Thursday 22 August 2019

घर सुरक्षेची जबाबदारी कोणाची ?





















कुणीही व्यक्ती इतरांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून आपली सुरक्षा व्यवस्था तयार करू शकत नाही.” … विला कॅथर

विला सायबर्ट कॅथर या अमेरिकी कादंबरीकार होत्या. त्यांच्या कादंबऱ्यांमधून प्रामुख्यानं अमेरिकन भूमीत वसाहती करणारे व सीमा भागात राहणाऱ्यांचं चित्रण दिसून येतं.अमेरिका जेव्हा 1800 व्या शतकाची अखेर व 1900 व्या शतकाची सुरुवात या काळात मोठ्या सांस्कृतीक संक्रमणातून जात होता, त्या काळातलं त्यांचं लेखन असल्यामुळे साहजिकचं त्याचे पडसाद आपल्याला त्यांच्या लेखनातून जाणवतात म्हणुनच त्यांचं वर दिलेलं अवतरण ज्या काळातलं आहे तो सामाजीकरीत्या अत्यंत असुरक्षित काळ होता. खरंतर माझ्या मनात अनेक दिवसांपासून सुरक्षा या मुद्द्यावर लिहायचं होतं. कारण आपल्याकडे या मुद्याकडे अतिशय दुर्लक्ष केलं जातं. बांधकाम व्यवसायात काम करताना असं जाणवतं की घरं सुरक्षित करणं सर्वाधिक महत्वाचं आहे.खरंतर तीन घटनांमुळे मी या पैलूचा जास्त विचार करू लागलो. या तिन्ही घटना माझ्या अवतीभोवतीच व मी बांधलेल्या इमारतींमध्येच घडलेल्या आहेत मात्र माझ्याकडून अभियंता किंवा बांधकाम व्यावसायिक म्हणून काही त्रुटी राहिल्या हे त्यामागचं कारण नव्हतं  परंतु मात्र बांधकाम व्यावसायिक म्हणून नाही तर किमान नागरिक म्हणून मी या घटनांचाच एक भाग होतो.

घटना १ अ:  मी पुण्याच्या पश्चिम भागात मध्य वस्तीत असलेल्या पटवर्धन बाग नावाच्या भागातील एका दहा मजली इमारतीत राहतो. तुम्ही याला उच्चभ्रू वस्ती म्हणू शकता. ही इमारत साधारण वीस वर्षांपूर्वी बांधली आहे, जेव्हा सीसी टीव्ही वगैरे सुरक्षेची साधनं फारशी वापरली जात नव्हती.साधारण पंधरा वर्षांपूर्वी आमच्या सोसायटीमध्ये घरफोडीचा एक प्रकार झाला व मी तेव्हा सोसायटीचा अध्यक्ष होतो. त्यानंतर मी भक्कम लोखंडी ग्रीलने एंट्रन्स लॉबीच्या संपुर्ण भागाला बंदिस्त करून  घेतलं व प्रवेशापाशी लोखंडी सुरक्षाद्वार लावलं. आम्ही मध्यरात्रीनंतर प्रवेशद्वार बंद करू लागलो. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनमध्ये बसलेल्या सुरक्षा रक्षकाकडे त्याची किल्ली ठेवू लागलो. प्रत्येक सदनिकेला सुरक्षा रक्षकाच्या केबिनशी जोडणारी इंटरकॉम यंत्रणा आहे. कुणाही रहिवाशाला मध्यरात्रीनंतर बाहेर जायचे असेल किंवा यायचे असेल तर त्याला किंवा तिला त्यांच्या सदनिकेतून सुरक्षा रक्षकाच्या केबिनमध्ये कॉल करावा लागतो व त्यानंतर एंट्रन्स लॉबीतून प्रवेश करता येतो जिथे लिफ्ट आहेत.आमच्या सोसायटीत गेल्या पंधरा वर्षांपासून हीच पद्धत वापरली जातीय व सुदैवानं आमच्या सोसायटीमध्ये त्यानंतर चोरीचा एकही प्रकार झालेला नाही. साधारण दोन वर्षांपूर्वी सोसायटीतील सर्व इमारतींभोवती व इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी सीसी टीव्ही बसविण्यात आले.काही महिन्यांपूर्वी मध्यरात्री उशीरा पोलीस माझ्या घरी आले व मला सांगितलं की माझ्या शेजारच्या  फ्लॅटमध्ये राहणारा रहिवासी आमच्या इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी पडलेला आहे व काही गुंडांनी त्याला मारलं आहे.मी खाली गेलो व त्याला रुग्णालयात नेणे वगैरे औपचारिकता पूर्ण केल्या. रस्त्यावर झालेल्या भांडणाचं पर्यावसन मारामारित झालं होतं व सुदैवानं कुणालाही गंभीर जखमा झाल्या नाहीत. तरीही पोलीसांनी तक्रार दाखल केली व प्रवेशद्वाराच्या सीसीटीव्हीचं फुटेज मागितलं व रात्री कामावर असलेल्या सुरक्षा रक्षकाची चौकशी केली.फुटेजमध्ये एका कारमधून काही तरुण बाहेर पडल्याचं व माझ्या शेजाऱ्याला मारत असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. मात्र कॅमेऱ्याच्या दृश्यात त्यांचे चेहरे तसंच कारचा क्रमांक दिसत नव्हता. त्यानंतर इमारतीच्या सुरक्षा रक्षकानं माझ्या शेजाऱ्याला वाचवायचा प्रयत्न करण्याऐवजी किंवा मदत मागण्याऐवजी तिथून पोबारा केला होता. तो त्यानंतर परत आलाच नाही. त्यानं नोकरी सोडून दिल्याचं सुरक्षा एजन्सीच्या व्यवस्थापकानं आम्हाला नंतर सांगितलं.

