Wednesday, 7 November 2018

अवनी नावाचा निसर्गाचा धडा !























“खरंतर वाघ, जखमी नसताना किंवा नरभक्षक नसताना, अतिशय सुस्वभावी असतात... कधीकधी, वाघाच्या बछड्यांच्या अति जवळ जाण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न केला तर तो हरकत घेतो. ही हरकत गुरगुरण्याच्या स्वरूपात असते, आणि ती पुरेशी प्रभावी नसेल तर घाबरवणाऱ्या डरकाळ्या फोडत थोड्या अंतरापर्यंत पाठलाग करतो. या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर, त्यानंतर झालेल्या कोणत्याही इजेची संपूर्ण जबाबदारी घुसखोरावर असते”.... जिम कार्बेट


“नरभक्षक वाघाने कथित हल्ले केल्याच्या शेकडो खोट्या अफवा आमच्याकडे येत होत्या, त्यामुळे अगणित मैल चालावे लागे, पण याची अपेक्षा होतीच, कारण प्रस्थापित नरभक्षक असलेल्या त्या भागामध्ये प्रत्येकजण स्वतःच्या सावलीवर सुद्धा शंका घेत असे, आणि रात्री ऐकू आलेला प्रत्येक आवाज नरभक्षक वाघाचा असल्याचे सांगितले जाई.” ....जिम कार्बेट


तर, वन्यजीवाची आवड असणाऱ्यांना वरील नावाची  वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही, पण पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये इमारतीच्या आवारांमध्ये अखेरच्या उरलेल्या काही झाडांवर कधीतरी दिसलेली चिमणी किंवा बुलबुल (याचेही दर्शन दुर्लभ झाले आहे), यांचा अपवाद वगळता ज्यांचा वन्यजीवाशी फारसा संबंध आलेला नाही, तसेच ज्यांचा वन्यजीवाशी केवळ वर्तमानपत्रे आणि टीव्ही वाहिन्या यांच्यापुरते मर्यादित आहे, आणि आता ते असा विचार करत असतील ती अवनी ऊर्फ टी1 हा एखादा परग्रहावरील प्राणी आहे, त्यामुळेच तिला इतकी प्रसिद्धी मिळाली असेल! (खेदाने मृत्यूनंतरच, जे आपल्या देशात नेहमीचेच आहे, उदा. निर्भया प्रकरण). तर अशा सर्व लोकांसाठी,जिम कार्बेट हा या देशाने पाहिलेला कदाचित सर्वोत्तम वाइल्ड लाइफर होता (मला त्यांना कधीही वाघाचा शिकारी म्हणायला आवडत नाही, अगदी नरभक्षक वाघाचे शिकारी असेही नाही), त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हिमालयाच्या पर्वतरांगांमधून, म्हणजे गढवाल/कुमाऊँ येथे व्यतीत केले आणि वाघाच्या वर्तनावर अधिकारवाणीने बोलणारे  ते अभ्यासक आहेत आणि त्यांनी वाघ व वन यांच्याबद्दलचे त्यांचे अनुभव चार उत्कृष्ट पुस्तकांमध्ये शब्दबद्ध केले आहेत, दुर्दैवाने ही पुस्तके त्यांनी नरभक्षक वाघाला मारण्यासाठी पाठलाग केल्याबद्दल अधिक लोकप्रिय झाली आहेत. आपण भारतीय (पुन्हा एकदा देशभक्तांप्रति आदर दाखवून) इतिहासापासून शिकण्यात नेहमी कमी पडतो, मग तो इथिहास प्राचीन असो अथवा कॉर्बेटच्या काळाइतका म्हणजे केवळ एक शतक जुना असो! एखादा वाघ किंवा बिबट्या नरभक्षक झाल्यानंतर त्याचा मागोवा घेण्यासाठी आणि मारण्यासाठी त्यांना बोलावण्यात येई (तेव्हा खूप अधिक वाघ अस्तित्वात होते आणि जंगलेही आतापेक्षा मोठी होती), या कामामध्ये ते प्रवीण होते पण त्यांना कधीही ते काम आवडले नाही! ते कोणत्याही नरभक्षकाचा मागोवा काढून त्याला मारू शकत होते कारण ते शार्प शूटर होते म्हणून किंवा त्यांना शिकार आवडत होती म्हणून नव्हे, तर त्यांनी वाघाबरोबरच जंगलांचा संपूर्ण अभ्यास केला होता, तसेच ते ज्या लोकांमध्ये नरभक्षक वाघ फिरत असत आणि शिकार करत असत त्या लोकांचाही त्यांनी अभ्यास केला होता! अन्यथा वरील दोन अवतरणांमध्ये ते वाघांबद्दलची आत्मीयता तसेच तो नरभक्षक झाल्यानंतर त्याला मारण्याची गरज व्यक्त केली नसती! बरे वाघ हा नरभक्षक का होतो याची कारणेही त्यांनी नमूद केलेली आहेत, आणि आपण  मात्र गेल्या सुमारे शंभर वर्षांपासून सोयीस्कररित्या त्याकडे दुर्लक्ष करत आहोत!

आता चर्चेत असलेल्या अवनी वाघिणीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही सज्ज झाले असाल, आणि तुमच्यापैकी बहुतेकांना हे माहिती आहे की ती नरभक्षक झालेली वाघीण होती, म्हणजे तिने हरणे किंवा जंगली म्हैस अशा तिच्या नेहमीच्या भक्ष्यांपेक्षा जास्त माणसे मारायला सुरुवात केली होती, त्यामुळे आपल्या राज्यातील वन्यजीवांची जबाबदारी असलेल्या  वनखात्याला तिच्यापासून लोकांना वाचविणे आवश्यक होते, तिला पकडून किंवा तिला मारून तर यातील त्यांनी दुसरा पर्याय निवडला म्हणजे अवनी वाघिणीला, तिचे जंगलातील नाव टी1 होते, ठार मारले. अवनी आणि टी1 नावाच्या दोन वाघिणी होत्या का हे ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी ही माहिती, तर बहुतांश वेळा वाघ किंवा वाघिणीला जिथे जन्म घेतलेला असतो किंवा वावर असतो त्या क्षेत्रातील स्थानिक नाव मिळते किंवा एखादा गाईड ते नाव देतो किंवा स्थानिक लोक त्यांना योग्य वाटेल अशा नावाने संबोधायला सुरुवात करतात (मला वाटते अवनीच्या बाबतीत असेच घडले). पण वनखाते अशा नावांनी प्रत्येक वाघाची नोंद ठेवू शकत नाही कारण प्रत्येक वाघ जैविदृष्ट्या वेगळा असतो त्यामुळे व्याघ्रगणनेनंतर टी1, टी2, टी3, इत्यादी नावे दिली जातात आणि ही नावे वाघांच्या ज्येष्ठक्रमतेनुसार दिले जातात, म्हणजे कान्हा जंगलामध्ये टी1 वाघ असेल आणि ताडोबा जंगलांमध्येही टी1 वाघ असेल, पण दोन्ही वाघ वेगवेगळे असतात!

