Friday, 15 May 2015

आनंदाचा निर्देशांक आणि बांधकाम व्यवसाय !






















एका विशिष्ट मर्यादेनंतर पैशामुळे नेहमी आनंद मिळेलच असे नाही. दहा दशलक्ष डॉलर कमावलेले लोक हे नऊ दशलक्ष डॉलर कमावलेल्या लोकांपेक्षा जास्त आनंदी असायलाच पाहिजे असे नाही  … हॉबर्ट ब्राउन

ब्राउन हा अमेरिकी मूर्तिकार व गतिमान प्रतिमांच्या स्पर्धेचा (कायनेटिक स्कल्पचर रेसिंग) प्रणेता होता. त्याचा असा विश्वास होता की प्रौढांनी आयुष्यात मौज मजा केली पाहिजे म्हणजे लहान मुलांना म्हातारे व्हावेसे वाटेल! त्याचे हे तत्वज्ञान व समाजाने त्यानुसार जगावे यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नामुळेच अमेरिका आज ज्या स्थानावर आहे.त्यात त्याचे मोठे योगदान आहे! जगभरातील लोक अमेरिकेत किंवा पाश्चिमात्य देशात यायला व स्थायिक व्हायला उत्सुक असतात; याचे कारण म्हणजे आनंद नेमका काय आहे हे त्यांना इतरांपेक्षा अधिक चांगले समजले आहे!

जेव्हा आपण आनंदाविषयी बोलतो तेव्हा व्यक्तिपरत्वे त्याविषयीची मतं बदलत असतात. मात्र अलिकडेच मी बहुतेक सर्व वृत्तपत्रांमधून अतिशय रोचक बातमी वाचली, ती म्हणजे आनंदाच्या निर्देशांकाविषयी! ब-याच जणांना हे पाश्चिमात्य देशांचं विशेषतः अमेरिकेचं खूळ वाटेल कारण ते प्रत्येक गोष्ट कुठल्यातरी परिमाणाने मोजण्याचा प्रयत्न करत असतात, मग ती संपत्ती असो किंवा स्वयंचलित वाहने किंवा अगदी रोज किती आईसक्रिम खाल्लं याचं मोजमाप असो! मात्र भावना किंवा आनंदासारखी भावना सर्वसामान्य निकषांवर कशी मोजता येईल तसंच त्याचा निर्देशांक कसा तयार करता येईल? आपल्या हिंदू तत्वज्ञानामध्ये आपण आनंदापेक्षा मन:शांतीचा अधिक विचार करतो मात्र आपला आजचा चर्चेचा विषय हा नाही, त्याविषयी आपण पुढील एखाद्या लेखात चर्चा करु व या लेखात आनंदाच्या निर्देशांकावर बोलू. हा निर्देशांक एखाद्या देशाचे नागरिक म्हणजेच आपल्या भाषेत बोलायचं झालं तर “आम आदमी” किती आनंदी आहेत हे ठरवतो. या निर्देशांकात भारत ब-याच खालच्या पायरीवर होता हे सांगायची गरज नाही. आनंद निर्देशांकावरील १५८ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक ११७ वा होता! बांग्लादेश आणि पाकिस्तान सारख्या शेजारी देशातील नागरीक सुद्धा आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहेत. या क्रमवारीमध्ये आपल्या देशातील नागरिक एवढ्या मोठ्या प्रमाणात दुःखी आहेत हे काही चांगले लक्षण नाही! यातही पुन्हा बरेच जण म्हणतील की त्यात काय नवीन? आपण एक  विकसनशील देश आहोत व आपल्याकडे ब-याच समस्या आहेत, त्यामुळे लाखो लोक दारिद्र्यरेषाखाली असताना आपण कसे आनंदी राहू शकतो? अवतरणात म्हटल्याप्रमाणे संपत्ती हा या निर्देशांकाचा एक निकष असला तरीही इतरही बरेच घटक आहेत, ज्यावर समाजाचा आनंद मोजला जातो व हे घटक आपण राहत असलेल्या परिसराशी संबंधित आहेत. आनंद निर्देशांकाच्या बातमीचा आपल्या उद्योगाशी जवळचा संबंध आहे ज्याचा मी भाग आहे, रिअल इस्टेट उद्योग तसेच आपण ज्याला घर म्हणतो त्याचाही आपल्या जीवनातील आनंदाशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. आपण याविषयी पुढे बोलूच, उत्सुकतेने मी निर्देशांक तयार करण्यासाठी कोणते निषक वापरण्यात आले हे वाचू लागलो! हे निकष अतिशय सोपे होते, त्यामध्ये स्वाभाविकपणे दरडोई उत्पन्नाचा समावेश होता, तसंच दयाळुपण, स्वातंत्र्य, सरासरी वय व भ्रष्टाचार यासारख्या घटकाचाही समावेश होता! मी हा निर्देशांक तयार करण्यासाठी नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक घटकाचा विचार करु लागलो.
सर्वप्रथम आपण दरडोई उत्पन्नाचा विचार करु; आपला देश विकसनशील आहे हे आपण सर्वजण जाणतो जेथे लाखो लोकांना प्यायचे पाणी किंवा पोषक आहार किंवा राहण्यासाठी स्वतःचे घर यासारख्या पायभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. आण्विक ऊर्जा निर्मितीसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी आपण पाश्चिमात्य देशांवर अवलंबून आहोत व एवढेच काय आपली संरक्षण व्यवस्थाही या विकसित देशांच्या कृपेवरच अवलंबून आहे. अनेक शहरांना किंवा गावांना जोडणारे रस्त्यांचे जाळे आपल्याकडे नाही किंवा आपल्या देशात सर्वत्र समान वीज वितरण जाळे नाही, त्यामुळे अनेक कुटुंबे विजेपासून वंचित आहेत हे तथ्य आहे. सार्वजनिक आरोग्य स्थितीही अतिशय वाईट आहे व कोट्यवधी लोकांना मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. आपल्या हिंदू तत्वज्ञानात भौतिक सुखांना त्याज्य मानण्यात आले असले तरीही मूलभूत गरजा खरेदी करण्यासाठी पैसाही महत्वाचा घटक आहे, म्हणूनच त्याचा कोठेतरी संबंध आनंदाशी आहे. हे दरडोई उत्पन्न तसंच, स्वतःचे पडवडण्यासारखे घर हे घटक थेट आपल्या लोकसंख्येशी निगडित आहेत! आनंद निर्देशांक काढताना रिअल इस्टेट उद्योगाचा इथेच संबंध येतो. स्वतःचे घर नसलेल्या व्यक्तिचा किंवा कुटुंबाचा विचार करा, त्यांच्या मनामध्ये सर्वात पहिला विचार येतो तो भाड्याने सदनिका घेण्याचा, मालकाने घर सोडायला सांगितले तर काय ही चिंता त्यांना नेहमी सतावते! दुसरीकडे स्वतःचे घर असलेल्या कुटुंबाचा विचार करा, ते कितीही गैरसोयीचे असले तरीही कर्जमुक्त घरामुळे त्यांना विश्वास असतो की त्यांना कुणीही त्यांच्या घरातून बाहेर जायला सांगणार नाही. मी जेव्हा त्यांना कुणीही बाहेर जायला सांगणार नाही असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ संपूर्ण मालकीहक्क असलेले घर, म्हणजे अगदी सरकारही त्यांना ते खाली करायला सांगणार नाही. जेव्हा घरासारखी मूलभूत गरज पूर्ण होते तेव्हा कुटुंबांतील व्यक्ती आनंद निर्देशांकावर एक पायरी वर जातात कारण त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य मिळालेले असते, त्यांच्याकडे हक्काचे घर असते. जीवनात एखाद्या उद्दिष्टाचा किंवा हेतूचा अभाव हे दुःखाचे मुख्य कारण आहे. कुणीही व्यक्ती भोवतालच्या व्यक्ती आनंदी असल्याशिवाय आनंदी होऊ शकणार नाही व एकत्र राहणा-या लोकांच्या आनंदाचा एक महत्वाचा घटक म्हणजे स्वतःचे घर कारण त्यामुळे आपल्याला अतिशय आरामदायक वाटते!
तुमच्याकडे एकदा तुमचे घर असल्यावर तुम्ही दयाळूपणाविषयी विचार करु शकता म्हणजे वाटून घेण्याची किंवा देण्याची सवय! स्वतःच्या गरजा पूर्ण झाल्यामुळे आनंदी असलेले एक मनच इतरांच्या गरजांचा विचार करु शकते व समाजासाठी उदारपणे काही करु शकते! एखादी व्यक्ती सतत स्वतःचे घर खरेदी करण्याचा विचार करतेय व त्यासाठी पै-पै गोळा करण्यामागे लागतील आहे तिचा विचार करा; एखाद्या व्यक्तिला स्वतःच पैशांची गरज असताना ती संत असल्याशिवाय इतरांना देऊ शकेल का आणि हा काही साधुसंतांचा जमाना नाही हे वास्तव आहे! तसेच आपल्याला उदारपणा हा काही शाळा कॉलेजातून शिकवला जात नाही, तर आपल्या बालपणी घरीच त्याचं बाळकडू मिळतं. इतरांना देणे म्हणजेच उदारपणा व त्याचा पहिला धडा आपल्याला घरी मिळतो, मात्र त्यासाठी आपल्या घरातले वातावरण आनंदी हवे. इथेही रिअल इस्टेट उद्योगाची भूमिका अतिशय महत्वाची असते कारण आपण केवळ सदनिका विकण्यासाठी बांधकाम करत नाही तर त्या सदनिकांमध्ये राहणा-या नागरिकाचे जीवन आरामदायक करण्यासाठी बांधकाम करतो जो आनंदाचाच मार्ग आहे. मुलांच्या पालकांना बांधकाम व्यावसायिकाने दिलेले घर आरामदायक वाटत नसेल; त्यांच्या मेहनतीच्या पैशाच्या मोबादल्यात त्यांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नसेल तर असे पालक त्यांच्या मुलांना दातृत्व व उदारपणा यासारख्या गोष्टी कशा शिकवू शकतील? त्याचवेळी यामध्ये सरकारची भूमिकाही अतिशय महत्वाची असते कारण घर चार भिंती व छपरांचे बनत असले तरीही त्याचा परिसर व त्या परिसरातील अनेक घटक महत्वाचे असतात जे बांधकाम व्यावसायिक देऊ शकत नाही तर सरकारने ते देणे अपेक्षित असते. यामध्ये रस्ते, सांडपाणी, रुग्णालये, क्रीडागंणे यांचा समावेश असतो; अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये या सुविधाही देण्यात आलेल्या असतात मात्र एका इमारतीसारख्या प्रकल्पांचे काय? ते देखील कर भरतात व त्यांचाही जीवनातील या सर्व सुविधांवर तेवढाच अधिकार आहे, ज्या केवळ काही सुदैवी लोकांसाठीच्या आरामदायक सुविधा नाहीत!
त्यानंतर मुद्दा येतो स्वातंत्र्याचा; आता पुन्हा बरेच जण म्हणतील की आपण स्वतंत्र देश आहोत तर मग आनंदामध्ये स्वातंत्र्याची काय भूमिका आहे? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आपण खरोखरच आनंदी आहोत का? स्वतःला भारतीय, स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणवणे म्हणजे स्वातंत्र्य असा अर्थ होतो का?  स्वातंत्र्याचा नेमका अर्थ आपण समजून घेतलेला नाही व तेच आपल्या दुःखाचे मुख्य कारण आहे. स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल ते करणे असा अर्थ होत नाही तर आपल्या जबाबदा-या समजून घेणे व त्यांचे पालन करणे यातच खरे स्वातंत्र्य आहे! उदाहरणार्थ मी सकाळी खेळायला जाण्यासाठी कारने जात आहे व लाल सिग्नल असल्यामुळे थांबलो आहे, मात्र वाहतूक पोलीस नसल्याचे पाहून अनेक गाड्या माझ्यापुढे सटकतात व माझ्या मागील गाड्या हॉर्न वाजवत राहतात व लाल सिग्नल असूनही माझ्यावर पुढे जाण्यासाठी ओरडतात! यामुळे मला खरोखर वाईट वाटते कारण इथे लोकांना लाल सिग्नल तोडणे म्हणजे स्वातंत्र्य असे वाटते! रस्त्यावर कचरा टाकण्यापासून ते पदपथावर थुंकण्यापर्यंत अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील, असे करुन एखादी व्यक्ती तिचा व्यक्तिगतआनंद उपभोगत असेल तर ती त्यावेळी इतर शेकडो व्यक्तिंना दुःखी करत असते हे तथ्य आहे! म्हणूनच आपण स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय हे आधी शिकून घेतले पाहिजे व स्वतःचे घर निवडण्यापासून त्याचे पालन केले पाहिजे. इथे बरेच जण विचार करतील की स्वतःचे घर निवडण्याशी याचा काय संबंध आहे? आजूबाजूला सर्व प्रकारचे बांधकाम व्यावसायिक आहेत, मात्र आपल्याला स्वतःचे सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झालेले घर हवे असेल तर अवैध घरांमध्ये राहणा-या लोकांकडे पाहून आपण दुःखी होता कामा नये, त्यासाठी कदाचित कमी पैसे लागले असतील मात्र ते ख-या अर्थाने स्वातंत्र्य देणारे घर नाही! याच कारणाने सरकारने अवैध बांधकामांना आळा घातला पाहिजे व कायदेशीरपणे घरे बांधणा-या प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाने अवैध बांधकामांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे कारण कायद्याचे पालन करण्यातच आनंदाची बिजे आहेत त्याचे उल्लंघन करण्यात नाहीत, हा संदेश इथे स्पष्टपणे दिला पाहिजे!

