Sunday 5 January 2020

२०२० मध्ये तुमच्या घरखरेदीचा गुरुमंत्र!


























तुम्ही जेव्हा आरामदायी जीवनाच्या बाहेर पाऊल ठेवता तेव्हाच तुमच्यातील खऱ्या बदलाची सुरूवात होते, तुमची वाढ होऊ लागते व तुम्ही परिपक्व बनता .”… रॉय टी. बेनेट
रॉय बेनेट यांची ओहायो रिपब्लिकन पार्टीच्या (यूएसए) अध्यक्षपदी 1988 साली निवड झाली होती व 2009 पर्यंत ते त्या पदावर राहिले. बेनेट हे प्रमाणित सार्वजनिक लेखापाल होते व कर व व्यावसायिक कायद्यांमध्ये प्राविण्य असलेले वकील होते. आपण आणखी एका नवीन वर्षात प्रवेश करत असताना, रिअल इस्टेट उद्योगानं  सुद्धा त्यांचे वर उद्धृत केलेले शब्द समजून घेतले पाहिजेत किंबहुना त्याही पुढे जाऊन आत्मसात केले पाहिजेत असं मी म्हणेन. आता  जवळपास चार वर्षं होत आली आहेत, रिअल इस्टेट उद्योगातील सगळेजण एकच प्रश्न विचारताहेत (कारण सगळेजण अचंबीत आहेत), इथून पुढे परिस्थिती कशी असेल, म्हणजेच थोडक्यात घरे विक्रीचा वेग (भाव) पुन्हा कधी वाढेल! यातील विरोधाभास म्हणजे बांधकाम व्यावसायिक, तसंच रिअल इस्टेटमधील संबंधित व्यावसायिक म्हणजेच बांधकाम साहित्याचे विक्रेते, कंत्राटदार हा प्रश्न विचारत असताना, घराच्या ग्राहकांना सुद्धा त्यांच्या स्वप्नातले घर कसे व कुठे खरेदी करायचे असा प्रश्न पडला आहे. खरंतर रिअल इस्टेटमध्ये इतकी गोंधळाची परिस्थिती कधीच नव्हती. प्रत्येक जण दुसरा कधी पाऊल टाकतोय याची वाट पाहतोय, म्हणजेच बांधकाम व्यावसायिक त्यांच्याकडे तयार असलेल्या किंवा ते बांधत असलेल्या सदनिका ग्राहक कधी बुक करताहेत याची वाट पाहताहेत. ते यासाठी उत्तम (त्यांच्या दृष्टिकोनातून) ऑफरही देताहेत. तर ग्राहक मात्र बांधकाम व्यावसायिकांनी घरांच्या किमती आणखी कमी करण्याची वाट पाहात आहेत व ते प्रकल्प शक्यतो तयार असल्याचं पाहतात, म्हणजे करार केल्यानंतर ते लगेच घरात राहायला जाऊ शकतात.
मला असं वाटतं हा जो शेवटचा मुद्दा आहे तो रिअल इस्टेटमध्ये गेल्या चार दशकात झालेला सर्वात महत्त्वाचा बदल आहे. ना बांधकाम व्यावसायिक ना ग्राहक कुणीच समाधानी वा सुखीं नाहीततरीही इतर शहरांच्या तुलनेत विचार केला तर मी म्हणेन पुण्यातली स्थिती बरीच चांगली आहे (सुखद नसली तरीही), व्यवसाय थोडाफार तग धरून आहे. इथे बाजारात ग्राहक असल्यामुळे घरांना मागणी आहे, त्यांच्याकडे खरेदी करण्यासाठी पैसा आहे. आता केवळ बांधकाम व्यावसायिकांना योग्य ग्राहक शोधायचा आहे, त्याच्या गरजा जाणून घेऊन त्यानुसार उत्पादन तयार करून द्यायचं आहेइथे ग्राहकापेक्षा बांधकाम व्यावसायिकाचं काम सोपं आहे असं मी म्हणेन, आता माझ्या रिअल इस्टेटविषयीच्या या विधानावर अनेकांच्या भुवया उंचावतील हे मला माहिती आहे. मात्र बांधकाम व्यावसायिक पैसे कमवण्यासाठीच कोणताही प्रकल्प (म्हणजेच घरं) बांधतात. त्यासाठी त्यांची कंपनी ईमारत बांधते, तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते त्यांच्या इच्छेने (म्हणजेच सोयीने) प्रकल्पाची सुरूवात करू शकतात किंवा तो थांबवू शकतात. मात्र सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकाचं काय, तो (किंवा ती) जेव्हा एखादं उत्पादन म्हणून घर खरेदी करतात तेव्हा त्यांना अशी सुविधा असते का? याचं उत्तर आहे, अजिबात नसते. मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला तुम्हाला घर का खरेदी करायचं आहे असा पहिला प्रश्न विचारतो. बरेच जण म्हणतील, हा काय मजेशीर प्रश्न आहे, अर्थातच राहण्यासाठी, हे सोपं उत्तर आहे, नाही का? मात्र बरेचदा साध्या गोष्टीच साध्य करणं अतिशय अवघड असतं असं मी नाही तर महान तत्ववेत्त्यांनी म्हटलंय!
