Tuesday, 16 May 2017

परवडणारी घरे म्हणजे काय रे भाऊ ?
















“आपण जोपर्यंत चांगल्या शाळा, सुबक घरे व उत्तम आरोग्य सेवा सगळ्यांना समप्रमाणात मिळाव्यात अशा संधी निर्माण करण्याचा व उपलब्ध करून देण्याचा मार्ग शोधत नाही, तोपर्यंत आपण एक विकसीत व सुदृढ समाज म्हणून टिकून राहणार नाही”… टिम वाईज.

टिमोथी जेकब म्हणजेच “टिम” हे अमेरिकी वंशवाद विरोधी कार्यकर्ते व लेखक आहेत. त्यांनी १९९५ पासून, अमेरिकेतील ६०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये भाषणे दिली आहेत. त्यांच्या वरील अवतरणातून दिसून येते की, जगभरातल्या लोकांसाठी अमेरिकेत स्थायिक होणं हे स्वप्न असलं तरी तिथेही परवडणाऱ्या घरांची समस्या आहेच. परवडणारी घरे हा शब्द आजकाल फक्त रिअल इस्टेटशीच संबंधित राहिलेला नसून प्रत्येकाच्याच तोंडी ऐकू येतो. आपल्या देशाच्या पंतप्रधान कार्यालयानंही  परवडणा-या घरांच्या विषयाला प्राधान्य दिलं आहे. पंतप्रधानांच्या परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या हेतूविषयी पूर्णपणे आदर राखत सांगावेसे वाटते की याची दोन कारणे आहेत. दोनच वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत व तोपर्यंत जवळपास पन्नास टक्के मतदार हे शहरी भागात राहणारे असतील व याच भागात घरांची समस्या गंभीर आहे. पंतप्रधानांना त्यांचा पक्ष पुन्हा जिंकावा असे वाटत असेल तर ते या पन्नास टक्के मतदारांना नाराज करू शकत नाही. या मतदारांकडे स्वतःचे एक चांगले घर नसेल तर त्यांची नाराजी थेट सरकार विरोधी मतांमधून दिसून येईल हे लहान मुलंही सांगेल. म्हणुनच सरकार सामान्य जनतेसाठी अधिकाधिक परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्याच्या खात्यात जवळपास २.५ लाख रुपये जमा करण्यापासून ते रिअल इस्टेट क्षेत्रासाठीची धोरणे अधिक लवचिक करण्यासाठी रेरा कायदा करण्यापर्यंत अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत तरीही कुठेतरी काहीतरी चुकतंय. एकीकडे घरांचा पुरवठा वाढत असला तरीही समाजातल्या बहुतेक वर्गातल्या लोकांची घरे परवडत नसल्याची ओरड आहे. परिणामी रिअल इस्टेटसमोर पेच निर्माण झाला आहे कारण तयार घरांची संख्या वाढतेय, तसेच उत्पादन खर्चही वाढतोय मात्र ग्राहक तसेच सरकारही घरांचे दर आणखी कमी करावेत अशी मागणी करत आहे. हे सर्व पहाता मला असे वाटते की रिअल इस्टेटच्या बाबतीत परवडणारे ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे, तरच आपल्याला परवडणाऱ्या घरांचे भविष्य ठरवता येईल.

 टिम वाईज यांनी त्यांच्या वर दिलेल्या अवतरणात म्हटल्याप्रमाणे चांगली घरे (शाळा तसेच आरोग्यसेवा विसरू नका) मिळण्याची संधी सगळ्यांना समानप्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे. म्हणजेच समाजामध्ये वेगवेगळे वर्ग असतात व प्रत्येक वर्गाला विशेषतः उत्पन्न तसेच जीवनशैलीच्या स्वतःच्या मर्यादा असतात. आपण प्रत्येक वर्गातल्या लोकांना घर उपलब्ध करून दिले पाहिजे म्हणजे ते स्वतःच्या जीवनशैलीसाठी योग्य घर खरेदी करून शांतपणे जगू शकतील. येथे मानसिक शांती हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. नाहीतर एखाद्या व्यक्तिला त्याच्याकडचे सगळे पैसे घरासाठीच खर्च करावे लागले, तर तो त्याच्या कुटुंबाला सिनेमाला घेऊन जाणे, एखादेवेळी बाहेर जेवणे यासारखी लहानशी चैन करू शकणार नाही किंवा मुलांना चांगल्या शाळेत पाठवू शकणार नाही कारण त्याची सगळी बचत घरांचे हफ्ते भरण्यातच संपून जाईल. कुणीही शहाणा माणूस असे घर खरेदी करणार नाही, कारण हे परवडणारे घर नाही. तुम्हाला ज्या घराचे हप्ते भरण्याचा सतत ताण जाणवतो ते घर परवडणारे असूच शकत नाही. त्याचप्रमाणे परवडणारे घर म्हणजे शहरापासून अतिशय दूर, कोणत्याही सोयी सुविधा नसलेल्या ठिकाणी स्वस्त जमीन मिळाली म्हणून घरे बांधणे नाही. आणखी एक समज असतो की परवडणारी घरे म्हणजे लहान घरे ज्यामुळे घर घेण्याचा उद्देशच पूर्ण होत नाही. परवडणाऱ्या घराच्या नावाखाली तुम्ही मोठ्या बाथरूमच्या आकाराएवढी बेडरूम देऊ शकत नाही. परवडणाऱ्या घराच्या नावाखाली वर नमूद केल्याप्रमाणे त्रुटी असलेली घरे देण्याचा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा तो अपयशी ठरला. शहरातील नागरिकांना अजूनही परवडणारी घरे मोठ्या संख्येने हवी आहेत ही वस्तुस्थिती आहे.

मी इथे भारतीय कुटुंबांसाठी घरानंतर दुसरी जी गरज असते तसंच ती बाळगण्याचं स्वप्न असतं त्याचं उदाहरण देतो ते म्हणजे स्वतःची गाडी. मला आठवतंय आमच्या घरातील पहिली गाडी लुना होती. मी माझ्या वडीलांबरोबर शो-रुमपासून आमच्या घरापर्यंत पळत आल्याचे मला लक्षात आहे. याची दोन कारणं होती एक म्हणजे आपल्या परिसरात फक्त आपल्याकडेच लुना असल्याचं कौतुक होतं व दुसरं म्हणजे वडिलांना डबल सीट घेऊन नवीन लुना चालवता येईल याची खात्री नव्हती. त्यांना मला काही इजा होण्यापेक्षाही लुनाचं नुकसान होण्याची काळजी होती. लुना हे आमच्याकडचं पहिलं वाहन होतं व ते सगळ्याच अर्थानी परवडणारं होतं. लुनामुळे ऑटो उद्योगामध्ये एका नव्या युगाची सुरुवात झाली. त्यानंतर काही वर्षांनी मारुती सुझुकीचं आगमन झालं जी मारुती या नावानं लोकप्रिय झाली. ही दोन वाहनं बाजारात येईपर्यंत चारचाकी सामान्यांच्या आवाक्याबाहेरची होती व दुचाकीची फारशी गरज नव्हती. याचं कारण म्हणजे सगळी अंतरं चालत किंवा सायकलनं जाण्यासारखी होती. मात्र आजचं जीवन पाहा. शहरातल्या लोकांना त्यांच्या कामासाठी, शिक्षणासाठी, नातेवाईकांना भेटायला, किराणा खरेदी करायला, अशा असंख्य कामांसाठी सगळीकडे जावं लागतं. मुंबईसारख्या काही शहरांचे अपवाद वगळले तर सगळीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव आहे. त्यामुळे स्वतःचे वाहन घेणे ही मूलभूत गरज होऊन जाते, अर्थात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नसणे हे त्याचे मुख्य कारण आहे. वाहनांमध्ये ग्राहकांना किती वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत ते पाहा, चारचाकींमध्ये पोर्शे, बीएमडब्ल्यू, ऑडी, मर्सिडीज अशा गाड्या आहेत ज्यांची किंमत साधारण दोन कोटींच्या घरात आहे. तर दुसरीकडे मारुती, टाटा, ह्युंदेईयासारखे जुनेच पण चांगले पर्याय आहेत. या श्रेणीत तुम्हाला साधारणतः चार लाखापर्यंत आवश्यक त्या सगळ्या सोयी असलेली चांगली कार मिळते. दुसरीकडे दुचाकींच्या बाजारामध्ये, ड्युकाती, हर्ले डेव्हिडसन यासारख्या सुपरबाईकपासून, होंडा, हिरो मोटर्स यांच्या इंधन बचत करणाऱ्या बाईक आहेत. दुचाकींमध्ये वैविध्यपूर्ण पर्याय उपलब्ध आहेत. महिलांसाठी होंडाच्या डिओ किंवा ऍक्टिवा यासारख्या गाड्या आहेत. यामुळे संपूर्ण बाजाराच्या गरजांचा विचार केला जातो व त्या पूर्ण केल्या जातात. म्हणूनच कुणीही परवडणारी कार किंवा बाईक मिळत नसल्याची ओरड करत नाही. समाजातल्या प्रत्येक वर्गाला आपल्या गरजांनुसार आपल्या खिशाला परवडेल असे वाहन घेण्यासाठी पर्याय उपलब्ध असतो. यासाठी विविध वित्तीय संस्था कर्जपुरवठाही करतात. तसंच व्याजरहित कर्जपुरवठ्यासारख्या योजनाही उपलब्ध आहेत. यामुळेच ग्राहकाच्या खिशावरचा ताण आणखी कमी होतो. वाहन उद्योगाला एक गोष्ट उमजली व त्यानुसार पावले उचलण्यात आली ती म्हणजे सर्व वर्गांसाठी परवडणारी वाहने म्हणजेच कमी देखभाल करावी लागतील अशी वाहने. विशेषतः भारतीय रस्त्यांची परिस्थिती पाहता ते एक आव्हान होतं मात्र त्याला यशस्वीपणे तोंड देण्यात आलं. आजकालच्या बाईकच्या टायरमध्ये ट्युबलेस टायरची सोय असते. त्यामुळे आता पंक्चर काढण्यासाठी बाईक पंक्चरवाल्याकडे घेऊन जायचे दिवस गेल्यात जमा आहे.