इतक्या तपशीलांबद्दल माफ करा, पण 120 कोटी भारतीयांमध्ये अतिशय कमी संख्येने असलेल्या डाय हार्ड वाइल्ड लाइफरचा आदर ठेवूनही असे म्हणावे लागते की, वन्य जीव संवर्धानाचा विषय येतो तेव्हा सामान्य माणसांमधील जनजागृतीची पातळी ही सामान्यपणे वर दिलेल्या तपशीलांपासून दूर असते! त्यामुळे मला हे प्रकरण वाघिणीच्या नावापासून तपशीलवार मांडणे आवश्यक वाटले. मी स्वतःला वन्यजीवांचा तज्ज्ञ म्हणून नक्कीच समजत नाही, पण मला जंगले, वाघ, जंगलांभोवतीचे स्थानिक लोक आणि हो वनखाते यांच्या अधिक संपर्कात येण्याचे भाग्य लाभले आणि त्यामुळे माझ्या अनेक मित्रांनी मला व्हॉट्सअॅप करून किंवा मेल करून अवनी वाघिणीला मारल्याच्या संपूर्ण प्रकरणावर माझे मत मांडावे असे सुचवले! शिवाय आपल्याकडे अनेक तज्ज्ञ, संवर्धक तसेच वरिष्ठ वन अधिकारी आहेत, तरीही अनेक वेळा एकच प्रसंग चुकीचा किंवा बरोबर, वाईट किंवा चांगला ठरवला जातो, आणि तुम्ही कोणत्या बाजूने आहात त्यानुसार ते ठरते! आणि वन्यजीवाशी संबंधित सर्व बाजूंनी थोडाबहुत संपर्क आल्यानंतर मला वाटते असे काही घडते तेव्हा आपल्याकडे संतुलित भूमिकेची सर्वाधिक उणीव आहे (मी आपल्या राज्यकर्त्यांबदल्ल बोलत आहे, विशेषतः ट्विट करणारे आणि वर्तमानपत्रात झळकणारे मंत्री)!
आता, अवनी वाघिणीबद्दल झालेल्या या सगळ्या गदारोळामागील कारण काय आहे ते पाहूयात; ती विदर्भाच्या जंगलामध्ये, म्हणजे आपल्या राज्याच्या पूर्वेला, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि आजूबाजूला  होती (शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे सर्वाधिक झालेले मृत्यू हे यवतमाळ जिल्ह्यामधीलच आहेत ही एक लक्षणीय बाब). आणखी एक गोष्ट म्हणजे तिच्याबरोबर दोन छावे सुद्धा आहेत, ते जवळपास अकरा महिन्यांचे आहेत आणि यामुळे हा प्रकार अधिकच विवादास्पद झाला आहे, कारण या वयाचे छावे आईविना टिकाव धरू शकत नाहीत आणि त्यांना पकडले नाही तर त्यांच्या आईपाठोपाठ म्हणजे अवनीपाठोपाठ त्यांचा मृत्यूही निश्चित आहे. आता गोष्ट अशी आहे की अवनी वाघीण गेल्या दोन वर्षांपासून नरभक्षक झाली आहे, याचा अर्थ आधी नमूद केल्याप्रमाणे तिने माणसांना स्वतःचे भक्ष्य म्हणून मारण्यास सुरुवात केली आणि हे धोकादायक आहे, विशेषतः ती राखीव जंगलात नसताना. पुन्हा ताडोबा किंवा कान्हा अभयारण्यासारख्या राखीव जंगलांचा अर्थ असा की, या जंगलांमध्ये मानवी हालचालींवर मर्यादा असतात किंवा त्यावर बंदी असते, जेणेकरून येथे वाघ नरभक्षक होण्याची शक्यता कमी असते, तर अवनी ज्या जंगलामध्ये राहत होती त्यामध्ये व भोवती मानवी वस्ती आहे, याचा अर्थ तिचा मानवी आयुष्याशी सहज संपर्क येत होता. बरे ती नरभक्षक का झाली हे आपल्याला केवळ तीच सांगू शकते, ते आता शक्य नाही (ते तसेही शक्य नव्हते) पण मुद्दा हा आहे की, वाघाने माणसाला मारायलाच नाही तर खायला सुद्धा सुरुवात केली असल्याचे आपल्याला ठाऊक झाल्यानंतर आपण काय करतो? याबाबतीत सर्वांचा योग्य तो आदर राखून असे म्हणेन की, मी हे वाचणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीइतकाच गंभीर वाइल्ड लाइफर आहे, तरीही कृपया हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की, पुण्या-मुंबईमध्ये तुमच्या इमारतीच्या 10व्या मजल्यावरील घरामध्ये बसून एका निष्पाप वाघाला मारणे हे लाजिरवाणे आहे. अशा प्रकारची मते व्यक्त करणे सोपे आहे, पण कल्पना करा कोणत्याही नागरी भागपासून दूर अशा दुर्गम खेड्यामध्ये तुमचा जमिनीचा लहानसा तुकडा आहे, तिथे मोबाईलचे व्यवस्थित नेटवर्कसुद्धा (अगदी जिओसुद्धा) नाही, वीज नाही, तुम्ही तुमच्या शेतात जे पिकवाल त्यावरच तुमचे आयुष्य अवलंबून आहे, त्यामुळे तुम्हाला घराबाहेर जाऊन तुमच्या शेतावर काम करावेच लागते! तुमच्याकडे एखादी काठी किंवा कुऱ्हाडीशिवाय दुसरे हत्यार नाही आणि हो, तुम्हाला तुमची पत्नी किंवा म्हाताऱ्या आई-वडिलांसोबत शेतात जावे लागते. आणि आणखी एक गोष्ट, तुमची लहान मुले शाळेत जातात, ती शाळा तुमच्या शेतातील तुमच्या घरापासून एक ते दोन किलोमीटर दूर आहे आणि तिथे कोणतीही स्कूलबस सेवा नाही, त्यामुळे त्यांना चालत शाळेत जावे लागते. आणखी एक गोष्ट, पुण्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये शौचालय नाही आणि रात्री तुम्हाला किंवा तुमच्या घरातील इतर सदस्यांना रात्रीच्या वेळी निसर्गाची हाक आली तर घराबाहेर काही मीटर अंतरावर शौचालयात किंवा त्याहून दूर उघड्यावर चालत जावे लागते! तर आता कल्पना करा की एक वाघीण तुमच्या घर व शेताभोवती फिरत आहे आणि ती माणसांना मारते आणि खाते आता तुमची प्रतिक्रिया काय असेल? मला अचंबा वाटतो, आता अवनीला मारल्याबद्दल सरकारची (म्हणजे वनखात्याची) लाज काढणारे किती लोक प्रत्यक्षात तिथे गेले असते आणि या दहशतीत जगणाऱ्या शेतकऱ्यांसोबत किंवा स्थानिक लोकांसोबत राहिले असते आणि लक्षात घ्या, हे मी म्हणत नाही, याच देशामधील नरभक्षक वाघाच्या दहशतीचे श्री. जिम कॉर्बेट यांनी जवळपास ऐंशी वर्षांपूर्वी वर्णन केले होते, फक्त आपण इतिहास विसरतो आणि इतिहासाची पुनरावृत्ती होत असते हेही विसरतो!

