Sunday 9 September 2018

देव त्यांचा आणि आपला !




















 देवाला कोणताही धर्म नाही.”…  महात्मा गांधी.

काही व्यक्तीची वेगळी ओळख करून द्यायची गरज नसते,महात्मा गांधी केवळ देशासाठीच नाही तर पुर्ण जगासाठी असंच एक व्यक्तिमत्व आहे. माझ्या बाबतीत झालेल्या एका प्रसंगामुळे मला हे अवतरण आठवलं. मी दररोज सकाळी बॅडमिंटन खेळायला जातो. त्यापूर्वी आमच्या अपार्टमेंटच्या आवारातल्या अनेक फुलझाडांपैकी एका कुंडीतली जास्वंदीची फुलं तोडायची आणि माझ्या कारमधल्या गणपतीला वाहायची अशी माझी सवय किंवा रोजचा परिपाठच आहे, खरं सांगायचं तर जरी भक्तीभाव  म्हणुन नसलं तरी मला असं करायला आवडतं आणि मी वर्षानुवर्षं फुले सवयीने गणपतीला वहात आलोय. यासाठी नियमितपणे फुलं मिळावीत म्हणून मी आमच्या इमारतीच्या आवारात खास जास्वंदीची झाडंही लावली आहेत. त्यांना वर्षंभर फुलं येत असतात. मात्र गेले काही दिवस मी खाली आल्यावर मला झाडावर एकही फूल दिसत नसे. सुरूवातीचे काही दिवस मला वाटलं पावसामुळे फुलं उमलत नसतील. पण पाऊस थांबल्यानंतरही मी सकाळी कधीही खाली उतरलो तरी झाडांवरची फुलं गायब झालेली असायची. मी दारावरच्या सुरक्षा रक्षकाला विचारलं, फुलांचं काय झालं? त्यावर त्यानं उत्तर दिलं की इमारतीत एक कुटुंब नव्यानं राहायला आलं आहे आणि त्यातल्या एक वृद्ध बाई दररोज सकाळी लवकर झाडांवरची सगळी फुलं घेऊन जातात. हे ऐकल्यावर मी सुरक्षा रक्षकाला सांगितलं की त्या बाईंना किमान काही फुलं तरी इतरांसाठी ठेवायला सांग. पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, मला झाडांवर एकही फूल दिसलं नाही. मी अतिशय वैतागून त्या कुटुंबाचं नाव व सदनिका क्रमांक घेतला. त्यांना भेटून, एखाद्या बांधकाम व्यावसायिकाप्रमाणे धडा शिकवायचं ठरवलं. मी दुपारी जेवायच्या वेळी माझ्या मुलाला सांगितलं की मी त्या कुटुंबाला इतरांसाठी (म्हणजे माझ्यासाठी) एकही फूल ठेवत नाही म्हणून झापणार आहे, त्यानं माझी बाजू ऐकून घेतली आणि निरागसपणे मला म्हणाला, बाबा जाऊ द्या ना, पण कोणत्यातरी देवाला मिळतात ना ती फुलं. मला त्याचं बोलणं समजायला एक क्षणभर लागला. नंतर झटका बसल्यासारखं झालं कारण मी पन्नाशीच्या उंबरठ्यावर पोहोचलोय, माझा तत्वज्ञानाचा अभ्यास, माझं वाचन वगैरे असूनही मला देव कळलेलाच नाही हे मलाच लक्षात आलं ! इथे माझ्या कारमधल्या गणपतीच्या मूर्तीला फुलं मिळत नसली म्हणून काय झालं त्या कुटुंबातील घरातल्या गणपतीला तर ती वाहिली जाताहेतच ना! मी मात्र स्वार्थीपणानं माझ्या देवाला फुलं मिळत नाहीत असा विचार करतोय. आपल्या पुण्यात सतत काहीना काही वादविवाद होत असतात. एवढ्यात एका सत्यनारायण पूजेवरूनही वाद झाला.  हिंदू धर्मात इतक्या जाती आणि पंथ आहेत की कुणाला हिंदू म्हणावं व कुणाला नाही असाच प्रश्न पडतो. सत्यनारायणाच्या पूजेत ब्राह्मण कथा वाचतो (अर्थात ती कुणीही वाचू शकतो), भगवान् सत्यनारायणाला फुलं वाहिली जातात आणि शिऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. हिंदू पंचांगानुर श्रावण महिन्यात अनेक हिंदू घरांमध्ये तसंच संस्थांमध्ये ही पूजा केली जाते. पुण्यातल्या एका प्रथितयश: शैक्षणिक संस्थेमध्येही ही पूजा केली जाणार होती मात्र हा धार्मिक विधी असल्याचं कारण देत काही विद्यार्थी संघटनांनी तिला विरोध केला. त्यांचं असं म्हणणं होतं धर्माला शैक्षणिक संस्थांपासून लांब ठेवा. हा विचार चांगला असला तरीही तो चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आला. नेहमीप्रमाणे शहराचं सामाजिक जीवन (राजकीयही) सत्यनारायण पूजेच्या बाजूनं आणि विरुद्ध बोलणाऱ्यांच्या टिप्पण्यांनी ढवळून निघालं. माझ्या मते सार्वजनिक ठिकाणी कोणतंही धार्मिक प्रदर्शन केलं जाऊ नये. विशेषतः आपल्या धार्मिक पूजा-पाठ करण्यामुळे इतरांना त्रास होत असेल तर असं करायची वेळ आलीय. आपल्याकडे रस्त्याच्या समस्या, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, वाहतुकीची कोंडी तसंच इतरंही अनेक समस्या आहेत. त्यात आपल्या देवावरील प्रेमामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची भर कशाला असं सामान्य माणसाला वाटतं. पण त्याचं मत जाहीरपणे व्यक्त केल्यावर काय परिणाम होतो हे तो जाणतो. खरंतर आपल्याकडे एवढं प्राचीन तत्वज्ञान असूनही आपल्याला देवाची संकल्पनाच समजलेली नाही हे दुर्दैवी आहे.

