Sunday, 18 August 2019

पाऊस , नद्या आणि पुर

























नदी आपल्याला अनेक गोष्टी शिकवते, मात्र तिची सर्वात महत्वाची शिकवण आहेतुमच्याभोवती काहीही होत असेल तरीही, तुम्ही तुमच्या मार्गावरून तुमच्या उद्दिष्टाच्या दिशेने वाहात राहा!” … मेहमत मुरात इल्दान.

मेहमत मुरात इल्दान, हा तुर्की लेखक व नाटकार आहे. एवढंच नाही तर तो एक अर्थतज्ञही आहे. म्हणूनच आपल्या लेखनातून नदीचं वर्णन करताना त्याचे तर्कशुद्ध विचार जाणवतात. आपल्या तथाकथित विकसित राज्यानं ह्या पावसाळयातील गेल्या पंधरवड्यात जे काही अनुभवलं त्यासाठी मेहमतच्या अवतरणाचा काही भाग अतिशय योग्यप्रकारे लागू होतो, की नदी तिच्या उद्दिष्टाच्या दिशेने वाहत असते. तुम्ही तिच्या प्रवाहात अडथळे आणले तर त्याचे परिणाम काय होतील हे आता तरी तुम्हाला माहिती झालं असेल. अजूनही काही लोक असे असतील की ज्यांना आपल्या राज्याच्या पश्चिम भागात नदीमुळे काय हाहाकार उडाला हे माहिती नसेल किंवा त्याचा परिणाम न होण्याइतके ते सुदैवी असतील. मी त्यांना दोष देत नाही, कारण पावसामुळे व नद्यांना पूर आल्यामुळे ज्यांच्यावर आपत्ती ओढवली ते निष्पाप लोक (त्यांच्यापैकी बहुतेक खरंच निष्पाप आहेत) अगदी अलिकडच्या काळापर्यंत या समस्येविषयी अनभिज्ञ होते किंवा सुदैवी होते. मी पुरग्रस्तांच्या भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा. पावसामुळे व नद्यांमुळे जे काही नुकसान झालं त्याविषयी मला मनापासून वाईट वाटतं व माझ्यापरीनं जी काही मदत करता येईल ती मी करणार आहे. पण मला सांगा आपण केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून हा विषय सोडून देऊ शकतो का?माध्यमांमध्ये यावर जोरदार चर्चा सुरू आहे. तज्ञ (त्यात पर्यावरणवादीही आले) नेहमीप्रमाणे यंत्रणेतील सगळ्यांना दोष देत आहेत ज्यामध्ये सरकार (जलसिंचन ते नगरविकास अशा विविध विभागांचे व स्थानिक संस्थांचे अधिकारी), लोकप्रतिनिधी (नगरसेवक, आमदार व मंत्री) असा सगळ्यांचा समावेश होतो. त्याशिवाय सर्वात मोठा खलनायक बांधकाम व्यावसायिकाला कसं विसरता येईल. माध्यमे व सर्व संबंधितांनुसार वरील सर्व वर्गवाऱ्या पुरासाठी व त्यामुळे सामान्य माणसाचे जे नुकसान झाले आहे त्यासाठी कारणीभूत आहेत.

नुकत्याच आलेल्या प्रलयंकारी पुरासाठी जी कारणं दिली जात आहेत त्यामध्ये या तिन्ही वर्गवाऱ्यांनी आपल्या फायद्यासाठी किंवा हव्यासापोटी नद्यांवर (पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांवर) अतिक्रमण केलं. त्यामुळे नद्यांचा प्रवाह आकसला किंवा त्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली. यंदा शतकातील (100 वर्षातील) सर्वाधिक पाऊस झाला. या प्रचंड पावसामुळे पूर आला (पाणी जमीनीत झिरपले नाही पृष्ठभागावर वाहू लागले). नदीचा प्रवाह आकसल्यामुळे पाणी चहूबाजूनी पसरले, त्यामुळे अभूतपूर्व पूरपरिस्थिती निर्माण झालीअसं सगळ्यांचं मत आहे ,तर नक्की काय घडलंय ?

खरंतर अति पावसामुळे व नद्यांचे प्रवाह बदलल्यामुळे पूर आला अशी एका वाक्यात कारणमीमांसा करता येईल. मात्र हे सगळे एका रात्रीत किंवा काही महिन्यात किंवा वर्षात झाले कातर अजिबात नाही, आपल्या या तथाकथित विकसित राज्यात अनेक दशकांपासून प्रत्येक गावातील व शहरातील नैसर्गिक जलस्रोतांवर अतिक्रमण सुरू आहे. ते सामान्यपणे घराची गरज किंवा असंही नदीला पाणीच नाही किंवा आजकाल मुसळधार पाऊस पडत नाही किंवा शहरात पायाभूत सुविधा उभारणे (नदीतून मेट्रोचा मार्ग) किंवा शहराचे सुशोभीकरण अशा विविध नावांखाली केलं जातं. खरंतर या विविध नावांखाली आपण निसर्गा निसर्गाचे अक्षरशः लचके तोडले आहेत. मी लेखात असा कठोर शब्द वापरल्याबद्दल मला माफ करा मात्र आपण आपल्या नद्या तसंच नैसर्गिक जलस्रोतांचं जे करून ठेवलंय त्याचं वर्णन करण्यासाठी मला हाच शब्द योग्य वाटतो. आता अनेक जण मला ढोंगीही म्हणून शकतील कारण मी पण एक स्थापत्य अभियंता व बांधकाम व्यावसायिक आहे व मी सुद्धा या गुन्ह्यात सहभागी आहे.  माझा व्यवसाय जो काही आहे तो आहेच, मात्र कुणीही असं म्हटलेलं नाही की गरजूंसाठी घरं बांधू नका किंवा नद्या सुशोभित करू नका किंवा शहरासाठी पायाभूत सुविधा उभारू नका किंवा स्मार्ट शहरे उभारू नका. आपल्याला शहरे किंवा गावे विकसित करण्याचा अधिकार आहे, पण (हा पण अतिशय महत्वाचा आहे) निसर्गाला हात न लावता व नद्या या निसर्गाचा अतिशय महत्वाचा भाग आहेत. नाहीतर निसर्ग (म्हणजेच नद्या) आपण जसं त्याला मनमानीपणे वागवतो तसंच आपल्यालाही वागवायला स्वतंत्र आहे. आपण हे वेळोवेळी अनुभवलंय.

