ या देशाच्या धमन्यांमध्ये रक्तासारखा वाहतो, म्हणूनच या खेळाला तुझा अभिमान वाटावा अशीच उत्तम कामगिरी कर, हीच माझी तुला शुभेच्छा आहे व तुझ्यातले बालपण नेहमी जप, त्याची निश्चितपणे मोठे झाल्यावर जास्त मदत होते!

संजय देशपांडे 

www.sanjeevanideve.com 

www.junglebelles.in