वाहन घेणे ही आता चैनीची बाब राहिलेली नाही तर प्रत्येक घराची गरज झाली आहे. इथेच वाहन उद्योगानं रिअल इस्टेटवर मात केली. वाहन उद्योगाने काळजीपुर्वक प्रत्येक ग्राहकाच्या गरजा ओळखल्या व त्यानुसार उत्पादनाची रचना केली. तुम्हाला आज जर आरामदायक सिदान हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला एसयूव्ही हवी असेल तर घेऊ शकता. तुम्हाला कमी देखभाल करावी लागणारी बाईक हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला इंधन बचत करणारी बाईक हवी असल्यास तुम्ही ती घेऊ शकता, तुम्हाला सुपर बाईक हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता, वाहन उद्योगात तुम्हाला हवा तो, हवा तसा पर्याय उपलब्ध आहे. मी यालाच परवडणारे वाहन असे म्हणेन कारण समाजाच्या प्रत्येक वर्गाची परवडण्याबाबतची संकल्पना वेगळी असते. त्यानुसार उपलब्ध होणारे उत्पादन म्हणजे परवडणारे उत्पादन.

आता या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेट किंवा गृहबांधणी क्षेत्राकडे पाहा. इथे पर्याय उपलब्ध आहेत मात्र सर्व वर्गांच्या ज्या गरजा आहेत त्यानुसार उपलब्ध नाहीत. ते विशिष्ट वर्गासाठी तयार करण्यात आले आहेत. रिअल इस्टेटमधला कल तुम्ही पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की अंतिम उत्पादन हे विकासकाच्या इच्छेप्रमाणे असतं. म्हणजे त्याला वाटलं एखाद्या ठिकाणी जास्त पैसे मिळतील तर तो “ड्रिम टाउनशिप किंवा हेवन्ली होम्स” यासारख्या नावाने एखाद्या उच्चभ्रू वसाहतीचा प्रकल्प जाहीर करतो, जिथे कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधांपेक्षा नफ्याचा वा घर विक्रीचा जास्त विचार केला जातो. तसंच त्यातल्या घरांचा आकारही विकासकला हवा तेवढा असतो ज्यामुळे घरं परवडतील असं त्याला वाटत असतं. मात्र आपण कधी विचार केलाय का की आपण कोणत्या प्रकारच्या घरांना परवडणारी घरे म्हणू शकतो. याचं उत्तर आहे उत्पन्नाच्या क्षमतेनुसार व जीवनशैलीनुसार सगळ्या प्रकारची घरं परवडणारी असतात. त्यात एक गोष्ट समान असते ती म्हणजे आरामशीरपणे राहण्यासाठी आवश्यक असलेली किमान जागा तसंच पायाभूत व सामाजिक सुविधा घराच्या जवळपास असणं अतिशय आवश्यक आहे व मानसीक शांती सुद्धा ! उदाहरणार्थ एखाद्या रिक्षाचालकाचं उदाहरण घ्या. त्याचं मासिक उत्पन्न कदाचित २०,००० रुपये असेल. त्याची बायकोही कमवत असेल तर दोघांचं मिळून साधारण ३०,००० रुपये मासिक उत्पन्न असेल. आता ईएमआय व कर्जाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे तुम्ही त्याला पुणे शहरापासून साधारण तीस किलोमीटर दूर घर घ्यायला सांगितलं तर तो कधीच जाणार नाही व त्याला हे घर परवडणारं वाटणार नाही. याचं कारण म्हणजे परवडणारं घर म्हणजे केवळ किंमत कमी असलेलं घर नाही. तो रिक्षावाला असल्यानं त्याच्या दिवसाची सुरुवात पहाटे पाच वाजता रेल्वे स्थानक किंवा बसस्थानकापाशी होते. त्यासाठी त्याला घरून अर्धा तास लवकर निघावं लागतं व रात्री रिक्षा घरी घेऊन जावं लागतं. तुम्ही त्याच्या कामाच्या ठिकाणापासून तीस किलोमीटर लांब घर घ्यायला सांगितलं तर तो त्याची रिक्षा घरी घेऊन कसा जाईल? त्याला सार्वजनिक वाहतूक वापरायची असेल तरी तिचा वेळेवर पत्ता नसतो, दुसरे म्हणजे तो रात्री सुरक्षितपणे रिक्षा कुठे लावू शकेल. कारण या शहरामध्ये पीएमपीएमएलला स्वतःच्या बस लावण्यासाठीही जागा नाही तर रिक्षा कुठे लावणार? हजारो लहान व्यावसायिक तसंच सेवा उद्योगामध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांची अशीच परिस्थिती आहे, ज्यांचे कामाचे क्षेत्र शहराच्या मध्य भागात आहे !

उच्च वा मध्यमवर्गीयांसाठीही परिस्थिती फारशी वेगळी नाही, एखाद्या आयटी किंवा बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करणाऱ्या अभियंत्याला एका लहान बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या किंवा एखाद्या लहानशा कारखान्यात काम करणाऱ्या अभियंत्यापेक्षा बराच जास्त पगार असतो. त्यामुळे दोन्ही अभियंत्यांचं शिक्षण सारखंच असलं तरीही त्यांचं उत्पन्न तसंच जीवनशैली पूर्णपणे वेगळी असते. पुण्यासारख्या शहरामध्ये रिअल इस्टेटचा मुख्य व्यवसाय स्थलांतरितांवर चालतो व या लोकांच्या गरजा शहरातल्या स्थानिक ग्राहकांसारख्या नसतात. उदाहरणार्थ एखादा स्थानिक आयटी अभियंता पश्चिम उपनगरामध्ये सदनिका शोधत असेल तर तो विचार करेल की त्याचे पालक, मित्र किंवा इतर नातेवाईक त्याला भेटायला येतील. त्यामुळे तो सार्वजनिक तसंच खाजगी वाहतूक व्यवस्था सहजपणे उपलब्ध होईल असं घर निवडेल. मात्र नागपूर/अमरावतीहून येणाऱ्या व्यक्तिचे शहरात कुणीही नातेवाईक नसल्यानं तो या घटकाचा गांभिर्यानं विचार करणार नाही. तो फक्त त्याच्या कामाचं ठिकाण, मुलांची शाळा किती लांब आहे याचा विचार करेल. इथेही वाहतुकीचे उपलब्ध पर्याय व घरापासूनचे अंतर यानुसार परवडणे ही संकल्पना बदलते.