माणूस (विशेषतः आपल्या राज्यातील) स्वतःला अतिशय हुशार समजत असला तरी तो खरंतर मूर्खच  असतो. कारण फक्त मूर्खालाच असं वाटतं की तो अतिशय हुशार आहे, मात्र प्रत्येक कृतीतून तो मूर्ख असल्याचं दाखवून देत असतो. आपल्यावर जेव्हा पूर्वी कधीही किंवा सध्या जशी नैसर्गिक आपत्ती आलीय तेव्हा आपल्या प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद पाहा. बचावकार्यासाठी जाणाऱ्या पथकातील प्रसिद्ध व्यक्ती (हसरे) सेल्फी काढण्यात गुंग असतात. त्याव्यतिरिक्त आपण केवळ समित्या व त्यांच्या उपसमित्या स्थापन करतो ज्यामध्ये तेच जुने चेहरे असतात, जे अशा आपत्तींना स्वतःच कारणीभूत असतात किंवा अशा आपत्तींचा अंदाज बांधण्यात किंवा त्या रोखण्यात अपयशी ठरलेले असतात. या समित्यांमधले हे जुने चेहरे काय करावे व काय टाळावे अशा स्वरूपाचे जुनाट अहवाल तयार करतात. यासंदर्भात नदीच्या निळ्या पूररेषा व लाल पूररेषा ठरवणे किंवा धरणांमधून पाण्याचा विसर्ग किंवा पावसाच्या पाण्याचे संधारण करण्याविषयी जागरुकता निर्माण करणे इत्यादी घटकांचा त्यामध्ये समावेश होतो. काही दिवस जातात व कालांतराने सगळे पढत मूर्ख आपत्ती विसरतात. जुनाट समित्यांनी सादर केलेले अहवाल कपाटात बंद केले जातात व नदी पात्रांमधील अतिक्रमणे सुरूच राहतात. पावसाच्या पाण्याचे संधारण करण्याविषयी केवळ जागरुकता निर्माण केली जाते (म्हणजे स्थानिक संस्था व त्यांचे वरिष्ठ), आपले शासनकर्ते (म्हणजे स्थानिक संस्थांचे निवडून आलेले सदस्य व त्यांचे अधिकारी) जमीनीच्या प्रत्येक इंचाचे काँक्रिटीकरण करतात. ज्या यंत्रणेनं (म्हणजे अधिकाऱ्यांनी) धरणे व पाण्याचा विसर्ग नियंत्रित करणे अपेक्षित आहे ती केवळ मंत्र्यांची व त्यांच्या अधिकाऱ्यांची खुशामत करताना दिसते, त्यांच्या प्राधान्यानुसार वागते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचे प्राधान्य कशाला असते. अगदी माध्यमेही याकडे दुर्लक्ष करतात व वाचकांसाठी सतत नवनवीन मथळ्यांच्या शोधात असतात. एखादी नवीन आपत्ती येईपर्यंत सगळे मूर्ख आनंदाने जगत असतात. मला असं म्हणायचं नाही की संपूर्ण यंत्रणाच (सरकार) वाईट आहे व सर्व जण मूर्ख आहेत. यंत्रणेमध्ये अर्थातच अशी काही माणसं आहेत जी एकएकटी लढाई लढत असतात व योग्य त्या गोष्टी करायचा प्रयत्न करतात. मात्र त्यांची संख्या कमी आहे व सरकार नावाची यंत्रणा अशा लोकांना कोपऱ्यात बसवून एखादं कारकुनी काम करायला लावते ही वस्तुस्थिती आहे.

मी वैतागल्यामुळे वा चिडल्याने वा उपहासानं असे बोलतोय का, तर याचं उत्तर निश्चितपणे हो असं आहे. आपण सगळे जाणतो की नदीच्या पुराची समस्या हाताळायची असते तेव्हा आपण सगळे एकमेकांना दोष देतो व पुराच्या मूलभूत कारणाकडे दुर्लक्ष करतो हे कटू सत्य आहे. स्मार्ट पुणे शहर व तिच्या नद्यांचे एक साधे उदाहरण घ्या. संबंधित सरकारी संस्थांना म्हणजेच जलसिंचन विभाग व पुणे महानगरपालिकेला शहराच्या हद्दीत मुळा व मुठेच्या दोन्ही किनाऱ्यांवर 100 वर्षांमधील पुराची पातळी म्हणजे लाल रेषा निश्चित करण्यास व निळी रेषा म्हणजे गेल्या 25 वर्षांमधील पुराची पातळी ठरवण्यास कुणी मनाई केली आहेनिळ्या रेषेंतर्गत कोणतेही बांधकाम पूर्णपणे मनाई करा व निळ्या व लाल रेषांदरम्यान केवळ मर्यादित बांधकामांना परवानगी द्या. नदीचे पात्र म्हणजेच जलस्रोत स्वच्छ राहील याची खात्री करण्यासाठी या साध्या नियमाचे पालन होणे आवश्यक आहे. अर्थातच कुणी एक बांधकाम व्यावसायिक किंवा बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेमध्ये निळी किंवा लाल रेषा ठरविण्यापासून सरकारला रोखण्याची क्षमता नाही. असती तर आम्ही नदी पात्रही मोकळे सोडले नसते, नाही का? मी बांधकाम व्यावसायिकांचं समर्थन करत नाही कारण त्यांना जमीनीच्या प्रत्येक तुकड्यावर बांधकाम करायची इच्छा असते (त्यांच्यापैकी काही जणांना असते) जो कधीकाळी एखाद्या नदीचा भाग होता. मात्र काही बांधकाम व्यावसायिकांच्या सांगण्यावरून नदीचा प्रवाह वळवणारी यंत्रणा (म्हणजेच सरकार) अधिक दोषी नाही काया पूर आपत्तीचे कारण नदी पात्रं सुरक्षित न ठेवणे एवढेच नाही तर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने सुरू असलेली वृक्षतोडही त्याला तितकीच कारणीभूत आहे हे आपण समजून घेतलं नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं. तुम्ही जंगलाच्या बाबतीतली आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की वाघांची संख्या वाढली आहे मात्र राज्यभरात त्यांचे वसतिस्थान (जंगलाचा आकार) बरेच कमी झाले आहे. हे आपण केवळ अभयारण्यांविषयी बोलत आहोत मात्र धरणे किंवा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील संरक्षण नसलेल्या जंगलाची काय परिस्थिती आहे याकडे लक्षं द्यायला कुणाला वेळच नाही. गेल्या अनेक वर्षात झाडे कमी होत असल्यामुळेजमीनीत न झिरपता नद्या व धरणांमध्ये जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पावसानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचे आपले पूर्वापार चालत आलेले गणित चुकू लागले आहे व आपण मात्र निसर्गाला दोष देतो. त्यामुळे सगळ्यात मुख्य चूक म्हणजे (खरंतर गुन्हा म्हणा) फक्त व्याघ्र प्रकल्पातच नाही तर सगळीकडे पुरेसे वृक्ष संवर्धन न करणे. याची जबाबदारी कुणाची आहे, बांधकाम व्यावसायिकांचीवृक्षारोपण व संवर्धन करणे ही केवळ बांधकाम व्यावसायिकच नाही तर सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळेच पाऊस आला तरी पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही.