आणि एकदा वाघ नरभक्षक झाला की तो त्याच्या नैसर्गिक स्वभावापेक्षा दसपट अधिक धोकादायक होतो, तो एक अतिशय हुशार प्राणी आहे, भक्ष्याची शिकार करणे हे त्याच्यासाठी जन्मजात असते! वाघ हा हरणासारख्या चपळ आणि गव्यासारख्या (रानरेडा सुद्धा म्हणतात) ताकदवान प्राण्याची शिकार काही क्षणात  करू शकतो तेव्हा माणसासारख्या दंतहीन, अचपळ, शिंग नसलेल्या, (अंधारात) पाहू न शकणाऱ्या आणि सामर्थ्यहीन प्राण्याला त्याचे भक्ष्य होण्यापासून बचाव करण्याची अशी कितीशी संधी असते? तरीही अनेक वन्यजीवप्रेमी (संवर्धक) अवनीला न मारता, तिला बेशुद्ध करून पकडण्याची विनंती करत होते. आता अंधारात म्हणजेच रात्रीच्या वेळेस वाघाला बेशुद्ध करता येत नाही किंवा मारताही येत नाही अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत किंवा पुस्तकातले नियम दाखवले जात आहेत. नियम हे माणसांनी, माणसांसाठी लिहिलेले असतात आणि अवनी माणूस नव्हती त्यामुळे तिला हे नियम माहीत असणे अपेक्षीत नव्हते (तिच्यासाठी चांगले झाले अन्यथा कोणीही तिच्या मृत्यूची दखल घेतली नसती)! वाघ नरभक्षक होतो तेव्हा रात्रीच्या वेळी बाहेर पडावे हे समजण्याइतका तो हुशार असतो, कारण त्याचे भक्ष्य म्हणजे माणूस हा अंधारात सर्वात दुबळा असतो! अवनी नरभक्षक असल्याचे अधिकृतरित्या जाहीर झाल्यानंतर आणि अगदी न्यायालयानेसुद्धा (नेहमीप्रमाणे या देशातील प्रत्येक वाद न्यायालयात संपतो आणि अवनीसुद्धा त्याला अपवाद नव्हती) अवनीला मारायचे की बेशुद्ध करायचे याचा निर्णय वनखात्यावर सोपवल्यानंतर संपूर्ण वनखाते दोन महिने तिचा शोध घेत होते आणि ते दिवसाउजेडी तिला शोधत असल्यामुळे ती सापडत नव्हती. छावे असलेली वाघीण स्वतःच्या हालचालींबाबत नेहमीच अतिशय सावध असते, अगदी राखीव जंगलांमध्येसुद्धा (ताडोबामधल्या माया आणि तारा या वाघीणी अपवाद आहेत) आणि येथे तर ती नरभक्षक झाली होती, अशा वेळी वाघ किती हुशार होतो ते समजण्यासाठी फक्त कॉर्बेटची पुस्तके पुन्हा वाचा! त्यामुळे व्यक्तिशः मला असे वाटत नाही की वनखात्याने तिला जिवंत पकडण्याचा तसेच बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही, जरी तसे केले असते तरी प्राणीसंग्रहालयामध्ये तिचा निभाव लागणे अवघड होते कारण क्वचितच एखादा नरभक्षक वाघ पकडल्यानंतर पाळीव झाल्याचे उदाहरण आहे. तसेच अशा नरभक्षक वाघाची देखभाल करणे ही नेहमीच जोखीम असते कारण त्याला सतत स्वतःचे भक्ष्य म्हणजे माणसे डोळ्यांसमोर दिसत राहतील आणि असा वाघ सर्वात आधी त्याच्या सर्वात जवळच्या मनुष्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल, हा प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांना कायमचा धोका असेल! आणि तरीही त्या दोन छाव्यांचा प्रश्न उरला असता, कारण अवनीचा शोध घेण्यासाठीही किती प्रयत्न करावे लागले होते ते आपण सर्वांनी पाहिले होते आणि येथे आपण एकाच वेळी तीन वाघांना बेशुद्ध करण्याबद्दल बोलत आहोत! आणि हे लक्षात घ्या की अकरा महिन्यांचे छावे शिकार करू शकणार नाहीत पण ते कोणत्याही माणसाला नक्कीच गंभीर इजा करू शकतात! त्यामुळे या सर्वांना पकडण्यामध्ये नेहमीच धोका होता आणि याच ठिकाणी वनखाते आणि इतर सर्वांमध्ये संघर्ष होत आहे!

मी पुन्हा सांगतो, मी अवनी किंवा इतर कोणत्याही प्राण्याला किंवा अगदी एखाद्या सापालासुद्धा मारण्याचे समर्थन करत नाही पण तुम्ही कोणत्या बाजूने आहात त्यावरून चूक किंवा बरोबर हे ठरते आणि दुर्दैवाने या जगावर मनुष्यांचे राज्य आहे, वाघांचे नाही, हे कटू वास्तव आहे त्याला वनखातेसुद्धा अपवाद नाही!तिथे असलेल्या परिस्थीतीत  खाकी कपड्यांतील लोकांनी (वन खात्याच्या तसेच पोलीस विभागाच्या गणवेषाचा रंग) अवनीची दहशत थांबवण्यासाठी काहीतरी केले नसते तर जमावाने त्यांना चोपून काढले असते! आणि त्याशिवाय कॉर्बेटच्या दुसऱ्या अवतरणानुसार, दहशतीतून गंभीर अफवा पसरतात, विशेषतः जेव्हा शेकडो चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये हजारो माणसे राहात असलेल्या भागामध्ये तीन नरभक्षक वाघ फिरत असताना काय गोँधळ निर्माण झाला असेल त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही!

आता कोणी शफत अली नावाचा शार्प शूटर (शिकारी) आणि त्याचा मुलगा असगर यांच्या जंगल खात्याने केलेल्या नियुक्तीवरून झालेल्या विवादाकडे येऊ!बरे,आपल्यापैकी किती जण नरभक्षक वाघिणीला, जिने किमान तेरा लोकांना नक्की मारले आहे, तितक्याच लोकांना जखमी केले आहे आणि मानवी वसाहतीमधील अनेक पाळीव प्राणी मारले आहेत, आणि हो बहुतांश रात्रीच्या वेळेस फिरते, तिला मारण्याचे काम अंगावर घेऊ शकतात! माफ करा, वाघिणीला मारणे तर सोडा पण तिला जिवंतपणी इंजेक्शन मारून पकडण्याचा प्रयत्न करण्याचे आणि बेशुद्ध करण्याचे किती लोकांनी स्वीकारले असते!माझ्या माहितीनुसार हे बेशुद्धीचे इंजेक्शन किमान वीस मीटर अंतरावरून मारावे लागते व हे अंतर वाघीण काही सेकंदात पार करू शकते, काही मिनिटेही नाही, आश्चर्यकारक आहे, नाही? तुम्ही वनखात्यासाठी काम करणारे पशूवैद्यक असलात तरी हे काम करण्यासाठी किती जण कुशल असतात, तसेच तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला किती वेळा अशा रागावलेल्या नरभक्षक वाघिणीवर इंजेक्शन मारण्याचे कौशल्य वापरण्याची संधी मिळते, माझ्या वन्यजीवप्रेमी मित्रांनो तुम्ही हे कराल का, मी तर याचा प्रयत्न करण्याचे स्वप्नसुद्धा पाहणार नाही असे मी स्वतःबद्दल नक्की म्हणू शकतो! तिला रात्री शोधण्याबद्दल आणि मारण्याबद्दल बोलताना मला आणखी एक गोष्ट विचारायची आहे, संपूर्ण वन खाते माहिती घेत काही महिने तो भाग पिंजून काढत होते. आणि तुम्ही ज्या नरभक्षक वाघिणीचा अटोकाटपणे शोध घेत आहात, ती वाघीण सूर्यास्तानंतर दिसल्याची बातमी तुम्हाला मिळाली तर मोहिमेचे प्रमुख म्हणून तुम्ही काय कराल? माहिती आणणाऱ्याला सकाळी होईपर्यंत वाघिणीवर पाळत ठेवायला सांगाल की सकाळी सूर्य उगवेपर्यंत डार्टगन घेऊन तिचा पाठलाग करत राहाल? मी उपहासात्मक बोलत असेल तर मला माफ करा, पण अशा वेळेस मोहिमेचे प्रमुख म्हणून तुमची किंवा माझी मुख्य कार्यवाही कोणती असली असती हे जाणून घेण्यास मी खरेच उत्सुक आहे!