त्यानंतर मुद्दा येतो तो जीवनशैलीचा, आयटी किंवा बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करणाऱ्या अभियंत्याची लक्ष्मीरोड किंवा एफसी रोड यासारख्या मध्यवर्ती ठिकाणांपासून लांब राहायला हरकत नसते. त्याला मित्रांसोबत पार्टी लाईफ अनुभवायला मिळेल असं ठिकाण हवं असतं. अशी ठिकाणं घराच्या जवळपास उपलब्ध नसतील तर जीवनशैलीचा विचार करता त्याला ते ठिकाण परवडणारं वाटणार नाही. इथे आणखी एक रोचक पैलू आहे, आपण जेव्हा पायाभूत सुविधांचा विचार करतो तेव्हा त्यामध्ये पाण्यासारख्या अगदी मूलभूत गोष्टीही येतात. मी पुण्या किंवा मुंबईच्या एखाद्या आयटी अभियंत्याला सांगितलं की एखाद्या प्रकल्पामध्ये पुणे महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा होत नाही. हा प्रकल्प महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर असल्यानं त्याला टँकरचं पाणी खरेदी करावं लागेल, अशावेळी असे घर पायाभूत सुविधांच्या बाबतीत परवडणारं नाही असं त्याला वाटेल. मात्र विदर्भ किंवा मराठवाड्यातून आलेल्या त्याच कंपनीतल्या एखाद्या आयटी अभियंत्याला त्या घराच्या बाबतीत काही हरकत नसेल. याचं कारण म्हणजे त्यानं जन्मापासून प्यायचं पाणी टँकरनच येताना पाहिलेलं असल्यामुळे घर घेताना त्याला तो अडथळा वाटणार नाही.

एखादं घर जीवनशैलीच्या बाबतीत किती परवडतं हे बजेटवरही अवलंबून असतं. मी ग्रुप बुकींग करिता आलेल्या काही तरुण आयटी अभियंत्यांशी बोलत असताना मला अतिशय रोचक अनुभव आला. ते सगळे बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये लठ्ठ पगारावर नोकरी करत होते. मी त्यांच्या वयाचा असताना असताना एवढ्या पगाराचं स्वप्नही पाहिलं नव्हते! त्यांनी प्रत्येक दोन बीएचके सदनिकेमागे साधारण वीस लाखांची बचत होत असल्यामुळे वर्दळीच्या उपनगरापासून लांबचा पर्याय निवडला. मी त्यांना विचारलं की त्यांना शहराच्या जवळचा पर्याय परवडू शकतो मग त्यांनी लांब राहण्याचा पर्याय का निवडला. त्यावर त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्यापैकी बहुतेक जण अविवाहित किंवा  वा  दोघेच होते. पुढे मुलं वगैरे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा खर्च वाढेल त्यामुळे त्यांच्या खर्च करण्यावर मर्यादा येतील. अशावेळी एखाद्यावेळी बाहेर जेवायला जाणे किंवा मॉलमध्ये खरेदी करणे यासारख्या नेहमीच्या चैनीला त्यांना मुकायचे नव्हते. त्याचसाठी त्यांना आतापासूनच ईएमआय नियंत्रणात ठेवायचा होता. तसंच त्यांच्यापैकी कुणीच पुण्याचे नसल्यामुळे घर शहरापासून जवळच हवं, विशिष्ट उपनगरातच हवं अशा त्यांच्या कोणत्याच अटी नव्हत्या. त्यामुळे बचत होत असेल तर फक्त कामाच्या जवळपास घर असणं त्यांच्यासाठी पुरेसं होतं . माझ्यासाठी हा डोळे उघडणारा अनुभव होता कारण आपण जेव्हा देखभालीचा खर्च जास्त असं म्हणतो तेव्हा त्यात प्रत्यक्ष पायाभूत सुविधांचा तसंच सामाजिक सुविधांच्या देखभालीचा खर्चही समाविष्ट होतो.

या सगळ्या  गोष्टींसोबत  सामाजिक राहणीमानही समजून घेणं महत्वाचं आहे. तुम्ही एका सामान्य मध्यवर्गीय कुटुंबाकडून झोपडपट्टीतल्या ३०० चौरस फुटांच्या घराशेजारी राहण्याची किंवा त्या आकाराच्या घरात राहण्याची अपेक्षा करू शकत नाही. आणखी एक घटक म्हणजे घरांची रचना कुटुंबाच्या आकारानुसार व त्यांच्या जागेच्या वापरानुसार करणे. तुम्ही कुठल्याही तथाकथित परवडणाऱ्या घराचं उदाहरण घ्या उदाहरणार्थ झोपडपट्टी पुनर्विकासांतर्गत बांधण्यात आलेली घरं. काही वर्षांनंतर या घरांना दिल्या जाणाऱ्या सेवा पुरवणं अशक्य होऊन जातं. मुंबईमध्ये अलिकडेच अशाच एका परवडणा-या गृहनिर्माण प्रकल्पामधली लिफ्ट योग्य देखभाल असलेली नव्हती व त्यामुळे एका लहान मुलीचा अपघाती मृत्यू झाला. परवडणारी घरे बांधण्यासाठी अशा प्रकरणांचा जाणीवपूर्वक अभ्यास केला जावा.

सरकारसह आपणही परवडणारी घरं देण्यात अपयशी ठरलो आहोत कारण आपल्याला परवडणारी घरे म्हणजे काय हेच कळलेलं नाही. परवडणारी घरं देणं ही केवळ सरकारची किंवा विकसकांची जबाबदारी नाही, तर ते संयुक्त प्रयत्नांमधून झालं पाहिजे. सरकार घर खरेदी करणाऱ्यांना दोन-तीन लाख रुपयांचं अनुदान देऊन मग परवडणारी घरं देण्यासाठी विकासकांना जबाबदार धरू शकत नाही. तसंच रिअल इस्टेट उद्योगही सरकारनं त्यांना सगळ्या सोयी द्याव्यात मग आम्ही परवडणारी घरं देऊ अशी ओरड करू शकत नाही. लक्षात ठेवा ही नैतिकपणे व प्रत्यक्षपणे दोघांचीही जबाबदारी आहे कारण गृहनिर्माण उद्योगातून दोघांनाही फायदा होतो आहे.

समाजात प्रामुख्याने तीन वर्ग असतात एक म्हणजे अति श्रीमंत, अति गरीब व तिसरा वर्ग म्हणजे मध्यम श्रीमंत किंवा मध्यम गरीब. पहिल्या दोन वर्गवाऱ्यांच्या बाबतीत समस्या नसते कारण अति श्रीमंत त्यांची इच्छा असेल तिथे घर निवडू शकतात व अति गरीबांना काही पर्याय नसतो म्हणून ते अगदी पदपथावरही राहू लागतात किंवा झोपडपट्टीमध्ये. खरी अडचण असते ती मध्यम वर्गाची मग तो उच्च मध्यम वर्ग असो किंवा कनिष्ठ मध्यम वर्ग. त्यांना घर हवे असले तरी त्यासोबत असंख्य मर्यादाही असतात व इथेच परवडणारे घर या शब्दाला अतिशय महत्व येते. परवडणारी घरे ही केवळ गरज नाही तर तो प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, जी व्यक्ती आपापल्या परीनं देशाच्या प्रगतीत योगदान देत आहे  त्या प्रत्येकाला घराच्या बाबतीत प्राधान्य दिलं पाहिजे. परवडणाऱ्या घरांसाठीच्या उपाययोजना नियोजनबद्धपणे तयार केल्या पाहिजेत, त्या केवळ जुनेपुराणे तर्क किंवा सूत्रांवर आधारित नसाव्यात. आपल्याला हे केवळ निवडणुका जिंकण्यासाठी किंवा रिअल इस्टेटला स्थैर्य मिळावे म्हणून नाही तर समाजात असंतोष नसावा यासाठी करावेच लागेल. कारण कोणत्याही देशाला जागतिक महासत्ता होण्याचा प्रयत्न करत असताना बेघरांची संख्या वाढणं परवडणार नाही!

संजय देशपांडे
Mobile: 09822037109



Sunday, 7 May 2017

झालना, बिबट्यांचे माणसातील गाव !





















“ज्यांनी बिबट्याला नैसर्गिक अनुकूल वातावरणात कधीच पाहिलेले नाही त्यांना आपल्या भारतीय जंगलातील सर्वात रुबाबदार व देखण्या प्राण्याच्या दिमाखदार हालचाली व त्याच्या रंगसंगतीमधील सौंदर्याची कल्पनाच येणार नाही.” … जिम कॉर्बेट.