सरासरी वय या घटकाबाबत आपण अतिशय सुदैवी आहोत, वैद्यकीय सुविधांमुळे सरासरी वय निश्चितच वाढले आहे व समाज सुदृढ असल्याचे हे एक लक्षण आहे व जो आनंदी असण्याचा परिणाम आहे! रिअल इस्टेटने याची दखल घेतली पाहिजे की त्यांचा ग्राहक पन्नाशीतला नाही तर विशीतला आहे! या वयोगटातील ग्राहक अतिशय आग्रही असतात व आधीच्या ग्राहकांच्या तुलनेत ते या घरांमध्ये त्यांच्या आयुष्याचा जास्त कालावधी घालवणार असतात. म्हणूनच या वर्गाच्या गरजांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे व त्या पूर्ण केल्या पाहिजेत, म्हणजेच त्यांना त्यांच्या गरजांनुसार परिसर मिळेल व त्यांना शांतपणे म्हणजेच पर्यायाने आनंदाने जगता येईल!   

शेवटचा मात्र महत्वाचा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचार जो आनंदाशी निगडित आहे! अमेरिका व युरोपसारख्या देशातही भ्रष्टाचार आहे मात्र सामान्य माणसाला क्वचितच त्याला तोंड द्यावे लागते. रिअल इस्टेटमध्ये सदनिका धारकाला सदनिकेचा ताबा घेतल्यानंतरही ब-याच आघाड्यांवर भ्रष्टाचाराला तोंड द्यावे लागू शकते, उदाहरणार्थ विजेच्या मीटरवर त्याचे नाव लावणे, मालमत्ता करावर नाव बदलणे किंवा अगदी नव्या मालमत्ता कार्डासारखे अगदी मूलभूत दस्तऐवज मिळवणे किंवा नव्या घराच्या पत्त्यासह नवीन शिधापत्रक मिळवणे, रिअल इस्टेटमध्ये भ्रष्टाचाराच्या अनेक वाटा असतात हे कटू सत्य आहे! केवळ पैसेच द्यावे लागतात असे नाही तर ही संपूर्ण प्रक्रिया इतकी दमछाक करणारी असते की त्यामुळे माणूस वैतागतो व स्वाभाविकपणे अशा परिस्थितीत कुणी आनंदी असेल अशी अपेक्षा करता येत नाही! एक बांधकाम व्यावसायिक म्हणून आपल्याला शिधापत्रिका मिळवून देता येणार नाही मात्र व्यक्तिच्या घराशी संबंधित औपचारिकता आपण पूर्ण करायचा प्रयत्न केला तर तिला आनंद मिळवून देण्यात नक्कीच आपला हातभार असेल! अनेकदा आपण ऐकतो की विजेच्या मीटरसारख्या औपचारिकता पूर्ण न करताच बांधकाम व्यावसायिक घराचा ताबा देतात व त्यामुळे सोसायटीची स्थापना लांबणीवर पडते त्यामुळे आपल्यावर अवलंबून असलेल्या या कुटुंबांच्या दुःखात भर पडते.