माझा लेख नेमका कुठल्या दिशेनं चाललाय याविषयी गोंधळला असाल (मला खात्री आहे की तुम्ही गोंधळला असाल), तर थोडं विषयांतर झाल्याबद्दल माफ करा. मला देव किंवा धर्माविषयी नाही तर इंडोनेशिया, जकार्तामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमधल्या भारताच्या कामगिरीविषयी लिहायचं होतं. पंधराहून अधिक सुवर्णपदकं, अनेक रौप्य व कांस्य पदकं जिंकून आपण आशियाई स्पर्धांमधील आत्तापर्यंतची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी केलीय. आपण 1955 साली सर्वोत्तम कामगिरी केली होती. पण तेव्हा चीन, चायनीज तायपेईसारख्या आपल्या शेजाऱ्यांची एवढी कठीण स्पर्धा आपल्याला नव्हती. मात्र आपण भारतीय लोक आपल्याच लोकांच्या कामगिरीवर टीका करण्यात आघाडीवर असतो. आता ही परंपरा मोडीत काढायची वेळ आलीय. कारण टीका आवश्यक आहे. मात्रं तिचा अतिरेक झाल्यावर सकारात्मक संवाद होऊ शकत नाही हे देखील तितकंच खरं आहे. म्हणूनच सर्वप्रथम आशियाई खेळातल्या उत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं मनःपूर्वक अभिनंदन! तुमच्यामुळे देशाचं ऊर अभिमानानं भरून आलंय. हिमा दास, तेजिंदरपाल तूर, जिन्सन जॉन्सन, दत्तू भोकनाळ, अमित पानगळ यासारख्या खेळाडूंच्या रुपानं त्यांना नवीन आदर्श (खरंतर देव) मिळाले आहेत. नाहीतर आत्तापर्यंत देशातल्या लाखो लोकांना फक्त अकरा देवच माहिती होते. मी भारतीय क्रिकेट संघाविषयी बोलतोय, यामध्ये कधी धोनी, कोहली, कधी मागच्या दशकातल्या द्रविड, तेंडुलकर यांचा तर कधी त्याही आधीच्या पिढीतल्या कपिल देव व गावस्कर यांचा समावेश होता. किती मोठा उपहास आहे पाहा. आपल्या पुराणात तेहतीस कोटी देवतांचा उल्लेख आहे पण आपण मात्र खेळात फक्त अकरा देवांचीच पूजा करायचो. क्रिकेट प्रेमींविषयी पूर्णपणे आदर राखत असं सांगावसं वाटतं की या खेळाची लोकप्रियता, तसंच या खेळाला (म्हणजेच खेळाडूंना) मिळणारा पैसा याविषयी भरपूर बोललं गेलं आहे. या खेळानं आपल्याला दोनदा विश्वचषक तसंच इतरही अनेक स्पर्धा जिंकून दिल्या आहेत हे खरं असलं तरीही जगभरात फक्त आठ ते दहा देश हा खेळ खेळतात त्यात एका प्रकारात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. ऍथलेटिक्स, पोहणे, मुष्ठीयुद्ध, नेमबाजी, कुस्ती व इतरही बरेच खेळ पन्नासहून अधिक देशात खेळले जातात व तेथे यश मिळवणं जास्त कठीण आहे. एक लक्षात घ्या चीन, जपान, कोरिया (मी फक्त आशिया खंडाचाच विचार करतोय) क्रिकेट नाही पण वर उल्लेख केलेले सगळे खेळ खेळतात. आता तुम्ही विचार करू शकता आपल्या देशाला या सगळ्या खेळाडूंच्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. तुम्ही आशियाई स्पर्धेतल्या पदक विजेत्यांच्या यशोगाथा ऐकल्या तर तुम्हाला कळेल की बहुतेक जण देशाच्या कानाकोपऱ्यातून अतिशय गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबांमधून आले आहेत. त्यांच्याकडे संबंधित खेळांचा सराव करण्यासाठी चांगले बुट किंवा इतर साधने यासारख्या मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव होता. आपलं सरकार क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांना पायाभूत सुविधा देण्यासाठी पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करत आहे हे मान्य करावं लागेल. उदाहरणार्थ एका ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या खेळाडूची नियुक्ती क्रीडामंत्री म्हणून करणं हा अतिशय उत्तम निर्णय आहे कारण त्यांना पदक जिंकायला काय करावं लागते याची नक्कीच जाणीव असणार . पण क्रिकेटला मिळणारा पैसा आणि सुविधांशी तुलना केल्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंनी जी कामगिरी करून दाखलीय ती निश्चितच उल्लेखनीय म्हणावी लागेल. यापैकी अनेक खेळाडूंनी त्यांना चांगल्या सुविधा मिळत नसल्याबद्दल पदक मिळाल्यानंतर बोलून दाखवलं. पण त्यांनी व्यवस्थेतल्या त्रुटींवर टीका करण्याआधी पदक जिंकून चांगली कामगिरी करून दाखवली. दिल्लीच्या एका नेमबाज मुलीला या स्पर्धेत कांस्य पदक मिळालं. त्यानंतर तिला रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलं. त्यावर हे पारितोषिकाचे पैसे आधी मिळाले असते तर आम्हाला सुवर्ण पद मिळवता आलं असतं अशी प्रतिक्रिया तिनं दिली. मला असं वाटतं या एका प्रतिक्रियेतून आपल्याला सगळ्या खेळाडूंच्या भावना समजू शकतात. सरकार किमान आता तरी दखल घेईल आणि खेळाडूंना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल अशी आपण आशा करू. चीनच्या पदक तालिकेवर एक नजर टाकल्यावर आपल्याला अजून कितीतरी आघाड्यांवर लांबचा पल्ला गाठायचाय याची कल्पना येईल. आपल्याला पंधरा सुवर्णपदकं मिळाली आहेत तर चीनला एकशे बत्तीस सुवर्ण पदकं मिळाली आहेत. आपल्याला आशियाई खेळांमधली कामगिरी सुधारायला किती वाव आहे याविषयी मी आणखी काही सांगायला हवं का?