घटना : आमच्याकडे एक स्वयंचलित लिफ्ट आहे व एक मॅन्युअल लिफ्ट आहे. माझी सत्तर वर्षांची आई काही दिवसांपूर्वी स्वयंचलित लिफ्टमध्ये अडकली. तर लिफ्टमध्ये लाईटही नव्हते व बाहेर कुणाशी बोलायचा मार्गही नव्हता.सुरक्षा रक्षक प्रवेशद्वारापाशी बसलेला होता. कुणी म्हातारी बाई लिफ्टमध्ये अडकलीये याचा त्याला पत्ताच नव्हता. सुदैवानं तिच्याकडे मोबाईल होता व मी घरी होतो. तिनं मला कॉल केला. त्यानंतर मी पटकन खाली गेलो व कसातरी लिफ्टचा दरवाजा उघडला व तिला बाहेर काढलं. आमचा सुरक्षा रक्षक साठहून अधिक वयाचा होता. त्याला बंद पडलेल्या लिफ्टमधून एखाद्या व्यक्तीला कसं बाहेर काढायचं हे त्याला माहिती नव्हतं तसंच लिफ्टचं दार उघडण्यासाठी जी शारिरीक ताकद असली पाहिजे ती त्याच्याकडे नव्हती  तसेच लिफ्ट ते सुरक्षा यंत्रणेपर्यंत किंवा सदनिकेपर्यंत इंटरकॉमची सोय नव्हती.