घराच्या ग्राहकांची बाजारात कशी परिस्थिती आहे हे आता मी समजून सांगतो, एखाद्या खरेदी उत्सवाच्या वेळी मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये जरी अवस्था होते, तशी त्यांची स्थिती आहे. तुमच्याकडे मर्यादित बजेट असतं (महत्त्वाचा निकष) व तुमच्याकडे पर्याय मात्र असंख्य असतात, यामुळेच गोंधळायला होतं. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसेल असं काय खरेदी करायचं आहे हे नेमकं माहिती नसतं, एका दुकानामध्ये तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसेल असं काहीतरी दिसतं, तुम्हाला ते आवडतंही. मात्र पुढच्या दुकानात आणखी चांगली ऑफर असेल व इथे खरेदी केली तर तिच्यावर पाणी सोडावं लागेल अशी मनात धाकधुक असते. तसंच तुम्ही दुसऱ्या दुकानातली ऑफर पाहायला पुढे गेलात आणि ती मनासारखी नसल्यानं मागे यावं लागलं तर आधीची संधीही हातची जाईल अशीही भीती वाटत असते. अशावेळी तुम्ही काय करता, माझा अनुभव असा आहे की तुम्ही काहीच निर्णय घेत नाही व काहीही खरेदी न करता परत येता. रिअल इस्टेट नावाच्या मॉलमध्येही अशीच परिस्थिती आहे. ग्राहक म्हणून तुम्हाला केवळ घराचीच काळजी असते असं नाही तर तुमच्या नोकरीची सुरक्षितता, तुमच्या मुलांचा शैक्षणिक खर्च, तुमच्या कारचे हप्ते, तुमच्या कौटुंबिक सहली, तुमचं आठवड्याला फिरायला जाणं, तुमची किरकोळ खरेदी, अशा सतराशे साठ गोष्टींमुळे खिशावर सतत ताणच असतो. या सगळ्या गरजांपैकी घर हे सर्वात महाग उत्पादन असल्यामुळे तुम्हाला त्याला काहीवेळा दुय्यम प्राधान्य द्यावे लागतेतुम्हाला आता माहितीय की रिअल इस्टेट मॉलमध्ये मेगा सेल लागलाय, त्यामुळे तुम्हाला आता घर घेण्यासाठी थांबणं परवडू शकतं. मात्र रिअल इस्टेट इतर उत्पादनांपेक्षा एका बाबतीत इतरांहून वेगळी आहे. ते म्हणजे रिअल इस्टेटचा कच्चा माल असलेली जमीन मर्यादित आहे. याचाच अर्थ असा होतो की तुम्ही घर का खरेदी करता आहात हे तुम्हाला माहिती असेल तर इतर वस्तूंएवढा निवडीला वाव नसतो. उदाहरणार्थ तुम्ही हिंजेवाडी आयटी पार्कमध्ये (पुण्याचे पश्चिकडील उपनगर) नोकरीला असाल तर वाघोला/खराडीमध्ये (पुण्याची पूर्वेकडील उपनगरे) शेकडो पर्याय असले, तरीही ते केवळ तुमच्या खिशाला परवडतात, लगेच ताबा मिळेल, प्रकल्प रखडण्यासारख्या कटकटींपासून सुटका होईल म्हणून तुम्ही खरेदी कराल का? तर अजिबात नाही, कारण पुण्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाऊन येऊन आजकाल जवळपास चार तास लागतात, म्हणजे तुम्हाला फक्त घरी झोपण्यासाठीच वेळ मिळेल. मेट्रोविषयी पूर्णपणे आदर राखत असं सांगावसं वाटतं की ती पूर्ण क्षमतेनी सुरू व्हायला अजून किमान दोन-तीन वर्षं तरी जावी लागतील. आपल्याकडचे सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय पाहता (आपला त्याबाबचा दृष्टिकोन पाहता) रहदारीची स्थिती आणखी बिकट होत जाणार आहे. तसंच एखाद्या मेट्रो स्थानकावर उतरल्यानंतर इच्छित ठिकाणी जाण्यासाठी बस सेवेसारख्या संलग्न सुविधांचं जाळं उभं राहायला हवं. म्हणून घर निवडताना आपल्या कामाच्या ठिकाणापासून ते घर, मुलांच्या शाळेपासून ते घर, तसंच आपल्याला दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारा प्रवास हे मुख्य घटक आहेत, ज्याचा अनेक लोकांना विसर पडतो.