तर मला असे वाटते की वरील सर्व परिच्छेदांवरून तुम्हाला असे वाटू शकेल की अवनीला बंदुकीने मारल्यामुळे मी खुप आनंदी आणि समाधानी आहे, तर नाही, पण हाच प्रश्न संबंधित वन अधिकाऱ्याला विचारा आणि ते काय उत्तर देतात ते बघा! तीसुद्धा माणसे आहे आणि इतर सर्व प्राण्यांसह, त्यात माणूससुद्धा येतो, वाघांचे संरक्षण करणे हे त्यांचे काम होते, आहे आणि असेल!लक्षात घ्या, नरभक्षक झालेली आणि मारलेली अवनी ही पहिली वाघीण नव्हती, याकडे पाहण्याचा महत्त्वाचा पैलू असा की, अशा प्रकारे मरण पावलेली ती अखेरची वाघीण असेल आणि त्यासाठी आपण काय करणार आहोत असा माझा प्रत्येकाला प्रश्न आहे, केवळ काही वन्यजीवप्रेमींना नाही!एकेकाळी वाघांनी समृद्ध असलेल्या या देशामध्ये काही दशकांपूर्वी केवळ बाराशे वाघ शिल्लक राहिले होते; प्रत्येकाच्या प्रयत्नांनी आज हा आकडा जवळपास दुप्पट झाला आहे, तरीही फक्त गेल्या एका वर्षामध्ये जवळपास पन्नासहून अधिक वाघ आपल्या देशामध्ये मरण पावले आहेत, त्यासाठी आपण काय केले आहे? आज अवनीसाठी ओरड होत आहे, कारण ज्या खात्याने (वन) तिचे संरक्षण करणे अपेक्षित होते, त्याच खात्याने तिला गोळी मारली, तरीही याच वनखात्यामुळे ती दोन छाव्यांना जन्म देईपर्यंत जिवंत राहू शकली, आपण हे विसरत नाही का?या देशामध्ये महामार्गांवरून वेगाने जाणाऱ्या वाहनांखाली वाघ मरतात, जंगलातून जाणाऱ्या आणि रूळांवर कोणतेही अटकाव नसल्यामुळे रेल्वेच्या खाली सापडून वाघ मरतात, शेताभोवती घातलेल्या कुंपणामधून जाणाऱ्या विजेचा धक्का बसून वाघ मरतात, शिकारीमुळे वाघ मरतात, उन्हाळ्यामुळे पाण्याच्या शोधात दिवसाढवळ्या एखाद्या गावात यावे लागल्यामुळे जमावाच्या तावडीत सापडून वाघ मरतात, आपण आपल्या गरजांसाठी (मी हाव हा शब्द वापरणे टाळत आहे) वाघांच्या घरांवर दररोज अतिक्रमण करत असल्यामुळे त्यांची अधिवासक्षेत्रावरून दुसऱ्या वाघांशी लढाई होऊन वाघ मरतात आणि तरीही त्याबद्दल कोणीही काहीही करत नाही!पण केवळ आज आपण एक वाघ मारला, तेसुद्धा पुणे किंवा मुंबईतील नसलेल्या दुसऱ्या काही माणसांच्याच समूहाच्या दबावामुळे आणि आपण संपूर्ण व्यवस्थेला वाघाचे मारेकरी अशा रंगात रंगवत आहोत, खरंच काहीतरी गंभीर चूक होत नाही का येथे? आणि जर ती चुकीची कृती असेल तर केवळ वनखातेच नाही तर आपल्यापैकी प्रत्येकजण वाघाचा मारेकरी आहे आणि अखेरीस आपण एक दिवस केवळ वाघच नव्हे तर प्रत्येक प्राणीजात मारून टाकू, त्यासाठी आपण बंदूकही वापरणार नाही, तर आपण त्यांचे जे भाग्य लिहीत आहोत त्यामुळे ते आपोआप मरून जातील!

अवनी, माझी इतकीच इच्छा आहे की तुझा मृत्यू व्यर्थ जाऊ नये, कारण तुझ्या इतक्या प्रसिद्ध मृत्यूनंतरही ही केवळ एका सरकारी विभागाची चूक नाही तर वाघाचे किंवा चिमणीचेही संरक्षण कसे करावे हे माहित नसलेल्या संपूर्ण मानवी समाजाची चूक आहे हे आम्ही मनुष्य काही शिकणार नसू, तर खरोखर आपण वाघांच्याच नाहीतर चिमणीच्या सुद्धा सहवासाच्या योग्यतेचे नाही आहोत, हे कठोर वास्तव आहे, आता देवच वाघांना वाचवो !

संजय देशपांडे
smd156812@gmail.com



Saturday, 3 November 2018

दिवाळी शोध खऱ्या आनंदाचा!



















“आनंद हा कुठल्याही दुकानात किंवा ऑनलाईन  साईटवर मिळत नाही तर तो तुम्हाला तुमच्या स्वत:च्या कृतीतूनच   मिळवावा लागतो.”… दलाई लामा.