जेम्स एडवर्ड "जिम" 'कॉर्बेट (25 जुलै 1875 – 19 एप्रिल 1955) हे ब्रिटीश-भारतीय शिकारी व शोधक होते. नंतर ते वनसंरक्षक, लेखक व निसर्गवादी झाले. त्यांनी भारतातील अनेक नरभक्षक वाघ व  बिबट्यांची शिकार केली. विकीपिडीयामध्ये जिम कॉर्बेट यांची ओळख अशी असली तरीही माझ्या मते त्यांचं एका शब्दात वर्णन करायचं झालं तर “जंगल” असंच करता येईल. कॉर्बेट निसर्गाशी एवढे एकरूप झाले की ते आणि निसर्ग एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं वाटू लागतं. त्यामुळे जेव्हा ते बिबट्या हा भारतीय जंगलांमधील सर्वात सुंदर प्राणी आहे असं म्हणतात तेव्हा तो हमखास असलाच पाहिजे याविषयी माझे दुमत नाही. जंगलाविषयी जिम जे म्हणतात त्याला मी दोन कारणांमुळे आव्हान देऊ शकत नाही. एक म्हणजे त्यांनी अनेक वर्षे जंगलात घालवली आहेत व दुसरे म्हणजे तुम्ही तुमच्या गुरुंविषयी शंका घेऊ शकत नाही. आणि मी कॉर्बेट यांना निसर्ग या विषयातील माझे गुरु मानतो. मी इतके वेळा जंगलाला भेट दिली असली तरीही मला बिबट्या फारसा पहायला मिळालेला नाही. मी वाघ अनेकदा पाहिलाय, जरी तो कितीही वेळा पाहिला तरी समाधान होत नाही हे तितकंच खरं आहे !  मी जिम यांच्या वरील अवरणाविषयी अनेक दिवसांपासून विचार करत होतो. तसंच अनेक दिवसांपासून बिबट्याला जंगलात पाहायची इच्छाही होती. मी जेव्हा माझ्या वन्यप्रेमी मित्रांसोबत रणथंबोरला जायचं ठरवलं तेव्हा तिथे वाघ तसंच बिबटे दिसतात हे माहिती होतं. मात्र वाघ किंवा बिबट्या या दोन्हीमध्ये नव्याण्णव टक्के लोक वाघाच्याच मागे जातात व मी सुद्धा त्याला अपवाद नव्हतो. हे अतिशय स्वाभाविकपणे होतं कारण वाघाचं वलय इतर प्राण्यांपेक्षा वेगळं असतं, त्यामुळेच की काय भारतीय जंगलांमधील बिबट्याचे महत्व विशेष ओळखलं जात नाही. त्यामुळे मला जेव्हा वॉट्सऍपवर वन्यप्रेमी गटाकडून जयपूरजवळच्या झालना बिबट्या अभयारण्याविषयी माहिती समजली तेव्हा मी आमच्या रणथंबोरच्या सफारीला जोडून तिथे जायची संधी लगेच घेतली.

ज्यांना जंगलाविषयी फारशी माहिती नाही त्यांना आपल्या देशात जवळपास सगळ्या भागात दिसणाऱ्या बिबट्याचे महत्व किंवा त्याचं वेगळेपण जाणवणार नाही. असं पाहता पुणे जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणावर बिबटे आहेत. बिबट्याने ग्रामीण भागात गुराढोरांवर हल्ला केल्याची किंवा तो दिसल्याची बातमी एक दिवसाआड येत असते. त्यामुळे बहुतेक जण विचारतील की त्यात एवढं काय विशेष आहे व मी त्यांना दोष देत नाही, कारण आपल्याला जंगलांविषयी काहीच माहिती नसते किंबहुना आपण त्याबाबतीत निष्काळजी असतो असंही म्हणता येईल. सर्वप्रथम एक म्हणजे  मनुष्यप्राण्याला  स्वतः सोडून इतर कोणत्याही प्राण्याची काहीही काळजी नसते, त्यामुळे बिबट्याचा विषय तर दूरच राहिला. जे मोजके लोक जंगलात जातात ते मी आधी नमूद केल्याप्रमाणे वाघाची छायाचित्रं घेतात आणि त्यांना आपण जंगल पाहिल्यासारखं वाटतं. विशेषतः जिथे वाघाचे अस्तित्व असते तिथे बिबट्या दिसून येणे मुळातच अतिशय अवघड असते. त्यामुळे त्याची छायाचित्रं घेणं त्याहूनही कठीण असते. तो अतिशय झपाट्यानं झाडा-झुडुपांमध्ये  मिसळुन  जातो व  दिसेनासा होतो, म्हणूनच त्याला जंगलामध्ये “भूत” म्हणतात ते योग्यच आहे. किती दुर्दैव आहे पाहा, इतक्या देखण्या प्राण्याला केवळ वाघाकडून मारले जाण्याची भीती असल्यामुळे तो अतिशय सजग व सतर्क असतो, म्हणून त्याला भूत म्हणतात तर वाघाला मात्र राजाचं बिरुद मिळतं! जिथे वाघ फिरत असतात तिथे बिबटे क्वचितच पाहायला मिळतात कारण वाघाला बिबट्या अजिबात आवडत नाही. याची दोन कारणे असू शकतात, एक म्हणजे तो वाघाच्या शिकारीच्या आड येऊ शकतो व दुसरे म्हणजे तो वाघाच्या बछड्यांना मारतो. वाघाने बिबट्याला मारल्याचे, तसेच बिबट्याचा अतिशय त्वेषाने पाठलाग केल्याचे किंवा त्याला हुसकावून लावल्याचे अनेक किस्से ऐकायला पाहायला मिळतात. मी जंगलात हजारदा वाघाला पाहिलंय मात्र बिबट्या दहा वेळाही दिसला नसेल. अनेकांना व्याघ्र प्रकल्पांमध्येही स्पष्टपणे बिबटे पाहायला मिळतात मात्र तो केवळ योगायोग किंवा नशीब असतं. वाघासारखा बिबट्या कधीही एका ठराविक रस्त्याने किंवा मार्गावरून जात नाही उदा. आमच्या अलिकडच्याच सफारीत आम्हाला नूर नावाची वाघीण पाणवठ्यातून बाहेर येताना व एका दिशेने जाताना दिसली. त्यानंतर गाईड व चालकाने तिचा जवळपास पाच किलोमीटर मागोवा घेत पाठलाग केला व पुढे आम्ही तिला फोटो काढायला गाठू शकलो. अशा प्रकारे वाघांच्या मार्गक्रमणाचा अंदाज बांधता येतो मात्र तुम्ही बिबट्याचा पाठलाग शंभर मीटरही करु शकणार नाही कारण तो कुठल्याही दिशेने जाऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर मी बिबट्याला अगदी जवळून आणि स्पष्टपणे पाहायला अतिशय उत्सुक होतो. मला असं वाटलं होतं की झालना हे बिबट्यांचं अभयारण्य असल्यामुळे मला निवांतपणे बिबटे पाहता येतील. मात्र मला दोन आश्चर्याचे धक्के बसले, एक म्हणजे झालना हे जयपूर शहरातच आणि मुख्य म्हणजे औद्योगिक क्षेत्रात आहे याची मला कल्पना नव्हती व दुसरे म्हणजे हे बिबट्यांचे अभयारण्य असले तरीही बिबटे अजिबात कसलीही काळजी न करता उघडपणे फिरत नाहीत, जे मी विसरलो होतो. झालनाचा प्रवेश अगदी शहरी भागातून होतो. हे आधी जयपुरच्या महाराजा मानसिंह यांचे खाजगी जंगल होते. हा भाग अगदी रणथंबोर सारखाच असला तरीही शहरीकरणात एखाद्या लहान बेटासारखा वाटतो. मला शहराच्या मध्यवर्ती भागात एवढे जंगल जपून ठेवल्याबद्दल राजस्थानच्या वनविभागाचे, नागरी विकास विभागाचे तसेच पर्यटन विभागाचे अभिनंदन करावेसे वाटते. तुम्ही जोपर्यंत झालना अभयारण्यामध्ये प्रवेश करेपर्यंत, तुम्ही प्रत्यक्ष जंगलात प्रवेश केलाय हे तुम्हाला कळत नाही. तसंच बिबट्या जवळपास असल्यावर विविध प्राण्यांनी दिलेले संदेश, प्रत्यक्ष बिबट्या बघणं हे एखाद्या व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ बघण्याइतकंच रोमांचक असणार आहे याची जाणीवही होत नाही. यातच या संपूर्ण व्यवस्थेचे यश आहे. बिबट्याला जगवणे, आजूबाजूच्या शहरी भागात प्रवेश करू न देणे यासाठी दोन गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. एक म्हणजे घनदाट झाडीसह लपण्यासाठी जागा तसंच शिकारीसाठी भरपूर प्राणी बिबट्याच्या जीवनशैलीसाठी अत्यावश्यक आहेत. इथे दोन्ही गोष्टी सहजपणे उपलब्ध आहेत. इथे घनदाट झाडी असलेले डोंगर आहेत, ज्यातील गुहांमध्ये बिबटे राहतात. तसंच बिबट्याच्या उदरभरणासाठी मोर, लंगूर, नील गाय व चितळ आहेत. साहजिकच झालनामध्ये तुम्हाला बिबट्या पाहण्याचा उत्तम अनुभव मिळतो व इथेच तुम्ही मोराने दिलेल्या इशाऱ्यावरून बिबट्याचा पाठलाग कसा करायचा हे शिकू शकता. एरवी तुम्ही चितळ किंवा सांबराच्या इशाऱ्यावरून सहजपणे त्याचा पाठलाग करू शकता. येथे सांबर, हरीण नाहीत व निलगाय ईशारा देत नाहीत त्यामुळे मोर व माकडांच्या आवाजावरूनच बिबट्याचे अस्तित्व शोधता येते.