मित्रांनो एखाद्या व्यक्तिला कशामुळे दुःख होईल हे जाणून घेणे अतिशय सोपे आहे, मात्र एखाद्या व्यक्तिला कशामुळे आनंद होईल हे समजून घेणे अतिशय अवघड आहे; म्हणूनच आपण दुःखाची कारणे शक्य तितकी कमी करु शकतो, आनंद मिळविण्याचा तो एक खात्रीशीर मार्ग आहे. आपल्याला या निकषांवरुन समजेल की आनंद बराचसा व्यक्तिच्या किंवा समूहाच्या परिसरावर अवलंबून असतो व आपण लोकांना अजिबात त्रास होणार नाही असा परिसर दिल्यास त्यांना शांतपणे राहता येईल त्यामुळे त्यांचे जीवन आनंदी होईल! शेवटी एक विकासक म्हणून आपल्या प्रकल्पांमधून किती पैसे मिळाले हे मोजण्यापेक्षा, आपल्या प्रकल्पांद्वारे किती लोकांचे जीवन आपण आनंदी केले यातच आपले व्यावसायिक यश मोजायला शिकले पाहिजे !  केंद्र सरकाराने देशभरात स्मार्ट शहरे विकसित करण्यावर भर दिला आहे व त्याच अनुषंगाने राज्य सरकारही हरित शहरे विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे मात्र त्याऐवजी आनंदी शहरे बांधणे किंवा नियोजित करणे ही खरी काळाची गरज आहे. आपण बांधत असलेल्या कोणत्याही शहराचे उद्दिष्ट हेच असले पाहिजे व त्यासाठी केवळ मानवी जीवनासाठी थोडीशी काळजी असली पाहिजे तसेच ज्या हेतूने आपण ही शहरे बांधत आहोत त्याविषयी थोडी बांधिलकी असली पाहिजे! याचप्रकारे आनंदी देशाची निर्मिती करता येईल व ज्या दिवशी प्रत्येक विकासकाला व सरकारला हे कळेल, तेव्हा किमान आनंद निर्देशकांच्या बाबतीत आपल्या देशाचे नाव तळाशी असणार नाही!

संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स





Saturday, 2 May 2015

माननीय मुख्यमंत्री महोदय यांस एका मध्यमवर्गीय बिल्डरचे पत्र !

