दिवाळी आली की वर्तमानपत्रे, टी.व्ही.चॅनेल्स,रेडीओ जाहिरातींनी भरून जातात. माझी एक अतिशय आवडती गोष्ट म्हणजे अॅमेझोन, रिलायन्स, अॅपल, बिग बझार आणि अशा अनेक मोठ्या ब्रँडच्या दिवाळीच्या जाहिरात मोहिमांचा अभ्यास करणे! खरोखरच, गेल्या काही दशकांपासूनच दिवाळी संपूर्ण देशभर सर्व थरात धर्म, जात आणि वर्ण यांच्या पलिकडे जाऊन साजरी केली जाते! १२० कोटी  लोकसंख्या असलेल्या या देशात, सर्व लोक एकत्रितपणे साजऱ्या करतात, अशा दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे भारताच्या क्रिकेट टीमचा विजय आणि दिवाळी! आता दिवाळीचे महत्त्व तुमच्या लक्षात आले असेलच आणि मग आपल्यासाठी तसेच आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रमैत्रिणींसाठी शॉपिंग करण्याइतका आनंदाचा दुसरा मार्ग कुठला! आनंदाची ही बदललेली संकल्पना हा भारताचा नवीन चेहरा आहे कारण जेव्हा आपण काम करत नसतो किंवा अभ्यास करत नसतो तेव्हा आपण खरेदी करत असतो, आपण मॉलमध्ये जातो, आपण ऑनलाईन शॉपिंग करतो, अगदी आपण सुट्टीसाठी कुठे गेलो तरीही स्थानिक गोष्टी खरेदी करतो आणि स्थानिक पदार्थ  चापतो. खरेच शॉपिंग मॉल म्हणजे आपल्या रीलॅक्सिंगसाठी सर्वोत्तम ठिकाण बनले आहे आणि ऑनलाईन शॉपिंग म्हणजे अगदी आपल्या सोफा कम बेडवरून न उठता रीलॅक्सिंगची गुरुकिल्ली! मला बऱ्याचदा माझ्या लहानपणाच्या दिवाळीची आठवण येते. फक्त दिवाळीतच आम्हाला नवीन कपडे खरेदी करता यायचे आणि इतर मोठ्या गोष्टी (म्हणजे घरातली भांडी) म्हणजे फ्रीज, टी.व्ही. सोफा सेट इ. खरेदी केले जायचे. दिवाळी म्हणजे अशी खरेदी करण्याची आणि ती समारंभपूर्वक घरी आणण्याची वेळ असायची म्हणजे अशा प्रकारे या वस्तू घरी यायच्या की सगळ्या गल्लीला ही खरेदी दिसेल! जरी हल्ली लोक संपूर्ण वर्षभर खरेदी करतच असले तरी काही कुटुंबांसाठी दिवाळी अजून खास सण आहे, कारण तेव्हा आपल्याला शॉपिंगचा आनंद लुटण्याची संधी मिळते आणि मार्केटिंग गुरूंना आपली भारतीयांची ही मनोवृत्ती चांगलीच कळली आहे! आणि अजून एक खास गोष्ट म्हणजे दिवाळी बोनस, तरी सध्या अनेक उद्योग ( उदा. रिअल इस्टेट) चांगल्या प्रकारे चालत नसल्यामुळे बोनसची जादू थोडी कमी झालेली दिसते. मला नेहेमी आश्चर्य वाटते की आधुनिक काळात दिवाळीसारख्या सणांचे खरेदी, खाणे आणि सुट्टी घेणे सोडून काही विशेष महत्त्व राहिले आहे का? कारण या गोष्टी सोडून कोणीही दुसरे काही करताना दिसत नाही. हो,सध्या दिवाळी पहाट(सकाळ)चा एक नवीन ट्रेंड आहे. यात संगीताच्या मैफली चढ्या तिकीट दरात आयोजित केल्या जातात आणि लोक नटून थटून त्यासाठी हजेरी लावतात, नंतर फेसबुक आणि इंस्टासारखे सोशल मिडिया दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या सेल्फीजनी भरून जातात. झाले, एवढेच!     

या पार्श्वभूमीवर मी माझ्या टीमला   माझं मनोगत लिहितो  कारण मला वाटते दिवाळी म्हणजे आपल्या आयुष्याचा विचार करण्याची विशेषत: आपल्या उत्सव साजरे करण्याच्या संकल्पनेचा विचार करण्याची वेळ आहे ...

प्रिय संजीवनी टीम,

पुन्हा एकदा नवीन दिवाळी साजरी करायची वेळ आलीये, मात्र मला आवर्जुन सांगावसं वाटतं की यंदाच्या दिवाळीला  एक रुपेरी किनार आहे. म्हणजे बहुतेक वेळा ऑफिसात बॉस लोक जेव्हा आणि जे काही लिहीतात ते आजूबाजूला घडणाऱ्या वाईट घडामोडी, धंद्यातली मंदी, तुम्ही तुमच्या कामात कशी सुधारणा केली पाहिजे अशाच गोष्टींविषयी असतं. तुम्ही सगळेजण अर्थातच अनेक वर्षांपासून संजीवनीसोबत काम करत आहात, काही जण तर अगदी स्थापनेपासून आहेत. असे असतानाही मला जर अजून आपल्या कंपनीमध्ये व भोवताली काय घडतंय हे सांगावं लागत असेल, तर सगळ्यात मोठा मूर्ख मीच ठरेन (म्हणजे, काहीवेळा मी करतोही मूर्खपणा ते जाऊ द्या)! खरंतर  हे पगारवाढीचं पत्रं नाही त्यामुळे मी रिअल इस्टेट किंवा आपली कामगिरी याविषयी काही सांगणार नाही. हे दिवाळीचं पत्रं आहे, म्हणुनच मी  दिवाळीचा खरा अर्थ काय आहे याविषयी थोडसं बोलणार आहे. तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की त्यात नवीन काय, दरवर्षी दिवाळी येते आणि तुम्ही आम्हाला पत्रं लिहीता. हे मान्य केलं तरीही दरवर्षी दिवाळी वेगळी असते, खरंतर प्रत्येक दिवस वेगळा असतो. म्हणुनच मी दरवर्षी दिवाळीचा वेगळा अर्थ शोधण्याचा व तिच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो.

मला तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी करणार आहात हे जाणून घ्यायला आवडेल. तुमचं उत्तर अर्थातच कुटुंब व मित्रांसोबत असं उत्तर असेल पण तुमची साजरं करण्याची व्याख्या काय आहे? खरेदी, खाणं-पिणं, प्रवास, कुटुंबियांच्या भेटीगाठी अशीच काहीशी उत्तरं असतील, पण हे सगळं तर वर्षंभरही केलं जाऊ शकतं, नाही का? दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. लक्षात ठेवा अंधार हा आपल्या आजूबाजूला नसतो तर आपल्या मनातच असतो. तुम्हाला मी काय म्हणतोय हे कदाचित आज लक्षात येणार नाही. पण विचार करा तुम्ही एखाद्या खोलीतला अंधार घालवण्यासाठी बाहेरून दिवे लावत नाही तर खोलीच्या आतमध्ये दिवा लावता. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या भोवतालचा अंधःकार नष्ट करायचा असेल तर तुम्हाला स्वतःला प्रकाशित करावं लागेल. म्हणजेच मनात कायम आनंदी व सकारात्मक विचार ठेवावे लागतील, असं मला सांगावसं वाटतं.