घटना २:  माझं कार्यालय माझ्या घराशेजारच्या इमारतीमध्ये आहे. या इमारतीत पहिल्या मजल्यावर दोन कार्यालयं आहेत, त्यातलं एक माझं आहे व वरच्या मजल्यावर सदनिका आहेत. तळमजल्यावर सहा दुकानं आहे व त्यांचा मुख्य इमारतीशी काहीही संपर्क नाही. आमच्याकडे येण्या-जाण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे, दिवसा एक सुरक्षा रक्षक असतो व रात्री दोन सुरक्षा रक्षक असतात. त्यातला एक प्रवेशद्वाराबाहेर बसतो व दुसरा आतमध्ये कुठेतरी बसतो.इथेही  लोखंडी सुरक्षा प्रवेशद्वार बसवून एंट्रन्स लॉबी सुरक्षित करण्यात आली आहे व तिला कुलुप घातलं जातं. अगदी गेल्या महिन्यापर्यंत मध्यरात्रीनंतर एंट्रन्स लॉबीचे लोखंडी सुरक्षा प्रवेशद्वार कुलुप लावून बंद केले जायचे, किल्ली सुरक्षा रक्षकाकडे असायची त्यामुळे कुणाही व्यक्तीच्या मध्यरात्रीनंतर येण्यावर नियंत्रण असायचं. या संकुलामध्ये 8 सीसी टीव्ही कॅमेरे आहेत ज्यातील पाच कॅमऱ्यांचे डिस्प्ले मॉनिटर एंट्रन्स लॉबीमध्ये असतात. तसेच पार्किंगमधील सोसायटीच्या कार्यालयात कॅमेरा इनपुट हार्डडिस्कमध्ये संग्रहित केलेले असते, या कार्यालयाला कुलुप असते. मला गेल्या आठवड्यात रविवारी सकाळी या इमारतीच्या एका सदनिकेत राहणाऱ्या रहिवाशाने कॉल केला की चोरांनी या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील एक सदनिका फोडली आहे. पोलीस आले व त्यांनी तपास सुरू केला. तपासात आढळले की दोन्ही सुरक्षा रक्षकांना चोर संकुलात कसे आले हे समजलं नव्हतं.प्रवेश मार्गिकेचे मुख्यद्वार कुणा सदनिका धारकाने सूचना दिल्यामुळे (असं सुरक्षा रक्षकाचं म्हणणं होतं) बंद करण्यात आलं नव्हतं. मार्गिकेतील सीसी टीव्ही डिस्प्ले मॉनिटर चोरांनी फोडला होता. तिसऱ्या मजल्यावर एकूण 3 सदनिका आहेत, मात्र त्यापैकी एकातील रहिवासी बाहेरगावी गेले असल्याने ती फोडण्यात आली, इतर दोन्ही सदनिकांचे दरवाजे चोरांनी बाहेरून लावून घेतले होते.आम्ही सर्व सदनिकांना लोखंडी सुरक्षा दरवाजे दिले आहेत, मात्र त्याचं ते कुलुप तोडण्यात आलं होतं. मुख्यदरवाजाचं लॅच लॉकही तोडून टाकण्यात आलं होतं.आम्ही सगळ्या सुरक्षा दरवाज्याला बाहेरून एक जास्तीचा कोंडा (बोल्ट) दिलेला आहे, म्हणजे कुणीतरी आत असताना कुणालाही बाहेरून दार बंद करता येणार नाही. पण त्यासाठी त्या जास्तीच्या कोंड्यामध्ये तुम्ही कुलुप लावलं पाहिजे, जे या दोन्ही रहिवाशांनी केलं नव्हतं. त्यामुळेच चोरांना त्यांचे फ्लॅट्स बाहेरून बंद करणं शक्य झालं.प्रत्येक मजल्यावरच्या जिन्याच्या लॉबीत सीसी टीव्ही कॅमेरे नव्हते. पोलीसांनी तळमजल्यावरील कॅमेऱ्यांचं सीसी टीव्ही फुटेज मागितलं तेव्हा त्यांना कळलं की डिस्प्ले सुरू होता मात्र रेकॉर्डिंग संग्रहित करणाऱ्या साधनाची बॅटरी बदलली नसल्यानं कोणतीही दृश्यं रेकॉर्ड झाली नव्हती. ती बॅटरी फक्त 50 रुपयांना मिळते. त्याशिवाय ही घटना होण्यापूर्वी सोसायटीतल्या कुणीही कधीही रेकॉर्डिंग तपासण्याची तसदी घेतली नव्हती. मुख्य एंट्रन्स लॉबीला कुलुप का लावलं नव्हतं असं विचारल्यावर इंटरकॉम आहे मात्र तो सुरू नसल्याने रात्री कुणी उशीरा आलं किंवा जायचं असेल तर सुरक्षा रक्षकाला सांगता येत नाही, म्हणून लोखंडी सुरक्षा दरवाजा उघडा ठेवण्यात आला. सोसायटीनंसीसी टीव्हीच्या तसंच इंटरकॉम यंत्रणेच्या देखभालीसाठी कंत्राट केलेलं नव्हतं.त्याचप्रमाणे सर्व रहिवाशांचे बाहेरचे दिवे गेला संपूर्ण आठवडा अज्ञात कारणांमुळे बंद होते. ते सुरू करण्याची तसदी कुणी घेतली नाही किंवा कृती करणं तर सोडा पण आठवडाभरापासून इमारतीभोवतालचे दिवे का बंद आहेत याची साधी चौकशीही केली नाही.  रात्रीच्या दोन सुरक्षा रक्षकांपैकी एक नवीन होता व दुसरा सुरक्षा रक्षक जुना होता पण तो मधुमेही होता व त्याच्या वैयक्तिक कर्जामुळे सोसायटीतील प्रत्येक सदनिकाधारकाकडे कायम पैसे मागत होता.