माननीय मुख्यमंत्री महोदय 

पुरवठा नेहमी मागणीनुसार केला जातो …

रॉबर्ट कॉलियर

रॉबर्ट कॉलियर या अमेरिकी लेखकाने २०व्या शतकात स्व-सहाय्यता तसेच नव विचारांची तत्वज्ञानविषयक पुस्तके लिहीली. आयुष्याच्या बहुतेक काळात त्याने लेखन, संपादन व संशोधन केले. त्याचे ‘सिक्रेट ऑफ एजेस (१९२६)’ हे पुस्तक अतिशय गाजले. त्याने चंगळवादाची व्यावहारिक मानसिकता, इच्छा, विश्वास, कल्पना, आत्मविश्वासपूर्ण कृती व वैयक्तिक विकास या विषयांवर लेखन केले. आता कुणालाही प्रश्न पडेल की स्व सहाय्यताविषयक लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या लेखकाच्या अवतरणाशी एका बांधकाम व्यावसायिकाचे काय देणेघेणे आहे? परिस्थिती फारशी आशाजनक नसली तरीही आपल्या रिअल इस्टेटसाठी निश्चितच फारशी वाईट नाही व आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मते तर बांधकाम व्यावसायिकांची परिस्थिती तर अतिशय चांगली आहे व माझी खात्री आहे की “माय बाप जनताही” माननीय मुख्यमंत्र्यांच्या मताशी सहमत असेल. वाचकांची उत्सुकता आणखी न ताणता मी सांगतो की अलिकडेच बांधकाम व्यावसायिकांच्या मुंबईमध्ये आयोजित एका बैठकीमध्ये, माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाचे मथळे खूप गाजले व मी त्यांचे ते शब्द इथे देत आहे (मी त्या बैठकीमध्ये हजर नव्हतो, मात्र माध्यमांमध्ये जे काही छापण्यात आले ते शब्द देत आहे). “बांधकाम व्यावसायिकांना कोणत्याही धोरणात सवलत द्यायची काय गरज आहे? कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाने कधीही त्याचा नफा सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला आहे का? सरकारने बांधकाम व्यावसायिकांवर उपकार करायची काय गरज आहे? मला कोणीही बांधकाम व्यावसायिक भेटायला येतो तेव्हा तो शासनाकडून केवळ उपकारांचीच मागणी करतो! मी सर्व बांधकाम व्यावसायिकांना परवडणारी घरे बांधण्याचे आवाहन करतो, आता उपकार पुरे झाले! अरे वा, “टाळ्या टाळ्या टाळ्या” बिचारा बांधकाम व्यावसायिक सोडून सर्वांनी या विधानाचे कौतुक केले, मला माहिती आहे की अनेकांच्या मते बिचारा बांधकाम व्यावसायिक हा शब्दच अस्तित्वात नाही, मी स्वतः पण काही बिचारा आहे असे नाही मात्र रिअल इस्टेटची परिस्थिती पाहता मला असे म्हणणे भाग पडले आहे!  मा. मुख्यमंत्र्यांनी फक्त टाळ्या मिळवण्यासाठी असे विधान केले असे नाही किंवा बांधकाम व्यावसायिक काही राजा हरिश्चंद्र नसतो हे मला अमान्य आहे असे नाही, पण मला सांगा आजच्या जगात राजा हरिश्चंद्र कोण आहे? अर्थात याचा अर्थ असा होत नाही की कुणी तसे व्हायचा प्रयत्न करु नये मात्र एखादी व्यक्ती उपाशी असेल तर ती इतरांना जेवू घालेल अशी अपेक्षा आपण नक्कीच करु शकत नाही! इथे मला साम्यवादाविषयी अतिशय चांगली गोष्ट आठवतेय ती मी इथे सांगतो …(माझ्या साम्यवादाविषयी कोणत्याही कटू भावना नाहीत, केवळ एक ऐकीव गोष्ट इथे सांगतोय)
एक कट्टर साम्यवादी कार्यकर्ता एका गरीब शेतक-याला साम्यवादाची संकल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता, तो म्हणाला भाऊ तुझ्याकडे दोन घरं असती तर त्यातलं एक तू तुझ्या बेघर मित्राला दिले नसतेस का? शेतक-याने उत्तर दिले होय मी दिले असते! त्याच्या उत्तराने खुश झालेल्या त्या पक्ष कार्यकर्त्याने त्याला पुढचा प्रश्न विचारला की तुझ्याकडे दोन ट्रॅक्टर असते तर त्यातला एक तू तुझ्या शेजारी शेतक-याला दिला नसतास का? शेतकरी पुन्हा म्हणाला हो मी दिला असता! त्या कार्यकर्त्याला असे वाटले त्याने त्याचा मुद्दा पटवून दिला, त्यानंतर त्याने शेतक-याला विचारले की तुझ्याकडे दोन शर्ट असते तर तू घातलेला शर्ट दिला असतास का? त्यावर शेतकरी म्हणला नाही मी माझा शर्ट दिला नसता! हे ऐकून पक्षाच्या सदस्याला आश्चर्य वाटले व त्याने विचारले की तू घर द्यायला तयार आहेस, ट्रॅक्टर द्यायला तयार आहेस, मग शर्ट द्यायला का तयार नाहीस? त्यावर शेतक-याने उत्तर दिले, महाशय माझ्याकडे केवळ एकच शर्ट आहे!
 ही गोष्ट स्पष्ट करते की  तुम्ही प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेली कोणतीही गोष्ट देऊ शकता; पण प्रत्यक्षात मात्र परिस्थितीलाच शरण जाता! आता आपण इथे काही साम्यवादाविषयी चर्चा करत नाही मात्र माननीय मुख्यमंत्री जेव्हा बांधकाम व्यावसायिकांनी नफा वाटण्याविषयी व गरजू लोकांसाठी घरे बांधण्याविषयी बोलतात तेव्हा रिअल इस्टेटमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे पाहणे आवश्यक ठरते! तसेच माननीय मुख्यमंत्र्यांना असेही वाटते की प्रत्येक बांधकाम व्यावसायिक समाजातील गरजू लोकांसाठी घरे बांधण्याचे त्यांचे काम करण्याऐवजी काही ना काही उपकार मागतो! आधुनिक भारतामध्ये विशेषतः झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात घरबांधणी क्षेत्रात सर्वात मोठी पोकळी आहे! मात्र घर म्हणजे केवळ चार भिंती व त्यावर एक छप्पर असा होतो का? घर म्हणजे त्यापेक्षाही बरेच काही असते व दुर्दैवाने माननीय मुख्यमंत्र्यां ना घराची व्याख्या पूर्णपणे लक्षात आलेली दिसत नाही! इथे मला माननीय मुख्यमंत्र्यांना अतिशय वैयक्तिक बाब सांगाविशी वाटते; श्री. देवेंद्र फडणवीस, हे आपल्या राज्याचे तडफदार व तरुण मा. मुख्यमंत्री मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत व याच वर्गाला एका साध्या घराची अत्याधिक गरज असते. कारण अतिशय श्रीमंत माणूस पैशाच्या जोरावर त्याच्या इच्छेप्रमाणे घर खरेदी करु शकतो व अतिशय गरीब लोक पदपथावरही दिवस काढू शकतात ! मध्यमवर्गीय लोकांनाच मात्र निवा-यासाठी कुठेही जागा नसते! मा. मुख्यमंत्री महोदय तुम्ही ज्या मध्यवर्गात मोठे झाला आहात त्याच वर्गातून मी आलो आहे व विदर्भात नागपूरजवळच्या खामगावसारख्या लहानशा गावात स्वतःचे बंगलेवजा छोटेखानी घर बांधताना सिमेंटच्या प्रत्येक गोणीसाठी माझ्या आई-वडिलांना कसे झगडावे लागले हे मी पाहिले आहे, हा भागही तुम्ही ज्या परिसरातून वाढला आहात तोच आहे! म्हणून एका मध्यमवर्गीय कुटुंबाला स्वतःचे घर बांधण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागतात हे आपण दोघेही जाणतो. माझे नशीब मला पुण्यात घेऊन आलं व मी बांधकाम व्यावसायिक झालो तर तुमच्या कर्तुत्वाने व नशिबाने तुम्ही मुख्यमंत्री बनलात ! राज्यातल्या सर्वोच्च पदावर तुम्ही आहात, तसेच नागरी विकास खातेही तुमच्याकडे आहे, जे राज्यासाठीच्या कोणत्याही गृहनिर्माण धोरणासाठी सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे आहे! माझे बहुतेक ग्राहक मध्यमवर्गातील किंवा उच्च मध्यमवर्गातील असल्याने त्यांना पैशांची मर्यादा असतेच व माझ्या मागेही कौटुंबिक व्यवसायाचे पाठबळ नसल्याने, मी स्वतःलाही मध्यमवर्गीय बांधकाम व्यावसायिकच मानतो!