जीएसटी, रेरा, सतत बदलती धोरणं, पेट्रोलचे दर किंवा उत्पन्न व खर्चाचा न बसणारा ताळमेळ या समस्यांपेक्षाही आपल्या भोवतालची नकारात्मकता व आपण या नकारात्मकतेला आपल्या मनात घर करू देतो ही खरी आजची आपली समस्या आहे. आपल्या मनात नकारात्मक विचारांनी एकदा प्रवेश केला की ते एखाद्या संसर्गजन्य रोगासारखे पसरतात, आपल्या भोवतालच्या लोकांनाही त्याची लागण होते. म्हणूनच आपण सगळ्यांनीच आपल्यात सकारात्मकता निर्माण होईल अशा एखाद्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे, ज्यामुळे आयुष्य प्रकाशमान होईल आणि यासाठी आपल्याला फक्त स्वतःसाठी थोडा वेळ काढावा लागेल. या वेळात स्वतःला आनंद मिळेल असं काहीतरी करा मग ते एखादा चांगला चित्रपट बघणं असेल, एकांतात गाणं म्हणणं असेल, दुरवर एकटंच चालायला जाणे असेल किंवा टेकडी चढणे ! निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यामुळे आपल्यातच नव्यानं उत्साह संचारतो. थोडक्यात काहीही करा पण स्वतःसाठी थोडा वेळ द्या. एक लक्षात ठेवा आपल्याला आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्याचं मुख्य कारण म्हणजे ईतरांना खूष करण्याच्या नादात आपण स्वतः दुःखी राहता! पण स्वतःला आनंदी करणं म्हणजे इतरांना दुःखी करणं किंवा त्यांच्या भावनांचा आदर न करणं असा होत नाही! याचा अर्थ फक्त एवढाच आहे की आनंदाचा खरा अर्थ समजून घेणं. शेवटी रात्री झोपायला जाताना मात्र आपण आनंदी नसलो तर नक्कीच काहीतरी चुकतंय. उदाहरणार्थ एखाद्या खोलीतला दिवा जुना होऊन बंद पडल्यामुळे तिथे अंधार पसरला तर आपण काय करतो, फक्त तो दिवा बदलून टाकतो. दिवाळीसुद्धा हा आपल्या आतला दिवा बदलायची आणि नव्यानं सुरूवात करायची वेळ असते असं मला व्यक्तिशः वाटतं. खरंतर अंधार व प्रकाश  ही लढाई म्हणजेच वाईटपणा आणि चांगुलपणा यांची लढाई,हाच खरा संघर्ष आहे. याबद्दल (मार्व्हल, डिस्नेच्या माझ्या आवडत्या चित्रपटांचे आभार). ही अंधार व उजेडाची लढाई सतत सुरू असते व उजेडाचं म्हणजेच चांगुलपणाचं प्रतिनिधित्व करणारा सुपरहिरो तुमच्यातच आहे हे ओळखा !

आणखी एक गोष्ट, तुम्ही तुमच्या मनातल्या अंधाराला दूर लोटून ते प्रकाशित केलं (मला विश्वास आहे तुम्ही नक्की कराल) तर तो प्रकाश स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. मनाची कवाडं उघडून तो प्रकाश इतरांपर्यंतही पोहचू द्या जे कदाचित तुमच्याइतके सुदैवी नसतील. कारण एक सुपरहिरो इतरांचं आयुष्य अधिक चांगलं करण्यासाठी त्याची ताकद वापरतो व तुमच्या सकारात्मक विचारांच्या प्रकाशाशिवाय तुमच्याकडे दुसरी अधिक मोठी कोणती ताकद असू शकते? म्हणूनच तुम्ही जे काही चांगलं पाहिलं असेल किंवा शिकला असाल ते तुमच्या भोवतालच्या प्रत्येक व्यक्तीला सांगा, कदाचित त्यामुळे त्यांना त्यांच्यातला सुपरहिरो सापडेल. तुम्ही स्वतःला कितीही कमनशिबी समजत असला तरीही तुमच्यापेक्षाही कमनशीबी लोक जगात आहेत याची जाणीव ठेवा. तुम्ही फक्त अशा लोकांचा शोध घ्या व तुम्हाला एकदा ते सापडल्यानंतर, तुम्ही त्यांच्यासाठी काय करू शकता याचा विचार करा व तशी कृती करा.

आणखी  एक गोष्ट म्हणजे  या दिवाळीत फटाके  फोडु नका, हा संदेश जास्तीत जास्त पसरवा कारण आपल्याकडे आधीच भोवताली प्रचंड प्रदूषण आहे. आपले विचारही जात, पंथ, धर्म अशा भेदांनी प्रदूषित आहेत, हा सुद्धा एकप्रकारचा अंधःकारच आहे. यात भर म्हणुन आपल्याला अजुन फटाक्यांच्या प्रदूषणाची काय गरज आहे असा प्रश्न स्वतःला विचारावासा वाटतो. त्याऐवजी या दिवाळीला निसर्गासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करा, तुमच्या इमारतीभोवती एखादं झाड लावा, तुमच्या बाल्कनीमध्ये एखादी फुलांची वेल लावा. यामुळे तुम्ही एखाद्या फुलपाखराचं आयुष्य तरी  नक्कीच  उजळवू शकाल. हे करून पाहा, त्यानंतर तुम्ही स्वतःवर आणखी प्रेम करू लागाल, मन प्रकाशानं उजळून जाईल. मित्रांनो मी तुम्हाला, स्वतःचंच नाही तर इतरांचंही जीवन उजळून टाका, याहून आणखी काय शुभेच्छा देऊ? मला असं वाटतं तीच खरी दिवाळी! तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


संजय देशपांडे, नितीन महाजन
09822037109


Monday, 22 October 2018

बांधकाम व्यवसाय आणि पारदर्शकता





















 “व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पारदर्शकता कारण फक्त पारदर्शकतेमुळेच ग्राहकाचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो”... डेनिस मोरिसन.