यंत्रणा नदी पात्र सुरक्षित ठेवू शकत नाही, त्यामुळे पाणलोट क्षेत्राचे संरक्षण केले जाईल अशी अपेक्षा ठेवणे जे स्वप्नवतच आहे (म्हणजे मूर्खपणा आहे). मला असे वाटते संपूर्ण पूर नियंत्रण यंत्रणेचा महत्वाचा घटक म्हणजे जमीनीचा वापर निश्चित करणे व जो वापर निश्चित केला आहे तो नियंत्रित करणेशेकडो वर्षांपासून नद्या, ओढे असे पाण्याचे नैसर्गिक स्रोत अस्तित्वात आहेत. मात्र कागदावर काही नकाशे तयार करण्याव्यतिरिक्त आपण प्रत्यक्षात त्यांचे संरक्षण करायची तसदी घेतलेली नाही

तज्ञ शहरातील विविध भागांचे काँक्रिटीकरण होत असताना बेंबीच्या देठापासून ओरडत होते की शहरात (म्हणजे पुण्यात) काही ठिकाणी जमीन उघडी राहू द्या म्हणजे पावसाचे पाणी त्यात झिरपेल. त्यामुळे भूजल पातळी वाढेल व पाणी वायाही जाणार नाही. जे सरकार (म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था) पावसाच्या पाण्याचे संधारण करण्याविषयी वर्तमानपत्रात जागरूकीकरणाच्या जाहिराती देते, तसे करणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात सवलत देते, तेच शहरातील प्रत्येक स्क्वेअर फुट जमीनीचे काँक्रिटीकरण करायच्या मागे लागलेय. यामुळे पाणी जमीनीत न झिरपल्याने, शहरांमध्ये व गावांमध्ये पूर येतो. मात्र याची काळजी कुणाला आहे कारण काँक्रिटचे रस्ते व पेव्हर ब्लॉकची कंत्राटे पुराहून जास्त महत्वाची आहेत, नाही का? कुणीही सरकारला याचा जाब विचारत नाही, कारण आपण देवाला प्रश्न विचारू शकतो का? कारण सरकार म्हणजे देवच ना ! त्यानंतर पुराच्या व त्यामुळे झालेल्या नुकसानाच्या जबाबदारीचा मुद्दा येतो. एखाद्या खाजगी बांधकाम व्यावसायिकाच्या किंवा उद्योजकाच्या कामावर एखादा अपघात झाल्यास लगेच पोलीसांकडे तक्रार दाखल केली जाते व संबंधित व्यक्तींना (अगदी मजूर कंत्राटदारांसह) तुरुंगात पाठवले जाते. या व्यक्तींच्या (बहुतेकवेळा बांधकाम व्यावसायिक) हव्यासामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागल्याने त्यांना माननीय न्यायालयाद्वारे जामीनही नाकारला जातो. मी कुणाचंही समर्थन किंवा तुलना करत नाही. मात्र जेव्हा पूर येतो तो माणसाच्या चुकांमुळे किंवा निष्काळजीपणामुळे येतो व त्यामुळे शेकडो माणसांना व हजारो प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो, कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान होते. मात्र या प्रकरणात एकाही व्यक्तीला अटक का होत नाही किंवा बांधकाम व्यावसायिक किंवा स्थापत्य अभियंता म्हणून नाही तर एक सामान्य माणूस म्हणून येथे कोणावरच आरोप निश्चित का केला जात नाही, असा प्रश्न मला विचारावासा वाटतो.