म्हणूनच तुम्ही बांधकाम व्यावसायिकांच्या भूमिकेविषयी जे मत मांडले त्याविषयी आज मी माझ्या भावना इथे सांगणार आहे! देवेंद्र दा (इथे थोडे वैयक्तीक उल्लेखाचे स्वातंत्र्य घेतल्याबद्दल माफ करा मात्र मला तसे वाटले म्हणून लिहीले) सर्वप्रथम घर म्हणजे काय याची योग्य व्याख्या करा म्हणजेच चार भिंती व छप्पराचे घरात रुपांतर करण्यासाठी काय करावे लागते. उदाहरणार्थ आपल्या राज्यात लाखो एकर पडिक जमीन आहे मात्र आपण ती घरे बांधण्यासाठी वापरु शकतो का कारण कोणत्याही घरामध्ये जमीन हा मुख्य घटक असतो. मात्र जमीनीसाठी पायाभूत सुविधा आवश्यक असतात ज्यामध्ये पाणी, वीज, रस्ते, सांडपाण्यापासून ते आजकालच्या इंटरनेटसारख्या गरजांचाही समावेश होतो. त्यानंतर आपल्याला रुग्णालये, मॉल, शाळा, मैदाने, सार्वजनिक वाहतूक व मनोरंजनाची अनेक केंद्रेही आवश्यक असतात. त्यानंतर आपल्याला रोजगार आवश्यक असतो कारण त्याशिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालेल? चार भिंतींच्या भोवती हे घटक असल्यावरच त्यांचे घर बनते, तर मला सांगा राज्यामध्ये वरील घटकांची परिस्थिती कशी आहे? पुण्यासारख्या शहरातही सार्वजनिक वाहतुकीची परिस्थिती चांगली नाही, बहुतेक उपनगरांमध्ये  पुरेसा पाणी पुरवठा होत नाही, इमारतींचे सांडपाणी वाहून नेणारी गटारे नाल्यात सोडली जातात व, आपण वृत्तपत्रांमध्ये दररोज त्यांची छायाचित्रे पाहतो! संपूर्ण पुणे शहरासाठी एकच कचरा डेपो आहे, परिणामी एका आड एक महिन्याने या कचरा डेपोच्या परिसरातील नागरिकांदरम्यान वाद होतात व संपूर्ण शहर या नागरिकांच्या दयेवर असते! सार्वजनिक वाहतूकही अतिशय गंभीर मुद्दा आहे, सर्वांनी तसेच पुणे ज्या गणपती आणि मारुतींसाठी प्रसिद्ध आहे अगदी त्यांनीही या समस्येपुढे हात टेकले असतील मात्र त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही व प्रत्येक गल्लित तसेच मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा खोळंबा आता नेहमीचाच झाला आहे! आता पीएमसीच्या शाळा व रुग्णालयांविषयी, केवळ जे कुठेही जाऊ शकत नाही केवळ तेच अशा रुग्णालयांमध्ये किंवा शाळांमध्ये दाखल होतात. कुठल्याही क्षेत्रातील आमदाराला किंवा नगरसेवकाला विचारा की त्यांची मुले कोणत्या शाळेत जातात किंवा ते आजारी पडल्यास उपचार घेण्यासाठी कुठे जातात? मला असे वाटते की त्यांच्या उत्तरातून आपल्याला शासकीय यंत्रणेद्वारे दिल्या जाणा-या तथाकथित सुविधांची खरी परिस्थिती समजेल!
 या पार्श्वभूमीवरही शहर वाढतेय कारण खेड्यांमध्ये व लहान शहरांमधील परिस्थिती पुणे शहरापेक्षा किंवा राज्यातल्या कोणत्याही मोठ्या शहरापेक्षा वाईट आहे! अनेक दिवस वीज पुरवठा होत नाही, टँकर लॉबीने दया केली तर पाणी मिळते, या अतिशय मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत तसेच रोजगारही उपलब्ध नाही. परिणामी माझ्यासारख्या पदवीधारकांना गाव सोडून पुण्यासारख्या मोठ्या झोपडपट्ट्यांचा आसरा घ्यावा लागतो! याचे एकमेव कारण म्हणजे मला इथे किमान उपजीविकेसाठी रोजगार मिळतो, थोडे जास्त पैसे देऊन मला पाणीही मिळू शकते, जे मला माझ्या गावात परवडत नाही. मात्र आपण याला शहरांची वाढ म्हणतो! संजय देशपांडेंसारखे असंख्य मध्यमवर्गीय सुशिक्षित मूर्ख पुण्यात स्थलांतरित होत आहेत, म्हणुनच बांधकाम व्यवसायिक नावाची प्रजाती तग धरुन आहे मात्र कोणाच्या दयेवर? या प्रश्नाचे आपण विश्लेषण करायची वेळ आली आहे!
अलिकडेच वृत्तपत्रांमध्ये एक बातमी आली की पीएमआरडीए म्हणजेच पुणे महानगर विकास प्राधिकरण नावाच्या नवीन संस्थेने स्वाक्षरी करायची किंवा जिल्हाधिका-यांनी स्वाक्षरी करायची याचा निर्णय न झाल्याने असंख्य फाईल्स  अनेक महिन्यांपासून प्रलंबित होत्या! एक बांधकाम प्रस्ताव मंजूर होण्यास एखाद्या महिन्याचाही उशीर झाल्यास लाखो रुपयांचा फरक पडू शकतो कारण जमीनीच्या दरांवर कोणत्याही सरकारचे नियंत्रण नसते व कोणत्याही बँका जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज देत नाहीत. त्यामुळेच माझ्यासारख्या बांधकाम व्यवसायिकांना कुणाला तरी पैसे देण्याची विनंती करावी लागते किंवा उसने घ्यावे लागतात (तुमच्या व माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलांसाठी दरोडा घालणे हा पर्याय खुला नाही) व त्यावरील व्याज दरदिवशी वाढतच असते! ज्या भागांमध्ये सर्व पायाभूत सुविधा आहेत तेथील जमिनींच्या किंमती माझ्यासारख्या बांधकाम व्यवसायिकाच्याही आवाक्याबाहेरच्या आहेत व जेथे पायाभूत सुविधा नाहीत तेथे जमीन खरेदी करण्याचा काय उपयोग? कारण अशा ठिकाणी माझ्या भूखंडापर्यंत रस्त्यासारख्या सोयी कधी केल्या जातील मला माहिती नाही तर मग अशा ठिकाणी कोण सदनिका खरेदी करेल? यातला विनोदाचा भाग म्हणजे मला परवानगी देणा-या प्रत्येक प्राधिकरणाला शुल्क द्यावे लागते व ते माझ्याकडून लिखित आश्वासन घेतात की अशा कोणत्याही पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी त्यांची नाही तर नागरिकांना या सुविधा उपलब्ध करुन देणे ही बांधकाम व्यावसायिकाची जबाबदारी आहे! माझ्यासारख्या बिचा-या बांधकाम व्यावसायिकांना शरणागती पत्करण्याशिवाय व अशाप्रकारे लिखित आश्वासन देण्याशिवाय पर्याय नसतो कारण माझ्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी इतर कोणतेही प्राधिकरण नाही! या प्रक्रियेलाही अनेक महिने लागतात तसेच त्यामध्ये अनेक अडथळेही असतात उदाहरणार्थ कधी तलाठ्यांचा संप असतो तर कधी संबंधित अधिका-यांवर नैसर्गिक आपत्ती आलेल्या गावाचे स्थलांतर करण्याची जबाबदारी असते त्यामुळे माझ्या फाईलवर स्वाक्षरी करायला कुणीच उपलब्ध नसते! त्यानंतर पर्यावरणविषयक परवानगीसारख्या बाबी असतात ज्या काहीवेळा अतार्किक वाटतात, तरीही मी त्या स्वीकारल्यास परवानगी मिळण्यासाठी किमान सहा महिने जातात, कारण संपूर्ण राज्यासाठी दोन किंवा तीनच समित्या आहेत व या सर्व समित्या पर्यावरण संवर्धनाचे स्पष्ट निकष ठरवू शकत नाहीत व सरकार स्थानिक संस्थेच्या पातळीवर पर्यावरण संवर्धनासाठी सोपा मार्ग शोधू शकत नाही!
सुदैवाने, मी असे सगळे अडथळे पार केल्यानंतर मालकी हक्काचा काहीही वाद नसेल तरी, आपल्या राज्यामध्ये सर्व परवानग्या घेतल्यानंतर, योग्य ते सर्व करार करुन जमीन ताब्यात घेतल्यानंतरही जमीनीच्या मालकाचा कुणीतरी मृत बहीण किंवा भाऊदेखील कबरीतून बाहेर येऊ शकतो व जमीनीवर मालकीहक्काचा दावा करु शकतो व माननीय न्यायालय त्याचा किंवा तिचा दावा मान्य करतात व प्रत्येक शासकीय प्राधिकरणालाही असा कोणताही दावा आल्यानंतर काम थांबविण्याचा आदेश द्यायला अतिशय आनंद होतो! कुणालाही न्याय मागण्याचा अधिकार नाकारला जाऊ नये हे मान्य असले तरीही मालकी हक्कांच्या बाबतीत कोण योग्य आहे व कोण अयोग्य आहे हे ठरविण्यासाठी लागणा-या वेळाचे काय? हा वेळ वाया जात असताना व्याजाचे ओझे कोण सहन करते? अर्थातच माझ्यासारखा मध्यमवर्गीय बांधकाम व्यावसायिला, वेळ वाया जाऊ नये म्हणून काहीतरी तडजोड करावी लागते व त्यामुळे पुन्हा जमीनीचा खर्च वाढतो!