तरीही भोवताली नजर फिरवत मी जेव्हा झालनामध्ये प्रवेश केला तेव्हा मला तिथे काय थरार अनुभवायला मिळेल याविषयी शंका होती. मी त्या पिवळसर करड्या भूमीतून नजर फिरवत होतो, आजूबाजूला कुणी शत्रू आहे का याचा इशारा देणाऱ्या आवाजांसाठी कान टवकारलेले होते व त्याचे अस्तित्व आजूबाजूला जाणवत होते. मात्र झालनाने मला आश्चर्याचा धक्का दिला. पुढील दोन दिवस आम्ही सतत धुळीनं माखलेल्या रस्त्यांवरून फिरत होतो. या अभयारण्याचे क्षेत्रफळ जेमतेम तीस चौरस किलोमीटरचे आहे, मात्र तरीही ते तुम्हाला आजूबाजूचे शहरीकरण विसरायला लावते. पाणवठ्यावर वाट पाहाणं, मोराचा इशारा, नील गाईंचं जीवाच्या आकांतानं पळणं आणि बिबट्याचं गुरगुरणं हा सगळा रोमांच आम्ही अनुभवला. माझ्यावर विश्वास ठेवा अगदी दिवसा ढवळ्या, जिप्सीमध्ये सुरक्षित असताना रागावलेला बिबट्या भोवताली गुरगुरत फिरत असताना तुमची पाचावर धारण बसते. मला कुमाऊँच्या गावकऱ्यांच्या मनातली भीती आठवली ज्याविषयी जिम कॉर्बेट यांनी त्यांच्या “रुद्रप्रयाग्ज लेपर्ड” या त्यांच्या पुस्तकात उल्लेख केला आहे. माझा आता त्यावर पूर्णपणे विश्वास बसला आहे, कारण माझ्या अंगावर दिवसाढवळ्या भीतीने शहारा आला. विचार करा कुडाच्या भिंती, व फळ्यांचे दार असलेल्या झोपडीत, मिट्ट अंधारात बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज ऐकून गावकऱ्यांची अवस्था कशी झाली असेल. मला जाणीव झाली की झालनामध्ये बिबट्या दिसणे सोपे नाही कारण तो आपल्या स्वभावानुसारच वागणार. म्हणूनच एकदा आम्ही पाणवठ्यापाशी वाट पाहात होतो, त्याचवेळी भोवतालच्या दाट झुडुपांमधून बिबट्याची मादी हळूच डोकावली. तेवढ्यात एका खाजगी गाडीची (त्यांना आत्तापर्यंत परवानगी होती, मात्र नशीबाने 1 मे 17 पासून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली) हालचाल झाली. मादीला पाहण्यासाठी इंजिन सुरु झाले, त्याचवेळी तिचे डोके दिसेनासे झाले व ती जंगलात गुडूप झाली.

येथे वनविभाग संवर्धनाचे प्रयत्न करतो आहे, मात्र थेट जंगलात एक काली मातेचे मंदिर आहे. इथे स्थानिकांना यायची परवानगी आहे, वाईट म्हणजे ते लंगूर, चितळ व नील गाईंसाठी खायला आणतात. मी दर्शनासाठी आलेल्या एका जोडप्याला या प्राण्यांना भजी खाऊ घालताना पाहिलं. ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये खाद्यपदार्थही टाकून देतात, हे थांबलं पाहिजे. एक लक्षात ठेवलं पाहिजे की झालनामध्ये फक्त बिबटे नाहीत तिथे इतरही बरंच वन्यजीवन आहे. त्यातही नेहमी मोठा रोमांच असतो, इथे आम्हाला मोरांची झुंज पहायला मिळाली. हे दृश्य मी जंगलात कधीही पाहिलं नव्हतं. मी एफबीवर त्याची छायाचित्रं व वर्णन टाकलं होतं ते इथे देतोय … ”आम्ही त्यांच्याकडे बघत नव्हतो तर दुर्लक्ष करत होतो कारण झालना बिबट्या अभयारण्यामध्ये मोर दिसणं नेहमीचंच होतं. आमचे डोळे पिवळे काळे ठिपके शोधत होते. त्यामध्ये मोराची भूमिका फक्त इशारा देण्यापुरती होती. झालनामध्ये चितळांची संख्या कमी आहे, नीलगायी भरपूर असल्या तरीही इशारा देण्यासाठी त्यांचा काही उपयोग नव्हता म्हणून संपूर्ण भिस्त मोरांवर होती. जेव्हा आम्ही दोन मोर एकमेकांभोवती गोलाकार फिरताना पाहिले तेव्हा आम्हाला हे नेहमीचं दृश्य आहे असं वाटलं. मात्र लवकरच आम्हाला जाणीव झाली की ती मादीवरून चाललेली झुंज होती. पुढची पंधरा मिनिटं आम्ही बिबट्याविषयी विसरून गेलो इतकी अटीतटीची झुंज झाली. त्यांची पिसं एकमेकांमध्ये गुंतली होती व तीक्ष्ण पंजे दुसऱ्याला मारायला सज्ज होते. ही झटापट इतक्या वेगाने सुरु होती की लक्ष केंद्रित करणे अशक्य होते. तरीही वन्यजीवन छायाचित्रण म्हणजे केवळ जास्तीत जास्त तपशील चित्रित करणे नाही तर अचूक क्षण टिपणे! हा देखील असाच एक क्षण होता.”

आम्हाला इथे जंगली ससेही दिसले, त्यातल्या एकाचे अगदी स्पष्ट छायाचित्र काढता आले. अनेक वर्षात मला असे करता आले नव्हते, ससे अतिशय लाजाळू असतात व छायाचित्रासाठी क्वचितच एका जागी थांबतात.

आपण सगळ्यांनीच विशेषतः पुण्यातल्या व महाराष्ट्रातील नगर विकास संस्थांनी झालनाला भेट दिली पाहिजे व झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणातही वन्यप्रदेशाचे कशाप्रकारे संवर्धन करता येईल व त्यासाठी पर्यटनाची कशी मदत घेता येईल हे पाहिले पाहिजे. एकेकाळी हे बिबटे समाजासाठी त्रासदायक ठरले होते व माणूस-प्राण्यातील संघर्ष टिपेला पोहोचला होता, अशावेळी झालनातील बिबटे नष्ट होणे हा एकमेव निकाल ठरला होता. मात्र थोडे सूज्ञपणे केलेले नियोजन व कृतींमुळे, माणूस व प्राणी दोघेही शांतपणे जगू व राहू शकले. मी वर नमूद केल्याप्रमाणे पुण्यातही असे काही भाग आहेत जिथे आपण पर्यटनासह बिबट्यांचे संवर्धन करू शकतो. कॉर्बेटने म्हटल्याप्रमाणे बिबट्या हा निःसंशय अतिशय सुंदर प्राणी आहे व अतिशय कठीण परिस्थितीतही तो टिकू शकतो. त्यामुळेच भारतातल्या बऱ्याच ठिकाणी तो अजूनही दिसतो. मात्र आता त्याच्यासमोर एक बलाढ्य शत्रू उभा ठाकल्यानं तो हतबल झाला आहे. हा शत्रू दुसरा कुणीही नसून तुम्ही आणि मीच आहोत, आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या भोवताली बिबट्यांचे वसतीस्थान नष्ट करण्यासाठी जबाबदार आहोत. आपल्यापैकी प्रत्येकाला जोपर्यंत आपला गुन्हा समजत नाही, त्यासाठी आपण शिक्षा स्वीकारत नाही तसेच बिबट्यांच्या संवर्धनासाठी योगदान देत नाही, तोपर्यंत हा देखणा प्राणी हळूहळू नामशेषच होत जाईल.

संजय देशपांडे

Mobile: 09822037109


Wednesday, 3 May 2017

रणथंबोर, वाघांचे वस्तीस्थान !




