मात्र मला याची चिंता वाटत नाही, मला या देशातल्या जनतेची काळजी वाटते, जी आपण कशाप्रकारे देवाची पूजा करतो म्हणजे सत्यनारायण करतो किंवा नमाज अदा करतो किंवा छठ् पूजा करतो किंवा इतर काही यावरूनच वाद घालत बसलीयकुणी कधी या पदक विजेत्या जिन्सन जॉन्सन, हिमा दास किंवा तूरला विचारलंय का ते कोणत्या देवाची पूजा करतात किंवा त्यांची जात कोणती किंवा ते सत्यनारायणाची पूजा करतात का किंवा ते कोणत्या चर्च, मशिद किंवा मंदिरात प्रार्थना करतात? ते त्यांच्या-त्यांच्या देवाची पूजा करत असतीलच. पण त्या सगळ्यांसाठी एकच गोष्ट जास्त प्रार्थनीय आहे ती म्हणजे आपला राष्ट्रध्वज तोच त्यांचा खरा देव आहे! असं म्हणतात की तुम्ही मनापासून देवाची पूजा केली तर तो तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. या खेळाडूंचं आपल्या तिरंग्याची प्रार्थना करताना एकच मागणं होतं ते म्हणजे देशासाठी पदक, त्यांनी सगळ्या अडचणींवर मात करून हे पदक जिंकून दाखवलं. मला असं वाटतं ज्यांना आपल्या धर्मांच्या रंगांचा अभिमान आहे, मग तो भगवा असेल, हिरवा किंवा निळा त्यांनी आपला खरा धर्म तसंच देवाला ओळखावं, तरच आपल्याला देवाचा खरा अर्थ समजू शकेल. देव ही आपल्या भक्तिभावातून निर्माण झालेली एक संकल्पना आहे. विचार करा आपण संपूर्ण भक्तिभावाने एकाच देवाला मानलं (म्हणजे आपल्या राष्ट्रध्वजाला) तसंच या देवाला आधीच समर्पित झालेले खेळाडू तसंच व्यक्तींना देवाचंच प्रतीक मानलं तर काय होईल? असं झालं तर प्रत्येक नागरिकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. नाहीतर एक दिवस असा येईल की आपल्या मनात फक्त एकमेकांच्या देवांविरुद्ध द्वेषाची भावनाच उरेल. दानवच ती नियंत्रित करतील व देवत्व हरवून बसेल.