त्यानंतर मुद्दा येतो सोयीसुविधांचा यामुळेही घर निवडताना गोंधळात भर पडते. माझा याबाबतीतला तर्क अगदी स्पष्ट आहे. मी मर्सिडीज कार विकत घेताना त्यातली आरामदायक आसने किंवा साईड मिरर किंवा अद्ययावत संगीत यंत्रणा यासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी खरेदी करत नाही. मी मर्सिडीज खरेदी करतो कारण मला त्या किमतीत अत्यंत चांगली कार मिळते, तिची कामगिरी उत्तम आहे, ती आरामशीर आहे तसंच सुरक्षित आहे. मला मर्सिडीज घेणं परवडू शकतं हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, याबाबतीत घर हे मर्सिडीजपेक्षा वेगळं नसतं. मी घर आराम, ऊब, सोय, सुरक्षा या सगळ्या गोष्टींसाठी खरेदी करतो. या सगळ्या गोष्टी अगदी वैयक्तिक आहेत त्यांचा स्विमिंग पूल, जिम, मुलांसाठी खेळायची जागा किंवा जॉगिंग ट्रॅक यासगळ्या घरासोबत दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा आहे, ते म्हणजे घर नाही. या सगळ्या गोष्टी निरुपयोगी आहेत असा त्याचा अर्थ होत नाही, त्या महत्त्वाच्या आहेतच मात्र त्याआधी तुमची आराम व उबदारपणाची व्याख्या काय आहे याचा विचार करा. एखादं घर तुमच्या बजेटमध्ये असेल, तिथून तुम्हाला बाजार, शाळा जवळ असेल, कामाला जाण्यासाठी प्रवासाचा वेळ काही तासांनी कमी होत असेल तर त्यालाच तुम्ही आराम, उबदारपणा म्हणाल नाही का? मात्र हेच घर वर नमूद केलेल्या इतर सोयी सुविधांसह मिळत असेल, राहायला जाण्यासाठी तयार असेल व मुख्य म्हणजे तुमच्या बजेटमध्ये असेल तर तुम्ही नक्कीच ते निवडाल. कारण त्याने तुमच्या खिशावर भार न टाकता आराम, उबदारपणा व सुरक्षितता हे तुमचे सर्व निकष पूर्ण केले आहेत. त्याचशिवाय या उत्पादनाचे निर्माते कोण आहेत हे पाहणेही अतिशय महत्त्वाचे आहे, मी मर्सिडीज खरेदी करतो कारण तिची विक्रीनंतरची सेवा अतिशय उत्तम आहे. इथे टोयोटा, बीएमडब्ल्यू व होंडानी (तसंच इतरही गाड्यांनी) नाराज व्हायचं कारण नाही, मी रिअल इस्टेटच्या ग्राहकांना उत्पादनाची निवड कशी कराल हे समजून सांगण्यासाठी मर्सिडीज केवळ उदाहरण म्हणून देतोय. इतर कोणत्याही उत्पादनाच्या उलट, रिअल इस्टेटमध्ये ताबा मिळाल्यानंतरही (म्हणजेच पोहोच मिळाल्यानंतर किंवा हस्तांतरणानंतर) इतरही बऱ्याच बाबी असतात. केवळ बांधकामाच्या दर्जा विषयकच नाही तर सोसायटीची स्थापना, तुमच्या घराचे मालकीहक्क हस्तांतरण यासारख्या कायदेशीर बाबीही असतात. या सगळ्या बाबीही तुमचा आराम, उबदारपणा, सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्त्वाच्या असतात. तुम्हाला सर्व सोयीसुविधांनीयुक्त घर तुमच्या बजेटमध्ये मिळाले (तुम्हाला असे वाटले) तरीही त्याचे काही काळ तुमच्या नावावर हस्तांतरणच झाले नाही किंवा एखाद्या घरामध्ये ताबा दिल्यानंतरही वॉर प्रूफिंग किंवा इलेक्ट्रिक दुरुस्ती यासारखी इमारतीच्या देखभालीच्या समस्या असतील, उत्पादन निर्माता (म्हणजेच बांधकाम व्यावसायिक) तुमच्या घराच्या दुरुस्तीकडे काणाडोळा करत असेल, तर तुम्हाला आरामात, शांतपणे राहता येईल का? तुम्ही आरामशीरपणाची तुमची व्याख्या करताना हा प्रश्न स्वतःला विचारा असं मी सुचवेन.
