Tuesday, 5 June 2012

पेट्रोल, मेट्रो आणि घर!













 
 
 
आपण कारचा विचार केला तर रस्ते बनवाल.  आपण माणसाचा विचार केला तर आपण इमारती बनवाल. मात्र आपण निसर्गाचा विचार केला तर आपण सर्वांना राहता येईल असे जग बनवाल....ली कॉर्बिझीयर.

शीर्षक वाचल्यानंतर बरेचजण बुचकळ्यात पडतील या तिन्ही गोष्टींमध्ये काय संबंध आहे?  सूरज का सातवां घोडा  किंवा  अल्बर्ट पिंटो को घुस्सा क्यों आता हे?”  या कलाचित्रपटाच्या नावांप्रमाणे हे वाटू शकते. मात्र एवढ्यातल्या पेट्रोल दरवाढ, सार्वजनिक वाहतूक, विशेषतः मेट्रोविषयीच्या बातम्या पाहिल्या तर त्यामध्ये संबंध आहे हे पटेल. पहिल्या दोन बातम्या एकमेकांशी संबंधित आहेत पण घराचे काय? या दोन बातम्यांचा रिअल इस्टेट किंवा घरांशी किंवा त्यांच्या किंमतींशी काय संबंध आहे? इथेच या प्रश्नाची खरी मेख आहे. त्यासाठी आपल्याला रिअल इस्टेट किंवा गृहनिर्माण व्यवसाय वेगळ्या दृष्टीकोनातून समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या शहरामध्ये अनेक लोक/नागरिक विविध संघटनांद्वारे विविध प्रश्नांवर चर्चा करतात. त्यामुळे सार्वजनिक संस्था व वाहतूक पोलिसांसारख्या विभागांना त्यांचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करता येते. अशा अनेक संघटना किंवा समूह एकमेकांशी इंटरनेट किंवा फेसबुकद्वारे जोडलेले आहेत. इंटरनेटवरील अशाच एका समूहाने मला अलिकडे एक प्रश्न विचारला की पुण्यातील मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो रहदारीचा किती टक्के भार उचलू शकेल? सध्या शहराविषयीच्या मुद्यांमध्ये मेट्रो हा सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. माझे उत्तर होते....आपण मेट्रोला पूरक अशी वाहतूक यंत्रणा, ज्यामध्ये पीएमटी म्हणजे आपली सार्वजनिक वाहतूक यंत्रणा, तिथपर्यंत पोहोचायला रिक्षा वगैरे सोय देत नाही तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही. मुंबई किंवा दिल्लीच्या तुलनेत पुण्यातली अंतरे कमी आहेत त्यामुळे बरेच लोक खाजगी वाहने वापरणेच पसंत करतात, म्हणूनच हव्या त्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी मेट्रोला पूरक अशी वाहतूक व्यवस्था असेल तरच तिचा उपयोग होईल. यातला आणखी एक मुद्दा म्हणजे अंमलबजावणीसाठी लागणारा वेळ, तोपर्यंत अनेक लोक वाहने खरेदी करतील व जर माझ्याकडे वाहन असेल तर स्वाभाविकपणे मी माझ्या सोयीसाठी ते रोज वापरेन. शहराची मानसिकता अशी आहे. अशा प्रकारच्या गरमा गरम चर्चा सामाजिक असो किंवा राजकीय, सर्व मंचावर सुरु आहेत.
त्यानंतर आपण अचानक झालेली पेट्रोलची दरवाढ पाहिली व त्यासाठी भारत बंदही झाला. पेट्रोलच्या किंमती वाढण्यापूर्वी टाकी भरण्यासाठी गर्दी झाली. मात्र आहे त्या साठ्यावर जास्तीत जास्त नफा कमावण्यासाठी पेट्रोल पंप मालकांनी दर वाढ होण्याआधी संध्याकाळी पेट्रोल पंप बंद ठेवले या बातम्या आपण वाचल्या! दरवाढ सरळसोट १०% होती व आता ती दोन रुपयांनी कमी करुन जखमेवर मलपट्टी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विचार करा दुस-या एखाद्या ग्राहकोपयोगी वस्तुचे दर एका रात्रीत एवढे प्रचंड वाढले असते तर? या वाढीचे खरे परिणाम तर अजून जाणवायचे आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे.
खाजगी वाहनांचा एक दुष्परिणाम म्हणजे अपघात!  आता आपल्याला या दुष्परिणामाची एवढी सवय झाली आहे की आपण त्याविषयी विचार करणे सोडून दिले आहे. दररोज वर्तमानपत्र उघडले की संपूर्ण शहरात विविध घटनांमध्ये मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या आपण वाचतो, जे थोडे संवेदनशील आहेत ते आपापसात याविषयी चर्चा करतात, बाकीचे पान उलटतात व क्रीडा किंवा शेअर बाजाराच्या बातम्यांकडे वळतात. राज्यात आपल्या शहराचा रस्त्यावरील अपघातातील मृत्यूंमध्ये पहिला क्रमांक लागतो कदाचित देशामध्येही असेल. इथे २० लाखांहून अधिक वाहने रस्त्यावर धावतात, दर दिवशी त्यांची संख्या वाढतेच आहे, मात्र रस्त्यांची क्षमता वाढलेली नाही मग आणखी काय होणार? दररोज जवळपास ७०% लोकांना अपघातांचा धोका पत्करुन ज्या ठिकाणी जायचे आहे तिथे स्वतःच्या खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागतो यामध्ये दुचाकी वाहनांचीच संख्या जास्त आहे. इथे आपण या वाहनांमधून बाहेर पडणा-या हजारो टन धुरामुळे होणारे प्रदूषण विचारातही घेतलेले नाही!
दररोज जेव्हा एखादी गृहिणी दुचाकीने नव-याला ऑफिसमध्ये व मुलाला शाळेत पाठवते तेव्हा ते सुखरुप परत येईपर्यंत तिचा जीव टांगणीला लागलेला असतो! आता बरेच जण म्हणतील यामध्ये नवीन काय आहे व याचा रिअल इस्टेट किंवा घर शोधण्याशी काय संबंध आहे? वरील अवतरणातील महान वास्तुविशारदाच्या म्हणण्यानुसार आपण जसा विचार करु भविष्यात त्याच दिशेने पुढे जाऊ. कुठल्याही समृद्ध शहराप्रमाणे लोक इथे राहायला प्राधान्य देतात कारण इथे त्यांना सुरक्षित वाटतं व जगण्यासाठी आरोग्यदायी वातावरण आहे. शहरात व्यक्तीला केवळ पैसा मिळून उपयोग नाही तर त्याला आरोग्यदायी व सुरक्षित जीवनही मिळालं पाहिजे व त्याकडेच आपण दिवसेंदिवस सर्वाधिक दुर्लक्ष करित आहोत. आपण जेव्हा म्हणतो की घरांच्या किमती वाढत आहेत व आवाक्याबाहेर चालल्या आहेत आपण लक्षात घेतले पाहिजे की केवळ एकाच घटकावर घरांच्या किमती अवलंबून नसतात. कुठलीही गोष्ट आधीच्या तुलनेत महाग झाली आहे. ९० च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा मी रिअल इस्टेटमधील माझी कारकीर्द सुरु केली तेव्हा प्रभात रोडवरील घरांच्या किमती जवळपास १२००/स्क्वे.फू. होत्या पण तेव्हा देखील ती किंमत सर्वाधिक होती! त्यावेळी पेट्रोलची किंमत होती ७रु./लिटर. आता या दोन्हीचाही आलेख पाहा, दोन्हींच्या किंमतीत दहा पटींनी वाढ झाली आहे मग केवळ घराच्याच किमती वाढताहेत अशी ओरड कशाला? हा प्रश्न मी एक सामान्य माणूस म्हणून विचारतोय, एक बांधकाम व्यावसायिक म्हणून किंवा आर्थिक समीक्षक म्हणून नाही.
आपण इतर खर्च नियंत्रणात ठेवले तरच घर स्वस्त वाटेल व ही एक प्राथमिक व मूलभूत गरज आहे. इतर खर्चांमधील सर्वात महत्वाचा खर्च आहे पेट्रोलचा, आपल्या शहराऐवढ्या दुस-या शहरांच्या तुलनेत आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय कमजोर आहे. परिणामी नागरिकांचा जास्तीत जास्त वेळ एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाण्यामध्येच जातो (मी म्हणेन वाया जातो) यासाठी त्यांना पेट्रोलवर वारेमाप खर्च करावा लागतो व अपघाताचा धोका असतोच! यामुळे आपले आर्थिक नियोजन अस्ताव्यस्त होते व घर खरेदी करण्यासाठी लोकांकडे कमी पैसा उरतो. कामाचे ठिकाण, बाजार, मुलांची शाळा इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी लोक विशिष्ट भागातच घर घेणे पसंत करतात त्यामुळे एखाद्या जागेची किंमत फार जास्त होते. व ज्या लोकांना ते दर परवडत नाहीत त्यांना त्या भागातून दूर, जिथे पायाभूत सुविधा नाहीत अशा ठिकाणी घर घ्यावे लागते व बरेचजण अवैध वसाहतींचा पर्यायही निवडतात आणी आपण म्हणतो की शहरामध्ये घरे दिवसेंदिवस आवाक्याबाहेर चालली आहेत!