एकही सरकारी विभाग पुराची (आपत्तीची) किंवा त्याच्या कारणांची जबाबदारी घ्यायला पुढे येत नाही. पाण्याच्या नैसर्गिक स्रोतात अतिक्रमण हे पुराचे मुख्य कारण आहे. मात्र प्रत्येक विभाग किंवा संस्था त्यांनी किती परिणामकारकपणे आपत्ती व्यवस्थापन केले हे दाखवण्यात गुंग असतात. मात्र ही आपत्तीनंतर केली जाणारी कारवाई आहे, त्याऐवजी आपत्ती येऊच नये यासाठी व्यवस्थापन कसे करायचेमला असं वाटतं या पुरातून आपण एक गोष्ट शिकली पाहिजे ती म्हणजे भविष्यात पूर येऊ नये यासाठी जबाबदाऱ्या स्पष्टपणे ठरवल्या पाहिजेत. या पुराची जबाबदारी, एरवी शहराचा पाणी पुरवठा तत्परतेने खंडित करणाऱ्या जलसिंचन विभागाने घेतलेली नाही किंवा मायबाप पुणे महानगरपालिकेने घेतलेली नाही (म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांनी), सगळे एकमेकांवर दोषारोप करताहेत. म्हणूनच सरकारला (मंत्रालयातल्या बड्या अधिकाऱ्यांना) खरोखरच सामान्य माणसाच्या आयुष्याची काळजी असेल व त्याचे संरक्षण करायचे असेल तर नेमकी जबाबदारी ठरवली पाहिजे म्हणजे किमान कातडी तरी वाचवता येईल (चेहरा वाचवता आला नाही तर) म्हणुन तरी हे विभाग नीट काम करतील, मग नक्कीच नैसर्गिक जल स्रोतांचा मार्ग निश्चित केला जाईल व त्याचप्रमाणे त्याचे संरक्षण सुद्धा केले जाईल याची खात्री करतील. हे वनविभागालाही लागू होतं, ते वाघ वाचवा मोहिमेचा प्रचार करण्यात गुंग आहेत, मात्र आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक झाड वाचवण्याची तसेच झाडांची संख्या वाढवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. नदी पात्रे व पाणलोट क्षेत्रात तर हे आवर्जून झाले पाहिजे. सगळ्यात शेवटचे म्हणजे पोलीस दलानेही ज्या विभागांनी नद्यांचे संरक्षण करणे अपेक्षित आहे त्यांचे संरक्षण करण्याची किंवा त्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. नैसर्गिक जलस्रोतांमध्ये अतिक्रमण करायची लोकांची हिंमत होते कारण कानून के हाथ लंबे तो है पर ताकतवर नहीं हैं, माफ करा हिंदी चित्रपटातला संवाद वापरतोय, पण याचा अर्थ असा होतो की कायद्याचे हात (म्हणजेच पोलीसांचे) आपल्यापर्यंत पोहोचण्याइतके लांब असले तरीही आपली मानगुट पकडण्याइतके बळकट नाहीत हे अतिक्रमण करणाऱ्यांना माहिती असतं. त्याचवेळी न्याय व्यवस्थेविषयी पूर्णपणे आदर राखत असे म्हणावेसे वाटते की त्यांच्याकडूनही नद्यांना संरक्षण मिळाले पाहिजे. नदी पात्रातील अवैध बांधकामे किंवा अतिक्रमणांविरुद्धचे खटले वर्षानुवर्षे प्रलंबित असतात (त्यातले काही पर्यावरणवाद्यांनी दाखल केलेलेही असतात), अशा अवैध तत्वांच्या हे पथ्यावरच पडतं. म्हणूनच असे अवैध घटक (इथे गुन्ह्यात प्रत्येक जण सहभागी आहे) कायद्याच्या भानगडीतच पडत नाहीत, सरळ नद्यांवर अतिक्रमण  करून तिचे लचके तोडतात, कारण पुढे काहीच होणार नाही हे त्यांना माहिती असतं.

पुन्हा एका हिंदी चित्रपटाचाच संवाद वापरतोयउसकी आँखें सब देखती हैं और उसकी लाठी जब चलती है तब आवाज नही होता, आगाज होता है, म्हणजेच, “देव कशाकडेही दुर्लक्ष करत नाहीआपण माणसे न्याय करू शकलो नाही तर तो नक्की करतो. पण तो अतिशय शांतपणे पण अतिशय कठोरपणे न्याय करतोच!”.  माझा या तत्वज्ञानावर पुन्हा एकदा विश्वास बसलाय. मला पूरग्रस्तांविषयी पूर्णपणे सहानुभती आहे, आपण नुकत्याच आलेल्या पुरात जे अनुभवलं तो एकप्रकारे निसर्गाचा न्याय होता.देवाच्या न्यायाला जे बळी पडतात ते गुन्हेगारच असतात असं नाही. निसर्गदेवता (इथे नदी) माणसांमध्ये त्यांचे पद, धर्म किंवा जातीच्या आधारावर भेदभाव करत नाही. ती खऱ्या अर्थानं आंधळी असते तिच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला ती शिक्षा करते व आपल्या उद्दिष्टापर्यंत वाहत राहते. तिचा न्याय संपूर्ण मानवजातीला भोगावा लागतो. मात्र एवढ्या कठोर शिक्षेनंतरही माणसाला शहाणपण येत नाही!

अर्थात या पुराच्या आपत्तीतही काही आशादायक गोष्टी दिसून आल्या. उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांनी त्यांच्या बक्षिसाची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी दान केली. दुसऱ्या एका घटनेमध्ये एक कुत्रा आपल्या हरवलेल्या मालकाची वाट पाहात आठवडाभर एकाच ठिकाणी थांबून होता. एका प्राण्याची निष्ठा दाखवणारी ही घटना अतिशय हृदयस्पर्शी होती. त्यासोबत पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हजारो हात धावून आले. अशा अनुभवांमुळे आपण मूर्ख असलो तरीही, सगळं काही संपलेलं नाही असा विश्वास वाटतो!  

 संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

Monday, 5 August 2019

बांधकाम व्यवसायाचे भवितव्य !


























“जमिनीच्या मालकीची मक्तेदारी ही सर्वार्थाने सगळ्यात मोठी मक्तेदारी असते; ती चिरस्वरुपी मक्तेदारी असते व इतर सर्व प्रकारच्या मक्तेदारींपेक्षा ती जास्त ताकदवान असते.”…विन्स्टन चर्चिल.
बाजारातील चढउतारांकडे तुमचा शत्रू म्हणून पाहण्याऐवजी तुमचा मित्र म्हणून पाहा; काहीतरी अविवेकीपणा करण्याऐवजी त्यातून नफा कमवा.”... वॉरन बफेट.