“भारतामध्ये, पारपत्र किंवा ओळख पत्र नसतात तसेच विविध धर्मांचा पगडा मोठा असतानाही, ‘काळं पाणी’ ओलांडलेली काही माणसं त्याला अपवाद असतात- मला असं वाटतं भगवी वस्त्र घातलेला एखादा साधू किंवा हातात वाडगा घेऊन फिरणारा एखादा भिक्षेकरी किंवा टोपीवर व अथवा छातीवर चांदीचे क्रॉस मिरवणारा एखादा माणूस, अगदी खैबर खिंडीपासून ते केप कॉमोरिनपर्यंत बिनदिक्कतपणे भटकंती करू शकतो, त्यांना कुणीही कुठे किंवा कशाला जायचंय असं विचारणार नाही.”… जिम कॉर्बेट.

जिम कॉर्बेट यांचे वरील अवतरण द मॅन इटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मधील आहे. या पुस्तकात  ते माणूस व प्राण्यांमधील संस्मरणीय चकमकीच्या आठवणी सांगतात. त्याचप्रमाणे या प्रवासात जिथे चकमकी घडल्या त्या भूमीविषयी काही रोचक माहितीही सांगतात. जंगलाचा विषय सुरु करण्यासाठी हे अतिशय वेगळे अवतरण असले तरीही आपण दोन गोष्टी समजून घेतल्याशिवाय कोणत्याही जंगलाचे संरक्षण करता येणार नाही. एक म्हणजे जंगलाची भाषा व दुसरे म्हणजे  जंगलातील व जंगलाभोवतीच्या लोकांची मानसिकता जे जंगलाचे एक प्रकारे रक्षक किंवा भक्षक पण असतात. जिम कॉर्बेट यांना या दोन्ही गोष्टी अतिशय चांगल्याप्रकारे समजल्या होत्या, एवढेच नाही तर त्यामध्ये त्यांचा हातखंडा होता कारण आयुष्याचा बहुतेक काळ त्यांचे वास्तव्य जंगलातच होते. लहानपणापासूनच ते माझा आदर्श आहेत तसेच जंगलांच्या अधिकाधिक जवळ येण्याचे कारणही. एप्रिल अखेर आली की आमच्या वन्यजीवप्रेमी मंडळींचा गट (काही सम आवड असणारेमित्र) जंगलाच्या आमच्या वार्षिक भेटीसाठी सज्ज होतात. यावेळी रणथंबोर तसेच झालना बिबट्या अभयारण्य या फारशा माहिती नसलेल्या ठिकाणाला भेट दिली, ज्याचा अनुभव मी पुढे देणारच आहे. मला माझी चौदा वर्षांपूर्वीची मे महिन्यातली भेट आठवली. मी निस्सीम वन्यजीवप्रेमी असूनही मला मोकळेपणाने सांगावसं वाटतं की जंगल पाहून अतिशय उदास वाटलं असं रणथंबोर हे पहिलंच जंगल होतं. राजस्थानातला अतिशय कडक उन्हाळा होता. मी आत्तापर्यंत ज्या जंगलांना भेट दिलीय त्यात अगदी मेळघाटातही उन्हाळ्यात सगळी पाने गळून पडली तरी एक हिरवी छटा कायम असते. रणथंबोरमध्ये मात्र तुम्हाला सगळीकडे पिवळ्या व करड्या रंगाच्या छटा दिसतात. इथे जास्त उंच झाडं दिसतच नाहीत, सगळीकडे झुडुपं व खुरटी झाडं असतात व या पार्श्वभूमीवर लाल दगडातला रणथंबोर किल्ला दिमाखात उभा असतो! उन्हामुळे सांबराचा फरचा कोटही जीर्णशीर्ण झालेला असतो. मात्र मी जेव्हा जोगी महाल व राजबाग तलाव पाहिला, तसंच आजूबाजूच्या भागात भटकंती केली तेव्हा मला रणथंबोरमध्ये देशाच्या इतर भागातील कोणत्याही जंगलापेक्षा वाघांची सर्वाधिक छायाचित्रे का घेतली जातात हे जाणवलं. उन्हानं तळपणाऱ्या काळपट करडी छटा असलेल्या या प्रदेशात प्रथमदर्शनी भकास वाटलं तरीही तो पिवळ्या काळ्या पट्ट्यांसाठी अतिशय सुरेख कॅनव्हास बनतो. त्यातच रणथंबोर किल्ल्यामुळे प्रत्येक छायाचित्राला एक सुरेख पार्श्वभूमी मिळते व ते अतिशय संस्मरणीय होतं. त्यानंतर मी रणथंबोरच्या जंगलाच्या  प्रेमातच पडलो कारण प्रत्येक करड्या रंगात एक हिरवी छटा असते याची मला जाणीव झाली.

आमची यावेळची सहलही त्याला अपवाद नव्हती. मी माझ्या मित्रांना हे जंगल पहिल्यांदा पाहिल्यानंतर मला कसं वाटतं व 44 अंश सेल्सिअस तापमानासाठी, तसंच तुमच्या जीपला वेढणाऱ्या धुळीच्या लोटांसाठी तयार राहा अशी कल्पना दिली होती. दिल्लीला उतरल्यानंतर आग्र्याला जाण्याच्या रस्त्यावर आम्हाला जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल तसंच आमच्या लष्करातल्या एका मित्रामुळे आग्रा हवाई तळ पाहायला मिळाला. आम्ही सवाई माधोपूरला पहाटे 2 वाजता पोहोचलो, जो रणथंबोरचा एक प्रकारे शेजारी आहे. जंगल सफारी पहाटे सहा वाजता सुरु होणार होती त्यामुळे आम्हाला पाच वाजता उठणं भाग होतं. मी जेमतेम दोन तास झोपून तयार झालो. डोळ्यांवर झोप होती मात्र मन प्रसन्न होतं. मी आधीही सांगितल्याप्रमाणे जंगलातली ताजी ऑक्सिजननं भरलेली हवा तुमचा थकवा घालवून टाकते. त्याचशिवाय वाघच नाही तर इतरही प्राण्यांचा (मात्र मनात कुठेतरी वाघाचाच विचार सुरु असतो) शोध घ्यायच्या विचारानं झोप कुठल्या कुठे पळून जाते. रणथंबोरमध्ये वाघ पाहण्यासाठी निघालेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ती 10 मार्गांमध्ये विभागली जातात. आम्हाला मार्ग 2 देण्यात आला होता. ही मार्ग व्यवस्था गाईड व जिप्सी चालकांना फारशी आवडत नाही कारण अभयारण्याचे अधिकारी त्याची धोरणे सतत बदलत असल्यामुळे गोंधळ होतो अशी त्यांची प्रतिक्रिया होती. मुख्य तक्रार अशी होती की ज्या मार्गावर सर्वाधिक वाघ दिसतात ते मार्ग अभयारण्याचे अधिकारी बंद करतात. यामुळे अनेक पर्यटकांना वाघ दिसत नाही व ते त्याचसाठी तर जंगलात आलेले असतात. रणथंबोरला येण्यापूर्वी आम्हाला माहिती मिळाली होती की एक व दोन मार्गावर रणथंबोरचं मुख्य आकर्षण असलेल्या दोन वाघिणी बछड्यांसोबत आहेत, त्यामुळेच आम्ही या मार्गाची निवड केली होती. केवळ वाघच नाही तर इतरही अनेक प्रजाती न दिसण्याची निराशा टाळण्यासाठी जंगलाला भेट देण्यापूर्वी त्याविषयी आधी माहिती घेणे अतिशय महत्वाचे आहे. एक म्हणजे उन्हाळ्यातली पाण्याची परिस्थिती, जर एखाद्या मार्गावर किंवा विभागात पुरेशी पाणतळी किंवा पाण्याचे नैसर्गिक स्रोत नसतील तर बहुतेक प्राणी त्या भागातून निघून जातात त्यामुळे तुम्हाला फक्त झाडंच न्याहाळत बसावी लागतात. त्याचप्रमाणे अतिशय महत्वाचा घटक म्हणजे बछडे असलेल्या वाघिणीविषयी माहिती किंवा एखाद्या विशिष्ट वाघाने नुकतीच शिकार केली असल्यास त्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे कारण याच दोन मुख्य कारणांमुळे वाघ जंगलामध्ये एका विशिष्ट भागात जास्त वेळ राहतो. वाघ एकाच भागात राहिल्यास तो दिसण्याची शक्यता जास्त असते. त्याप्रमाणे रणथंबोरच्या कडक उन्हाळ्यात संपूर्ण जीवनचक्रच पाणवठ्याभोवती फिरत असते त्यामुळे सर्वाधिक घडामोड इथेच होते. या पाणवठ्यांच्याभोवती पँगोलीन, ससा किंवा मुंगूस यासारखे लहान प्राणी व पक्षी पाहणे शक्य आहे. त्यामुळे वाघ दिसावा म्हणून अशा मार्गांवर किंवा भागांमध्ये फिरणे महत्वाचे आहे. याच कारणामुळे पर्यटक नंतर तक्रार करतात की त्यांना त्यांच्या सफारीमध्ये वन्यप्राणी अजिबात दिसले नाहीत कारण ज्या भागातून बहुतेक प्राण्यांनी जंगलाच्या इतर विभागात किंवा भागांमध्ये स्थलांतर केले आहे तेथेच ते फिरत राहतात.