डेनिस एम. मोरिसन या एक विख्यात अमेरिकन व्यावसायिक अधिकारी आहेत. त्यांनी 2011 ते 2018 पर्यंत कँपबेल सूप कंपनीच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. फॉर्च्युन मासिकाने 2011 साली “व्यवसायातील सर्वात शक्तिशाली 21 महिलांमध्ये” त्यांची गणना केली होती. मॉरिसन यांची 2010 साली कँपबेलच्या संचालिका म्हणून नियुक्ती करण्यात आली. अमेरिकेमध्ये असे व्यावसायिक अधिकारी विविध उद्योग समुहांचे नेतृत्व करत असल्यामुळेच तिथे सगळ्याच व्यवहारांमध्ये अतिशय पारदर्शकता असल्याचे मानले जाते. मला आठवतंय मी पहिल्यांदा अमेरिकेला गेलो होतो तेव्हा मला एक लॅपटॉप खरेदी करायचा होता. नेहमीप्रमाणे मी त्याचा वापर, हमी, त्याची वैशिष्ट्ये इत्यादींविषयी प्रश्न विचारत होतो. यावर  दुकानदाराच्या उत्तरामुळे मी गारच पडलो. तो मला म्हणाला की मी लॅपटॉप घरी नेऊन महिनाभर वापरून पाहू शकतो. त्यानंतर मला ते मॉडेल आवडलं नाही तर परत करून पैसे घेऊ शकतो. ही जवळपास २० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तोपर्यंत अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलेल्या माझ्या मित्राला विचारले, ‘समजा एखाद्या माणसाने महिनाभर लॅपटॉप वापरून परत केला आणि दुसऱ्या दुकानातून लॅपटॉप खरेदी केला तर काय?’ त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला ‘ही अमेरिका आहे. इथे व्यवहार विश्वासावर आणि पारदर्शकपणे होतात.’ दुर्दैवानं भारतीय लोक अमेरिकेचं कौतुक करतात मात्र आपल्या देशात व्यवसाय करताना त्यांच्या या व्यवसायाच्या मूलभूत तत्वाचा स्वीकार करत नाहीत, मग ते व्यापारी असो किंवा ग्राहक. जर हा व्यवसाय रिअल इस्टेट असेल तर कमी बोललेलंच बरं अशी परिस्थिती आहे. मी रेरासंदर्भात बोलतोय. माझ्या बोलण्यामुळे रेराचं (रेरा हे सरकारचं  खरोखरंच चांगलं पाऊल आहे) कौतुक करणाऱ्या सगळ्यांच्या भुवया उंचावल्या जातील. पण रिअल इस्टेटचे नियमन करण्यासाठी सरकारला रेरा (रिअल इस्टेट नियमन कायदा) लागू का करावा लागला असा प्रश्न मला विचारावासा वाटतो. रेरा लागू झाल्यानंतर रिअल इस्टेटमधली परिस्थिती सुधारली आहे का? मी रेरा लागू झाल्यानंतर रिअल इस्टेट उद्योगाचं आर्थिक गणित कसं बदललं याविषयी बोलत नाहीये. दिवसागणिक त्याचा ताळमेळ घालणं अवघड होत चाललंय, पण त्यासाठी अनेक घटक जबाबदार आहेत. मी रिअल इस्टेटमध्ये रेरानंतरची परिस्थिती व एकूणच पारदर्शकता व विश्वासाबद्दल बोलतोय.
 याचे कारण म्हणजे मी वर्तमानपत्रात बातमी वाचली की आता रेरा प्राधिकरणाने बांधकामस्थळी मंजूर झालेले आराखडे प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे. अरे व्वा किती कल्पक, छान, ग्राहकाभिमुख अशी अनेक विशेषणं माझ्या मनात आली, कारण आपण दररोज बांधकाम व्यावसायिक-ग्राहक संबंधांच्या आघाडीवर अविश्वासाचे नवनवीन विक्रम प्रस्थापित करतोय, असं दिसतंय. रेराच्या हेतूविषयी पूर्णपणे आदर वाटतो पण माझ्या माहितीप्रमाणे आपण सर्व प्रकल्पांशी संबंधित माहिती रेराच्या संकेत स्थळावर देणे अपेक्षित आहे. त्यामध्ये मंजूर झालेले सर्व आराखडे तसंच पुणे महानगरपालिका/पिंपरी चिंचवड महानगरपालिका इत्यादी सक्षम प्राधिकरणाकडून बांधकाम सुरू करायच्या परवानगीचे प्रमाणपत्र यांचा समावेश होतो. असं असेल तर मग घराच्या शोधात असलेला ग्राहक ते रेराच्या संकेतस्थळावर का पाहात नाही. असंही पुणे महानगरपालिकेनं पुण्यातल्या प्रत्येक विकासकाला बांधकामाच्या ठिकाणी जमीनीच्या मालकापासून ते मंजुरी क्रमांकापर्यंत प्रत्येक तपशील असलेला फलक लावणे बंधनकारक केले आहे. विकासकाला असा फलक बांधकामस्थळी लावल्याचे छायाचित्र जोडल्याशिवाय प्लिंथ तपासणीपासून ते भोगवटा प्रमाणपपर्यंत काहीच मिळत नाही. त्याशिवाय सगळी सक्षम प्राधिकरणं आता मंजुरीसाठी फक्त ऑनलाईन आराखडेच स्वीकारतात जे त्यांच्या संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध करता येऊ शकतात, व ते असं करत असल्याचा दावा करतात. म्हणूनच, बांधकाम स्थळी छापील स्वरूपातील आराखडे प्रदर्शित करून काय साध्य होणार आहे, आपण कागदविरहित व्यवस्थेकडे वाटचाल करणं आवश्यक आहे ना? मला असं वाटतं रेराचा कागदविरहित धोरणावर विश्वास नसावा!

रेराची समस्या (मला माफ करा पण हा एकमेव शब्द माझ्या मनात येतो आहे) अशी आहे की ते सगळं काही बांधकाम व्यावसायिकांकडूनच करून घेताहेत. म्हणजे मला मान्य आहे की बांधकाम व्यावसायिकालाच त्या प्रकल्पातून लाभ होणार असल्यामुळे त्यानेच बांधकामाचा आराखडा प्रदर्शित करणं वगैरेसारख्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण या बांधकामांना  मंजुरी देणाऱ्या विविध प्राधिकरणांचं काय त्यांना सुद्धा विविध कर व शुल्कांच्या स्वरूपात पैसे मिळत असतात, जे बांधकाम व्यावसायिकांच्या नफ्याहून जास्त असतात. विकासकांचं त्यांनी प्रकल्पांसाठी संकलित केलेला निधी फक्त संबंधित प्रकल्पांसाठीच वापरला जावा यासाठी एस्क्रो खातं असतं. त्याचप्रमाणे विशिष्ट भागातून किंवा उपनगरातून संकलित केलेलं विकास शुल्क तसंच इतर करांच्या निधीचा एक मोठा हिस्सा तरी त्या उपनगरात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठीच वापरला जाईल याची खात्री करण्यासाठी असंच करायला काय हरकत आहे? सरकारला (पुणे महानगरपालिका/पिंपरी चिंचवड महानगरपालिका/पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) प्रकल्प मंजूर करण्यासाठी पैसे आकारून, रेराअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पातून लाभ मिळत नाही का? त्यामुळे आपल्याला ग्राहकांसाठी पारदर्शकता हवी असेल तर त्यामध्ये पाणी पुरवठ्यापासून ते वीज पुरवठ्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा समावेश होत नाही का?