ही दोन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांची वेगवेगळ्या विषयांवरील अवतरणे आहेत, मात्र या दोघांमध्ये एक गुण सारखा होता तो म्हणजे पथदर्शी नेतृत्व. चर्चिल यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचा विजय झाला तर बफेट यांनी दाखवलेल्या गुंतवणुकीच्या मार्गामुळे अमेरिकेची व्यापार क्षेत्रात (व्यवसायात) भरभराट झाली. विन्स्टन चर्चिल यांनी जमीनीच्या मक्तेदारीबाबत केलेलं विधान फार पूर्वीचं आहे. मात्र आपले सध्याचे शासनकर्ते (म्हणजे सरकार) चर्चिल यांचं अपूर्ण काम पूर्ण करायच्या मागे लागलेत असं दिसतंय, ते म्हणजे रिअल इस्टेटमधली जमीनीची मक्तेदारी मोडून काढणं. या अशा वातावरणामध्ये रिअल इस्टेटमधली बडी मंडळीही चिंतेत असताना आपण बफेट यांचे शब्द आठवले पाहिजेत. म्हणूनच माझ्या लेखाची सुरुवात करण्यासाठी मी या दोघांची अवतरणं वापरली.

मला अलिकडे बरेचजण विचारतात की रिअल इस्टेटचं काय होईल. एखादा रुग्ण बराच काळ पलंगाला खिळून असल्यावर त्याच्या तब्येतीविषयी विचारावं तसा त्यांचा सूर असतो. आपल्याला रुग्ण आजारी आहे हे दिसत असतं मात्र त्याचे कुटुंबीय व डॉक्टरसुद्धा रुग्णाच्या आरोग्याविषयी व निदानाविषयी खरी परिस्थिती सांगत नसल्यानं (सांगू शकत नसल्यानं), आपल्याला त्याच्या आजारपणाचं कारणच समजत नाही. 

आता या रुग्णाच्या जागी रिअल इस्टेट आहे म्हणून मी काही त्यातला तज्ञ किंवा डॉक्टर नसलोत तरीही रुग्णाला पाहिल्यानंतर मी तो रुग्ण आहे हे सांगू शकतो एवढं नक्की (खरंतर आपल्यापैकी सगळेच सांगू शकतात). मी आता पंचवीस वर्षांहून अधिक काळ रिअल इस्टेटमध्ये वेगवेगळ्या भुमिकांमधून काम केलंय  म्हणून काम केल्यामुळे या रुग्णाविषयीथोड्याफार गोष्टी जाणतो ज्यामुळे आपल्याला रोगाचं स्वरूप समजू शकेल. रोगाचं निदान झालं तरच आपल्याला योग्य उपचाराचा विचार करता येईल. इथे सगळ्यात पहिला व महत्वाचा नियम म्हणजे आपल्या मायबाप सरकारचा देशाविषयीचा (म्हणजे मतदारांविषयीचा) जो दृष्टिकोन आहे त्यानुसार देशातला कोणताही व्यवसाय चालवला जातो व रिअल इस्टेटही या नियमाला अपवाद नाही. तुम्ही म्हणाल त्यात काय मोठंसं, सगळयाच देशांना हे लागू होत नाही का तर त्याचं उत्तर नाही असं आहे. अमेरिकेमध्ये सरकार काही उद्योग समूहांपुढे (उद्योजकांपुढे) झुकतं, पण हे उद्योग बहुतेकवेळा केवळ त्यांच्या व्यवसायाचाच नाही तर संपूर्ण देशाचा विचार करतात. कोणत्याही विकसित देशाचं उदाहरण घ्या तिथे अशीच परिस्थिती दिसते किंबहुना म्हणूनच ते देश विकसित आहेत. आपल्याला स्वातंत्र्य मिळून इतक्या वर्षांनंतरही आपल्यावर मात्र अजुनही विकसनशील देशाचा शिक्का कायम आहे. अनेक दशकांपासून रिअल इस्टेट ही दुभती गाय होती व प्रत्येकानं तिच्यापासून आपला फायदा करून घेतला. मी जेव्हा प्रत्येकजण असं म्हणतो त्यामध्ये बांधकाम व्यावसायिक, जमीनदार, पुरवठादार, कंत्राटदार, गुंतवणूकदार, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, सल्लागार यासारखे व्यावसायिक, माध्यमे (वर्तमानपत्रे), बँका तसंच अगदी सरकारचाही समावेश होतो. या सगळ्यांनी रिअल इस्टेटमधून रग्गड पैसा कमावला. मात्र याला केवळ दोन अपवाद आहेत ते म्हणजे सदनिका खरेदी करणारे ग्राहक व बांधकामावर राबणारे मजूर. बांधकाम व्यावसायिकांनी घरांच्या विक्रीतून पैसा कमावला तर जमीन मालकांनी केवळ जमीनी मालकीच्या असल्यामुळे बक्कळ पैसा कमावला ज्यावर ही घरं बांधण्यात आली. पुरवठादार व उत्पादकांनी त्यांच्या वस्तुंची भरपूर विक्री करून पैसा कमावला, कंत्राटदारांनी कमावला (अर्थात इतरांहून थोडंसं कमी), सल्लागारांनी त्यांच्या बांधकाम व्यावसायिक ग्राहकांना भरभक्कम शुल्क आकारून पैसा कमावला, बँकांच्या चढ्या व्याजदरांनी बांधकाम व्यावसायिकांना हैराण केलं तर गुंतवणूकदार खरेदी केलेल्यापेक्षा दुप्पट भावानं घरे विकून श्रीमंत झाले. माध्यमांनी बांधकाम प्रकल्पांच्या पानभर जाहिराती छापून पैसे कमावले. सरकारही या सगळ्यात मागे नव्हतं, त्यांनी रिअल इस्टेटवर मुद्रांक शुल्क ते आयकरापर्यंत विविध प्रकारची शुल्क आकारून भरपूर कमाई केली.रिअल इस्टेटचा फायदा करून घेण्यात मी वर उल्लेख केलेले दोन घटकच मागे राहिले. खरंतर या दोन्ही घटकांचीच पिळवणूक झाली. त्यातला एक घटक म्हणजे प्रत्यक्ष बांधकामस्थळी काम करणारा मजूर जो वर्षानुवर्षे साईटवर पत्र्याच्या झोपड्या बांधून रहात होता आणि अजुनही तसाच रहातोय व दुसरा म्हणजे सदनिका खरेदी करणारा ग्राहक. त्यानं खरेदी केलेल्या घरावर वेगवेगळ्या संस्थांनी  विविध शुल्क आकारून पैसे कमावले व त्याला आयुष्यभर या घराचे हफ्ते फेडत बसावं लागले.