त्याचदिवशी मी अर्ध्या दिवसाची सफारी घेतली होती. इथे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये काही दुर्मिळ क्षण हमखास टिपता येतात. अर्ध्या किंवा पूर्ण दिवसाची सफारी घेतली तर बाकीच्या सफारीमधल्या वाहनांना बाहेर पडावं लागलं तरीही तुमच्या वाहनाला अगदी दुपारीही जंगलात थांबता येतं. यातला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे तुमच्या जिप्सीला मार्गाचं किंवा विभागाचं बंधन राहात नाही, ती जंगलातल्या पर्यटकांसाठी खुल्या भागात कुठेही फिरू शकते. मात्र सामान्य सफारीच्या वाहनांकडून मिळालेली माहिती अतिशय महत्वाची असते, कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या सफारीचा मार्ग बदलू शकता, त्यामुळे तुम्हाला वाघ किंवा प्राणी हमखास दिसू शकतात. अर्थात तुम्ही जेव्हा अर्धा किंवा पूर्ण दिवसाचं आरक्षण करता तेव्हा तिथल्या वन्य जीवनाची काय परिस्थिती आहे याची व्यवस्थित माहिती करून घ्या. नाहीतर ही सफारी महाग असल्याने तुमचे पैसे वाया जाऊ शकतात. अगदी पूर्ण दिवसाची सफारी घेऊनही वाघ किंवा इतर प्राणी न दिसलेले लोकही मला भेटले आहेत. लक्षात ठेवा व्यवस्थित माहिती घेतली असली, तसंच पूर्ण दिवसाची सफारी असली तरीही जंगल विस्तीर्ण असल्याने वाघ नशीबानीच दिसतो. त्यामुळेच माझा असा सल्ला आहे की फक्त वाघावर लक्ष केंद्रित करू नका, त्याऐवजी तुम्ही जास्तीत जास्त वन्य जीवन पाहण्याचा प्रयत्न करा. विशेषतः रणथंबोरसारख्या जंगलामध्ये उन्हाळ्यात दुपारी प्रचंड उष्मा असल्याने सगळे प्राणी पाणवठ्यापाशी किंवा सावलीच्या शोधात जातात.

स्वाभाविकपणे जंगलातल्या पाणवठ्यांवर वाघांचा पहिला हक्क असतो. वाघ बहुतेकवेळा दुपारी पाण्यापाशी किंवा जवळपास सावलीत विश्रांती घेत असतात. विशेषतः शिकारीचे कच्चे मांस खाल्ल्यानंतर वाघाच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण होते. म्हणूनच थंड वाटावे यासाठी तो पाण्यात जाऊन बसतो. अशावेळी वाघाला काही उपद्रव न करता तुम्ही तासन् तास छायाचित्रे काढू शकता. पाणवठ्यावर आल्यावर त्यात वाघ बसलेला पाहून इतर प्राण्यांच्या प्रतिक्रिया बघायला मजा येते. पाण्यातही वाघ शक्यतो झाडांची सावली असलेल्या भागात बसतो, डोके थोडेसे पाण्याच्या वर ठेवून बाकी शरीर पूर्णपणे पाण्यात बुडालेले असते. यामुळेच इतर प्राण्यांना अतिशय धक्का बसतो कारण पाणवठ्याच्या अगदी जवळ येईपर्यंत इथे वाघ बसलेला आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही, प्रत्येक प्राणी वाघ पाहून वेगळी प्रतिक्रिया देतो. अशाच एका पाणवठ्यावर दोन नर वाघ आरामात पहुडले होते व त्यांची भरपूर छायाचित्रे काढल्यानंतर मी कॅमेरा बाजूला ठेवला व इतर प्राण्यांचे निरक्षण करू लागलो. चितळांचा एक कळप पाणवठ्याकडे चालला होता, त्यांनी वाघांना पाहिल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढला, त्यानंतर संपूर्ण कळप पाणी न पिता पळत सुटला. कोतवालासारख्या पक्षांना मात्र वाघ आपल्याला काहीही करणार नाही याची खात्री असल्यामुळे ते आरामात असतात. एक मोर दबक्या पावलांनी आला, पाण्याकडे पाहात बराच वेळ वाट पाहिली व पाणी न पिता परत निघून गेला. एक लांडोर आली व ती वाघाकडे बघत होती. शेवटी तिच्या तहानेने भीतीवर मात केली. तिने पाणवठ्याच्या  वाघ बसलेल्या विरुद्ध कोपऱ्यातुन  जाऊन पाणी प्यायले व पळून गेली. वाघाला यापैकी कोणत्याही प्राण्यांमध्ये काहीही रस नव्हता तरीही तो कुतुहलाने लांडोरीकडे बघत होता. मी जंगलातली ही खास दृश्य पाहण्यात गुंगून गेलो होतो. प्राण्यांच्या या निरीक्षणामुळेच आम्हाला वाघ शोधायला अनेक वेळा मदत झाली. आमच्या एका सफारीमध्ये चालकाला एक सांबरांचा कळप दिसला. सगळ्यांच्या शेपट्या ताठ झालेल्या व उथळ भागातील एका पाणवठ्याच्या दिशेने ते काळजीपूर्वक चालले होते. आम्हाला समजलं की सांबरांना पाण्यात काय धोका आहे हे समजलं नव्हतं तरीही एका सांबराने अचानक इशारा दिला होता. आम्हाला खात्री पटली की सांबराला वाघ प्रत्यक्ष दिसल्याशिवाय ते इशारा देत नाही. त्यामुळे आम्ही पाणवठ्याच्या दिशेने निघालो. आम्हाला पाण्यातून नुकताच बाहेर येत असलेला वाघ दिसला. याच सगळ्या अनुभवांमुळे जंगलाचा अनुभव संस्मरणीय होतो कारण तुम्हाला जंगलाची भाषा समजू लागलेली असते. मला वाटते की जंगलाचा हाच खरा अनुभव आहे. वाघाची छायाचित्रे घेणे हा एक भाग झाला व संपूर्ण जंगल त्याच्या सान्निध्यात कसे वागते हे अनुभवणे म्हणजे जंगल जाणून घेणे, जंगल जगणे, यामुळे तुम्ही जंगलावर मनापासून प्रेम करू लागता व तुम्हाला जंगलात पुन्हा पुन्हा यायची ओढ लागते.