सरतेशेवटी सदनिका भाड्यानी देणं आणि खरेदी करणं यातल्या तुलनेवरून होणारा मोठा वाद; आता जोपर्यंत तुम्हाला तुमच्या आदर्श घराची व्याख्या करता येत नाही तोपर्यंत सदनिका भाड्यानं घ्यायला काही हरकत नाही. मात्र स्वतःचं घर खरेदी करणं आणि भाड्यानी घर घेणं यातला फरक ओला/उबरची सेवा विरुद्ध स्वतःचे वाहन खरेदी करण्यातल्या फरकाएवढा आहे, हे इतकं सोपं आहे. मी स्वतः उबरची सेवा  अनेकदा वापरतो मात्र नेहमी नाही कारण अनेकदा या सेवांमुळे विनाकारण मनस्ताप झाल्याचा, पैसे वाया गेल्याचाही अनुभव आहे. जोपर्यंत तुम्ही करिअर व तुमची प्राधान्ये याविषयी द्विधा मनस्थितीत आहात तोपर्यंत तुम्ही भाड्याच्या घरात राहू शकता. मात्र तुम्ही त्या घरात स्थायिक होऊ शकता का, तिथे तुम्हाला मनःशांती मिळू शकते का या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच द्यायचे आहे. या सगळ्या मुद्द्यांशिवाय तुमचे घर ही तुमची सर्वोत्तम मालमत्ताही असते, हा दर्जा इतर कोणत्याही वस्तूला मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती अगदी आर्थिक पंडितही मान्य करतात. सोन्याव्यतिरिक्त, इतर सर्व वस्तूंचे मूल्य कालांतराने कमी होते मात्र घरांचं तसं होत नाही (बहुतेक घरांचे). तुम्ही आपल्याला कसं घर हवं आहे हे व्यवस्थित समजून घेऊन त्यानंतर ते खरेदी केलं असेल हे खरंच आहे.
बांधकाम व्यावसायिक 2020 वर्षाकडे आशेने पाहात आहेत, माझं सांगणं आहे की जुन्या जाणत्यांनी सांगितल्याप्रमाणे मूलभूत गोष्टींनाच धरून राहा. आपण काय करू शकतो याच्यापेक्षाही आपण काय करू शकत नाही याची जाणीव असणं म्हणजेच परिपक्वता. तुम्ही काय आणि कसं बांधणार आहात याचं व्यवस्थित नियोजन करा. एकदा तुम्ही प्रकल्प बांधायला सुरूवात केली की त्याचं बांधकाम पूर्ण करामला रिअल इस्टेटमध्ये एक गोष्ट कळून चुकलीय की तुम्हाला आता अर्धवट किंवा निम्म्या पूर्ण केलेल्या प्रकल्पांमधून पैसे कमवता येणार नाहीत; तुम्हाला आता केवळ पूर्ण केलेल्या प्रकल्पांमधूनच थोडाफार पैसा मिळेल व तुम्ही इथे पैसे कमवण्यासाठीच आहात. मला असं वाटतं रिअल इस्टेटमध्ये वर्तमान काळात तुम्ही योग्य प्रकारेच पैसे कमवू शकता. त्याचवेळी शक्य त्या सर्व माध्यमांनी तसंच वैयक्तिक पातळीवरही तुमचे ग्राहक, विक्रेते, कंत्राटदार तसंच तुमच्या चमूतील सदस्यांच्या संपर्कात राहा. हा खरंच कठीण काळ आहे, तुम्ही कप्तान म्हणून हा काळ कसा हाताळता यावरच या सगळ्या घटकांची मनस्थिती अवलंबून असेल.
घर खरेदी करणाऱ्या प्रिय ग्राहकांनो, स्वच्छ दृष्टिकोन व खुल्या मनानं नवीन वर्षाचं स्वागत करा. एक लक्षात ठेवा हे 2020 आहे, तुम्हाला घरासाठी अनेक आकर्षक प्रस्ताव समोर येतील. मात्र घर खरेदी करणं कसोटी सामन्यासारखं आहे जे तुमच्या संयमाची, स्वभावाची कसोटी पाहील. मात्र एकदा तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवलं की घर सर्वार्थानं तुमचंच असेल!

संजय देशपांडे
smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स

No comments:

Post a Comment