माझ्या रिअल इस्टेटशी कोणत्याहीप्रकारे संबंधित असलेल्या मित्रांना माझं वरील विश्लेषण आवडणार नाही. पण मला सांगा रिअल इस्टेट सोडला तर कोणत्या उद्योगामध्ये उत्पादनाचे मूल्य एक-दोन वर्षांमध्ये दुप्पट किंवा तिप्पट वाढतेते देखील उत्पादनामध्ये कोणत्याही मोठ्या तांत्रिक किंवा दर्जात्मक सुधारणा न होता. केवळ रिअल इस्टेटचंच असं नशीब होतं कारण जमीन मर्यादित होती व आहे, लोकसंख्या वाढतेय, नोकऱ्या मर्यादित आहेत व केवळ काही जागीच उपलब्ध आहेत. पाणी, रस्ते, वीज, वाहतूक, शाळा व वैद्यकीय सुविधा यासारख्या पायाभूत सुविधांच्याबाबतीतही असंच आहे. अर्थातच अशा जागी पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त झाली व वर नमूद केलेल्या सर्व व्यावसायिकांच्या साखळीला ते योग्य वेळी योग्य ठिकाणी असल्यामुळे (खरंतर चुकीच्या ठिकाणी) असल्यामुळे फायदा झाला व त्यांनी या दुभत्या गाईला पिळून काढलं (बक्कळ पैसा कमावला). अर्थात या प्रक्रियेत लाखो लोकांना घरं मिळाली मात्र जरा स्वतःच्या अंतरंगातून डोकावून पाहा (ज्यांना माझा तर्क आवडला नाही त्यांनी) व या विक्री झालेल्या घरांचे दर रास्त होते का हा प्रश्न विचारा? मग तुम्हाला या प्रश्नाचं जे उत्तर मिळेल (तुम्हाला अंतरंगात डोकावून पाहायची हिंमत असेल तर) त्यानेच रुग्णाच्या म्हणजेच रिअल इस्टेचच्या आजाराचं निदान होईल.

रिअल इस्टेटची खरी समस्या अशी आहे की रिअल इस्टेटशी संबंधित व्यक्तींना कमी नफ्यात टिकून राहायची तसंच ग्राहकांची वाट पाहायची सवयच राहिली नाहीये नाही. आपण आता आज जी परिस्थिती आहे त्या दृष्टिकोनातून वरील घटनाक्रम पुन्हा पाहू. जमीनीचे मालक त्यांच्याकडे एखादा बहुमूल्य दुर्मीळ खजिना असल्यासारखे वागायचे व त्यांच्या जमीनींसाठी बोली लावणाऱ्यांची रांग लागलेली असायची. मात्र आता त्यांच्या जमीनींसाठी ग्राहकच नाही. या साखळीतल्या इतर व्यावसायिकांचीही हीच कथा आहे. पुरवठादार  व कंत्राटदार आज बांधकाम व्यावसायिकाच्या मागे ऑर्डरसाठी धावत असतात, त्याशिवाय आपल्याला पैसे वेळेत मिळतील का याचीही डोक्यावर टांगती तलवार असते. उधारी दिल्याशिवाय ऑर्डर मिळत नाहीत व दुसरीकडे बांधकाम व्यावसायिक पैसे देतीलच याचीही शाश्वती नसते, त्यामुळे त्यांची मधल्यामध्ये गोची होते. आर्किटेक्ट वा चार्टर्ड अकाउंटंट्स आधी बांधकाम व्यावसायिकांकडून भरपूरसल्ला शुल्क घ्यायचे मात्र आता नवीन प्रकल्पच सुरू होत नाहीत त्यामुळे आधीचं शुल्क मिळणंही कठीण झालंय, त्यामुळे तेही अडचणीत आहेत. बँकांनी रिअल इस्टेटला कर्ज पुरवठा करणं थांबललं आहे पण त्यांच्या ठेवींवर त्यांना व्याज द्यावं लागतंय. गृहकर्ज घेण्यासाठी कुणी आलंच नाही तर काय म्हणून बँकाही विवंचनेत आहेत. एनबीएफसी व गुंतवणूकदारांना याचा सर्वाधिक फटका बसलाय. बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या विनाहमी कर्जाविषयी तसंच त्यांना अपेक्षा होती त्या दरानं घरं घेण्यासाठी ग्राहक येत नसल्याने अपूर्ण घरे पडून असल्याबद्दल ते चिंतेत आहेत. प्रसार माध्यमांनाही याचा फटका बसलाय, तुम्ही कोणतंही वर्तमानपत्र उघडून पाहा, तुम्हाला त्यामध्ये क्वचितच एखाद्या बांधकाम व्यावसायिकाची जाहिरात दिसेल. त्यामुळेच त्यांना रिअल इस्टेटकडून मिळणारे उत्पन्न अतिशय कमी झाले आहे, तसंच त्यांना डिजिटल माध्यमांशीही स्पर्धा करावी लागतेय जी स्वस्त व व्यापक आहेत. वाघ जसा जंगलातल्या साखळीत सर्वोच्च स्थानी असतो, बांधकाम व्यावसायिकांचंही रिअल इस्टेटमध्ये तसंच स्थान आहे. मात्र ज्याप्रमाणे वाघाला अन्न व पाण्यासाठी जंगलात भटकावं लागतं त्याचप्रमाणे बांधकाम व्यावसायिकांनाही ग्राहकांच्या व वित्त पुरवठ्याच्या शोधात फिरावं लागतं ही वस्तुस्थिती आहे. या सगळ्यात एकाच घटकाला तुलनेने कमी फटका बसलाय तो म्हणजे अर्थातच आपलं सरकार. ते करांमध्ये वाढ करतं व रिअल इस्टेटशी संबंधित प्रत्येक व्यवहारातून त्यांना आपला वाटा मिळत असतो. मात्र विकास शुल्कांमधून व विविध अधिभारांमधून स्थानिक संस्थांना मिळणाऱ्या महसुलात घट झालाय. यावरूनच जर रिअल इस्टेट क्षेत्र आजारी पडलं तर कुणीच त्यातून वाचणार नाही हा सरकारसाठी सुद्धा इशारा आहे.