सुरुवातीचे हे सगळे अडथळे पार केल्यानंतर मी जेव्हा माझा प्रकल्प सुरु करतो तेव्हा बाजारामध्ये वाळूच उपलब्ध नसते कारण सरकारने वाळू उपसण्याचे परवानेच दिलेले नसतात! किंवा वाळू व खडी वाहतुकदारांचा त्यांच्या वाहनाच्या भार वाहून नेण्याच्या क्षमतेविषयी काहीतरी धोरणात्मक वादामुळे संप असतो, त्यामुळे मला थांबणे भाग पडते किंवा ही माणसे जो दर मागतील तो द्यावा लागतो! त्यानंतर टोळी वाले, मी जाणीवपूर्वक टोळी हा शब्द वापरतोय कारण तथाकथित माथाडी कामगारच्या नावाखाली सुद्धा प्रत्येक विकसकाकडून असे लोक पैसे उकळतात, इतरही अशा अनेक घटकांमुळे या व्यवसायाच्या उत्पन्नाला गळती लागते जी भरुन काढणे आवश्यक आहे. एमएसईडीसीएल म्हणजेच एमएसईबीकडे पैसे नसल्याने मला माझ्या प्रकल्पासाठी वीज वितरणाचे जाळे बसविण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात, तसेच त्यासाठी आधीपासूनच खराब स्थितीत असलेले रस्ते खणण्याकरीता मला स्थानिक संस्थेला शुल्क द्यावे लागते! मात्र एमएसईडीसीएल हा खर्च विचारातच घेत नाही कारण हे त्यांच्या कार्यक्षेत्रात नाही असे ते म्हणतात, म्हणून मला एका एमएसईबी मीटरसाठी जवळपास एक लाख रुपये खर्च येतो, पण त्याची काळजी कुणाला आहे!
हे अग्निदिव्य पार केल्यानंतर विक्रीची खात्री नसतानाही मी वेळेत प्रकल्प पूर्ण करणं अपेक्षित असतं, नाहीतर नवीन कायद्यानुसार आश्वासनाचे पालन न केल्यामुळे मला कदाचित तुरुंगातही जावे लागेल! आता तुम्हीच सांगा माननीय मुख्यमंत्री महोदय, इथे बांधकाम व्यावसायिकांनी सरकारकडून कोणते उपकार मागितले आहेत? मी मोफत जमीन मागितलेली नाही, किंवा मी कमी दराने सिमेंटचा पुरवठा व्हावा अशी मागणी केलेली नाही, महोदय मला कोणत्याही सवलती नको आहेत! मला केवळ माझ्या प्रकल्पांसाठी ठोस व निश्चित धोरण हवे आहे, व माझ्या प्रकल्पास वेळेत ती सगळी मंजुरी मिळाली पाहिजे, जी मी घेतली पाहिजे असे तुम्हाला वाटते! आता हे उपकार आहेत असं तुम्हाला वाटतं का? नवीन गृहबांधणी कायद्यात मी आश्वासनांची पूर्तता केली नाही तर मला तुरुंगात टाकायची तरतूद आहे, तर मग सरकारचे काय? पाणीपुरवठा विभागाचे एनओसी असेल किंवा कुप्रसिद्ध एनए परवानगी असेल त्यासाठी वेळेची कोणतीही मर्यादा नसते? स्थानिक संस्थांनी नागरिकांना पायाभूत सुविधा देण्याविषयी दिलेल्या आश्वासनांचे काय, हे नागरिक व बांधकाम व्यावसायिक त्यांच्याकडून जे कर मागितले जातात ते सर्वप्रकारचे कर देतात! इथे एक रोचक तथ्य सांगावेसे वाटते की सदनिकेच्या किमतीपैकी जवळपास अकरा टक्के भाग विविध करांच्या स्वरुपात सरकारकडे जमा होतो, उदाहरणार्थ मुद्रांक शुल्क, सेवा कर, व्हॅट व एसईएस; या बदल्यात सदनिकाधारकाला काय मिळते तर केवळ उपेक्षा. इथे आणखी एक महत्वाचा पैलू आहे की सरकारला वाटते बांधकाम व्यावसायिक वाढत्या दरांचा व नफ्याचा लाभ घेत आहेत, मात्र दरवर्षी सरकार रेडी रेकनर दर म्हणजेच विक्री मूल्य निर्देशांक वाढवते व त्यामुळे सदनिकाधारकांवरचे ओझेच वाढते. बांधकाम व्यावसायिकांसह सरकारही वाढीव मालमत्ता दराचा लाभ घेते किंवा त्याचा हिस्सा घेते कारण या रेडी रेकनर दरामुळे हजारो कोटी रुपये मिळतात.
यात सर्वोत्तम मार्ग म्हणजे सरकारने बांधकाम व्यावसायिकांचे काम करावे व माझ्यासारख्या लोकांना कंत्राटदार म्हणून नियुक्त करावे व आम्हाला विक्री तसेच निश्चित बांधकाम दराची खात्री द्यावी कारण सध्या मी जेव्हा प्रकल्प सुरु करतो तेव्हा तो संपेपर्यंत अंतिम खर्च किती असेल हे मला माहिती नसते म्हणूनच योग्य ती खबरदारी घेऊन मी विक्री केली तर माझ्यावर अतिरिक्त नफा कमावण्याचा किंवा परवडणारी घरे न देण्याचा आरोप केला जातो! माध्यमे व शासनकर्त्यांद्वारे असे काही चित्र रंगवले जाते की कधी-कधी मला स्वतःविषयीच शंका वाटू लागते की, सामान्य माणसाचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात एकमेव मी सामान्य माणसाचा गुन्हेगार आहे का? मा. मुख्यमंत्री मला माफ करा मात्र समाजाला अधिक चांगल्याप्रकारे सेवा देण्याच्या तुमच्या हेतुंविषयी मला शंकाच नाही व मी मान्य करतो की या उद्योगामधील काही व्यक्तिंच्या कृतीमुळे या उद्योगाची बदनामी झाली आहे, मात्र काही चांगले लोकही असतात, म्हणूनच त्यांचे काय म्हणणे आहे हे देखील ऐकून घेतले पाहिजे! प्रत्येक मागणी म्हणजे उपकार नाही हे विचारात घ्या व मला काही समस्या असेल तर मी तुमच्याकडे नाही तर कुणाकडे जायचे; हे देखील कृपया मला सांगा! मला केवळ माझ्या भावना सांगायच्या होत्या ज्या माझ्यासारख्या अनेक मध्यमवर्गीय बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करतात, म्हणूनच माझ्या मनातलं थेट इथे मांडण्याची हिंमत केली! रिअल इस्टेट हा परवडणारा व्यवसाय किंवा उद्योग झाला तरच परवडणारी घरे देता येतील त्यासाठी कोणत्याही सवलतींची किंवा उपकारांची गरज नाही तर व्यवहार्य धोरणाची गरज आहे! तुम्ही आमच्या उद्योगातील कुणाही दहा मान्यवर लोकांना त्यांची व्यवसायाची पार्श्वभूमी तपासून मग बोलवा, त्यांचे याविषयीचे मत ऐकून घ्या, त्यांना तुमच्या चमूसोबत बसवा व यानंतर एक वर्षभर लागले तरी चालेल मात्र प्रत्येक प्रकारच्या घरासाठी ठोस धोरण तयार करा व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, मग मुंबईसारखी महानगरे असतील किंवा आपल्या विदर्भातील लहानसे गाव असेल व त्यानंतर परिणाम पाहा!  आपण इथे ताज महाल बांधण्याविषयी चर्चा करत नसून समाजातल्या प्रत्येक घटकाला परवडतील अशी साधी घरे बांधण्याविषयी बोलत आहोत, दुर्दैवाने आपण विसरतो की ताजमहाल बांधण्यासाठी कोणतेही आर्थिक निकष किंवा धोरण नव्हते मात्र परवडणा-या घरांसाठी ते आवश्यक आहे व त्यासाठी आपले प्रयत्न आवश्यक आहेत!
आपल्याला हे करता येत नसेल तर, प्रत्येक जण परवडणा-या घरांविषयी एकमेकांवर आरोप करत राहील व या प्रक्रियेमध्ये पंचतंत्राच्या गोष्टीप्रमाणे, मांजरी भांडत राहतील व माकड लोण्याचा गोळा घेऊन जाईल व आपल्याकडे काहीच मिळणार नाही!
मला अशा आहे की तुम्ही हा लेख वैयक्तिक टीका म्हणून घेणार नाही, कारण एक मध्यवर्गीय बांधकाम व्यावसायिकला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नाराज करून परवडु शकत नाही!  कृपया लक्षात घ्या की तुम्ही व्यक्त केलेले मत इतर कुणा राजकीय नेत्याने मांडले असते तर मी ते हसण्यावारी नेले असते व सोडून दिले असते. मात्र कुठेतरी आम्हा सर्वांना तुमच्याकडून अतिशय जास्त अपेक्षा आहेत व आम्ही तुमचा आदरही करतो व माझ्यासाठी माझा धर्म असलेल्या व्यवसायाविषयी मला जे वाटते ते तुम्हाला सांगावेसे वाटले, कारण तरच शेवटी या राज्यामध्ये परवडणा-या घरांसाठी काही आशा असू शकते!