आणखी एक मुद्दा म्हणजे मार्गिकेतील कॅमेरा डीव्हीआरला म्हणजेच माझ्या कार्यालयातील रेकॉर्डिंग हार्ड डिस्कला जोडलेला होता. माझ्या कार्यालयातील इतरही कॅमेरे त्याला जोडलेले होते. मात्र जेव्हा हार्ड डिस्क तपासली तेव्हा ती भरलेली असल्याचं आढळलं व त्याची “ओव्हर राईट की” बंद होती. म्हणजेच हार्ड डिस्कची संग्रहित करण्याची क्षमता संपली होती, ज्यामध्ये साधारण महिनाभराचं रेकॉर्डिंग होतं.त्यानंतर मागचं रेकॉर्डिंग आपोआप डिलीट होतं व नवीन रेकॉर्डिंगसाठी जागा होते. माझ्या प्रशासकीय विभागातील लोकांनी ते तपासायची तसदी घेतली नाही तसंच देखभालीचं कंत्राट ज्यांना दिलेलं आहे त्यांनाही ते केलं नाही, त्यामुळे तो कॅमेराही निरुपयोगी ठरला.

घटना ३: त्याच रात्री आमच्या इमारती परिसरातील आणखी दोन इमारतीमध्येही चोरी झाली. कदाचित त्याच चोरांच्या टोळीने केली असावी. या इमारतींपैकी एकीमध्ये सीसी टीव्ही नव्हता किंवा एंट्रन्स लॉबीलोखंडी सुरक्षा दरवाजा नव्हता.दुसऱ्या एका इमारतीला एंट्रन्स लॉबीमध्ये लोखंडी सुरक्षा दरवाजा होता, मात्र देखभालीची रक्कम जमा होण्याबाबतच्या अडचणींमुळे रात्रीचा सुरक्षा रक्षक नव्हता व देखभालीचे कंत्राट केले नसल्याने सीसी टीव्ही सुरू नव्हता. 
सांगायची गोष्ट म्हणजे, चोरीच्या या घटना सुरू असताना, मी राहतो त्या इमारतीमध्ये, तसंच आमच्या शेजारच्या इमारतीमध्ये काहीही झालं नाही. दोन्ही इमारतींमध्ये प्रवेशद्वारापाशीच सुरक्षा रक्षक असतो, सीसी टीव्ही सुरू असतो व एंट्रन्स लॉबीला सुरक्षितपणे कुलुप लावलेलं असतं. तसंच आमच्या शेजारच्या इमारतीमध्ये पहाऱ्यासाठी तीन कुत्री आहेत ती रात्री सुरक्षा रक्षकांसोबत असतात.

आत्तापर्यंत वाचकांना माझ्या लेखाचं सार कळलं असेल ते म्हणजे आपल्या स्वतःच्या घराच्या सुरक्षिततेविषयी आपला दृष्टिकोन. माझा लेख वाचल्यानंतर अगदी शाळकरी मुलालाही सुरक्षेत कुठे त्रुटी होत्या ते समजेल. माझा अनुभव असा आहे की स्वतःचं संरक्षण करण्याच्या बाबतीत शाळकरी मुलं हीच आपल्या मोठ्यांपेक्षा अधिक शहाणी असतात.आता बरेच जण म्हणतील की पोलीस काय करत होते, आम्ही सरकारला कर देतो तर मग आम्ही सुरक्षेसाठी स्वतंत्र उपाययोजना करायची काय गरज आहे, सोसायटीचे अध्यक्ष व सचिव काय करत होते वगैरे, वगैरे.पण वरील अवतरणात म्हटल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही एखाद्या वास्तुला आपलं घर मानता तेव्हा त्याचं संरक्षण करणे ही तुमचीही जबाबदारी आहे. हे म्हणजे एखाद्याला आपल्याकडे जीवन विमा असल्यामुळे आपण मरणार नाही असं वाटत असतं, म्हणून तो दहाव्या मजल्यावरून उडी मारतो असं झालं.