आता रिअल इस्टेटच्या बाबतीत असं का झालं हे पाहू व याचं एकमेव कारण म्हणजे रिअल इस्टेटशी संबंधित प्रत्येकानं वर्षानुवर्षं चालत आलेलं नफ्याचं गणित बदललं पाहिजे तसंच आपली हाव शक्य तितकी कमी केली पाहिजे. हे सरकार जमीनीच्या बाबतीत श्री. चर्चिल यांचं धोरण अवलंबत असल्यामुळे पूर्वीसारखा नफा कधीच असणार नाही व घरं बांधण्यासाठी जास्तीत जास्त जमीन उपलब्ध करून देईल. परिणामी घरासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाचा मुबलक पुरवठा होईल (किंबहुना झालाय) जो मागणीपेक्षा कितीतरी पटीनं अधिक असेल.स्पर्धेचं खुलं धोरण स्वीकारल्यानंतर इतर सगळ्या बाजारपेठांमध्ये काय झालं हे लक्षात ठेवा. सेल फोन, कार, दुचाकी ते विद्युत उपकरणांपर्यंत सगळ्या बाजारपेठा अनेक उत्पादकांच्या वस्तुंनी गजबजून गेल्या, त्यामुळेच त्यांच्या किमती कमी झाल्या. याचा दोन प्रकारे परिणाम झाला, एक म्हणजे ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध झाले व कुणा एकाची मक्तेदारी उरली नाही, जी फक्त आता रिअल इस्टेटमध्ये उरली आहे किंवा होती म्हणा! खुल्या धोरणामुळे वरील कुठल्याही व्यवसायांवर अवकळा आली नाही किंबहुना ते भरभराटीलाच आले कारण उत्पादक व संबंधित उद्योगांना कमी नफ्यात काम करण्याची सवय लागली व दर्जेदार उत्पादनातून त्यांनी नफा कमवायला सुरूवात केली. नवनवीन बाजारपेठांचा शोध घेतला गेला व उत्पादकांनी ग्राहकांची वाट पाहण्यापेक्षा आपणहून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. उत्पादनाच्या प्रत्येक पैलूचा विचार करताना वापरकर्त्याला (म्हणजे ग्राहकाला) केंद्रस्थानी ठेवण्यात आलं, म्हणूनच या व्यवसायांचा गाडा सुरळीतपणे चालला आहे. ज्या कंपन्या (अगदी नावाजलेल्याही) हे बदल स्वीकारू शकल्या नाहीत त्या बाजारातून गायब झाल्या. मोबाईल उद्योग किंवा सेवा पुरवठा या झपाट्याने वाढणाऱ्या क्षेत्रातली नोकिया किंवा एअरसेल ही याची सर्वोत्तम उदाहरणं म्हणता येतील. बफेट यांनी प्रतिकूल परिस्थितीचाही वापर करून घ्या असं म्हटलंय. म्हणूनच नोकिया व एअरसेलसारख्या कंपन्या नामशेष होत असताना जिओसारख्या कंपन्या याच उद्योगात आज अग्रणी ठरल्या आहेत. ऑटो उद्योगाही आपण पाहिलं की महाराष्ट्र स्कूटरसारखी कंपनी जी प्रिया नावाची प्रसिद्ध स्कूटर बनवायची, ती बंद पडली. मात्र आज पियाजिओ व्हेस्पा व होंडा अॅक्टिव्हाची तडाखेबंद विक्री होतेय. रॉयल एनफिल्ड या बुलेट मोटरसायकलच्या लोकप्रिय ब्रँडची गोष्ट तर आणखी रोचक आहे. कोणे एकेकाळी बाजारामध्ये आघाडीवर असलेल्या या ब्रँडची फॅशन जुनी झाली व कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर होती. त्याचवेळी तिनं पुन्हा फिनिक्स पक्ष्यासारखी झेप घेतली व प्रचंड स्पर्धा असूनही आज पुन्हा एकदा हा लोकप्रिय ब्रँड ठरला आहे.

रिअल इस्टेट व्यावसायिकांनीही रिलायन्स जिओ किंवा रॉयल एनफिल्ड यासारख्या ब्रँडमधून शिकलं पाहिजे (आवर्जून शिकलं पाहिजे) कारण त्यांनी बाजारातील प्रतिकूल परिस्थितीवरही मात केली. यासाठी बाजाराचा अभ्यास करणं आवश्यक आहे, सरकारच्या मनात काय आहे तसंच आगामी धोरणं पाहिली पाहिजेत त्याचसोबत ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये हव्या असलेल्या वस्तू दिल्या पाहिजेत व हे सगळं करत असतानाच थोडाफार नफाही कमवायचा आहे. त्यासाठी रिअल इस्टेट व्यावसायिकांनी देशभरातील ग्राहकांच्या काय गरज आहेत याविषयीच्या डेटावर लक्षं केंद्रित केलं पाहिजेइतर कोणत्याही उत्पादनाच्या उलट रिअल इस्टेट क्षेत्र स्थानिक घटकांवर म्हणजे पायाभूत सुविधा, शिक्षण, रोजगार, अगदी एखाद्या ठिकाणची संस्कृती यावरही अवलंबून असते. म्हणूनच मी माझा लेख पुण्यापुरताच मर्यादित ठेवलाय, अर्थात थोड्याफार फरकानं हे कुठल्याही शहराला लागू होईल. आपण जेव्हा परवडणाऱ्या घरांविषयीबोलतो तेव्हा ते फक्त आपल्यासाठीच नाही तर बांधकाम व्यावसायिकासाठीही परवडणारे असलं पाहिजे. बांधकाम व्यवसायायिकासाठी परवडणारे घर म्हणजे ज्याची विक्री वेगानं होईल व गुंतवणुकीपेक्षा दुप्पट नफा मिळेल. आता वेळ आहे की परवडणाऱ्या घराचा विचार ग्राहकाच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे कारण तो त्या घरात राहणार आहे, एखाद्या गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून नाही कारण तो कधीना कधी पैशांसाठी ते विकून टाकेल. तुम्ही जेव्हा ग्राहकाच्या दृष्टिकोनातून घराकडे पाहायला सुरुवात करता तेव्हा पूर्वीपेक्षा आजच्या परिस्थितीत काय फरक झालाय आहे हे समजतं. आता तुम्हाला ग्राहकाची खरेदी करण्याची क्षमता, त्याच्या गरजा, त्याचे इतर खर्च उदाहरणार्थ मुलांच्या शाळेचे शुल्क, कारचे हप्ते व सुट्टीच्या दिवशी होणारा खर्च तसंच त्याची बचत इत्यादी गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त त्याला घरही खरेदी करायचं आहे व त्याचे हप्ते फेडायचे आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे.