आता मंजूर आराखडे प्रदर्शित करायचा विचार तर चांगलाय पण रेरा त्यावर नियंत्रण कसं ठेवणार आहे? तसंच कोणतीही परवानगी न घेता सुरू असलेल्या हजारो बांधकामांचं काय? स्थानिक प्रशासकीय संस्थाही ती अवैध असल्याचं स्वीकारतात, पण त्यावर काय कारवाई केली जाणार आहे? या दुर्दैवानं या देशात प्रत्येक कायदा फक्त जे त्याचं पालन करणाऱ्यांसाठीच असतो, सदनिकाधारकांनाही आतापर्यंत हे समजलं आहे. माझा मुद्दा असा आहे की, एखादा सामान्य माणूस हापूस आंब्याची एखादी पेटीही खरेदी करायला गेला तर तो प्रत्येक आंब्याचा रंग, वास व आकार इत्यादी तपासून पाहतो. असं असताना लाखो रुपयांची सदनिका (घरं किंवा भूखंड) खरेदी करताना, रेरा किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेला ग्राहकांनी अशा घरांची वैधता तपासून पाहावी असं वारंवार का सांगावं लागतं. सरकारी संस्था विविध प्रकारच्या माध्यमांमधून अशा अवैध बांधकामांविषयी वारंवार घोषणा करत असतात, तरीही अशी अवैध बांधकामं सुरूच असतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे लोकही आपली आयुष्यभराची कमाई अशा अवैध घरांमध्ये गुंतवतात. रेरा किंवा इतर कोणतेही प्राधिकरण अवैध घरांविरुद्ध कडक कारवाई करू न शकल्यामुळे असे होते. ज्या सरकारने रेरा तयार केला आहे तेच अशी अवैध घरे बांधण्यात आल्यानंतर काही काळाने ती नियमित करते हे आता अगदी शाळकरी मुलालाही माहिती झालं आहे. एवढंच नाही तर या अवैध घरांना वीज पुरवठा, पाणी पुरवठा मिळतो, त्याच्या करारांची उप-निबंधक (एक सरकारी संस्थाच) नोंदणी करतात, त्याचशिवाय ग्राहकाला गृह कर्जही मिळते. प्रकल्पाच्या संकेतस्थळावर मंजूर आराखडे प्रदर्शित करण्याच्या बाबतीत कायद्याचे पालन करणारे केवळ काही मूठभर मूर्ख (बांधकाम व्यावसायिक) त्यांचे मंजूर आराखडे छापून, बांधकाम स्थळी प्रदर्शित करण्यासाठी खर्च करतील. आता मला कुणी ग्राहक हे आराखडे पाहायची तसदी घेतील का याचीही शंका वाटते, कारण त्यांना बांधकाम व्यावसायिक किती घासाघीस करतो, घरात कोणत्या प्रकारच्या फरशा आहेत, क्लब हाऊस किंवा जिम आहे का यातच जास्त रस असतो! अशा मंजूर आराखड्यांचा वापर (म्हणजेच गैरवापर) परिसरातले तथाकथित समाजसेवक करतील. अशा आराखड्यांचा बारकाईनं अभ्यास करून, त्यातील त्रुटी काढून, बांधकाम व्यावसायिकाला वेठीला धरतील. माझं बोलणं फार नकारात्मक वाटत असेल तर मला माफ करा पण आपल्या देशात केवळ कटू सत्य मांडण्यालाच (विशेषतः गाजावाजा झालेल्या लोकाभिमुख सरकारी धोरणांबद्दल) नकारात्मकता म्हणतात आणि माझे शब्दही या नियमाला अपवाद नाहीत!

रेराला घर खरेदी करणाऱ्यांना जर मदत करायची असेल तर जेव्हा खरेदी करार नोंदणीसाठी येतो तेव्हा त्याला केवळ मंजूर आराखडेच जोडणे बंधनकारक करा म्हणजे ते खऱ्या अर्थानं प्रभावी ठरेल. त्याचवेळी रेराची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा उलट तपासणी करण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ आहे का याचाही विचार व्हायला हवा. बांधकाम व्यावसायिकांना अधिक पारदर्शक करण्यासाठी या कायद्यांतर्गत काढण्यात आलेल्या शेकडो परिपत्रकांचं किंवा आदेशांचं काय होतंय? मी जेव्हा सरकारी कार्यशैलीचा विचार करतो तेव्हा, आपलं संपूर्ण शरीरच होरपळलेलं असताना आपण काही भागाला बरनॉल लावण्यासारखे तात्पुरते उपाय का करतोय हे कळत नाही, अशावेळी आपण तंत्रज्ञानाचा वापर का करत नाही? प्रकल्पाचं मार्केटिंग करणाऱ्या संकेत स्थळावर तसंच बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांमध्ये मंजूर आराखडे प्रदर्शित करणे बंधनकारक का केले जात नाही, कारण ग्राहक सदनिका आरक्षित करण्यासाठी आधी तिथेच जातात ना? त्याचवेळी सामान्य माणसांना चर्चासत्रं आयोजित करून तसंच समाज माध्यमांद्वारे जागरूक करा, कारण बहुतेक लोकांनी त्यांच्या आयुष्यात कधीही एखाद्या प्रकल्पाचा मंजूर आराखडाच पाहिलेला नसतो त्यामुळे तो कसा वाचायचा हे त्यांना माहितीच नसतं. त्यांना फक्त बांधकाम व्यावसायिकानं फर्निचरसहित (जे खरंतर कधीच बसत नाही) तयार केलेली त्रिमितीय दृश्यं व सादरीकरण व त्यावर लिहीलेली मोजमापंच समजतात. रेरा प्राधिरणाने त्यांच्या मंडळामध्ये आत्तापर्यंत प्रत्येक शहरामध्ये व गावामध्ये खाजगी वास्तुविशारदाची नियुक्ती का केलेली नाही, जे सदनिका खरेदी करणाऱ्यांना कार्यकारी ड्रॉईंग, सादरीकरण ड्रॉईंग व मंजूर ड्रॉईंग याविषयी जागरुक करतील. म्हणजे ग्राहक सदनिका निश्चित करण्यापूर्वी ही सगळी पडताळणी स्वतःहून करू शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोणत्याही मंजुरीशिवाय, तसेच रेराकडे नोंदणी न करता बांधल्या जात असलेल्या सर्व प्रकल्पांसंदर्भात काय केले जात आहे? जोपर्यंत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जात नाही तसंच तशी कृती केली जात नाही, तोपर्यंत कुणीही रेराचा किंवा कोणत्याही प्राधिकरणाचा किंवा त्यांच्या अशा “फतव्यांचा” म्हणजेच परिपत्रकांचा आदर करणार नाही!

यापुढे काय आता आपण विकासकाला मंजूर आराखडे प्रदर्शित केल्यानंतर विकास करार, 7/12, त्याचा आस्थापना कायदा परवाना किंवा चारित्र्य प्रमाणपत्रही प्रदर्शित करायला लावणार आहोत का? मी पुन्हा एकदा सांगतो की बांधकामच्या ठिकाणी मंजूर आराखडे प्रदर्शित करायला माझा विरोध नाही. कायद्याचे पालन करणाऱ्या इतर कोणत्याही व्यावसायिकाप्रमाणे मी माझ्या बांधकामाच्या ठिकाणी हे करेन, पण मुद्दा असा आहे की आपण कुणाला मूर्ख बनवतोय? तुम्ही कुणाही व्यक्तीवर पारदर्शकता लादू शकत नाही. तो एक दृष्टिकोन आहे ज्याचा आदर व्यवहाराच्या दोन्ही बाजूंनी केला पाहिजे. यातली महत्वाची गोष्ट म्हणजे कुणी फसवणूक करत असेल किंवा इतरांचा गैरफायदा घेत असेल त्यांना लवकर व कडक शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे ते पारदर्शकतेचा आदर करू लागतील. जोपर्यंत आपण अशी यंत्रणा तयार करत नाही तोपर्यंत फक्त मंजूर झालेले आराखडे व इतर दस्तऐवज केवळ संकेतस्थळावर प्रदर्शित करून खुश होऊ जो फक्त पारदर्शकतेचा बुरखा आहे! पण ज्या देशात जिथे अनेक जण बुरखा पांघरून वावरतात, तिथे आणखी काय अपेक्षा असू शकते?


संजय देशपांडे
Mobile: 09822037109