मी जाणीवपूर्वक माझ्या भोवताली झालेल्या घटनाच निवडल्या आहेत. मला इमारतींच्या यंत्रणा व सुरक्षा व्यवस्थेचा एवढा अनुभव असूनही माझ्याही बारीकसारीक तपशील लक्षात आले नाहीत (दुर्लक्ष झालं). ते लक्षात घेतले असते तर चोऱ्या टाळता आल्या असत्या किंवा चोरांना घर फोडीची त्यांची योजना लांबवणीवर टाकावी लागली असती. वेळोवेळी सीसीटीव्ही यंत्रणा तपासणे, कर्जबाजारी सुरक्षा रक्षकाला कामावर न ठेवणे अशा अनेक गोष्टी करता आल्या असत्या. माझ्या इमारतीच्या स्वयंलित लिफ्टविषयी बोलायचं तर मी तिथे माझ्या खर्चानं इंटरकॉम बसवून घेतला कारण माझं कुटुंबही ती लिफ्ट वापरणार आहे. केवळ सोसायटी एखाद्या समस्येवर लवकर तोडगा काढत नाही म्हणून कुणीही लिफ्टमध्ये अडकू नये व अडकल्यास घाबरल्याने त्याच्या किंवा तिच्या तब्येतीवर परिणाम होऊ नये असं मला वाटतं. यावर बरेच जण म्हणतील की हे बरोबर नाही, सोसायटी किंवा अगदी सरकारही त्यांचं काम करत नाही म्हणून एखाद्याला आपल्या खिशातून सीसी टीव्ही दुरुस्ती किंवा इंटरकॉम अशा खर्चांसाठी पैसे का द्यायला लागावेत? तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण ज्यांचं घर फोडलं गेलंय, अनेक मूल्यवान वस्तू चोरल्या गेल्या आहेत त्यांना विचारा. मग तुम्हाला जाणवेल की तिनं किंवा त्यानं दुरुस्तीच काय संपूर्ण सीसी टीव्ही यंत्रणा बसवण्याचा खर्चही स्वतः केला असता. मी सोसायटी किंवा पोलीस यंत्रणेतील त्रुटींचं समर्थन करत नाही. मात्र प्रश्न जेव्हा आपल्या स्वतःच्या सुरक्षेचा असतो तेव्हा आपण थोडं आणखी जागरुक व्हायला नको का असा प्रश्न मला या शहरातल्या सगळ्या नागरिकांना विचारावासा वाटतो. जो सुरक्षा रक्षक तंदुरुस्त नाही व नेहमी रहिवाशांकडून पैसे मागत असतो त्याला काढून टाकण्यासाठी थोडा चौकसपणा दाखवण्याची व कृतीची गरज आहे. अशी व्यक्ती तुमच्या इमारतीच्या सुरक्षेतील त्रुटींविषयीची माहिती थोड्याशा पैशांसाठी चुकीच्या लोकांना विकू शकते किंवा चोर आल्यावर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकते, असं होऊ शकणार नाही का?