माझे म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल आधीच अनेक धन्यवाद!

आपला एक मध्यमवर्गीय बांधकाम व्यावसायिक!

संजय देशपांडे










Tuesday, 28 April 2015

पुण्याचा ऐतिहासीक वारसा आहे कुठे?






















एका आईचे आपल्या मुलाशी जे नाते असते तेच एका व्यक्तिचे त्याच्या  ऐतिहासिक वारशाशी असते…     जॉन हेन्रिक क्लार्क

जॉन हेन्रिक क्लार्क, हे अखिल-आफ्रिकी लेखक, इतिहासतज्ञ, प्राध्यापक, व ६० च्या दशकाच्या उत्तरार्धात अनेक आफ्रिकन व व्यावसायिक शिक्षण संस्थांचे प्रवर्तक होते. जॉन क्लार्कसारख्या व्यक्तिंमुळेच, अमेरिकेसारख्या देशाचा इतिहास अगदी अलिकडचा असूनही तिथे हजारो ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करण्यात आले आहे; मी जाणीवपूर्वक ऐतिहासिक वारसा इमारती असा शब्द वापरला नाही व त्याचे कारण मी या लेखात पुढे सांगेन. माझ्यासाठी सर्वोत्तम भाग किंवा एक जमेची बाब म्हणजे मी बांधकाम व्यावसायिक असण्यासोबतच मला पर्यावरण क्षेत्रातील कामाचाही थोडाफार अनुभव असल्याने मी समाजाच्या अनेक वर्गांच्या संपर्कात येतो, अशी संधी एक सामान्य माणूस म्हणून मला मिळाली नसती! अशाच एका संपर्कामध्ये सेंट मेरीज शाळे च्या  काही विद्याथिर्नी मला त्यांच्या प्रकल्पासंदर्भात भेटल्या ज्याचा विषय होता पुण्याचा ऐतिहासिक वारसा. सर्वात आदरणीय व जुन्या शाळांपैकी असल्यामुळे सेंट मेरी शाळेची इमारत अशा ऐतिहासिक वारसा इमारतींपैकी एक आहे, मात्र या मुलींची प्रश्नावली कशा प्रकारची असेल याचे मला कुतूहल होते. शाळकरी किंवा महाविद्यालयीन मुलांशी गप्पा मारायला मला नेहमीच आवडतं कारण त्यांच्या कुतुहल व उत्साहामुळे त्यांच्या डोक्यातून काय बाहेर येईल हे जादुच्या टोपीतून काय येईल याचा अंदाज लावण्यासारखं असतं!
यावेळीही माझी निराशा झाली नाही कारण त्या विद्यार्थ्यांशी पुण्याच्या जे काही शिल्लक आहे अशा ऐतिहासिक वारशाविषयी जी चर्चा झाली त्यातूनच मी हा लेख लिहीला!
मुलींनी मला त्यांचे प्रश्न ईमेलद्वारे पाठवले होते व या मुलाखतीचे ध्वनीचित्रमुद्रण केले जाणार होते, ज्यात मला पाठविण्यात आलेल्या प्रश्नांविषयी माझे काय मत आहे किंवा काय उत्तर आहे हे सांगायचे होते. मी इथे माझे शिक्षण व काम यासारखे वैयक्तिक प्रश्न वगळून ऐतिहासिक वारशाशी संबंधित प्रश्न देत आहे …
१. पुण्याच्या ऐतिहासिक वारशाविषयी तुमचे काय मत आहे?
२. या ऐतिहासिक वारसा स्थळांचे संवर्धन करण्यासाठी काय केले पाहिजे?
३. तुमच्या मते त्यांच्या ढासळत्या परिस्थितीचे काय कारण आहे?
४.   ऐतिहासिक वारशाचे जतन करताना, नव्या इमारतींचा विकास थांबविता येणार नाही. या दोन्हींमध्ये कशाप्रकारे संतुलन साधता येईल असे तुम्हाला वाटते?
५. पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी काय करता येईल असे तुम्हाला वाटते?
६. तुम्हाला आम्हाला आणखी काही मार्गदर्शन करावेसे वाटते का?

या प्रश्नांमधूनच लेखात काय मांडले जाणार आहे याची झलक तुम्हाला मिळाली असेल मात्र मी उत्तर द्यायला सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांना एक प्रश्न विचारला जो त्यांच्याकडून किंबहुना त्यांच्या शिक्षकांकडून राहिला होता. तो प्रश्न म्हणजे “तुम्ही ऐतिहासिक वारसा वास्तु किंवा स्थळाची व्याख्या कशी करता?” ९व्या इयत्तेतील वयोगटाकडून मला फार काही असाधारण उत्तरांची अपेक्षा नव्हती, केवळ यासंदर्भातील त्यांचे मत जाणून घ्यायचे होते. तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाले तर त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली, ऐतिहासिक वारसा इमारत म्हणजे जिला काही इतिहास आहे व तिचे वय जास्त आहे इत्यादी उत्तरे त्यांनी दिली. यात काहीच चुकीचे नव्हते, तुम्ही एखाद्या प्रौढ व्यक्तिला विचारले तरीही तिचे उत्तर साधारण असेच असेल. आपण जेव्हा पर्यावरण किंवा ऐतिहासिक वारसा यासारख्या विषयांचा विचार करतो तेव्हा आपला दृष्टिकोन चाकोरीबद्ध असतो, कारण आपल्याला चाकोरीबाहेरचा विचार करायला शिकवलंच जात नाही.
मी त्या मुलींना सांगितलं की ऐतिहासिक वारसा ही एखादी वास्तुच असली पाहिजे असं नाही तर मनुष्य किंवा पूर्णपणे निसर्गनिर्मित गोष्ट सुद्धा ऐतिहासिक वारसा स्थळ असू शकते! उदाहरणार्थ पुण्यातली सर्वात जुनी गोष्ट कोणती? त्यांनी उत्तर दिले शनिवारवाडा, याचे उत्तर खरंतर “जेएम मार्गावरील पाताळेश्वर गुंफा” आहे हे त्यांना माहिती नव्हते; अर्थात हे ब-याच जणांना माहिती नसते! मी त्यांना आपल्या नदीचे काय असे विचारले? यावर त्या हसल्या व नदी पुण्यात सर्वात जुनी असून शहराला सर्वोत्तमप्रकारे सेवा दिल्याचे त्यांनी मान्य केले. त्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही नदीचा विचार ऐतिहासिक वारसा म्हणून का केला नाही?  विचार करा एंप्रेस उद्यानातील जुना वटवृक्ष असो, नदी असो किंवा पर्वती असो, आपल्याकडे कितीतरी नैसर्गिक स्थळे ऐतिहासिक वारसा आहेत व आपण ती विचारातही घेत नाही. अशा प्रकारे माझ्या उत्तरांना सुरुवात झाली. म्हणूनच माझ्या मते आपण सर्वप्रथम ऐतिहासिक वारसा म्हणजे काय हे निश्चित केले पाहिजे व आपण आपली व्याख्या केवळ काही इमारतींपुरतीच मर्यादित ठेवू नये ज्यामध्ये काही ऐतिहासिक व्यक्तिंचा निवास होता. तर इतिसाची साक्षीदार असलेले तसेच माणसाची कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवा केलेले प्रत्येक स्थळ किंवा अगदी परिसरही ऐतिहासिक वारसा मानला पाहिजे. मला असे वाटते ऐतिहासिक वारशाची व्याख्या तीच असली पाहिजे व हीच व्याख्या आपण मुलांच्या मनावर बिंबवली पाहिजे.
पुण्यातल्या ऐतिहासिक वारसा स्थळांची परिस्थिती आपण जाणतोच; आपण रस्ते, सार्वजनिक शौचालये यासारख्या दैनंदिन गरजेच्या गोष्टींची देखभाल करु शकत नाही तर मग काही जुन्यापुराण्या इमारती व स्थळांची देखभाल करायचा कुणाला वेळ किंवा रस आहे! आपल्या वर्तमानकाळाविषयी आपला दृष्टिकोन आपल्या वारशांना आपण कशी वागणूक देतो यातून दिसून येतो व आज आपण तो पाहात आहोत! मला शंका आहे की कुणाही शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेकडे पुण्यात नेमकी किती ऐतिहासिक वारसा स्थळे आहेत याची अचूक यादी असेल का, त्यांची परिस्थिती जाणून घेणे ही तर दूरची गोष्ट झाली! ज्या इमारतींचा आपल्याला विविध प्रकारे उपयोग झाला ज्यांना आपण ऐतिहासिक वारसा म्हणतो, त्यांची आपण देखभाल करु शकत नाही, तर मग नद्या किंवा पर्वतांची काय कथा? पुणे मनपा मध्ये एक ऐतिहासिक वारसा कक्ष आहे व राज्यपातळीवर पुरातत्वशास्त्र विभाग आहे ज्याने केवळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या वास्तु हाताळणेच अपेक्षित आहे. असे असुनही कुणीही ऐतिहासिक वारसा स्थळांची थेट जबाबदारी घेत नाही हे तथ्य आहे. सर्व ऐतिहासिक वारसा स्थळांची व इमारतींची एक यादीही आहे मात्र आपण त्यांचे काय करतो असे कोडे मला पडते! ऐतिहासिक वारसा स्थळांच्या ढासळत्या परिस्थितीचे कारण म्हणजे आजच्या समाजाचा आपल्या भूतकाळाविषयी दुर्लक्ष करण्याचा व भौतिकतावादी दृष्टिकोन. आपल्याला भौतिकदृष्ट्या लाभदायक आहेत असे वाटणा-या गोष्टींनाच आपण महत्व देतो! उदाहरणार्थ आपण मॉल किंवा मल्टिप्लेक्सची काळजी घेतो कारण त्या आपल्या बाजारहाटीच्या किंवा मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करतात व यांच्याबाबतीत काही गैर आढळले तर आपण लगेच सोशल मिडियासकट सगळीकडे  त्यावर आवाज उठवतो मात्र शनिवारवाड्यासमोर पर्यटकांसाठी व्यवस्थित वाहनतळ नसेल किंवा शौचालय नसेल तर त्याची काळजी कुणालाही नसते कारण आपण विरंगुळ्यासाठी शनिवारवाड्यावर क्वचितच जातो! म्हणूनच आपली ऐतिहासिक वारसा स्थळे आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तिंसारखी आहेत, आपल्याला त्यांची गरज नसते म्हणूनच आपण त्यांच्यासाठी काही करत नाही!