त्यानंतर दुसऱ्या जिप्सीतले आमचे इतर मित्र आमच्यासोबत आले व त्यांनी आम्हाला नूर नावाच्या एका वाघिणीसोबत बछडे दिसल्याचे सांगितले. ज्यांना व्याघ्र प्रकल्पांविषयी फारशी माहिती नसते त्यांना सांगतो, सर्व जंगलांमधील व्याघ्र प्रकल्पांची सर्वोच्च प्रशासकीय संस्था असलेल्या व्याघ्र प्राधिकरणाने वाघांना त्यांच्या क्रमांकाने ओळखले जावे त्यांच्या नावाने नाही असा निर्णय घेतला आहे. तांत्रिकदृष्ट्या हे तर्कशुद्ध असले तरीही टी19 किंवा टी 60 अशा नावांनी हाक मारण्यापेक्षा स्थानिकांनी किंवा गाईडने वाघांना नावं दिलेली असल्यामुळे ते अधिक ओळखीचे वाटतात. केवळ क्रमांक वापरल्यानंतर आपण वाघासारख्या रुबाबदार प्राण्याविषयी नाही तर कुणा यंत्राविषयी बोलतोय असं वाटतं. तरीही अनेक ठिकाणी गाईड, जिप्सीचालक व अगदी जंगलाचे सुरक्षा रक्षकही वाघांना त्यांनी दिलेल्या नावानेच हाक मारतात. त्यामुळे आम्ही आमच्या मित्रांनी सांगितलेल्या ठिकाणी लगेच गेलो आणि आश्चर्य म्हणजे आम्हाला तिथे नूर तिच्या जेमतेम सात ते आठ महिन्यांच्या बछड्यांसोबत दिसली. या वयाचे बछडे अतिशय खेळकर असतात व आई आरामात सावलीत पहुडलेली असताना ते तिच्या अवतीभोवती खिदळत असतात. बछड्यांसोबत असलेल्या वाघिणीचं वागणं पाहणं अतिशय रोचक असतं कारण त्यांना सुरक्षित ठेवून त्यांना खाऊ घालणं असं अतिशय अवघड काम तिला करायचं असतं. त्यानंतर बछडे जेव्हा वयाने वर्षाहूनही लहान असतात ते चित्त्याचे भक्ष्य ठरू शकतात, त्यामुळे तिला बछड्यांना जवळपास ठेवूनच शिकारीसाठी जावं लागतं. वाघ होणं हे काही सोपं नसतं. असं म्हणतात की वाघ पन्नास वेळा प्रयत्न करतो तेव्हा त्याला एकदा शिकार मिळते. रणथंबोरच्या कडक उन्हाळ्यात जंगलात फिरून, सावज शोधून त्याची शिकार करणं हे अतिशय थकवणारं असतं. यावेळी दौऱ्यात आम्हाला नूर अनेकदा तिचे बछडे तसेच इतर वाघिणींसोबत दिसली, सावजाचा पाठलाग करताना ती खरोखरच दमलेली दिसत होती.आम्हाला टी19 नावाची एक वाघीण तिच्या जेमतेम दोन महिन्यांच्या बछड्यांसोबत पाहायला मिळाली, ते साधारण मोठ्या मांजरीच्या आकाराचे होते, मात्र वयात येणाऱ्या वाघाची सगळी वैशिष्ट्य त्यांच्यात होती. बछडी एवढी लहान असताना वाघीण अतिशय सतर्क असते व इथे तर ती शिकारीसाठी आली होती. टी19 (ऐकायला किती कंटाळवाणं वाटतं) एका सांबर हरिणाच्या शिकारीपाशी सावलीत आरामात बसलेली होती व तिच्या नजरेच्या टप्प्यात तिचे दोन बछडे होते. मी वाघाचे इतके लहान बछडे पूर्वी कधीच पाहिले नव्हते. केवळ शिकारीमुळे वाघिणीनं त्यांना असं उघड्यावर आणलं होतं, एरवी तिनं असं कधीच केलं नसतं.

आम्ही एका नर वाघाला असंच बसलेलं पाहिलं तेव्हा आम्हाला एक धक्कादायक अनुभव आला. त्यांच्या पंजामध्ये काहीतरी पांढरी वस्तू होती. झुडुपांमधून दुरून पाहताना तो एखादा मारलेला बगळा असावा व वाघ त्याच्या पिसांशी खेळतोय असं वाटलं. मात्र जेव्हा वाघ उघड्यावर आला तेव्हा मला धक्काच बसला, त्याच्या तोंडात कणकेची प्लॅस्टिकची पिशवी होती, त्यामुळे तो शहरातल्या रस्त्यांवरच्या भटक्या कुत्र्यांसारखा दिसत होता. हे कुणा पर्यटकांच्या वाहनामुळे झाले नव्हते. सुरक्षा रक्षकाने सांगितले की आरटीआरमध्ये मार्ग 2वर भैरोजी मंदिर आहे व स्थानिक आदिवासी अजुनही चोरून तिथे दर्शनासाठी येतात व असा कचरा करून जातात, त्याचाच हा परिणाम होता. इथे जिम कॉर्बेटची जंगलाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांविषयीची समज अतिशय महत्वाची ठरते. त्यामुळे आपल्याला लोकांना जुनाट परंपरांमुळे जंगलांचे नुकसान करू नका याची जाणीव करून देता येईल. आपला धर्म व वन्य जीवन वेगळं ठेवण्याची वेळ आता आली आहे नाहीतर आम्हाला दिसलेलं दृश्य सर्रास दिसू लागेल. वनविभाग गावकऱ्यांना जागरुक करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊ शकतो, त्याचशिवाय अशी ठिकाणं स्वच्छ ठेवण्यासाठी किमान काही कर्मचारी नियुक्त करू शकतो. कोणत्याही शस्त्रांशिवाय, पायी फिरून गस्त घालणाऱ्या वनरक्षकांना पुरेशी मदत देणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जंगलांमध्ये सगळ्याच वनरक्षकांकडे इतरांच्या संपर्कात राहण्यासाठी वॉकी-टॉकीसारखी बिनतारी संदेश यंत्रणा सुद्धा नसते. वाघ जंगलात वावरत असताना अशाप्रकारे पायी गस्त घालणे वनरक्षकांना धोकादायक वाटते व ही चिंता त्यांनी मला बोलून दाखवली आहे. आपल्याला नॅशनल जिओग्राफिक चॅनलमध्ये दिसते की इतर सर्व देशातल्या वनरक्षकांकडे अतिशय आधुनिक साधनं असतात. त्यांच्याकडे चार चाकी वाहनांनी गस्त घालण्यापासून ते बंदुकींपर्यंत सर्व काही सुसज्ज असते. मग आपणच आपल्या रक्षकांना अशी साधने का देत नाही हा मोठा प्रश्न आहे. मात्र तरीही आपण या वन रक्षकांनी आपला जीव धोक्यात घालून वाघ तसंच वन्य जीवनाचे रक्षण करावे अशी अपेक्षा करतो!

त्यानंतरचे चार दिवस भुर्रकन् उडून गेले कारण शेवटचे दोन दिवस आम्हाला झालना बिबट्या अभयारण्याला भेट द्यायची होती. ते जयपूरसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. त्याविषयी मी एक वेगळा लेख लिहीनच. हे अभयारण्य मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाप्रमाणे शहरी भागाने वेगढलेले असूनही अतिशय छान ठेवण्यात आले आहे. मित्रांनो आपल्यापैकी अनेकांनी त्यांच्या आयुष्यात कधीच जंगलाला भेट दिलेली नसते. अगदी जवळपासची वनराईही पाहिलेली नसते, मी दोन कारणांसाठी असे करण्याची शिफारस करतो. एक म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात तुम्हाला स्वतःविषयी अनेक गोष्टींची विशेषतः तुमच्या शारीरिक मर्यादांची जाणीव होते. मनुष्यप्राणी स्वतःला अतिशय प्रगल्भ व हुशार प्रजाती मानतो. मात्र एका लहानशा मुंगीचं उदाहरण घ्या व ती किती सुंदर वारूळ तयार करते ते पाहा. विचार केला तर त्यासाठी कोणतीही ऑटो-कॅड ड्रॉईंग नसतात, सल्लागार नसतो किंवा जेसीबीसारखी यंत्रसामग्रीची मदत नसते. तरीही एक लहानशी मुंगी तिच्यापेक्षा लाखोपटींनी मोठे वारूळ उभारते. आपण मात्र तब्बल सहा वर्षांच्या काळात सगळ्या आधुनिक साधनसामग्रींची मदत घेऊन बुर्ज खलिफासारखी इमारत उभारतो व स्वतःला महान समजतो! आता स्वतःलाच प्रश्न विचारा की अधिक प्रगल्भ व हुशार कोण आहे, माणूस की मुंगी? अशा अनेक उदाहरणांमध्ये तुम्हाला जंगल शिकायला मिळते व दुसरे म्हणजे तुम्ही तुमच्या ज्ञानेंद्रियांचा विशेषतः निरीक्षण शक्तिचा अधिक परिणामकारकपणे वापर करायला शिकता. 

लक्षात ठेवा, जंगलात काही घटना कोणत्याही हेतूशिवाय घडत नाही. तुम्हाला जंगल खऱ्या अर्थानं उपभोगायचं असेल तर तुम्ही तुमची सगळी ज्ञानेंद्रिये सतर्क ठेवली पाहिजेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या समोर घडणाऱ्या गोष्टींचा उलगडा होईल! म्हणूनच तुम्हाला जंगलात जे शिकायला मिळतं ते तुम्हाला कोणत्याही महाविद्यालयात किंवा संस्थेतही शिकायला मिळणार नाही असं मला वाटतं. त्यासाठी प्रत्येकाने किमान एकदा तरी जंगलाला भेट दिली पाहिजे. त्यासाठी आधी जंगलांचे संवर्धन करणे आवश्यक आहे, कारण वन्य जीवनच उरले नाही तर आपण आपल्या सर्वोत्तम शिक्षकाला मुकू. त्याचसोबत आपल्या भविष्याचे दरवाजेही बंद होतील!


संजय देशपांडे

Mobile: 09822037109