अमेरिकेसारखा प्रगत देशही माणसा माणसात भेदभाव करण्यात आपल्यापेक्षा वेगळा नाही. फक्त तिथे धर्मावरून नाही तर रंगावरून भेदभाव केला जातो.  अलिकडेच नाईकेसारख्या क्रीडा साहित्य निर्मात्या आंतरराष्ट्रीय कंपनीची एक जाहीरात वादाच्या भोवऱ्यात सापडली. (तुम्ही यूट्यूबमध्ये नाइके ड्रीम क्रेझी नावानं टाईप केल्यावर तुम्हाला पाहता येईल)...
ही जाहीरात पाहिल्यानंतर मी माझी मुलं, पुतणे व भाचे मंडळींना त्याविषयी लिहीलंय. ते इथे देऊन शेवट करतोयमाझ्यामते खेळ हे आपल्याला दैनंदिनी जीवनाचंच प्रतिबिंब असतं. एखादी व्यक्ती कशाप्रकारे एखादा खेळ खेळते यातून त्याचा किंवा तिचा जीवनाविषयीचा दृष्टीकोन दिसून येतो. म्हणूनच प्रत्येकानं आयुष्यात कुठला तरी खेळ खेळलाच पाहिजे...

दादा, छोटा, भिक्या, रोहित, केतकी व श्रुती. मी आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे. पण मी आजही जेव्हा अशी जाहिरात पाहतो तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात, माझ्या हृदयाचे ठोके वेगानं पडू लागतात आणि माझ्या नसानसांमध्ये उत्साह संचारतो. मला असं वाटतं यातच जाहिरातीचं यश दडलेलं आहे. या जाहिरातीमुळे मी स्वतःविषयी सकारात्मक विचार करायला लागतो, कारण मला अजूनही बरंच आयुष्य जगायचं आहे. ही जाहिरात तुम्हाला पुन्हा स्वप्न पाहायला आणि तुम्ही जे स्वप्न पाहिलंय ते साध्य करण्याचा निर्धार करायला सांगते. एक लक्षात घ्या 100 पैकी 99 लोक  कोठले
तरी स्वप्न पाहतात पण त्यापैकी फक्त 5 टक्के लोकांमध्येच ही स्वप्न प्रत्यक्ष साकार करण्याची इच्छाशक्ती असते ही वस्तुस्थिती आहे. असं म्हणतात की, "तुम्ही तुमच्या स्वप्नांनुसार घडता, पण मला थोडंसं वेगळं वाटतं की "तुम्ही तुमची स्वप्न कशी साकार करता त्यानुसारच तुम्ही घडता". कारण तुम्ही पलंगावरून उठल्यानंतर लगेच विरून जातात अशा स्वप्नांचा काय उपयोग? या जाहिरातीतलं सर्वोत्तम वाक्य म्हणजे तुमची स्वप्नं वेडी आहेत का याची काळजी करू नका तर ती पुरेशी वेडी आहेत का असा प्रश्न विचारा! जेव्हा लोकांना एखादी गोष्ट करणं अशक्य आहे असं वाटतं तेव्हाच ती करून दाखवण्यात खरी गंमत आहे व त्यासाठी तुम्हाला तुमच्याशीच स्पर्धा करावी लागेल. हे सोपं नाही, कारण तुम्ही स्वतःलाच कसं हरवाल, पण यामुळेच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठराल. म्हणूनच स्वप्न पाहा आणि तुमची स्वप्न साकार करा. नाईकेची जाहिरात पाहून फक्त कौतुक करत बसू नका, ती स्वतः जगा. तुमच्या देवाची पूजा करण्याचा हा नक्कीच एक मार्ग आहे!”  ... बाबा

संजय देशपांडे 


No comments:

Post a Comment