समजा तुमच्या बांधकाम व्यावसायिकानं काहीच सुरक्षा उपाययोजना करून दिलेल्या नसतील तर तुमच्या अंतर्गत सजावटीवर थोडा कमी खर्च करा व ते पैसे तुमचं घर व ते ज्या इमारतीमध्ये आहे तिची सुरक्षा थोडी वाढवण्यासाठी करा, हेच अधिक शहाणपणाचं होईल. त्याचप्रमाणे सुरक्षा म्हणजे केवळ काही साधनं बसवणं नाही तर तो एक दृष्टिकोन आहे. इमारतीमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवण्यापासून ते इमारतीमध्ये रात्री पुरेसा उजेड असेल याची खात्री करण्यासारख्या लहानसहान गोष्टींमुळेही तुमचं घर अधिक सुरक्षित होऊ शकतंत्याचप्रमाणे तुमच्या बांधकाम व्यावसायिकानं जी काही सुरक्षा साधने दिली असतील ती सुरू राहण्यासाठी त्यांच्यावर थोडा पैसा खर्च करा. यासाठी फार काही तांत्रिक ज्ञान असण्याची गरज नाही. तुमच्या घरातला टीव्ही बंद पडला तर तुम्ही लगेच टीव्ही दुरुस्त करणाऱ्या माणसाला बोलवता, असं असताना सोसायटीचा सीसी टीव्ही बंद असेल तर तुम्हाला कसं समजत नाही? याचं उत्तर असं आहे की तुम्हाला सीसी टीव्ही तपासण्याची गरज वाटत नाही. म्हणूनच सुरक्षेविषयी दुसऱ्या कुणाचा नाही तर तुमचास्वतःचाच दृष्टिकोन तुमच्या घराची सुरक्षा ठरवणार आहे. पोलीस जसे सराव संचलन करतात, तसंच तुम्ही स्थानिक पोलीस ठाण्यात कॉल करून तुमच्या इमारतीच्या सुरक्षाविषयक बाबी तपासून घेऊ शकता. त्यांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ते बदल करून घेऊ शकता, पण अडचण अशी आहे की पोलीसांनी हे सगळं आपणहून केलं पाहिजे अशी आपली अपेक्षा असते.आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा जवळपास 120 कोटी लोकांचा देश आहे. यातील अनेक लोक वंचित घटकातले आहेत. अशा परिस्थितीत पोलीस प्रत्येक घर सुरक्षित ठेवू शकत नाहीत हे कटू सत्य आहे. त्यांना त्यांची कारणं असतील किंवा मर्यादा असतील पण म्हणून आपणही आपल्या घराकडे दुर्लक्षं करावं असा होत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, वॉट्सअॅप व फेसबुकमधून थोडा वेळ काढून तुमच्या शेजाऱ्यांच्याही संपर्कात राहा. याची खरंच मदत होते कारण तेसुद्धा तुमच्या घराकडे लक्षं ठेवू शकतात.

सगळ्या शेवटी थोडंसं पोलीसांसाठी, पोलीस खाते आपले शहर सुरक्षित ठेवण्यासाठी अथक प्रयत्न करतात. मात्र कुठेतरी लोकांचा पोलीसांवरील विश्वास कमी होत चाललाय ही वस्तुस्थिती आहे. लोकांना आपण सुरक्षित आहोत असं वाटत नाही व हे नक्कीच सुदृढ समाजाचे लक्षण नाहीनागरिकांनी स्वतःच सुरक्षेची खबरदारी घेतली पाहिजे मात्र सीसी टीव्हीसारख्या गोष्टी एकप्रकारे शवविच्छेदनासारख्याच आहेत, नाही का? इतके सारे लोक चोरीचा मार्ग का पत्करतात किंवा त्यांची चोरी करायची हिंमत कशी होते, असा प्रश्न सरकार नावाच्या यंत्रणेनं स्वतःला विचारला पाहिजे. लोकांमध्ये सुरक्षितपणाची भावना निर्माण व्हावी असं सरकारला वाटत असेल तर त्यादिशेनं कृती करायलाच हवी आणि यासाठी पोलीसांचा गुन्हेगारांवर धाक हवाच 

इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनो एक लक्षात ठेवा पोलीस, सरकार, सोसायटीच्या कार्यालयातील कर्मचारी, सुरक्षा रक्षक, सुरक्षा साधने या सगळ्या गोष्टी तुमच्या घराच्या विम्यासारख्या आहेत. तुम्ही घर घेतल्यामुळे या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आहेत, त्यामुळे प्रत्येकाने या पॉलिसीचे हप्ते तरी वेळच्या वेळी भरले पाहिजेत.प्रश्न जेव्हा तुमच्या घराच्या सुरक्षेचा असतो तेव्हा, पॉलिसीचे हप्ते भरण्यासारख्या लहान सुरक्षाविषयक बाबींकडे तुम्ही स्वतः लक्षं दिलं पाहिजे. मात्र तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं किंवा दुसरं कुणीतरी तुमची जबाबदारी पूर्ण करेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःचं भविष्य स्वतःच लिहीलं आहे, एवढंच मी म्हणेन!



संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स



No comments:

Post a Comment