कोणत्याही ऐतिहासिक वारसा स्थळाचे जतन करणे म्हणजे ते जुन्या स्वरुपात ठेवणे असे नाही तर आपण त्याला कार्यरत ठेवले पाहिजे. शेरलॉक होम्सच्या प्रसिद्ध बेकर स्ट्रिट हाउसप्रमाणे, कोणतेही ठिकाण ज्या हेतूने वापरले जात होते त्या भावनेचे जतन झाले पाहिजे. अलिकडेच सर्व वर्तमानपत्रांमध्ये राज्य सरकार डॉ. आंबेडकर लंडनमध्ये ज्या घरात राहिले ते घर ताब्यात घेणार व त्यासाठी काही अब्ज पौंड खर्च केले जातील अशी एक मोठी बातमी होती. या निर्णयाविरुद्ध काही आकस नाही, मात्र डॉ आंबेडकर ज्या घरात जेमतेम दोन वर्ष राहिले त्यासाठी आपण काही अब्ज डॉलर खर्च करु शकतो, मात्र त्यांच्या जन्मस्थळाविषयी व जेथे त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य घालवले त्याचे काय? त्यांचा जन्म कुठे झाला व त्या ठिकाणाची परिस्थिती नेमकी कशी आहे हे कुणाला माहिती तरी आहे का व आता त्या ठिकाणाची परिस्थिती काय आहे? त्याचप्रमाणे पुण्यामध्ये लोकमान्य टिळक व आगरकर यासारख्या अनेक महान व्यक्तिंचे वास्तव्य होते, ही यादी वाढतच जाईल, त्यांच्या निवासस्थानांचे व त्यांनी जेथे काम केले त्या वास्तुंचे काय?

आधुनिक वास्तुरचनेच्या मदतीने नव्या व जुन्याचा अचूक मेळ घालून ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करता येईल. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात जिथे शनिवार वाडा किंवा इतरही अनेक जुन्या इमारती आहेत तिथल्या इमारती पाहा. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला अगदी लागून बांधल्या जात असलेल्या उड्डाण पुलाचंच उदाहरण घ्या. अभियांत्रिकी महाविद्यालय अतिशय उत्तम ऐतिहासिक वारसा इमारत आहे. महाविद्यालयातल्या इमारतींच्या रचनेचा विचार करुन उड्डाण पूल बांधला जाऊ शकत नाही का? त्याशिवाय फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नावाने प्रसिद्ध असलेला एफसी रस्ता विकसित करताना महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाशी त्यांचे संतुलन राखता आले असते मात्र त्याची काळजी कुणाला आहे? एक लक्षात ठेवा आपण आज जी काही रचना करतोय व बांधतोय ती उद्याचा ऐतिहासिक वारसा असणार आहे. आपण त्यानुसारच नियोजन केले पाहिजे, कारण येत्या अनेक पिढ्या या इमारती वापरणार आहेत व तिचा ऐतिहासिक वारसा होण्यासाठी तिला काळाची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे! आपल्याला अशा एका धोरणाची गरज आहे जे कोणत्याही ऐतिहासिक वारसा इमारतीच्या आजूबाजूचा परिसर विकसित करताना अडथळा ठरणार नाही. संपूर्ण परिसरच ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करण्यात मदत करेल मात्र नदी किंवा पर्वती पाहा, या ठिकाणांच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्ट्या, कच-याने तुंबलेली गटारे पाहा व आपल्याला असे वाटते की आपण ऐतिहासिक वारशाचे जतन करत आहोत!

आपल्याला ऐतिहासिक वारसा ओळखता आला पाहिजे व त्याचा आदर करता आला पाहिजे कारण तो आपल्या संस्कृतीचा कणा आहे. या ठिकाणांना आपल्या शहराच्या सुशोभिकरण योजनेचा एक भाग बनवा व त्यांच्यासाठी निधी देऊन तसेच खाजगी सहभागातून त्यांची देखभाल करा. शहराचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काय महत्व आहे याविषयी सर्व भागधारकांना जागरुक करा, आपल्याला त्यांचा व्यावसायिक वापरही करता येईल. उदाहरणार्थ सिंगापूरच्या जुन्या शहराचा व भविष्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांचा ऐतिहासिक वारसा नकाशा आहे, त्यांनी या स्थळांचा मार्ग तयार केला आहे. आपण अशा कल्पना का राबवत नाही? आपल्या आजूबाजूला असे अनेक देश आहेत ज्यांना ऐतिहासिक वारसा पर्यटनाचा व्यावसायिक फायदा झाला आहे, नेपाळ त्यापैकीच एक आहे! आपण अतिशय अभिमानाने स्वतःला ऐतिहासिक वारसा शहर म्हणून मिरवतो मात्र प्रत्यक्षात तो केवळ पोकळ दावा आहे! स्वतःला एक प्रश्न विचारा की कुणी बाहेरील व्यक्ती आपल्याकडे आली आणि आपल्याला पुण्याचा ऐतिहासिक वारसा दाखवायला सांगितला तर आपण तिला काय दाखवणार आहोत? म्हणूनच पर्यावरणाप्रमाणेच ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यालाही प्राधान्य द्या व आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश करा. आपण लवकरात लवकर या दिशेने विचार करायला सुरुवात केली पाहिजे कारण जे शहर किंवा जो देश आपल्या भूतकाळाचा आदर करत नाही तो लवकरच इतिहासजमा होतो! आपला ऐतिहासिक वारसा ही आपली सर्वोत्तम संपत्ती आहे व आपण हे समजून घेतले पाहिजे. घटना चिकित्सा म्हणून शहरातील मुख्य दहा ऐतिहासिक वारसा स्थळे घ्या, त्यांच्यावर काम करा, त्यांचा एक आदर्श नमुना तयार करा व त्यानंतर तेच सूत्र इतर सर्व ऐतिहासिक वारसा ठिकाणांसाठीही वापरा व हे लवकर करा. या शहरातल्या बिचा-या वारशांसाठी वेळ आधीच हातातून निघून गेली आहे. आता आपण पावले उचलली नाही तर आपल्याकडे या स्थळांची केवळ छायाचित्रे व त्याविषयीचे लेख उरतील व आपण कोणताही सामाजिक पैलू नसलेला समाज होऊ!

मी त्या मुलींना सांगितले की हा केवळ तुमचा आणखी एक शालेय प्रकल्प होऊ नये, तर तुम्ही हे जास्तीत जास्त व्यासपीठांवर सांगितले पाहिजे. माहिती देणे ही सुरुवात आहे, त्यामुळे कधी ना कधी, कुणामुळे तरी काही चांगला फरक पडेल. ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वर्तमानकाळात इतिहासाचा एक भाग बनणे व तो पुढे नेणे. काय कमावले यापेक्षा आपण मागे काय सोडतो ते महत्वाचे असणार आहे, हे आपण स्वतःला बजावले पाहिजे, असे झाले तरच आपल्या ऐतिहासिक वारसा स्थळांसाठी काही आशा आहे!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्सhttps://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif