Sunday, 25 May 2014

“दिल है छोटासा छोटीसी आशा”!























दिल है छोटासा छोटीसी आशा”!

आशा निर्माण करणारा योद्धा!

तुम्ही मागे उभे राहून नेतृत्व करणे व इतरांना आघाडीवर ठेवणे अधिक चांगले, विशेषतः विजय साजरा करता तेव्हा ! जेव्हा धोका असतो तेव्हा तुम्ही आघाडी घेतली पाहिजे. अशाप्रकारे लोक तुमचे एक चांगला नेता म्हणून कौतुक करतीलनेल्सन मंडेला.”

आदरणीय मोदी सर,

मी तुम्हाला पत्र लिहीताना काय म्हणून संबोधित करावे अशा विवंचनेत होतो, म्हणूनच शेवटी नरेंद्र दा म्हणायचा निर्णय घेतला कारण त्यामध्ये एक सहजता व आपलेपणा वाटतो. मी संजय देशपांडे महाराष्ट्रातील पुणे शहरातील एक स्थापत्य अभियंता/बांधकाम व्यवसायिक; मला माहिती नाही की माझे शब्द कधी तुमच्या कानापर्यंत पोहोचतील किंवा नाही, कारण मी माझ्या आयुष्यात कधी माझ्या शहरात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला पत्र लिहीलेले नाही, त्यामुळे भारताच्या पंतप्रधानांना पत्र लिहीणे ही तर दूरची गोष्ट याला कारण म्हणजे तुम्ही एखादे पत्र लिहीता तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर तुम्ही भावना व्यक्त करत असता. माझ्या आयुष्यात समाजातील काही चांगले नेते/राजकारणी आले नाहीत असे नाही मात्र त्यांना कधी पत्र लिहावेसे वाटले नाही हेहि तितकेच खरे आहे. मंडेला यांच्या वरील अवतरणाच्या उत्तरार्धाप्रमाणे, तुम्ही जेव्हा धोका होता तेव्हा सर्वांचे नेतृत्व केले व नेत्याने संकटाचा सामना कसा केला पाहिजे हे दाखवून दिले! या अवतरणाचा पूर्वार्ध अजूनही खरा व्हायचा आहे कारण तुम्हालाही खरा धोका (हा कदाचित चुकीचा शब्द असेल) माहिती आहे, मात्र काहीतरी करुन दाखविण्याची जबाबदारी समोर असल्याने तुम्हाला  अजुन बराच काळ पुढे उभे राहून नेतृत्व करणे आवश्यक आहे.
नरेंद्र दा तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना आव्हान करता ते पाहून मनात एक विचार येतो हा केवळ योगायोग आहे का, की तुमच्याच नावाच्या एका व्यक्तिने अनेक दशकांपूर्वी "माझ्या बंधु आणि भगीनिंनो" केवळ या एका वाक्याने पाश्चात्य जनसमूहाला सुद्धा जिंकले होते व या देशाला स्वतःच्या सामर्थ्याची सतत जाणीव करुन दिली होती, मी स्वामी विवेकानंदांविषयी बोलत आहे, त्यांचे आयुष्य फारच लहान होते मात्र नक्कीच अनुकरणीय होते! त्यांनी सामान्य माणसाला जीवनाचे मूल्य समजून घ्यावे व एखाद्या उद्देशासाठी ते समर्पित करावे हे सांगण्याचा प्रयत्न केला व तुम्ही तुमच्या प्रचारातून यापेक्षा काही वेगळे सांगत नव्हता असे मला वाटते. यामध्ये काही फरक असेल तर तो एवढाच की तुम्ही आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून हे करायला सांगत होता, अर्थात ते आमच्याच भल्यासाठी होते. तुम्ही येईपर्यंत व आम्हाला जागे होण्याचे किंवा खरेतर परिपक्व होण्याचे आवाहन करेपर्यंत आम्ही लोकशाही म्हणून अतिशय अपरिपक्व होतो. याचे उदाहरण म्हणजे बहुतांश शिक्षित व अशिक्षित लोकही निवडणुकांबाबत आपल्या एका मताने काय फरक पडतो असा विचार करत होते; याचे कारण निवडणुका ज्याप्रकारे लढल्या जात व जिंकल्या जात यामध्ये होतेतुम्ही आम्हाला आमच्या शक्तिची जाणीव करुन दिली. मी गेल्या वीस वर्षांपासून मतदान करत आहे मात्र पुण्यातल्या ज्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये मी राहतो तिथे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मतदानासाठी रांग पाहिली. या ठिकाणी पूर्वी मतदान म्हणजे सुट्टीचा दिवस असे वातावरण असायचे! त्या दिवशी व त्याक्षणी मी तुमचा जास्त आदर करु लागलो, कारण हा एका दिवसाचा परिणाम नव्हता किंवा चमत्कार नव्हता, तर एका माणसाने केवळ स्वतः च्या नव्हे तर हजारो हातांचा वापर करुन हे घडवून आणले. धर्मनिरपेक्षतेचा टेंबा मिरवणा-या आपल्या या देशात धार्मिक विजोडता समाजातील प्रत्येक स्तरावर आहे मग निवडणूक असो किंवा नोकरी किंवा अगदी लग्नासारखी वैयक्तिक बाब असो. मात्र तरीही प्रत्यक्ष धर्मनिरपेक्ष नसलेल्या आपल्या देशात परिवर्तन हे प्रत्येक गावात व शहरात दिसून आले.
आपण धर्मनिरपेक्षतेचा वापर आत्तापर्यंत फक्त सोयीस्कररीत्या करत आलो आहोत, आपली जात किंवा धर्म केवळ आपल्या फायद्यासाठी वापरले आहे. मात्र यावेळी संपूर्ण राष्ट्राचा व समाजाचा विकास ही खरी जात किंवा धर्म आहे हे जाणून आपण या सगळ्याच्या पलिकडे जाऊन मतदान केले. नरेंद्र दा तुम्ही प्रचारादरम्यान काय जागृत केले आहे याची तुम्हाला जाणीव आहे का? केवळ मतदात्यांचा आत्मविश्वास किंवा तुमच्या वक्तव्यावरील विश्वास नाही तर तुम्ही या देशातील प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात आशा जागृत केली आहे जी मरणासन्न अवस्थेत होती. इथे मी सामान्य माणूस म्हणतो तेव्हा कोट्याधीश व्यवसायिकांपासून ते रस्त्यावरील रिक्षावाल्यापर्यंत सर्वांचा त्यामध्ये समावेश होतो! जो देश प्राचीन काळापासून आशेवर जगत आला आहे, ज्याचा तेहतिस कोटी देवांवर किंवा अल्लाह किंवा येशूवर विश्वास आहे व त्यांचा देव त्यांना कोठल्याही वाईट स्थितीतून बाहेर काढू शकेल असा विश्वास होता, त्यांचा या देशातील परिस्थितीवरील विश्वासच उडाला होता! या देशाला आता काही भविष्य नाही अशी एक सर्वसाधारण भावना होती व मी देखील त्यास अपवाद नव्हतो.

तुम्ही आयन रँडची ऍटलस श्रग्ड ही कादंबरी वाचली असेल व त्यामध्ये आपण दररोज जी अनुभवतो तशीच परिस्थिती दाखविली आहे. त्यामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाला प्रश्न विचारतोहू इज जॉन गॉल्ट?” म्हणजे देवालाच माहिती! यातून सभोवतालच्या परिस्थितीविषयी नैराश्य व असहाय्यतेची भावना व्यक्त होते. जे जिवापाड मेहनत करत आहे व ज्यांना समाजासाठी खरोखर चांगले करायचे आहे त्यांचे केवळ आदर्शवादी लोक कोणतेही धोरण नसलेल्या शासनकर्त्यांच्या मदतीने शोषण करत आहेत असे दृश्य होते.
माझी पिढी विश्वास बाळगायला विसरली होती म्हणूनच आम्ही चमत्काराची आशा करणे सोडून दिले होते व तुम्ही नेमके तेच करुन दाखवले. आपण विसरतो की चमत्कार हा आपल्यातच असतो व आपण तो घडवू शकतो. आमच्यापैकी प्रत्येकाला जो बदल हवा होता तो घडवून आणण्याठी सामाईक समूह किंवा संवाद गट नव्हता व तुमच्या नकळत तुम्ही तो समूह झालात व वॉट्स-ऍप किंवा फेसबुकवर करतो त्याप्रमाणे लोकांनी तुमच्या माध्यमातून बदल शेअर केला किंवा घडवून आणला! जेव्हा इंटरनेटची बिजे रोवली जात होती तेव्हा त्यामुळे समाजात काय बदलणार आहे याची कुणालाच जाणीव नव्हती, त्यामुळे केवळ समाजच बदलला नाही तर संवादाच्या संकल्पनाच बदलल्या व कोठलाही समाज हा संवादाशिवाय असूच शकत नाही ! तुमचा प्रचार हा अभ्यासाचा विषय होता व मला खात्री आहे की यापुढे व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयांच्या, तसेच युद्धप्रशिक्षण देणा-या महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात त्याचा निश्चितच समावेश होईल. याचे कारण म्हणजे माझ्या मते ते एक युद्धच होते ज्यात तुम्हाला दृश्य तसेच अदृश्य शत्रुंशी लढायचे होते. असे म्हणतात की राजकारणात कुणीही कायमचे शत्रू नसतात; या नाण्याची दुसरीही बाजू आहेत. याचाच अर्थ राजकारणामध्ये तुमचे कुणीही कायम मित्रही नाहीत
मी चांगल्या चित्रपटांचा व चांगल्या पुस्तकांचा चाहता आहे. हॅरी पॉटर या प्रसिद्ध चित्रपटात, हॉगवर्ट शाळेचा मुख्याध्यापक डंबलडोर एकदा म्हणतो, “शत्रूंविरुद्ध उभे राहण्यास धैर्य लागते मात्र तुमच्या मित्रांविरुद्ध उभे राहण्यास त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक धैर्य लागतेव मला वाटते हा संवाद तुमच्याबाबतीत अगदी चपखल लागू होतो!

मी तुमची युद्धकथा म्हणालो कारण तुम्ही एकाचवेळी विविध पातळ्यांवर लढत होता, सर्वप्रथम हा लढा विरोधी पक्षांशी होता त्यानंतर पक्षांतर्गत तथाकथित मित्रांशी व सर्वात शेवटी संपूर्ण देशातील सामान्य माणसाच्या मरणप्राय झालेल्या आशांशी होता! हे सर्व करण्यासाठी आठ महिन्यांपेक्षाही कमी काळ होता व या राज्यातील बत्तीस राज्यांपैकी केवळ एका राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री हीच शिदोरी हाताशी होती! माझ्या माहितीप्रमाणे ब-याच काळानी तुम्ही देशाच्या पंतप्रधानपदी पोहोचलेले एकमेव मुख्यमंत्री आहात, पण देशात इतरही यशस्वी मुख्यमंत्री होते. यामुळे यशाचे श्रेय नक्कीच तुम्हाला जाते व ज्या यशाचे कुणी स्वप्नही पाहू शकले नाही ते तुम्ही कसे साध्य केलेत हा अभ्यासाचा विषय आहे! या दणदणीत विजयासोबत तुमच्या विरोधकांना आदराने वागविण्याची मोठी जबाबदारीही तुमच्यावर आहे; आपण इतिहासात पाहिले आहे की सिकंदराने राजा पुरुचा पराभव करुनही त्याला राजासारखे वागविले.
आपल्या देशात दुर्दैवाने आपण पराभवाचे विश्लेषण करण्यात निपुण आहोत मात्र आपण विजयाचे विश्लेषण क्वचितच करतो कारण आपण त्याविषयी अगदी अज्ञानी असतो किंवा नेमकेपणाने सांगायचे झाले तर भावनिक मूर्ख असतो. मात्र मला खात्री आहे की २०१९ साली तुम्ही तुमचे प्रगती पुस्तक दाखवाल असे जेव्हा तुम्ही म्हणाला होता तेव्हा तुम्हाला यशाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे याची जाणीव होईल.

आत्ता युद्धाचा पहिला भाग जिंकल्यानंतर अधिक अवघड भागाची सुरुवात झाली आहे. देशाच्या आशा पुनरुज्जीवित करणे हे झोपलेल्या राक्षसाला जागे करण्यासारखे आहे, हा राक्षस मागणी करायला सुरुवात करेल व शेकडो भाषा, संस्कृती, जाती व धर्मांच्या या देशात हे महाकाय काम आहे. जीवनाच्या अपेक्षांविषयी बोलायचे झाल्यास मला वाटते की १२० कोटी जनता असलेल्या देशातील चांगल्या जीवनाची व्याख्या एकसारखीच आहे. भारतीय पाश्चिमात्य देशांमध्ये अतिशय यशस्वी झाले आहेत याचे कारण म्हणजे आपल्या जीवनाकडून अतिशय कमी अपेक्षा आहेत. “दोन वेळचे जेवण, स्वतःचे घर आणि शक्य असल्यास एखादी गाडीआपली चांगल्या जीवनाची एवढी साधी सोपी सरळ व्याख्या आहे व त्यासाठी कष्ट करायची आपली तयारी असते; व यातील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे कुणालाही या मूलभूत गरजा मोफत नकोत! लोकांनी दंगली व जातीवादाविषयी कितीही भीती घालू देत, यासर्वांचे मूळ लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण न होण्यामध्ये आहेत. त्याशिवाय आपले नेते आपल्याशी दूरान्वयेही संबंध नसलेल्या कारणांसाठी आपल्यात भांडणे लावण्यात पटाईत आहेत. स्वतःच्या अपयशापासून लोकांचे लक्ष हटविणे हाच त्यामागचा उद्देश आहे. या देशातील सामान्य माणूस अजूनही माणुसकी विसरलेला नाही कारण आपल्याकडे अजूनही आल्या-गेलेल्याला त्याची जात वा धर्म न विचारता पाणी देण्याची पद्धत आहे. म्हणूनच तुम्ही जेव्हा विकासाची साद घातलीत, तेव्हा सामान्य माणसाला त्यातील फरक व तुमच्या प्रचाराचे महत्व समजले व त्यांनी प्रचंड बहुमताने तुम्हाला प्रतिसाद दिला!! एकापरीने लोकशाहीवादी भारताच्या परिपक्वतेचे हे लक्षण आहे.

शहराचा किंवा देशाचा विकास म्हणजे केवळ जीडीपी, विमानतळे, आयटी पार्क्स किंवा मोठे मॉल्स नाही तर सामान्य माणसाला दैनंदिन जगण्याचा संघर्ष कमीत कमी किती करावा लागतो यातून ते दिसून येते. आम्हाला शिक्षण, चांगल्या आरोग्य सुविधा हव्या आहेत व या सर्व सेवांसाठी पैसे मोजण्याची आमची तयारी आहे. या सुविध रास्त दरात प्रत्यक्षात उपलब्ध करुन देणे हे खरे आव्हान आहे. वर्षानुवर्षे आम्हाला सुजलाम् सुफलाम् भारताची सुंदर स्वप्ने दाखविण्यात आली आहेत व प्रत्यक्षात कोण सुजलाम् सुफलाम् होत आहे हे आम्ही पाहातच आहोत!”. मला खात्री आहे की तुम्हाला हे माहिती आहे किंवा हे सर्व समजले असेल पण, केवळ एका सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून हे तुमच्यापर्यंत पोचवायचे होते ! कृपया हा दृष्टिकोन व तुमचे विचार प्रत्येक ज्येष्ठ किंवा कनिष्ठ कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण यानंतर तुम्हाला त्याची गरज पडणार आहे. कारण जेव्हा राज्यातील शिपाई सुद्धा राजाचीच भाषा बोलतात व राजाप्रमाणेच त्यांची नैतिकता असते तेच राज्य यशस्वी झालेले आहे हा धडा आपण इतिहासातून शिकलो आहोत!

तुम्ही सध्या ज्या पदावर आहात, तिथे लाखो लोक तुमच्याकडून काहीना काही अपेक्षा करतील. मात्र माझी इच्छा आहे की अच्छे दिनच्या मोहिमेमध्ये मी माझे काय योगदान देऊ शकतो हे तुम्ही मला सांगावे, कारण या देशाच्या आशा निर्माण करणा-या योद्ध्यास ही सर्वोत्तम दिलेली दाद आणि साथ असेल!!

जय हिंद!!



संजय  देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स


No comments:

Post a Comment