मेट्रो कॉरिडॉरमध्ये अधिक एफएसआय म्हणजे चटई क्षेत्र निर्देशांक देण्याचा प्रस्ताव आहे अशा प्रकारे या मार्गावर अधिक घरे निर्माण होऊ शकतील व घरांच्या किंमती कमी होऊ शकतील. आणखी एक घटक म्हणजे मेट्रो आल्यामुळे शहराच्या ब-याच मोठ्या भागात कमीत कमी वेळात व खर्चात पोहोचता येईल. यामुळे लोक शहराच्या सध्याच्या सीमारेषांबाहेर जाऊ शकतील व उपनगरांबाहेरची ठिकाणेही निवडू शकतील. आपण शहराच्या अगदी दुस-या टोकाला जिथे स्वस्त घरे उपलब्ध आहेत तिथे राहू शकता व मेट्रो स्थानकावर आपल्या वाहनाने येवून, वाहन तिथे पार्क करुन, मेट्रोने शहरात येवू शकता. त्यामुळे एकप्रकारे पेट्रोलच्या वाढलेल्या किमती मेट्रोसाठी वरदानच आहे, कारण सामान्य माणसासाठी पेट्रोलच्या किमती एवढ्या वाढल्यानंतर खाजगी वाहनाने प्रवास करणे अतिशय महाग झाले आहे. एक गोष्ट मात्र तितकीच खरी आहे की मेट्रो किंवा इतर कुठलीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कागदोपत्रीही निश्चित झालेली नाही, त्यामुळे ती प्रत्यक्षात यायला अजून पाच वर्षे तरी जातील. आणखी पाच वर्षांमध्ये खाजगी वाहनांची संख्या वाढेल मात्र घर घेताना आपण मेट्रो किंवा तत्सम मार्गाचा विचार करुन निवड करु शकतो.
एका आदर्श शहरामध्ये, शहराच्या सर्व भागात पायाभूत सुविधांचा समतोल विकास झालेला असेल, ज्यामुळे नागरिकांचे प्रवासासाठीचे अंतर व वेळ कमी होईल त्यामुळे इंधनावर होणारा खर्च कमी होईल. मेट्रोमुळे नागरिकांना हव्या त्या ठिकाणी अतिशय कमी खर्चात जाता येईल व त्यांना प्रवासाचे सुरक्षित माध्यम मिळेल. विचार करा तुमच्याकडे असा एक पर्याय असेल की ज्यामुळे आपण आपल्याला हव्या त्या ठिकाणी कमीत कमी वेळेत व खर्चात पोहोचू शकता व अपघात तसेच प्रदूषणाचा धोकाही टाळू शकता! अगदी स्वप्नात असल्यासारखे वाटते! मात्र इथेच आपण कमी पडतोय, या सर्व मुद्यांचा वरकरणी एकमेकांशी संबंध नसल्याचे वाटते, त्यामुळे कुणीच एकत्रितपणे या मुद्यांचा विचार करत नाही! याबाबतीत विकासकांनीही संघटित व्हायला हवं. जर एखाद्या उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास होत असेल तर त्यासाठी स्थानिक सार्वजनिक वाहतूक मंडळाला पैसे देऊन ते त्या उपनगरासाठी बसचा स्वतंत्र मार्ग सुरु करु शकतात. मात्र शहरातल्या बहुतेक उपनगरांमध्ये "आधी अंडं का आधी कोंबडी?" या म्हणीनुसार प्रवासी नाहीत म्हणून बसचे मार्ग नाहीत, व बसचे मार्ग नसल्यामुळे प्रवासी नाहीत अशी परिस्थिती आहे.
पेट्रोलच्या किमती एका रात्रीत वाढल्या त्याप्रमाणे मेट्रो झटक्यात तयार होणार नाही, मात्र आपण त्या अनुषंगाने आतापासूनच पायाभूत सुविधा निर्माण केल्या तर मेट्रोमुळे शहरात परवडणारी घरे मिळायला मदत होईल. नाहीतर वाहतुकीची समस्या सोडवण्याऐवजी मेट्रो फायदेशीर कशी बनवायची असा प्रश्न निर्माण होईल?
संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!


संजीवनीची सामाजिक बाजू!

शहराविषयीच्या तुमच्या काही तक्रारी असतील, तर खालील लिंकवर क्लिक करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx


हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा

wood pecker gray pigmy orange head close.jpg


No comments:

Post a Comment