त्याशिवाय बांधकाम व्यावसायिकांनी सरकारवर योग्य धोरणांसाठी दबाव टाकण्यासाठी स्वतःच  एक दबाव गट (प्रेशर ग्रुप) तयार केला पाहिजे, कारण रिअल इस्टेटमधल्या पडझडीची झळ सरकारला आत्तापर्यंत बसलेली नाही. ते केवळ या क्षेत्रावरील विविध शुल्क व कर वाढविण्यात व्यस्त आहेआपण आपलं शहर स्मार्ट म्हणतो मात्र तरीही इथे पायाभूत सुविधा शून्य आहेत ही वस्तुस्थिती आहेकेवळ एक मेट्रो सारखी गोष्ट लाखोंचं आयुष्य बदलू शकणार नाही. तो एक महत्वाचा घटक असला तरीही पाणी, सांडपाणी, चांगले रस्ते, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, वीज व इतरही अशा सोयीसुविधा शहरामध्ये सगळीकडे सारख्या नाही. अशा ठिकाणी ग्राहकाला गृहकर्जाच्यां हप्त्यांशिवायही बराच खर्च करावा लागतो, त्यामुळे अशा भागात घरं घ्यायला ग्राहक फारसे इच्छुक नसतात. एक लक्षात ठेवा सरकारवर दबाव टाकण्यासाठी दबाव गट बनविण्यासाठी आधी आपण ग्राहकांच्या मनातील आपली प्रतिमा सुधारली पाहिजे, त्यांचा आदर मिळवला पाहिजे. सरकारच्या चुकीच्या धोरणांना तोंड देताना, जनतेकडून त्या व्यवसायीकांना मिळणारा आदर हीच कोणत्याही उद्योगाची खरी ताकद असते.

ग्राहकांच्या बाबतीत बोलायचं (व सरकारच्याही) तर केवळ घरं स्वस्त करणं हे उद्दिष्ट नसावं तर रिअल इस्टेटसाठी धोरणं आखताना, निर्माता व ग्राहक या दोघांसाठी परवडणारी घरं असतील याचा विचार झाला पाहिजे. एक लक्षात ठेवा लोभीपणा केवळ बांधकाम व्यावसायिकांची मक्तेदारी नाही, अनेकदा ग्राहकही एखाद्या अतिशय गरजू बांधकाम व्यावसायिकाला (ज्याला पैशांची नितांत गरज आहे) पाहून लोभीपणा करतो व घासाघीस करून त्याच्याकडून शक्य तितक्या कमी दरात घर घेण्याचा प्रयत्न करतो. त्यातून त्याला अनेकदा तोटाही होतो ही वस्तुस्थिती आपल्यापैकी अनेकांनी पाहिली आहे. स्वस्त घरं नेहमीच उत्तम असतात असं नाही, अवैध घरांमध्ये राहणाऱ्या हजारो लोकांना, स्वस्त घराचा पर्याय निवडण्याच्या त्यांच्या निर्णयाचा काय परिणाम झाला हे विचारा. खरंतर सरकारच ग्राहकाला तसंच बांधकाम व्यावसायिकांनाही परवडणारी कायदेशीर घरं बांधता येतील अशी यंत्रणा तयार करण्यात अपयशी ठरलं आहे. म्हणूनच अवैध घरांची संख्या दररोज वाढतेय. अजूनही वेळ गेलेली नाही. उद्योगातील काही जाणत्या मंडळींची नियुक्ती करून एक समिती स्थापन करा व धोरणं तयार करा, अजूनही लाखो लोकांना स्वतःचं घर हवंय व हजारो लोक ही घरं बांधण्यासाठी तयार आहेत. केवळ हे घडवण्यासाठी आपण एक योग्य यंत्रणा तयार केली पाहिजे. तोपर्यंत रिअल इस्टेट व्यावसायिकांनो, ग्राहक जशी हवी आहेत तशी घरं बांधण्यावर लक्ष केंद्रित करा. त्याचसोबत ही घरं विकण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सरकारशी लढत राहा. त्याचप्रमाणे प्रत्येक जमीनीमागे हा पृथ्वीवरचा शेवटचा जमीनीचा तुकडा असल्याप्रमाणे लागू नका, तरच जमीन मालकांना आता आपली मक्तेदारी उरलेली नाही याची जाणीव होईल. तसंच ग्राहकाला त्याच्या पैशांच्या योग्य मोबदला द्या ज्यामध्ये पारदर्शक व चांगल्या सेवांचाही समावेश होतो. नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर अतिशय महत्वाचा आहे. असं झालं तर भविष्य अगदी सोनेरी नाही तर किमान रुपेरी तरी असेल. घर ही केवळ माणसाचीच नाही तर प्रत्येक प्राण्याची मूलभूत गरज आहे, त्यामुळे बांधकाम व्यावसायिक कधीही उपाशी मरणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे; केवळ बांधकामाची कला अधिक चांगल्याप्रकारे आत्मसात करा, एवढाच हे सगळे सांगण्याचा मतितार्थ आहे!

 संजय देशपांडे 
संजीवनी डेव्हलपर्स